लाऊडस्पीकर लावण्यामागची नेमकी मानसिकता

nishapari's picture
nishapari in काथ्याकूट
24 Dec 2017 - 12:22 am
गाभा: 

लाऊडस्पीकर लावण्यामागची नेमकी मानसिकता काय असते ? ह्याचं उत्तर कुणी साध्या , समजेल अशा पद्धतीने देऊ शकेल का इथे ?

शहरात राजकीय कारणांनी लावल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकर बद्दल विचारत नाहीये . सार्वजनिक गणेशोत्सवाच्या , नवरात्रीच्या वेळी लावले जाणारे लाऊडस्पीकर , लग्न , मुंज , बारसे , सत्यनारायणाची पूजा व अन्य धार्मिक प्रसंग अशा वेळी लावल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरमागची मानसिकता जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण झाली आहे . मिपावरचे विचारवंतच ती शमवू शकतील असं वाटल्याने हा धागा काढला आहे .

हा प्रश्न आजच पडलेला नाही , वेळोवेळी डोकं वर काढतो . आज निमित्त झालं ते म्हणजे चार घर सोडून असलेल्या शेजाऱ्यांच्या घरातील बारशाचं . सकाळी नऊ पासून ते रात्रीचे 9 वाजेपर्यंत अविरत लाऊडस्पीकर वर गाणी सुरू होती .. हे जरा अतीच झालं , सहसा आमच्या परिसरात बारशाच्या वेळी कोणी एवढा वेळ गाणी लावत नाहीत , तरी दिवसाचे किमान 3-4 तास एवढया वेळासाठी लावतातच . आमचा ग्रामीण भाग आहे . शहरात बारसे ह्या प्रसंगासाठी तरी लाऊडस्पीकर लावत नसावेत अशी माझी अटकळ आहे पण मिपावर ग्रामीण भागात वास्तव्य असलेलेही सदस्य असावेत . तुमचा काय अनुभव आहे ?

आज एवढा धागा काढून शंकानिरसन करून घेण्याचा प्रयत्न करण्याचं कारण म्हणजे आज आणखी 2 - 3 प्रश्न पडले आणि " का हे लोक दुसऱ्यांना पीडण्यासाठी लाऊडस्पीकर लावतात ? " हा मला पडलेला जुना प्रश्न अपरिपक्व असावा , माझं काहीतरी चुकत असावं अशी शंका आली .

बारसं म्हणजे बाळाच्या नामकरणाचा प्रसंग . यावेळी बाळाचं वय जास्तीत जास्त 1 ते 2 महीने एवढं असतं . मग ज्या ठणाणा आवाजाचा मोठ्या माणसाच्या कानाला त्रास होतो तो आवाज बाळाला तापदायक ठरेल हा विचार बाळाची अनुभवी आज्जी , ती हयात नसल्यास , बाळाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी - त्याने 2 शिंका जरी दिल्या तरी घाबरीघुबरी होणारी त्याची आई आणि नुकताच बाबा झालेला त्याचा बाप ह्यांपैकी कोणाच्याच मनाला शिवत नाही का ? की बाळाला मोठ्या आवाजाचा काही त्रासच होत नाही ? मला लहान बाळांची काही माहिती नाही , ज्यांना आहे त्यांनी सांगा ... बाळाला एवढ्या मोठ्या आवाजाचा खरंच काहीच त्रास होत नाही का ? दुसरा प्रश्न असा की आईला वाटतं असतं लाऊडस्पीकर वगैरे लावू नयेत पण ते ती ठामपणे घरातल्या उत्सवप्रिय पुरुषांना सांगू शकत नाही , तिच्या मताला तेवढी किंमत नसते , अशी परिस्थिती असते का ? की मुळात आईलाही तेवढीच हौस असते , बारसं दणदणीत साजरं करण्याची ? यातली कोणती गोष्ट खरी आहे ?

