वाटाडे भाग 4 - कासारी नदीचे पात्र सापडेना !

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
17 Apr 2018 - 3:01 pm
गाभा: 

1
वाटाडे भाग 4

कासारी नदीचे पात्र सापडेना !
17
गेलावडे धरण व कासारी नदीचे जुने पात्र...
महाराजांच्या वाटाड्यांनी ठरवलेला मार्ग कासारी नदीच्या मांजरे खेड्याच्या आसपास (सध्याच्या नकाशात ती जागा गेलावडे धरणाचा बांध असलेली दाखवली जाते.) पात्राला पकडले की गजापूरला (नकाशात धरणाच्या पाण्यात बुडलेला) मार्ग जायला सोपा होता. तेथून पुढे विशाळगडाच्या समोरील दरीत उतरून जर तेथील भागात सिद्दीच्या सैन्याचा तळ असेल तर त्याला कसे चकवायचे आणि विशाळगडावरच्या गडकऱ्याला खालून हमी देऊन दरवाजे उघडायला भाग पाडायचे अशी आव्हाने स्वीकारायची होती.

जाना था जापान! पहुंच गये चीन!! पण झाले ते बरे झाले...!!!

वाटाड्यांच्या मतभेदाची कारणे-
कांही वाटाड्यांच्या म्होरक्यांच्या मते सोनुर्ले नंतर बुरंबळला जाऊन तेथून मांजरेच्याजवळ नदीला पकडता येईल तर काहीं म्होरक्यांचे मत पडले की येलवडेच्या पठारावरून (सध्याच्या) करणजोशी गावापाशी, खाली उतरून (सध्याच्या) कांटे गावाजवळ जरी तो मार्ग लांबचा असला तरी कासारी नदीचे पात्र नक्की येईल. एकदा नदीपात्र धरले की पुढचा गजापूरला जायचा मार्ग सोईचा होईल. (आजच्या 3डी व अन्य आधुनिक उपकरणांनी उपलब्ध नकाशाच्या सोईवरून दोन्ही बाजूच्या वाटाड्यांचे म्होरके त्याकाळात नकाशा न पाहता बरोबरच बोलत होते हे लक्षांत येते. )
खालील नकाशातून दोन्ही वाटा कासारी नदीवरील सद्याच्या गेलावडे धरणाच्या त्या वेळच्या नदीच्या पात्राकडे कशा नेतात. ते कळेल.
1.जवळचा मार्ग बुरंबळकडून मांजरे गावाकडे वरून...
2. खालून वळसा घालून नदीपात्राच्या बाजूने ...
1. 17
2. कांटे गावाकडे जाण्याच्या शक्यता गुगल नकाशा दाखवतो.
18

पण घडले भलतेच!
(जर वरीलपैकी पहिल्या पर्यायातून ते गजापूरच्या वाटेला लागले असते तर किंवा दुसरा लांबचा मार्ग महाराजांनी घेतला असता तर त्यांना गजापूरच्या माळावर पोहोचायला जो जास्त वेळ लागला असता तोवर सिद्दीचे सैन्य त्यांच्या शोधात गजापूरच्या उघड्या माळावर समोरासमोर आले असते. मैदानातील लढाईत सैन्याची कमी संख्या, तुटपुंजे शस्त्रबळ, जास्त संख्येच्या सैन्याशी मुकाबला व्यर्थ जाऊ शकले असते. पण महाराजांचा जथ्था चुकीने पांढरेपाणीकडे पोहोचला व नंतरच्या सैन्य मांडणीतून लढ्याचे चित्र बदलून गमिनीकाव्यात रुपांतरित झाले. ‘अडचणीतून संधी शोधतो तो सिकंदर ठरतो’ असा निष्कर्ष निघतो)

