चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध
चारठाणा हे माझ्या सासुबाईचे माहेरगाव. म्हणजे त्या तिथे अगदी जन्मल्या किंवा लहानाच्या मोठ्या झाल्या नाहीत पण वडीलांचे मूळ गाव म्हणून जाणे येणे कायम होते, आजही आहे.काकांची शेतीभाती आहे, जुने घर आहे अगदी माळदाचे. माळद हा छप्पराचा एक प्रकार असतो मराठवाड्याच्या तुफान गरमीत माळदाचे घर म्हणजे एअर कंडीशंड... एवढेच नाहीतर ह्या माळदाच्या छतात दागिने, पैसे ते अगदी वेळ पडली तर हैद्राबाद मुक्ती संग्रामातले क्रांतिकारकही लपत. असे ते जाड भक्कम छत. पण ह्या माळदाच्या छतात सापही वस्तीला असतात त्यामुळे जेवताना झोपताना वरून साप अंगावर पडणे अगदी नित्याचे नसले तरी सवयीचे. (आपली तर हे ऐकून फाटली आणि आपली खाट आपण बाहेर अंगणात लावली. जन्म काढला तरी मला अंगावर वरून साप पडण्याची सवय होणार नाही... असो.)
तसे पाहू जाता चारठाणा हे परभणी जिल्ह्यातले एक अगदी साधे से खेडेगाव. पण इथे असलेल्या पुरातन मंदिरांच्या आणि भाग्नावाशेषांच्या ठेव्यामुळे ते अनेक इतिहासतज्ञाना आणि पुरातन वास्तू प्रेमीना माहिती असते. तरीही ते इतके काही प्रसिद्ध नाही.( ते एका अर्थी बरेच आहे म्हणा अन्यथा ह्या गावाताली शांतता बिघडायची आणि फक्त काळाचेच घाव सोसत आलेला हा ठेवा पर्यटकांच्या उत्पाताने नष्ट व्हायचा.)
चारठाण्याचे मूळ नाव चारूक्षेत्र. चारू म्हणजे सुंदर. हा परिसर तसा रखरखीतच पण डिसेंबर- जानेवारी महिन्यात मात्र हवामान आल्हादकारक असल्याने मलातरी सुंदर भासला आणि त्याकाळी तरी नक्कीच सुंदर असणार. हा सगळा भाग राष्ट्राकुटान्च्या अंमलाखाली येत असे (इसविसनाचे ६वे ते ९वे शतक)राष्ट्रकुट सम्राट अमोघवर्ष्र. ह्याची आई चारुगात्रीदेवी ही मोठी शिवभक्त होती. तिने म्हणे ह्याभागात एक सहस्त्र शिवमंदीर उभारण्याचा संकल्प सोडला होता (हे तिचे जन्म गाव असावे किंवा इथे काही शुभ घटना घडली असावी)तिची ही इच्छ राजाने पूर्ण केली. आणि खरोखरच ह्यागावात जवळपास ३६० लहान मोठी शिव मंदिरे आहेत.बरीच जमिनीखाली गाडली गेलेली आहेत. १९९३ च्या भूकंपानंतर इथल्या अनेक मंदिरांची बरीच नासधूस झाली आहे पण नवीन बरीच मंदिरे सापडलीही आहेत. अजूनही सापडतात अक्षरश: लोकांच्या घरात, अंगणात शेतात सापडतात. भारतीय पुरातत्व खाते जप्त करेल, घेऊन जाईल, जागा बळकावेल अशा भीतीने लोक सांगत नाहीत किंवा सापडलेली शिवलिंग, मुर्त्या बाहेर काढून ठेवतात. अशी मूळ जागा सोडलेली, रस्त्याच्या कडेला, झाडाखाली, वळचणीला पडलेली शिल्प गावात जागोजागी खूप दिसतात ...असो
गावात( आणि इतिहास प्रेमींमध्ये ) सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे दीपमाळ किंवा विजयस्तंभ.हा जवळ पास ४५ फुट उंच आहे. गावकरी जरी ह्याला दीपमाळ म्हणत असले तरी हा दीपमाळ वाटत नाही शिवाय आजूबाजूला तेवढे मोठे मंदीर किंवा त्याचे भग्नावशेषही नाहीत. आश्चर्य म्हणजे हा अख्खाच्या अख्खा उभा मातीखाली गाडला गेलेला होता. आमच्या सासुबाइन्च्या काकांनी- भाऊ काकानी ( माझे चुलत आजे सासरे- वय वर्षे ८५ )सांगितल्याप्रमाणे मुसलमान आक्रमकांपासून रक्षण करण्यासाठी तो लोकांनीच माती खाली गाडला. तसेच इतर आणखी ही काही मंदीरेही मातीखाली गाडली.
