साहित्य -
५०० ग्राम बोनलेस चिकन, २ ते ३ चमचे चिकन मसाला, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा हळद,१ चमचा तिखट, १/२ चमचा कसूरी मेथी (ऑप्शनल), १ पेराएवढे आले, ४ ते ५ लसूण पाकळ्या, १ चहाचा चमचा साखर, २ टेबलस्पून बदाम किवा काजू पावडर, १ मोठा कांदा, ५ ते ६ मध्यम लालबुंद टोमॅटो,१ चमचा टोमॅटो केचप, २ टेबलस्पून तेल, २ ते ३ टेबलस्पून बटर, पाऊण ते १ कप फ्रेश क्रिम,मीठ, कोथिंबिर सजावटीसाठी.
कृती -
चिकन स्वच्छ करुन लहान तुकडे करुन घेणे.आलं लसणीची पेस्ट करणे.चिकनच्या तुकड्यांना निम्मी आलेलसूण पेस्ट व चिकनमसाल्यातला निम्मा मसाला (साधारण मोठा चमचाभर) चोळून ५ ते १० मिनिटे ठेवणे.तोपर्यंत कांदा चौकोनी चिरणे,टोमॅटोच्याही फोडी करणे.
एका कढल्यात तेलावर हे चिकन पिस गोल्डन ब्राउन रंगावर परतून घेणे व बाजूला काढून ठेवणे.
त्याच कढल्यात उरलेल्या तेलावर बटर घालणे व त्यावरच कांदा परतणे, उरलेला चिकन मसाला,गरम मसाला, तिखट, हळद, कसूरी मेथी , उरलेली आले लसूण पेस्ट घालणे व परतणे.टोमॅटो घालणे व परतणे. अगदी थोडे पाणी घालून झाकण ठेवून शिजवणे.सगळे मिश्रण एकजीव झाले पाहिजे.थोडे गार झाले की मिक्सरमधून हे मिश्रण काढणे. एकदम गुळगुळीत झाले पाहिजे.
आता हे मिश्रण परत कढल्यात घालून ४ ते ५ मिनिटे शिजवणे. १ चमचा टोमॅटो केचप घालणे.हवा असल्यास किंचित तंदूर कलर घालणे.चिकनपिसेस घालणे व परत साधारण ५ ते ७ मिनिटे शिजवणे. चमचाभर साखर व चवीनुसार मीठ घालणे. फ्रेश क्रिम घालणे व ढवळणे. कोथिंबिरीने सजवणे.
आच पूर्णवेळ मध्यम ठेवणे.
गरमगरम बटरचिकन नानबरोबर सर्व्ह करणे.
बटरचिकन + नान
प्रतिक्रिया
20 Oct 2008 - 1:30 pm | ऋषिकेश
बरं झालं दुपारच्या जेवणानंतर फोटु बघितला.. नहितर महाराष्ट्रात एका आयटी कंपनीमधे एक (अचानक लागलेल्या अनावर भुकेने)भुकबळी ! ही हेडलाईन दिसली असती!
बाकी तुमच्या कड्या नान साठीची भट्टी देखील आहे की काय? नसल्यास नान कसा करावा?
-(बटरसकट जळून खाक) ऋषिकेश
20 Oct 2008 - 1:50 pm | स्वाती दिनेश
नानची घरगुती रेशिपी टाकली आहे आत्ताच..:)
20 Oct 2008 - 2:02 pm | टारझन
बासंच .. बादली भर लाळ गळालीये आता .. मला सर्वर रूम पुर्ण ओली केल्याने बाहेर पाठवलं ... :(
स्वाती ताई .. मला हॉटेलने किचनओटा :) पण दिलाय .. प्लिज येणं करा हिकडं ... मी सगळा कच्चा माल आणतो :)
(सर्वचिकनचापी) टार्जू
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
20 Oct 2008 - 2:05 pm | मनस्वी
स्वातीताई, छान रेसिपी आहे.
साखर टाकणे सक्तीचे आहे का?
मनस्वी
20 Oct 2008 - 2:16 pm | टारझन
साखर टाकणे सक्तीचे आहे का?
नाही नाही .. त्यात तर चिकन पण टाकणे सक्तीचं नाही ... तु तुझ्या पद्धतीचा बटर चिकन कर हो मने ... ;)
टारस्वी
20 Oct 2008 - 3:39 pm | मनस्वी
ए तू गप्प बस रे टरटर.