वाटाड्यातील लोकांची एक वाक्यता नसणे आणि लोंबत्या ढगांच्या गर्दीतून हवी ती वाट न सापडल्याने जंगलातील चढांच्या अरुंद पायवाटेने पुढे सरकत जाताना ‘आपण ठरवलेल्या जागी जाणाऱ्या रस्त्याने जात नसू’ असे वाटून देखील पर्याय नसल्याने पुढे जात राहून एखादा पठारी प्रदेश आला की आढावा घेऊ असे ठरवून महाराजांचा जथ्था हळूहळू पुढे सरकत असावा. असे करता करता महाराजांचा जथ्था पांढरे पाणी या पठारी प्रदेशात पोहोचला असावा. तोवर आणखी वेळ टळून सकाळचे 9 ते 10 वाजले असावेत. वाटाडे चूक का बरोबर हा विचार बाजूला ठेऊन आता इथून पुढे कसे जायचे? यावर वरिष्ठ सैन्य पदाधिकारी व महाराजांच्यात मसलत होत असावी. तोवर किती सैनिक बरोबर आले? किती वेगवेगळ्या कारणांनी पोहोचू शकले नाहीत? याची तपासणी करायचे काम महाराजांच्या सरदारांनी करून कमीत कमी 25 ते 30 जणांना इथे पर्यंत येता आलेले नाही असे ठरले. ते वाट चुकून किंवा चुकवून मधून निघून गेले असावेत किंवा जखमी होऊन पुढे यायच्या अवस्थेत नसावेत असे मानले गेले. काही तरीही कसेबसे बरोबर आले तरी त्यांना विश्रांती व मलमपट्टीची गरज असावी म्हणून जमेल तसे सैन्याच्या बरोबर राहा म्हणून महाराजांनी दिलासा दिला असेल.
जर तोतया शिवाजी सापडला गेला असेल तर सिद्दीचे घोडदळ कधीही आपल्याला शोधत येऊ शकते याची धास्ती शिवाजी महाराजांना असावी. या भागातून थोडे पुढे गेले की कासारी नदीचे उगमाचे पात्र लागते त्यात लपायची सोय होऊ शकते. असे माहिती काढता समजले असावे. म्हणून तिथेच थांबावे आणि मुकाबला करावा किंवा दोन भाग करून एकाने लपून राहायचे व महाराजांनी या खिंडीच्या पात्रात न उरता उताराच्या अन्य वाटेने गजापुरच्या जायला निघायचे. असे दोन पर्याय महाराजांना असावेत असे मिलिट्री कमांडर मानतात.
कासारी नदीच्या उगमापाशी आल्यावर, समोरच्या दूरदृष्यात सखोल भागातील कासारी नदीचे वळणदार पात्र, गजापुरच्या खेड्याचा भाग त्यापलिकडे विशाळगडाचा डोंगरमाथा वगैरे पाहता वाटाड्यांची उपयुक्तता संपल्यात जमा झाली असावी. बाजी प्रभूंच्या नेतृत्वाखालची पथके भातशेतीच्या खाचरातून चालायला, कामाला तरबेज व जास्त काटक म्हणून संखेने जास्त असावीत. त्यांच्या बरोबरच्या अन्य सरदारांना बाजी प्रभूंची वरिष्ठता (सिनियॉरिटी) व अनुभव मान्य असल्याने बाजीप्रभूंना खिंडात लपून हल्ला करायच्या मोहिमेवर निवडणे महाराजांना सोपे गेले असावे. उरलेल्यांनी महाराजांच्या बरोबरच्या खास पलटनीशी संपर्कात राहून पुढची वाट धरावी असे ठरवले गेले असावे असे मिलिटरी कमांडरांना वाटते. आपापल्या पथकांना शस्त्रे व अन्य बरोबरच्या सामानाची वाटणी करून ते लगेच डोलीकरांना बरोबर घेऊन निघाले असावेत. (सध्याच्या काळात याला ‘रोड क्लियरन्स पार्टी’ म्हणतात. पुढे जाऊन मागावून येणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती वा सैन्याला वाटेत दगाफटका न होण्यासाठी वाटा सुरक्षित करणे हे त्यांचे काम असते.)
महाराज बाजींच्या बरोबर थांबून जर खिंडीत आपल्या सैनिकांना शत्रूच्या सैन्याने वरून व खालून दाबून धरले तर खिंडीतून बाहेर पडा व मोकळ्या जागेच्या ठिकाणी आपापली शस्त्रे, विशेषतः दांडपट्ट्याचे पथक उभे करून शेवटचा प्रहार करत रहा. आम्ही विशाळगडावरील परिस्थिती पाहून प्रवेश केला की ताबडतोब तोफांच्या आवाजाची खूण करून सुखरूप असल्याची बातमी देतो. पावसाचे मान पाहून धूर करता आला तर ते पाहतो. आपण शेवटपर्यंत खिंडीतून शक्यतो बाहेर पडून नका. जोवर शेवटचा शिपाई आहे तोवर सिद्दीच्या सेनेला सिवाचे सैन्य कासारीनदीच्या पात्राच्या खिंडीतच लपले असेल याची खात्री वाटत राहील. सिद्दीला मी (सिवा) पण इथेच असू शकतो याची खात्री वाटून तो विशाळगडाच्या वाटेला जायचे टाळेल. असे विचार करून महाराज बाजींचा निरोप घेऊन निघाले असतील. बाजींच्या बरोबर पुन्हा भेट होईलच असे नाही असे वाटून भावपूर्ण गळाभेट होणे स्वाभाविक वाटते.
...

