भाव तेथे(च) देव:......यनावाला

यनावाला's picture
यनावाला in काथ्याकूट
18 Dec 2017 - 9:10 pm
गाभा: 

भाव तेथे(च) देव:......यनावाला
आमच्या कोकणात गणेश चतुर्थीचे महत्त्व अन्य धार्मिक सणांच्या तुलनेत सर्वाधिक असते. उत्सव दीड दिवसाचाच, पण त्या काळात गणपतीच्या मूर्तीला सतत जिवापाड जपावे लागते. मूर्तीला कुठे तडा गेला, टवका उडाला, देवापुढील समई-निरांजन विझून अंधार झाला तर ते अगदी अशुभ मानतात. लहानपणी मी एकदा आईला विचारले," आई, या मूर्तीत खरोखरच देव असतो का? " त्यावर ती म्हणाली, " अरे, मानला तर देव. नाहीतर मातीचा बाहुला."
......म्हणजे देव हा केवळ मानण्यावर आहे. काल्पनिक आहे. त्याला खरे अस्तित्व नसावे. असे मला तेव्हापासून वाटू लागले. पुढे "गणपती म्हणजे मातीचा बाहुला." हेच बुद्धीला पटले.
"जगनिर्माता, जगन्नियंता, पूजा-अर्चा-प्रार्थना-आरती-नैवेद्य यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धावून येणारा देव अस्तित्वात आहे." हे विधान कोणत्याही तर्कसंगत युक्तिवादाने बुद्धीला पटविता येत नाही. देवाचे गुणवर्णन आहे की तो सर्वसमर्थ-सर्वसाक्षी-सर्वव्यापी-करुणेचा सागर-दीनांचा कैवारी-दुष्टांचा निर्दालक आहे. त्यांतील एकाही गुणधर्माचा कधीही प्रत्यय दिसत नाही. अनुभव येत नाही. मानवाच्या अधिकृत ज्ञानभांडारात देवाला स्थान नाही. आपण शाळा-कॉलेजात असताना भौतिकी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अशा विषयांचे जे ज्ञान शिकतो ते या अधिकृत ज्ञानसंग्रहातील असते. त्या विषयांच्या अभ्यासक्रमाच्या कोणत्याही पुस्तकात "देव अस्तित्वात आहे." असे विधान नसते. तसेच देव जर आहे तर आपले अस्तित्व सर्वांना पटावे असा काही प्रत्यय तो का देत नाही ? इतका दडून, दडून का राहातो ? याचे कारण कळत नाही. त्याला कसली अडचण आहे ? कोणती भीती आहे ? याचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे "देव अस्तित्वात आहे." हे विधान खरे कसे मानायचे ? आस्तिक लोक ते विधान पूर्वसंस्कार, ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य, संतवचने यांच्या आधारे केवळ श्रद्धेने सत्य मानतात. "देव अस्तित्वात आहे. असेच आम्हाला वाटते. आमची तशी श्रद्धा आहे." एवढेच त्यांना देवअस्तित्वाच्या समर्थनार्थ सांगता येते. देवाच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही.
कुणी म्हणेल, "प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही पुरावा काय मागता? असे पुरावे देता येतात काय?"
इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. हा पुरावा म्हणजे न्यायालयात लागतो तसला लेखी पुरावा नव्हे. जे विधान तत्त्वत: खरे असण्याची शक्यता असते ते आम्ही सत्यच मानतो. त्यासाठी पुरावा मागत नाही. मग ते विधान प्रत्यक्षत: सत्य असो वा नसो. ते विधान खरे असणे शक्य असले म्हणजे झाले. ही शक्यता ज्ञान, वाचन, अनुभव -विवेक (कॉमनसेन्स) यांच्या आधारे आपल्याला समजू शकते. लेखी पुराव्याची आवश्यकता नसते. समजा तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे पन्नास लक्ष रुपये किंमतीचा हिरा आहे. तर ते विधान मी तत्त्वत: सत्य मानणार. पुरावा मागणार नाही. कारण वैयक्तिक मालकीचा असा हिरा असू शकतो हे मला समजते. आणि तुमच्याकडे तो आहे असे तुम्ही स्वत: सांगत आहात. तेव्हा ते खरे आहे असेच मी मानणार. प्रत्यक्षात तो हिरा तुमच्याकडे आहे किंवा नाही याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मात्र या हिर्‍यासंबंधी त्रयस्थाशी बोलताना, "अमुक एक गृहस्थ असे म्हणत होते." असे सांगणार. कारण तुमच्याकडे तसा हिरा आहे की नाही याची मला निश्चित अशी माहिती नाही.
पण समजा कोणी एक म्हणाला की त्याच्याकडे परीस आहे. तर मी ते सत्य मानणार नाही. कारण ते खरे असण्याची शक्यताच नाही. ज्याच्या स्पर्शामुळे लोखंडाचे सोने होते असा मणी अस्तित्वात नाही हे मला समजते. आता, "माझ्याकडे परीस आहेच. " असा जर कोणी हट्टी दावा केला तर त्यासाठी पुरावा मागणे, तुमचा दावा सिद्ध करून दाखवा असे सांगणे, भाग आहे. तसेच ज्या विधानाने कुणाचे चारित्र्यहनन होते असे विधान सत्य असणे शक्य असले तरी काही आधाराविना मी ते सत्य मानणार नाही.

"देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ? पायथ्यागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बुद्धिगम्य आहे. म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवतो. तिथे श्रद्धेची आवश्यकता नसते. एखाद्या गोष्टीची/तत्त्वाची/संकल्पनेची सत्यता बुद्धीला पटली तर विश्वास ठेवतात. ती बुद्धीला पटत नसता भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे

काही आस्तिक म्हणतील, "देव अस्तित्वात आहे " हे आम्हाला सिद्ध करता येत नाही. ठीक आहे. मग "देव अस्तित्वात नाही" हे तुम्ही नास्तिक लोक सिद्ध करा ना!"
एखादे विधान सत्य नाही, एखादी गोष्ट अस्तित्वात नाही हे सिद्ध करता येईलच असे नाही. ती गोष्ट अस्तित्वात आहेच असे जे दावा करतात त्यांच्यावरच ते अस्तित्व सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व (जबाबदारी) असते. न्याय व्यवस्थेत सुद्धा हेच तत्त्व आहे. या संदर्भात "बर्टरॅंड रसेल यांची किटली (रसेल्स टी पॉट)" हे उदाहरण कदाचित् आपल्या वाचनात आले असेल. रसेल म्हणतात, "समजा पृथ्वी आणि मंगळ ग्रह यांच्या मधे कुठेतरी एक किटली आहे. ती आपल्या विवक्षित कक्षेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. मला तसा साक्षात्कार झाला आहे." असे विधान कोणी केले तर ते खोटे आहे हे आपल्याला कॉमनसेन्सने कळते. पण अशी किटली नाहीच हे सिद्ध करणे शक्य नाही. म्हणून ते विधान खरे मानायचे का ? ज्याचा खोटेपणा अनुभव-विवेकाने सहज समजतो पण तसे सिद्ध करता येत नाही अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. "एवंगुणविशिष्ट देव अस्तित्वात आहे ." हे विधान तशाच प्रकारचे आहे. ते सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व (जबाबदारी) सर्वस्वी आस्तिकांवर आहे.
एवंच काय तर "देव अस्तित्वात आहे." हे केवळ श्रद्धेनेच सत्य मानता येते. "आमची तशी श्रद्धा आहे." असे म्हटल्यावर पुढचे बोलणेच खुंटते.
श्रद्धा ही एक मनोभावना आहे. आपण जाणताच की बुद्धी आणि भावना यांचा उद्भव माणसाच्या मेंदूत होतो. आनंद-दु:ख, क्रोध-मद-मत्सर इ.अनेक भावना आहेत. भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचे. ते अमूर्त आहे. व्यक्तीकडून भावनांचे प्रकटीकरण होते तेव्हा त्या भावनांचा आविष्कार दिसतो. त्यातून मनाचा प्रत्यय येतो. श्रद्धेला मनोभाव अथवा केवळ "भाव" असेही म्हणतात. संत साहित्यात "श्रद्धा " या शब्दापेक्षा त्याच अर्थाचा "भाव" हा शब्द अधिक वेळां वापरलेला दिसतो. तसेच श्रद्धाळू या अर्थी भाविक हा शब्द वापरला आहे. "श्रद्धा" हा शब्द ज्ञानेश्वरीत आहे. गीतेत आहे. पण तुकाराम गाथेत श्रद्धा हा शब्द मला अजून सापडलेला नाही. कुठल्यातरी अभंगात तो असेलही. पण माझ्या पाहण्यात नाही. ज्यात श्रद्धा हा शब्द आहे असा संत नामदेव, संत एकनाथ यांचा एकही अभंग माझ्या वाचनात नाही. "भाव" असा शब्द अनेक अभंगांत आहे. "भाव तेथे देव ." असे एक सुवचन आहे. ते पटण्यासारखे आहे. पुढील वचनांत "भाव" शब्दाचा अर्थ "श्रद्धा’ असाच आहे.
* देह जाओ अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो॥
* भावबळे आकळे एरव्ही नाकळे। करतळीं आवळे । तैसा हरी ॥
* देव भावाचा भुकेला ॥
* भाव धरा S रे । अपुलासा देव करा रे ॥
* करीतसे ध्यास हृदयीं सकळ । भाव तो सबळ । धरियेला ॥
* भाव देवाचा उचित । भाव तोची भगवंत ॥
...(या वचनात तर श्रद्धा म्हणजेच देव -दुसरा देव नाही- असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.)
* आमुचिया भावे तुज देवपण । हे का विसरोन । राहिलासी ? । असे तुकाराम महाराजांनी देवाला खडसावले आहे.तसेच "आम्ही तुझ्यावर श्रद्धा ठेवतो म्हणून तुला देवपण प्राप्त झाले आहे. (श्रद्धा नसती तर तू म्हणजे निर्जीव मूर्ती असे झाले असते.)

