विश्वास-श्रद्धा-निष्ठा: यनावाला

यनावाला's picture
यनावाला in काथ्याकूट
2 Feb 2018 - 2:11 pm
गाभा: 

विश्वास-श्रद्धा-निष्ठा: यनावाला
(भाविक आणि विवेकवादी यांच्यातील संवाद. यात श्रद्धा, विश्वास आणि निष्ठा या तीन संकल्पनांच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न आहे. "आजचा सुधारक" चे संस्थापक-संपादक दि.य.देशपांडे यांनी आ.सु.च्या एका अंकात या व्याख्या थोडक्यात दिल्या आहेत. त्यांचा विस्तार या संवादात केला आहे.)
भाविक: परवा तुमचा एक लेख वाचला. त्यात "श्रद्धाभावना नसावी." असे तुम्ही म्हटले आहे. श्रद्धेवर तुमचा एवढा राग का ? श्रद्धा का नसावी?
विवेकवादी: श्रद्धा का नसावी ? श्रद्धेमुळे माणसाची कोणती हानी (नुकसान) होते ? या प्रश्नांविषयीं त्या लेखात विवेचन केलेच आहे. ते असो. तुमच्या काही शंका असतील त्यांविषयी आपण अवश्य चर्चा करूया. पण तत्पूर्वी आपल्याला "श्रद्धा" या संकल्पनेची व्याख्या करावी लागेल. श्रद्धेविषयी तुमची समज आणि माझी समज भिन्न भिन्न असतील तर चर्चा निष्फळ ठरेल. म्हणजे तुम्ही एका विषयावर बोलत आहात तर मी दुस-याच असे होईल.
भाविक: श्रद्धा म्हणजे काय यावर आपणा दोघांची मते इतकी वेगवेगळी असतील काय ?
विवेक : असू शकतील. प्रत्येकाला वाटते की एखाद्या संकल्पनेची आपल्या डोक्यात जी व्याख्या आहे तीच सर्वांच्या डोक्यात असणार. सर्वसाधारण बोलण्यात , लिहिण्यात आपण विश्वास, श्रद्धा, निष्ठा हे शब्द साधारणपणे एकाच अर्थी वापरतो. पण या तीन शब्दांचे तीन काटेकोर अर्थ आहेत. ते भिन्न भिन्न आहेत. तसे असायला हवेत.
भाविक : असे ? मला हे ठाऊक नव्हते.
विवेक : ठीक आहे. तुमच्या मते श्रद्धा म्हणजे काय ते सांगा. अथवा श्रद्धा शब्द वापरून एक वाक्य बोला.
भाविक: श्रद्धा म्हणजे एखाद्या पवित्र गोष्टीवरील दृढ आणि अतूट विश्वास. उदा. देव अस्तित्वात आहे यावर माझी श्रद्धा आहे.
विवेक : श्रद्धाविषय पवित्र का हवा?
भाविक : मला वाटते श्रद्धा ही पवित्र गोष्टीवरच ठेवतात. "पृथ्वी सूर्याभोवती फिरते." या गोष्टीवर माझा विश्वास आहे. पण ती श्रद्धा नव्हे.
विवेक : देव पवित्र म्हणून त्याच्यावर श्रद्धा. पृथ्वीचे सूर्याभोवती भ्रमण पवित्र नाही. म्हणून त्यावर विश्वास. पण पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे ज्ञान आहे ना ? आणि "नहि ज्ञानेनसदृशं पवित्रमिह विद्यते।" [ज्ञानासारखे पवित्र अन्य काही नाही.] असे गीतेत म्हटले आहे ना?
भाविक : ते असो.
विवेक : बरे असो. देवाचे अस्तित्व तुम्ही खरे मानता. ते कोणत्या आधारावर ?
भाविक : अहो, देव अस्तित्वात आहे हे बहुसंख्य लोक खरे मानतात. त्याअर्थी ते खरेच असले पाहिजे. ते खोटे का म्हणायचे ?
विवेक: सत्यासत्य बहुमताने ठरत नाही. बहुमताने पारित होतात ते सभेतील ठराव. हजारांतील ९९९ जणांनी असत्याला सत्य मानले तरी ते असत्यच राहाते. "बहुसंख्य लोक देवाचे अस्तित्व खरे मानतात म्हणून मी मानतो." हा युक्तिवाद सदोष आहे. त्यावरून देवाचे अस्तित्व सिद्ध होत नाही. क्षमा करा, पण तुम्ही गतानुगतिक मनोवृत्तीचे आहात हे यावरून दिसून येते.
भाविक: ते कांही असो. देव अस्तित्वात आहे यावर आमची -म्हणजे आम्हा सर्व भाविकांची-पूर्ण श्रद्धा असते. त्यासाठी कसल्या पुराव्याची, आधाराची आवश्यकता वाटत नाही. किंबहुना देव हाच आमचा आधार आहे. तुम्हा विवेकवाद्यांची कशावरच श्रद्धा नसते काय ?
विवेक : नसते. विवेकवादी व्यक्ती कशावरच श्रद्धा ठेवत नाहीत. श्रद्धेची आवश्यकताच नाही. श्रद्धेमुळे मानवसमाजाची अतोनात हानी झाली आहे असे आम्ही मानतो. पण त्यासाठी व्याख्या करायला हवी.
भाविक: तेच तर मी मघापासून म्हणतो आहे. विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा या तीन संकल्पनांच्या तुमच्या व्याख्या सांगा.
विवेक. : जे विधान, जे तत्त्व, जो निसर्गनियम, जी संकल्पना, जी गोष्ट :
१) पंच ज्ञानेंद्रियांतील एकातरी इंद्रियाने प्रत्यक्ष अनुभवता येते.
अथवा २) जिच्या कथित गुणधर्मांचा सार्वत्रिक,सार्वकालिक प्रत्यक्ष प्रत्यय येतो,
अथवा ३) जी वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध करता येते,
अथवा ४) जी खरी असण्याची शक्यता अनुभवाने, कॉमनसेन्सने, किंवा तर्कसंगत युक्तिवादाने दाखविता येते,
अथवा ५) जिचे सत्यत्व मानवाच्या अधिकृत ज्ञानसंग्रहातील तत्त्वांच्या आधारे सिद्ध करता येते,
थोडक्यात म्हणजे ज्याची सत्यता माणसाच्या तर्कबुद्धीला पटते, पटविता येते. केवळ तेच तत्त्व, तीच संकल्पना, तीच गोष्ट सत्य मानणे म्हणजे विश्वास ठेवणे होय.
भाविक: तुमची ही "विश्वास" शब्दाची व्याख्या लांब आणि किचकट झाली.
