श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ५ : माझी मी जन्मले फिरुनी

Primary tabs

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in लेखमाला
30 Aug 2017 - 9:39 am

माझी मी जन्मले फिरुनी

१९९३चा मे महिना होता. जळगावचं रणरणतं ऊन मी म्हणत होतं. त्यात माझ्या चुलतबहिणीचं लग्न असल्याने आणि साडी नेसण्याची हौस असल्याने मी सकाळपासूनच झकास तयार होऊन मिरवत होते. मार्चमध्ये बारावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे आता सिनिअर कॉलेजला जाणार, म्हणजे मोठी झाले आहे... असा माझा एकूण आविर्भाव होता. मे महिन्याची एकोणतीस तारीख होती, पण अजून बारावीचा निकाल लागला नव्हता. आदल्या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात निकाल जाहीर झाला होता, त्यामुळे मनातून खूप धाकधूक होती. सकाळपासून दोनदा जवळच्या S.T.D. बूथवर जाऊन मी मुंबईच्या मैत्रिणीला फोन करून निकाल कधी लागणार आहे ते विचारलं होतं. पण तोपर्यंत काही कळलं नव्हतं. संध्याकाळी कार्यालयातून निघताना मी हट्टाने परत एकदा मैत्रिणीला फोन करायला गेले. आईच्या मते इतक्यात निकाल लागणार नव्हता. तसेही आम्ही तीस मेला, म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघणार होतो. त्यामुळे मी उगाच फोन करते आहे असं तिचं मत होतं. तरीही मी फोन केलाच.

माझ्या मैत्रिणीने तिसऱ्या फोनच्या वेळी मला सांगितलं की निकाल उद्या संध्याकाळी, म्हणजे तीसलाच आहे. हे ऐकताच मी खूपच अस्वस्थ झाले. मला लगेच मुंबईला जायचं होतं. घरी पोहोचल्याबरोबर मी आई-वडिलांना रडक्या आवाजात सांगितलं की निकाल उद्याच आहे आणि मला आजच... आत्ता निघायचं आहे. निकाल लागणं म्हणजे त्या वेळी मोठी गोष्ट होती. आजकालची मुलं online निकाल बघून घेतात आणि निकाल लागला तरी अ‍ॅडमिशनदेखील online असल्याने निवांतच असतात. निकाल लागणं ही आमच्यावेळी खूपच मोठी गोष्ट होती.

माझा हट्ट कमी होत नव्हता. माझी आत्या आणि काका त्याच दिवशी रात्री साडेनऊच्या ट्रेनने निघणार होते. त्यांचं रिझर्वेशन होतं, त्यामुळे आई-बाबांनी मला त्यांच्याबरोबर पाठवावं असं माझं म्हणणं होतं. शेवटी माझी आत्या मध्ये पडली आणि म्हणाली की “मी घेऊन जाते तिला. ट्रेनमध्ये बघू काय करायचं ते.”

ठरल्याप्रमाणे मी, आत्या आणि काका रात्री स्टेशनवर आलो. पोहोचल्यावर आम्हाला कळलं की ट्रेन लेट होती. मी आणि आत्या दिवसभराच्या लग्नाच्या गडबडीमुळे खूपच दमलो होतो. त्यामुळे एका बाकड्यावर बसलो आणि डुलक्या काढायला लागलो. आमच्या या डुलक्यांमुळे काका फारच वैतागले होते. अचानक काका ओरडले, "उठा... ट्रेन आली." आम्ही दोघी धडपडत उठलो. आत्याने माझ्या हातात एक लहानशी हँडबॅग दिली. माझी बॅग आणि इतर सामान आत्या आणि काकांनी उचललं. काका माहिती काढून आले होते की ट्रेन फक्त पाच मिनिटंच उभी राहते. त्यामुळे आम्ही धावत पळत आमच्या डब्याजवळ गेलो. ट्रेनमधून उतरणारे आणि चढणारे यांची एकच झुंबड उडाली होती. प्रत्येकालाच घाई होती. खरं तर माझ्या डोळ्यावरची झोप अजून उडाली नव्हती. त्यामुळे आत्याचा हात धरून मी तिच्या मागून खेचल्यासारखी चालत होते. अचानक आत्याचा हात सुटला आणि माझ्या काही लक्षात यायच्या आत आत्या आणि काका ट्रेनमध्ये चढलेदेखील. मी गोंधळून गेले. त्यातच ट्रेनमधून उतरणाऱ्या लोकांनी मला मागे लोटलं. त्यामुळे मी ट्रेनपासून लांब ढकलले गेले. अचानक ट्रेन सुटली आणि मी तशीच फलाटावर उभी राहिले. माझ्या डोळ्यासमोरून ट्रेन जात होती आणि मी गोंधळून मोठ्याने रडत आत्याला हाका मारत होते.