महाराजांनी जाण्यापूर्वी जखमी सैनिकांची विचारपूस करून म्हटले असावे की पांढरे पाणी पासून पुढील वाटेत बसा... जर पाठलाग करणाऱ्या सैन्याने त्यांना पकडून विचारले तर, ‘हो आम्ही शिवाजी महाराजांबरोबरच होतो पण जखमी झाल्याने त्यांनी आम्हाला इथेच सोडून दिले. आमची योजना कासारी नदीच्या पात्रात लपायची होती असे महाराजांनी आम्हास सांगितले होते’. असे सांगायला सांगितले असावे. काही परत जाणाऱ्या वाटाड्यांना मुद्दाम तिथे थांबायला लावून, ‘चला आम्ही तुम्हाला त्या कासारी नदीचे उगम पात्र दाखवतो’ म्हणून पाठलाग करणाऱ्या सैन्याला बरोब्बर त्या दरीत उतरवायला भाग पाडले असावे. त्यासाठी वेगळे जादा कामाचे पैसे त्यांना चुकते केले गेले असावेत. घोड्यांच्या दलाच्या धावण्यातून दुरून उधळलेला मातीच्या रंगाची धूसर धूळ, टापांचे कानात बसलेले आवाज यातून पाठलागावरील सैन्य आसपास आले असावे असे वाटून विविध शस्त्रे व इतर सामानाची वाटणी करून बाजींबरोबरच्या सैन्याला दोर शिड्या, पाण्यात पडले तर पकडायला गळ, गोफणींच्या दगडांच्या पिशव्या व बाणांचे गठ्ठे दांडपट्ट्यांच्या जोड्या वगैरे शस्त्र संभार बाजींच्या सैन्याला जास्त दिले गेले असावे. गडाचे दरवाजे फोडायची वेळ आली तर म्हणून पहारी, घण, जादा तलवारी, यांनी भरलेल्या बुट्टीडोल्या घेऊन महाराज सटकले असावेत.
या दरम्यान बाजींच्या एका पथकाने नदीच्या पात्रात उतरायला पाठवलेल्या सैनिकांनी एक धबधबा लागतो तो पार केला तर खूप लांबवर घळ आहे त्यात लपता येईल असे काही वाटाड्यानी सांगितले तसे ते खरोखर आहे अशी खात्री करून सर्वांनी दोर शिड्यांच्या मदतीने धबधब्याची वाट उतरायला सुरवात केली असावी.