विवेक.: लांब झाली हे मान्य. पण परिपूर्ण व्याख्या करताना शक्य ते सर्व पर्याय लक्षात घ्यावे लागतात. म्हणून व्याख्या मोठी झाली. पण किचकट नाही. सोपे स्पष्टीकरण असे : वर पाच कसोट्या दिल्या आहेत. त्यांतील किमान एका कसोटीला जे तत्त्व, जो नियम,जे विधान खरे उतरते तेच सत्य मानणे म्हणजे त्यावर विश्वास ठेवणे.
.
भाविक: आता श्रद्धा या संकल्पनेची तुमची व्याख्या सांगा.
विवेक: श्रद्धेची स्वतंत्र व्याख्या करण्याची आवश्यकता नाही. विश्वासाच्या संदर्भात ज्या पाच कसोट्या वर सांगितल्या आहेत त्यांतील एकाही कसोटीला खरी न उतरणारी संकल्पना केवळ पूर्वग्रहामुळे, शब्दप्रामाण्यामुळे खरी मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा.
तर "एवं गुण विशिष्ट देव अस्तित्वात आहे." हे विधान या पाच अटीतील एकही अट पूर्ण करीत नाही, तरीसुद्धा "ते विधान सत्य आहे." असे मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा.
भाविक: हे कळले. आता निष्ठा म्हणजे काय ते सांगा.
विवेक: आपण थोडी उजळणी करूंया. एखादे विधान, तत्त्व, एखादी संकल्पना , नियम इ. सत्य असण्याची शक्यता आहे किंवा नाही हे तपासण्याच्या ज्या पाच अटी आहेत त्यांतील एकही अट पूर्ण करीत नसेल तर ते विधान , संकल्पना, नियम इ. तर्कदृष्ट्या असत्य ठरते. असे विधान उपनिषदांत आहे, पुराणात आहे, गीतेत भगवंतांच्या मुखी घातले आहे . अशा शब्दप्रामाण्याच्या आधारे सत्य मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा होय, हेही स्पष्ट केले आहे.
वरील व्याख्यांवरून दिसून येते की श्रद्धा ही व्यक्तीच्या भावनेशी तर विश्वास हा व्यक्तीच्या विचारसरणीशी संबधित आहे.. "देव अस्तित्वात आहेच." अशी आस्तिकांची भावना असते. तरी प्रत्येक आस्तिक व्यक्ती देवपूजा, नामजप, होमहवन अशी कर्मकांडे करीलच असे नाही. तसे न केले तरी त्या व्यक्तीच्या श्रद्धेला बाधा येत नाही. ती व्यक्ती श्रद्धावंतच राहाते. कारण श्रद्धेचा संबंध आचारांशी नसतो तर भावनेशी असतो.
तसेच नास्तिकाच्या घराण्यात परंपरागत चालत आलेले कांही धार्मिक सण -उत्सव तो करणारच नाही असे नाही. तसे केल्याने त्याच्या नास्तिकवादी विचारसरणीला बाधा पोचत नाही. "देव अस्तित्वात नाही" हा त्याचा विचार ठाम असतो.
याप्रमाणे श्रद्धा आणि विश्वास या संकल्पना अनुक्रमे व्यक्तीच्या भावनेशी आणि विचाराशी निगडित आहेत, आचारांशी नाहीत. मात्र विचार आणि आचार यांत एकवाक्यता असणे चांगले हेही खरेच. आणि तसे बहुधा असतेच. पण अशी एकवाक्यता नसली तरी श्रद्धा आणि विश्वास यांच्या आपल्या व्याख्या अबाधित राहातात.
भाविक : हे सर्व चांगले समजले. आता निष्ठा म्हणजे काय ते तुमच्याकडून ऐकण्याची उत्सुकता आहे.
विवेक. : निष्ठा ही संकल्पना, व्यक्तीच्या आचारांशी संबंधित आहे. आपण निष्ठेची व्याख्या करूया. "एखादी कृती अथवा कार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण ते प्रामाणिकपणे केलेच पाहिजे." अशी मनोवृत्ती असणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे निष्ठा. मग या मनोवृत्तीचे कारण काहीही असो. समजा "अ" या व्यक्तीची योगासनांवर निष्ठा आहे. तर "अ" नित्य नेमाने योगासने करणारच. योगासनांनी शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगले राहाते अशी त्याची श्रद्धा अथवा असा विश्वासही असू शकेल. त्याला महत्त्व नाही. "अ" नित्य नेमाने योगासने करीत नसेल तर त्याची योगासनांवर निष्ठा नाही असे म्हणावे लागेल.
समजा "ब" ची आबाजींवर निष्ठा आहे. याचा अर्थ "ब" स्वत:ला आबाजींचा निष्ठावंत सेवक समजतो. त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य मानतो. समजा "सत्य-अहिंसा-अस्तेय " या तत्त्वांवर "क" ची श्रद्धा आहे. याचा अर्थ असा होतो की "क" कधीही हेतुपूर्वक (म्हणजे जाणून-बुजून) असत्य बोलत नाही. कुणाची हिंसा करीत नाही. कठोर बोलून कुणाचा आत्मसन्मान दुखावत नाही.(कारण ती हिंसाच असते.) तसेच अस्तेय म्हणजे चोरी न करणे हे तत्त्व "क" पूर्णांशाने पाळतो.
याप्रमाणे निष्ठा ही संकल्पना आचरणाशी संबंधित असते. त्या मागच्या विचारसरणीशी नाही. समजा "ड" जर विवेकानंदांचा निष्ठावंत भक्त असेल तर त्याने विवेकानंदांची शिकवणूक आचरणात आणायला हवी. तसेच त्या शिकवणुकीचा शक्य होईल तेवढा प्रसार करायला हवा.
भाविक : छान ! देवाच्या अस्तित्वाविषयी तुमचे आणि माझे मतभेद असले तरी श्रद्धा- विश्वास-निष्ठा या संकल्पनांच्या तुम्ही केलेल्या व्याख्या मला आवडल्या. पण "श्रद्धेचे दुष्परिणाम" या विषयावर आपली चर्चा झालीच नाही. त्यासाठी पुन्हा कधीतरी येईन. धन्यवाद !
विवेक : अवश्य यावे. तुमचे सदैव स्वागत आहे. धन्यवाद !
**********************************************

