बस्तर दशेरा – एक अद्वितीय लोकोत्सव

विहंग३००७'s picture
विहंग३००७ in भटकंती
25 Mar 2018 - 11:52 pm

अनवट निसर्गासोबत लोकजीवन नाही अनुभवले तर बस्तरची सहल अपूर्णच! त्यात दसऱ्याच्या सुमारास तुम्ही बस्तरमधे असाल तर दुधात साखर. बस्तरमधे साजरा केला जाणारा दसरा (बस्तर दशेरा) म्हणजे एक एकमेवाद्वितीय लोकोत्सव आहे. भारतात सर्वत्र दसऱ्याच्या उत्सवाला रामायणाचा संदर्भ आहे. रामाने रावणावर मिळवलेला विजय, सीतेची बंधनातून केलेली मुक्ती, आणि थोडक्यात चांगल्याचा वाईटावर झालेला विजय दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो. बस्तर दशेरा मात्र संपूर्ण वेगळा आहे. रामाने वनवासातली दहा वर्षे दंडकारण्यात, म्हणजेच आजच्या बस्तरमधल्या रानात, व्यतित केली असली तरी इथल्या दसऱ्याच्या उत्सवाचा रामायणाशी काहीच संबंध नाही. या उत्सवाचे मूळ इथल्या इतिहासात आहे. या संपूर्ण प्रदेशावर काकतीय राजांचे राज्य होते. काकतीय राजे मूळचे तेलंगणातील वारंगळचे. दिल्लीच्या सुलतानशाहीने त्यांचा पाडाव केल्यानंतर तत्कालीन राजा आपल्या कुटुंबासोबत इ.स. १३२४ मध्ये दंडकारण्यात पळून आला. अत्यंत घनदाट आणि दुर्गम अरण्याने वेढलेल्या त्या प्रदेशात त्याने आपले राज्य स्थापले. सोबत त्याने आपली कुलदेवता आणली, तीच दांतेश्वरी. काकतेय राजांनी या दुर्गम प्रदेशावर १९४७ पर्यंत राज्य केले. या काळात राजांनी आणलेली वैदिक संस्कृती आणि स्थानिक आदिवासी संस्कृती यांचा सुंदर मिलाफ घडून आला. बस्तर दशेरा म्हणजे याचेच फलित होय.

या उत्सवाची सुरुवात झाली १५ व्या शतकात, जेव्हा काकतीय राजे पुरुषोत्तम देव जगन्नाथपुरीहून रथावर आरूढ होण्याची दैवी परवानगी घेऊन बस्तरला आले. ती घटना साजरा करण्याची मग प्रथाच पडून गेली. अनेक स्थानिक परंपरा मग या उत्सवाशी जोडल्या गेल्या. हा उत्सव एकूण ७५ दिवस चालतो. श्रावण अमावास्येला, जिला हरियाली अमावस म्हणतात, या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी रथ बांधण्यासाठी रानातून लाकूड आणले जाते. या प्रथेला म्हणतात पटजत्रा. मग रथांचे बांधकाम, सजावट, वगैरे कामं वेगवेळ्या जमातींचे लोक करतात. उदाहरणार्थ, बेडा उमरगांव गावचे सुतार दुमजली रथ बांधतात तर कारंजी, केसरपाल, आणि सोनाबल गावचे लोक रथ ओढण्याचे दोरखंड वळतात. पोटनार गावचे मुंडा लोक लोकगीते गातात. या सगळ्या प्रथा गेली कित्येक शतके अखंडित सुरु आहेत. एकदा रथाचे बांधकाम झाले की नवरात्रीच्या सुमारास रथपरिक्रमा सुरु होते. पहिल्या दिवशी म्रिगन जमातीतल्या एका लहान मुलीला देवीस्वरूप मानून तिच्याकडून परिक्रमा सुरु करण्याची आज्ञा घेतली जाते. या प्रथेला काछ्न गाडी म्हणतात. मग देवीची मूर्ती रथामध्ये बसवून रथ जातात. त्यादरम्यान आसपासच्या प्रदेशांतले असंख्य लोक त्यांच्या स्थानिक देवतांना घेऊन जगदालपूरला येतात. मुख्य रथांच्या आजूबाजूने आपल्या देवतांना फिरवतात. सारे वातावरण मांगल्याने आणि उत्साहाने भरलेले असते. प्रत्येक जमातीचा पारंपरिक पोशाख, त्यांच्या देवतांच्या विशिष्ट मूर्ती, त्यांचे लोकसंगीत या सगळ्याचे अनोखे प्रदर्शन या उत्सवात घडते.

