डेरमाळ-पिसोळ ट्रेक

नमिता श्रीकांत दामले's picture
नमिता श्रीकांत दामले in भटकंती
12 Nov 2017 - 5:05 pm

         डेरमाळ-पिसोळ ट्रेक

  ङेरमाळ आणि पिसोळ, फार दिवसांपासून हुलकावणी देत असलेले बागलाणातले अनवट किल्ले. गाळणा टेकड्यांमध्ये वसलेल्या या किल्ल्यांची उंची जरी फार नसली तरी विस्तार विस्तृत आहे. त्यामुळे एकेक किल्ला शांतपणे बघायला एक संपूर्ण दिवस तरी हवाच.
सतराव्या शतकामध्ये  राठोडवंशीय बागुल राजे पिसोळसह इतर किल्ल्यांवर वास्तव्यास होते. त्यांच्यावरुनच या प्रांताला बागलाण असे नाव पडले. ३२ वा बागुल राजा नामदेव याने गवळी राजाचा पराभव करुन पिसोळ, डेरमाळ व मुल्हेर हे किल्ले घेतले. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ पिसोळच्या पायथ्याच्या गावाचे नाव नांदिन ( नामदेव चा अपभ्रंश होऊन ) असे पडले. या किल्ल्यावर गवळी राजाने राने, प्राणी व प्रजा रक्षणार्थ घरे, दरवाजे, पाण्याचे तळे, संरक्षक भिंती इ.बांधकाम केले. वाईचा देशमुख सूर्याजी पिसाळ याला इस्माइल मका याने बागलाणातील हा नंदीमाळ किल्ला व शेकडो एकर जमीन त्याला केलेल्या मदतीच्या बदल्यात बक्षीस म्हणून दिली होती. या किल्ल्यावर सूर्याजीनी जहागिरीच्या रक्षणासाठी वसाहत वसवली आणि किल्ल्याचे नाव पिसोळ पडले.


१. डोंगरांच्या कुशीत
         
 सहा आक्टोबरला रात्री ठीक सव्वा दहाला आमची किल्लेखोर चौकडी जमली. पाठपिशव्या ङिकीमध्ये टाकून गाडी भरधाव निघाली. आक्टोबर महिना असूनही वातावरण पावसाने गार केले होते; पण त्याचमुळे शारदीय पौर्णिमेचा चंद्र मात्र झाकोळून गेला होता. रात्रीच्या या प्रवासाची मजाच काही और असते. डोळ्यांमधल्या निद्रेनी रजा घेतलेली आणि हातात सुसाट वेगानी पळणा-या गाडीचं चक्र; सोबतीला उत्साहानी सळसळणारे तीन मित्र. कल्याणपर्यंत ट्रॕफिकमध्ये जरा हळूहळू पळणारी चाकं नंतर मात्र जोरात पळू लागली. ट्रेकच्या गप्पांनी उत्साहाला उधाण आले आणि मग कसारा घाटातला शेवटचा ढाबा 'बाबाचा ढाबा' आला. आलं घातलेला कडक चहा पिऊन पुढे निघालो. वाटेत मधूनमधून अमोल पवारचा फोन येत होता. अमोल पवार बिलपुरीला राहतो. आम्ही शनिवारी पहाटे ४ च्या दरम्यान येऊ म्हणून त्याला फोन करुन सांगून ठेवलं आहे. पण आम्हाला रात्री  त्याचा फोन लागला नाही तर घर सापडायला अडचण नको म्हणून तो काळजीनी फोन करतो आहे. जानेवारीमध्ये मुल्हेरवाडीला गेलो होतो त्यामुळे रस्ता तसा परिचयाचा आहे. सोग्रास फाट्याला वळलो; मागच्या वेळी या ढाब्यावर थांबून रात्री दीड वाजता चहा प्यायलो होतो. तेव्हा खूप थंडी होती त्यामुळे माणसं घोंगडी लपेटून बसली होती. अंधारामध्ये फक्त त्यांचे चार डोळे लकाकत होते. पण आज मात्र चहाची गरज नाहीये. चला पुढे. ताहराबादकडे, साल्हेर-मुल्हेरकडे अशा ओळखीच्या पाट्या दिसत होत्या. पण आम्हाला आज नामपूरकडे जायचे होते. गुगल माता की जय हो ; कारण रस्ता विचारायला कोणी जागेच नव्हते. अधून-मधून किशोरी मी आता गाडी चालवू का म्हणून विचारणा करत होती. 'झोप आली की देते' माझे प्रत्येक  वेळी तेच उत्तर. एका ठिकाणी एक आजी अजून फटफटायचे होते तरी आंघोळ करत होत्या.  लवकरच नामपूर मागे पडले आणि रामाचे मंदिर आले. गेल्यावर अमोलला फोन लावला. तो आम्हाला घ्यायला खूप दूर आला. पण तो आला म्हणून खूप बरं झालं कारण अंधारामध्ये त्याच्या घराची खडतर वाट शोधून काढणं अवघड गेलं असतं. 
मळ्यामध्ये टुमदार नवीन घर बांधलं होतं. पण अजून सगळ्या सोयी झाल्या नाहीत. स्वच्छ भारत अभियान पोहोचलेले नाही. गच्चीवर जाऊन पथा-या पसरल्या. सहा वाजेपर्यंत आराम करुन सात वाजता किल्ल्यावर निघू अशी मसलत झाली. तास-दीड तास होता, पण अजिबात झोप नाही. 
सहा वाजता उठून अमोलच्या जुन्या घरी गेलो. घरापुढे अंगणात गाय-वासरु, मागे शेतमळा, मातीची सारवलेली जमीन आणि प्रेमानी स्वागत करणारे अमोलचे आई-वडील असा थाट होता. तिथे जाऊन चहा-नाश्ता केला आणि निघालो डेरमाळकडे. 