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

2 Feb 2018 - 5:22 pm | प्रकाश घाटपांडे

श्रद्धा ही व्यक्तीच्या भावनेशी तर विश्वास हा व्यक्तीच्या विचारसरणीशी संबधित आहे.. "देव अस्तित्वात आहेच." अशी आस्तिकांची भावना असते. तरी प्रत्येक आस्तिक व्यक्ती देवपूजा, नामजप, होमहवन अशी कर्मकांडे करीलच असे नाही. तसे न केले तरी त्या व्यक्तीच्या श्रद्धेला बाधा येत नाही. ती व्यक्ती श्रद्धावंतच राहाते. कारण श्रद्धेचा संबंध आचारांशी नसतो तर भावनेशी असतो.
तसेच नास्तिकाच्या घराण्यात परंपरागत चालत आलेले कांही धार्मिक सण -उत्सव तो करणारच नाही असे नाही. तसे केल्याने त्याच्या नास्तिकवादी विचारसरणीला बाधा पोचत नाही. "देव अस्तित्वात नाही" हा त्याचा विचार ठाम असतो

सहमत आहे. पण मेंदुत जैव् रासायनिक बदल झाले तर बदल होउ शकतात.

लेख आवडला, कितीही टीका झाली तरी यनावालांचे आपल्या विचारांवर ठाम असणे नेहमीच आवडते.

राही's picture

3 Feb 2018 - 6:22 pm | राही

प्रचेतस यांच्याशी पूर्णपणे सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Feb 2018 - 9:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला, कितीही टीका झाली तरी यनावालांचे आपल्या विचारांवर ठाम असणे नेहमीच आवडते.

सहमत रे वल्ली...!!!

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

6 Feb 2018 - 11:44 pm | प्रसाद गोडबोले

लेख आवडला, कितीही टीका झाली तरी यनावालांचे आपल्या विचारांवर ठाम असणे नेहमीच आवडते.

विचारांवर ठाम रहाणे हाच फार मोठ्ठा पराडोक्स आहे त्यांच्या विचारसरणीतला ! सिधांत चुकीचा दिसत असेल तर तो त्यागणे , जे योग्य दिसते ते स्विकारणे हा विज्ञानाचा खरा मार्ग आहे ! जे अयोग्य दिसते ते त्यागणे हे जमले पाहिजे !

रेने देकार्त त्याच्या मेडिटेशन्स आणि फर्स्ट फिलॉसोफी मध्ये पहिल्याच चॅप्टर मध्ये Meditation I. Of the things which may be brought within the sphere of the doubtful. श्रध्दा विश्वास ज्ञान अज्ञान ह्या संदर्भाने सविस्तर चर्चा करतो ह्या विषयवर ! तो म्हणातो :

All that up to the present time I have accepted as most true and certain I have learned either from the senses or through the senses; but it is sometimes proved to me that these senses are deceptive, and it is wiser not to trust entirely to anything by which we have once been deceived.

ज्ञान विज्ञान तत्वज्ञान आत्मज्ञान ह्या सार्‍यावर सविस्तर चर्चाही करता आली असती पण यनाचा उद्देश केवळ टीका करणे हाच आहे ! जर कुत्राचे शेपुट वाकडेच रहाणार असेल तर ते सरळ कराय्चा प्रयत्न करणे काही शहाणपणाचे नाही म्हणुन त्याच्याशी चर्चा करण्यात अर्थच नाहीय !!

पण
दुसर्‍याचे मत समजुनही न घेता , केवळ दुसर्याम्वर टीका करत रहाणे असाच अजेंडा वल्ली सरांच्या कौतुकास पात्र होत असेल तर आम्हीही तेच करत राहु .

ख्या ख्या ख्या !!

जालिम लोशन's picture

5 Oct 2019 - 2:09 pm | जालिम लोशन

बर्‍याच जणांना ते वळत नाही.

रात्री झोपताना मी जर म्हणालो, उद्या सकाळी मी लवकर उठून अमुक एक काम करणार आहे. यात 'उद्या दिवस उगवणार आहे' हि माझी श्रद्धा आहे कि विश्वास?

मार्मिक गोडसे's picture

3 Feb 2018 - 9:42 am | मार्मिक गोडसे

Speculation म्हणता येईल.

उद्या दिवस उगवणार आहे :
Statistics : आतापर्यंत नेहमीच रात्रीनंतर दिवस आला आहे, त्यामुळे उद्या दिवस उगवण्याची probability 100%(1) आहे.
Astronomy & Physics : रात्रीनंतर दिवस येतोच.
त्यामुळे रात्रीनंतर दिवस येणार हा विश्वास आहे.
तुम्ही तो दिवस उद्या बघणार ही तुमची श्रद्धा आहे.

सालदार's picture

6 Feb 2018 - 8:55 pm | सालदार

हेच सेपरेशन हवं होतं!

चौकस२१२'s picture

5 Oct 2019 - 3:08 pm | चौकस२१२

वगिश...ह्याला म्हणतात बुल्स आय

तसेही श्रद्धा आणी विश्वास अतीशय ambiguous शब्द आहेत, इतके की द्विरुक्ती ठरावी.