आता मूळ प्रश्न असा की बारसे , सत्यनारायणाची पूजा , देवळात चाललेले भजन - कीर्तन , लग्न या सगळ्या प्रसंगांत लाऊडस्पीकर लावून तो आवाज 1- 2 मैलाच्या परिसरातील लोकांपर्यंत पोहोचावा असं लोकांना नक्की का वाटतं ? इतर लोकांना सत्यनारायणाची पूजा किंवा देवळात चाललेलं कीर्तन भजन ऐकायचं असेल तर ते तिथे उपस्थित राहतील .
सार्वजनिक गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव यामध्ये लावली जाणारी गाणी ( यांचं स्वरूप अलीकडे नको तेवढं बदलू लागलं आहे , भक्तीगीतांच्या जोडीनेच बेबी डॉल आणि राणी कधी व्हणार तू माझ्या लेकराची आई अशी भयंकर गाणी कानावर येऊ लागलीत , विशेषतः विसर्जनाच्या दिवशी असल्या फिल्मी गाण्यांना उत येतो , पण तो मुद्दा इथे नको ) मंडपापर्यंत मर्यादित असली तर कार्यकर्त्यांचा आणि भक्तगणांचा उत्साह वाढतो हे समजू शकतं .. पण ती एक दोन किमी अंतरावरच्या लोकांनाही ऐकू जावीत एवढ्या मोठ्याने लावायचं प्रयोजन काय असतं ?

लग्न - मुंज - बारसे हे कौटुंबिक , खाजगी प्रसंग ... या प्रसंगी लावली जाणारी गाणी ही उत्साहासाठी हॉलपर्यंत / घरापर्यंत मर्यादित असली तर समजण्यासारखं आहे पण ती आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या लोकांना ऐकायला जावीत एवढ्या मोठ्या आवाजात लावण्याची इच्छा माणसांना नेमकी का होते ? जर सख्ख्या आईलाही छोट्या बाळाच्या कम्फर्ट पेक्षा मोठ्या स्वरात गाणी लावून सेलिब्रेशन करायची हौस आवरत नसेल तर या गाणी - संगीत लावण्याच्या प्रेरणेमागे नक्कीच काहीतरी ठोस मूलभूत कारण असावं अशी माझी धारणा झाली आहे पण ते नेमकं काय ते लक्षात येत नाही आहे .

एवढ्या मोठ्या आवाजात स्वतःला गाणी ऐकायची असतात म्हणून कोण लावत असतील हे पटत नाही , हल्ली जवळजवळ प्रत्येकाकडे निदान प्रत्येक आधुनिक संगीतप्रेमी माणसाकडे मोबाईल आणि इअरफोन असतातच तेव्हा इअरफोन वापरून हव्या तेवढ्या ठणाणा आवाजात अगदी मध्यरात्रीही गाणी ऐकता येऊ शकतात .... त्यासाठी अशा सण समारंभांच्या निमित्ताची वाट पाहण्याची गरज नसते . आपल्याला आवडणारी गाणी जबरदस्तीने दुसऱ्यांना ऐकायला भाग पाडणे , जेणेकरून त्यांनाही ती आवडतील असा सुप्त हेतू असण्याची एक शक्यता वाटते ... पण हा माझा अंदाज झाला... तो चूकही असेल .

