आनंददायी इहलोक: यनावाला
प्रश्न:- प्रत्येक जीवा एक जन्म । जो प्रथम तोचि अंतिम ।
नाही कोणाही पुनर्जन्म । ऐसा तुमचा विचार ॥१॥
सत्य जर तो मानियेला । अल्पसा काळ आयुष्याला ।
मग आनंद तो कसला। क्षणभंगुर जीवनी ? ॥२॥
ईश्वरे घातले जन्मासी । कांही हेतू असेल त्यासी ।
एका जन्मी पूर्तता कैसी । होईल दैवी हेतूची ?॥३॥
इहलोक हा दु:खमय । प्रत्येकासी मरणभय ।
येथे मुक्ततेचा उपाय । जनसामान्यां कोणता ? ॥४ ॥
उत्तर :-- मानवा देव जन्म देई । सत्य न मुळी यात काही ।
जनुक सातत्य राखणे ही । निसर्गऊर्मी जीवांची ॥५॥
निसर्गप्रेरणे कारणे । नर-मादींना अपत्ये होणे ।
घडे न कोणत्या हेतूने । संबंध नसे देवाचा ॥६॥
माता-पित्यांना होई सुख । जन्मकारण हेचि एक ।
उद्दिष्ट नसते कारक । कोणाच्याही जन्माचे ॥७॥
असो इहलोक कैसाही । परलोका अस्तित्व नाही ।
स्वर्गलोकाची कल्पनाही । भ्रामक आहे निश्चित ॥८ ॥
प्रश्न:-- कोsहं ? कोण मी ? पडे प्रश्न । कोणत्या कार्यार्थ जीवन ? ।
मृत्यूनंतर कोठे गमन ?। नकळे माझे होईल ॥९॥
ऐसे प्रश्न मानवा पडती । आध्यात्मिक गुरू सांगती ।
"मोक्ष असे परमगती । जन्मा आलिया जीवाची ॥१०॥
यास्तव अध्यात्म जाणावे । गुरु चरणी लीन व्हावे ।
जीव मोक्षपद तेणे पावे । चुकती फेरे जन्माचे "॥११॥
अध्यात्मज्ञान ब्रह्मज्ञान । प्राप्तकरण्या एक जीवन ।
अपुरे निश्चित म्हणोन । पुनर्जन्म आवश्यक ॥१२ ॥
उत्तर :-- भासती प्रश्न गूढ गंभीर । आध्यात्मिकांसी निरंतर ।
थोडा विचार केला तर । सारे प्रश्न फुटकळ ॥१३॥
उत्तर कोण मी? प्रश्नाचे । आधारकार्डीं असे साचे ।
ते जाणावे नाव तुमचे । सत्य उत्तर निश्चये ॥१४॥
कांही नसते विधिलिखित । जीवनकार्य न नियत ।
व्यक्ती निवडतात । कार्यक्षेत्र आपापले ॥१५॥
जाणोनि आपुली क्षमता । स्वयंमर्यादा आकळता ।
कार्यक्षेत्र ये निवडता । उपलब्धता देखोनी ॥१६॥
मृतदेह स्मशानी नेती । दहन वा दफन करिती ।
धर्मपरत्वे रक्षा, माती । उरती अस्थी केवळ ॥१७॥
अपरिहार्य असे मरण । पुनर्जन्मा न येई कोण ।
निश्चित हे, परी जीवन । क्षणभंगुर नव्हे हे ॥१८॥
सत्य नसे मोक्षकल्पना । आधार ना अध्यात्मज्ञाना ।
अध्यात्मगुरूंच्या वल्गना । फुलोरे केवळ शब्दांचे ॥१९॥
वरुषें पाउणशें आयुर्मान । लाभते सर्व साधारण ।
पंधरा वर्षे बालपण । साठ वर्षे काळ उरे ॥२०॥
नसे लहान कालखंड । सुख उपभोगा उदंड ।
कित्येक करिती प्रचंड । कार्य आपुल्या जीवनी॥२१॥
सामान्यजन जीवनात । आहे तैशा परिस्थितीत ।
सुख:दु:खे भोगतात । परिवाराच्या साथीने ॥ २२॥
माता, पिता, भाऊ, बहिणी । आप्तजन मित्र-मैत्रिणी ।
