सुरमई एनपॅपिलो

मोदक's picture
मोदक in पाककृती
21 Nov 2017 - 1:09 am

बरेच दिवस स्वयंपाकघरात हात साफ केला नव्हता म्हणून आणि शेफ केडी व जॅक ऑफ ऑल यांनी फोटो टाकून टाकून जळवले म्हणून एकदाची किचनमध्ये एंट्री मारलीच..

स्वतः मासे फ्राय करण्याची लज्जत मागच्या वर्षी अनुभवली होती म्हणून मासे हाच प्रकार निवडला आणि आमचे द्रोणाचार्य शेफ केडींना शरण जाऊन "माशांचा एखादा वेगळा प्रकार करायचा आहे. काय करू..?" असे विचारले.

शेफ केडी यांनी "अरे बेटा.. दॅट्स व्हाय यू शूड कॉल मी..!!" असे बोलून चांगली व ताजी भाजी कुठे मिळेल, मासे कुठे मिळतील याची इत्यंभूत माहिती दिली.एनपॅपिलो या प्रकाराची ओळखही करून दिली. पूर्वी मी एकदा व्हेज बार्बेक्यू केले होते त्याच्या जवळपास जाणारी पाकृ होती.

मासे घेताना हा एक प्रकार बघितला.. (हा वजनात मारण्याचा प्रकार आहे का..??)

.

तिथे जवळच एका भिंतीवर कुणाची तरी प्रतिभा ओसंडून वाहत होती.

.

तर.. सुरमई एनपॅपिलो साठी साहित्य -

१) सुरमईचे जाड तुकडे
२) आले, लसूण, मिरची, पुदीना, कोथींबीर वाटून त्याची पेस्ट
३) बडीशेप
४) हळद
५) मीठ
६) दालचिनीचे लहान तुकडे
७) २ पिवळेधमक आणि एकही डाग नसलेले लिंबू - हे शोधावे लागतात.
८) चमचाभर तूप
९) तेल
१०) अ‍ॅल्युमिनीयम फॉईल

सर्वप्रथम सुरमईचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या.
त्याला आले, लसूण, पुदीना, मिरची ही पेस्ट लाऊन आणि हळद व बडीशेप भुरभूरून मुरवत ठेवा.
मुरवताना थोडेसे तेलही लावा.
लिंबाचे गोल काप करून घ्या. (यासाठी एकदम धारधार सुरी लागते)

.

गॅसवर तवा / कढई गरम झाल्यानंतर त्यात तूप घालून त्यावर लिंबाचे काप पसरा आणि थोडे शेकून घ्या.

अ‍ॅल्युमिनीयम फॉईल घेऊन त्यावर मुरवलेली सुरमई आणि लिंबाचे काप ठेवा, (लिंबाचे काप शक्यतो स्किन साईडला)
दालचिनीचे तुकडे वर ठेवा.
त्यावर एका बारीक किसणीने लिंबाची साल किसून घाला - याला लेमन झेस्ट असेही म्हणतात.

.

अ‍ॅल्युमिनीयम फॉईलचे दोन भाग घेऊन पहिल्यांदा एका भागाची घट्ट पुरचुंडी बांधा आणि नंतर त्यावर दुसर्‍या भागाची पुरचुंडी बांधा म्हणजे आत तयार होणारी वाफ निसटून जाणार नाही व त्या वाफेत मासा अलगद शिजेल.
शक्यतो बाजूला घडी येईल अशी पुरचुंडी बांधा म्हणजे तव्याची धग माशापर्यंत नीट आणि समान पोहोचेल.

.

यानंतर प्रत्येक पुरचुंडी एका बाजूने १० मिनीटे व दुसर्‍या बाजूने ५ मिनीटे थोड्या गरम तव्यावर शेकून घ्या.यानंतर तव्यावरून पुरचुंडी उतरवून ५ मिनीटे तशीच ठेवा. लगेच उघडू नका.
पुरचुंडी उघडल्यानंतर मासे + मसाला + बडीशेप यांचा फर्मास दरवळ पसरेल - तो चुकवू नका

.

सुरमई एनपॅपिलो थंडगार सोलकढी सोबत लगेचच संपतील.

******************************

ही पाकृ तयार होण्यास २० / २५ मिनीटे लागतील.. तोपर्यंत बांगडा तवा फ्राय बनवू शकता.

.

******************************

प्रतिक्रिया

केडी's picture

21 Nov 2017 - 5:07 am | केडी

जे बात, झक्कास! मस्त रे! निगुतीने केलेलं दिसतच आहे फोटोतून, किप ईट अप!

इरसाल कार्टं's picture

21 Nov 2017 - 6:08 am | इरसाल कार्टं

बाकी एक प्रश्न: अल्युमिनियम फॉईलच्या ऐवजी केळीची/पळसाची पाने चालतील का?