हा इतका उंच,सुंदर, आणि भव्य आहे कि ह्याच्याकडे कितीहीवेळ बघत राहिले तरी मन भरत नाही पण वर बघून बघून मान मात्र चांगलीच दुखून येते. हा बऱ्याच चांगल्या स्थितीत टिकून आहे त्यामुळे तत्कालीन कला आणि नक्शीकामातले ट्रेंड्स कळून येतात. वेरूळचे कैलास लेणे हे हि राष्ट्राकुटानीच बांधले( मी चूक असल्यास जाणकारांनी चूक सांगावी )पण तिथले विजय स्तंभ आणि हा विजय स्तंभ ह्यात फरक जाणवतो.
ह्या स्तंभाच्या आसपासचा परिसर मात्र अत्यंत बकाल आहे, झाड झुडप,चिखल, खड्डे त्यात लोळणारी डुकरं, गाई बैलांच्या आणि कुत्र्यांच्या विष्ठा इतस्तत:विखुरलेल्या, त्यांचा उग्र दर्प ह्यामुळे तिथे जाणे अवघड होऊन बसते.
स्त्म्भाच्या वरच्या बाजूला असलेले हे रुद्राक्ष आणि घंटाची नक्षी अत्यंत अप्रतीम आणि नाजूक आहे. ४० फुटावरून ती नुसती लटकवलेली दिसते. मागची दगडी कॉलर दिसतच नाही. फोटो झूम करून पाहिल्यावर ही पातळ दगडी कॉलर दिसते.अत्यंत पातळ आणि परफेक्ट वर्तुळाकार आहे ही.
तिथेच बाजूला पडलेला कोरीव काम केलेला दगड...
ह्या विजय स्तंभाच्या जवळच उकंडेश्वर महादेवाचे मंदीर आहे. भीती वाटावी असे तडे आणि भेगा गेल्यात. हे सगळे नष्ट व्हायच्या बेतात आहे
मन्दीराबाहेरच्या सप्त मातृका,ह्यांनाच सात आसऱ्या म्हणतात. सर्वसाधारणत: सप्त मातृकांबरोबर गणेशही असतो पण इथे नाही दिसला.
सासरेबुवांच्या घराबाहेर कडूनिम्बाच्या झाडावर करकोच्यानी केलेलं घरटे. करकोचे माणसाच्या वस्तीच्या इतके जवळ घरटे करून राहतात हे माहितीच नव्हते.
रस्त्याच्या बाजूला अशी भग्न शिल्प पडलेली दिसतात
उकंडेश्वर महादेवापासून काही अंतरावर असलेले रेणुका देवीचे मंदीर, हिला खुराची देवी असेही म्हणतात. का? ते पुढे कळेल
हे अख्खे मंदीर मातीखाली गाडलेले होते. वरचे मातीचे ढेकूळ अजुनही तसेच आहे. खाली रेणुका देवी ची मूर्ती
स्पष्ट सांगायचे तर मला वाटते ही मूर्ती नंतर इथे बसवली गेली आहे. मूळ मूर्ती मंदीर मातीखाली झाकताना मुसलमानी आक्रमकांपासून वाचवण्यासाठी हलवली असावी, पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणे, पण परत आणलीच गेली नाही किंवा सगळा प्रकार विस्मृतीत गेला असावा.
मंदिराचे छत
गाईच्या खुरांसाराखा आकार बघितलात म्हणून ही खुराची देवी. ह्यात जी खुर उभारून आलेली दिसताहेत ती प्रत्यक्षात खुराच्या आकाराचे खड्डे आहेत. पूर्ण छताचा फोटो टाकला तर दृष्टीभ्रम कसा होतो ते कळेल. हे असे मला इतर कुठे ही आढळले नाही
जबरदस्त दृष्टीभ्रम होतो कि नाही! छताला तडे गेलेत त्यामुळे खाली उभे रहायला भीतीच वाटते .