या संदर्भात एक संस्कृत श्लोक आहे. तो असा:-
न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न च मृत्तिके* । भावे हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम् ॥( *खरे तर हे रूप "मृत्तिकायाम्।" असे हवे. पण मूळ श्लोकात मृत्तिके आहे.ते तसेच ठेवले आहे.)
अर्थ :- लाकडी मूर्तीत (उदा.पुरीचा जगन्नाथ) देव नसतो. दगडी मूर्तीत (उदा.बालाजी) देव नसतो. मातीच्या मूर्तीत देव नसतो.(उदा. गणपती). देव केवळ श्रद्धेत असतो. (म्हणजे श्रद्धेने मानता येतो.) म्हणून श्रद्धा हेच देवाच्या अस्तित्वाचे कारण आहे.
वरील सत्य वचनांवरून कोणता तर्कसंगत निष्कर्ष निघतो ? निष्कर्ष असा निघतो की देवाचे अस्तित्व सत्य मानण्यासाठी श्रद्धा आवश्यक असते. श्रद्धा असेल तरच देव आहे. श्रद्धा नसेल तर देव नाही. कुणी म्हणतील की तुम्ही वरील वचने सत्य मानली म्हणजे तुम्ही शब्दप्रामाण्य मानता. तर तसे नव्हे. वरील वचने संतसाहित्यातील आहेत म्हणून सत्य आहेत असे म्हटलेले नाही. ती बुद्धीला पटतात, अनुभवाशी सुसंगत आहेत, म्हणून सत्य आहेत.
"देवाच्या अस्तित्वासाठी श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धा नसेल तर देव नाही." असा निष्कर्ष निघाला. म्हणजे देवाचे अस्तित्व खरे मानण्यासाठी श्रद्धेची अट आहे, असे स्पष्ट झाले.
आता, एखादी गोष्ट जर खरोखर प्रत्यक्षात अस्तित्वात असेल तर त्यासाठी कुठली अट असू शकते का ? आपण जाणतो की खरे अस्तित्व व्यक्तिनिरपेक्ष असते. तसेच ते अटनिरपेक्ष असले पाहिजे. थोडक्यात म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात आहे हे सत्य असेल तर त्या अस्तित्वाला कोणतीही अट लागू असू शकत नाही. देवाचे अस्तित्व मानण्यासाठी श्रद्धेची अट आहे असे अनेक सत्य वचनांवरून दिसते. त्याअर्थी देव प्रत्यक्ष असित्वात नाही. देवाचे अस्तित्व केवळ मानीव आहे, हे सिद्ध होते.
कांहीजण सांगतात:"ज्याला देव मानायचा असेल त्याच्यासाठी देव आहे. ज्याला मानायचा नसेल त्याच्यासाठी नाही. "
ही दोन्ही विधाने भोंगळ आहेत. १) देव अस्तित्वात आहे. २) देव अस्तित्वात नाही. या दोन विधानांतील एक, आणि केवळ एकच, विधान सत्य असले पाहिजे. तिथे कोण्या व्यक्तीचा संबंध नाही.
******************************************************************************

प्रतिक्रिया

रविकिरण फडके's picture

18 Dec 2017 - 9:54 pm | रविकिरण फडके

बिनतोड मुद्दे. ह्यावर काही विवाद करता येणार नाही असे माझ्या अल्पमतीनुसार मला वाटते.

विशुमित's picture

18 Dec 2017 - 9:57 pm | विशुमित

आवडला लेख.
आता धर्ममार्तंडांच्या फैरी झडतील.

हतोळकरांचा प्रसाद's picture

19 Dec 2017 - 11:36 am | हतोळकरांचा प्रसाद

आता धर्ममार्तंडांच्या फैरी झडतील.

हे अवांतर आवश्यकच आहे का? म्हणजे तुम्हाला नास्तिक लोकांच्या फैरी चालतात आणि आस्तिक लोकांची मते नको आहेत असा अर्थ घ्यायचं का? तुमची काही मते असतील तर ती मांडा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2017 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

आतापर्यंत वाचलेल्या तुमच्या लेखांत हा एक तर्कसुसंगत, मुद्देसूद आणि सारासारविवेकी लेख आहे. आवडला हेवेसांन !

इतरांना तुमचा मुद्दा मान्य असो की नको, पण, तो पटवून देताना ओढूनताणून असंबद्ध उदाहरणे अथवा विश्लेषणे द्यायची तुम्हाला गरज नाही, हे या लेखाने, तुम्हीच तुमच्यासाठी दाखवून दिले आहे !

आणखी एक विधान (बहुतेक भोंगळ)

(1) मला आमचा मोत्या कुत्रा आवडतो.
(2) आमच्या शेजार्‍याला मोत्या कुत्रा आवडत नाही.
ही दोन्ही विधाने भोंगळ आहेत. या दोन विधानांतील एक, आणि केवळ एकच, विधान सत्य असले पाहिजे. तिथे कोण्या व्यक्तीचा संबंध नाही.
शरद

मी धार्मिक आहे, मला देव आणि त्याविषयी, विरोधी कोणाच्या मांडलेल्या मताला प्रतिवाद करणे आवश्यक वाटत असेल तर मी धर्म मार्तंड ठरतो का?
जेव्हा नास्तिक व्यक्ती श्रध्दावानाच्या धारणांना गरज नसतांना छेडतात, त्या फैरी नसतात का?
सदर लेखक गोळीबार करुन पळुन जातात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपुर लाभ घेउन गंमत पाहतात त्याला काय नाव द्यावे?
बाकी देवाविषयी लेखनाचे आणि विचार प्रगटीकरणाचे एवढे स्वातंत्र्य ईतर कुठे मिळते का पहा. बाकी यावर तुम्ही (लेखकास) आम्हास सोडुन जा अशी अजिबात ईच्छा नाही कारण आम्हास तुमची काळजी आहे, ईतर कुठे गेलात आणि असे काही बोलुन अथवा लिहुन गेलात तर काय होईल ते देवच जाणो, (देव तर जाणेन हो, तुम्ही नाही जाणले तरी)

गामा पैलवान's picture

18 Dec 2017 - 11:42 pm | गामा पैलवान

यनावाला,

लेख उत्तम आणि संतुलित आहे. फक्त एक विधान पटलं नाही :

बुद्धीला पटत नसता भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे

श्रद्धा ठेवायला भावनेच्या आहारी जायची गरज नसते. श्रत् म्हणजे ऐकलेलं आणि धा म्हणजे धारण करणे. तर श्रद्धा म्हणजे ऐकलेलं मनात धारण करायची मनाची क्षमता होय. तुम्ही लेखात दिलेल्या मजकुरात देव या शब्दाऐवजी इलेक्ट्रॉन शब्द टाकून पाहू या.