आनंदाने सारे मिळुनी । सण-सोहळे साजरे ॥२३॥
मुले लेकरे संसारात । धकाधकी ही आयुष्यात ।
जरी असली जगण्यात । जीवन असते मौजेचे ॥२४॥
वृत्तपत्र सकाळी नवे । उत्सुकतेने वाचन हवे ।
नाटक चित्रपट पाहावे । जावे संगीत कार्यक्रमा ॥२५॥
वार्ता-चर्चा-मालिका रोज । मनोरंजना टी.व्ही.सज्ज ।
कार्यालयीन कामकाज । त्यातही असे आनंद ॥२६॥
वाचावे ग्रंथ ज्ञानवर्धक । दृष्टी असावी वैज्ञानिक ।
खरेदी, सांसारिक कामे । मित्रां भेटणे नित्य नेमे ।
ऐशा कारणे मन रमे । चिंता, खंती नाठवती ॥२८॥
आपुली आवड जाणोनी । आर्थिक क्षमता समजोनी ।
कर्तव्यकर्मे न विसरोनी । शक्य आनंद जीवनीं॥२९॥
किंबहुना कर्तव्यपालन । हे समाधानाचे निधान ।
राहे सुखी, आनंदी मन । स्वकर्तव्ये आचरिता ॥३०॥
जीवनी समस्या अनेक । उद्भवणे हे साहजिक ।
दु:खद क्षण प्रासंगिक । येणार ऐसे निश्चित ॥३१॥
दैवी उपाय काही नसे । धूर्त गुरूंना मूर्ख फसे ।
वाया जाती आपुले पैसे । स्वकष्टार्जित कमाई ॥३२॥
संकटांना सामोरे जाणे । अटळ असे ते सोसणे ।
विचारे समस्या निवारणे । साथ पाहिजे आप्तांची ॥३३॥
स्वर्ग, वैकुंठ, परलोक । अस्तित्वहीन काल्पनिक ।
एकची सत्य इहलोक । सूर्यमालेत पृथ्वी ही ॥३४॥
सुख-दु:खाचा ताळेबंद । जीवनी मांडता सबंध ।
निश्चित उरतो आनंद । इहलोकीं असेचि तो ॥३५॥
सत्य मानोनी आत्मा, मोक्ष । शाश्वत आनंद हे लक्ष्य ।
ठेविल्या जीवन प्रत्यक्ष । दु:खी होणे क्रमप्राप्त ॥३६॥
प्रतिक्रिया
17 Nov 2017 - 9:28 pm | गॅरी ट्रुमन
नाही कोणाही पुनर्जन्म हे छातीठोकपणे कसे म्हणता बुवा? फार तर पुनर्जन्म आहे याचा पुरावा नाही किंवा जो काही पुरावा इतरांनी मांडला आहे तो तुम्हाला मान्य नाही असे म्हणा.
पुनर्जन्म नाही याचा पुरावा मागणे/देणे आणि एखाद्या माणसाचा गुन्ह्यात हात नाही याचा पुरावा मागणे/देणे यात फार फरक नाही. एखाद्या माणसाचा गुन्ह्यात हात आहे याचा पुरावा नाही हे म्हणणे ठिक आहे. पण त्याचा गुन्ह्यात हात नाही याचा पुरावा कसा काय द्यायचा बुवा? तीच गोष्ट पुनर्जन्माविषयी.
बाकी चालू द्या.
17 Nov 2017 - 11:55 pm | सुबोध खरे
हे काथ्याकूट ऐवजी कविता सदरात टाकले असते तर न वाचताच फाट्यावर मारता आले असते.
19 Nov 2017 - 7:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्याला काय त्यांनी माझं लेखन वाचाच न गडे असा व्य. नि. टाकला होता काय ?
-दिलीप बिरुटे
19 Nov 2017 - 8:30 pm | सुबोध खरे
प्रा डॉ
ते काव्य आहे लेख नाहीये
आम्ही कवितांच्या नादाला लागत नाही
19 Nov 2017 - 11:05 pm | चामुंडराय
काय हे खरे काका !