ह्या मंदिराला अगदी जोडून असलेले जोड महादेव मंदीर ( म्हणून बहुधा जोड महादेव)
सर्वसाधारण पणे पिंडीची साळून्खा मंदिरातील प्रवेशाच्या बाजूने पहिली तर उजवीकडे असते ही डाव्या बाजूला आहे. की मी चूक आहे? जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
जोड महादेव मंदिरातले छत – जीर्ण अवस्था
गावाबाहेर असलेल्या गोकुळेश्वर मंदिराकडे जाताना ही वस्तू लागते. हे मंदीर नाही पण बहुधा जुन्या मंदिराच्या तटाचा भाग असावा.दाराला कडी कुलूप आहे पण पलीकडे काहीच नाही
आणि हे नक्की काय होते कुणास ठावूक बहुधा जुनी दीपमाळ असावी.
ह्या अशा मुर्त्या/ कोरीव खांब जागोजागी पडलेलेआढळतात
गोकुलेश्वर मंदिराबाहेर अशा भग्न मुर्त्या लोकांनीच आणून ठेवल्या आहेत. त्या अत्यंत हलाखीत आणि दुर्लक्षित अवस्थेत आहेत. हा अनमोल ठेवा नष्ट होईल किंवा चोरी होईल.
गोकुळेश्वर मान्दिराबाहेरची पुष्करणी – अत्यंत सुंदर
पुष्कारणीतले कोरीव काम
ही एवढी पाण्याने भरलेली नसते पण यंदा पाउस तुफान झाला. नेट वरून मिळालेला जुना कमी पाण्यातला फोटो खाली टाकत आहे. पाणी खूप असल्याने आत जाता नाही आले. पुढच्या वेळी जाईन
नदीकाठचे महांकाळेश्वर (शनी) मंदीर
शनी मंदीर म्हणून बाहेर हनुमान असावा पण हा हनुमानही नाही. ही मर्कट शिल्प आहेत. अशीच हम्पीला पहिली होती.
शनी महाराज! ( मूर्ती नक्कीच नवीन आहे ) ही बाहेर ठेवली आहे आत पिंड आहे.
विष्णू मंदिरात यज्ञ वराह असतो पण हा मात्र मूषक आहे. कानावरून तसे वाटते. जाणकारांनी सांगावे
भाऊ काकांच्या शेतात सापडलेले शिव मंदीर. हे त्यानी झाकून लपवून ठेवले आहे (म्हणजे होते.)
हे विटांचे बांधकाम त्यांनीच केले दिवाबत्ती ही करतात.
मंदिराचे जोते
वापरात असलेल्या बर्याप शिल्पाना शेंदूर आहे.शेंदाराने ओबड धोबड मुर्त्या सुंदर दिसतात पण ज्या मुर्त्या सुबक सुंदर आहेत त्यांचा सुबकपणा मात्र कमी दिसतो.कदाचित शेंदराने मूर्त्यांच्या नाजूक नक्षी चे काहीप्रमाणात संरक्षणही होत असावे .
भारतीय पुरातत्व खात्याने असे जागोजाग फलक लावणे आणि काही ठिकाणी मान्दिराला आणि देवाला ओबड धोबड दिसणारे लोखंडी दरवाजे लावून कुलूप घालण्यापलीकडे जास्त काही केलेलं नाही.
गावकरी त्यांच्या पद्धतीने हा ठेवा जतन करतात पण त्यांच्याकडे शास्त्र शुद्ध ज्ञान नाही आणि इतर व्यवधानं आहेतच. एकंदरीत हा ठेवा धोक्यात आहे.एका छोट्याश्या खेड्याच्या आजूबाजूला इतके प्रचंड शिल्प वैभव आहे आणि अगदी आजूबाजूला हो कुठे मोठा डोंगर चढून जायचे नाही कि गुहा धुंडाळायच्या नाहीत. अगदी just around the corner असे ही वैभव पडून आहे . एक दोन दिवसाच्या भेटीत पाहून होणे शक्यच नाही. कमीतकमी आठवडा तरी नक्की लागेल.
पुण्याहून जाण्याचा रस्ता( साधारण ३८०-४०० किमी)
गावात रहायची काहीही सोय नाही.
पुणे- अहमदनगर-औरंगाबाद-जालना- मंठा- चारठाणा ( हमरस्त्यावर चारठाणाकडे जाणारा फाटा फुटतो. तिथे कमान आहे.)
आदित्य
प्रतिक्रिया
19 Nov 2017 - 9:01 am | एस
किती दुर्लक्षित शिल्पवैभव पडून आहे इथे! वाईट वाटले पाहून. तो स्तंभ अतिशय आवडला. किती प्रमाणबद्ध कोरीव काम आहे. त्या अनाम कारागिरांना सलाम! हा लेख लिहून अशा एका अनवट जागेची ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप आभार.