"इलेक्ट्रॉनच्या अस्तित्वासाठी श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धा नसेल तर इलेक्ट्रॉन नाही." असा निष्कर्ष निघाला. म्हणजे इलेक्ट्रॉनचे अस्तित्व खरे मानण्यासाठी श्रद्धेची अट आहे, असे स्पष्ट झाले.

वरील विधान शंभर टक्के सत्य आहे. इलेक्ट्रॉन ही वस्तू मानण्यावर अवलंबून आहे. इलेक्ट्रॉन नामे वस्तू एखाद्या ठिकाणी अस्तित्वात आहे असं विधान करता येत नाही. हायझेनबर्गचं अनिश्चिततेचं तत्त्व इलेक्ट्रॉन विषयी ठोस विधाने करण्यास प्रतिबंध करतं. मग इलेक्ट्रॉन आहे अशी श्रद्धाच बाळगावी लागणार ना?

तुम्ही म्हणता की :

एवंच काय तर "देव अस्तित्वात आहे." हे केवळ श्रद्धेनेच सत्य मानता येते. "आमची तशी श्रद्धा आहे." असे म्हटल्यावर पुढचे बोलणेच खुंटते.

खरंतर श्रद्धा असल्यावरच खुंटलेला मार्ग मोकळा होतो. सर जोसेफ जॉन थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवली तेव्हा त्यांना विद्युतभाराचं वास्तुमानाशी गुणोत्तर (=चार्ज टू मास रेशो) काढता आलं. हे भौतिकशास्त्रातलं पथदर्शी संशोधन आहे. या अगोदर अणु अ अभेद्य आहे अशी कल्पना होती. आपल्या श्रद्धेच्या आधारे श्री. थॉमसन यांनी वैज्ञानिक संशोधन करून या कल्पनेस तडा दिला.

आ.न.,
-गा.पै.

रामपुरी's picture

19 Dec 2017 - 2:31 am | रामपुरी

"प्रत्यक्षात तो हिरा तुमच्याकडे आहे किंवा नाही याच्याशी मला काही कर्तव्य नाही. "

मग कोण अंधश्रद्ध आहे की श्रद्धावान आहे, किंवा कोण देवावर विश्वास ठेवतो की ठेवत नाही याच्याशी तरी का असावे? आपल्याला पटेल , रुचेल तो रस्ता पकडावा आणि चालत रहावे. कुणाचे मतपरिवर्तन करायच्या भानगडीत पडू नये. कसे?

अरविंद कोल्हटकर's picture

19 Dec 2017 - 3:41 am | अरविंद कोल्हटकर

मुख्य मुद्द्याला सोडून थोडे लिहीत आहे.

न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न च मृत्तिके* । भावे हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम् ॥( *खरे तर हे रूप "मृत्तिकायाम्।" असे हवे. पण मूळ श्लोकात मृत्तिके आहे.ते तसेच ठेवले आहे.)

हा श्लोक अशा स्वरूपातहि आढळतो:

न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये ।
भावेषु विद्यते देवस्तस्माद्भावो हि कारणम् ॥

न काष्ठे विद्यते देवो न शिलायां न मृत्सु च।
भावे हि विद्यते देवस्तस्माद् भावं समाचरेत्।।

न काष्ठे विद्यते देवो न शिलायां न कांचने ।
यत्र भावस्तत्र हरिस्तस्माद्‌भावं हि कारयेत् ॥

हा श्लोक कोठून आला ह्याविषयी एकमत दिसत नाही. त्याचा उगम पुढील स्रोतांकडे दाखविलेला सापडतो. चाणक्यसूत्राणि ८ वा अध्याय, समयोचितपद्यरत्नमालिका, गरुडपुराण प्रेतकाण्ड, ३८:१३, श्रीगर्गसंहिता अश्वमेधखण्ड. चाणक्यसूत्रे आणि अर्थशास्त्राचा लेखक हे एकच का वेगवेगळे ह्याचीहि खात्री नाही.

सुभाषितरत्नभाण्डागारामध्येहि हा श्लोक दिसतो पण तेथे कोणताच स्रोत दाखविलेला नाही.

मारवा's picture

19 Dec 2017 - 4:00 am | मारवा

लेखाची मांडणी बघुन असे वाटते की
Not a Penny More, Not a Penny Less

आनन्दा's picture

19 Dec 2017 - 4:56 am | आनन्दा

आवडला.

अर्धवटराव's picture

19 Dec 2017 - 5:32 am | अर्धवटराव

देवाच्या अस्तित्वावर प्राथमीक स्तरावरचा हा युक्तीवाद अनादी काळापसुन चालत आलेला आहे. आता तर अप्लाइड सायन्सच्या प्रकट अनुभवातुन तर्काधिष्ठीत विचारसरणी बलवत्ततर झाली आहे. आणि ते सहाजीक आहे. "भाव" हा शब्द इमोशन या अर्थाने तर्काशी युक्तीवाद करु शकत नाहि. तसच "सेन्स" या अर्थाने "भाव" कन्सीडर केला तर तर्क त्याच्याशी जिंकु शकत नाहि (कार्य-कारण 'भावा'शी तर्क युक्तीवाद करु शकत नाहि)
मानवी सुख-दु:खांना सेण्टीमेण्टल आधार म्हणुन तर्काच्या आधारे देव, भाव वगैरे विषयांची दोन मिनीटात बोळवण करता येते. पण "एक मूळ तत्व अगणीत रुपाने प्रकट होऊन देखील आपले मूळ स्वरूप अबाधीत ठेवते" हा सेन्स कुठल्याच तर्काच्या आधारे डिफीट होत नाहि. त्याला भिडायला तेव्हढेच डीप पर्सेप्शन डेव्हलप करायला लागतात.. दुसरा उपाय नाहि.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Dec 2017 - 11:17 am | प्रकाश घाटपांडे

उत्तम लेख.
मी मानला तर देव नाहीतर दगड, भाव तोचि देव या संकल्पना लहानपणापासून सश्रद्धांकडूनच ऐकत आलो आहे. विशेषत: किर्तनकार प्रवचनकार यांच्या कडून. माणसाच्या अस्तित्वाला भावना व बुद्धी दोन्हीचा समन्वय लागतो. भविष्यात कृत्रिम बुद्धीमत्ता रोबो आधार काम करु लागली तर कदाचित भावनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. जोपर्यंत देव या संकल्पनेचा मानवी जीवनाला उपयोग होतो आहे तो पर्यंत ती या ना त्या स्वरुपात राहील अन्यथा ती नामशेष होत जाईल. पण ही खूप लांब प्रोसेस आहे.

चांदणे संदीप's picture

19 Dec 2017 - 11:55 am | चांदणे संदीप

टाळ्या!

यनावाला फॅन क्लब...

Sandy

नाखु's picture

19 Dec 2017 - 12:47 pm | नाखु

यनावाला आगे बढो

करुन टाका उच्चाटन देवावर विश्वास ठेवून असलेल्या लोकांच मिपावरून

एक्का साहेब यांच्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे "प्रत्यक्षात जीवनात फक्त काळा रंग आणि पांढरा रंग असे दोनच​ रंग नसतात , यांच्या मध्ये बर्याच छटा आहेत", यावर विश्वास असलेला नाखु वाचकांची पत्रेवाला

" आई, या मूर्तीत खरोखरच देव असतो का? " त्यावर ती म्हणाली

आई देव मानायची की नाही?
मूर्ती घरात आणली म्हणजे मानत असेल. तेव्हा मागच्या लेखांत वापरलेली सर्व विशेषणे तिला लागू असावीत.

" आई, या मूर्तीत खरोखरच देव असतो का? " त्यावर ती म्हणाली

आई देव मानायची की नाही?
मूर्ती घरात आणली म्हणजे मानत असेल. तेव्हा मागच्या लेखांत वापरलेली सर्व विशेषणे तिला लागू असावीत.

देवाच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही.

मूळात अस्तित्वाचा पुरावा काय प्रकरण असते? एखादी गोष्ट अस्तित्वात असायची बेसिक मिनिमम कसोटी काय?

समजा तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे पन्नास लक्ष रुपये किंमतीचा हिरा आहे. तर ते विधान मी तत्त्वत: सत्य मानणार.

चुकुन कधी पाच मिनिटं मिळाले तर विज्ञानही वाचा. विज्ञानाला अशा प्रकारचे तत्त्वतः देवाचे अस्तित्व मान्य आहे. मिपावरचे लोक वाचत नाहीत म्हणून त्यांना मूर्खात काढू नका.

