*** *** *** *** ***
कंजूस
यांचे सर्व लेखन इथे पाहा
*** *** *** *** ***
गोवा - कुडाळ उडती भेट
गोवा म्हटलं की भारतीय आणि परदेशी पर्यटकांचं आवडतं ठिकाण. समुद्रकिनारे,मासे,दारू, शिवाय निसर्ग आणि बोलके गोयकार हे चित्र समोर येतं. पण पहिल्या तीन गोष्टींचा काहीच संबंध नसल्याने तिकडे आतापर्यंत गेलोच नव्हतो. मग उरल्या दोनांसाठी एकदातरी गोव्याला जाऊ हा विचार गेले तीनचार वर्षं करत होतो. कुणा जाऊन येणाय्रास माहिती विचारली की "अरे हे करायचे नाही तर गोव्याला जातोसच कशाला?" असे उडवले जायचे. मग ठरवले की काही कुणाला विचारायचेच नाही. सरळ गोवा गाठायचे. सगळी माहितीपत्रके,नकाशे जमवले आणि एकट्याचेच तिकिट काढायचे ठरले. पायी भराभर फिरता येईल हा विचार.
"एकट्यासाठी रुम घेणारच तर मीही येते आणि पाहीन तुम्ही काय पाहता ते. चालेन मी. काढा दोन तिकिटं." मुकाटपणे रेल्वे टाइमटेबलं काढली.
कधी जायचं यावर ज्ञानात थोडी भर पडली की गोव्याचे वर्षभरात तीन सीजन आहेत. गर्दीचा हाई सीजन - नोव्हेंबर ते फेब्रुवारी, मध्यम मिड सीजन - मार्च ते जून, खपाटीचा लो सीजन - जून ते ऑक्टोबर. मार्चवर बेत पक्का झाला. कायकाय पाह्यचं यावर रिटन तिकिटाची तारीख ठरणार होती. फोंडा/पोंडामधली मंगेशी,शांतादुर्गा इत्यादि देवळं मी फार भाविक/ धार्मिक नसल्याने गाळून टाकली. जुना गोवा /पणजीमधली चर्चेस बघण्यात काही स्वारस्य नव्हते त्यामुळे तेही गाळले. उरली बीचेस. उत्तर गोव्यातली लोकप्रिय बीचेस/किनारे म्हपशाला जवळ. कोलवा बेनोलिम ही मडगावला जवळ. फक्त पाचसहा किमिवर. शिवाय मडगावला सर्व गाड्या थांबतात म्हणजे मडगावचे तिकिट काढायचे. अगोंडा,पालोळे अतिदक्षिणेस. बीच काय कोणतेही एक बीच पाहून काम भागणार होते म्हणजे मडगावला एक दिवस पुरेसा आहे. बाकी खाण्यापिण्याचे आकर्षण नव्हतेच. रेल्वेगाड्यांची मडगावला पोहोचण्याची वेळ पाहिल्यावर मुंबई - मंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस ( 11233 ) मडगावला सकाळी सातला पोहोचत असल्याने ती नक्की झाली. आता परतीचं काय करायचं? कुडाळजवळचे (!) तारकर्ली,धामापूर तलाव पाहायचे ठरले. दुसरे दिवशी बसने कुडाळला पोहोचून ( हॅाटेल रूम न घेताच) तिकडे जाऊन संध्याकाळची ट्रेन कुडाळहून पकडायची. राज्यरानी एक्सप्रेस/ आता नवीन नाव तुतारी एक्सप्रेस ( 11004 ) सातला आहे. ती ठरली. तसं या दोन गाड्यांची तिकिटेही मिळाली दीड महिना अगोदर. कोकणकन्या गाडीची कधीच संपतात चार महिने अगोदर. शिवाय कोकची पोहोचण्याची वेळ बरोबर नाही वाटली.
तारकर्ली आणि धामापूर याच ट्रिपमध्ये होणार होते. पुढच्या वेळेस म्हापसा - कलंगुट/ बागा/इतर बीच अधिक सावंतवाडी - आंबोली करता येईल हा विचार केला.
नेहमीप्रमाणे रेल्वे आरक्षण केले आणि हॅाटेलचे बुकिंग नाही. समजा जाणे रद्द केले तर फक्त रेल्वे तिकिटाचे पैसे वाया जातील. हॅाटेलचे नाही. शोधू तिकडे. सातला पोहोचणार म्हणजे भरपूर वेळ मिळेल.
