दरवर्षी प्रमाणे दिवाळीची सुट्टी संपल्यावर नेहमी सारखे कुठेतरी जायचे म्हणून विचार चालू केला. ऑफिस मध्ये १५ दिवसांची सुट्टी आधीच राखून ठेवली असल्यामुळे वेळेचा प्रश्न निकालात निघाला होता. दिवाळीच्या सुट्टीत ऑफिसमधील सहकारी सुट्टीवर असल्यामुळे सहलीचे नियोजन करायला वेळ कमी मिळत होता. तरीपण हो नाही हो नाही करत ठिकाणाची यादी बनवायला घेतली. अगदी रणथंबोर, कन्याकुमारी, ताडोबा, मध्य प्रदेश (इंदोर, रावेरखेडी इ.) पासून ते म्हैसूर पर्यन्त....
ठिकाण कसेबसे नक्की झाले तिथून पुढे पुढची तयारी सगळ्यात महत्वाचे म्हणजे दोन कन्यांना घेऊन जायचे कसे आणि कधी.. ह्याची कथा काय ते इथे लिहू शकत नाही :) मी म्हणत होतो कि तुम्ही तिघी (सौ व दोन कन्या) विमानाने बेंगलोरला जा व मी तुम्हाला घ्यायला कारने घेतो तर यावर सौ म्हणाल्या की तू एकटा बेंगलोर पर्यंत गाडी चालवत येणार म्हणजे तू इथून निघाल्या पासून ते तू आम्हांला बेंगलोरला विमानतळावर आम्हाला दिसेपर्यंत मला टेन्शन. त्या पेक्षा आपण सगळे विमानाने जाऊ. लगेच मी माझा पुढचा प्रश्न टाकला कि आपण पुढे फिरणार कसे..? कारण आपल्या मुलींच्या हिशोबाने वागायचे म्हंटले तर कोणीही सहल आयोजन करणारे पळून जातील, दुसरा पर्याय होता रेल्वेचा. पुण्यातून म्हैसूर चा प्रवास २४ तास आणि तिकीट साधारण २००० रू (वातानुकूलित ३ टियर) म्हणजे ८००० रुपये एका बाजूचे व परत पुणे रेल्वे स्थानकापर्यंत जायचा आणि तिथे फिरायचे कसे हा प्रश्न वेगळाच. झुमकारचा पर्याय होताच. साधारण त्यांचे दरपत्रक काढले तर जरा जास्तच महाग वाटत होते शिवाय मला दुसऱ्या कोणाचीही गाडी चालवायचे भयानक टेन्शन (भीती) वाटते म्हणून मी स्वतःच्याच गाडीने जाण्याचे नक्की केले.
गुगलबाबा एक बाजूचे अंतर अंदाजे ९५० किमी व प्रवासाचा कालावधी साधारण १५ तास दाखवत होता. सकाळी ४ वाजता निघालो तर जेवणाचे व चहाचे २ तासाचे ब्रेक घेऊन रात्री ११ वाजता पोहचू. हे माझे वाक्य ऐकून बायकोने असा काही चेहरा केला कि विचारायची सोय नाही. तिचे म्हणणे होते कीं आपण गाडीत दोघेच असतो तर हे शक्य होईल पण दोन लहान मुलींना घेऊन हे शक्य नाही. मग याच्यावर पर्यायी विचार चालू झाला. जाताना व येताना १-१ मुक्काम वाढवणे हा एक पर्याय निघाला. मुक्कामाचे ठिकाण साधारणपणे घर ते म्हैसूरच्या मध्यावर शोधावे असा विचार झाला. जराशी शोधाशोध व चौकशी करून धारवाड किंवा हुबळी ह्या ठिकाणी मुक्काम नक्की केला.
शेवटी एकदाचे ठरले आपल्याच गाडीने जायचे म्हणून पुढच्या तयारीला लागलो. काय काय बघायचे, कुठे राहायचे, रूट कोणता याची उत्तरे शोधू लागलो.
