भूनंदनवन काश्मीर – भाग ५ (गुलमर्ग-मुघल गार्डन्स)

के.के.'s picture
के.के. in भटकंती
13 Sep 2017 - 7:05 pm

भूनंदनवन काश्मीर – भाग ५ (गुलमर्ग-मुघल गार्डन्स)

====================================
भाग-१
भाग-२
भाग-३
भाग-४
====================================

हा भाग टाकायला जरा उशीरच झाला. . .

====================================

“यहां कश्मीरमे एक कहावत है| ‘गुलमर्ग का मौसम और बम्बई की फ़ॅशन, इसकी कोई गॅरण्टी नही’” हे वाक्य तुम्हाला काश्मीरमधे कधी ना कधी हमखास ऐकायला मिळेल. सोहैलकडुन तसेच इतर लोकांकडुन बरेचदा ऐकायला मिळाले होते. तर अश्या गुलमर्गला आज आम्ही भेट देणार होतो. गुलमर्ग काश्मीरची ‘Snow Capital’ म्हणुन ओळखले जाते. ह्याला पूर्वी ‘गौरीमर्ग' म्हणायचे. पांढर्‍याशुभ्र बर्फामुळे पार्वतीसारखा गोरा असा ‘गौरीमर्ग'. नंतर कधीतरी सोळाव्या शतकात त्याचे नाव ‘गुलमर्ग' असे पडले. गुलमर्ग म्हणजे ‘फुलांचे गाव' (Meadow of Flowers). इथे साधारणपणे २१ विविध जातींची फुले बहरतात असे म्हणतात. गुलमर्गला जगातले सगळ्यात ऊंचीवरचे Golf Course आहे. तसेच, हिवाळ्यात इथे भरपूर प्रमाणात स्कींग चालते.

तर, गुलमर्ग श्रीनगरच्या पश्चिमेला साधारण ५०किमीवर आहे. आपण दीड-दोन तासात आरामात पोहोचतो. गुलमर्गच्या अलिकडे तांगमर्गला, म्हणजे पायथ्याच्या गावात, आपल्याला उबदार कपडे, गम शूज वगैरे भाड्याने मिळतात. गुलमर्गला जाताना इथुन घ्यायचे आणि परत जाताना इथे आणुन द्यायचे असे एकदम सोपे गणित आहे. फायदा हा की त्यामुळे आपल्या सामानातील ह्या वजनदार गोष्टी कमी होतात. गुलमर्गच्या लहरी हवामानाचा प्रत्यय आम्हाला लवकरच आला. उबदार कपडे भाड्याने घेत असतानाच एक जोरदार सर आली. आणि नंतर ५-१०मिनीटात जणु काही घडलेच नव्हते अशा थाटात ऊन पडले. असेच घाट चढतानादेखिल झाले. एकुण काय तर गुलमर्गचे हवामान सतत बदलत असते. काही नेम नाही त्याचा.

गुलमर्गला पोहोचल्यावर आधी सामान रूमवर टाकले. सोहैलने सांगीतल्यानुसार लगेचच गुलमर्गचे मुख्य आकर्षण असलेल्या गोंडोलाकडे निघालो.

गुलमर्गला पोचायच्या आधीच सोहैलने आम्हाला सांगीतले होते की गुलमर्गचे घोडेवाले सगळ्यात जास्त लबाड असतात त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. त्यानुसार घोडेवाल्यांना टाळतच आम्ही चालत-चालत गोंडोलाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. एव्हाना भली मोठी रांग लागलेली होती. गुलमर्गचे मुख्य आकर्षण म्हणजे बर्फ आणि गोंडोला केबलकार. गोंडोला केबलकार दोन टप्प्यात आहे. पहिला मुख्य टप्पा आणि त्याच्या वर दुसरा टप्पा. दुसरा टप्पा अजुन उंचावर असल्याने तिथे उन्हाळ्यातदेखिल हमखास बर्फ असतेच. मात्र अति-उंचीमुळे तिथले हवामान खूप लहरी असते. आम्ही गेलो तेव्हा खराब हवामानामुळे दुसरा टप्पा बंद ठेवलेला होता. तिकीट घेतानाच हे कळाले. (नाहीतर पैसे वाया गेले असते!) रांग खूप मोठी असल्याने पहिल्या टप्प्यापर्यंततरी जाता येईल का ह्याची खात्री नव्हती. रांगेतच आमचे साधारण दीड-दोन तास गेले. केबलकारने पहिल्या टप्प्यावर पोहोचलो तोच पाऊस सुरू झाला आणि गारठा पण चांगलाच वाढला. तिथले जवळपास सगळेच पर्यटक उबदार आसर्‍यात गेले. आम्हीदेखिल एका टपरीच्या आसर्‍याला गेलो. टपरीवाल्याने मस्त शेकोटी पेटवली होती. पब्लिक मस्त चहा-कॉफी-मॅगी ऑर्डर करत होते. पाऊस थांबेपर्यंत काहीही करता येणार नव्हते. थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि चक्क मस्त ऊन पडले. ऊन पडताच सगळे पांगले. आम्ही पण मग बर्फात खेळायला गेलो. मनसोक्‍त खेळलो आणि कॅमेर्‍याने पण भरपूर क्लिकक्लिकाट केला. एव्हाना गोंडोलाची वेळ संपत आली होती. गोंडोलाच्या शेवटच्या फेरीने खाली आलो. इथे गाईडपण मिळतात पण आम्हाला त्याची काही गरज जाणवली नाही. एकदा बर्फात गेल्यावर फक्‍त बर्फात खेळावे वाटते, गाईडबरोबर कुठे पॉईंट बघत हिंडत बसणार.