मनस्वी
20 Oct 2008 - 3:47 pm | शिप्रा
स्वाती ताई बेसिक शंका ...चिकन मसाला आणी गरम मसाला विकतचा आणायचा का? कारण घरचा मसाला आणी बाहेरचा यात चवीत खुप फरक असतो...
नाहितर मसाल्याची रेसिपी पण देना ग... :P
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
20 Oct 2008 - 4:36 pm | स्वाती दिनेश
चिंटी,मी तरी एव्हरेस्ट किवा बादशाह मसाले (खरं म्हणजे इथल्या भारतीय दुकानात ज्या कं चा उपलब्ध असेल तो) वापरते. फारफार वर्षांपूर्वी मी गरम मसाला घरी करत असे. रेसिपी शोधायला लागेल कारण हल्ली कित्त्येक वर्षांत केलेला नाही,:)
मनस्वी, बटरचिकन खूप तिखट नसते बघ,थोडे गोडुस असते,म्हणून चमचाभर साखर घालायची.
स्वाती
20 Oct 2008 - 5:04 pm | टारझन
मनस्वी, बटरचिकन खूप तिखट नसते बघ,थोडे गोडुस असते,म्हणून चमचाभर साखर घालायची.
म्हणूनच म्हंटलो तिला की स्वत:च बटरचिकन बनव .. तर मला म्हणे गप्प बस ... नको तिथे हीची मनमानी .. छी बाबा !!
-टारस्वी
20 Oct 2008 - 5:00 pm | लिखाळ
आम्ही अंडी खातो..त्यांचे आई-बाप नाही.. त्यामुळे या पाकृची मजा आम्हाला घेता येणार नाही..
पण जुन्या काळी बटरचिकन खाल्लेले असल्याने पाकृ छान आहे ते समजले :)
--लिखाळ.
20 Oct 2008 - 5:34 pm | ललिता
स्वातीताई, कांदा + टॉमेटो + फ्रेश क्रीम मुळे बटर चिकन भरपूर गोडुस होईल, साखर वगळली तर चालेल का? चवीत फरक होईल का त्यामुळे?
20 Oct 2008 - 7:00 pm | स्वाती दिनेश
अग तुला नको असेल तर नको घालू साखर :) पण मला ती गोडुस चव आवडते म्हणून मी चमचाभर साखर घालते.
साखर न घातल्याने कमी गोडुस होईल एवढेच..
स्वाती
20 Oct 2008 - 6:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाककृतीबरोबर बटरचिकनचे सुंदर चित्र, चालू द्या !!! :)
20 Oct 2008 - 7:44 pm | प्राजु
अत्याचार आहेत. आधी ललिताताईची शाकुती.. आणि आता हे बटरचिकन..
फोटोंमुळे जीव हैराण होतो.
खासह रेसिपी. मी या रेसिपीला वाचन्खुण केली आहे.. आता दिवाळी नंतर लगेचच करणार मी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Oct 2008 - 8:24 pm | रेवती
रेसेपी छान दिसतायत, पण चिकन खात नाही गं स्वातीताई.
मला वाटते चिकनच्याऐवजी पनिर घातले तर शाकाहारींसाठी पनिर बटर मसाला असे काही होईल का?
चिकन मसाल्यामध्ये सगळे पदार्थ शाकाहारीच असावेत.
रेवती
20 Oct 2008 - 9:35 pm | सुनील
फोटो आणि पाकृ उत्तमच.
पण, का कुणास ठाऊक पण मांसाहाराचा आणि झणझणीतपणाचा एक संबंध मनात तयार झालेला आहे त्यामुळे हे गोडसर चिकन तितकेसे उतरत नाही. हे अर्थात, माझे वैयक्तिक मत.
दुसरे नान बाबत. माझ्या वैयक्तिक पसंतीची उतरण अशी - घडीची पोळी - भाकरी (तांदूळ, ज्वारी, बाजरी) - पराठा - तंदूरी रोटी - नान
ही तुमच्या पाकृवर टीका नाही हो!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Oct 2008 - 12:04 am | विसोबा खेचर
स्वातीवहिनी,
उत्तम पाकृ!
लौकरच मिपाच्या मुखपृष्ठावर टाकणार! :)
तात्या.
21 Oct 2008 - 12:23 am | ब्रिटिश टिंग्या
फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटले!
पाककृती सोपी वाटतेय्.....करुन पहावी म्हणतो!
बाकी वरती सुनीलभौंशी सहमत!