आतापर्यंत नेहमीच रात्रीनंतर दिवस आला आहे, त्यामुळे उद्या दिवस उगवण्याची probability 100%(1) आहे.

1) नाही. समजा मी पृथ्वीच्या आशा भागात आहे जिथे रात्र ही तास न्हवे महिन्यात मोजता येईल, तिथे उद्या कदाचीत फक्त काळरात्रच उगवेल दिवस नाही.

2) जिथे सुर्यच नेहमी प्रकाशीत राहील याची शाश्वती नाही तिथे रात्रीनंतर दिवस हे विधान 101% सत्य ठरतनाही

3) अथवा पृथ्वीवर काही आपत्ती निर्माण होणार नाही याची जिथे शाश्वती नाही तेथे रात्रीनंतर दिवस उगवेल हे फक्त अनुभवाधारीत विधान ठरते.

हे विधान भूतकाळातील मर्यादित अनुभवाधारीत "विश्वास" म्हणजेच दृढश्रध्देची प्रगाढ पुष्टतायुक्त भावना म्हणून फक्त आणी फक्त एक श्रद्धाच ठरते. विज्ञानिक सत्य तर अजिबात नाही.

मार्मिक गोडसे's picture

3 Feb 2018 - 9:49 am | मार्मिक गोडसे

यनावालांच्या यशस्वी चालींने श्रद्धा लवकरच चेक मेट होणार असं वाटतंय.

पिवळा डांबिस's picture

3 Feb 2018 - 12:07 pm | पिवळा डांबिस

तुमच्या ह्या अव्याहत दगडफोडीनंतर तरी ज्ञानाचे निव्वळशंख पाणी वहाणारा झरा उदयास येवो ही सदिच्छा.
कै होईलसं वाटत नाय, पण तरीही सदिच्छा...

माहितगार's picture

3 Feb 2018 - 12:43 pm | माहितगार

....याप्रमाणे निष्ठा ही संकल्पना आचरणाशी संबंधित असते. त्या मागच्या विचारसरणीशी नाही.

या बद्दल सबळ साशंकता वाटते. निष्ठा या विषयावर वेगळ्या धागा चर्चेची गरज असावी. आचरणाचे काही भाग हे कर्मकांडाचे असू शकतात एखादी व्यक्ती कर्मकंडात सहभगी न होता विचारसरणीशी बांधील असू शकते. राष्ट्रगीत ऐकु येताना प्रत्येकवेळी उभे टकणार नाही पण प्रत्यक्षात वेळ आल्यावर देशासाठी प्राण देईल असे होऊ शकतेच.

उपरोक्त व्याख्येत बाह्य उपचारास महत्व अधिक दिले आहे. बाह्य उपचार न करता निष्ठा अस्तीत्वात असू शकतात.

इतक्या संयमाने सांगणारे विवेकवादी आणि संयमाने ऐकून घेणारे भाविक असू शकतात यावर श्रद्धा ठेववत नाही हो..

तुमच्या कल्पनेतला भाविक किती समजूतदार , विनयशील आणि तुम्ही म्हणाल ते लगेच पटणारा आहे ... त्यामानाने खऱ्या जगातले लोक / भाविक फारच असमंजस , प्रत्येक गोष्टीवर वाद घालणारे आणि अडेलतट्टू वाटतात .

माहितगार's picture

3 Feb 2018 - 2:18 pm | माहितगार

....श्रद्धेची स्वतंत्र व्याख्या करण्याची आवश्यकता नाही. ....

श्रद्धा विश्वासापेक्षा स्वतंत्र आहे पण स्वतंत्र व्याख्या करण्याची आवश्यकता नाही हे विधान विरोधाभासी आणि आणि पुर्वग्रहीत व्यक्तीगत मत दिसते. पुर्वग्रहीत यासाठी कि श्रद्धेची कुणी स्वतंत्र व्याख्या केली तर त्याची आम्ही दखल घेणार नाही अशी वृत्तीही यातून व्यक्त होते.

....विश्वासाच्या संदर्भात ज्या पाच कसोट्या वर सांगितल्या आहेत त्यांतील एकाही कसोटीला खरी न उतरणारी संकल्पना केवळ पूर्वग्रहामुळे, शब्दप्रामाण्यामुळे खरी मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा.

आधी निष्कर्ष ठरवून मग लिहिलेली व्याख्या दिसते या बद्दल मी आधीच्या एका धाग्यावर चर्चा केलेली आहे त्याचे पुर्नरावृत्ती करत करत नाही. व्याख्या ह्या आधी ठरवलेल्या नकारात्मक निष्कर्षावर आधारीत स्विकार्य असू शकत नाहीत

यनावाला's picture

4 Feb 2018 - 5:47 pm | यनावाला

श्री.माहितगार लिहितात,
"

श्रद्धा विश्वासापेक्षा स्वतंत्र आहे पण स्वतंत्र व्याख्या करण्याची आवश्यकता नाही हे विधान विरोधाभासी आणि आणि पुर्वग्रहीत व्यक्तीगत मत दिसते. पुर्वग्रहीत यासाठी कि श्रद्धेची कुणी स्वतंत्र व्याख्या केली तर त्याची आम्ही दखल घेणार नाही अशी वृत्तीही यातून व्यक्त होते."

श्री.माहितगार यांचा कांही चुकीचा समज झालेला दिसतो. मी जे लिहिले आहे ते संवादाच्या संदर्भात आहे. विश्वासाची व्याख्या आधीच दिली आहे. त्यांतील पाच कसोट्या वापरून श्रद्धेची व्याख्या करता येते. त्याच कसोट्या पुन्हा लिहिण्याची आवश्यकता नाही एवढाच अर्थ आहे. त्या संवादात श्रद्धेची व्याख्या लिहिलीच आहे. कसोट्या परत लिहिल्या नाहीत एवढेच. श्रद्धेची कुणी स्वतंत्र व्याख्या लिहिली तर आम्ही त्याअची दखल घेणार नाही. असा अर्थ त्यातून कसा प्रतीत होतो ? बुद्धीला पटेल अशी परिपूर्ण व्याख्या कोणी लिहिली तर ती मान्य करावीच लागेल.
श्री.माहितगार असेही म्हणतात की,

"आधी निष्कर्ष ठरवून मग लिहिलेली व्याख्या दिसते ."