व्हेज बार्बेक्यु - हा धागा चेकव.

फोटो दिसत नाहियेत.. एक दोन दिवसात नीट करतो.

भ ट क्या खे ड वा ला's picture

21 Nov 2017 - 6:28 am | भ ट क्या खे ड वा ला

घरी करणे शक्य नाही .. पण मित्र परिवाराला पाठवतोय .

अभिजीत अवलिया's picture

21 Nov 2017 - 6:38 am | अभिजीत अवलिया

करुन बघेन.

ताजी भाजी कुठे मिळेल, मासे कुठे मिळतील याची इत्यंभूत माहिती दिली

कुठे मिळतील?
मी नेहमी गणेश पेठेत होलसेल मार्केटला जातो.

सस्नेह's picture

21 Nov 2017 - 12:18 pm | सस्नेह

मोदक मासा बनवू लागले , संसारी जाहले, बहुत संतोष जाहला !
चला आता मासळीबाजार धुंडाळून सुरमई आणलाच पाहिजे !

शब्दबम्बाळ's picture

21 Nov 2017 - 12:25 pm | शब्दबम्बाळ

भारीच की!!

इरसाल's picture

21 Nov 2017 - 1:18 pm | इरसाल

हेच बाकी होते आता बघायचे. आता डोळे मिटावे म्हणतो..........................वामकुक्षीसाठी.

भारीच, कधी खाउ घालतोस ?

आता सुकट घालुन मोदक बघायचे बाकी आहे फक्त..

भारी रे रच्याकने..

गवि's picture

21 Nov 2017 - 6:02 pm | गवि

सुरमई शाम.. वाह.

सोलकडीही फार आवडते. झकास.

Ranapratap's picture

21 Nov 2017 - 6:35 pm | Ranapratap

करून पाहतो

सुबोध खरे's picture

21 Nov 2017 - 8:36 pm | सुबोध खरे

लै म्हणजे लैच झकास

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Nov 2017 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

झकास ! सुरमई एक अष्टपैलू (versatile) मासा आहे. तिचे जितके प्रकार बनवावे तितके कमीच !

इथे सुरमईचे काप जरा जास्त जाड झाले नाहीत का ? जाड तुकड्यांमध्ये आंबटपणा (मरिनेशन), मीठ आणि मसाला खोल आतपर्यंत जात नाही, त्यामुळे मला स्वतःला, कोणत्याही प्रकारात, माशांचे खूप जाड तुकडे आवडत नाहीत.

सुरमईच्या पातळ ते मध्यम (साधारण १.५ ते २.० सेमी) जाडीच्या तुकड्यांना लिंबाचा रस व मीठ लावून दहा मिनिटे ठेवा आणि नंतर आपल्याला आवडणारा कोणताही (आपल्या आवडीप्रमाणे) लसूण व हिरव्या मिरच्यांचा ठेचा लावून तो दहा मिनिटे तुकड्यांत मुरू द्या. आता, साध्या किंवा मायक्रोवेव्ह मध्ये "किंग फिश स्टेक" बनवा. हा माझा अत्यंत आवडता प्रकार ! ओव्हनमधून काढल्या काढल्या, गरम, रसदार आणि लुसलुशीत असतानाच तसाच किंवा स्पॅनिश राईसबरोबर गट्टम करावा ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2017 - 10:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कधी भेट बीट झाली तर बसू..... :)

-दिलीप बिरुटे

mayu4u's picture

27 Nov 2017 - 2:00 pm | mayu4u

करून बघतो.

शाकाहारी असून सुद्धा तोंडाला पाणी सुटले... :)

मोदक's picture

27 Nov 2017 - 8:13 pm | मोदक

सर्वांचे धन्यवाद.

म्हात्रे काका - मुद्दाम जाड काप करून घेतले होते. पण पुढच्या वेळी थोडी कापांची जाडी कमी ठेवेन.

इरसाल बुवा - हॅ हॅ हॅ..

प्राडॉ - कधी भेटूया..?

५० राव - सुकट सोबत आपले जमत नै.. :(

बाबा योगिराज's picture

29 Nov 2017 - 1:41 pm | बाबा योगिराज

मोदाक्रो तुम्ही सुद्धा?
फोटो तर भारी दिसतायेत. करून बघायला हवे.
पुढल्या भेटीत हा पदार्थ खाऊ घालण्याचा आग्रह करण्यात येईल याची नोंद घ्यावा.

आपला
बाबा योगीराज.

नूतन सावंत's picture

18 Dec 2017 - 10:53 pm | नूतन सावंत

कसा काय नजरेतून सुटला हा धागा,झकास,करून पाहीनच.एक्काकाकांचीही सुरमई स्टीक करून पाहीन.

खादाड's picture

4 Jan 2018 - 12:23 pm | खादाड

मस्त !!!

निश's picture

31 Jan 2018 - 11:06 am | निश

मस्त एकदम