नाऊ कॉलिंग प्रचेतस. :-)
19 Nov 2017 - 5:07 pm | निशाचर
स्तंभ, पुष्करणी, देवळांचे अवशेष सगळंच सुंदर आहे. फोटो पाहून पट्टदकलची देवळे आठवली. अश्या ठेव्याबद्दल असलेली अनास्था पाहून वाईट वाटतं.
लेखासाठी आदित्य कोरडे यांचे आभार मानायलाच हवेत.
19 Nov 2017 - 11:19 am | कंजूस
अप्रतिम!!
लेख आणि भरपूर फोटोंबद्दल धन्यवाद. सर्वच ठिकाणी काही जाणे शक्य नसतं अशावेळी फोटोच उपयोगी पडतात. इथे ड्रोन फोटोग्राफी वापरायला हवी कुणीतरी.
19 Nov 2017 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर माहिती आणि फोटो. स्तंभ खास आवडला ! गतवैभवाचा असा किती साठा कुठे कुठे पडून आहे, कोणास ठाऊक ? :(
20 Nov 2017 - 11:24 am | दुर्गविहारी
अत्यंत उत्कृष्ट लेख !!! इतक्या अनवट आणि अज्ञात ठिकाणाची ओळख करुन दिल्याबध्दल आभार. तसेही तुमचे प्रत्येक धागे उत्कृष्ट असतात. सध्या मि.पावर असणार्या दर्जेदार लेखकांपैकी तुम्ही एक आहात.
आता धाग्याविषयी. आर्किऑलॉजी खात्याकडे कारभार सोपवल्यानंतर या मंदिराच्या बाबतीत सकारात्मक काही होईल असे वाटत नाही. मुळात मराठवाडा औरंगाबाद सोडला तर पर्यटन दृष्ट्या मागासलेला आहे. आवर्जुन या परिसरात कोणी जात नाही. अपवाद फक्त औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई यांचाच. ईतका मोठा मंदिर समुह असताना यांची काहीच माहिती असू नये हे खेदजनक आहे. वास्तविक दक्षिणेकडच्या राज्यात जरी हे ठिकाण असते तरी याचा बराच विकास होउ शकला असता.
पहिला स्तंभ हा किर्ती स्तंभ असावा असे वाटते आहे. असाच स्तंभ मी सज्जनगडाजवळच्या शिवमंदिरात पाहिला आहे. बाकीच्या फोटोतील मंदिरे अप्रतिम आहेत. यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. तुम्ही जे उंदराचे शिल्प दाखविले आहे ते यज्ञवराह असेल असा अंदाज आहे. अर्थात प्रत्यक्ष पाहिले पाहिजे. असेच यज्ञवराह मोरगावजवळच्या लोणी-भापकर व चाकणच्या किल्ल्याजवळ आहे.
खुराच्या देवीच्या मंदिरावरचा तो मातीचा ढीग तातडीने हलविणे गरजेचे आहे, अन्यथा मंदिराला नुकसानच होईल. मंदिरातील देवीची मुर्ती मुळ मुर्ती नक्कीच नसावी.अर्थात या परिसरात बहामनी कालखंडापासून आक्रमणे होत असल्याने मुळ मुर्ती कोठे असेल हे सांगणे कठीण आहे. छतावरवे खुरासारखे नक्षीकाम नक्कीच अनोखे आहे, अक्षी नक्षी पहाण्यात नाही. सध्याची देवीची मुर्ती कदाचित माहुरच्या रेणुकेपासून स्फुर्ती घेउन तयार केली असावी.
तुम्ही दिपमाळ म्हणून जो फोटो दिला आहे, तो एखाद्या बुरुजासारखा वाटतो आहे. इतके मंदिर वैभव असणार्या गावाभोवती काहीतरी संरक्षक तटबंदी असावी असे वाटते ( जशी गोंदेश्वर व एश्वर्येश्वर हि मंदिरे असणार्या सिन्नर शहराभोवती होती).
पुरातत्व खात्याने दम देणारी निळी पाटी लावण्याचे सोडले तर दुसरे काही केलेले दिसत नाही, अर्थात त्यांच्याकडून अपेक्षाही नाही, म्हणूनच राज्यातले किल्ले त्यांच्या ताब्यातून काढून घेण्याची वेळ आली.