सिद्दी मसूदच्या हालचाली

त्याने बरोबर आणलेल्या वाटाड्यांच्या सोबत काही मराठ्यांची पथके बरोबर होती. पहाट झाल्यावर वाटेवरच्या वस्त्यातील लोकांशी ते गावच्या भाषेत संपर्क करून ते मजल दर मजल करत पुढे येत असावेत. अशा लोकांना पैसे देऊन ऩंतर त्याच वाटेवरू येणाऱ्या सैन्याला आम्ही गजापूरच्या बाजूला गेल्याची बातमी व वाट सांगा म्हणून तयार केले गेले असावे.
सिद्दीचा जावई मसूद विशाळगडावर सिवा पोचलाच तर तिथे त्याला पकडायला हवा म्हणून त्यांच्या पथकामागाऊन येणारे बरेच मोठे घोडदळाचे व पायदळाचे सैन्य एकत्र जाण्यासाठी वाट पहावी असे ठरवून असावा. पुढे सरकताना त्याच्या सरदारांना वाटेत जखमी पडलेले मावळे सापडले असावेत. त्यांची दमलेली व जखमी हालत पाहून ते जे सांगतायत त्यावर विसंबून राहावे असे वाटले असावे. त्या शिवाय त्यांनी सिवाला इथवर घेऊन आलेले वाटाडे पकडल्यावर त्यांच्या तोंडून देखील जर सांगतायत की शिवा कासारी नदीच्या पात्रात लपला आहे तर आणखी पुढे न जाता याच नदीच्या पात्रात उतरून शिवाजीला पकडून किंवा मारून नेता येईल असा आपापसात विचार करून घोडदळातील सैन्याला खाली पात्रात उतरवले असेल. मागावून निघालेली पायदळाची आणखी कुमक 2 ते 3 तासाच्या नंतर तिथे पोहोचली असेल तोवर दुपारचे 12 वाजून गेले असावेत.

लढाईची वेळ आली आहे. आता आपली उपयुक्तता संपली आहे. जर आपण त्यात सापडलो तर जीवंत राहायची खात्री नाही असा असा रागरंग पाहून उरलेल्या वाटाड्यांनी, संधी साधून जंगलाच्या झाडीतून पसार व्हायला सुरवात केली असावी.

वाटाड्यांची संगत लेखमाला भाग 4 समाप्त.
...

प्रत्यक्ष लढ्याचे आयोजन कसे केले असावे? ते यापुढे...

प्रतिक्रिया

अभिदेश's picture

17 Apr 2018 - 5:22 pm | अभिदेश

डोळ्यांसमोर सगळं उभं करताय...

शशिकांत ओक's picture

17 Apr 2018 - 5:35 pm | शशिकांत ओक

लेखनातील त्रुटी असतील तर जरूर सांगत रहा...

वरुण मोहिते's picture

17 Apr 2018 - 6:23 pm | वरुण मोहिते

धागे वाचत आहे. पुढील माहितीच्या / धाग्याच्या प्रतिक्षेत

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2018 - 8:48 pm | श्रीगुरुजी

उत्कृष्ट माहिती!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Apr 2018 - 9:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्कृष्ट धागा. एकेका प्रसंगांचा सविस्तर विचार करून ती मोहीम कशी घडली असावी याचे चित्र समोर उभे केले आहे !

पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत.

आनन्दा's picture

17 Apr 2018 - 9:43 pm | आनन्दा

फारच छान लिहीत आहात.

चित्रगुप्त's picture

17 Apr 2018 - 10:28 pm | चित्रगुप्त

अत्यंत अभ्यासपूर्ण आणि वाचनीय धागा. कृपया कमी प्रतिसादांमुळे हतोत्साहित होऊन लेखन थांबवू नका. खरेतर असे लेख जास्त आले पाहिजेत इथे.

महाराज बाजींच्या बरोबर थांबून जर खिंडीत आपल्या सैनिकांना शत्रूच्या सैन्याने वरून व खालून दाबून धरले तर खिंडीतून बाहेर पडा व मोकळ्या जागेच्या ठिकाणी आपापली शस्त्रे, विशेषतः दांडपट्ट्याचे पथक उभे करून शेवटचा प्रहार करत रहा. आम्ही विशाळगडावरील परिस्थिती पाहून प्रवेश केला की ताबडतोब तोफांच्या आवाजाची खूण करून सुखरूप असल्याची बातमी देतो. पावसाचे मान पाहून धूर करता आला तर ते पाहतो. आपण शेवटपर्यंत खिंडीतून शक्यतो बाहेर पडून नका. जोवर शेवटचा शिपाई आहे तोवर सिद्दीच्या सेनेला सिवाचे सैन्य कासारीनदीच्या पात्राच्या खिंडीतच लपले असेल याची खात्री वाटत राहील. सिद्दीला मी (सिवा) पण इथेच असू शकतो याची खात्री वाटून तो विशाळगडाच्या वाटेला जायचे टाळेल. असे विचार करून महाराज बाजींचा निरोप घेऊन निघाले असतील.