संकल्पनेची व्याख्या लिहिताना आधी पूर्ण विचार करावाच लागतो. काय लिहायचे ते ठरवावेच लगते. मग ते योग्य शब्दांत मांडावे लागते. वैज्ञानिक प्रयोग करताना आधी निष्कर्ष ठरवू नये. प्रयोगाच्या निरीक्षणांवरून निष्कर्ष काढावा हे खरे.

चौकटराजा's picture

3 Feb 2018 - 2:54 pm | चौकटराजा

मी मागल्या एका धाग्यात उदाहरण दिले होते त्याचेच हे विस्तारित रूप आहे. विश्वास अनुभव , निरिक्षण ई च्या साह्याने इतरास काहीसा का होईना पटवून देता येतो. उदा
उद्या सकाळी सूर्य उगवेल यात तो न उगवण्याची शक्यता ५० टक्के तत्वतः आहेच. पण अनुभव पहाता ती शून्य आहे. हे वेडा सोडला तर कुणाला ही पटेल. कारण अनेक युगे तो उगवत आलेला आहे. पण उद्या महात्मा गान्धी अवतरतील व सध्याच्या स्थितीवर भाष्य करतील असे विधान श्रद्दावाला करेल कारण अतापावेतो वर गेलेला खाली आला नाही हे त्याला पटत असले तरी त्याची भावना त्याला सांगतेय " ते येतील . "

यनावाला's picture

3 Feb 2018 - 3:12 pm | यनावाला

@श्री. सालदार

रात्री झोपताना मी जर म्हणालो, उद्या सकाळी मी लवकर उठून अमुक एक काम करणार आहे. यात 'उद्या दिवस उगवणार आहे' हि माझी श्रद्धा आहे कि विश्वास?

हा निश्चितपणे विश्वास आहे. (व्याख्येतील अट क्र.४) तो सार्वकालिक, सार्वत्रिक आणि व्यक्तिनिरपेक्ष अनुभव आहे. (व्याख्येतील अट क्र.४) . असे पाहा, आपण राहतो ते जग वास्तव आणि व्यावहारिक आहे. उद्या सूर्य उगणार या विश्वासावर माणूस भविष्यकाळासाठी नियोजन करतो. " येत्या दसर्‍याला मायक्रोवेव्ह आवन घ्यायची " असे ठरवतो आणि ते चार महिन्यांनी प्रत्यक्षात येते. आपला सूर्य कधीतरी नष्ट होईलही. पण त्याला अब्जावधी वर्षे आहेत.
"सगळे क्षणभंगुर आहे.अशाश्वत आहे ." असले आध्यात्मिक विचार भोंगळ आहेत. अव्यवहार्य आहेत. आपली क्रॉकरीसुद्धा वीस वर्षे फुटत नाही!
....यनावाला

सालदार's picture

6 Feb 2018 - 8:53 pm | सालदार

वोक्के! मान्य..धन्यवाद.

गामा पैलवान's picture

3 Feb 2018 - 6:30 pm | गामा पैलवान

यनावाला,

तुमचं वरील विधान रोचक आहे :


"सगळे क्षणभंगुर आहे.अशाश्वत आहे ." असले आध्यात्मिक विचार भोंगळ आहेत. अव्यवहार्य आहेत. आपली क्रॉकरीसुद्धा वीस वर्षे फुटत नाही!

अध्यात्मिक विचार अव्यवहार्य असू शकेल, पण तो भोंगळ कसा काय?

कपबशा वीस वर्षे फुटल्या नाहीत. ठीके. तुमचं वय वाढलं ना वीस वर्षांत? तुमच्या देहांत बदल होतोच आहे. तो कोणाला चुकलाय? देहासकट सर्व परिस्थितीत सतत बदल होत असतो. त्यालाच क्षणभंगुरत्व म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

राही's picture

3 Feb 2018 - 7:06 pm | राही

मला स्वत:ला 'क्षणभंगुर' या संकल्पनेचा ( केवळ या शब्दाचा नव्हे) अर्थ जो जाणवतो तो असा:
शब्दश: अर्थ म्हणजे क्षणात नष्ट होणारे. पण तेव्हढेच नव्हे. हे जग क्षणभंगुर आहे, नाशिवंत आहे तेव्हा त्यात गुंतू नका. हे जे वर वर दिसते ते खरे नाही. शाश्वत नाही. ही सर्व माया आहे. तेव्हा जे नाशिवंत नाही, शाश्वत आहे, नित्य आहे त्याचा शोध घ्या, तिथे मन रमवा.
हे अर्थात ऐहिकामध्ये गुरफटू नका असे सांगणे आहे आणि ते सर्वसामान्यांच्या पचनी पडेल किंवा त्यांना सहज आचरता येईल असे नाही. तेव्हा 'प्रपंच करावा नेटका' हे बरे. नेहमीच्या जगण्यासाठी टिकाऊ, तकलादू या मुद्द्यांवर आपण वस्तू तपासतो, खरेदीविक्रीचे, जगण्याचे संदर्भ बनवतो. तरतूद करतो, साठा करतो, नियोजन करतो वगैरे. आणि जगण्यासाठी हे आवश्यकच आहे. आणि सर्वसामान्यांसाठी तेच बरे.यात प्रयत्नवादही आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Feb 2018 - 8:51 pm | प्रकाश घाटपांडे

सहमत आहेच. म्हणुनच मी फलज्योतिशहे माणसाला दैववादी बनवते हे विधान मला पटत नाही

गामा पैलवान's picture

3 Feb 2018 - 7:10 pm | गामा पैलवान

रोचक (इंग्रजी) कथा : https://www.quora.com/What-is-something-you-want-to-get-off-your-chest-u...