पायथ्यागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बुद्धिगम्य आहे. म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवतो. तिथे श्रद्धेची आवश्यकता नसते.

एखादे वेळेस परीस मिळेल पण या प्रमेयाच्या सिद्धतेला लागणार्‍या गोष्टी मिळणार नाहीत. पुन्हा लोकांना मूर्खात काढताय.

ती गोष्ट अस्तित्वात आहेच असे जे दावा करतात त्यांच्यावरच ते अस्तित्व सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व (जबाबदारी) असते.

हा नास्तिकांनी काढलेला एक मूर्खपणाचा नियम आहे.
यनावाला भाऊ, हा नियम नैतिक आहे का वैज्ञानिक आहे?
नैतिक असेल तर गेला गाढ.. ..त. कायदासंम्मत तरी नक्की नाही. असा कोणता अ‍ॅक्ट नाही. तेव्हा मला अनैतिकपणे पण नास्तिकाकडून देवाचे नसणे सिद्ध करून घ्यायला आवडेल.
==================================
आणि हा नियम वैज्ञानिक असेल तर, बिफोर वी गो इनटू द कोर सब्जेक्ट, द एक्झिस्टंस ऑफ गॉड, मला नास्तिकांकडून या नियमाचा पुरावा घ्यायला आवडेल. भावड्यांनो, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक सत्याचा पुरावा लागतो ना? उपरोक्त सिद्धतेच्या जब्बाबदारीचे विधान तुम्ही सत्य मानता ना? मग मला बघायचं आहे तुम्ही पुरावे, इ कसे देता असली विधानं सिद्ध करायला?
=================================
आणि या विधानाच्या सत्यतेचा पुरावा देऊ शकला नाहीत तर गुमान देव मानायला चालू करा.

सस्नेह's picture

19 Dec 2017 - 12:50 pm | सस्नेह

वेल, देव 'नसण्या'च्या सिद्धतेसाठी तुम्ही ज्याअर्थी इतकी खटपट करता इतके पुरावे मागता, त्याअर्थी असे वाटत्ते की खोल कुठेतरी तुमच्या मनात देव 'असण्या'ची आस आहे ! एखादी गोष्ट जर अस्तित्वात नाही असे आपल्या मनाला वाटत असेल तर सोडून द्यावी ना ! ती नाहीच्च असे सिध्द करण्याची गरज काय ? इतरांना सापडला असेल तर त्यांच्या मनावर सोडा. तुम्हाला तो इतरांनी दाखवलाच पाहिजे हा अट्टाहास का ?
रच्याकने तुम्ही पातंजल योगसूत्र एकदा अवश्य वाचा. वाचले असेल तर पुन्हा एकदा वाचा. 'देव' ही व्यक्ती नसून अवस्था आहे. ती तुमची होऊ शकते, माझी होऊ शकते, एखाद्या दगडाची सुद्धा होऊ शकते. या विश्वात प्रत्येक गोष्ट सतत उत्क्रांत होत आहे. दगड हासुद्धा करोडो वर्षांनी दगड राहणार नाही. तद्वत तुम्ही आम्ही सुद्धा उत्क्रांत झालो असू. ती उत्क्रांतीची सर्वोच्च अवस्था म्हणजे सुद्धा 'देव' असू शकेल.
....कदाचित त्यानंतर एक नवीन चक्र आणि पुन्हा दगडापासून सुरुवात होईल, कुणी सांगावे !! तस्मात, दगडाला देव मानायला माझी तरी काहीच हरकत नाही !

arunjoshi123's picture

19 Dec 2017 - 1:03 pm | arunjoshi123

त्यांचं सोडा. पेटलेले सेक्यूलर, लिबरल, कम्यूनिस्ट, टेररिस्ट आणि एथिस्ट रिफॉर्म्सच्या पलिकडचे असतात. यनावाला हे ब्रेनवॉश्ड नास्तिक आहेत.
================
पण कडावर बसलेल्या काही प्रेक्षकवर्गाला काही विरोधी विचार वाचायला लावणं आवश्यक आहे जेणेकरून ते दर्जेदार अस्तिक / नास्तिक / अन्य बनतील.

शाली's picture

20 Dec 2017 - 1:12 pm | शाली

अगदी सहमत.
+१

रसेल म्हणतात, "समजा पृथ्वी आणि मंगळ ग्रह यांच्या मधे कुठेतरी एक किटली आहे. ती आपल्या विवक्षित कक्षेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. मला तसा साक्षात्कार झाला आहे." असे विधान कोणी केले तर ते खोटे आहे हे आपल्याला कॉमनसेन्सने कळते. पण अशी किटली नाहीच हे सिद्ध करणे शक्य नाही. म्हणून ते विधान खरे मानायचे का ?

मित्रहो, तुम्हाला कोणी सांगीतले कि भूतलावर उणे २५० डिग्रीचा फॉस्फेरिक अ‍ॅसिडचा समुद्र, त्याच्या शेजारी धन २०० डिग्री तापमानाला असलेला सल्फ्यूरिक अ‍ॅसिडचा समुद्र नि अजून एक असलाच एक नायट्रिक अ‍ॅसिडचा समुद्र असे तीन समुद्र होते. या तिन्ही समुद्रांचे पाणी कसेतरी ऊडून एकत्र येऊन एक सहज जळणारा, सहज विरघळणारा, सहज विघटन होणारा रेणू बनला. आणि हा रेणू पृष्ठभागावर ४६० कोटी वर्षे टिकला.
तुम्ही खरं मानणार आहात का?
नाही ना?
पण स्वतःला एक चिमटी काढून बघा, आणि खरं मानायला चालू करा. असं झालं आहे!!!
=====================
विश्वाच्या अनंत काळाच्या इतिहासात काय काय झालं, काय काय झालं नाही, काय काय होऊ शकतं, काय काय होऊ शकत नाही हे सांगणारा हा टोण्या रसेल कोण?
========================
त्या किटलीचं काय घेऊन बसलात, आपलं अख्खं विश्व (हे लैच मोठ्ठं आहे) शून्यातून स्फुरून (काय खरंय का यनावाला?) एका फोटॉन इतक्या (किंवा अजून लहान) पार्टिकलात बसलं होतं असं शास्त्रज्ञ सांगू लागले कि तुम्ही कॉन्फरन्स मधे मधेच उठून "नाय नाय यनावालांनी सांगीतलंय की हे कॉमन सेन्सला पटत नाही" म्हणणार का?
का शास्त्रज्ञ म्हटले कि बुद्धी गहाण टाकून माना डोलावायच्या आणि तत्त्वज्ञ म्हटले कि बांबूचे फोक दाखवायचे? त्यातही लोकांना विज्ञानाचं एक्सपोजर नाही म्हणून देव मानतात म्हणावं तर लाखो महान शास्त्रज्ञ देव मानतात. उलट सर्वे असं सांगतात कि ज्या शास्त्रज्ञांना विश्वाच्या किचकटपणाचं एक्सपोजर आहे, ते जास्त देव मानतात. मंजे बोंबला. मग हे विज्ञानाचे ओ कि ठो माहित नसलेले तुणतुणेबाज नक्की कशाला बुद्धी - श्रद्धा - विवेक - ज्ञान - मेंदू - विद्नयान यांची समीकरणं मांडत बसतात?

एखादी गोष्ट अस्तित्वात नाही हे सिद्ध करता येईलच असे नाही.

हे ठीक आहे.
पण तुमची (ज्याचे अस्तित्व मान्य नाही अशा) देवाची आयडिया काय आहे?
देवाच्या व्याख्येत कोणते विशिष्ट शब्द घातले कि संकल्पना खारिज करता येते?
तुमच्या लेखनमालेत तुम्ही (ऐकलेली) देवाकरिता अनेक विशेषणे वापरली आहेत. त्यातले कोणते विशीष्ट विशेषण वापरले कि संभावना शून्य होते? का कोणतेही एक विशेषण वापरले तर तसे होते?

प्रकाश घाटपांडे's picture

19 Dec 2017 - 1:11 pm | प्रकाश घाटपांडे

मी आणि माझा देव
संपादक वि. शं चौघुले

arunjoshi123's picture

19 Dec 2017 - 1:17 pm | arunjoshi123

मस्त लिंक आहे.

इतका दडून, दडून का राहातो ? याचे कारण कळत नाही. त्याला कसली अडचण आहे ? कोणती भीती आहे ?

ईश्वराच्या स्वरुपाबद्दल आपल्या नक्की काय धारणा आहेत? ते जंगलातले एक जनावर आहे असे वाटते का? तुम्ही एखाद्या गोष्टीचे स्वरुप आजमावायला कशी सुरुवात करता?