तुमच्या धाग्यावरून अजून बरेच प्राचीन शिल्प वैभव आजुबाजुला असणार, त्याचा शोध घ्यायला हवा. बाकी मंदिराविषयी वल्लीदा सविस्तर लिहितीलच या अपेक्षेने थांबतो.
बाकी काही सुचना, धाग्यात काही शुध्दलेखनाच्या चुका आहेत, त्या दुरुस्त व्हाव्यात. शिवाय चारठाण या गावी जाण्यासाठी बसची सोय नेमकी कशी आहे? जवळ रहाण्याची सोय काय होउ शकते ? ( छतावरून साप पडताहेत म्हणल्यावर गावात रहायची भिती वाटती आहे. ;-) ) मंठा गावात मुक्काम करणे सोयीचे होईल कि जालन्यालाच रहावे लागेल ?चारठाण गावात या सर्व ठिकांणाची माहिती देणारे कोणी आहे का ? त्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध होईल का?
तुमच्या धाग्यानंतर या ठिकाणाला भेट देण्याची उत्सुकता वाढली आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतुरजवळचा नेमीनाथगड व परळी जवलचा धर्मापुरीचा भुईकोट आणि तेथील मंदिरे ईतकेच पहायचे राहिले आहे. आता मराठवाड्यातील किल्ल्यावर लिहीणार आहेच, त्यापुर्वी शक्य झाल्यास वरील ठिकाणे पहायची आहेत. जमल्यास चारठाणलाही भेट देता येईल. तेव्हा शक्य झाल्यास वरील माहिती धाग्यातच टाकता येती का ते पहा.
अप्रतिम धागा. पु.ले.शु.
21 Nov 2017 - 6:56 am | आदित्य कोरडे
नमस्कार,
आपला विस्तृत प्रतिसाद वाचून खूप आनंद वाटला. असे प्रतिसाद उत्साहवर्धक असतात. धन्यवाद
आपण सांगितल्या प्रमाणे तो यज्ञ वराहच असावा पण कानाच्या आणि डोक्याच्या एकंदरीत आकारावरून मला उंदीर वाटला म्हणून मी ही तशीच शंका उपस्थित केली आहे.
मला जी जुनी दीपमाल वाटली ती एखाद्या तटाचा/ कोटाचा किंवा बुरुजाचा भागही असू शकते किंवा त्यात देखील एखादे शिल्प दडवलेले असू शकते. कुणी सांगावे!
बसची सोय म्हणाल तर नांदेडला जाणारी प्रत्येक लाल एस टी तिथे फाट्याजवळ थांबते. आत मात्र बस जात नाही. गावात जीप सुमो वगैरे आहेत ते ही सोय करतात.आपण आपली गाडी घेऊन जाणे सगळ्यात उत्तम रस्ते बरे आहेत पण राहण्याची मात्र काही सोय नाही. उत्तम उपाय म्हणजे मंठा किंवा जिंतूर ला मुक्काम करून तिथून ये जा करणे बरे. खाण्याचे म्हणाल तर टपरी वजा हॉटेल्स आहेत गावात. बाटली बंद पाणी ही मिळते पण जास्त करून सगळे लोकल ब्रान्ड असतात.
गावात दीप माळ बघायची आहे , उकंडेश्वर मंदीर बघायचे आहे , पुष्करणी बघायची आहे म्हटले तर कुणीही रस्ता दाखवते.माहिती ही देते.गावातले लोक सौजन्यशीलच आहेत.फारसा गजबजाट नसल्याने शांतपणे मंदीर बघणे फोटो काढणे. करता येते.पायपीट खूप करावी लागते. जुने नवे अशी दोन गावे आहेत. नदीच्या अलीकडे आणि पलीकडे. सध्या हवामान चांगले आहे बघायला जायला. उन्हाळ्यात फार त्रास होतो.
20 Nov 2017 - 4:24 pm | कपिलमुनी
पु.ले.शु.
21 Nov 2017 - 12:25 am | SHASHANKPARAB
खुरांसारखे असेच नक्षीकाम खिद्रापूर येथील शिवमंदिरात देखील आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारात जो मंडप आहे तिथल्या प्रसिद्ध वर्तुळाकार कोरीव कामाचा एक भाग म्हणून अशीच खुरांची नक्षी दिसते..
21 Nov 2017 - 8:53 am | प्रचेतस
चारठाण्याचं शिल्पवैभव जबरदस्तच आहे. तिथे कधी जाणं होईल कुणास ठाउक.