प्रश्न : वरील नास्तिकाचं करायचं काय?

-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Feb 2018 - 7:55 pm | प्रकाश घाटपांडे

बाकी नास्तिकांनी तो खरा नास्तिक नव्हताच असे म्हणायचे. इंद्रियजन्य भ्रम असे म्हणता येईल. त्याच्यापुरता तो अनुभ्व खराच होता.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Feb 2018 - 7:32 pm | प्रकाश घाटपांडे

बर बाकी जाउ द्या! तुमच्या जगण्याची व्याख्या सांगा.जन्म ते मृत्यु यातील अंतर म्हणजे जगण का?

यनावाला's picture

3 Feb 2018 - 8:48 pm | यनावाला

@श्री.चौकट राजा
ते लिहितात:

"उद्या सकाळी सूर्य उगवेल यात तो न उगवण्याची शक्यता ५० टक्के तत्वतः आहेच. पण अनुभव पहाता ती शून्य आहे."

अनुभव पाहता सूर्य न उगवण्याची संभवनीयता शून्य आहे हे खरेच. पण तत्त्वत: सुद्धा ती शून्याप्रत जाणारीच आहे. सूर्य न उगवण्यावी संभवनीयता ५०% असती तर १०० दिवसांत ४५ ते ५५ वेळां सूर्य उगवलाच नसता. इथे:-
सकाळी सूर्य न उगवण्याची संभवनीयता --->० % (approaches 0 % )
सकाळी सूर्य उगवण्याची संभवनीयता --->१०० % (approaches 100 % )
....यनावाला

नेत्रेश's picture

4 Feb 2018 - 2:10 pm | नेत्रेश

हेच लिहीणार होतो

नेत्रेश's picture

4 Feb 2018 - 2:49 pm | नेत्रेश

विश्वास-श्रद्धा-निष्ठा या गोष्टी व्यक्तीसापेक्ष असतात. विज्ञान फक्त सत्य मानते / शोधते, त्यामुळे वेळोवेळी आधीचे निष्कर्श बदलुन नवीन माहीती उजेडात आणत असते. आज विज्ञानाला देवाचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही याचा अर्थ विज्ञानाला देवाचे अस्तित्व मान्य नाही असा नसुन आजच्या घडीला विज्ञान तेवढे प्रगत नाही असा होतो.

२ हजार वर्षांपुर्वीच्या विज्ञानाला पृथ्वी सपाट व स्थीर आहे, व चंद्र, सुर्य, तारे पृथ्वीभोवती फीरतात हे मान्य होते.
२०० वर्षांपुर्वीच्या विज्ञानाला माणुस उडु शकत नाही, पाणी हे मुलद्रव्य आहे हे मान्य होते.
५० वर्षांपुर्वी बहुतेक वैज्ञानिकांना ब्लॅकहोलचे अस्तित्व पटत नव्हते.
आजच्या विज्ञानाला अजुनही साधा प्रकाश हा particle (photon) आहे की wave हे निश्चित करता आलेले नाही.
तर देव आहे की नाही हे ठामपणे सांगण्या एवढे आजचे विज्ञान निश्चेतच प्रगत नाही. पण भविष्यात कुणाला देवाला शोधणे, अनुभुती घेणे शक्य होणार नाही असे म्हणणे म्हणजे विज्ञानाला विरोध करणे झाले.

सतिश गावडे's picture

4 Feb 2018 - 2:58 pm | सतिश गावडे

आज विज्ञानाला देवाचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही याचा अर्थ विज्ञानाला देवाचे अस्तित्व मान्य नाही असा नसुन आजच्या घडीला विज्ञान तेवढे प्रगत नाही असा होतो.

आजच्या विज्ञानाला अजुनही साधा प्रकाश हा particle (photon) आहे की wave हे निश्चित करता आलेले नाही.
तर देव आहे की नाही हे ठामपणे सांगण्या एवढे आजचे विज्ञान निश्चेतच प्रगत नाही. पण भविष्यात कुणाला देवाला शोधणे, अनुभुती घेणे शक्य होणार नाही असे म्हणणे म्हणजे विज्ञानाला विरोध करणे झाले.

विज्ञानाच्या बाजूने लिहीत आहे असे भासवून तुम्ही हळूच कार्यभाग साधून घेतला आहे. हे वाचून यनावाला "हेची फळ काय मम लेखाला" असे म्हणून कपाळावर हात मारून घेतील.

गामा पैलवान's picture

4 Feb 2018 - 3:24 pm | गामा पैलवान

सतिश गावडे,

विज्ञानाच्या बाजूने लिहिणे म्हणजे नक्की काय? विज्ञानास स्वत:ची अशी काही बाजू असते का? की जी काही बाजू आहे ती नेत्रेश या व्यक्तीची आहे?

आ.न.,
-गा.पै.

विज्ञान हे अंतिम सत्य नाही, विज्ञान म्हणजे सत्याचा शोध.
एखादी गोष्ट नक्की माहीत नसताना त्या बाबत अडुन रहाणे किंवा ठाम विधान करणे विज्ञानाच्या बाजुने बोलणे नक्कीच नाही.

चौकस२१२'s picture

5 Oct 2019 - 4:12 pm | चौकस२१२

" तर देव आहे की नाही हे ठामपणे सांगण्या एवढे आजचे विज्ञान निश्चेतच प्रगत नाही."
बरं तसे पण याचा उपयोग असा नाही आपण करू शकत आपण कि " बघा विज्ञानाला देव नाही हे सिद्ध करता येत नाही म्हणजे मग तो असलाच पाहिजे ..

असो देव आहे किंवा नाही हा फुकाचा वाद वाटतो मला .. त्यापैकेश इंग्रजीत जायला आग्नोस्टिक म्म्हन्तात ते पटते ... असेल बापडा देव मला काय फरक पडतो... जगायचे आणि शेवटी मारायचे हेच सत्य ....ते करिना दुसऱ्याला आणि आपल्याला कमीत कमी त्रास दयावा आणि जगावे त्यासाठी ना अंधश्रेद्धेच्या कुबड्या लागतात ना ज्योतिषाच्या
( अरे बापरे ज्योतिष,, चुकून पंडोरा बॉक्स उगडलाला कि काय !)