कधीकधी वाक्यरचना क्लिष्ट आणि गोंधळात पाडणारी होते आहे असं वाटतं. लांब वाक्यं, कर्तरी कर्मणि वारंवार बदलणे हे टाळता येईल.

विषय मात्र रोचक आहे.

शशिकांत ओक's picture

19 Apr 2018 - 9:53 am | शशिकांत ओक

वाक्य रचनेतून वाचणार्‍यांच्या कल्पना शक्तीला ताण बसू नये ही सुचना आवडली. महाराज बाजीरावांना थांबून म्हणाले असतील... 'जर...
(मग हे संभाषण मग सुगम होईल)
धन्यवाद. सूचनेबद्दल.

दुर्गविहारी's picture

19 Apr 2018 - 1:27 pm | दुर्गविहारी

वेळेअभावी प्रतिसाद देता आला नव्हता. आज सविस्तर प्रतिसाद देतो.

महाराजांच्या वाटाड्यांनी ठरवलेला मार्ग कासारी नदीच्या मांजरे खेड्याच्या आसपास (सध्याच्या नकाशात ती जागा गेलावडे धरणाचा बांध असलेली दाखवली जाते.) पात्राला पकडले की गजापूरला (नकाशात धरणाच्या पाण्यात बुडलेला) मार्ग जायला सोपा होता. तेथून पुढे विशाळगडाच्या समोरील दरीत उतरून जर तेथील भागात सिद्दीच्या सैन्याचा तळ असेल तर त्याला कसे चकवायचे आणि विशाळगडावरच्या गडकऱ्याला खालून हमी देऊन दरवाजे उघडायला भाग पाडायचे अशी आव्हाने स्वीकारायची होती.

यापुर्वी लिहील्याप्रमाणे अशी मोहिम राबवण्याआधी महाराजांनी किमान दोन वेळा गुप्तहेर यामार्गे विशाळगडावर पाठवून किती वेळ लागतोय, वाटेतील सगळी आव्हाने, जर युध्दाची वेळ आली तर गनिमीकाव्यासाठी योग्य जागेची पहाणी हे केलेले असणार. हे गुप्तहेरच वाटाडे असणार, त्यांनी स्थानिकांच्या मदतीने वाटा धुंडाळून ठेवल्या असणार. लक्षात घ्या, हा प्रदेश नुकताच स्वराज्यात आला आहे. तेव्हा इथल्या स्थानिक लोकांच्या निष्ठा नक्की माहिती नसताना, महाराज त्यांच्यावर अवलंबून राहिले नसतील. तेव्हा वाटाडे चुकणे, वगैरे मुद्यात फार तथ्य नाही. शिवाजी राजांबरोबर असलेले सहाशे मावळे बांदल होते. हे हिरडस मावळ या प्रदेशातील लोक. हिरडस मावळ म्हणजे, सध्याचा भोर परिसर. या परिसरात तुफान पाउस असतो. ( मी अनुभव घेतलाय ) तेव्हा या लोकांना चिखलांने भरलेल्या वाटा, जळवा, घसारा याची सवय असणारच. तेव्हा त्यांच्यासाठी या मार्गाने जाणे हे आव्हान असणार नाही.
तेव्हा असा पलायनाचा बेत आहे, याचा निरोप विशाळगडाच्या किल्लेदाराला आधीच दिलेला असावी. शिवकालातील शिस्त पहाता, कोणीही उठून 'मी शिवाजी आहे', हे सांगून गडात प्रवेश करु नये यासाठी कदाचित सांकेतीक शब्दही ठरवला असावा. तेव्हा विशाळगडाच्या किल्लेदाराला हमी देत बसण्याएवढा वेळ वाया घालवणे शक्यच नव्हते. त्याची योजना आधीच तयार असणार.
आपली चर्चा ज्या परिसराभोवतॉ केंद्रीत आहे, त्याचा टेरीयन मॅप आणि भौगोलिक नकाशा टाकतो.
Gajapur parisar1