मिपाकरांनी यावर अभिप्राय द्यावेत व माझी शंका दूर करावी ही विनंती . खरंतर ही नुसती जिज्ञासेतून उत्पन्न झालेली शंका नाही ... आणखीही एक कारण आहे . एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट वर्तनाचा आपल्याला अतिशय राग येत असतो , ही व्यक्ती अशी का वागते आहे हे न समजणं हे बऱ्याच वेळा त्या रागाचं कारण असतं . तेच जर त्या व्यक्तीच्या तशा वर्तनाला काही शास्त्रीय / मानसशास्त्रीय कारण - बेस आहे हे कळलं तर राग येत नाही किंवा कमी येतो .... तारस्वरात लावली जाणारी चित्रविचित्र गाणी हा माझा विकपॉइंट आहे , अत्यंत संताप येतो आणि काहीही करू शकत नसल्याने मनःशांती पार बिघडून जाते . सुरेश वाडकर किंवा अजित कडकडे , अनुराधा पौडवाल यांची भक्तीगीतं कितीही मोठ्या स्वरात लावली तरी त्रास होत नाही पण अलीकडे विचित्र नवीन संगीत दिलेली ( उदा . कोंबडी पळाली / जंजीर दाखवाल का यांच्या चालीवर गायलेली ) भक्तीगीतं ( ! ) आणि नवीन फिल्मी गाणी ऐकून अक्षरशः जीव जाईल तर बरं असं वाटतं . ही ओव्हर रिऍक्शन आहे हे कळतं पण काय करावं समजत नाहीये . तेव्हा निदान अशा कर्णकटू आवाजात गाणी लावण्यामागे काहीतरी मानसशास्त्रीय कारण असेल असं कळलं तर हा मनस्ताप बराच कमी होईल असं वाटतं .

प्रतिक्रिया

भंकस बाबा's picture

24 Dec 2017 - 10:06 am | भंकस बाबा

लाऊडस्पीकर संस्कृती जास्त करून झोपडपट्टी भागात दिसून येते , मग येणाऱ्या पाहुण्यांना पत्ता समजावणे कठीण असते तेव्हा स्पीकरचा दणदणाट असला की पाहुणा आपसूक न चुकता घरी येतो, आपलं एक निरीक्षण हो !
हलकेच घ्या

भंकस बाबा's picture

24 Dec 2017 - 10:07 am | भंकस बाबा

लाऊडस्पीकर संस्कृती जास्त करून झोपडपट्टी भागात दिसून येते , मग येणाऱ्या पाहुण्यांना पत्ता समजावणे कठीण असते तेव्हा स्पीकरचा दणदणाट असला की पाहुणा आपसूक न चुकता घरी येतो, आपलं एक निरीक्षण हो !
हलकेच घ्या

मागच्या आठवड्यात आमच्या इथे कोणत्या तरी टोणग्याचा "हॅपी बर्थ डे" साजरा केला जात होता, लाउड स्पीकर वरुन अख्या जगाला ते समजावे याची सोय केली होती !
तेव्हा अग्नीसाक्षी चित्रपटातला नान्या चा डायलॉग आठवला होता... तू नळीवर मीम्सवालेच व्हिडियो सापडले... त्या सीन मधला दोन संवाद सापडले तो इथे देतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]

nishapari's picture

24 Dec 2017 - 12:23 pm | nishapari

मस्त ! अगदी खरं आहे ..

मराठी_माणूस's picture

24 Dec 2017 - 12:58 pm | मराठी_माणूस

लाऊडस्पीकर लावण्यामागची नेमकी मानसिकता काय असते ?

अजुन काही चीड आणणार्‍या गोष्टी

१)कुठेही पचापचा थुंकणे
२)मोबाईल वर जोरजोरात गाणी लावणे/बोलणे (सार्वजनीक ठीकाणी, जसे की ट्रेन मधे , बस मधे )
३)गाडी चुकीच्या बाजुने चालवणे, सिग्नल तोडणे, जोर जोरात हॉर्न वाजवणे, प्रखर लाईट लावणे, मोटर बाइक वर स्टंट करुन आपला आणि दुसर्‍यांचा जीव धोक्यात घालणे, कार मधुन जातांना रीकाम्या बाटल्या व इतर कचरा रस्त्यावर फेकणे

४)रांग असताना कसेही करुन पुढे घुसणे
५)हॉटेल मधे आजुबाजुंच्या लोकांची पर्वा न करता आरडाओरड करणे
६)लिफ्ट थांबल्यावर , आतल्या लोकांना बाहेर यायच्या आधी लिफ्ट मधे शिरणे (ट्रेन, बस च्या बाबतीत ही हा प्रकार केला जातो)
७) वेगवेगळ्या पदयात्रा (**भक्तांच्या, धार्मिक कारणा साठी) काढुन रहदारीला अडथळा आणणे

ही यादी अजुनही वाढवता येइल.

