माझं माहेर म्हणजे " नारळाचं खाणार त्याला देव देणार " वालं. त्यामुळे सगळ्या पदार्थात नारळ असतोच. तर गणपतीसाठी अशीच नारळात आकंठ बुडालेली रेसिपी. मणगणं
साहित्य-
१) चणा डाळ एक वाटी
२) साबुदाणा पाव वाटी
३) शेंगदाणे अर्धी वाटी
४) काजू तुकडा अर्धी वाटी
५) बदाम अर्धी वाटी
६) बेदाणे अर्धी वाटी
( वरील सर्व सुमारे तीन तास भिजत ठेवणे.)
७) एक मोठा अख्खा खवलेला नारळ
८) गूळ दोन वाट्या ( चवीप्रमाणे कमी जास्त )
९) तूप एक चमचा
१०) लवंग ४-५
११) वेलची पूड अर्धा चमचा
१२) केशर
.
.
कृती.
१) चणा डाळ, साबुदाणा , शेंगदाणा , काजू, बदाम, बेदाणे धुवून सुमारे तीन तास पाण्यात वेगवेगळे भिजत ठेवावेत.
२) शेंगदाणे, बदाम सोलून त्याचे काप करावे. (शेंगदाण्याचे दोन तुकडे करायला भारी पेशन्स लागतो. तो नसेल तर शेंगदाणे नाही घेतले तरी चालेल. आई, आज्जी, शेंगदाणे घालायच्या कारण बाकी सुका मेवा परवडत नसावा त्यामुळे ती आठवणीतली चव यावी म्हणून मी शेंगदाणे घालते.)
३) नारळ खवून, मिक्सर मधून थोडे पाणी घालून, पहिला जाड रस काढावा. परत त्या खोबऱ्यात थोडे पाणी घालून दुसरा थोडा पातळ रस काढावा.
४) भिजलेली डाळ, साबुदाणा , शेंगदाणे, बदाम आणि काजू यामध्ये नारळाचा पातळ रस घालून कुकरमध्ये शिजायला ठेवावे. (वेगळे पाणी घालू नये.) शिजताना डाळ उतू जाते म्हणून भांड मोठे आणि उभे घ्यावे. आणि रस जास्त घालू नये. साबुदाणे असल्यामुळे डाळ छान एकजीव होते.
५) एक जाड बुडाचे भांडे गॅस वर ठेऊन ( गॅस पेटवून:)) त्यात चमचाभर तूप घालावे. ते गरम झाले की लवंगा घालाव्या. त्यात लगेच शिजवली डाळ, काजू बदाम वगैरे ओतावे. त्यात गूळ, मनुका वेलची केशर घालून जरा उकळी काढावी . नारळाचा पातळ रस उरला असेल तर तोही घालावा, ( गुळाचे प्रमाण ज्याच्या त्याच्या चवीनुसार कमी जास्त.)
६) छान शिजल्यावर गॅस बंद करावा आणि नंतर त्यात नारळाचा जाड रस घालावा. झाले मणगणं तयार. गार किंवा गरम दोन्ही छान लागते.
.
प्रतिक्रिया
31 Aug 2017 - 10:02 am | पैसा
यावर्षी गोव्यात नसल्याने आयते हादडायला कोणी देणार नाहीये. चला उठा अस्मादिकांनो, मणगणं हवं असेल तर स्वतःचे हात पाय हलवा!
फोटो मस्त आलेत! तांब्याच्या भांड्यात किटी वेळ ठेवता येईल पण?
पाककृतीमधील "गॅस पेटवा" ही अतिशय महत्त्वाची सूचना दिल्याबद्दल धन्यवाद! सर्व हौशा गवशा नवशा स्वयंपाक्यांसाठी अत्यंत मननीय आहे! =))
1 Sep 2017 - 8:02 am | प्राची अश्विनी
;)
31 Aug 2017 - 10:09 am | नूतन सावंत
छान पाककृती.माहेरच्या इमारतीतील एक गोवेकर काकू गणपतीला या खिरीचा नैवेद्य दाखवतात,त्यात ओल्या खोबऱ्याचे पातळ काप असतात,(चिवड्यात जसे सुक्या खोबऱ्याचे असतात तसे)
अतिशय चविष्ट लागते ही खीर.
1 Sep 2017 - 8:06 am | प्राची अश्विनी
हो. अगदी बरोबर. मी विसरून गेले होते.
31 Aug 2017 - 11:22 am | अनन्न्या
नारळ शब्द ऐकून बरं वाटलं, आमच्याकडे ओलं खोबरं म्हणतच नाहीत , नारळचं म्हणतात! मला इथे लिहिताना आठवणीने लिहावं लागतं!