Gajapur parisar2

नकाशा पहाता, एक गोष्ट लक्षात येते, सध्याचा गाडीरस्ता वरून जातो, तशीच पाउलवाट त्या काळात असणे शक्य आहे. कदाचित कासारी नदीवर पुलही असू शकतो. हा परिसर गेळवडे धरणाच्या बॅकवॉटरम्धे गेल्याने ठाम विधान अवघड आहे. मात्र हे दोन्ही गड पन्हाळ्याच्या शिलाहार राजाची निर्मीती असल्याने, यामधे रुळलेली वाट नक्कीच असणार. शिलाहरांचा कालखंड अकरावे शतक धरला, तरी सतराव्या शतकापर्यंत इथे चांगलीच ये जा होती. अर्थात उत्तम वाटांशिवाय ते शक्य नाही, कारण कोकणातून विशाळगडावर चढणारी वाट खुपच खडी आहे, अर्थात तिथून रसद आणने सोयीचे नाही.
शिवाय या वाटेने जलद लष्करी हालचाली शक्य होत्या. उदा- संभाजी महाराज संगमेश्वरला आहेत, हि बातमी मुकरबखानाला समजली तेव्हा तो पन्हाळ्याला होता. तेव्हा लवकर पोहचायचे या हेतुने तो याच वाटेने कोकणात उतरला.

जर तोतया शिवाजी सापडला गेला असेल तर सिद्दीचे घोडदळ कधीही आपल्याला शोधत येऊ शकते याची धास्ती शिवाजी महाराजांना असावी. या भागातून थोडे पुढे गेले की कासारी नदीचे उगमाचे पात्र लागते त्यात लपायची सोय होऊ शकते. असे माहिती काढता समजले असावे. म्हणून तिथेच थांबावे आणि मुकाबला करावा किंवा दोन भाग करून एकाने लपून राहायचे व महाराजांनी या खिंडीच्या पात्रात न उरता उताराच्या अन्य वाटेने गजापुरच्या जायला निघायचे. असे दोन पर्याय महाराजांना असावेत असे मिलिट्री कमांडर मानतात.

मुळात अत्यंत कमी वेळ हाताशी, सैन्यबळही कमी असे असताना, कुठेतरी लपण्याची शक्यता मला अशक्य वाटते. सुरक्षित जागा फक्त एकच होती, विशाळगड. काहिही करुन तो गाठणे आवश्यक होते. ज्या कासारी नदीचा उगमावर चर्चा केली जाते आहे, तो अत्यंत दुर्गम भाग आहे. आत्ताही तिथे खाली उतरायला जागा नाही, तेव्हाही नव्हती. शिवाय एन आषाढात पाणी तुफान वेगाने अक्षरशः फुफाटत असताना, हि कसरत करायची गरज काय?

हाराज बाजींच्या बरोबर थांबून जर खिंडीत आपल्या सैनिकांना शत्रूच्या सैन्याने वरून व खालून दाबून धरले तर खिंडीतून बाहेर पडा व मोकळ्या जागेच्या ठिकाणी आपापली शस्त्रे, विशेषतः दांडपट्ट्याचे पथक उभे करून शेवटचा प्रहार करत रहा. आम्ही विशाळगडावरील परिस्थिती पाहून प्रवेश केला की ताबडतोब तोफांच्या आवाजाची खूण करून सुखरूप असल्याची बातमी देतो. पावसाचे मान पाहून धूर करता आला तर ते पाहतो. आपण शेवटपर्यंत खिंडीतून शक्यतो बाहेर पडून नका. जोवर शेवटचा शिपाई आहे तोवर सिद्दीच्या सेनेला सिवाचे सैन्य कासारीनदीच्या पात्राच्या खिंडीतच लपले असेल याची खात्री वाटत राहील. सिद्दीला मी (सिवा) पण इथेच असू शकतो याची खात्री वाटून तो विशाळगडाच्या वाटेला जायचे टाळेल. असे विचार करून महाराज बाजींचा निरोप घेऊन निघाले असतील. बाजींच्या बरोबर पुन्हा भेट होईलच असे नाही असे वाटून भावपूर्ण गळाभेट होणे स्वाभाविक वाटते.

विशाळगडाच्या परिसरात पडणारा पाउस विचारात घेता आणि विशाळगडावरती उपलब्ध असणार्‍या तोफा विचारात घेता, बाजीप्रभु लढले ते ठिकाण विशाळगडापासून दोन- तीन कि.मी.वर असावे असे माझे मत आहे.

