'भटकंतीचा एक उनाड दिवस, पण कुटुंबासोबत'!!!

दिलीप वाटवे's picture
दिलीप वाटवे in भटकंती
24 Jan 2018 - 3:48 pm

'भटकंतीचा एक उनाड दिवस, पण कुटुंबासोबत'!!!

आपण भटके पाहिजे तसं भटकु शकतो ते केवळ घरून मिळणार्‍या पाठींब्यामुळेच, खरं म्हणजे या गोष्टीला कुणाही भटक्याचा आक्षेप नसावा. पण असा पाठींबा मिळवण्यासाठी प्रत्येकाला त्यासाठी काहीना काहीतरी कष्ट घ्यावेच लागतात. मग घरच्यांना घेऊन हॉटेलींग, पिक्चर पाहणे असो किंवा घरची कामं, सासुरवाडीतील कार्यक्रम, मुलांचा अभ्यास घेणे असो. अर्थात माझ्यापेक्षा अनुभवी मंडळी मी सांगितलेल्या पर्यायात नक्की भर घालू शकतील यात काही शंकाच नाही. त्यातल्या त्यात लग्न झालेल्यांना तर त्यासाठी फार मोठं प्लॅनिंग करावं लागतं. प्रत्येकाला भटकायला जाण्याची परवानगी मिळण्यासाठी अधुनमधुन मोबाईल सारखं घरच्यांचं 'रिचार्ज' मारावं लागतं. नाही म्हणायला प्रत्येकाचं ड्युरेशन बाकी वेगवेगळं असु शकतं.
पावसाळ्यानंतर येणार्‍या थंडीत ट्रेकींगला जायला परवानगी मिळण्यासाठी मलाही असंच रिचार्ज मारावं लागणार होतं. मग आता घरच्यांना घेऊन फिरायला जायचं कुठे?

********************************************************************

थंड हवेच्या ठिकाणातील घाटमाथ्यावरची लोणावळा-खंडाळा, ताम्हिणी, माळशेज, महाबळेश्वर, आंबोली ही ठिकाणं पर्यटकांच्या अत्यंत आवडीची. पावसाळ्यात तर अशा ठिकाणी गर्दीचा महापुर लोटलेला असतो. पण हल्ली दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांमुळे कुटुंबासह फिरायला जाणाऱ्यांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सध्यातरी जिथं अशा हुल्लडबाजांचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी जायचं नक्की केलं होतं. ते ठिकाण म्हणजे भीमाशंकर जवळचं "आहूपे". केवळ आडबाजुलाच असल्यामुळं हुल्लडबाजी करणारे पर्यटक कमी किंवा नाहीच म्हटलं तरी चालेल.
तसं व्यवसायाच्या आणि ट्रेकींग निमित्तानं माझं स्वतःचं बर्‍यापैकी फिरणं होतं. पण निदान पुढच्या ८-१० ट्रेक्ससाठी तरी परवानगी मिळण्यास काही अडचण येऊ नये, म्हणून अधुनमधुन कुटुंब देवतेलाही प्रसन्न करणं गरजेचं होतं. त्यामुळे काहीही झालं तरीही ९ जुलैचा रविवार फक्त कुटुंबासाठी राखुन ठेवला होता. स्वतःच्या कुटुंबासोबत फिरायला जाण्याची वेळ ट्रेकींग करणार्‍या भिडूंवर तशी क्वचितच येते. त्यामुळे माझ्यासारख्याच समदु:खी ट्रेकर्स सोबत आहुपे जाण्याचं नक्की केलं होतं.
आहूपे म्हणजे तसं माझ्या परीचयाचं ठिकाण. ट्रेकींगच्या निमित्ताने मी बर्‍याच वेळा तिथे गेलोय. त्यामुळे गावात ओळख होती. आगाऊ कल्पना देऊन ठेवल्याने जेवणाखाण्याचा प्रश्न पण मिटलेलाच होता. नियोजन तर व्यवस्थित झालं होतं. आता फक्त निघायचंच बाकी होतं.
ठिकाण तर ठरलं होतं आहूपे आणि त्याच्यासोबत माळीण, पण याच्याबरोबर अजुन काही वेगळं पाहता येईल काय? अशी चर्चा चालू असताना सोबत असलेल्या मोदकाने घोडेगाव जवळच गिरवलीला असणारी 'आयुकाची वेधशाळा' पाहता येईल असं सुचवलं. मग सर्वांनीच ते उचलून धरलं. त्याच्याच आयुकातला मित्राने गिरवलीसाठी लागणार्‍या परवानगीची व्यवस्थाही लगेच केली. काहीतरी वेगळं बघायला मिळणार म्हणुन सर्वजण खुपच उत्साहात होते.
आता कुणी कुठं यायचं? कुणाला कुठं पीकअप करायचं? किती वाजता निघायचं? म्हणजे दिवसभरात ठरवलेला कार्यक्रम पुर्ण होईल आणि वेळेत घरी परतता येईल वगैरे अगदी व्यवस्थित ठरवलं होतं. कुटुंब सोबत असल्यामुळे निघायला होणार होता तसा शेवटी अर्धा तास उशीर झालाच. पण आधीच तो गृहीत धरल्याने दिवसभराच्या कार्यक्रमावर तसा फारसा काही फरक पडणार नव्हता.