अहो सगळ्या मिपा-कवींचा प्रतिसादांचा धडक मोर्चा तुमच्या खरड वहीवर येईल बर्र्का असे काही म्हटलं तर.
एक कवी कोटी कवी !!
20 Nov 2017 - 11:24 pm | सुबोध खरे
आमची समज थोडी कमीच आहे त्यामुळे आम्हाला सरळ असलेला अर्थ तेवढा समजतो. कवितेत आम्हाला समजलेला अर्थ कवी ला अभिप्रेतच नसतो बऱ्याच वेळेस.
त्यामुळे आम्ही गदिमा शांता बाई आणि मंगेश पाडगावकर यांच्यापालिकडे जातच नाही.
मिपा वरही काव्य या प्रकाराकडे पाहत नाही.
उगाच कळत नाही त्यात नाक खुपसायला आम्ही काय "ते हे"नाही.
18 Nov 2017 - 12:23 am | arunjoshi123
यनावाला, तुमचा जिनोम कोड कितीही किचकट असला तरी तो रिपीट व्हायची शक्यता आहेच हो. असलं गैरवैज्ञानिक बोलत नका जाऊ. कदाचित गेल्या २२ लाख वर्षांत ज्या लाखो टोळ्या होऊन गेल्या, त्यात एक यनावाला होऊनही गेला असेल.
18 Nov 2017 - 12:25 am | arunjoshi123
निसर्गात जनुकसातत्य आहे, अश्मसातत्य का नाही म्हणे?
18 Nov 2017 - 12:27 am | arunjoshi123
बॅक्टेरियांना सुख झाल्याची कथा वाचली नाही.
18 Nov 2017 - 12:28 am | arunjoshi123
पृथ्विवर परग्रहावरून जीवन आले आहे ही एक अधिकृत उत्क्रांतीची थेरी आहे.
18 Nov 2017 - 12:32 am | arunjoshi123
मी आत्ताच माझ्या स्पिकरवर "य ना वालावलकर" असा स्टिकर चिटकावला.
---------------
अहो, नाव ही एक अबस्ट्रॅक्ट संकल्पना आहे. ते कसं एका सत्याचं स्वरुप असेल?
18 Nov 2017 - 12:34 am | arunjoshi123
जसे, बिनधास्त पाप करणे.
18 Nov 2017 - 12:36 am | arunjoshi123
व्यक्तींची वर्तने का भिन्न असतात? जनुकांमुळे? मग जनुके बदलून द्यावीत, तुरुंगात का टाकावे?
18 Nov 2017 - 12:39 am | arunjoshi123
विज्ञानात जीवन नावाची कोनतीही संकल्पना नाही. फक्त रासायनिक, भौतिक, आण्विक, इ इ प्रक्रिया आहेत.
त्यामुळे पुर्न काय, पहिला जन्म देखील नसतो.
18 Nov 2017 - 12:41 am | arunjoshi123
सण? डुलकी लागली होती का लिहिताना?
18 Nov 2017 - 12:44 am | arunjoshi123
साधा तुम्हाला प्रश्न करणाराविरुद्ध तुम्ही जो डुख धरता, त्याचे मानसिक स्वास्थ्य काढता नास्तिकतेचा तुमच्या व्यक्तिशः उलट परिणाम झालेला दिसतो. तीच अवस्था सर्व नास्तिकांची दिसते.
18 Nov 2017 - 12:48 am | arunjoshi123
चरण कुठे आहेत?
18 Nov 2017 - 5:35 am | चौकटराजा
नेव्हर एक्सप्लेन युवर फ्रेन्ड्स डोन्ट नीड अॅन्ड एनीमीज वोन्ट बिलिव्ह !असे सत्य शोधनातही असते. माणूस संवेदनाक्षम वयात जे भले वाईट कानावर घेतो डोळ्याने पहातो. ते नंतर बदलत नाही. कोणत्याही भल्या वाईट अनुभवा॑चे आपल्या सम॑जुतीने परीशीलन करण्याची मनाला संवय लागते ती कायमची. अपवाद क्व॑चित.
18 Nov 2017 - 6:07 am | Duishen
रचना आणि विचार दोन्ही आवडले!