तिकिटे,प्लान तर ठरला. विचार केला कोकणी थोडेफार शिकायला काय हरकत आहे? "अहो तिकडे मराठी,हिंदी,इंग्रजी सर्वांना समजते, कशाला कोकणीचा खटाटोप?" हा सल्ला धुडकावून युट्युबावर "learn Konkani" शोधल्यावर Saurabh आणि प्रताप नाइकचे व्हिडिओ सापडले. छान आहेत. goaholidays dot com >info>konkani इथेही आहे.
ठाण्याला रात्रीच्या चारपाच फास्ट लोकल ट्रेन्स गेल्यावरच एक्सप्रेस आली. एक फारनर जोडपे बसलेले. टिसीने त्यांचे इतिकिट पाहून "नो सीट!" सांगितल्यावरही काही खळखळ न करता गपचूप बसून राहिले. पुढे पनवेलला एका साइड अप्परवर दोघांना जागा मिळाली. काही गडबडगोंधळ न करता प्रवा कसा करायचा यांच्याकडून शिकले पाहिजे. त्या एवढ्याशा जागेत सहाफुटी दोघे बसून राहिले. प्रवासात बॅगांवर लक्ष ठेवण्यासाठी सावध राहावे लागते. ती काळजी डासांच्या फौजेने दूर केली. या मुंबईच्या गाड्या भायखळा जवळच्या वाडीबंदर साइडिंगला पडून असतात तेव्हा डास घुसतात. असो. गाडी रात्री फक्त रत्नागिरी, कणकवलीला थांबते आणि बाराला मंगलोरला, त्यामुळे पॅन्ट्री कार देण्याची तसदी रेल्वेने घेतली नव्हती.
आठला मडगावला पोहोचलो. पूर्वेकडे ( डावीकडे ) बस स्टँड मॅपमध्ये दाखवत असल्याने तिकडे बाहेर पडलो.
फोटो १
मडगाव परिसर
फोटो २
कोकणीं पेपर भांगरभूंय (= सुवर्णभूमी )
फोटो ३
कोलवा किनारा -१
टॅक्सी/ओटोवाल्यांनी घेराव घातला पण त्यातून पुढे येऊन एका भरत आलेल्या टॅक्सीने (२०/-) KTC STAND - कदंबा ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनच्या स्टँडला पोहोचलो. दोन किमि असेल. फार मोठा डेपो आहे.
"खयच्यांन आयतलान?"
"मुंबईच्यांन!"
- माझ्या कोंकणी अभ्यासाची परीक्षा एवढ्या लवकर सुरू होईल असं वाटलं नव्हतं. काल कोकणी
लेसनवाल्या सौरभला इमेल केला होता त्याचाही उत्तराचा इमेल आला होता.
"मुंबईच्यांन खयच्यांन?"
"डोंबिवली, कल्याण."
"औट ओफ मुंबई आसा ते!!" -"तुका हाटेल दाखवता"
मग त्याला कटवून डेपोत गेलो. चार टपय्रांत वडे समोसे बिस्किटे दिसली,चहा एकाकडेच होता. एक लांबलचक रांग कदंबाच्या पणजी बसची तिकिटे काढायला लागलेली. उद्या इकडेच उभे राहावे लागणार होते. रस्त्यावर इकडे तिकडे पाहिले तर बय्रापैकी स्वस्त राहण्याचे हॅाटेल आणि रेस्टारंटस दिसली नाहीत. एका बाइकवरच्या मनुष्यास विचारले बजेट हॅाटेल्स जवळ कुठे आहेत?आमच्या हातात बॅगा होत्याच.
"कुठून आलात?"
"आताच मडगावला उतरून इकडे आलो."
" फार फुडे आलात, मागे ओल्ड मार्केट गार्डन - कामत हॅाटेल स्टॅापला जा,तिकडे मिळतील."
जवळच ओटोरिक्षा रांग होती.
"कामत हाटेल, किती?"
"शंभर रुपय." (// हे अंतर एक किमि असेल.//)
"माका नाका."
"बस आसता. धा रुपय."
मग खासगी मिनिबसकडे आत गेलो. पाचपाच मिनिटाला मडगाव बस सुटत होत्या. धा रपयात गार्डनजवळच्या कामत हॅाटेलला आलो. या बसेसचे मालक पावलो/डकुन्हा/इत्यादि. डायवर क्लिनर बहुतेक मुसलमान असावेत.
कामत हॅाटेल स्टॅापला उतरल्यावर मी हॅाटेल शोधायला निघालो. एक मोठी नगरपालिका इमारत, बाजूला मोठी बाग, बागेभोवती छान रस्ता,स्टेट बँक,कॅनरा बँक, बँक ओफ इंडिया, गोवा टुअरिझमचे ओफिस/हॅाटेल, मार्केट,पेट्रोल पंप्स,शाकाहारी तीनचार रेस्टारंट्स पाहून लगेच लक्षात आल हा भाग मध्यवर्ती आणि वर्दळीचा आहे. एका पेपरवाल्याकडे कोकणी पेपर 'भांगरभूंय' मिळाला.
