मेथी डाळवडे

Primary tabs

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
18 Dec 2017 - 5:37 pm

मेथी डाळवडे

थंडी आली की,माझी आई आहारतल्या मेथीचे प्रमाण वाढवायची.मेथीचे लाडूही केले जायचे,पण मला ते कधीच आवडायचे नाहीत.मेथीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार,मेथी घालून डोसे,घावणे, धिरडी,थालिपीठं बरंच काय काय व्हायचं.त्यातलाच एक चमचमीत पदार्थ म्हणजे मेथी डाळवडे,नाश्त्याला हमखास असायचेच.भरपूर थँडियासायची तेव्हा दिवळीपासूनच.सकाळी पहाते उठून अभ्यासला बसायचो तेही स्वेटर घालून, कं बांधून.आणि अभ्यास अर्धयवर आलेला असतानाच पाट्यावर वेतनाचा आवज येऊ लागायचा.लसूण,मिरच्या ठेचून,त्यात कोथींबीर,ओळखोबरे,मीठ ,साखर घालून चटणी वॅट असायची आई.हल्ली मिक्सरमध्ये वाटण जरताना मिक्सर उघडल्याशिवय काय वाटलं जातंय ते कळत नाही,पण पाट्यावर वाटताना ,वाटली जाणारी प्रत्येक गोष्ट आपला वेगवेगळा सुवास सोडत असायची आणि कान बंद असले तरी उघड्या नाकाला काहीतरी चमचमीत,तोंडात जाणार असल्याची सुवार्ता देऊन मनाला सुखवीत असे.चटणी वाटून झाली की त्याच पाट्यावर भिजलेल्या डाळी लसूण,मिरची, आल्यासह वाटल्या जायच्या.बाकीचे सोपस्कार पार पाडून १०/१५ मिनिटातच स्टोव्हच्या फुरररर आवाजासोमत डाळवडे कढईत पडल्याचा चुररर आवाज येत असे आणि त्याबरोबरच चणाडाळ आणि मेथीचा घमघमाटही नाकात शिरून जिभेला पूर आणत असे.एव्हाना वातावरणातला थंडावा कमी झालेला असे,स्टोव्हच्या उबेने,तेव्हा आम्ही कानावरचे रुमाल सोडून आईची हाक कधी कानावर पडते याकडेत्या फुररर आणि चुररर च्या तालावर ध्यान लावत असू.
"चला रे,या नाश्ता करायला",असा आईचा आदेश आला की आम्ही तत्पर आज्ञाधारकपणे जात असू,आणि मग मेथी डाळवडयांचा समाचार चवीने घेत असू.
आताही मी मेथी डाळवडे करते,त्या चित्रातली आई,पप्पा,दोन भाऊ ही मंडळी आज नसली तरी त्यांच्या सोबतीनेच खाते.
त्या डाळवड्यांची ही कृती मिपाकरांसाठी.लागा तर डाळवडे खायच्या तयारीला.
साहित्य:-
१. अर्धी वाटी चणाडाळ
२. पाव वाटी तूरडाळ
३. पाव वाटी मूगडाळ
४. पाव वाटी मसुरडाळ
५. पाव वाटी उडीदडाळ
६. पाव वाटी तांदूळ
७. मूठभर काळे वाटाणे
८. १०/१२ लसूणपाकळ्या
९. पेरभर आले
१०. ४/५ हिरव्या मिरच्या
११. अर्धी वाटी बारीक चिरलेली मेथी
१२.अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१३. एक लहान कांदा बारीक चिरून
१४. एक चहाचा चमचा मिरचीपूड
१५. एक चहाचा चमचा धणेपूड
१६. पाव चहाचा चमचा जिरेपूड
१७. अर्धा चमचा गरम मसाला पूड १८.मीठ चवीनुसार
१९. तेल तळण्यासाठी.

कृती:-
१. अनुक्रमांक १ ते ७ पर्यंतच्या वस्तू रात्री भिजत घाला.
२. अनुक्रमांक १ ते १० पर्यंतच्या वस्तू ,पाणी न घालता दरदरीत वाटून घ्या.
३. अनुक्रमांक ११ ते १७ पर्यंतच्या वस्तू त्यात मिसळा व हाताने छान कालवून घ्या
४. तेल तापत ठेवा.
५. पाण्याचा हात घेऊन हातावर लिंबाएवढा गोळा घेऊन चपटा थापा.
६. गरम तेलात अलगद सोडा व लालसर रंगावर तळून ,निथळून काढा.
७.आधी करून ठेवलेल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या.

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

18 Dec 2017 - 5:40 pm | नूतन सावंत

फोटो का आला नाही कळले नाही,सा सं कृपया मदत करा.

संपादक मंडळ's picture

18 Dec 2017 - 6:06 pm | संपादक मंडळ

तुमच्या फेसबुक पेजवरच्या फोटोवर क्लिक करा व तो पूर्ण आकारात दिसू लागल्यावर मिळणारी त्याची लिंक मिपावर वापरा... चित्र मिपावर दिसू लागेल... आता दिसत आहे तसे.

नूतन सावंत's picture

18 Dec 2017 - 7:19 pm | नूतन सावंत

धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2017 - 6:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटोतले डाळवडे आत्ताच उचलून खावे इतके मस्तं दिसत आहेत !

कपिलमुनी's picture

18 Dec 2017 - 6:14 pm | कपिलमुनी

कातिल फोटो !

तोंपासू !
विकांताला करून बघण्यात येइल.

कंजूस's picture

18 Dec 2017 - 6:22 pm | कंजूस

भन्नाट!