आपण जाणताच की बुद्धी आणि भावना यांचा उद्भव माणसाच्या मेंदूत होतो.

हे एक धांदात असत्य आहे. बुद्धी आणि भावना म्हणजे काय असतं हे देखिल अजून वैज्ञानिक पद्धतीने माहित नाही. ते कुठं उत्पन्न होतं ते जाऊच द्या.

"देवाच्या अस्तित्वासाठी श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धा नसेल तर देव नाही." असा निष्कर्ष निघाला. म्हणजे देवाचे अस्तित्व खरे मानण्यासाठी श्रद्धेची अट आहे, असे स्पष्ट झाले.
आता, एखादी गोष्ट जर खरोखर प्रत्यक्षात अस्तित्वात असेल तर त्यासाठी कुठली अट असू शकते का ? आपण जाणतो की खरे अस्तित्व व्यक्तिनिरपेक्ष असते. तसेच ते अटनिरपेक्ष असले पाहिजे.

हसून पुरेवाट.
व्यक्ति नसेल तर सत्य दाखवणार कुणाला?
===========================
अटनिरपेक्ष हा तर जोक ऑफ द "लाइफ ऑफ फिलॉसॉफी" आहे. कोणती सिद्धता म्हणे बिना अटींची आहे?
=====================
हे जग अस्तित्वात आहे हे मान्य आहे का नाही? पण काही वैज्ञानिकांचे मते म्हणे हे जगच अस्तित्वात नाही.
===============
कशाला हो असले फालतू रतीब घालता लेखांचे?

या चावून चोथा झालेल्या विषयावर संतुलित लेख क्वचितच वाचायला मिळतो.

काही प्रश्न मांडावेसे.. अर्थात् विरुद्ध मतांचं स्वागत असेल असे गृहित धरून लिहितो.

१. अगदी साध्या व्यवहारातसुद्धा, ज्या गोष्टीचा अनुभव आपण स्वतः, व्यक्तिशः, जाणीवपूर्वक घेतलेला नाही, त्या गोष्टीवर आपण श्रद्धा आपसूकच ठेवतो. अगदी नकळत. श्रद्धा असणं चूक आहे का? असेल तर का?
२. वैज्ञानिक दृष्ट्या जे सिद्ध होऊ शकलेले नाही, ते अस्तित्वातच नाही असे म्हणणे वैज्ञानिक आहे का? ते सिद्ध होण्यासाठी जे मिनिमम रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे ते साध्य केल्याशिवाय अस्तित्व समजणारच नाही असे का म्हणू नये?
३. रोग आहे अथवा नाही हे अथॉरिटीव्हली सांगण्याचा अधिकार डॉक्टरला असतो. मग देव आहे अथवा नाही हे अथॉरिटिव्हली सांगण्याचा अधिकार कुणाला?
४. समजा कुणी सांगीतले की "हो, देव असतो.. मी पाहिला आहे", तर त्यावर आपण विश्वास ठेवू काय? जर हा अनुभव अतिंद्रीय असेल तर तो सिद्ध कसा करणार? कोणत्या परिमाणावर आपण ते मान्य करणार?
५. देव आहे अथवा नाही हे सिद्ध होणं गरजेचं आहे का? असेल तर कुणाला आणि का?

माहितगार's picture

19 Dec 2017 - 10:17 pm | माहितगार

डॉ. म्हात्रे म्हणतात तसे , आतापर्यंत वाचलेल्या तुमच्या लेखांत हा लेख अधिक तर्कसुसंगत, मुद्देसूद आणि सारासारविवेकी लेख म्हणून उजवा वाटतो. 'ओढूनताणून असंबद्ध उदाहरणे अथवा विश्लेषणे द्यायची तुम्हाला गरज नाही, हे या लेखाने, तुम्हीच तुमच्यासाठी दाखवून दिले आहे ! ; हे म्हात्रेंच्या म्हणणे पटते.

१) देव अस्तित्वात आहे. २) देव अस्तित्वात नाही. या दोन विधानांतील एक, आणि केवळ एकच, विधान सत्य असले पाहिजे.

भले एकच विधान सत्य असेल पण अनेकविध भूमिकांची मांडणी शक्य होते. आणि माझी भूमिका प्रत्येक क्षणाला वेगळी असण्याचा
अधिकार जपणे मला व्यक्तिशः आवडते.

अर्धवटराव's picture

20 Dec 2017 - 12:35 am | अर्धवटराव

१) देव अस्तित्वात आहे. २) देव अस्तित्वात नाही. या दोन विधानांतील एक, आणि केवळ एकच, विधान सत्य असले पाहिजे.

एखादी गोष्ट अस्तीत्वात असते म्हणजे नेमकं काय हेच कळलं मला अजुनपर्यंत. 'असणे' म्हणजे काय याचाच उलगडा झालेला नाहि मला अजुन :( . शरीर कशाला म्हणावं, ते कुठे सुरु होतं, कुठे संपतं हे सुद्धा कळत नाहि. सगळेच लोचे आहे च्यायला...

जयंत कुलकर्णी's picture

20 Dec 2017 - 9:12 am | जयंत कुलकर्णी

:-)
माणसाने जन्माला घातलेल्या अनेक वस्तूंपैकी एक आहे "देव". असे मी मानतो. पण यात वाईट काय आहे हे मला आजपर्यंत समजलेले नाही. "अडचणींच्या वेळी तुम्हाला देवाची आठवण येते" हे वाक्य मी बर्‍याच वेळ ऐकले आहे. पण मी जन्माला घातलेल्या "देवाला'' मी वापरणार नाही तर कोण ? मी अडचणीच्या वेळीच फक्त देवाला आठवतो आणि स्वतःच्या मनाला उभारी देतो, मला तरी त्यात बिलकूल अपराधी वाटत नाही. इतर वेळी माझा देवावर विश्र्वास नसतो, यातही माझा काही गुन्हा आहे असे मी मानत नाही. मग कोणी म्हणेल हीच कल्पना तुम्ही मित्रांच्या बाबतीत वापरणार का ? याचे उत्तर "नाही" असे आहे कारण स्पष्ट आहे... त्यात दुसर्‍या व्यक्तिचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि दुसर्‍या कुठल्याही व्यक्तिला माझ्या पासून त्रास होणार नाही असे वागणे ही माझी धर्माची व्याख्या आहे. देवाच्या बाबतीत हा धोका संभवत नाही.

अंधार पडला - दिवा लावला. उजेड पडला- दिवा विझवला
अडचणीत सापडलो - श्रद्धेने देवाचा धावा केला. अडचणीतून बाहेर आलो- देवाला विसरलो. अश्रद्ध झालो.
वीजही माणसाने निर्माण केली आणि देवही.

हे सगळे नैसर्गिक आहे व माणसाच्या फायद्याचेच आहे म्हणून हजारो वर्षं चाललंय.

सतिश गावडे's picture

20 Dec 2017 - 11:07 am | सतिश गावडे

एकदा देव अस्तित्वात नाही, तो केवळ मानण्याचा हे स्वीकारले की या काल्पनिक देवाचा आपल्याला संकटाच्या प्रसंगी आधार वाटू शकेल का?

हे एखाद्या जंगलातून जाताना सोबत खेळण्यातील बंदूक जायची आणि त्या बंदुकीच्या भरवशावर मार्गक्रमणा करायची असे झाले.

हा मला पडलेला प्रश्न आहे. तुमच्या मताबद्दलचा आक्षेप नाही :)

प्रकाश घाटपांडे's picture

20 Dec 2017 - 12:15 pm | प्रकाश घाटपांडे

एकदा देव अस्तित्वात नाही, तो केवळ मानण्याचा हे स्वीकारले की या काल्पनिक देवाचा आपल्याला संकटाच्या प्रसंगी आधार वाटू शकेल का?

होय. त्यावेळी होणार्‍या मेंदुतील केमिकल लोच्या मुळे एखाद्याला तस वाटू शकत.

हे एखाद्या जंगलातून जाताना सोबत खेळण्यातील बंदूक जायची आणि त्या बंदुकीच्या भरवशावर मार्गक्रमणा करायची असे झाले.