इकडेतिकडे शोधल्यावर एक 'हॅाटेल दत्तराज' ( Duttraj ) दिसले. दोनबेड्स नान एसी ९५०/एसी १२००, गिजर,टिवी,बॅल्कनी, रुम छोटी पण चकाचक. लगेच घेतली. चेकआउट उद्या बारा वाजता!
(( Hotel DUTTRAJ, OPP. BANK OF INDIA, NEAR MUNICIPAL BLDG.,MADGAON 403601. PHONE 08322715046 / 9822120086 ))
रुमवर तयार होऊन बाहेर पडायला साडेदहा वाजले. जवळच्याच कामत हॅाटेलात भरपूर नाश्ता करून तिथे बाहेरच कोलवा बीचला जाणारी बस मिळते म्हणून उभे राहिलो. समोरच्या बागेतून पलीकडे जाणारी वाट आहे तिथे काजूफळे ( मुरटे/बोंडे) १०रु/४ मिळाली. मोठमोठे चिकू पन्नासला चार होते. हे घेऊन कोलवा बसमध्ये बसलो. (( कदंबा स्टँडसमोरच्या सरळ रस्त्याने कोलवा ५ किमि आहे.) इकडून जाणाय्रा बसेस बेनोलिमला वळसा घालून कोलवा बीचला जातात. ( १५रु/-) अगोंडा/वरका किंवा पालोलें बीचलाही जाणाय्रा बसेस भराभर सुटत होत्या. टोपी,टीशर्ट,हाफचड्डी,पायात चपला,खांद्यावर शबनम पिशवी घेतलेले फारनर याच बसमधून जात होते. रेल्वेवरच्या एका यु आकाराच्या ब्रिजवरून पलिकडे जाऊन वीसेक मिनिटांत बस कोलवा बीचला पोहोचली. रस्त्याने दोन्ही बाजूस रंगीत टुमदार विला,भरपूर झाडे असं छान दृष्य दिसते. समोर अफाट पसरलेला शुभ्र वाळूचा किनारा, दोनतीन फुट उंचीच्या लाटा. काहीजण पोहताहेत. मार्च महिन्याचे दुपारचे बाराचे ऊन. वॅाटर स्कुटर, पॅरासेलिंगसाठी , पोहण्यासाठी वेगवेगळे भाग करून ठेवलेले. कडेला झावळ्यांनी शाकारलेली रेस्टारंटे. सावलीकरता नारळाची भरपूर झाडे. मजा वाटली. दोनला परत येऊन आराम केला.
फोटो ४
कोलवा बीच - पॅरासेलिंग
फोटो ५
मडगाव वाचनालय इमारत
फोटो ६
नगरपालिका बागेजवळचा रस्ता, बस स्टॅाप.
संध्याकाळी मडगाव मार्केट भाग फिरलो. काही दुकाने तिथल्या होळी ( गंजीमली असं काही नाव कळलं)निमित्ताने बंद होती. कपड्यांच्या दुकानांत फारनर जात होते. इकडे स्टॅापवर एक कदंबा बस आली त्याच्या कंडक्ट्ररला विचारले "सकाळी सावंतवाडीला जाण्यासाठी बस कुठे मिळेल?"
"स्टेट बँकेपाशी सकाळी सहा ते सात वेळात येतात बस. कंकोळ्ळी- बांबोळी- मडगाव-पणजी."
चला एक काम झाले. KTC स्टँडला जायला नको. बागेत बसलो. बाग अतिशय फुललेली होती. सुंदर. फोटो,विडिओ काढले. मग रूमवर परतलो.
फोटो ७
नगरपालिका बाग -१
फोटो ८
नगरपालिका बाग - २
फोटो ९
नगरपालिका बाग - ३
(( काही फोटो व्हिडिओतून सेव केल्याने कमी रेझलुशनचे आलेत.))
आजचा दिवस आरामात काढला. एकूण मडगाव परिसर, वाहन व्यवस्था, हॅाटेल, रेस्टारंटस याची कल्पना आली.
दुसरे दिवशी सकाळीच तयार होऊन सहाला स्टेट बँकेपाशी आलो. तिथे टपरीवर चहा वडा घेतला आणि कदंबाची पणजी ( उच्चार पों-ण-जीं) बस आलीच. ऐसपैस मोठी बस. तासाभरात पणजीला पोहोचलो. डेपो थोडा गावाबाहेर वाटला. मेट्रोचं काम चालू होतं. समोर होळीचे पुतळे लावलेले.