.

सकाळी निघाल्यावर पुणे-नाशिक महामार्गावर भामा नदी ओलांडली आणि हॉटेल भामला एक छोटासा टि-ब्रेक घेतला. तसं भीमाशंकरला जाण्यासाठी मंचरहुन धोपट मार्ग आहे पण त्याच्या थोडे अलिकडे असलेल्या पेठमार्गे घोडेगावला जायला शॉर्टकट असल्याने वेळ वाचवण्यासाठी मधूनच जाण्याचं ठरवलं. काही अंतर गेल्यावर एक छोटासा घाट लागला. तिथुन समोरच गिरवलीची वेधशाळा स्पष्ट दिसत होती. पावसामुळे आसपासचा परिसरही हिरवागार झाला होता त्यामुळे खुपच सुंदर दृष्य दिसत होतं. शेवटी रहावलं नाही म्हणून काही क्षण तिथे मुद्दाम थांबलोच.

.

.

आता बाकी पोटातले कावळे ओरडून नाष्ट्याची वेळ झाली आहे हे सांगत होते. पुढे वेधशाळा पहायला जवळजवळ दोनएक तास तर सहज मोडणार होते. त्यामुळे गिरवलीला जाण्याआधी घोडेगाव बाजारपेठेत असलेल्या 'न्यु इंडिया रेस्टॉरन्ट'मधे जाऊन प्रसिद्ध कढी-वड्यावर यथेच्य ताव मारला.

.

घोडेगावातुन गिरवली गाव फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे. पण वेधशाळा गिरवली गावातुन आणखी पुढे सहा किलोमीटरवर डोंगरावर आहे. गावातील शाळेच्या बाजुनेच वेधशाळेकडे जाण्याचा रस्ता आहे. तसा फलकही तिथे पहायला मिळतो.

.

इथुन पुढच्या झाडांनी आच्छादलेल्या आणि वळणावळणाच्या घाटाच्या रस्त्याने जाताना अगदी कोकणात असल्याचाच भास होत होता.

.

.

आयुका वेधशाळेच्या गेटवर परवानगीचे सर्व सोपस्कार पार पाडले. दुर्बीण पहायला येणार्‍या प्रत्येक गटाला वेधशाळेच्या प्रतिनिधीकडून वेधशाळेची इत्यंभुत माहिती दिली जाते. तसं आज आम्हाला वेधशाळेची माहीती देण्यासाठी दिलीप पाचर्णे सर येणार होते. ते या वेधशाळेत असणार्‍या दुर्बीणीच्या देखभालीचे काम पाहतात.