ट्रेनमधून उतरणाऱ्या लोकांनी मला “काय झालं?” म्हणून विचारलं. मी कसंबसं रडत काय झालं ते सांगितलं. त्यावर 'बिच्चारी' असं म्हणत सगळेच निघून गेले. तोवर रात्रीचे साडेअकरा होऊन गेले होते. पाचच मिनिटांत संपूर्ण फलाट रिकामा झाला. आता फलाटावर रडणारी मी आणि समोरच्या फलाटावरच्या स्टेशन मास्तरच्या कार्यालयातले स्टेशन मास्तर असे दोघेच उरलो होतो. काय करावं मला सुचत नव्हतं. स्टेशन मास्तर मला बघून रेल्वे लाईन क्रॉस करून माझ्याकडे आले. त्यांना मी झालेला प्रकार सांगितला. त्यांनी मला विचारलं, "मग आता तू काय करणार?" मला काहीच सुचत नव्हतं. त्यांनी एकदा उजवी-डावीकडे बघितलं आणि म्हणाले, "चल, माझ्या ऑफिसमध्ये ये. मग बघू काय करायचं ते." मी नकळत त्यांच्या मागून चालायला लागले. आम्ही फलाटाच्या एका टोकाला आलो. आता रूळ पार करून समोरच्या फलाटावरच्या त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं होतं. तेवढ्यात समोरून एक तरुण पोलीस आला. मला स्टेशन मास्तरांबरोबर बघून त्याने मला विचारलं, "कोण गं तू? आणि या वेळी इथे काय करते आहेस?" मी काही बोलायच्या आतच स्टेशन मास्टर म्हणाले, "तिचे नातेवाईक ट्रेनने गेले. ही चुकून मागे राहिली आहे. मी तिला माझ्या ऑफिसमध्ये घेऊन जातो आहे. मग ती ज्यांच्याकडे उतरली आहे त्यांना फोन करून बघीन. नाहीतर मग काय ते बघावं लागेल."

त्या पोलिसाने स्टेशन मास्तरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि मला विचारलं, "अशी कशी राहिलीस गं? खरंच कोणी होतं तुझ्याबरोबर की खोटं बोलते आहेस?" मी परत रडायला लागले आणि उलट त्यालाच विचारलं, "मी तुम्हाला घरातून पळून आलेली वाटते का? आणि पळून आले असते तर असे पैसे नाहीत, कपडे नाहीत अशी गोंधळून रडले असते का? मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी आले होते. बारावीचा निकाल उद्या लागणार म्हणून घाईने आत्या आणि काकांबरोबर निघाले. पण ते ट्रेनमध्ये चढले आणि मी राहिले. काय करू आता?" माझ्या बोलण्याने त्याला काय वाटलं कोण जाणे, पण तो हसला आणि त्याने मला विचारलं, "तू इथे ज्यांच्याकडे उतरली आहेस त्यांचा फोन नंबर आहे का तुझ्याकडे?" मी परत रडवेली होत नकारार्थी मान हलवली. त्यावर त्याने विचारलं की, "घर कुठे आहे माहीत आहे का?" त्यावरदेखील मी 'नाही' म्हणून मान हलवली. मग तो पोलीस स्टेशन मास्तरांकडे वळला आणि त्यांना विचारलं, "मास्तर, परत ट्रेन आहे ना आता?" मास्तरांनी माझ्याकडे न बघता त्याला उत्तर दिलं, "हो, आहे! अजून तासाभराने. हवं तर तिला तिच्या घरी सोडायची सोय मी करतो." पण मास्तरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत तो पोलीस मला म्हणाला, "हे बघ, जर तुझी आत्या किंवा काका पुढच्या स्टेशनवर उतरून मागे आले आणि तू दिसली नाहीस, तर ते घाबरतील. त्यामुळे तू आता इथेच या फलाटावर थांब. समजा, ते आलेच नाहीत, तर तासभराचा प्रश्न आहे. मग इथूनच मुंबईसाठी पुढची ट्रेन आहे. मी त्यात तुला बसवून देईन. पण आता इथून हलायचं नाही. मी इथेच आहे गस्तीवर. त्यामुळे तुला घाबरायचीदेखील गरज नाही." त्याचं बोलणं ऐकून मास्तरांनी एकदा माझ्याकडे बघितलं आणि ते पलीकडच्या फलाटावर त्यांच्या कार्यालयात निघून गेले.