महाराजांनी जाण्यापूर्वी जखमी सैनिकांची विचारपूस करून म्हटले असावे की पांढरे पाणी पासून पुढील वाटेत बसा... जर पाठलाग करणाऱ्या सैन्याने त्यांना पकडून विचारले तर, ‘हो आम्ही शिवाजी महाराजांबरोबरच होतो पण जखमी झाल्याने त्यांनी आम्हाला इथेच सोडून दिले. आमची योजना कासारी नदीच्या पात्रात लपायची होती असे महाराजांनी आम्हास सांगितले होते’. असे सांगायला सांगितले असावे. काही परत जाणाऱ्या वाटाड्यांना मुद्दाम तिथे थांबायला लावून, ‘चला आम्ही तुम्हाला त्या कासारी नदीचे उगम पात्र दाखवतो’ म्हणून पाठलाग करणाऱ्या सैन्याला बरोब्बर त्या दरीत उतरवायला भाग पाडले असावे. त्यासाठी वेगळे जादा कामाचे पैसे त्यांना चुकते केले गेले असावेत. घोड्यांच्या दलाच्या धावण्यातून दुरून उधळलेला मातीच्या रंगाची धूसर धूळ, टापांचे कानात बसलेले आवाज यातून पाठलागावरील सैन्य आसपास आले असावे असे वाटून विविध शस्त्रे व इतर सामानाची वाटणी करून बाजींबरोबरच्या सैन्याला दोर शिड्या, पाण्यात पडले तर पकडायला गळ, गोफणींच्या दगडांच्या पिशव्या व बाणांचे गठ्ठे दांडपट्ट्यांच्या जोड्या वगैरे शस्त्र संभार बाजींच्या सैन्याला जास्त दिले गेले असावे. गडाचे दरवाजे फोडायची वेळ आली तर म्हणून पहारी, घण, जादा तलवारी, यांनी भरलेल्या बुट्टीडोल्या घेऊन महाराज सटकले असावेत.
या दरम्यान बाजींच्या एका पथकाने नदीच्या पात्रात उतरायला पाठवलेल्या सैनिकांनी एक धबधबा लागतो तो पार केला तर खूप लांबवर घळ आहे त्यात लपता येईल असे काही वाटाड्यानी सांगितले तसे ते खरोखर आहे अशी खात्री करून सर्वांनी दोर शिड्यांच्या मदतीने धबधब्याची वाट उतरायला सुरवात केली असावी.

या सर्व शक्यता मला फारशा शक्य वाटत नाहीत.

सिद्दीचा जावई मसूद विशाळगडावर सिवा पोचलाच तर तिथे त्याला पकडायला हवा म्हणून त्यांच्या पथकामागाऊन येणारे बरेच मोठे घोडदळाचे व पायदळाचे सैन्य एकत्र जाण्यासाठी वाट पहावी असे ठरवून असावा. पुढे सरकताना त्याच्या सरदारांना वाटेत जखमी पडलेले मावळे सापडले असावेत. त्यांची दमलेली व जखमी हालत पाहून ते जे सांगतायत त्यावर विसंबून राहावे असे वाटले असावे. त्या शिवाय त्यांनी सिवाला इथवर घेऊन आलेले वाटाडे पकडल्यावर त्यांच्या तोंडून देखील जर सांगतायत की शिवा कासारी नदीच्या पात्रात लपला आहे तर आणखी पुढे न जाता याच नदीच्या पात्रात उतरून शिवाजीला पकडून किंवा मारून नेता येईल असा आपापसात विचार करून घोडदळातील सैन्याला खाली पात्रात उतरवले असेल. मागावून निघालेली पायदळाची आणखी कुमक 2 ते 3 तासाच्या नंतर तिथे पोहोचली असेल तोवर दुपारचे 12 वाजून गेले असावेत.

जिथे महाराजांच्या दृष्टीने एक एक मावळा महत्वाचा होता, तिथे असे जखमी मावळे वाटेत सोड्ले जातील असे वाटत नाही. कदाचित आजुबाजुच्या गावात त्यांची सोय केलेली असावी.
असो. अत्यंत विचारप्रवर्तक असे तुमचे धागे आहेत.
पु.भा.प्र.