फोटो १०
शिमगोत्सवानिमित्त प्रदर्शन, पणजी डेपोसमोर - १
फोटो ११
शिमगोत्सवानिमित्त प्रदर्शन, पणजी डेपोसमोर -२
फोटो १२
धामापूर तलाव ( कुडाळ - मालवण रस्ता)
एका डायरेक्ट म्हापसा बसने म्हापसाला गेलो. तिथून मडगाव-सावंतवाडी-बेळगाव जाणाय्रा कदंबा बसने सावंतवाडीला पोहोचलो. मागेच कुडाळ बसही होती. कुडाळला साडेअकरा झाले. प्रवास छान झाला. कुडाळात बुधवारचा बाजार असल्याने गर्दी खूप होती. नाश्ता करून परत डेपोत आलो. डेपो फारच लहान आहे. शाळेच्या मुलांची गर्दी. मालवणला तारकर्ली जाण्याचा प्लान रद्द केला. इथे स्कुबा डाइविंग आहे पण ते करणार नव्हतोच शिवाय आता फारच उकडत होते. पुन्हा बीचसाठी कशाला जा म्हणून फक्त जाऊन येण्याचे ठरवले.
लवकरच मालवण जाणाय्रा दोन बस आल्या त्यात एक धामापूरमार्गे होती त्याने वीस मिनिटांत तलावाच्या स्टॅापला उतरलो. बाजूलाच सातेरी देवी मंदिर आणि तलावाचा दक्षिण भाग आहे. तिथे वेळ घालवण्यासारखं काही नाही. रस्यावरच्या हॅाटेलवाल्याला विचारलं "इकडून काळसे गावाला जाऊन नदी ओलांडायला होडी असते का?"
"कशाला?"
"वालावलला जायचय."
"आता होड्या( तर) बंद झाल्या. बसनेच मागे जा आणि जकातनाक्याला उतरा. तिथे बस बदला."
मग लगेच तिकडे गेल्यावर वालावलची बस मिळून नारायण /रवळनाथ देवळापाशी उतरलो तेव्हा एक वाजला होता. दोन्ही देवळे छान आहेत आणि येणाय्रा पाडव्याच्या दहा दिवसांच्या उत्सवासाठी सजावट करत होते. नारायणाच्या देवळामागे भक्तनिवासही दिसले आणि करंबेळकरांकड जेवणाचीही व्यवस्था झाली. मागचा छोटासा तलाव रम्य आहे. गावातून खाली गेल्यावर कर्ली नदी/खाडी आहे तिथे तासभर बसलो. दोन्ही तिरांवर माडाचे वन आहे. या खाडीलाच आता बॅकवॅाटर म्हणतात. त्यात बोटी फिरवतात. ही जागाही खूपच रम्य आहे. जवळच स्टेट बँकेची शाखा आहे. या मार्गावर एसटी बसेसही बय्राच झाल्या आहेत. रोज वीस बस. चारची बस पकडून कुडाळला आलो.
फोटो १३
धामापूर, सातेरी मंदिर मंडप
फोटो १४
वालावल तलाव
थोडीफार खरेदी करून रेल्वे स्टेशनला ओटो रिक्षाने (४०/-) आलो. अंतर थोडेच आहे,चालतही जाता येण्यासारखे. सातच्या तुतारी एक्सप्रेसचे तिकिट होते आणि गाडी वेळेवर आली. ही मागच्या सावंतवाडीहूनच सुरू होते पण मालगुंडच्या कुशवसुतांच्या तुतारी कवितेचे नाव गाडीला दिले आहे बहुतेक. प्रत्येक राज्यात एक राज्यराणी गाडी आहे आणि ते हवे ते नाव बदलू शकतात. ही खरी कोकणची गाडी आहे. गाडीला पॅन्ट्री कार होती आणि जेवण चांगले होते. गाडी वेळेत ठाण्याला पोहोचली.
एकूण गोवा ट्रिप फारशी अपेक्षा न ठेवल्याने फळली. गोव्याचे वातावरण,लोक,निसर्ग आवडला आणि पुढच्या खेपेस चारपाच दिवस राहायचे नक्की करून टाकले.