त्या पोलिसाचं बोलणं ऐकून मला खूपच धीर आला. खरं तर तो पोलीस अगदीच तरुण होता आणि स्टेशन मास्तर जवळजवळ माझ्या वडिलांच्या वयाचे होते. तरीदेखील का कोण जाणे, मला त्याचं म्हणणं पटलं. मी त्याच्यामागून परत फलाटावर आले आणि एका बाकड्यावर बसले. आता झोप पार उडून गेली होती. समोरच्या बाजूने परतीची एखादी ट्रेन येते आहे का आणि त्यातून आत्या-काका येतात का, याची मी वाट बघत होते. कदाचित ते परत येतील असं माझं मन मला सांगत होतं. समोरून एक ट्रेन आली आणि मी उठून उभी राहिले. पण ट्रेन आली तशी गेली. मात्र उतारूंमध्ये माझे काका किंवा आत्या नव्हते. तो पोलीसदेखील माझ्याजवळ येऊन उभा होता. त्याने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. मी त्याच्याकडे बघत, ‘नाही’ म्हणून मान हलवली. त्यावर तो म्हणाला, "अगं, त्यांना ही ट्रेन मिळाली नसेल. तू चिंता करू नकोस. आता मुंबईकडची ट्रेन येते आहे. मी त्यात तुला नक्की बसवून देतो." त्यावर मी “बरं” म्हणून परत बाकड्यावर जाऊन बसले.

थोड्या वेळाने एक ट्रेन आली. इतक्या उशिराच्या ट्रेनसाठी कोणीही चढणारे नव्हते. फलाट पूर्ण रिकामा होता. तो पोलीस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “जो डबा समोर येईल त्यात आपण चढू या. मग मी तुझी बसायची सोय करीन.” ट्रेन थांबली आणि आम्ही समोरच्या डब्यात चढलो. आता मात्र माझं नशीब बलवत्तर होतं. आम्ही चढलो तो डबा पोलिसांसाठी राखीव होता आणि अनेक पोलीस त्यांच्या कुटुंबांबरोबर मुंबईला जात होते. त्या तरुण पोलिसाने समोर असणाऱ्या एका पोलिसाला घडलेला एकूण प्रकार सांगितला आणि मला मुंबईला उतरवून द्यायला सांगितलं. मग माझ्याकडे वळून तो म्हणाला, "मुंबईला उतरलीस की काय करशील? घरी एकटी जाऊ शकशील का?" मी पहिल्यांदा हसत म्हणाले, "अहो, मी मुंबईचीच आहे. रोज लोकलने प्रवास करते. नक्की जाईन मी घरी." त्याने माझ्या खांद्यावर थोपटलं आणि मला “सुखरूप जा” असं म्हणून खाली उतरला, तोवर ट्रेनदेखील सुरू झाली होती. मी त्याला हात हलवून निरोप दिला.