बैलाच्या ताकदी पुढे दोरखंडाची ताकद काहीच नसते पण त्याला बांधल की तो स्वतःला मुक्त समजत नाही. मनाला कशाने उभारी वाटेल हे गणित अवघड असते.
बुडत्याला काडीचा आधार यात काडीचा आधार बुडत्याला पुरणार आहे का? पण त्याला तो वाटतो. मनाची गणित इतकी सोपी नसतात. अंधश्रद्धांचीही उपयुक्तता असते म्हणून त्या टिकून आहेत. उपयुक्तता जशी कमी होत जाईल तसा आधार वाटेनासा होत जाईल

माहितगार's picture

20 Dec 2017 - 11:43 am | माहितगार

जयंतजी मल ज्या भूमिकांचे वैविध अनुभावयास आवडते त्यात तुम्ही उल्लेखीलेल्या भूमिकेचा समावेश नक्कीच आहे. जंगलातून जाताना मन गलित गात्र होण्या पेक्षा लुटूपुटूच्याही बंदुकीचा ही आधार बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने अवश्य घ्यावा.

कुठे शोधीसी रामेश्वर आणि संत गाडगे बाबांची देव दगडात नाही ह्याची आठवण देणारी गाणी ते पंढरपुरच्या विठोबाची गाणी आकाशवाणीवरुन एका पाठोपाठ आली तरी तेवढ्याच अल्पावधी सेकंदात आमच्याही न कळत भूमिका बदलत प्रत्येक गाण्यात तेवढेच तन्मय व्हायला होते. ज्यांना आमच्या प्रमाणे दोन्ही नावेत पाय ठेवणे जमत नाही आपापल्या कोषात अधिक सुरक्षीत वाटते त्यांचाही आदर आहेच.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Dec 2017 - 12:19 pm | प्रकाश घाटपांडे

जयंतजी अगदी सहमत आहे. मी माझ्या गरजे व परिस्थिती नुसार स्वतःला अस्तिक नास्तिक वा अज्ञेयवादी स्वतःपुरते मानतो. इतरांनी तसे असाव असा माझा आग्रह नसतो.

एक माणूस आयूष्यभर “देव अस्तित्वात नाही” हे सांगत जगभर फिरला. वयाच्या ऊत्तरार्धात त्याला एक साधू भेटला. त्याने तासभर साधूसमोर आवेशाने “देव नाहीच” यावर व्याख्यान झोडले. साधू शांतपणे म्हणाला “देव नाहीये म्हणतोस? नसेलही. पण अस्तीत्वातच नसलेल्या गोष्टीसाठी तू का तुझ्या आयुष्यातली साठ वर्षे वाया घालवलीस बाबा?”

फ़लसफ़ी को बहस के अंदर ख़ुदा मिलता नहीं

भावबळे आकळे एरव्ही नाकळे
यांत सर्व काही आले.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Dec 2017 - 1:12 pm | प्रकाश घाटपांडे

त्यावर तो माणूस शांतपणे म्हणाला,"बुडते हे जन देखवेना डोळा । म्हणोनि कळवळा येतो आम्हां ॥ म्हणून आम्ही साठ वर्षे घालवली"
या बोधकथेला अजूनही काही ट्विस्ट देता येतील

मूकवाचक's picture

20 Dec 2017 - 4:51 pm | मूकवाचक

त्यावर तो साधू शांतपणे म्हणाला आस्तिक्यामुळे जन बुडतात अशा निव्वळ अंधश्रद्धेपायी आलेल्या कळवळ्यापोटी साठ वर्षे घालवली असशील, तर तुला सल्ला देण्यात माझी दोन मिनीटे दवडली, त्याबद्दल मीच तुझी माफी मागतो. ईश्वर तुला तुझ्या नियोजीत कार्यात यश देवो :)

यनावाला's picture

20 Dec 2017 - 1:43 pm | यनावाला

क्षमस्व !

* इथे माझ्या लेखांवरील अनेक प्रतिसादांतील विचार आणि उपस्थित केलेले प्रश्न हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे असतात. त्यांवर कांही उत्तरे लिहिण्याची क्षमता आणि विद्वत्ता माझ्यापाशी नाही.
* जोवर इथे काहीजण हे लेख वाचत आहेत, जोवर या संस्थळाचे प्रवर्तक मला प्रतिबंध करीत नाहीत आणि जोवर लिहावेसे वाटते आहे तोवर लिहिणार. धन्यवाद !
......यनावाला

प्रकाश घाटपांडे's picture

20 Dec 2017 - 2:28 pm | प्रकाश घाटपांडे

खर आहे. समोरच्याला पटतील अशी उत्तरे आपल्याला देता येतीलच असे नाही. अशावेळी आपल्या त्या मर्यादा समजाव्यात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2017 - 3:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१, आणि...

किमान अश्या वेळी* तरी "आपली मते अंतीम सत्य आहेत अश्या अविर्भावात मांडू नयेत", व त्यांच्याशी सहमत नसणार्‍यांबद्दल अवमानकारक शब्द वापरू नयेत, असा सभ्य सामाजिक संकेत पाळावा. :)

* : माझे व्यक्तीगत मत तर असे आहे की, व्यक्ती कितीही बुद्धीवान असली तरी तिने इतर व्यक्तींशी वादविवादात नेहमीच माणूसकीच्या नात्याने सभ्य व्यवहार करायला हवा. कारण...
१. विद्या विनयेन शोभते,
२. फळांनी लगडलेले झाड जास्त झुकते,
इत्यादी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2017 - 2:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथे माझ्या लेखांवरील अनेक प्रतिसादांतील विचार आणि उपस्थित केलेले प्रश्न हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे असतात. त्यांवर कांही उत्तरे लिहिण्याची क्षमता आणि विद्वत्ता माझ्यापाशी नाही.

"एखाद्या मुक्त माध्यमांतल्या लेखातल्या मजकूराला (मुद्दे / तर्क / विधाने / विश्लेषणे / निश्कर्ष / इत्यादींना) धरून कोणी प्रश्न विचारले / विवरण मगितले / प्रतिवाद केला तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी लेखकावर असते", असा सर्वसाधारण दंडक आहे. तुमच्यासारख्या विद्वान (व विशेषतः प्राध्यापक असलेल्या) व्यक्तीला हे सांगण्याची गरज आहे असे नाही.

विशेषतः, वादग्रस्त ठरू शकेल अश्या विषयावर लेखन करून, मग "एकतर पाय काढून गप्प बसणे किंवा असा वरच्यासारखा हात झटकाणारा प्रतिसाद टाकून बाजूला होणे" असे केल्याने लोकशिक्षणाच्या कामात फायदा तर निश्चितच होणार नाही. तसेच, ते काही शास्त्रिय अथवा न्याय्य वर्तनही ठरणार नाही, हे सांगायला नकोच. याशिवाय, त्या कृतीची तुलना कोणी "दगड मारून पळून जाणे" या कृतीशी केली तर ते असत्य होणार नाही, ते वेगळेच.

विशेषतः आपल्याबरोबर सहमत होत नाहीत त्यांचा, निर्बुद्ध, (अंध)श्रद्ध, अडाणी, अश्यासारख्या शेलक्या विशेषणांनी सत्कार करणार्‍या (पक्षी : स्वतः बुद्धीवान व तार्कीक असण्याचा दावा करणार्‍या) व्यक्तीने आपल्याला शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करता येणार नाहीत असे दावे करणे "कसे दिसते" हे सांगायलाच हवे का ?

हे वरचे "सर्वसामान्य माणसांना" सुचतील असे विचार मनात आले, ते इथे मांडले आहेत. बाकी, तुम्हाला आम्ही अज्ञ लोक काय सांगू शकणार म्हणा !

कवितानागेश's picture

20 Dec 2017 - 8:15 pm | कवितानागेश

हेच कधीपासून सांगतेय मी त्या अर्धवट रावाला, तर उगीच वाद घालत बसतो इथे तुमच्याशी!

आपण जर एखाद्या विषयावर संवाद साधायचा प्रयत्न करित आहोत तर त्यावर आपल्याला अवगत नसलेल्या एंगलने मांडलेले विचार किमान ऐकुन घेण्याचा मनमोकळेपणा असायला हवा. संवादाऐवजी केवळ प्रवचन द्यायची इच्छा असेल तर त्या विषयाची सर्वांगाने माहिती असायला हवी.

इथे माझ्या लेखांवरील अनेक प्रतिसादांतील विचार आणि उपस्थित केलेले प्रश्न हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे असतात. त्यांवर कांही उत्तरे लिहिण्याची क्षमता आणि विद्वत्ता माझ्यापाशी नाही.