दुपारच्या पारंपरिक जेवणानंतर आम्ही आजूबाजूचे अजून दोन-तीन धबधबे बघितले आणि संध्याकाळी सातच्या सुमारास जगदालपूरला पोहोचलो. शहराच्या मध्यवर्ती भागात दांतेश्वरी मंदिर आहे. आम्ही आत जाऊन दर्शन घेऊन आलो. सगळा परिसर गर्दीने गजबजलेला होता. मंदिराच्या बाहेरील चौकात एक फुलांच्या माळांनी सजवलेला भलामोठा दुमजली रथ उभा होता. रथावर शिरोभागी देवीची मूर्ती स्थानापन्न केली होती. रथाची रचना साधीच होती. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे रथाच्या रचनेत कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला नव्हता. केवळ लाकडाने बांधलेला तो प्रचंड रथ ओढण्याचे काम मारिया जमातीतले जवळपास ४०० लोक अत्यंत भक्तिभावाने करत होते. एकदा ओढायला सुरुवात केली की काही मीटर अंतर रथ पुढे जाई आणि थांबे. मग माणसे बदलली जात. मग पुन्हा हाईसा म्हणत ओढायला सुरुवात. त्याशिवाय आजूबाजूच्या गावांतून आलेले लोक त्यांच्या ग्रामदेवतांना लहान पालख्यांवर बसवून फिरवत होते. या पालख्या अत्यंत वेगात पळवल्या जातात. त्यांना पळवणारे कुठल्याशा धुंदीत असतात. या पालखीच्या खालून जाणे भाग्याचे मानले जाते. वेगात पाळणाऱ्या पालख्या, त्यांच्या खालून जायचा प्रयत्न करणे स्थानिक तरुण, त्या चढाओढीत होणारी पडापड, असे सगळेच दृश्य गमतीशीर होते. पालख्यांच्या मार्गापासून दूर राहण्याचा सल्ला आम्हाला जीतने आधीच दिला होता. पालखीचा दांडा फारच जोरात लागतो म्हणे. आम्ही बापुडे सुरक्षित अंतर ठेवून तो सारा सोहळा पाहत होतो आणि फोटो काढत होतो.

दोनेक तास रथसोहळा पाहिल्यानंतर आम्ही जेवायला निघालो. उपहारगृह तसे शहराच्या मध्यवर्ती जागेपासून लांब होते. तिथे आमचे आरक्षण आधीच केलेले होते. यथावकाश जेवण उरकून आम्ही बाहेर पडलो. शहराच्या मध्यवर्ती भागाकडे आलो आणि बघतो तर काय, सगळीकडे वीज गेलेली, दुकाने बंद केलेली, आणि जणू सगळे शहर रस्त्यावर लोटलेले! हा प्रकार काय आहे हे कळेचना. इतक्यात समोरून मघाशी पाहिलेला तो महाकाय रथ अत्यंत वेगात पुढे येताना दिसला. सुमारे हजार-एक जण तो रथ अक्षरशः पळवत होते. आजूबाजूचे लोक चित्कारत त्यांना प्रोत्साहन देत होते. एवढ्या अंधारात कसे काय पळवत असतील देव जाणे! आम्ही सगळे स्तिमित होऊन तो प्रकार पाहत होतो. मग जीत म्हणाला, हा रथ चोरीला जातो आहे! त्याची कथा सुद्धा गमतीदार होती. जेव्हा हा उत्सव पहिल्यांदा साजरा केला गेला तेव्हा प्रत्येक जमातीला काही ना काही काम मिळाले. पण माडिया जमातीला काहीच काम मिळाले नाही. म्हणून त्यांनी एका रात्री देवीचा रथच चोरून नेला. अखेर खुद्द राजाला त्यांच्याकडे जाऊन रथ परत करण्याची विनंती करावी लागली. बऱ्याच वाटाघाटीनंतर राजाला त्या जमातीच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या आणि मगच रथ मंदिरात परत आला. आता ही घटनाही परंपरेचा एक भाग बनली आहे. रथ चोरीला जाताना मुद्दामहून सगळ्या शहरातले दिवे घालवले जातात. सगळे व्यवसाय-धंदे बंद केले जातात. सारे शहर रथ चोरीला जाताना बघते आणि ‘चोरांना’ प्रोत्साहनही देते!

उत्सवाची सांगता ‘मुरीया दरबार’ ने होते. यात राजा सगळ्या जमातींच्या नेत्यांना भेटतो, त्यांच्या मागण्या ऐकतो आणि काही पूर्णही करतो. आजही हा परंपरागत दरबार भरतो. राजाच्या जागी छत्तीसगढचा मुख्यमंत्री लोकांच्या मागण्यांचे निराकरण करतो. परंपरेला मिळालेली ही आधुनिकतेची जोड प्रशंसनीयच म्हणायला हवी.

थोडा वेळ शहरात घालवून आम्ही मुक्कामाच्या जागेकडे निघालो. आमचा मुक्काम तीरथगढ धबधब्याच्या जवळील सरकारी हॉटेलवर होता. आता झोप अनावर होत होती. हॉटेलवर पोहोचताच निद्राधीन झालो.

फोटोंसाठी येथे क्लिक करा
पांथस्थ

प्रतिक्रिया

चांगले वर्णन आहे. पण चित्रपट सुरू झाल्यावर बऱ्याच वेळाने आत सोडले जावे आणि संपायच्या आत उठवून बाहेर काढले जावे असे काहीसे वाटले लेख वाचताना. ब्लॉगवर दिलेली छायाचित्रे इथेही दिली असती तर बरे झाले असते. असो.

अनिंद्य's picture

26 Mar 2018 - 11:12 am | अनिंद्य

छान लेख. ह्या भूभागाबद्दल वाचले की आपलाच देश आपल्याला किती अल्पपरिचित आहे ते लक्षात येते.

बस्तर तर फार चुकीच्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे, तुमच्या मुळे स्थानिक संस्कृतीची थोडी झलक मिळाली - फोटो हवे होते मात्र.

अनिंद्य