15 ) गोवा टुअरिस्ट map portrait
Photo
16 )गोवा टुअरिस्ट map landscape
Photo
फोटो १७)
कुडाळ डेपो बस वेळापत्रक
युट्युब व्हिडिओ लिंकस
१) कोलवा बीच पॅरासेलींग
File size 146 MB
2 minutes
वि लिंक:https://youtu.be/uGPkDzY126k
२) कोलवा बीच ते मडगाव बसमधून
फाइल साइज 137 MB,
2 minutes
Link:https://youtu.be/B5U02MIA4Tc
प्रतिक्रिया
19 Mar 2018 - 8:37 am | प्रचेतस
मजेदार शैली. मजा आली वाचून.
मडगाव परिसर छान आहे. आजूबाजूची रंगबिरंगी घरे सुरेख दिसतात. कोळवा बीच मात्र गर्दीमुळे काहीसा अस्वच्छ आहे पण त्याच्या आजूबाजूला असलेले इतर किनारे अतिशय सुंदर आहेत. गेल्या दोन सफरींत मडगावला बरेच फिरणं झालंय.
घामापूरची छायाचित्रेही आवडली.
19 Mar 2018 - 10:33 am | सुनील
छोटेखानी सफर आवडली. फोटोदेखिल छान.
आपल्या आवडीनुसार प्राधान्यक्रम ठरलेला असेल तर, अगदी कमी वेळातदेखिल त्या ठिकाणाचा आनंद लुटता येतो. तसा तुम्ही तो मनमुराद लुटला याबद्दल अभिनंदन!
किनारी वर्दळीपासून दूर आणि निवांत ठिकाण हवे असल्यास, पुढील गोवा भेटीसाठी मी "तांबडी सुर्ला" हे ठिकाण सुचवीन. मसाल्याच्या बागेलाही भेट देता येईल.
माझे जरी गोव्यात वरचेवर जाणे होत असले तरी जुनी पोर्तुगिजकालीन घरे पाहण्याची तसेच अगदी ऑथेन्टिक किरिस्तावी पाककृती चाखायची इच्छा अशीच, हाताशी कमी वेळ असताना, मडगावी झालेल्या एका मुक्कामात पूर्ण झाली होती! त्याचा वृत्तांत इथेच दिला होता.
19 Mar 2018 - 1:34 pm | एस
धावती ट्रिप आवडली. छान भटकंती. किमान वेळेत आणि किमान खर्चात उत्तम समाधान.
19 Mar 2018 - 2:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
खास कंजूसकाका स्टाईलची सहल आवडली. तुमची प्रवासाची पद्धत खास रोचक आहे आणि अंतरे व खर्चासकट नोंदी ठेवण्याची सवय वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाचकांना त्यांची सहल आखण्यात अश्या माहितीचा खूप उपयोग होतो. फोटोही आवडले.
19 Mar 2018 - 4:23 pm | श्वेता२४
सुंदर प्रवासवर्णन. पुढच्यावेळी जाल तेव्हा पाळोलेम बीच ला अवश्य जा. अतीशय स्वच्छ व फारशी वर्दळ नसलेला बीच. या बीचच्या आत तीन नयनरम्य बेटे आहेत. बीचवरुन फेऱ्या जातात. 1-2 तास जाजात त्यामध्ये. आम्हाला डॉल्फीनही दिसले होते. 5 वाजता तेथून पणजीला परत यायला शेवटची बस आहे. त्यामुळे लवकरच जावे.
19 Mar 2018 - 5:38 pm | कंजूस
सहलीची गम्मत रेल्वे प्रवासापासूनच सुरू होते. आपण वेळ घालवायलाच जात आहोत तर तो तिकडच्या लोकांशी बोलण्यात जावा ही इच्छा. ग्रुप टुअर अशासाठीच टाळतो. एकट्याने/फक्त आपल्याच कुटुंबासह केलेला पहिला प्रवास थोडासा त्रासदायक वाटू शकतो पण नंतर त्याचीच चटक लागते. जाताना आमच्या डब्यात बाजुलाच एक मुसलमान नवराबायको हनिमुनसाठी तिकडे जात होते. त्यांनी मडगाव जवळ आल्यावर आम्हालाच ( आमच्याकडे बघून हे मडगावला नेहमी जात असणार असे वाटून ) गोव्याबद्दल विचारायला सुरुवात केली.
"कोलवा किती दूर आहे,कसं जायचं वगैरे."
त्यांचं कोलवामधल्या हॅाटेलचं दोन दिवसांचं बुकिंग होतं.
सर्वांना प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. नवीन जागा, बीचेसही कळली. पब्लिक ट्रान्सपोर्टची वारंवारता ( फ्रिक्वन्सी),किमि अंतर यामुळे आयोजन करायला सोपं जातं. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार मजा घेणारच आहे आणि माहितीचा नक्कीच उपयोग होईल असं वाटतं.