२. अमोल पवारचे प्रेमळ घर
             
उगवत्या सूर्याचे कोवळे ऊन पीत वाटेत शेतात बाजरीची कणसे डुलत होती. ठिकठिकाणी सीताफळाची झाडे फळांनी लगडली होती. डेरमाळचा किल्ला झाडीतून डोकं वर काढून प्रसन्न दर्शन देत होता. चढही अगदी सौम्य होता. वाट झाडीतून वळणे घेत शांत चढत होती. मग एक मोठ्ठे पठार लागले. त्या पठारावरुन दूरवर दिसाणा-या डोंगररांगा कॕमे-यात टिपून घेतल्या. हे पठार पार करुन गेल्यावर डेरमाळचा चढ सुरु झाला. थंडगार गोड पाण्याचे समुद्री टाके आले. तुडुंब पाणी पिऊन बाटलीत भरुन घेतले. किल्ल्याची तटबंदी आपले अवशेष जपून उभी आहे. वर बालेकिल्याचे बांधकामही थोडेफार शाबूत आहे. डेरमाळचा भैरवकडा तडाखेबंद आहे.


३. डेरमाळचा भैरवकडा

हा बघून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण होतेच. पण कोकणकडा बेलाग आहे आणि तिकडचे डोंगरकडे रौद्र व अंगावर येणारे आहेत. त्या तुलनेत इथले डोंगर शांत दिसतात. कोणकोणते किल्ले असावेत बरं? सेलबारी-डोलबारी रांगेतले साल्हेर, मुल्हेर, मांगी, तुंगी धीरोदात्तपणे पाय रोवून खडे आहेत. मांगी-तुंगीचा आकार तर स्पष्ट ओळखू येतोय. आणि त्यांच्या  बाजूला हा रतनगड. पाण्याच्या  सात टाक्यांचा समूह बघून मनानीच सचैल स्नान केले. मग माळावर ऊन-पाऊस-थंडी अंगावर सोसत किती काळ उभ्या असलेल्या  मारुतीरायांनी दर्शन दिले. एका ठिकाणी हिरव्यागार शेवाळ्याखाली टाक्यात पाणी भरपूर होते. त्याकाळी आपल्या पूर्वजांनी केलेले जलसंवर्धन आणि जलनियोजन बघून आपण खरंच थक्क होतो. आता निवांत सावलीत बसून जेवण्यासाठी सगळेच आतुर होते. गडफेरी जवळजवळ पूर्ण झाली होती. मग एका झाडाखाली बसून शेजवान राईस, तिखट पु-या, आंबा-पोळी, पेर असे जेवण केले. बडीशोप खाऊन मुखशुद्धी झाल्यावर जरा लवंडण्याचा फारच मोह होत होता; पण तो आवरला आणि उतरायला सुरुवात केली. आल्या वाटेनी परत गेलो असतो तर खूप वळसा पडला असता; म्हणून आता अमोलनी जवळचा,खिंडीतला रस्ता काढला. पण या रस्त्याने किती वर्षात कोणी गेले नसेल. कारण सतत झाडीभरली आणि काट्याकुट्यांनी भरलेली वाट होती; 'काटा रुते कुणाला... ' सगळ्यांनाच रुतत होते. खाली