उगाच सर्कॅस्टीक कशाला बनताय. अहो, स्पष्ट लिहा ना कि बुवा अनेक मिपाकरांची विद्वत्ता, आकलनशक्ती माझे विचार पचवायच्या लायकीची नाहि म्हणुन.असले गुणगान ऐकायची सवय आहे मिपाला. एक अध्यात्मीक रेडीओ हि टेप नेहेमी वाजवायचे.

जोवर इथे काहीजण हे लेख वाचत आहेत, जोवर या संस्थळाचे प्रवर्तक मला प्रतिबंध करीत नाहीत आणि जोवर लिहावेसे वाटते आहे तोवर लिहिणार. धन्यवाद !

कोडगेपणाची कमाल झाली.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Dec 2017 - 10:00 am | प्रकाश घाटपांडे

कोडगेपणाची कमाल झाली.

नाही याला चिकाटी म्हणतात. ते मिपाकर आहेत त्यांना त्यांची मते इथे सातत्याने मांडण्याचा अधिकार आहे. तसेच आपल्याला त्याचा प्रतिवाद करण्याचाही अधिकार आहे. वाचायचे की नाही हे ठरवण्याचा अधिकार वाचकालाही आहे.

अर्धवटराव's picture

21 Dec 2017 - 10:54 pm | अर्धवटराव

आपल्या समर्थक विचारवंतांच्या मनोरंजनासाठी लेख पाडायचे आणि प्रतिवाद/प्रतिवाद्यांना निर्बुद्ध संबोधुन सरळ सरळ फाट्यावर मारायचे याला मी तरी कोडगेपणाच म्हणतो. बाकि त्यांच्या जालीय अधिकारांविषयी कोणालाच काहि आक्षेप नसावा.

समाधान राऊत's picture

22 Dec 2017 - 1:14 am | समाधान राऊत

एक अध्यात्मीक रेडीओ हि टेप नेहेमी वाजवायचे.
....यनावाला == रेडिओ टेप

arunjoshi123's picture

21 Dec 2017 - 12:28 pm | arunjoshi123

प्रिय यनावाला सर,
आपल्या नास्तिक असण्याच्या, श्रद्धेविषयक काही निगेटिव विचार असण्याच्या अधिकाराचा व प्रक्रियेचा मला व्यक्तिशः पूर्ण आदर आहे. माझ्या काही शब्दांमुळे वा प्रतिक्रियांमुळे आपणांस वाईट वाटले असेल तर क्षमा असावी.
-----------
सामाजिक मंचावर आपण विचार प्रकट करतो ते बहुजनांस दुखावणारे तसेच एकसुरी नसावेत अशी माफक अपेक्षा होती. विश्वकारण, ईश्वर, मनुष्य, ज्ञान, श्रद्धा, इ इ विषय गहन तर आहेतच शिवाय चर्चांतर्भूत आहेत. अजून सेटल झालेले नाहीत.
---------------
कृपया तुमच्या विचारांचा विरोध करणारे लोक प्रामाणिकपणे तसे करत आहेत असे मानून उत्तरे देत चला. मागच्या धाग्यात तुम्ही "सहमतांचे आभार" असा प्रकार केला होता तो अजिबात आवडला नाही. बर्‍याच लोकांनी सल्ला देऊनही मी आपणांस अद्यापि संवाद्य नास्तिक मानतो. आकलन, क्षमता या बाबी असोत, पण सधेतुप्रवृत्त मनुष्याने नेहमी निरंतर संवाद ठेवला पाहिजे.

याला म्हणतात विद्वत्ता!!!
आम्ही किती ...आहोत ते सांगितल्या बद्दल आभार.

सर्वसाक्षी's picture

20 Dec 2017 - 2:38 pm | सर्वसाक्षी

आपण नास्तिक वा निरिश्वरवादी असाल, हरकत नाही ती आपली वैचारिकता आहे आणि आपली भूमिका ठरविण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला आहे. मात्र सर्वांनीच आपली भूमिका पूर्णतः मान्य करावी अशी जी भूमिका आपण घेत आहात ती इतरांचा अधिक्षेप करणारी आहे. आपल्याला मान्य नाही म्हणजे असे काही अस्तित्वातच नाही असे होउ शकत नाही
आपण म्हणता:

थोडक्यात म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात आहे हे सत्य असेल तर त्या अस्तित्वाला कोणतीही अट लागू असू शकत नाही.

. साहेब, आपण सूक्ष्म असे रोगजंतू डोळ्यांनी पाहू शकता का? ते पाहायचे तर सूक्ष्मदर्शक वापरणे बंधनकारक आहे. अर्थातच आपण याला अटसमजू शकता. मग आपल्या मते विनाअट दिसत नाहीत तर सूक्ष्मजंतू अस्तित्वातच नाहीत. दूरचे ग्रह पाहायचे तर शक्तिशाली दुर्बिण वापरावी लागते. मग मी माळावर उभा राहून नुसता आकाशाकडे पाहून " काहीही दिसत नाहे तेव्हा हे खगोलशास्त्रद्न्य खोटे बोलतात" असे म्हणावे का?

सगळा वाद बाजुला ठेवुन देव नाहीत हे समजा एकवार मान्य केले, तरी जर कुणाला देव आहे या भावनेने बरे वाटत असेल तर त्यात गैर काय? देवाचा व्यापार करणे, देवदेवतार्जनाच्या नावाखाली लोकांना फसवणे वा लुबाडणे वा देवावर भरवसा ठेवून काहीही न करता बसणे हे निश्चितह वाईट. पण सर्व नित्याची कामे करत असता देवावर विश्वास ठेवून हात जोडले तर कुणाचे काय नुकसान आहे?

शारिरीक व्याधींपेक्शा मनोविकार भयंकर असतात असे ऐकतो. अनेक मनोविकारांवर उपचार करताना डॉक्टर कधीही रुग्णाला तो खोटे वा अतर्क्य बडबडत आहे असे म्हणत नाही उलट आपला रुग्णाच्या कथनावर पूर्ण विश्वास आहे असे सांगतो आणि उपचार करतो. अनेकदा मनाचा कोंडमारा असह्य होउन अनेक आजार उद्भवतात. मन मोकळे करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि मन मोकळे करायचे तर देव उत्तम. जर आपण अस्तिक असाल तर आपले गार्‍हाणे देव ऐकेल हे समाधान असेल व जर नास्तिक असला तरी आपण कुणाला तरी शल्य सांगितले आणि ज्याला सांगितले तो तर दगड म्हणजे ते तो आणखी कुणाला सांगणार नाही वा त्याचा गैरफायदा सुद्धा घेणार नाही हे समाधान. मग सांगा देवावर विश्वास ठेवण्यात गैर काय? विश्वास अत्यंत महत्वाचा. एका बँक दरोड्यात एका धाडसी तरुणाने एका दरोडेखोराला झेप घेउन पकडले. अर्थातच त्याचे बरेच कौतुक झाले. त्याला पोलिस अधिकार्‍याने जेव्हा असे विचारले की सशस्त्र दरोडेखोरावर झडप घालण्याची हिम्मत त्याला कशी झाली तेव्हा तो अगदी सहज म्हणाला की त्याने त्या दरोडेखोराला सहा गोळ्या झाडताना पाहिले होते तेव्हा आता याचे पिस्तुल रिकामे असणार म्हणुन उडी मारली. पोलिसांनी कपाळाला हात लावला, म्हणाले बाबा रे काही पिस्तुले आठ बारीही असतात! हे सांगण्यामागचा हेतू इतकाच की मनात हिंमत असेल तर सामान्य माणूसही असामान्य कार्य करु शकतो. आपण हाती घेतलेल्या कार्यात नेहमी यश मिळेलच असे नाही पण जर जिंकणारच या आत्मविश्वासाने गेलं तर कामगिरी अधिक चांगली होते आणि असा आत्मविश्वास सर्वांकडे नसतो तेव्हा बालपणापासून 'परिक्षेला जाताना देवाला व मोठ्या माणसांना नमस्कार करावा' असे संस्कार केले जातात जेणे करुन आपण करत असलेल्या कामात कुणीतरी पाठीशी आहे हा विश्वास असतो. यात गैर काय? कुणी परिक्षेला वा मुलाखतेला जात असेल तर आपण शुभेच्छा देतो. त्या दिल्याने काही फरक पडत नाही पण त्या व्यक्तिला बरे वाटते आणि तो आत्मविश्वासाने जे येत आहे ते पूर्णपणे व्यक्त करु शकतो.