प्रकाश घाटपांडे's picture

4 Feb 2018 - 8:38 pm | प्रकाश घाटपांडे

हिंदी मध्ये अंधश्रद्धा ला अंधविश्वास का म्हणतात.श्रद्धा शब्द तर हिंदी मध्ये पण आहे

चित्रगुप्त's picture

6 Feb 2018 - 6:01 pm | चित्रगुप्त

मय भी वोईच सोचता रहेला, ये मराठी मे अंधविश्वास को अंधश्रद्धा क्यो बोलते है जबकी अंधविश्वास शब्द मराठी मे भी है....

यनावाला's picture

6 Feb 2018 - 9:46 pm | यनावाला

@प्रकाश घाटपांडॆ आणि चित्रगुप्त
"अंधविश्वास" या शब्दाचा अर्थ "श्रद्धा" असाच होतो. कारण ज्या गोष्टीच्या सत्यतेसाठी कोणताही पुरावा नसतो ती गोष्ट पूर्वग्रहामुळे डोळे झाकून (आंधळेपणाने) खरी मानणे म्हणजे श्रद्धा. यावरून अंधविश्वास अणि श्रद्धा हे शब्द समानार्थी आहेत. म्हणजे अंधविश्वास हा श्रद्धेसाठी पर्यायी शब्द मानता येईल. मराठीत तो फारसा रूढ नाही. हिंदीत श्रद्धेसाठी "आस्था" असाही शब्द वापरतात.

गामा पैलवान's picture

6 Feb 2018 - 11:18 pm | गामा पैलवान

यनावाला,

ज्या गोष्टीच्या सत्यतेसाठी कोणताही पुरावा नसतो ती गोष्ट पूर्वग्रहामुळे डोळे झाकून (आंधळेपणाने) खरी मानणे म्हणजे श्रद्धा.

तुमची ही श्रद्धेची व्याख्या पार चुकीची आहे. श्रत् म्हणजे ऐकलेलं किंवा अनुभवलेलं. धा म्हणजे मनाची धारणशक्ती. म्हणून श्रद्धा म्हणजे अनुभव धारण करायची मनाची क्षमता. हिचा डोळे झाकून विश्वास ठेवण्याशी काडीमात्र संबंध नाही. श्रद्धेची व्याख्या करतांना तिच्या अर्थाचा विपर्यास तुमच्याकडून होतो आहे. शब्दातून जो अर्थ सूचित होतो आहे त्याबद्दल बोलावे. उगीच मन मानेल तसे अर्थ लावू नये.

आ.न.,
-गा.पै.

manguu@mail.com's picture

6 Feb 2018 - 11:43 pm | manguu@mail.com

श्रत म्हणजे ऐकलेलं.

श्रुणु धातूचे रूप वाटते.
...

अनुभवलेलं हा अर्थ कसा होउ शकेल ?

गामा पैलवान's picture

7 Feb 2018 - 1:37 pm | गामा पैलवान

manguu@mail.com,

तुमचा कयास बरोबर आहे. ऐकलेलं म्हणजे श्रुत. श्रत् चा निरुक्तानुसार अर्थ अंतिम सत्याच्या संदर्भात स्वत:ला आलेली अनुभूती असा आहे. यनावाला अंतिम सत्य मानंत नाहीत. त्यामुळे ऐकलेलं असा शब्दप्रयोग केला.

आ.न.,
-गा.पै.

Rahul Dhanraj Patil's picture

4 Oct 2019 - 4:00 am | Rahul Dhanraj Patil

Sir tumhi sangitalya pramane kontahi thos purava athava kontyahi goshtoche Satya samje vina vishwas thevane mhanje shraddha.mi apalya matashi pari purn sahamat ahe.mag tumhi mala he sanga ki Shraddha ani andh shraddha yat Kay vegalepana.ani maza prashna kramank dusara asa ki nishthavan manushya ani kartavyala pramanik asnara manushya ya donhit Kay farak

परंतु बुद्धिमत्ता (intelect)मान्य करतेच असे नाही ती श्रद्धा होय.

यनावलांनी मिपाला रामराम ठोकला याचं काही संबंध नसताना थोडंसं वाईट वाटतं .. आता ते बहुतेक फक्त फेसबुकवर लिहितात .. तिथे त्यांचं डोकं खाणारे निगेटिव्ह प्रतिसाद जवळपास येतच नाहीत बहुतेक सगळे पॉजिटिव्हच असतात .. चांगला माणूस आहे , इथल्या टिंगल टवाळीला आणि अतिचिकित्साखोर प्रश्नांना उत्तरं द्यायला त्यांना झेपलं नाही .. उत्तरं देता येत नाहीत तर लोकांना अतिशहाणपणाने सल्ले द्यायचं काम हाती घ्यायचं कशाला असाही प्रश्न बहुतेक विचारला गेला ... पण त्यांची पद्धत परिणामकारक नसली तरी हेतू चांगलाच होता , अंधश्रद्धा दूर व्हाव्यात हा ... त्यात लोकांना कमी - मूर्खात काढणारा सूर दुर्दैवाने स्वीकारला गेला आणि तो सहन न होऊन इथल्या लोकांनी त्यांना पुरेवाट करून सोडली ..
आज धाग्यात नाव बघून फेबुवर जाऊन पुन्हा एकदा आहेत की गेले याची खात्री करून घेतली ... अभद्र शंका .. कुठला काडीचा संबंध नाही पण उगाच जराशी हुरहूर - काळजी काहीतरी भावना निर्माण झाली आहे मनात ... असो काही दिवसांपूर्वीच नवीन लेख पोस्ट केला आहे पाहून जरा हायसं वाटलं .. भाषाही खूप मवाळ झाली आहे .. लोकांना मूर्खात काढणारा सूर कमी झाल्यासारखा भासला पण तो भासही असेल ... यनांंना उत्तरं द्यायला झेपलं नाही ते साधे होते म्हणून , दाभोळकरांसारखा अग्रेसिव्ह माणूस असता तर टिंगलटवाळीला पुरून उरला असता आणि चिकित्साखोर प्रामाणिक प्रतिसाद - प्रश्नांचंही यनांपेक्षा चांगलं समाधान करू शकला असता कदाचित असं वाटतं ...