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

अंधार पडायच्या आत आम्ही रूमवर परतलो. रूम मस्त मिळाली होती. रूमच्या दोन बाजूंना मोठ्या काचेच्या खिडक्या होत्या आणि त्यातून आम्हाला दूरवर पसरलेले गोल्फ-कोर्स तसेच बर्फाच्छादित अफ़रवत डोंगर दिसत होता.

1

संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात त्याच्यावरचे बर्फ मस्त चमकत होते. गुलमर्गला गारठा जरा जास्तच असतो. आणि संध्याकाळनंतर तो खूप वाढतो. त्यामुळे अंधारल्यावर रस्त्यावरची वर्दळ झपाट्याने कमी होते. दुसर्‍या दिवशी सकाळी इथले जवळपासचे एक-दोन पॉईंट्स पाहून आम्ही श्रीनगरकडे परत निघालो.

1

1

श्रीनगर-गुलमर्ग रस्त्यावर कार्पेट्स, शाली, पश्मीने वगैरेची बरीच दुकाने आहेत. सोहैलने एक-दोन ठिकाणी थांबवले पण आम्हाला ह्या खरेदीत फारसा रस नव्हता. त्यामुळे तिथे जास्त वेळ घालवला नाही.

श्रीनगरला साधारण दुपारी १२ पर्यंत पोहोचलो. निम्मा दिवस बाकी होता तेव्हा श्रीनगर फिरायचे ठरवले. प्रथम आम्ही शंकराचार्य टेकडीवर गेलो. इथे आद्य शंकराचार्यांनी भेट दिली होती व एक शंकराचे मंदिर उभारलेले होते. एकूणच ह्या टेकडीचा आणि मंदिराचा बराच इतिहास आहे. पण शंकराचार्य टेकडी ही एक फार सुरेख जागा आहे. साधारण २५० पायर्‍या चढुन गेल्यावर तुम्ही टेकडीच्या सर्वात ऊंच ठिकाणी पोहोचता. इथेच शंकराचे मंदिर आहे. टेकडीवरुन चहुबाजूला पसरलेले श्रीनगर फार छान दिसते. दल सरोवर, मस्त वळणे घेत चाललेली जेहलम नदी फारच छान. पण सुरक्षेच्या कारणास्तव कॅमेरा, मोबाईल काहीच वर नेऊन देत नाहीत त्यामुळे एकही फोटो काढता येत नाही. श्रीनगरमधे ह्या ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका.

इथुन पुढे आम्ही श्रीनगरमधल्या जगप्रसिद्ध ‘मुघल गार्डन्स'ला भेट दिली. सर्वप्रथम आम्ही ‘चश्मेशाही’ बागेला भेट दिली, नंतर ‘निशात बाग’ आणि शेवटी ‘शालीमार बाग’. तीनही बागा अतिव सुंदर आहेत. तीनही बागांची खूप छान पद्धतीने निगा राखलेली आहे. लॅण्डस्केपिंग खूप छान केले आहे. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे बागेची शोभा खूपच वाढवतात. तीनही बागांना प्रवेश फी आहे.
चश्मेशाही बाग त्यातल्या त्यात जरा छोटी आहे. चश्मेशाही म्हणजे ‘शाही झरा’. ह्या बागेत एक जिवंत नैसर्गिक झरा आहे ज्याचे पाणी खूप गोड आणि चवदार आहे. (हेच पाणी पं. नेहरूंना काश्मीर मुक्कामात पिण्यासाठी पुरवले जायचे असे म्हणतात) ही बाग शाहजहानने स्वतःच्या देखरेखीखाली ज़बरवान डोंगराच्या पायथ्याशी ई.स. १६३८ मध्ये वसवलेली होती.