एका पोलिसाने मला त्याच्या बायकोशी ओळख करून दिली. तिच्यासमोरचा त्याचा स्वतःचा बर्थ मला देत म्हणाला, "इथे झोप तू. ट्रेन दादरला थांबते. तू कोणाकडे जाणार आहेस मुंबईला?" मी म्हणाले, "माझ्या आत्याच्या घरीच जाईन. कारण अजून माझे आई-बाबा जळगावलाच आहेत. ते उद्या रात्री निघून परवा येतील." एकदा ट्रेनमध्ये बसल्यानंतर मी एकदम निवांत झाले होते. थोड्या वेळाने तर मला डुलकीदेखील लागली. साधारण सकाळी आठच्या सुमाराला ट्रेन दादरला आली. मला त्या पोलिसच्या बायकोने उठवलं आणि उतरायला सांगितलं. मी पटकन उठून त्यांचे दोघांचे आभार मानले आणि खाली उतरले. आत्या सांताक्रूझला स्टेशनच्या अगदी जवळ राहायची. माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. पण मी फार विचार केला नाही. सरळ लोकल ट्रेन पडकली आणि सांताक्रूझला स्टेशनला उतरून मी चालत आत्याच्या घरी पोहोचले.

मी गेटजवळ पोहोचताच आत्याला मोठ्याने हाक मारली आणि घराकडे धावले. आत्या आणि काका माझा आवाज ऐकून धावत बाहेर आले. आत्या आणि काका पाहाटे पाचलाच मुंबईला पोहोचले होते. त्यांनी दादर स्टेशनहूनच जळगावला काकांच्या शेजाऱ्यांकडे फोन केला होता आणि मी स्टेशनवर राहिल्याचं कळवलं होतं. त्यांना वाटलं होतं की मी परत घरी गेले असेन. पण मी तिथे नाही म्हटल्यावर आत्या खूप घाबरली होती. तिथे आई आणि आजीला काहीच सांगितलं गेलं नव्हतं. पण माझा भाऊ, वडील, काका सगळेच मला शोधायला बाहेर पडले होते. घरतल्या पुरुषांमध्ये तणावाचं वातावरण होतं. मला मात्र ट्रेनमध्ये बसल्यानंतर एकदम निवांत वाटायला लागलं होतं. त्यामुळे बाकी काय गोधळ झाला असेल याचा विचारदेखील मी केला नव्हता.

मला बघितल्याबरोबर आत्या रडायला लागली. काका मात्र आत धावले आणि त्यांनी लगेच जळगावला फोन लावला. मी सुखरूप घरी आल्याचं त्यांनी कळवलं. काय झालं-कसं झालं ते सांगण्यासाठी फोन माझ्या हातात दिला. मी वडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. मी घरी सुखरूप आल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

मात्र हा प्रसंग इथेच संपत नाही. कारण साधारण - वर्षभराने जुलै १९९४मध्ये जळगावमध्ये घडलेलं सेक्स स्कँडल एकदम समोर आलं. माझ्या मते वर्तमानपत्रातून जगासमोर आलेलं हे पहिलं सेक्स स्कँडल होतं. शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना फसवून त्यांच्यावर बलात्कार केला गेला होता. त्यांची व्हिडिओ टेप बनवून त्यांना धमकावलं गेलं होतं आणि अनेक मुलींची विक्री केली गेली होती.
सकाळीच वर्तमानपत्रातली ती बातमी वाचून माझी आई एकदम रडायला लागली. मला जवळ घेऊन ती म्हाणाली, "वर्षभरापूर्वी तू एकटीच त्या एकलकोंड्या स्टेशनवर होतीस. काय झालं असत गं तुझं? मला विचारही करवत नाही. भलं व्हावं त्या तरुण पोलिसाचं. अगदी देवासारखा पावला गं तो तुला. त्याने तुला ट्रेनमध्ये बसवून दिलं, म्हणून माझी लेक काही वाकडंतिकडं न घडता सुखरूप घरी परतली."
त्यानंतर माझी आई आणि वडील मुद्दाम जळगावला त्या पोलिसाला शोधायला आणि त्याचे आभार मानायला गेले. पण त्याचा पत्ता लागला नाही.