गामा पैलवान's picture

4 Oct 2019 - 5:45 pm | गामा पैलवान

निशापरी,

मी चिकित्सक आहे. पण हे अतिचिकित्सक म्हणजे नक्की काय भानगड आहे?

चिकित्सा काही एका मर्यादेपर्यंतच करायची असते, हेच ना? ही मर्यादा ओलांडल्यावर श्रद्धाच ठेवावी लागते.

आ.न.,
-गा.पै.

म्हणजे जी त्यांच्यासाठी अति झाली .. त्यांच्या उत्तरं देऊ शकण्याच्या बाहेरची होती .. आस्तिकांकडून आपल्याला उत्तरं द्यायला जमणार नाहीत अशा काठिण्यपातळीवरचे प्रश्न बहुधा त्यांना अनपेक्षित होते ... जर अढळ श्रद्धा / अंधश्रद्धा टाईप वाले प्रतिसाद असते तर त्यांना उत्तरं देणं त्यांना कदाचित सोपं वाटलं असतं ... पण इथले प्रश्न खरोखर चिकित्सक वृत्तीने - लॉजिक - अध्यात्म - विज्ञान सगळ्याचा कीस पाडत विचारलेले होते - ते त्यांच्या मर्यादे बाहेरचे होते ... त्यांना शांतपणे ऐकून - समजून घेणारे वाचक हवे होते बहुधा ...

*त्यांच्या उत्तरं देऊ शकण्याच्या क्षमतेच्या बाहेरची होती .

गामा पैलवान's picture

6 Oct 2019 - 12:17 am | गामा पैलवान

एकंदरीत यनाबाबांनी आपला स्वत:चा नास्तिकमठ उघडला तर.
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Oct 2019 - 9:15 am | प्रकाश घाटपांडे

गामाजी,मठ तर लागतोच ना! ज्ञानाचे आदानप्रदान,वादसंवाद,चर्चा आवश्यक असतेच. शिवाय मानवी नाती ही त्यात निर्माण होतात. चार्वाक,लोकायत अशी नावे या पंथाचे लोक आपापल्या घरांना मठांना देतात. अश्रद्धांचीही अश्रद्ध श्रद्धास्थाने असतातच ना! अस्तिक त्यांच्या सोयीची श्रद्धा स्थानांची नावे देतात.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Oct 2019 - 6:42 pm | प्रकाश घाटपांडे

पण हे अतिचिकित्सक म्हणजे नक्की काय भानगड आहे? >>>>> चिकित्सेचा अतिरेक करणारा तो अतिचिकित्सक. अतिरेक सापेक्श आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Oct 2019 - 7:10 pm | प्रकाश घाटपांडे
चौकस२१२'s picture

5 Oct 2019 - 3:36 pm | चौकस२१२

या विषयातील एक उपविषय म्हणजे "गुरु" गुरूबाजी , गुरूगिरी कि जी पूर्वी हि आहे आणि आज हि आहे आणि त्याचे असंख्य प्रकार आहे ( सर्व धर्मात थोड्या फार फरकाने पण भारतीय ( हिंदू) समुदायात याचा छाप जरा जास्त मोठा आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही
मी अनेक माझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या व्यक्तींना एका प्रकारचया हट्टीप्रमाणे हे म्हणताना बघितलंय कि "असे कसे? आयुष्यात गुरु असलाच पाहिजे" (भाविक:)
माझा ( विवेक गटातील ) प्रश्न मग असा असतो कि ...
गुरु या शब्दाऐवजी शिक्षक हे वापरलेले नाही का चालणार? हा अर्थात माझा हेतू पुरस्पर वापरलेले प्रश्न असतो ..
भाविक: त्यात काय फरक? उगाच का फाटे फोडताय दोन्ही एकच.
विवेक: सांगतो, शाळेतील एखादा आवडता शिक्षक/ शिक्षिका आठवा ... तुम्हाला त्यांच्या बद्दल आदर होता तो आठवा ...
भाविक: हो आठवले गणिताचे शिक्षक
विवेक: बरं मग समजा काही काळानं किंवा तेव्हा जर त्या वयक्तीने काही गंभीर गुन्हा केला तर त्यांच्या बद्दल चा आदर (एक व्यक्ती म्हणून गणित शिक्षक म्हणून नाही ) कमी होईल / असता झाला कि नाही? .. आणि एक नागरिक म्हणून त्याला तुम्ही शिक्षेस पात्र ठरवले असते कि नाही... हे हि समजा बाजूला ठेव तुम्ही अश्या आदरणीय शिक्षकाच्या शिकवण्यात त्रुटी किंवा न पटणारी गोष्ट ठाम पणे दाखवून दिली किंवा खोडून काढली असती कि नाही ?
भाविक: आ ....हा .. हो ...
विवेक: मग मला आता हे सांगा हाच तर्क तुम्ही "अध्यात्माच्या शिक्षकांना" का नाही लावत? गुरु हा शब्द मुळातच वापरलं जातो कारण या शब्दामागेच हे दडलेलं असतं की " मी सांगीन ती पूर्व दिशा" शेवटी मनुष्याला षड्रिपू ने वेढा घातलेला आहे ,, कदाचित ज्याला तुम्ही गुरु म्हणता ती व्यक्ती तुमचं माझ्या पेक्षा जास्त गुणी असेल ,,,पण शेवटी मनुष्यच ना?

प्रामाणिकपणे सांगायचं तर हे "देवाचे एजन्ट" असले काय आणि नसले काय जर देव आहे तर तो आणि मी पामर बघून घेईन ना !
माफ करा थोडा विषयांतर केले ...