यात मानसिकता अशी आहे की " जे माझ्यासाठी सोइस्कर आहे , ज्याने मला आनंद वाटतो ते मी करणारच , त्याने दुसर्‍याला त्रास होणार असेल तर होउ दे"

nishapari's picture

24 Dec 2017 - 5:30 pm | nishapari

☹️

माहितगार's picture

24 Dec 2017 - 2:49 pm | माहितगार

(आपल्या गरजे पेक्षा मोठा) लाऊड स्पीकर म्हणजे आपल्या उत्साहात (की उन्मादात) सामील होण्याचा जबरदस्तीचा आग्रह करणारी भडक जाहीरात असावी. यात वस्तुतः शहरी ग्रामीण असा फरक नसावा शहरी लोकांना कामातून असे उद्योग करण्यासाठी कमी वेळ मिळतो ज्यांना वेळ मिळतो ते ध्वनी प्रदुषणात सर्रास सहभगी होत असतात.

मानसिकतेचे म्हणाल तर माणूस रानटी अवस्थेत असताना तीन एक वेळा मोठ्या आवाजाची त्याला गरज पडत असावी , एखादी असुरक्षीत करणारी घटना -जसे की दुसर्‍या टोळीचाह/ प्रा ण्याचा हल्ला- एकमेकांना कळवून सावध करणे, दुसर्‍या गटावर करण्या/ आक्रमण करण्यासाठी अथवा शिकारी साठी स्वतःच्या गटातील लोकांना प्रोत्साहीत करणे आणि दुसर्‍या गटाला / प्राण्यांना घाबरवणे , तिसरे एखादा उत्सव साजरा करण्यासाठी सगळ्यांना बोलावणे, रानटी अवस्थेतील आणि आताच्या माणसात जेनेटीकली फारसा फरक पडला असेल असे नाही पण परिस्थितीत दोन महत्वाचे फरक पडले एकत तंत्रज्ञाना मुळे अधिक मोठा गोंगाट करणे अधिक सोपे झाले एक्दा का गोंगाटाने कानाचे पडदे फाटले की आपल्याला कमी एकु येते हे लक्षात न येता स्वतःस सामान्य वाटणारा आवाज इतरांसाठी अवाजवी आहे हे लक्षात न घेणे . या विषयावर झालेल्या अभ्यासाचे संदर्भ ध्वनी प्रदुषण इंग्रजी विकिपीडिया लेखात पहाण्यास मिळतात.

हे योग्य वाटतं . धन्यवाद .

ध्वनी नकोसा होण्याचे प्रमाण व्यक्ति परत्वे बदलते याचे कारण ज्यांची ऐकण्याची क्षमता कमी झालेली आहे त्यांना मोठा आवाज बरा वाटतो असे असू शकते पण आपल्या सारख्या अतीतीव्र ध्वनी नकोसा होणार्‍यांनी काय करायचे ?

आपली झोप व्यवस्थीत झाली असेल तर ध्वनी प्रदुषणाचा त्रास कमी होतो, ध्वनी प्रदुषण कधी होणार ते आधी पासून होणार हे माहित असेल तर आधी झोपून घ्यावे अथवा झोप न झालेल्या स्थितीत ध्वनी प्रदुषण असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. ज्यांना खिशास झेपते त्यांनी किमान एखादी खोलीचे दरवाजे खिडक्या काचेच्या फट रहीत करून घ्याव्यात ते जमले नाही किंवा फटी बुजवणे शक्य नसेल तर दरवाजां खिडक्यांना दुहेरी पडदे लावावेत, जरासे जास्त पैसे मोजले तर ध्वनी रिडक्शन करणारे हेड फोन मिळतात , आपले लक्ष आपल्या आवडत्या विषयात लावून घेतले तरी ध्वनीचा त्रास कमी जाणवतो पण कानाच्या पडद्यावर परिणाम होत रहातो, काही वेळा पर्याय नाही असे ध्वनी प्रदुषणात वावरावे लागते तेव्हा लिक्विड (द्रव पदार्थांचे सेवन अधिक करावे) शिवाय प्रवासात खुपदा बाथरुमला जाणे शक्य नसते तेव्हा चॉकलेट गोळ्यांची किंवा चिक्की च्युईंगम पॉपीन्स पोलो मिंट सारख्या चघळण्याची स्वतःला ट्रीट देणे तुमच्या कानासाठी उत्तम असू शकते.