20 Mar 2018 - 12:33 am | हिरवळ
छान संक्षिप्त वर्णन. पण "फोंडा/पोंडामधली मंगेशी,शांतादुर्गा इत्यादि देवळं एकतर नव्याने बांधलेली आणि धार्मिक नसल्याने गाळून टाकली. " हे वाक्य प्रचंड खटकले. तुम्हाला कोणी सांगितले कि हि देवळे धार्मिक नाहीत? आम्हा सारस्वतांच्या श्रद्धेची ती देवस्थान आहेत. क्रुपया असे विधान मांडुन कोणाचिही मने दुखावू नये.
20 Mar 2018 - 12:52 am | निशाचर
'स्वतः धार्मिक नसल्याने...' असं त्यांना म्हणायचं असावं.
20 Mar 2018 - 1:56 am | पिवळा डांबिस
मलाही हे वाक्य अगदी खटकलं नसलं तरी विचित्र वाटलं.
एकतर ही दोन्ही देवळं नव्याने बांधलेली नाहीत. त्यांचे जीर्णॉद्धारच शाहू महाराजांच्या काळातले (१७०० च्या आसपासचे) आहेत. वेळोवेळी दुरुस्ती/ विस्तार होतात ते वेगळं. लेखकाने ते धार्मिक नसल्याने सगळी 'देवळं'च टाळली असंही दिसत नाही कारण त्यांनी सातेरीच्या देवळाचं चित्र इथे टाकलं आहे. मंगेशी, शांतादुर्गा आणि जवळच असलेली नागेशी ही सुंदर देवळं आहेत.
असो. दोन सुंदर स्थळं बघायला लेखक मुकले इतकंच खेदापोटी म्हणावं लागेल.
20 Mar 2018 - 5:39 am | कंजूस
बदल केला आहे.
20 Mar 2018 - 11:01 pm | पिवळा डांबिस
धन्यवाद :)
पुढील खेपेस गेलांत तर जरूर वेळ काढून बघा. पणजीहून फोंड्याकडे जातांना वाटेत मंगेशी आणि फोंड्याहून पुढे शांतादुर्गा, रामनाथी आणि नागेशी करा. एक दिवसाची ट्रीप आहे.
तसंच शिवाजी महाराजांनी बांधलेलं सप्तकोटीश्वराचं मंदिर पाहिलं नसेल तर जरूर पहा.
ओल्ड गोव्याची चर्चेसही पहाण्यासारखी आहेत.
धर्माचा भाग बाजूला ठेवला तरी स्थापत्य ह्या दृष्टीने वरील सर्व ठिकाणं पहाण्यासारखी आहेत.
विश यू द बेस्ट.
20 Mar 2018 - 5:14 am | कंजूस
१)मी फार धार्मिक/भाविक नसल्याने ~~!!शिवाय एक दिवस वाढवायला हवा.कारण पुजेतील देवळे पाहायला बराच वेळ लागू शकतो. हम्पीतली तशी नाहीत,भराभर बघता येतात.
२)घामापूरच्या नावाला एक लोककथा आहे असे वाचले होते.
३)जुन्या गोव्यातली चर्चेसही नाही पाहिली.
20 Mar 2018 - 8:36 am | प्रचेतस
आँ...हंपीतली देवळं भराभरा???
हंपीतली देवळं निवांत बघावीत, प्रत्येक स्तंभावरील. चिर्यावरील शिल्प निरखून बघावं, नक्कीच वेगळं काहीतरी दरवेळी दिसतंच, देवळाच्या कट्ट्यावर निवांत बसून तिथल्या रखरखाटातील भग्नावशेष बघत पूर्वीच्या वैभवशाली साम्राज्याच्या आठवणी जागवाव्यात. हंपी हे अतिशय निवांत बघण्याचं ठिकाण आहे.
तुम्ही अप्रतिम स्थापत्यशैली बघायला मुकलात. बॅसिलिकेचं जांभ्यातील बांधकाम अप्रतिम आहे. १६ व्या शतकातील भव्य, उत्तुंग चर्चेस, सेंट ऑगस्टीनचा आभाळावेरी गेलेला टॉवर, जबरदस्त आहे. सी कथीड्रल, सेंट कॅथरीन चॅपेलच्या बाजूला असलेला गोवा पुराणवस्तू संग्रहालय तर न चुकवण्याजोगेच. गोव्यातील प्राचीन मूर्ती, वेताळ, नाविक युद्धांचे शिल्पांकन असलेले वीरगळ , सतीशिळा, गधेगाळ, अफोन्सो द अल्ब्युकर्कचा ब्रॉन्झमधील भव्य पुतळा हे कधीही न चुकवण्याजोगेच.