मानवा देव जन्म देई । सत्य न मुळी यात काही ।
जनुक सातत्य राखणे ही । निसर्गऊर्मी जीवांची ॥५॥
निसर्गप्रेरणे कारणे । नर-मादींना अपत्ये होणे ।
घडे न कोणत्या हेतूने । संबंध नसे देवाचा ॥६॥
माता-पित्यांना होई सुख । जन्मकारण हेचि एक ।
उद्दिष्ट नसते कारक । कोणाच्याही जन्माचे ॥७॥
असो इहलोक कैसाही । परलोका अस्तित्व नाही ।
स्वर्गलोकाची कल्पनाही । भ्रामक आहे निश्चित ॥८ ॥
18 Nov 2017 - 9:12 pm | सतिश गावडे
पुनर्जन्म आणि अध्यात्म (एक्स्क्लुडींग मोक्ष) हे मुद्दे सोडून इतर मुद्द्यांशी सहमत.
19 Nov 2017 - 8:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन वाचतोच. पण भूतलावरील काही सुक्ष्म जिवांचा त्रास बघवत नै हो. ;)
लिहित राहा....!
-दिलीप बिरुटे
(वालावलकरसेठचा पंखा ) :)
19 Nov 2017 - 10:18 pm | arunjoshi123
काव्यातल्या अनेक चांगल्या सल्ल्यांशी सहमती आहे.
20 Nov 2017 - 8:21 pm | यनावाला
"आनंददायी इहलोक" मधील ओवी क्र.२७ पुढीलप्रमाणे :
......
वाचावे ग्रंथ ज्ञानवर्धक । दृष्टी असावी वैज्ञानिक ।
चिकित्सा असे आवश्यक । स्वयंबुद्धीने करावी ॥२७॥
25 Nov 2017 - 10:23 pm | मामाजी
यनावाला साहेब,
हा प्रश्न फार पुरातन आहे.
कठोपनिषत् नावाचे एक उपनिषद आहे. त्यात नचिकेत नावाचा मुलगा यमा कडे जातो व त्याला सरळ प्रश्न करतो की काही लोकांच्या मते मृत्यु नंतर मनुष्याचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट होते तर काही लोकांच्या मते मृत्यु नंतर काहीतरी शिल्लक रहाते तेव्हा आपल्या सारख्या अधिकारी व्यक्ति कडुन यातले सत्य काय आहे ते जाणून घ्यायची ईच्छा आहे.
21 Nov 2017 - 12:32 am | babu b
छान
6 Dec 2017 - 10:05 pm | Ram ram
यना जी मी तुमचा खूप मोठा समर्थक आहे, तुमच्या लेखांवर उलट प्रतिक्रिया देणारे ममहामुर्खआहेत. तुम्ही त्यांना अनुल्लेखाने मारता हे मला खूप आवडते.
9 Dec 2017 - 6:12 pm | arunjoshi123
रामराम जी, मूर्खास मूर्ख मूर्ख वाटत नाही.
9 Dec 2017 - 1:31 pm | प्रकाश घाटपांडे
बघा यनावाला काव्यातूनही विचार मांडतात. विचारांना कवितेचे वावडे नसते. जे चार्वाका सांगतोय तेच यनावाला सांगताहेत ना? खाओ पिओ मजा करो. कुठला स्वर्ग अन कुठला नरक? भस्मिभूतस्य देहस्य पुनरा गमनः कुतः|
14 Dec 2017 - 5:49 pm | arunjoshi123
सर, आपला पुढील लेख प्लीझ लवकर टाकावा. आपल्या लेखनाच्या मजा काही औरच आहे.
14 Dec 2017 - 11:30 pm | nishapari
जर ... हां .. जर मृत्यूनंतर दुसऱ्या जन्मआधी स्वर्ग / नरक म्हणजे हे आपण माणसांनी दिलेले शब्द झाले पण तत्सम काही ठिकाणं असतील , जिथे थोडा काळ घालवून , पाप-पुण्याचे हिशेब थोडे चुकते करून मग दुसऱ्या जन्माला जायचं असेल तर अशा ठिकाणी प्रत्यक्षच गेल्यावर यनावालांची काय बरं प्रतिक्रिया होईल ?