उतरेपर्यंत सगळ्यांची दमछाक झाली. दुपारचे तीन वाजून गेले. आता पिसोळला जाण्यात अर्थ नाही. किल्ला पूर्ण बघता येणार नाही. मांगी-तुंगीला जाता येतंय का पाहू. तिथे  राहण्याची व जेवणाची उत्तम सोय होईल; अमोलकडून माहिती मिळाली. खाली आणि वर दोन ठिकाणी धर्मशाळा आहेत. मांगी-तुंगी ही दिगंबर जैनांची पवित्र तीर्थस्थळे. पायथ्याशी एक टपरी होती. तिथे आलं आणि गवती चहा घातलेला फक्कड चहा मिळाला. धर्मशाळा वातानुकुलित होती. तिथे हात- पाय- तोंड धुवून, सामान ठेवून जेवायला गेलो. शेवेची भाजी- भाकरी, डाळ - भात पापड असे उत्तम जेवण झाले. जेवणानंतर मांगीला दर्शनासाठी जावे. रात्रीच्या थंड वेळी तीन-चार तासात जाऊन परत येऊ आणि मग शांत झोपू असा विचार झाला. पुन्हा पायथ्याशी आलो. 'मांगीला वर जाऊन यायला साडे-चार तास लागले. तुंगीचा रस्ता बंद आहे' नाशिकच्या पर्यटकांकडून कळले. मग संध्याकाळच्या टपरीवर एक-एक कटिंग चहा झाला. टाॕर्च बरोबर घेतले होते. चहा पिऊन आम्ही वर जायला निघालो तर तिथे समजले की दर्शन फक्त बारा वाजेपर्यंतच होते कारण नंतर मंदिर बंद करतात. हे ऐकल्यावर नाइलाज झाला. पहिल्पा पायरीचे दर्शन घेऊन मुकाट्याने परत फिरावे लागले. मांगी-तुंगी आणि भामेर पुन्हा कधीतरी!
खोलीवर जाऊन थंडगार पाण्यानी आंघोळ केल्यावर दिवसभराचा शीण कुठल्या कुठे पळून गेला. रात्री ९.३० वाजता बिछान्यात पहुडणे ही एक अपूर्व अशी चैन होती. एवढया लवकर झोप कसली लागत्येय पण, माणूस आपल्या सवयींचा गुलाम असतो.
पहाटे चार - सव्वा चारलाच जाग आली. पटापट आटोपून चहा घेतला. जवळ असलेला खाऊ, केळी खाल्ली. परिसर दर्शन, छायाचित्रण सुरु असताना किशोरीनी तिथल्या मार्जार आणि श्वान मंडळाशी गट्टी जमवली. मांगी आणि तुंगी कोवळ्या सूर्यप्रकाशात उजळले होते वर चढणारी पांढरी वाट स्पष्ट दिसत होती.
वाडी पिसोळ जीपीएस् ला सापडत नव्हते. पिसोळ फोर्ट, नांदिन कडे चल म्हटलंवाडी पिसोळ हे अगदी खेडेगाव; आदिवासी पाडाच; इथे काही सोयी नाहीत. पुढे जायखेड नावाचे थोडे मोठे गाव होते. जायखेडमध्ये जेवण वगैरे मिळू शकेल असे समजले होते. पिसोळ किल्ल्याकडे कच्चा रस्ता जात होता.