.

.

आयुका(IUCAA) वेधशाळेची घोडेगावजवळ असणार्‍या गिरवली गावाबाजुच्या डोंगरावर एक दुर्बीण आहे. जी पुण्यापासुन फक्त ८० किलोमीटर अंतरावर आहे. ती दुर्बीण तिथंच स्थापित करण्याचं मुख्य कारण म्हणजे दळणवळणाच्या दृष्टीने सोइस्कर ठिकाण. आडबाजुला टेकडीवर असल्यामुळे आजूबाजूच्या उजेडाचा दुर्बीणीच्या फोटो घेण्याच्या क्षमतेवर काहीही परिणाम होत नाही. खगोलशास्त्राच्या संशोधकांच्या गरजा भागवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मुख्यत्वेकरून या दुर्बीणीची स्थापना केली गेली. टेलीस्कोप टेक्नॉलॉजीज लिमीटेड(लिव्हरपुल UK) या टेलीस्कोप तयार करणार्‍या कंपनीने या दुर्बीणीची निर्मिती केली आहे. या दुर्बीणीचा प्राथमिक अंतर्गोल आरसा दोन मीटर व्यासाचा असुन दुसरा आरसा ६० सेंटीमीटर व्यासाचा आहे. या दुर्बीणीचा आयुकाला प्रदान सोहळा १३ मे २००६ रोजी प्रा. यश पाल यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. ही दुर्बीण पावसाळ्यात बंद असल्याने आम्हाला मात्र ती बंद स्थितीत पहावी लागली. पण साधारणपणे ती ऑक्टोबर ते मे दरम्यान फक्त रात्रीच्या वेळेस चालु अवस्थेत पाहता येते. त्यामुळे या दुर्बीणीची संपुर्ण माहिती करून घेण्यासाठी आणि चालु अवस्थेत असताना पाहण्यासाठी या काळात परत एकदा तरी यावेच लागेल.

.

.

.

.

.

.

.

.