खरंच धन्यवाद . पुढच्या वेळी यातले उपाय करून पाहीन . कालही अक्षरशः रडकुंडीला आले होते मग सहज एक आवडीचा व्हिडीओ लावला आणि सगळा राग 3 मिनिटात गुल झाला ☺️ . घरापासून 2 - 2 मिनिटाच्या अंतरावर 2 देवळं आहेत , एक विठोबाचं आणि एक आमच्या गावाच्या देवीचं ... त्यामुळे दर महिन्यात किमान एकदातरी सणाच्या वेळी तिथे भक्तीगीतं लावतात ... नवरात्राच्या वेळी तर 9 दिवस आणि रात्रीही उशिरापर्यंत जल्लोष असतो ... हा आवाज अगदी घरातच स्पीकर लावला आहे एवढा स्पष्ट ऐकू येतो पण गाणी दर्जेदार असतात बहुतांशवेळा त्यामुळे फार त्रास होत नाही . अगदी दिवसभर ही गाणी चालू असली तरी माझा तोल अजिबात ढळत नाही . पण गणेशोत्सवाच्या वेळी किंवा घरगुती प्रसंगांच्या वेळी जेव्हा नवीन हिंदी चित्रपट गीतं लावतात किंवा देवळात कीर्तन / भारुड किंवा लोकनाट्य टाईप जिवंत मंडळी आणून त्यांची कला लाऊडस्पीकर वरून वाजवतात तेव्हा मात्र ते सहन होत नाही ... जास्त लिक्विड , चॉकलेट हे उपाय पुढच्या वेळी करेन .

माहितगार's picture

24 Dec 2017 - 3:48 pm | माहितगार

वस्तुतः खासगीपणाच्या अधिकारास मुलभूत अधिकाराचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच मान्य केला आहे, ध्वनी प्रदुषण विषयक काही नियमावली सुद्धा अस्तीत्वात आहे असे वाटते, पण सर्वच समाज जेव्हा कायद्यांना स्विकारत नाही तेव्हा समाजाचे वर्तन बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतात अगदी शेजार्‍याला तुमचे मत पटले नाही तरी तुमच्या सारखे समदु:ख्खी मिळवणे ते कानाच्या डॉक्टरसारखे तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन करवणे गरजेचे असू शकावे. इंग्रजी विकिपीडियावर असे काम करणा र्‍या आवाज फाऊंडेशनची माहिती दिसते .

धन्यवाद . वर्षानुवर्षांचे शेजारी असल्याने आवाज कमी करा , आम्हाला त्रास होत आहे असं सरळ सांगून दुखवता येऊ शकत नाही . क्षुल्लक कारणावरून उगाच अढी निर्माण होण्याची भीती वाटते .

माहितगार's picture

24 Dec 2017 - 7:02 pm | माहितगार

युट्यूबवर noise pollution loud speaker या शोधास बर्‍याच व्हिडीओ दिसताहेत व्हॉट्स अ‍ॅप वापरत असाल तर महिन्यातून एक शेअर करत चला म्हणजे अवेअरसनेस वाढण्यात मदत होऊ शकेल.