या विकांतास करून पाहणारच.
जब्रा पाकृ.

सूड's picture

18 Dec 2017 - 6:29 pm | सूड

अगदी देखणे झालेत!!

सुरेख!
करुन पाहायलाच हवेत!

मनोगत किती सुंदर लिहील आहात. खुप आवडल. अगदी तो आवाज आणि सुवास पोहोचला.

फोटो पाहुन तर तोपासु.

मी आज मेथी घालून बेसन पोळा केला.

नूतन सावंत's picture

19 Dec 2017 - 5:22 pm | नूतन सावंत

धन्यवाद जागुतै. तुझे लेखही असे भावतात मनाला.

तुझे लेखही असे भावतात मनाला.
धन्यवाद.

दिपक.कुवेत's picture

19 Dec 2017 - 5:08 pm | दिपक.कुवेत

मला हे वडे प्रचंड आवडतात आणि ते चहासोबत कुडुम कुडुम खायला अजून मजा येते. पण त्यात एवढ्या सगळ्या डाळी असतील माहित नव्हतं. मला वाटत होतं कि फक्त चणाडाळ घालून करतात. असो आता असे करुन पहातोच तशीहि ईथे थंडि आहेच. अजून एक काळे वाटाणे वाटले जातात?? माझ्या ईथे नाहियेत पण नसले तर चवीत एवढा फरक पडतो का? भांड्याला लागुन चटणी ठेवायचा कप्पा सहि आहे. सहिच पाकॄ आणि तोंपासू फोटो.

नूतन सावंत's picture

19 Dec 2017 - 5:29 pm | नूतन सावंत

काळे वाटणे बारीकही वाटले जातात,पण आपल्याला जाडसरच वाटायचे आहेत.आणि त्याचा अर्धभाग दाताखाली आला की मस्त चव येते.पण नसलेच तर .... नसुदेत.
आणि ती चटणी ठेवलेला छोटा बाउल वेगळा आहे,तो चिकटून ठेवल्याने फोटोत एकसंध वाटतोय.

एस's picture

19 Dec 2017 - 6:21 pm | एस

आवडता पदार्थ.

फोटो आणि पाककृती दोन्ही मस्त....करून बघेन एकदा...

वडे केले आणि फस्तपण झाले.. फोटोसाठी धीर धरवला नाही. मी पाव वाटी किनवापण घातला, काळ्या वाटाण्याऐवजी पांढरा घातला आणि मसूर डाळीऐवजी चुकून आख्खे मसूर घेतले ते तर वडे संपल्यावर लक्ष्यात आले =)

माझा मुलगा म्हणाला की, असे वडे रोज कर :)

नूतन सावंत's picture

20 Dec 2017 - 5:09 pm | नूतन सावंत

खऱ्या सुगरणीच असे बदल नकळतपणे घडवून आणतात आणि नव्या पाककृती जन्माला घालतात,चालुदेत अशीच खाद्ययात्रा.

अनिंद्य's picture

20 Dec 2017 - 2:50 pm | अनिंद्य

@ सुरन्गी,

सुपर !
फोटो सुद्धा मस्त.
आणि हा पदार्थ माझ्या सध्याच्या अटीसुद्धा पूर्ण करतोय - व्हेज, ग्लूटेन फ्री, हाय प्रोटीन.

चामुंडराय's picture

20 Dec 2017 - 10:22 pm | चामुंडराय

सुरेख दिसतायेत डाळवडे.

तळलेले असून हि अजिबात तेलकट दिसत नाहीयेत, जसे काही बेक केले आहेत.

अवांतर : लहान असताना एकदा हे डाळवडे खाल्यावर मला खूप जुलाब झाले होते. तेव्हा पासून या वड्यांना मी ढाळवडे म्हणतो :)

स्वाती दिनेश's picture

21 Dec 2017 - 10:04 pm | स्वाती दिनेश

मस्त दिसत आहेत ग डाळ वडे.
मेथीने वेगळाच सुंदर स्वाद येत असणार..
डाळवडे आवडतातच पण हल्ली ए फ्रा करते मी ,:)
स्वाती

नूतन सावंत's picture

23 Dec 2017 - 3:15 pm | नूतन सावंत

मीपण एअरफ्रायरच वापरते ग ,पण कधीतरी थंडीत आईच्या हातची चव हवीशी वाटली तर डीप फ्राय करते चुकून माकून.

सविता००१'s picture

23 Dec 2017 - 7:55 pm | सविता००१

फार सुंदर दिसताहेत.

मदनबाण's picture

24 Dec 2017 - 11:43 am | मदनबाण
दीपा माने's picture

29 Dec 2017 - 4:07 am | दीपा माने

खुपच छान पाकृ आहे.
चहासोबत पोटभरीचा मेनू मलातरी वाटला.

हे वडे आणि चटणी झक्कास कॉम्बो आहे...

गोंडस बाळ's picture

2 Jan 2018 - 11:52 am | गोंडस बाळ

आ हा हा !!! आत्ता येऊन वडे गट्टम करावेसे वाटत आहेत..

पद्मावति's picture

2 Jan 2018 - 2:39 pm | पद्मावति

आहा.. वडे मस्तंच आणि लिखाण पण.

विवेकपटाईत's picture

7 Jan 2018 - 9:39 am | विवेकपटाईत

मस्त आवडली.

पैसा's picture

7 Jan 2018 - 9:18 pm | पैसा

मस्त!

सही रे सई's picture

8 Mar 2018 - 6:49 pm | सही रे सई

सुन्दर दिसतायत वडे आणि चटणी पण.
नक्कीच करून बघेन.