वेधशाळा पाहण्यात दोन तास कसे गेले ते समजलंच नाही. आहुप्यात जेवणाचं सांगुन ठेवलं होतं त्यामुळे आता आम्हाला माळीण पाहून आहूपेला जेवणाच्या वेळेपर्यंत पोहोचायलाच हवं होतं. त्यामुळे सर्वांना थोडी घाई करावीच लागणार होती. फार वेळ न घालवता डिंभ्याला आलो. इथून सरळ जाणारा रस्ता भीमाशंकरला जात होता तर उजवीकडे वळून जाणारा रस्ता डिंभे धरणाच्या भिंतीच्या लगत माळीणला. धरणात साठवलेल्या पाण्याच्या बाजुबाजुने जाताना वाटेत छोटी छोटी गावे लागली. आजची आमची सर्व भटकंतीची ठिकाणे आंबेगाव तालुक्यातली होती. तर मग हे आंबेगाव नेमकं आहे तरी कुठे? तर हे मुळचं आंबेगाव हे डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत असल्यानं विस्थापित करावं लागलं. त्यामुळं गावातील सर्व मंडळी मंचर, घोडेगाव, पाणलोट क्षेत्राच्या बाजुलाच असणारं फुलावडे आणि डिंभे गावात विस्थापित झाली. फार पुर्वीपासुन घोडनदीच्या खोर्‍यातलं हे मुख्य गाव असल्यानं तालुक्याला 'आंबेगाव' असं नाव ठेवलं गेलं. आम्ही माळीणकडे जाताना रस्त्यातुन धरणाच्या पाण्यातुन वर डोकावणारा एक कळस दिसत होता नेमकं तिथंच हे आंबेगाव होतं. खोर्‍यातलं हे मुख्य गाव असल्यामुळं इथं पुरातन मंदीरं नक्कीच असणार. आत्ता आम्हाला जो कळस दिसत होता ते एक जैन मंदीर होतं. त्याच्या बाजुलाच विश्वेश्वर मंदिरही आहे. तसंच पुण्याहुन भोरला जाताना गुंजन मावळात अमृतेश्वराचं पुरातन मंदीर आहे. हा अमृतेश्वर म्हणजे शिळीमकर देशमुखांचं कुलदैवत. हे मंदीर मात्र पाण्यात बुडालेलं नाही. पण पवना, चासकमान धरणात अशी मंदीरे बुडालेली माझ्या माहितीत आहेत. खरं म्हणजे शिवकाळात किंवा त्यापुर्वी सुद्धा पंचक्रोशीतल्या लोकांचं दैवत हे महादेवच. त्यामुळे प्रत्येक खोर्‍यात, नेर्‍यात आणि मावळात ( खोरं, नेरं आणि मावळ या संज्ञांविषयी पुन्हा केव्हातरी) महादेवाची पुरातन मंदीरे असायलाच हवीत. अशा या पाण्यात लुप्त झालेल्या असंख्य मंदीरांविषयी थोडा शोध घ्यायलाच हवा.
वाटेत लागलेली छोटी छोटी गावे पार करत रस्ता माळीण फाट्यापर्यंत गेला. तिथेच दुर्घटनाग्रस्त लोकांना तात्पुरते राहण्यासाठी पत्र्याच्या शेड उभारलेल्या दिसल्या. ओढ्यावरचा पुल ओलांडून पाचच मिनीटात माळीणमधे पोहोचलो. गावातली शाळा, त्याच्या मागे असणारे पण भुस्लखनात अर्धे वाहून गेलेले घर पाहून एकदम अंगावर काटा आला. काय घडलं असेल त्या रात्री? कल्पनाच करवत नव्हती. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. बाजूला हल्लीच १५१ मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ स्मारक उभारलेलं दिसलं. गेलेल्या प्रत्येकाची आठवण कायम रहावी म्हणून वनविभागाने प्रत्येक व्यक्तींच्या नावाने एक एक वृक्षाची तीही स्वदेशी वृक्षाची लागवड केलेली दिसली. जोपर्यंत ही झाडं आहेत तोपर्यंत त्याची आठवण कायम राहील ही कल्पना मनाला खुपच भावली. पुढे निघणार इतक्यात नजर एका ओढ्याच्या मोरीवर गेली तिथे कुणीतरी लिहुन ठेवलेलं दिसलं 'एक होतं माळीण'.

.

.

.

.

.

.

.

माळीण सोडल्यावर मात्र कुठेही न थांबता तडक माझ्या मित्राचं, ज्ञानेश्वरचं घर गाठलं. हातपाय धुऊन होईस्तोवर गरमगरम जेवण समोर आलं. एकतर भयानक भुक लागली होती, त्यात पावसाळी वातावरणात असं गावरान जेवण म्हणजे मेजवानीच. मग काय सर्वांनीच जेवणावर यथेच्य ताव मारला. नंतर हक्काची वामकुक्षी घेतली आणि थोड्या वेळाने कोकण कड्यावर फिरायला गेलो. सुरवातीला थोडा पाऊस होता, ढगही होते त्यामुळे काही बघायला मिळेल का नाही याबद्दल शंकाच होती. पण थोड्यावेळाने पावसाने उघडीप दिल्याने गोरखगड, मच्छिंद्र सुळका, आहुपे घाट, खोपीवली गाव स्पष्ट दिसु लागले. भीमाशंकरची वाट, भट्टीचं रान, आहुप्याच्या वाड्या तर अगदी निसर्ग चित्रात चितारल्यासारख्या दिसत होत्या.
संध्याकाळ होऊ लागली होती त्यामुळे आता सर्वांनाच हळूहळू घरचे वेध लागू लागले होते. कोकणकड्यावर फारवेळ न काढता गावात परतलो. गरमागरम चहा घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. आहुप्याला येताना जेवणासाठी उशीर झाल्यामुळे वाटेतली भैरवनाथाची देवराई पाहता आली नव्हती. सध्या आपल्याकडे देवराया खुपच कमी राहिल्या आहेत त्यामुळे परतताना मुद्दामहुन तिथे थांबलो. देवराई आणि भैरवनाथ दार ही घाटवाट आवर्जून सोबत्यांना दाखवली आणि परतीची वाट धरली.

