सुधारस हे पक्वान्न बहुसंख्य मराठी घरात ऐतिहासिक किंवा आठवणींच्या कोषात जाऊन पडलं असलं तरी आमच्याकडील जेवणाच्या ताटात मात्र आजही सुधारस आपलं स्थान टिकवून आहे. याचं मुख्य कारण म्हणजे यासाठी लागणार्या सामग्रीची सहज उपलब्धता, कमीत कमी लागणारा वेळ आणि कौशल्य ,ही त्रिसूत्री. तर मग करुया की सुधारस लगेचच!
आधी साहित्याची जमवाजमव करू.
३ मोठ्या लिंबांचा रस किंवा १ वाटी रस
साखर रसाच्या तिप्पट म्हणजे ३ वाट्या भरून
पाणी दीड वाटी
८-१० केशरकाड्या थोड्या पाण्यात भिजत घालणे
बदाम ,पिस्ते काप,बेदाणे,वेलची दाणे/पूड, स्वाद आणि सजावटीसाठी ,आवडीनुसार
आता कृती.
१.एका पसरट भांड्यात साखर घ्या, त्यात पाणी घाला(साखर भिजली पाहिजे)
२.मध्यम आचेवर पाक करायला ठेवा. सतत ढवळत रहा.
३.पारंपारीक भाषेत गोळीबंद पाक हवा.पण बरेचदा गोळीबंद पाक करण्याच्या नादात पुन्हा साखर व्हायला लागते. (अनुभवाचे बोल). म्हणून साधारण ५ ते ७ मिनिटांनी आच बंद करा.
४.पाक जरा गार होवू दे. मग पाकाचा दाटपणा तपासा.(कारण गार झाल्यावर पाक थोडा दाट होतो)
५.साधारण मधाइतपत झाला की पुरे. पातळ वाटल्यास पुन्हा १-२ मि. उकळावा.
६.पाक निवला की त्यात लिम्बुरस,केशरपाणी(हे पाक करतान घातलं तरी चालेल),बदाम,पिस्ते,वेलची घालून नीट ढवळा.
७.सुधारस तयार आहे पण खायला मात्र दुसर्या दिवशी घ्यायचा.कारण सारे घटक समरस झाल्यावरच त्याचा आंबट गोड स्वाद चाखता येतो.
तर मग मंडळी,आता सुधारसाची फक्त आठवण न काढता मनात आलं की करा आणि खा!
जाता जाता अजून एक युक्ती! यात थंडगार पाणी घातलं की झटपट लिंबू सरबत तय्यार!
प्रतिक्रिया
30 Jan 2018 - 11:15 pm | एस
पाकृबद्दल धन्यवाद. फोटो टाकले आहेत का? दिसत नाहीयेत.
31 Jan 2018 - 10:07 am | नूतन
फोटो टाकले आहेत पण काहीतरी तांत्रीक घोटाळा झाला असावा .आज पुन्हा टाकून बघते
31 Jan 2018 - 2:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
फोटो दिसत नाहीत. बहुतेक, गुगलफोटोंमध्ये तुम्ही फोटोंना "पब्लिक अॅक्सेस" दिलेला नाही.
31 Jan 2018 - 3:02 pm | जागु
पूर्वी गुलाबजामच्या पाकाचा सुधारस करायचो.
31 Jan 2018 - 3:02 pm | जागु
पूर्वी गुलाबजामच्या पाकाचा सुधारस करायचो.
1 Feb 2018 - 3:29 pm | II श्रीमंत पेशवे II
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या
2 Feb 2018 - 2:04 am | पर्णिका
जागु +१
तयार सुधारसाचा फोटो सुरेख !
2 Feb 2018 - 10:55 am | नूतन
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार
2 Feb 2018 - 5:17 pm | सई कोडोलीकर
सुधारस म्हणजे राजस पदार्थ आहे. सणाला किंवा सहज म्हणूनही घरी नेहमी होतो.
चांदीच्या वाटीत सुधारस, त्यावर लोणकढं तुप. सण असेल तर गरम पु-या, नसेल तर तव्यावरून थेट पानात पडलेल्या पोळ्या.
आम्ही केळं घालतो सुधारसात. कंसिस्टंसी मधापेक्षा थोडी पातळ. लिंबाचे प्रमाणही थोडे कमी.
8 Feb 2018 - 4:56 pm | सविता००१
सई
असच आमच्याकडे आहे. सेम
2 Feb 2018 - 11:20 pm | manguu@mail.com
हो. सुधारसात केळे अगदी मस्ट आहे.
देशस्थांच्या लग्नाच्या आदल्या रात्री सीमांतपूजेच्या भोजनात हमखास करतात.
4 Feb 2018 - 1:16 pm | पैसा
मस्त, साधी सोपी पाककृती.
8 Feb 2018 - 4:56 pm | सविता००१
मस्तच