ज्या वेळी मी स्टेशनवर राहिले होते किंवा ट्रेनमध्ये बसले किंवा अगदी आत्याच्या घरी पोहोचले, तरी मला एकूण मी केलेल्या पराक्रमाचा भयंकर परिणाम कळला नव्हता. मात्र जळगाव सेक्स स्कँडलबद्दल कळल्यानंतर मात्र माझं मला मनापासून वाटलं, ‘खरंच............ माझी मी जन्मले फिरुनी.’

प्रतिक्रिया

बाजीप्रभू's picture

30 Aug 2017 - 11:18 am | बाजीप्रभू

वाचतांना ठोके वाढले होते पण मग शेवट गोड झाल्याने आनंद झाला.

मीहि असाच एकदा बाबांचा हाथ सुटल्याने स्टेशनावर राहिला ७-८ वर्षांचा होतो... पण ती संधी साधून मी जवळच्याच एका व्हिडीओ पार्लरमधे घुसलो होतो... तिर्थरुपांनी आमचा शोध लावून सालट काढली हे वेगळं सांगायला नको.

वयाच्या ७व्या-८व्या वर्षी? जबरी हो दादा! आपण फुल्ल स्पीड वर फिरणारा पंख झालो तुमचा :))

कपिलमुनी's picture

31 Aug 2017 - 7:05 am | कपिलमुनी

8 व्या वर्षी व्हिडीओ पार्लर मग 21 वर्षी थायलंड ला जाणारच ;)

पैलवान's picture

30 Aug 2017 - 11:58 am | पैलवान

मोबाईल कनेक्टिविटी सहज उपलब्ध असताना आता जर मुलीचा फोन लागला नाही तर घरच्यांचा जीवात जीव राहत नाही. तेव्हा तुम्ही आत्याच्या घरी पोहचेपर्यंत आत्या व काकांची काय मनस्थिती झाली असेल....

बाजीप्रभू's picture

30 Aug 2017 - 12:08 pm | बाजीप्रभू

भारतात इतक्या वर्षांनीही आपल्याला सिक्युरिटीची चिंता करावी लागते... हा एकप्रकरचा पराभवच म्हणायला हवा.
मला स्वतःचंही कधी कधी आश्चर्य वाटतं,
मुलीला शिक्षणासाठी परदेशात एकटं पाठवायला तयार आहे पण नाक्यावरच्या वाण्याकडे एकटं पाठवायला मन धजावत नाही.

परदेशांत भारतीय लोकां कडे चोर / रेपिस्ट सुद्धा ढुंकून पाहत नाहीत.

सप्तरंगी's picture

1 Sep 2017 - 7:02 pm | सप्तरंगी

परदेशांत भारतीय लोकां कडे चोर / रेपिस्ट सुद्धा ढुंकून पाहत नाहीत.

काहीही. असे काही नाहीये. आणि या वाक्यावरून काहीही अर्थ निघु शकतात, जरा जपून !!

स्वाती दिनेश's picture

30 Aug 2017 - 1:09 pm | स्वाती दिनेश

शेवटी एकदा तू घरी पोहोचलेली वाचून मलाच हुश्श झालं..
स्वाती

ऋतु हिरवा's picture

30 Aug 2017 - 3:00 pm | ऋतु हिरवा

चांगला अनुभव. एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर आपलं आपल्यालाच आश्चर्य वाटतं . आपण कसं निभावलं याचं

जव्हेरगंज's picture

30 Aug 2017 - 3:10 pm | जव्हेरगंज

खूप छान मांडलाय अनुभव!!!