.

.

.

.

एकंदरीत ही फॅमिली ट्रिप उत्तमच झाली असावी कारण पुढच्या पंधराच दिवसातच गोप्या घाट, शिवथरघळ आणि आंबेनळी घाटाच्या ट्रेकला जाण्याची परवानगी आम्हाला सर्वांनाच विनासायास मिळाली होती. म्हणजे सोबत आलेल्या प्रत्येकाचं घरचं Recharge successfully मारलं गेलं होतं. मात्र त्याची Validity निदान पुढल्या आठदहा ट्रेकपर्यंत तरी कायम राहो याचंच साकडं नंतर सर्वांनी भैरवनाथाला मनोमन घातलं होतं.

प्रतिक्रिया

मस्त भटकंती. आहुपे हा आवडता परिसर आहे. यानिमित्ताने मोदकरावांच्याच गिरवली वेधशाळेवरील लेखाची आणि ३_१४ विक्षिप्त अदिती यांच्या जीएमआरटीवरील लेखाची आठवण झाली.

http://www.misalpav.com/node/26880

http://www.misalpav.com/node/2738

मस्तं भटकंती. माहिती आणि फोटो आवडले.

कंजूस's picture

24 Jan 2018 - 4:33 pm | कंजूस

जुलैतली भटकंती?
भिमाशंकरला आकाश छान दिसायचं पुर्वी. आता सोनेरी दिवे लागलेत सगळीकडे.

चौथा कोनाडा's picture

24 Jan 2018 - 5:34 pm | चौथा कोनाडा

झकास वृतांत ! फोटो देखील सुरेख !
आयुकाची वेधशाळा महिती व फोटो रोचक आहेत.

पुवृप्र !

मुक्त विहारि's picture

25 Jan 2018 - 4:48 am | मुक्त विहारि

लेख आवडला.....

प्रचेतस's picture

25 Jan 2018 - 8:44 am | प्रचेतस

सुरेख भटकंती.
घोडेगावला आत्याचा वाडा असल्याने तिथला जवळपास सर्वच भाग परिचयाचा आहेच. अतिशय सुंदर परिसर आहे तो.

संत घोडेकर's picture

25 Jan 2018 - 12:21 pm | संत घोडेकर

मग काढा की दौरा तिकडे

प्रचेतस's picture

25 Jan 2018 - 12:48 pm | प्रचेतस

चला, जाउयात.

निनाद आचार्य's picture

25 Jan 2018 - 10:58 am | निनाद आचार्य

लेख आवडला. रिचार्ज ची कल्पना भन्नाट आहे. फारच उपयोगी पडेल.

विशाल कुलकर्णी's picture

25 Jan 2018 - 12:39 pm | विशाल कुलकर्णी

सुरेख भटकंती !
आयुकाला भेट देण्यासाठी काही आगाऊ परवानगी वगैरे काढावी लागते का?

मस्तच लिहीलयं. घरच्यांना पटवायचे म्हणजे या अ‍ॅडजस्टमेंट आल्याच. ;-)
बाकी फोटो आणि माहिती नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट. गिरवलीच्या वेधशाळेची परवानगी कशी मिळवायची ते लिहीले असते तर बरे झाले असते.

विशाल कुलकर्णी's picture

25 Jan 2018 - 12:45 pm | विशाल कुलकर्णी

पुणे येथील आयुकाच्या वेधशाळेला भेट देण्यासाठी परवानगी अर्जाची सोय त्यांच्या संस्थळावरच आहे. गिरवलीचे मात्र माहिती नाहीये.