अनेकांना आपण पीत नाही तेव्हा पेला घेतलेले समस्त बेवडे आहेत असा समज असतो. आपली वैचारिकता तशी तर नाही ना?

शाली's picture

20 Dec 2017 - 2:51 pm | शाली

+++++१

मराठी_माणूस's picture

20 Dec 2017 - 3:01 pm | मराठी_माणूस

अनेकांना आपण पीत नाही तेव्हा पेला घेतलेले समस्त बेवडे आहेत असा समज असतो. आपली वैचारिकता तशी तर नाही ना?

एव्हढा एकच प्रश्न ह्या लेखाला (लेखमालेला ) धोबीपछाड घालायला पुरेसा आहे

शाली's picture

20 Dec 2017 - 3:04 pm | शाली

पुर्ण सहमत.
मुळात हा वादच नको.
नको असेल देव तर ठाम नको म्हणा, पुढे चला.
हवा असेल तर पुर्ण विश्वास ठेऊन पुढे चला.
मला तर कधी कधी नास्तिक जास्त आवडतात कारण आस्तिक देवाच्या अस्तित्वावर जितके ठाम असतात त्यापेक्षा कैकपटींनी नास्तिक देव नाही यावर ठाम असतात. ठामपणा जगायला बळ देतो.
नास्तीकच देवाच्या जास्त जवळ पोहोचलेले असतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2017 - 3:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

नास्तीकच देवाच्या जास्त जवळ पोहोचलेले असतात.

हे वाचून नास्तिकांना फीट येऊन त्यांच्या तोंडाला फेस आला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल ! ;) =)) =)) =))

असा दृढनिश्चयी नास्तीक दाखवा डाॅक्टर, मी त्याची जबाबदारी आनंदाने घेईन.

माहितगार's picture

20 Dec 2017 - 5:14 pm | माहितगार

अगदी अगदी ठाम नसण्या बद्दलची ठाम भूमिका आणि तरीही सर्व भूमिकात आम्हीच सर्वोत्कृत्ष्ट (ज्यांना पटत नाही त्यांनी वृथा म्हणावे हवे तर ) अभिमान बाळगतो. अनेक भूमिका स्विकारताना आपल्या भूमिकेतही असतो म्हणून त्याही भावना आदर पुर्वक पोचल्या .

प्रकाश घाटपांडे's picture

21 Dec 2017 - 10:42 am | प्रकाश घाटपांडे

ईश्वर या संकल्पनेमुळे बहुसंख्यांना आपले मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते. ईश्वर हा त्यांच्यासाठी स्वस्तातला सायकियाट्रिस्ट आहे :)

सुखीमाणूस's picture

22 Dec 2017 - 12:26 am | सुखीमाणूस

पटले एकदम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2017 - 3:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही दोन्ही विधाने भोंगळ आहेत. १) देव अस्तित्वात आहे. २) देव अस्तित्वात नाही. या दोन विधानांतील एक, आणि केवळ एकच, विधान सत्य असले पाहिजे.

आणि जोपर्यंत त्यातले कोणतेही एक विधान सिद्ध होत नाही तोपर्यंत, कोणत्याही एकाच विधानाचा "अंतीम सत्य" असा दुराग्रह धरणारी व्यक्ती भोंगळ ठरते, नाही का ?

कुठून या वाद प्रतिवादात पडले! मी देव मानते, मला देव आवडतो, माझ्या मनात देवाविषयी शंका निर्माण होत नाहीत. मला फार जवळचा वाटतो तो. संध्याकाळी निरांजणात वात लाऊन ऊदबत्ती लावली की माझं आख्खं घर छान ऊत्स्हात येतं. त्यात देवाचा कीती हात मला माहित नाही. श्रध्देची, विश्वासाची जीतकी चिकीत्सा कराल तेवढा मोठा शून्य हाती येईल. ज्यात आनंद वाटतो त्या मताने चालावे माणसाने. यनावाला तुमच्याही मताचा आदर आहे पण मला एकून नाही पटत. पण तुमच्या लेखांमुळे आणि त्यावरच्या प्रतिक्रियांमुळे माझी श्रद्धा आणखी दृढ झाली. धन्यवाद.

कानडाऊ योगेशु's picture

20 Dec 2017 - 11:15 pm | कानडाऊ योगेशु

प्रो.विद्यासागरांसंबंधित एक किस्सा आठवला. रोज कॉलेजात स्टाफरूममध्ये गेल्यावर ते पाच मिनिटे तिथे असलेल्या देवाच्या तसवीरीसमोर प्रार्थना करत असत व त्यावर त्यांचे नास्तिक प्राध्यापक सहकारी हसत असत व टर उडवत असत. एकदा चर्चेत त्या कंपूने त्याना "देव नाहीच आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातली रोजची पाच मिनिटे वाया घालवत आहात" असे म्हणुन प्रा.विद्यासागरांना खिजवण्याचा प्रयत्न केला. त्यावर विद्यासागर स्मितहास्य करत शांतपणे त्यांना म्हणाले "बंधूंनो, जर देव अस्तित्वात नसेल तर माझ्या आयुष्यातली रोजची पाचच मिनिटे वाया गेली असे समजु पण जरा देव अस्तित्वात असेल तर तुमचे पूर्ण आयुष्यच वाया गेले असे समजावे लागेल"

गामा पैलवान's picture

21 Dec 2017 - 12:52 am | गामा पैलवान

यनावाला,

इथे माझ्या लेखांवरील अनेक प्रतिसादांतील विचार आणि उपस्थित केलेले प्रश्न हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे असतात. त्यांवर कांही उत्तरे लिहिण्याची क्षमता आणि विद्वत्ता माझ्यापाशी नाही.

तुमची आकलनशक्ती कमी पडतेय हे कबूल केल्याबद्दल अभिनंदन. ती वाढवण्यासाठी काय उपाय चालू आहेत ते वाचायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

एक्का काका आणि अरुणजोशी यांचा आपण फॅण झालोय :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Dec 2017 - 11:08 am | डॉ सुहास म्हात्रे

नको, नको... थंडीच्या दिवसात फॅण/फॅन नको... उन्हाळ्यात विचार करता येईल ! ;) =))

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2017 - 11:16 pm | अत्रुप्त आत्मा

21 Dec 2017 - 9:00 am | स्पा
एक्का काका आणि अरुणजोशी यांचा आपण फॅण झालोय :)

››› अखेर पांडू आला! =))

माझे फक्त माझ्यासाठी असलेले वा आतापावेतो बनलेले यासंदर्भातील मते. जरूरीचे नाही की ते बरोबरच असतील. १.देव न माऩणे = योग्य.
२.दुसरा देव मानत असेल, तर त्याच्या ह्या मानसिकतेचा फायदा घेऊन त्याला फसवणे= बुवाबाजी= अतिशय अयोग्य.
३. देव मानणे = योग्य
४. अस्तिकांनी नास्तिकांना देव मानवा म्हणून वेठीस धरणे = अतिशय अयोग्य.
५. नास्तिकांनी अस्तिकांना कमी दर्जाचे अथवा कमी बुद्धिचे समजणे = अतिशय अयोग्य.
मी स्वतं: ऐक सर्वधारण बुद्धिचा असुन , मला पुजा पाठ फारसे येत नाही. तरीही माझा देव या गोष्टी वर विश्वास आहे.
माणसांतील अत्युच्च बुद्धिमत्ता असणारा माणुस जरी नास्तिकता अंतिम सत्य समजत असला किंवा असेल तरी मी त्याच्याशी याबाबतीत मी सहमत नसेल. कारण मानवी बुद्धिला सर्वकाही समजते यावर मी विश्वास ठेवू शकत नाही.

मूकवाचक's picture

21 Dec 2017 - 12:05 pm | मूकवाचक

दुसरा देव मानत नसेल, तर त्याच्या ह्या मानसिकतेचा फायदा घेउन त्याला आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापरून घेणे = तथाकथित पुरोगामी राजकारण = अतिशय अयोग्य

योग्यायोग्यतेचा मुद्दा काढायची कल्प्नना भारी आहे.
सत्य काय आहे यापेक्षा चांगलं काय आहे हे कधीही महत्त्वाचं.

आज सकाळी सकाळीच यनावालांचा नवीन मजेशीर लेख वाचायला मिळावा अशी इच्छा झाली होती .... न बघते तर काय देवाने माझी इच्छा पुरी केलेली दिसली .