पाषाणभेद's picture

24 Dec 2017 - 11:49 pm | पाषाणभेद

सकाळच्या वेळेपासून दिवसभर जी अजान होते ती देखील त्रासदायक असते. हे देखील लिहायला हवे होते.

nishapari's picture

25 Dec 2017 - 9:58 am | nishapari

खरं आहे , राहून गेलं

पाषाणभेद's picture

24 Dec 2017 - 11:53 pm | पाषाणभेद

तसेही कुठल्याही धर्माच्या सुरूवातीपासून आधूनिक तंत्र नव्हते. त्यामूळे त्या त्या देवतांना आवाहन करण्यासाठी तांत्रीक शक्ती असणारे ध्वनीवर्धक यंत्रे व त्यातून येणारा आवाज कसा काय त्या देवतांना चालू शकतो?

त्याचप्रमाणे आजकाल काही फेरीवाले देखील गळ्यात हे असले यंत्र घालून गल्या फिरतात. फार त्रास होतो.
काही चारचाकी वाहनचालक वाहन मागे घेण्यासाठी देखील असलेच आवाज काढणारे यंत्र त्यांच्या वाहनात लावतात. तेदेखील त्रासदायकच असते.

अमित मुंबईचा's picture

25 Dec 2017 - 9:25 am | अमित मुंबईचा

आमच्या इथे तर याहून भयानक प्रॉब्लेम आहे, एका नवश्रीमंत गावकऱ्याने हर्ले देवीडसॅन घेतली आहे. तो प्राणी बहुतेक रात्री १२ ला जागा होत असावा, इतका प्रचंड आवाज करतो त्या गाडीचा कि आजूबाजूच्या २-३ सोसायटी जाग्या होतात, आणि साहेब परत येतात सकाळी ५ च्या दरम्यान, काय बोलावे काळात नाही.

हे गावीही नसते ह्या लोकांच्या

हिंदूंना प्रश्न विचारला की ते म्हणणार मुसलमानांची अजान रोज वाजवतात ती चालते आणि आमच्या उत्सवांचा मात्र त्रास होतो ? ,मुसलमान म्हणणार तुमच्या सणांना लावताच ना लाऊडस्पीकर मग आम्हालाही तेवढाच हक्क आहे आमच्या धर्माच्या आड येऊ नका . थोडक्यात तोंड मिटून गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही . पण इतर ध्वनीप्रदूषण करणाऱ्या गोष्टी उदा. हॉर्न , फेरीवाल्यांची यंत्रे इत्यादी वर सरकारने कडक बंदी घातली तर खूप बरे होईल .

प्रकाश घाटपांडे's picture

25 Dec 2017 - 11:29 am | प्रकाश घाटपांडे

ध्वनिप्रदुषणामुळे रक्तदाब, कर्ण बधिरता,डोकेदुखी इत्यांदिंना आमंत्रण तर मिळतेच पण मानसिक स्वास्थ्य बिघडून चिडचिड वाढते हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे. गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक,सात्विक, मंगलमय व आनंददायी असला पाहिजे अशी सुसंस्कृत अपेक्षा असते..टिळकांनी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सावाचा हेतु समाज जागृती व समाजप्रबोधनाचा होता.आज ते स्वरुप दुर्दैवाने राहिले नाही. केवळ धार्मिकतेच्या नावाखाली केलेला समूहउन्माद अशा स्वरुपात आज ते दिसते आहे. समूह उन्मादात सारासार विवेक व विचार नष्ट झालेला असतो.अशा काळात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलोस यंत्रणेला जिकिरीचे बनते. माध्यमांनी गणेशोत्सवाचे उदात्तीकरण करताना त्यातील अनिष्ट प्रथांना ग्लॆमर मिळणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.ढोलपथकांचा उपद्रव कमी करण्यासाठी त्यावर तातडीने निर्बंध घालणे आवश्यक आहे. समूह उन्माद हा नेहमी गुन्हेगारीला निमंत्रण देतो.
माझ्या मते गतानुगतिकता हे उठसुट लाउडस्पीकर लावण्यामागचे कारण असावे. तसेच लाउडस्पीकरवर झिंगाट गाणी मोठ्यामोट्याने लावून त्यात नशा मिळते. मेंदु जरा बधिर होतो.

