मी माझ्या भटक्या मित्रांसोबत सकाळी ६ वाजता पुण्याहून देवकुंडच्या दिशेने निघालो. कात्रज, चांदणी चौक, मुळाशी मार्गे ताम्हिणी घाटातून नागमोडी वळणे घेत आम्ही भिरा ह्या बेसपॉईंटला ९ च्या सुमारास पोहचलो. तशी थंडी जास्त नव्हती पण भूक मात्र सपाटून लागली होती त्यामुळे पोटाची भूक शांत करून सोबत एक गाईड घेऊन डोळ्याची आणि मनाची भूक शांत करण्यासाठी आम्ही देवकुंडाच्या प्रवासासाठी निघालो. गेल्या काही काळात झालेल्या दुर्दैवी अपघातांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने सोबत गाईड घेऊन जाणे बंधनकारक केले आहे. जर तुमचा ग्रुप मोठा असेल तर प्रतिमानसी ५० रु देऊन अथवा दुसऱ्या ग्रुप मध्ये सामील होऊन तुम्ही जाऊ शकता.
प्रवेशनोंदणी केली की तुमची वाटचाल सुरु होते ती देवकुंडाच्या दिशेने. खरतर देवकुंड अतिशय सुंदर निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं मनाला शांती देणार रमणीय ठिकाण. ह्या वाटचालीमध्ये एकाबाजूने अथांग जलाशय, चहुबाजुंनी सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि गर्द झाडीने नटलेली वनराई तुम्हाला शेवटपर्यंत साथ देते. दोन तासांच्या निसर्गरम्य वाटचालीनंतर तुम्ही येऊन पोहचता ते थक्क करणाऱ्या देवकुंड धबधब्याजवळ. दोन विशाल महाकाय खडकांच्या ओंजळीतून मुक्तपणे वाहणारा जलप्रवाह एखाद्या नक्षीदार तबकाप्रमाणे दिसणाऱ्या त्या दगडांच्या मांडणीत अखंड कोसळत असतो. ते अप्रतिम निसर्ग सौन्दर्य बघून तुमचं तन आणि मन तर सुखावतच पण कुंडातील ते शीतल जल तुमचा उरलासुरला थकवा ही पळवून लावतं.
तिथल्या स्थानिक रहिवाश्यांच्या म्हणण्यानुसार देवकुंड म्हणजे ईश्वराचा वास असलेली पवित्र जागा. तो एक श्रद्धेचा भाग आहे. पण निसर्गाला देव मानून त्याचा आदर करून, त्याच्या नियमांना आव्हान न करता जेवढा निखळ आनंद घेता येईल तेवढा मनमुराद घ्या. निसर्गाने मनुष्याला भरभरून दिलं पण त्याची समाधानाची झोळी मात्र फाटकीच ठेवली......जी कधीच भरत नाही. फोटो हा आठवणींचा ठेवा असतो हे खरं पण तो ठेवा आठवणींच्या कुपीत भरून घेत असताना स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या. फोटो-सेल्फी जरूर घ्या पण त्यासाठी जीव धोक्यात घालू नका. नैसर्गिक शक्तीचा आदर करत सुरक्षित मौजमजा करा आणि हसत भरल्या मनानं देवकुंदाचा निरोप घ्या तो त्याला परत भेटण्यासाठी.
देवकुंडाची ही शब्दसफर इथेच थांबवत तुमचा तात्पुरता निरोप घेतो आणि परत लवकरच भेटू एका नव्या निसर्गरम्य ठिकाणांसोबत.
प्रतिक्रिया
20 Nov 2017 - 1:06 pm | श्रीधर
+1
20 Nov 2017 - 3:20 pm | कंजूस
भिरा इथला हा धबधबा आहे हे कळलं. पावसाळा संपल्यावरही असतो का?
20 Nov 2017 - 4:16 pm | GRavindra
हो असतो पण पावसाळ्यात तो जास्त मोठा असतो .....जर तुमच्या सोबत लहान मुलं असतील तर पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर चा काळ सर्वाधिक चांगला आहे.
20 Nov 2017 - 4:26 pm | सूड
फोटो कुठे आहेत ग्राविंद्रा?
21 Nov 2017 - 1:17 pm | GRavindra
देवकुंड विषयी आता पर्यंत जी माहिती आहे त्यामध्ये भीती आणि गैरसमजातून निर्माण झालेल्या बऱ्याच प्रतिक्रिया उपलब्ध होत्या पण एक निसर्गप्रेमी म्हणून मला असं वाटलं कि योग्य ती काळजी घेतली तर अपघात टाळता येऊ शकतात. ज्यांच्या सोबत असे दुर्दैवी अपघात झाले त्यांच्या विषयी दिलगिरी तर आहेच पण त्यासोबत ते परत होऊ नयेत त्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न.


21 Nov 2017 - 6:52 pm | सूड
अरे मी विचारलं काय, तुम्ही बोलताय काय!!
21 Nov 2017 - 7:57 am | आदित्य कोरडे
फोटो पायजेल न भाऊ ...
21 Nov 2017 - 1:11 pm | GRavindra
21 Nov 2017 - 1:12 pm | GRavindra
21 Nov 2017 - 1:13 pm | GRavindra
21 Nov 2017 - 7:06 pm | सतिश गावडे
या फोटोत वर कोणता गड आहे का?
21 Nov 2017 - 8:03 am | सतिश गावडे
भिरा माणगाव तालुक्याच्या एका कोपऱ्यात आहे त्यामुळे माझ्यासारख्या स्थानिकांनाही या ठिकानाबद्दल माहिती नाही.
भिरा गावापासून किती चालावे लागते? खुप चढ आहे का?
21 Nov 2017 - 10:01 am | GRavindra
साधारणतः दोन तास चालावे लागते पण बऱ्यापैकी वाट सपाट आहे फक्त शेवटीची एक १० ते १५ मिनिटे तुम्हाला एक चढण चालून उतरावे लागते.
21 Nov 2017 - 8:07 am | सतिश गावडे
21 Nov 2017 - 10:23 am | GRavindra