१) म्हैसूरचा राजवाडा
२) वाळूचे संग्रहालय (सॅण्ड म्युझियम)
३) प्राणी संग्रहालय
४) बंदीपूर अभयारण्य
५) वृंदावन गार्डन
६) चामुंडेश्वरी मंदिर व नंदी
मुक्कामाची जागा शोधणे मुख्य काम होते कारण अशी जागा शोधावी लागणार होती की ज्या जागेपासून बघण्याची ठिकाणे आहेत ती चालत जाऊन पाहता यावीत अथवा कमी अंतरावरचा रिक्षा सारखा पर्याय सहज वापरता यावा. शेवटी बरीच शोधाशोध केल्यानंतर लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिलेले म्हैसूर मधील एक हॉटेल बुक केले. म्हैसूर पासून पुढचे ठिकाण होते बंदीपूर अभयारण्य. अंतर्जालावर बराच शोध घेतला तरी अधिकृत संकेतस्थळ कोणते तेच नेमके सापडत नव्हते. ते सापडले तर काही केल्या त्या संकेत स्थळावर आरक्षण होत नव्हते व नेहमीच्या सरकारी नियम व अपेक्षेप्रमाणे दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर कोणीही उत्तर देत नव्हते. काही खाजगी रिसॉर्ट धारकांना ई-मेल पाठवले. त्यातल्या त्यात जी महाग रिसॉर्ट होती त्यांनी लगेच उत्तर पाठवले. एक खडा टाकून बघावं म्हणून दूरध्वनी वरून संपर्क साधला आणि काही सवलत मिळेल का ते विचारले तर त्यांनी मला सांगितले कि आता जरा ऑफ सिझन आहे म्हणून खर्च कमीच सांगितला आहे बघा तुमच्या आर्थिक कुवतीत असेल तर.... म्हंटले बरं बाबा बघतो आणि तुला परत फोन करतो.. तू काही मला परत संपर्क करू नकोस ... शेवटी ठरवले कि एकदा म्हैसूरला पोहचू आणि मग पुढचे ठरवूयात
ह्या गडबडी मध्ये एक गोष्ट पूर्णपणे विसरलो होतो ती म्हणजे कॅमेरा, आता अभयारण्यात जायचे म्हणजे चांगले फोटो येणारा कॅमेरा + लेन्स हवी. मग बाकीची तयारी सुरू असताना मित्रमंडळींच्यात चांगल्या कॅमेऱ्याच्या शोधाशोध सुरू झाली. साधारण अर्ध्या डझन लोकांना संपर्क केल्यावर तीन जणांचे कॅमेरे उपलब्ध असल्याची सुवार्ता कळाली. आता त्यांच्याकडे जाऊन आणण्यात मला अजून वेळ घालवावा लागणार होता, शेवटच्या क्षणी एका मित्राची आठवण आली की जो मला निघण्यापूर्वी एका कार्यक्रमात भेटणार होता. त्यांना व्हाट्सअँप वर विनंती केली की मला कॅमेरा हवा आहे १ आठवड्याकरता. मिळेल का..? दुसऱ्या क्षणात उत्तर आले अरे त्यात काय बिनधास्त घेऊन जा..
प्रवासाचा मार्ग..
पहिला दिवस - चिंचवड ते हुबळी (साधारण ४५० किमी व ७ तास)
दुसरा दिवस - हुबळी ते म्हैसूर (तुमकूर मार्गे साधारण ५०० किमी व ८ तास)
यात तुमकूर मार्गे जाण्याचे कारण म्हणजे मोदकचा सल्ला. कारण तो या मार्गे न गेल्यामुळे एका दिवसात इस्लांपूर ते म्हैसूर असे पोहचू शकला नव्हता.
इथून पुढचे त्या त्या दिवशी ठरवून असे म्हणून सामान बांधाबांधीच्या तयारीला लागलो.
काही धावती छायाचित्रे
(क्रमश:)
प्रतिक्रिया
11 Nov 2017 - 5:50 am | रेवती
सुरुवात आवडली पण फोटू दोनच आहेत. ते पाहता सहलीचा मूड बनू लागला तेवढ्यात शहाकाकांच्या क्रमला आणलेत.
11 Nov 2017 - 5:57 am | कंजूस
कसली भक्कम तयारी केली आहे!
लेख मजेदार होत आहे.
11 Nov 2017 - 6:58 pm | चौथा कोनाडा
सुरेख सुरुवात !
डीटेल्स लहायची स्टाईल आवडली !
पुढील भागाची उत्सुकता आहे आता !
15 Nov 2017 - 7:34 pm | श्रीधर
वाचतोय पुढचा भाग लवकर येवूदे
17 Nov 2017 - 9:34 am | महेश हतोळकर
बंदिपूर हे कर्नाटकात येते. याच्याच तमीळनाडूकडच्या भागाला मधूमलई म्हणतात. अंतरही फार नाहीये. काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा त्यांचा नंबर ऑफिसातून घेतला होता. बघा काही उपयोग होतो का ते.
0423 244 4098
0423 244 5971
डिटेल प्रवासवर्णनाची वाट पहातोय.
17 Nov 2017 - 11:32 am | रुस्तम
पुभाप्र
17 Nov 2017 - 5:29 pm | चौथा कोनाडा
सुमे, पुढचा भाग कधी टाकणार ?
18 Nov 2017 - 11:35 am | नाखु
आणि उपयुक्त ठरेल अशी माहिती
सहलविचारांच्या विचाराधीन नाखु