20 Mar 2018 - 9:12 am | कंजूस
२) भराभरा म्हणजे दर्शनाच्या रांगा, दुपारी ११ ते ५ देऊळ बंद वगैरे नसतं. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ उघडी असतात. दिवसाचा पूर्ण वेळ मिळतो.
३)ओके.
म्हापसा + सावंतवाडी करतो पुढच्यावेळेस.
चर्चेस अधिक वागाटोर,अन्जुना,बागा,कळंगुट असा प्लान करतो.
20 Mar 2018 - 12:51 am | निशाचर
सविस्तर माहितीसह केलेलं प्रवासवर्णन आवडलं. बागेचे आणि तळ्यांचे फोटो आवडले. घामापूरऐवजी धामापूर असा बदल सुचवेन.
20 Mar 2018 - 5:42 am | कंजूस
घामापूरऐवजी धामापूर असा बदल केला आहे. एसटी डेपोतल्या पाटीचा फोटो पाहिला त्यामध्येही धामापूर लिहिलं आहे हे लक्षात आलं.
20 Mar 2018 - 5:53 am | कंजूस
बस वेळापत्रक फलक,

कुडाळ एसटी डेपो
20 Mar 2018 - 6:40 am | निशाचर
वेळापत्रकाचे वा नकाशाचे फोटो काढायची सोय डिजिटल कॅमेरे आणि स्मार्टफोनमुळे छान झाल्येय. फोटो नंतर झूम करूनही बघता येतो त्यामुळे बरं पडतं.
20 Mar 2018 - 5:54 am | Ram ram
डीटेलींग आवडलं,पि.डा.व हिरवळ चुकीचे प्रतिसाद
20 Mar 2018 - 9:21 am | कंजूस
- डीटेलींग -
डीटेलींग अशासाठी की आपण जेव्हा गुगल सर्च करतो तेव्हा इंग्रजीतली भरपूर माहिती मिळते. मराठीत कुठेतरी असावी. कुठे काय चुकलं, रस्ता, वाहनव्यवस्थेतील बदल हे सर्व दोनदोन वर्षांनी नमुद करणे गरजेचं आहे. आता बरेचजण कारने जातात त्यामुळे एसटीचे वेळापत्रक फोटो लेखामध्ये दिला नव्हता. आता तो दिला.
20 Mar 2018 - 9:57 am | प्राची अश्विनी
धामापूरपर्यंत जाऊन आमच्या मालवणला न गेल्याबद्दल णिषेध.
धामापूरच्या तळ्यात पाय बुडवून शांत बसावं. मुळीच पाय हलवू नयेत. मग इटुकले पिटुकले मासे येऊन पायाला गुदगुल्या करायला लागतात. तळ्यावरच्या गार वा-याची झुळूक , निवांत शांत परिसर, चुबुक चुबुक असा लाटांचा हळुवार आवाज , तळ्याभोवतीची गर्द झाडी.... समाधी अवस्था म्हणजे हीच असावी. तळ्याशेजारच्या बागांपैकी एक पुलंची सासुरवाड. पुलं तिथे अनेकदा आलेले आहेत.
असं म्हणतात, की पूर्वी गावातल्या मुलीचं लग्न ठरलं की ती फुलांचे दागिने बनवून ती परडी देवीला आणि मग तळ्याला अर्पण करी. तळ्यातून तिने जे जे फुलांचे दागिने बनवले ते ते सोन्याचे बनून येत. देवीचा आशीर्वाद म्हणून लग्नात ती मुलगी ते घाली. छान मिरवल्याबिरवल्यानंतर सासरी जाताना , ती नवीनवेली पतीबरोबर तळ्यावर येई. आणि परडीतून ते दागिने तळ्याला परत करी. भरल्या डोळ्याने आणि मनाने ती तिच्या नव्या घरी जाई. एकदा कुणी ती सोन्याच्या दागिन्यांची परडी परतच केली नाही म्हणे.
त्या मुलीचं काय झालं माहित नाही पण तळं मात्र रुसलं.
20 Mar 2018 - 10:29 am | सतिश गावडे
धामापुरचो तलाव बेस्ट हा. मी मालवनाक गेलंय काय जमला तर थय नक्की जातंय. एकदा भर पावसात गेललंय. तेव्हा पावसाचा धुमशान चालू होता. अशा धुमशानात मी मस्तपैकी बोटींग केलंय.
20 Mar 2018 - 12:21 pm | ज्ञानोबाचे पैजार
गोवा आहेच बघण्यासारखे
पैजारबुवा,
20 Mar 2018 - 6:48 pm | हिरवळ
बदल केलेत म्हणून खूप खूप धन्यवाद.