खरं आहे . समूह उन्माद ह्या प्रकाराची तर कधीकधी भीतीच वाटते .

मराठी कथालेखक's picture

25 Dec 2017 - 11:44 am | मराठी कथालेखक

मानसिकतेचं म्हणाल तर कायदा मोडण्यात , वाकवण्यात , इतरांना त्रास होईल असे वागण्यात आणि असे वागूनही आपले कुणी काही वाकडे करु शकणार नाही ही मस्ती अगांत मिरवण्यात धन्यता मानणारे लोकं असतात. यामुळे त्यांना आपण सामर्थ्यवान आहोत अशी मिजास करता येत , तो गंड कुरवाळता येतो. यांना कायद्याचा बडगा कठोरपणे दाखवूनच वठणीवर आणायला हवे असे माझे मत आहे. पण दुर्देवाने पोलीसही अनेकदा काही करत नाहीत .. असो. आपण प्रयत्न करत रहावा. ते लोक ओळखीचे , स्नेहातले असतील तर समजवून बघावे, विरोध , पोलीसांत तक्रार यातलं जे मानवेल ते करत रहावं.

सुरेश वाडकर किंवा अजित कडकडे , अनुराधा पौडवाल यांची भक्तीगीतं कितीही मोठ्या स्वरात लावली तरी त्रास होत नाही

हे वाक्य टाळता /काढता आलं तर बघा.. कारण यामुळे धाग्याला उगाच वेगळं वळण लागू शकतं. शिवाय तुम्हाला स्वतःला जरी या गायकांची गाणी मोठ्या आवाजात ऐकूनही त्रास होत नसला तरी तुम्ही त्याचं समर्थन करताय असं ध्वनीत होतंय आणि ते तितकंसं पटलं नाही. मोठ्या आवाजातील ध्वनी ऐकून कानांना , शरीराला त्रास होतो हे खरेच आहे मग तो आवाज वाडकरांचा असो की आनंद शिंदेंचा किंवा अगदी तलत महमूदचा.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Dec 2017 - 11:52 am | प्रकाश घाटपांडे

अगदी सहमत आहे. आपला तो बाब्या व इतरांच ते कार्ट असे असू नये.

बरोबर आहे तुमचं . पण मी समर्थन अजिबात करत नाहीये . माझ्या हातात असतं तर मी हर प्रकारच्या लाऊडस्पीकर वर बंदी घातली असती . फक्त मला हे आवाज थोडे सह्य वाटतात हे लिहिण्याच्या ओघात सांगितलं गेलं .

शिवाय हे माझे फार आवडते गायक आहेत असंही काही नाही . पण अर्थपूर्ण , दर्जेदार संगीत दिलेल्या आणि खरोखर चांगला आवाज आणि संगीतज्ञान असलेल्या गायकांची शांत भाव असलेली गाणी ऐकून मला वैयक्तिक तेवढा त्रास होत नाही हे सांगायचं होतं .... पण ते इथे सांगायचं प्रयोजन नव्हतं हे तुमचं बरोबर आहे .

मराठी कथालेखक's picture

25 Dec 2017 - 3:06 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद..

वकील साहेब's picture

25 Dec 2017 - 4:36 pm | वकील साहेब

काही नवश्रीमंतांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये ज्यांच्या आर्थिक स्थितीत अचानक बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे त्यांच्यात ही वृत्ती जास्त दिसते अस माझ निरीक्षण आहे.
होत काय की वर्षानुवर्षे आर्थिक दुर्बल घटकात राहिल्याने हा वर्ग बराच उपेक्षित राहतो. आपल्या अजूबाजूच्या श्रीमंतांची हौस मौस डाम डौल बघत असतो. आतल्या आत कुढत असतो. पण त्याच्या हातात काही नसते. आता जेव्हा अल्पावधीत परिस्थिती सुधारली किंवा हौसेच्या गोष्टी आवाक्यात आल्या की ते त्यांची मिजास अजूबाजूच्या जगाला ढोल बडवून सांगत असतात.