31 Aug 2017 - 12:54 pm | सूड
त्यातही नारळ खवून म्हटलंय. काही लोक किसून म्हणतात.
31 Aug 2017 - 12:58 pm | पैसा
सुकं खोबरं किसावं लागतं आणि नारळ खवतात. पण "नारळ किसून" हे वाचून वाचून आता निगरगट्ट व्हायला झालंय.
31 Aug 2017 - 2:48 pm | प्रीत-मोहर
हो अणि!! खोबरं हे बाय डिफॉल्टसुककंच असत. नारळ ओला :)
31 Aug 2017 - 12:02 pm | स्वाती दिनेश
फोटोतच इतके चविष्ट दिसते आहे तर प्रत्यक्ष काय असेल?
नारळ आणि गूळ हे काँबो भयंकर आवडीचे आहे.
स्वाती
31 Aug 2017 - 12:27 pm | सूड
सुंदर. कुकरमध्ये म्हणजे साधारण एखादी शिट्टी होईपर्यंत का?
31 Aug 2017 - 12:39 pm | पैसा
डाळ मऊ झाली पाहिजे साबुदाण्यात मिसळेल अशी.
1 Sep 2017 - 8:05 am | प्राची अश्विनी
मी मध्यम आचेवर तीन शिट्ट्या येईपर्यंत आणि नंतर गैस बारीक करून पाच मिनिटे ठेवते.
31 Aug 2017 - 12:50 pm | सविता००१
वा. कधीच खाल्ला नाहीये हा प्रकार. आता करायलाच हव. फोटो मस्त आलाय
31 Aug 2017 - 2:24 pm | पद्मावति
मस्तच!
31 Aug 2017 - 2:40 pm | प्रीत-मोहर
हमार फेवरिट पाकृ!! मी असही करुन करुन गिळत असे :)
31 Aug 2017 - 2:46 pm | बाजीप्रभू
+११११
31 Aug 2017 - 2:58 pm | सस्नेह
सुरेख पाकृ !
नारळ गूळ बाप.पांना भारी प्रिय. आणि म्हणून सर्वांना !
हरभरा डाळीला काही substitute ?
31 Aug 2017 - 3:00 pm | सस्नेह
बाप्पांना असे वाचावे
31 Aug 2017 - 3:06 pm | प्रीत-मोहर
मणगणं ह. डाळीचच करतात अगं.
1 Sep 2017 - 8:08 am | प्राची अश्विनी
मूगडाळीचं करून बघायला हवं. कारण मूगडाळीचं पुरण पण चांगलंच लागतं.
31 Aug 2017 - 3:28 pm | केडी
छान, एकदाच मुळगाव (गोवा) मध्ये प्रसादाला म्हणून खाल्लेला आठवतंय.....आता घरी करून बघेन....
31 Aug 2017 - 4:45 pm | सानिकास्वप्निल
खूप खूप आवडतं.
झकास पाककृती आहे.
31 Aug 2017 - 5:23 pm | अजया
मस्त पाकृ
गॅस पेटवायच्या सूचनेबद्दल धन्यवाद _/\_
- दिलीतशीरेसिपीकरुनबघ्णारमहासंघाकडून पुस्प्गु्च
1 Sep 2017 - 8:05 am | प्राची अश्विनी
;)
1 Sep 2017 - 10:34 am | पैसा
=))
31 Aug 2017 - 5:41 pm | रेवती
रेसिपी आवडली. आधी वाटायचं की नावावरून हा पदार्थ वाटल्या डाळीसारखा असणार पण हा खिरीसारखा आहे.
31 Aug 2017 - 5:54 pm | गम्मत-जम्मत
नारळाचे दूध + गुळ हे अत्यंत प्रिय प्रकरण असल्याने या शनिवारी हि पाकृ करण्यात येईल.
1 Sep 2017 - 8:09 am | प्राची अश्विनी
आवडली का ते नक्की कळवा.
1 Sep 2017 - 2:55 am | विशाखा राऊत
अरे वाह मस्त
1 Sep 2017 - 8:09 am | प्राची अश्विनी
धन्यवाद सगळ्यांना.
1 Sep 2017 - 3:54 pm | पूर्वाविवेक
मणगणं.. भारी भक्कम नाव पण दिसतेय छान! नारळाचे दूध आणि गुळ ह्या अलौकिक संगमाने पदार्थ उत्तम होणार याची खात्रीच असते.
2 Sep 2017 - 1:49 am | रुपी
मस्त!
या वर्षी बरेच वेगवेगळे पारंपरिक पदार्थ पहायला मिळत आहेत..
8 Sep 2017 - 7:59 am | जुइ
कधीही खाल्ला नाहिये हा प्रकार. मस्त दिसत आहे एकदम.