20 Mar 2018 - 7:05 pm | उपेक्षित
नक्की काय बघितले मग तुम्ही ? काय कळना झालय कारण प्रवासवर्णन म्हणाव तर इथे नुसताच प्रवास आहे.
असो, तुमचे प्रवासवर्णन नाही आवडले इतकेच सांगतो राग माणू नये.
पुढच्या वेळी १/२ ठिकाणे घेऊन तितकेच निवांत बघता आले तर पहा. मला स्वतः ला मंगेशी मंदिर खूप आवडले अगदी शांत आहे आणि तेथील कॅन्टीन मधले जेवान पण उत्तम होते पुढील टायमाला नक्की try करा
21 Mar 2018 - 5:26 am | कंजूस
सहमत.
सुरुवात म्हणून मडगाव स्टेशन व जवळचे बीच,हॉटेल निवडलं. एकूण गोव्याचे जाणे,राहणे,खाणे,बस वा इतर वाहनव्यवस्था याचा अनुभव घेण्याचा उद्देश सफल झाला.
पुढच्या वेळेस करमळी सटेशनला उतरून पोंडा - देवळे,जुना गोवा - चर्चेस, म्हापसा - चार बीचेस अधिक सावंतवाडी - आंबोली असा आराखडा आहे.
जो काही अर्धवट प्रवास /पर्यटन केलं ते मांडल्यामुळे प्रतिसादांतून अधिक उपयुक्त माहिती मिळण्याचा उद्देश साध्य झालाच. "मला गोवा करायचे/पाहायचे आहे " असा लेख प्रथम लिहून माहिती आधारे सहल योजण्याऐवजीचा हा एक वेगळा प्रयत्न केला. प्रवासात काहीही होऊ शकते अथवा होतच नाही पण जे काही त्या दिवसांत अनुभवयास मिळाले त्यामध्ये आनंद घेतला.
20 Mar 2018 - 7:21 pm | पिलीयन रायडर
मला मोबाईलवरून तरी एकही फोटो दिसत नाहीये. इतर एक दोन धाग्यात हाच प्रॉब्लेम आला.
खास कंकाका टाईप वृत्तांत आहे. आवडला.
21 Mar 2018 - 5:05 am | कंजूस
फोटो फेसबुक अकाऊंटवर अपलोड करून लिंकस घेतल्या आहेत.
लेखामध्ये गोवा mapखाली लिंकसुद्धा दिली आहे ती क्लिक करून फोटो येतो का पाहा. किंवा दुसरा पर्याय शोधतो.
20 Mar 2018 - 7:38 pm | इरसाल
मोठ्या अक्षरामधे शिगमोत्सव झाल्ये.
21 Mar 2018 - 5:30 am | कंजूस
तिकडे कोकणीत शिमगा म्हणत नाहीत ,शिगमो म्हणतात बहुतेक.
21 Mar 2018 - 1:33 pm | नीलकांत
लेख आवडला व लेखनशैलीसुध्दा आवडली.
मडगावला आपण बसने उतरतो ते याच बागेजवळच. मडगाव छान आहे. तेथून जवळच असलेल्या बाणावली आणि केवलोसिम भागात फिरून झालंय. शांतादुर्गा आणि मंगेशीबाबत मी असे म्हणेन की तुम्ही धार्मीक असा किंवा नसा मात्र ह्या जागा चुकवू नये अश्याच आहेत. मालवण आणि तारकर्ली सुध्दा खुप छान आहे. कुडाळचे बस स्टँड छोटे आहे. ओरोसचे (सिंधुदुर्ग नगरी) रवळनाथ मंदीर आणि परिसर छान आहे.
21 Mar 2018 - 3:06 pm | सस्नेह
लेखनशैली भन्नाट आहे, कंकाका.
22 Mar 2018 - 8:18 am | चौकटराजा
आपली प्रवासाची शैली व वर्णनाची शैली जवळ जवळ माझ्या सारखी आहे. प्रवास वर्णनात काय पाहिले याचे तपशीलवार वर्णन असण्याचे आता कारण नाही कारण जालावर मजबूत माहिती उपलब्ध असते. पण कसा गेलो. सीझनचा काय परिणाम झाला. खर्च काय आला. वहातुकीची साधने , वेळा ई तपशील आवश्यक असतात . खास करून ज्याना यात्रा कंपनी वा ग्रूप टूर ऐवजी कौटुंबिक प्रवास हा महत्वाचा वाटतो.भारत देशात मी सुमारे १८ सहली स्वतंत्र पणे केल्या आहेत. पण का कुणास ठाउक गोव्याला जावे असे नाही वाटले.