1

1

1

1

इथुन पुढे आम्ही निशात बागेत गेलो. निशात बागचा शब्दशः अर्थ ‘आनंदाची बाग' किंवा ‘आनंदबाग’. ही दल सरोवराच्या पूर्व भागात सरोवराच्या काठावरच आहे. आकाराने श्रीनगरमधली दुसर्‍या क्रमांकाची मुघल बाग. ही देखिल ज़बरवान डोंगराच्या पायथ्याशीच ई.स. १६३३ मध्ये आसिफ खान याने वसवली. निशात बाग ही देखिल नितांत सुंदर बाग आहे.

1

1

निशात बागेतून समोर दिसणारे दल सरोवर आणि त्यामागे दिसणारा बर्फाच्छादित पीरपांजाळ हे एक नितांत सुंदर द्रुश्य आहे.

1

निशात बागेतून पुढे आम्ही शालीमार बागेला भेट दिली. शालीमार बाग दल सरोवराच्या ईशान्येला शाहजहानने त्याची बायको नूरज़हांसाठी बनवली होती. ही बाग मुघल पद्धतीच्या बागकामाचा परमोच्च बिंदू मानली जाते. शालीमार बाग तीन सज्जात विभागली आहे. पहिला दिवाण-ए-आम, दुसरा दिवाण-ए-खास व तिसरा ज़नाना बाग. हे तीनही भाग बागेच्या मधोमध वाहणार्‍या कालव्याच्या बाजूबाजूने तयार केलेले आहेत. कालव्याच्या बाजूने दुतर्फा चिनार झाडांची रांग आहे. तसेच कालव्यात बरीच कारंजी देखिल आहे. तिसर्‍या सज्जाच्या मागील वरच्या सज्जातून सगळीकडे पाणी खेळवले जाते. एकूणच, हे सर्व द्रुश्य फारच विलोभनीय दिसते. शिशिर आणि वसंत ऋतूंमध्ये चिनारच्या पानांचा रंग बदलतो आणि त्यावेळेस बागेचे सौंदर्य अजूनच खुलते. मुघलांच्या नंतरच्या शासनकर्त्यांनी देखिल ह्या बागांची विशेष काळजी घेतल्याने ह्या सर्व मुघल बागा अजूनही सुस्थितीत आहेत. जहांगीरला मरणासन्न अवस्थेत असताना त्याची शेवटची इच्छा विचारली असता तो म्हणाला होता “काश्मीर! बाकी सारे व्यर्थ.”

1

1

1

शालीमार बागेतच कवी अमीर ख़ुस्रोचे काश्मीरबद्दलचे हे सुप्रसिद्ध वाक्य कोरलेले आहे:

“गर फिरदौस बर रोय-ए-ज़मीं अस्त, हमीं अस्त-ओ हमीं अस्त-ओ हमीं अस्त”.

====================================
भाग-१
भाग-२
भाग-३
भाग-४
====================================

टीपः फोटो मोठ्या आकारात बघण्यासाठी फोटोवर Right Click करून स्वतंत्र windowमधे open करा.

प्रतिक्रिया

वा. छान भटकंती घडवताय वाचकांना. अमीर ख़ुस्रोचे ते उद्गार देताना तुम्ही नुक्ता व्यवस्थित दिला आहे हे फार आवडले. पुभाप्र.

पद्मावति's picture

14 Sep 2017 - 12:57 am | पद्मावति

अप्रतिम!

सुंदर व उपयोगी माहिती देणारी मालिका आहे. फार आवडली आहे.

दुर्गविहारी's picture

14 Sep 2017 - 5:36 pm | दुर्गविहारी

खुपच सुंदर माहिती.काश्मीरची सध्याची परिस्थिती पहाता हि सर्व ठिकाणे प्रत्यक्ष पहाता येतील कि नाही याची शंकाच आहे.

पैसा's picture

14 Sep 2017 - 5:47 pm | पैसा

फोटो आवडले

स्वाती दिनेश's picture

21 Sep 2017 - 6:24 pm | स्वाती दिनेश

फोटो व माहिती आवडली,
स्वाती