माझीही शॅम्पेन's picture

30 Aug 2017 - 3:33 pm | माझीही शॅम्पेन

अनुभव एकदम थरारक आहे , त्याकाळी फोन नव्हते त्यामुळे किती प्रॉब्लेम व्हायचे

वर्षभराने जुलै १९९४मध्ये जळगावमध्ये घडलेलं सेक्स स्कँडल

सेक्स स्कॅंडल हे काही वर्ष चालू होत , पंडित सप्काळ इत्यादी मंडळी गावातून शिकायला येणार्‍या मुलींना किवा कॉलेज मध्ये प्रवेश घेणार्‍या मुलींना टार्गेट केल जायचे त्यामुळे तुम्हाला तस काही झाल नसत...त्यामुळे बाप रे तुम्ही किती मोठ्या संकटातून (सेक्स स्कँडल मधून ) वाचलात वैगरे टाईप प्रतिक्रिया देऊ शकत नाही , क्षमस्व , आमच्या कॉलेज मधली एक मुलगी त्यात अडकली होती

दुसर म्हणजे हे सेक्स स्कॅंडल सोडाल तर जळगाव हे त्या काळी अतिशय सुरक्षित शहर होत , माझे आजोबा जळगाव मध्ये स्थायिक झाले होते आणि माझ कॉलेज शिक्षण सुद्धा जळगवातून झाले आहे. माझे आजोबा पुढील वाक्य नेहमी म्हणायचे "एखाद्या लहान मुलाला जरी सोनाराच्या दुकानात योग्य पैसे घेऊन पाठवाल तर सोनार चोख सोनच देईल" तुमचा अनुभव म्हणून आदर आहे पण थोडक्यात जळगाव खूप चांगल शहर होत

ज्योति अळवणी's picture

30 Aug 2017 - 5:04 pm | ज्योति अळवणी

माझीही शँपेन जी,
माझे काकाच तिथे राहत होते. मी जळगावला दोष देत नाहीये. फक्त त्या परिस्थितीच वर्णन केलं आहे. मी तेव्हा केवळ 17 वर्षांची होते. कॉलेजच्याच वयाची. ज्या वयातल्या मुलींच्या संदर्भातील छळ पुढे प्रकाशात आला. त्यामुळे माझ्या आईच्या मनात 'माझी मुलगी वाचली' हा विचार आला किंवा 'मी खरंच वाचले' असा विचार आला; तर त्याचा अर्थ जळगाव असुरक्षित होते तेव्हा असा अर्थ होत नाही. जळगाव चांगलं शहर होत आणि आहे. अहो, अनेक शहरात अनेक वाईट घटना घडत असतात म्हणून काही आपण त्या शहराला दोष देत नाही न?

माझं त्यावेळच वय, रात्र आणि मी एकटी स्टेशनवर अडकण हे भयानक होतं आणि त्यानंतरच्या बातम्यांमुळे सुटले अस वाटणं सहाजिक होत; अस मला वाटतं.

पण जर मी तुमच्या जळगावसाठीच्या असलेल्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व

माझीही शॅम्पेन's picture

31 Aug 2017 - 6:17 pm | माझीही शॅम्पेन

तुमच्या वरचा प्रसंग अतिशय गंभीर होता आणि तुम्ही तो व्यवस्थितपणे लिहिला आहे पण मी प्रतिक्रिया लिहिताना बहुतेक काहीतरी गडबड केली माफ करा - भावना जळगाव बद्दल वैगरे काही नाही , तुम्ही जे म्हणता झालं असत ते तस कदाचित झालं नसत हे सांगायचं होत

जळगावला तुम्ही प्लॅटफॉर्मवर गाडी सुटून सेक्स स्कँडल मध्ये सापडला असतात हे म्हणणं म्हणजे एखादा १३ वर्षाचं तरुण मुंबईत जर असा हरवला तर अंडरवर्ल्ड मध्ये फसला असता किंवा म्हैसूरच्या जंगलाजवळ हरवला असता तर वीरप्पनच्या टोळीत सामील झाला असता बोलण्यासारखं आहे.

खरोखर मोठं संकट टळलं तुमच्यावरचं.

सिरुसेरि's picture

30 Aug 2017 - 4:10 pm | सिरुसेरि

थरारक अनुभव .

स्टेशन मास्तरचा संशय यायला लागला होता पण तसं काही घडलं नाही हे बरं झालं.