४. पिसोळच्या वाटेवर

जमेल तिथपर्यंत गाडी हाकावी असा विचार केला. दुतर्फा शेतवाडी आणि मधून छोटा रस्ता, त्यात मोठे- मोठे खड्डे आणि कुठे तर रस्ता असा होता की खालचा जीव खाली आणि वरचा जीव वरती. शेवटी असा हा खडतर रस्ता पार करुन आम्ही किल्ल्याच्या कमानीजवळ पोहोचलो. एका झाडाच्या सावलीत गाडी उभी केली. वाटाड्या मिळाला तर किल्ला नीट पाहता येईल. एका शेतात मामा भेटले; 'मामा किल्ल्याची वाट दाखवाल का?' 'आलो असतो मीच खरं पण, नातवंडांना घेऊन गावात जातोय. बघतो कोणाला तरी पाठवतो.' आम्हीही मामांच्या पाठोपाठ गेलो. राजू लगेच निघाला आमच्याबरोबर. त्या डावीकडच्या खिंडीच्या बाजूनी वाट वर चढते. पारावर स्थापन केलेल्या मारुतीरायाच्या पाया पडून चढायला सुरुवात केली. स्वच्छ हवा आणि प्रसन्न वातावरण होते. थोडे पुढे गेल्यावर एक दर्गा लागला. तिथे कापडी बैल करुन दर्ग्यावर चढवले होते. वाट सावलीतून वळणे घेत सावकाश चालली होती. मध्येच डेरमाळच्या परतीच्या वाटेची आठवण करुन देणारे काटे कुटेही लागत होते. चढ सौम्य असून आजूबाजूला डोंगर आणि झाडी होती. वाटेतली झाडे सीताफळांनी लगडली होती. चिंचेचे आकडेही मिळाले. कितीही आंबट लागाली तरी मिटक्या मारत चिंच पोटात जात होती. वाटेत एका झाडाच्या सावलीत 'थोडीसी पेट पूजा' झाल्यावर गार वाऱ्याची एक झुळूक अंगावर घेऊन पुढे निघालो. आता किल्ल्याच्या बांधकामाचे अवशेष वर दिसत होते. किल्ल्याला चौपदरी तटबंदी आहे. एका बाजूनी कडा आणि मजबूत तटबंदी यामुळे किल्ला अगदी सुरक्षित असावा. पायात फुललेली रंगी-बेरंगी गवतफुलंही लक्ष वेधून घेत होती.


५. वा-यासंगे डोलू

पाण्याचे टाके दिसल्यावर लगेच मोर्चा तिकडे वळवला. गारेगार गोड पाणी भरपूर पिऊन बाटल्यांमध्ये भरुन घेतले. चेहऱ्यावर पाणी मारायला तर विशेष गंमत वाटली. त्यातील एका टाक्याच्या बाहेर नंदी उभा होता आणि आतील पाण्यात  शिवलिंग. "जय शंकर, जय शंभो" ; देवाच्या पाया पडून आणि फोटो काढून आगे-कूच केले. 

६. पिसोळवरील पाण्याचे टाके, पाण्याखाली शिवालिंग

             किल्ल्यावर गेल्यावर प्रथम उजवीकडच्या पठारावर मोर्चा वळवला. वाटेतले पाण्याचे तळे मागे ठेवून बुरुजाकडे गेलो. बुरुजावरुन समोरच्या डोंगररांगा भव्य दिसत होत्या. डेरमाळ, मांगी-तुंगी रतनगड ओळखायला आले. इतरही डोंगररांगा ओळीनी शोभत होत्या. इथे पिसोळच्या कड्याला खाच आहे. बुरुजाखालून शत्रूनी हल्ला केला तर निसटून जाण्यासाठी एक गुप्त मार्ग आहे. खाली जाऊन तो मार्ग कुठे दिसतो का हे शोधून पाहिलं. खालच्या भोकातून पलीकडे जायला कुठे वाट दिसते का याचीही टेहळणी केली. ही खाच बघितल्यावर दुर्ग भांडारची आठवण झाली. दुर्ग भांडारचा डोंगरही ब्रह्मगिरीपासून तुटलेला आहे आणि तिथे जाण्यासाठी वाट आहे हे माहीत नसेल तर नुसते बघून अजिबात  कल्पना येत नाही.


७. पिसोळच्या बुरुजावारुन टेहळणी

  मग पुन्हा तळ्याच्या दिशेनी निघालो. वाटेत एक समाधीसारखे बांधकाम दिसले. तळ्याकाठी बसून चटकदार मसाला भेळ, चिवडा, पेर अशी खादाडी झाली. किल्ल्यावर थोडे उंचावर एका भव्य प्रासादाचे अवशेष आहेत. त्या दिशेनी जाताना एक सुकलेले पावसाळी पाण्याचे तळे दिसले.