खरोखरचं मांसाहाराचा आणि झणझणीतपणाचा एक संबंध मनात तयार झालेला आहे......पण तरीदेखील फुकटात बटर चिकन मिळणार असेल तर FTP ;)
21 Oct 2008 - 5:32 am | सहज
बटरचिकन आहाहा!!!!!
शागुती खाउन होतीय तेवढ्यात बटरचिकन...
लाईफ हो तो ऐसी.....
21 Oct 2008 - 12:14 pm | नंदन
:)
अगदी असेच म्हणतो
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
21 Oct 2008 - 6:04 pm | विसोबा खेचर
१३ खणखणीत प्रतिसाद!
काय स्वाती, इतर संकेतस्थळावरील मंडळींना तुझं बटर चिकन फारसं आवडलेलं दिसत नाही! ;)
आपला,
(कोकणातला) तात्या बर्वा.
22 Oct 2008 - 7:01 pm | प्रभाकर पेठकर
स्वातीची मुळ पाककृती चांगलीच आहे. पण त्यातील साखरेवर, गोडूसपणावर काहींनी आक्षेप (सौम्य शब्दात) घेतला आहे. खास त्यांच्यासाठी खालील सुचवणी.....
५०० ग्रॅम कोंबडीस १ चहाचा चमचा साखर जास्त होत नाही पण अजिबात घातली नाही तरी चालेल.
कांदा अर्धवट तळला तर गोडसर राहतो. तो गडद तपकिरी रंगावर परतून घ्यावा. त्याचा गोडपणा जातो. (जास्त तळल्यास कडवट होतो)
२ टॉमॅटो वाढवता येतील. टॉमॅटोसुद्धा परतून त्यातील पाणी आटवून टाकायचे. त्यातही गोड चव असते. शिवाय नीट न शिजलेल्या टॉमॅटोंची 'टॉमॅटीश' चव पदार्थाला येते ती टाळण्याचा प्रयत्न करावा. टॉमॅटोचे पाणी आटवून तेल सुटले की साधे नळाचे पाणी घालून रश्याचा दाटपणा सांभाळून घेता येतो.
टॉमॅटो केचप मध्येही गोडवा असतो. केचप टाळून किंचित लाल पावडर रंग वापरावा. (अगदी हरभर्याच्या डाळी एवढा)
फ्रेश क्रिम कमी करता येईल.
टीपः
१)कांदा उभा पातळ चिरून तळून घ्यायचा आणि त्याची पेस्ट करून घ्यायची.
२)टॉमॅटो साले काढून मिक्सर मध्ये मनसोक्त फिरवून गाळून त्याचा रस घ्यायचा. तो तेलात आटवून घ्यायचा.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
22 Oct 2008 - 7:56 pm | सुनील
खास आमच्यासाठी केलेल्या सुचवणीबद्दल आभार!
तशी स्वाती यांनी दिलेली पाकृ ही बटरचिकनची पाकृ म्हणून उत्तमच होती. आता तुम्ही दिलेली कमी गोडाची पाकृ कशी लागते ते करूनच बघावे लागेल (दिवाळी नंतरच योग यावा).
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
23 Oct 2008 - 10:35 pm | वेताळ
सदर उतारा कुठे ठेवणार आहात ते कळवा. वेळ वाचेल.
चिकन तंदुर घरी बनवता येईल काय? असेल तर पाककृतीची वाट पाहात आहे.
वेताळ.
23 Oct 2008 - 10:35 pm | वेताळ
सदर उतारा कुठे ठेवणार आहात ते कळवा. वेळ वाचेल.
चिकन तंदुर घरी बनवता येईल काय? असेल तर पाककृतीची वाट पाहात आहे.
वेताळ.
31 Oct 2008 - 2:26 pm | स्वाती दिनेश
खवय्यांनो, धन्यवाद.
रेवती,चिकन ऐवजी पनीर घातले तर पनीर बटर मसाला करता येईल.. बरोबर..:)
पेठकर, तुमच्या सुचवणींसाठी धन्यवाद.
तात्याभावजी, बटरचिकन मुखपृष्ठावर यायची वाट पाहत आहे :)
वेताळ, 'उतारा' फ्रांकफुर्टात ठेवला होता. :) चिकनतंदूर घरगुती पध्दतीने करता येते, लवकरच रेसिपी देते.सॉरी लवकरच उतारा ठेवते,:)
ऋषिकेश, टारझन, मनस्वी, चिंटी, लिखाळ, ललिता, बिरुटेसाहेब, प्राजु, सुनील, टींग्या,सहजराव, नंदन, रेवती, पेठकर, तात्या, वेताळ
सर्वांना धन्यवाद.
स्वाती