गामा पैलवान's picture

19 Apr 2018 - 5:44 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,

जिथे महाराजांच्या दृष्टीने एक एक मावळा महत्वाचा होता, तिथे असे जखमी मावळे वाटेत सोड्ले जातील असे वाटत नाही.

माझ्या ऐकीव माहितीनुसार गजापूर गावांत शिवाजीने पंचवीसेक मावळ्यांची तुकडी सोडली होती. तिचं काम लढण्याचं नसावं. बहुतेक दिशाभूल करण्यासाठी जखमी असल्याची बतावणी करून सोडलेली असावी. सिद्दी मसूदने त्या सर्वांना कापून काढलं.

आ.न.,
-गा.पै.

दुर्गविहारी's picture

19 Apr 2018 - 7:49 pm | दुर्गविहारी

हे आपण कोणत्या पुस्तकात वाचले ? बाकी महाराजांना एकेक मावळा किती महत्त्वाचा होता हे आग्रा प्रकरण आठवुन बघा. माझा तरी यावर विश्वास बसत नाही

गामा पैलवान's picture

19 Apr 2018 - 8:35 pm | गामा पैलवान

आठवत नाही. :-(

पण मनुष्यबळाची विभागणी बहुधा बाजींवर सोडली असावी.

-गा.पै.

शशिकांत ओक's picture

19 Apr 2018 - 10:20 pm | शशिकांत ओक

शोधणे इतिहास तज्ज्ञांचे काम आहे. कागदी पुरावे अद्याप मिळालेले नाहीत व कदाचित मिळणार देखील नाहीत. म्हणून इथे लष्करी कारवाईतून लढाईचीतंत्रे वापरून इतिहास कसा घडवला गेला असेल यावर जोर धरला आहे. सिद्धीचे फौज बळ ४५ हजार कि ६० हजार यावर पुरावे ही चर्चा अपेक्षित नाही. सध्या जातात तो मार्ग विशाळगडावर जायला उपयुक्त आहे? या पेक्षा जवळचाअन्य मार्ग शोधला जावा. हे काम गूगल नकाशातून समजून घ्यायला सोपे जाते. पण प्रत्यक्षात पाहून ठरवणे महत्त्वाचे. या कामासाठी दुर्ग प्रेमींचा सहभाग, ड्रोन शूटिंग, ३ डी कॅमेरा, याच्या उपयोगातून शोध घेतला जावा. पुढील ३ते ५ वर्षांत याचे परिणाम दिसले तरी खूप झाले... असो.

शशिकांत ओक's picture

19 Apr 2018 - 10:00 pm | शशिकांत ओक

नमस्कार,
आपण शक्यतांवर विचार करतोय. त्यामुळे हेच खरे किंवा बरोबर असे एका लेखात ठरवले जावे असे अपेक्षित नाही. या विषयावर पूर्व संकल्पना, सोडून विचार करायला प्रवृत्त करणे हा उद्देश आहे. इथे मिलिटरी पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांची संख्या, आवड कमी असायची शक्यता आहे. तरीही यावर चर्चा व्हावी असे वाटून ही चर्चा सुरू केली आहे.
तोफेचा आवाज किती दूर पर्यंत ऐकू येईल त्याची शहानिशा यानंतर जे हौशी दुर्ग प्रेमी त्या स्थानाला भेट देतील ते दिवाळीतील मोठ्या फटाक्यांची माळ लावून आजमावून पाहू शकतील. धरण योजना कार्यालयातून सध्याच्या पाण्यात गेलेल्या वास्तूंचे पुरावे हवे तर मिळवता येऊ शकतात. दुर्गविहारींच्या नमस्कार सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

शशिकांत ओक's picture

21 Apr 2018 - 11:45 am | शशिकांत ओक

तोफेचा आवाज किती दूर पर्यंत ऐकू येईल त्याची शहानिशा यानंतर जे हौशी दुर्ग प्रेमी त्या स्थानाला भेट देतील ते दिवाळीतील मोठ्या फटाक्यांची माळ लावून आजमावून पाहू शकतील.

ही कामगिरी कोणी करेल का?