८. भव्य प्रासादाचे भग्नावशेष

या प्रासादाच्या प्रवेशद्वाराच्या  कमानीपाशी बरेच गवत, झुडुपे वाढलेली आहेत. मग त्या कमानीच्या पलीकडून वाट काढत पुढे गेलो. अजून दोन पाण्याची टाकी लागली; शेवाळ्याखालचे हे पाणीही स्वच्छ असावे. मोकळ्या आभाळाखाली स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती आणि वीरगळ पाठीला पाठ लावून उभ्या होत्या. त्यांना नमन करुन मग बुरुजाकडे गेलो. बुरुजावरुन दिसणारा भवातालचा रम्य प्रदेश डोळ्यांत साठवून परतीच्या मार्गाला लागलो. गडफेरी जवळजवळ पूर्ण झाली. गडावरचा दर्गा आणि भूमीगत गुहा मात्र बघायच्या राहून गेल्या.  

                पिसोळचा ट्रेक मनाप्रमाणे झाला. मग पिसोळवाडीत राजूच्या घरी जेवणही उत्तम झाले. ताज्या पिकलेल्या सीताफळांची गोडी जिभेवर ठेवून, झणझणीत सांडग्यांचा रस्सा, ज्वारीची भाकरी, गरमागरम भात, तिखट पापड आणि कैरीचे करकरीत फोडींचे ताजे लोणचे असा फक्कड बेत होता. किशोरीला गाडीची चावी सोपवली, तुला कंटाळा आला की मी घेते' असे सांगून; आणि गाडीचा प्रवास ठाण्याकडे सुरु झाला.


९. गवतफुला रे गवतफुला

            ब-याच  दिवसांपासून ठरु पाहणारा डेरमाळ-पिसोळचा ट्रेक दैवी इच्छेप्रमाणे झाला; भामेर राहिला पण मांगी-तुंगी-न्हावी आणि भामेर पुढच्या वेळी. आणि अचला-अहिवंत, कांचना-धोडप, गाळणा-कंकराळा हे सगळेही आतुरतेनी वाट बघत आहेतच; गाडीबरोबर विचारही भरधाव वेगात होते. वाटेत झेंडूच्या शेतांनी लक्ष वेधून घेतले.


१०. झेंडूच्या शेतातून विहंगम दृश्य

पलीकडे क्षितिजावर डोंगररांगा मावळतीने सजल्या होत्या. तिथेच मग  चहासाठी गाडी थांबवाली. त्याबरोबर गरम गोल भजीही मिळाली. इथे  चक्रधर बदलला. जुन्या हिंदी गाण्यांमध्ये हरवून जात आणि वाटेनी दूरवर  दिसणा-या अलंग-मदन-कुलंग, भास्करगड-हरिहर, मांगी-तुंगी रतनगड यांना दोन्ही  नेत्रज्योतींनी ओवाळत परतीचा प्रवास सुरु होता. एकीकडे पावसानी मेघ-मल्हार आळवत चौताल धरला होता. बेताच्या गतीनी गाडी चालवत साडेनऊ वाजता ठाणे गाठले.


११. किल्लेखोर चौकडी

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

12 Nov 2017 - 5:34 pm | संजय पाटिल

व्वा...
मस्त भटकंती.....
सुंदर वर्णन आणि फोटो!

पगला गजोधर's picture

12 Nov 2017 - 7:55 pm | पगला गजोधर

विशेषतः गवत फुलांचे फोटो खरंच खुप आवडले...

अत्रुप्त आत्मा's picture

14 Nov 2017 - 11:38 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

कपिलमुनी's picture

13 Nov 2017 - 1:14 am | कपिलमुनी

भटकंती आवडली

यशोधरा's picture

13 Nov 2017 - 6:09 pm | यशोधरा

खूप छान!

भ ट क्या खे ड वा ला's picture

13 Nov 2017 - 9:49 pm | भ ट क्या खे ड वा ला

भटकंती वर्णन व फोटो दोन्ही मस्त ..
परत ट्रेकिंग चा मोह व्हावा अशी

फोटो धूसर का दिसत आहेत?