सप्तरंगी's picture

30 Aug 2017 - 7:08 pm | सप्तरंगी

त्याकाळी अशी दूर एकटे जायची सवय नसेल म्हणुन नाहीतर हा अगदी जन्मले फिरुनी असा अनुभव मला तरी वाटत नाही. १७ वर्षे म्हणजे फार लहान वय नाही अर्थात तेंव्हा mobile नव्हता त्यामुळे आत्ताइतके सोपे नव्हते हे हि खरेच. पण विशेषतः मुलींसाठी परिस्थिती कायमच त्रासाची असते आणि तू त्यातून सुखरुप घरी पोहोचलीस हे चांगले.

आज यातून बोध घ्यायचा तर आपल्या मुलांना मोबाइल बरोबरच आपण कुठे जात आहोत त्याचा address, पैसे, identity वगैरे कायमच बरोबर द्यावी, आणि गरज पडल्यास कोणाशी बोलावे , स्वतःसाठी कसे उभे राहावे याचा सल्ला द्यावा.

पैसा's picture

30 Aug 2017 - 10:52 pm | पैसा

विलक्षण अनुभव. घरच्या मंडळीना जास्त काळजी लागली असणार. आपण त्या वयात बरेच बेफिकीर असतो!

पुंबा's picture

31 Aug 2017 - 9:45 am | पुंबा

छान मांडलाय अनुभव.

नूतन सावंत's picture

31 Aug 2017 - 9:59 am | नूतन सावंत

तू काही न घडता घरी पोचलीस हे छान झाले,पण तू संकटातून वाचलीस हे तुझ्या आईवडीलांना कळायला एक वर्ष लागले ,ते पण सेक्स स्कँडलची बातमी वाचल्यावर, याचे आश्चय वाटले.
ती बातमी वाचली नसती तर तू किती संकटात होतीस तर त्यांना समजलेच नसते का?
एक वर्षानंतरही त्या पोलिसाचा शोध घेणे काही कठीण नाही.एक वर्षानंतर शोध घ्यायला गेल्यावर थोडं दुरापास्त असलं तरी कठीण अजिबात नाही.

रायगड's picture

31 Aug 2017 - 11:35 am | रायगड

आवडलं लिखाण!

नितिन५८८'s picture

31 Aug 2017 - 12:00 pm | नितिन५८८

छान मांडलाय अनुभव

पद्मावति's picture

31 Aug 2017 - 2:26 pm | पद्मावति

उत्तम मांडणी. लेख आवडला.

कलंत्री's picture

31 Aug 2017 - 5:08 pm | कलंत्री

एखादा प्रसंग घडताना त्यात फारसे आहे असे वाटत नाहि. एकदा कि भविष्यात त्याच्याकडे पाहिले की आपण काय दिव्य केले हे समजते.

भारतामध्ये स्त्रीया तशा कायमच असुरक्षित असतात हेच किंवा हेही खरे.

भ ट क्या खे ड वा ला's picture

1 Sep 2017 - 10:51 am | भ ट क्या खे ड वा ला

आज यातून बोध घ्यायचा तर आपल्या मुलांना मोबाइल बरोबरच आपण कुठे जात आहोत त्याचा address, पैसे, identity वगैरे कायमच बरोबर द्यावी, आणि गरज पडल्यास कोणाशी बोलावे , स्वतःसाठी कसे उभे राहावे याचा सल्ला द्यावा.
*हा प्रतिसाद आवडला* ,अनुकरणीय आहे.

जुइ's picture

1 Sep 2017 - 8:37 pm | जुइ

तुम्ही त्यावेळी सुखरूप घरी पोहोला हे वाचुन बरे वाटले!

त्याकाळी अशी दूर एकटे जायची सवय नसेल म्हणुन नाहीतर हा अगदी जन्मले फिरुनी असा अनुभव मला तरी वाटत नाही. १७ वर्षे म्हणजे फार लहान वय naahee >>
Agadee hech manaat aale. Lagn Ghar kuthe aahe he maahit navhate hyachehee faar aascharya vaaTale.
Hyaa vayaat gaavaatoon Mumbai madhe shikayala aalele. Hostel var rahilele.
Locals chi savay navhati tar kharedi LA jatana haraval tar kaay kase karayache hyach planning kelel.
Thodakyat १७ varShachyaa mulila he mahit havach hot. ASA vaTal.
Landlines vagaire pan navhate/# barobar navhate hyach aashchary vaaTal.