दुर्गविहारींचा प्रतिसाद माहितीपूर्ण.
पहिला स्तंभ हा किर्तीस्तंभ किंवा विजयस्तंभच. असे एकूटवाण्या स्तंभांची (ओबेलिस्क) परंपरा फार प्राचीन आहे. अगदी इजिप्तच्या प्राचीन मंदिरांतही ते दिसतात. असेच स्तंभ महाराष्ट्रात सज्जनगड, पैठण, मस्तानीचे पाबळ ह्या ठिकाणी आहेत.
मस्तानीचे पाबळ येथील किर्तीस्तंभ
मंदिरातली मुर्ती यज्ञवराहाचीच आहे. त्याच्या झुलीवर लहान लहान विष्णूमुर्ती कोरल्या आहेत. चाकण, लोणी भापकर ह्याव्यतिरिक्त रांजणगवाजवळील पिंपरी दुमाला येथील मंदिरातही एक भग्न यज्ञवराह आहे.
दिपमाळ नसून हे दुर्गविहारी म्हणतात तसे बुरुजवजा बांधकाम असावे. कदाचित पाणी शेंदायची मोटही असावी. अशीच पाण्याची एक मोट बहादुरगडात आहे.
बहादूरगडातली पाण्याची मोट
शाळुंखा सर्वसाधारणपणे उजवीकडेच असते. पण काही ठिकाणी त्या शाळुंखा डावीकडेही असतात. पाटेश्वर येथील बहुतेक शाळुंखा ह्या अशाच डाव्या बाजूस आहेत. त्या बहुधा शाक्त पंथीयांच्या असाव्यात.
25 Nov 2017 - 8:05 am | आदित्य कोरडे
नमस्कार , आपण म्हणता ते बरोबर आहे. चिंचवड येथील प्रसिद्ध आणि पुरातन धनेश्वर महादेवाचे मंदीर असेच आहे तेथे पूर्वी स्मशान होते आता ते जरा लांब हलवले गेले आहे. त्यामुळे ती देखील शकत पंथीयाचे उपासना स्थळ असू शकते . नवीन माहिती बद्दल धन्यवाद. ह्याबद्दल तेथील स्थानिक जाणकार सहकार्याने सांगितलेली माहिती अशी कि साधारणपणे मंदीर पूर्वाभिमुख असते आणि साळून्खा उत्तराभिमुख त्यामुळे ती उजव्या अबजुला दिसते पण शाक्त पंथीयांची साळून्खा मात्र दक्षिणेला असते त्यामुळे ती डावीकडे दिसते....
23 Nov 2017 - 11:12 am | नाखु
या जागी जाऊ शकत नाही, काय पहातोय ते समजलं तर त्याचा आनंद आणि द्विगुणित होतो
नाखु
23 Nov 2017 - 1:29 pm | जयंत कुलकर्णी
दोन वर्षांपूर्वी मराठवाड्यात हिंडलो होतो त्यातील काही फोटो येथे टाकत आहे. अर्थात श्री कोरडे यांची परवानगी गृहीत धरली आहे. नसल्यास क्षमस्व.
मला वाटते या प्रकारच्या छताला गंडस्थळ रचना असे म्हणतात. हत्तीच्या गंडस्थळासारखे दिसतात म्हणून. पण एका तज्ञाला विचारुन खात्री करुन घेतो. :-)
23 Nov 2017 - 1:31 pm | जयंत कुलकर्णी
रेणूका माता
ही मूर्ती मला फार आवडली. तेथे गाभार्यात फारच गुढ भासली मला.
25 Nov 2017 - 8:07 am | आदित्य कोरडे
बस का सर ! परवानगी कसली ... तुंचा प्रतिसाद हाच आमचा पुरस्कार ....ह्या फोटोत पण दृष्टीभ्रम जबरदस्त होतो ....
23 Nov 2017 - 1:35 pm | जयंत कुलकर्णी
चारठाण्यात काढलेला माझा एक आवडता फोटो.
रस्टी क्वीन..
25 Nov 2017 - 8:08 am | आदित्य कोरडे
सुंदर ..आता नाहीये ती गाडी तिथे ....
25 Nov 2017 - 11:05 am | पैसा
फारच सुंदर!
3 Aug 2018 - 3:50 pm | विराग
चारठाण्या बद्दल माझा ब्लॉग
https://madhyalok.wordpress.com/2016/12/20/charthana-city-of-360-temples/