एकदा आम्ही मित्र मित्र ट्रीप ला गेलो होतो. या वरच्या वर्गात बसणारा आमचा एक मित्र आमच्या सोबत होता. आम्ही ज्या ठिकाणी रूम घेतली होती त्या रूम मध्ये एकमेकांचे फोटो काढतांना तो मित्र म्हणे की, "अरे फोटो काढतांना असा काढ की भिंतीवरचा एसी पण त्यात दिसला पाहिजे." मी म्हंटल, "का रे ?" तर तो म्हणे, " गावी परत गेल्यावर आपण ज्यांना फोटो दाखवू त्यांना पण कळल पाहिजे ना की आपण एसी रूम घेतला होता ते"

या लोकांच हे अस असत आपला आनंद, उत्सव त्याच celebration त्यांना साजर करायचं कमी अन जगाला दाखवायचं जास्त असत. त्यासाठीच ते मोठ मोठ्याने डीजे लावतील, कार मध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवतील, सहसा आपण ज्याला भडक म्हणू असे कपडे घालतील, जिथे जातील तिथले चित्रविचित्र पोझ मध्ये फोटो फेसबुक whatsapp वर टाकतील, बुलेट चा silencer काढून टाकून फट फट करत बुलेट चालवतील. कारण एकच " आमच्याकडे बघा आम्हीही कसे एन्जॉय करतो ते " ही त्या मागची मानसिकता असावी.

असं असण्याची शक्यता आहे .

तिमा's picture

26 Dec 2017 - 4:50 am | तिमा

आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये, अशी शिकवण पूर्वी बरीच ज्येष्ठ माणसे देत असत. तो एका संस्कृतीचा भाग होता. आता तशी शिकवण घरोघरी मिळत नसावी.
पूर्वीही जोरजोरात लाऊडस्पीकर लावलेले मी ऐकले आहेत. त्यांनाही दुसर्‍याची अजिबात पर्वा नसावी. कायद्याचे पालन न करणे म्हणजेच स्मार्टपणा, अशी काहीशी भावना असावी.

सतिश पाटील's picture

27 Dec 2017 - 2:34 pm | सतिश पाटील

घरगुती कार्यक्रमात लाउड स्पीकर अणि बैंजो म्हणून पत्र्याची डबी वाजवण म्हणजे मागासलेल्या विचारांची लक्षणे आहेत.
मानसिकतेबद्दल म्हणाल तर, बघा आमच्याकडे उत्सव चालू आहे, आम्ही कसा दणक्यात साजरा करतोय, कारण आमच्याकडे पैसा ही आहे बर का. आम्ही असा अणि इतकाही खर्च करू शकतो, हे असले काहीतरी केले की मग यांना मोठेपणा मिळाल्यासारखा वाटतो.

धार्मिक कार्यक्रमात जर लाऊड स्पीकर नसेल तर त्याला सण कसे म्हणायचे? स्पीकर तर पाहिजेच. नाहीतर तुम्ही आमच्या सणावर धर्मावर गदा आणताय, हा एक बूरसटलेला विचार.
तुम्हाला त्रास होतोय तर तुम्ही दरवाजे खिडक्या लावून घ्या नाहीतर कानात कापूस घाला.

दुसरयाला त्रास होतोय का याचा काहीही विचार हे लोक करीत नाहीत. कशाला लोकांची काळजी, ते का्य आपल्याला खायला घालतात का.
हे यांचे विचार.
घरातील पाळलेले प्राणी किंवा बाहेरचे पक्षी वेगैरे यांना बराच त्रास होतो. ते तर बोलूही शकत नाहीत.

dadabhau's picture

1 Jan 2018 - 12:05 pm | dadabhau

"घागर नळाला लाव " आणि " आला बाबुराव " , " गणपत..." ही आमची आवडती सुप्रसिद्ध , कर्णमधुर भक्तिगीते लिष्टीत न घेतल्याबद्दल जाहीर णिशेद !!!