अशा अचानक घडणाऱ्या प्रसंगाला कसे सामोरे जायचे व अशा प्रसंगी दाखवलेले धैर्य हे प्रत्येक व्यक्तीच्या स्वभाव नुसार भिन्न असू शकेल . अशी हि घटना आयुष्यात पहिल्यादाच घडली असेल व अनपेक्षित पणे त्याला सामोरे जावे लागले असेल तर आपण दाखवलेले धैर्य हे कौतुकास्पद आहे आणि इतर जवळच्या नातेवाईकांना वटणारी ही काळजी साहजिकच आहे .म्हणतात ना " मन चिंती वैरी न चिंती "

ज्योति अळवणी's picture

4 Sep 2017 - 7:13 pm | ज्योति अळवणी

माझं लहानपण तस बरच protected होतं. खूप फिरले, हाईक्स, ट्रेक, कॅम्पस केले. पण ते pre planned असतात. त्यात माझा मोठा भाऊ सतत माझ्याबरोबर असायचा. त्यामुळे हे अस रात्री उशिरा अनोळखी शहरातल्या अनोळखी स्टेशनवर अगदी एकटं राहणं म्हणजे माझ्यासाठी भयानक अनुभगव होता. मी आत्याच्या घरी पोहोचले आणि सर्वांना घडलेला प्रकार कळला तेव्हाच सर्वांचं मत झालं होतं की जर स्टेशन मास्टरने किंवा कोणत्याही पुरुषाने मला त्रास दिला असता तर काय झालं असत ते सांगता आलं नसत.

सेक्स स्कॅनडल कळलं त्यावेळी माझी सुखरुओ सुटका अजून जास्त प्रकर्षाने जाणवली.

चिगो's picture

4 Sep 2017 - 3:02 pm | चिगो

एक थरारक अनुभव म्हणुन लेख ठीक आहे, पण 'माझेच मी जन्मले फिरुनी' म्हणण्यासारखा नाहीये. स्पष्टवक्तेपणाबद्दल क्षमस्वः..

ज्योति अळवणी's picture

4 Sep 2017 - 7:17 pm | ज्योति अळवणी

चिगो अगदी खरं आहे तुमचं मत.

ज्याला अनुभव येतो ती व्यक्ती त्या अनुभवातून जे शिकते आणि आयुष्यभर लक्षात ठेवते तो धडा त्यावरून परत जन्म झाला की नाही हे वयक्तिक मत बनत.

मला तुमच्या परखड मताबद्दल आदरच आहे.

पण त्या एका अनुभवाने मला खरच खूप शिकवलं. त्यानंतर मी आयुष्यातले अनेक निर्णय स्वतंत्रपणे घेतले.. एकटी फिरले... खूप काही केलं. म्हणून वाटतं की त्यातून मी औरत एक वेगळा additional जन्म घेतला आहे याचं जन्मात

तुम्ही सुखरूप घरी पोहोचलात हे वाचून बरे वाटले. रात्री सडेअकरा वाजता निर्मनुष्य प्लॅटफ़ॉर्मवर राहून जाणे एखाद्या तरुणीसाठी तणावपूर्ण खरेच. परंतु लगेच स्टेशन मास्तर आणि पोलीस आल्याने परिस्थिती हातात होती. मागे वळून पाहताना देखील सेक्स स्कँडल मध्ये अडकण्याची शक्यता far fetched असण्याबाबत "माझीही शॅम्पेन" ह्यांच्याशी सहमत कारण त्या स्कँडलची modus operandi वेगळीच होती. बारावी पास म्हणजे सतरा-अठरा वर्षे हे काही लहान वय नाही. ज्या चुलत बहिणीकडे आपण राहिलो ते घर कुठे आहे हे माहित नसणे, आणि जवळ अजिबात पैसे नसणे ह्या गोष्टींचे खूपच आश्चर्य वाटले.
बहुते ह्या घटनेने childhood ते adulthood हे transition (जे आधीच gradually व्हायला हवे होते) मनात घडवून आणले असावे.