श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ४ : एका अनोळखी जगातला प्रवास.

Primary tabs

अनिवासि's picture
अनिवासि in लेखमाला
29 Aug 2017 - 10:31 am

एका अनोळखी जगातला प्रवास.

अनिवासि

लेखमालेसाठी काय लिहावे ह्याचा विचार करत असताना इतके प्रसंग डोळ्यापुढे आले की निवड करणे कठीण झाले.
तेव्हा जेथून माझ्या आयुष्यातल्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आणि ज्याचे सूतोवाच मी एका प्रतिसादातून केले होते, तेथेच जातो.

१९-२०व्या वर्षापर्यंत माझे आयुष्य पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात गेले.
५० साली शालान्त परीक्षा पास झालो, रीतसर कॉलेजला प्रवेश घेतला आणि त्या वेळच्या इंटरपर्यंत वाटचाल केली. सर्व काही आलबेल होते आणि ----
एकाएकी घरात आर्थिक आपत्ती आली. (तो निराळा विषय). कॉलेजची फी थकली, परीक्षेसाठी फॉर्म भरायलासुद्धा पैसे नव्हते. माझे आणि मोठ्या भावाचे कॉलेज संपले. त्याने एकदम भारतीय हवाई दलाचा रस्ता धरला. मी नोकरीच्या शोधात मुंबई गाठली. माझे एक चुलत आजोबा त्या वेळेस मुंबईत भुलेश्वरला राहत होते. अस्मादिक तेथे अवतरले. नशीब काढायला मुंबईत येणारे इतरही नातेवाईक / मित्र त्यांच्याकडे कायम येत असत आणि तेसुद्धा असेच कनिष्ठ मध्यमवर्गातले. पहिल्याच दिवशी त्यांच्या मोठ्या कर्त्या मुलाने सांगितले "झोपायला गॅलरीत जागा, आघोळ-संडास इ. वापरायला परवानगी. बस. चहा, जेवण स्वतःची व्यवस्था करावयाची."

सुदैवाने लवकरच एका इन्शुरन्स कंपनीत - वडलांच्या ओळखीने - नोकरी मिळाली. पगार महिना ९० रुपये. पैसे वाचवण्यासाठी शक्यतो सगळीकडे चालत जाणे असावयाचे. तांब्यांच्या खानावळीत महिन्याच्या जेवणाचे सत्र सुरू झाले. ठाकूरद्वारहून फिरोजशहा मेहता रोडपर्यंत चालणे वेळ घालविण्याचे साधन होते. संध्याकाळी काम संपल्यावर चर्नी रॊड चौपाटीवर घरी जायची वेळ होईपर्यंत! पुरा वैतागलो होतो. ऑफिसकाम केले होते, पण नोकरी म्हणून नाही. जेवणाचे पैसे, वडलांना थोडे पैसे व एक दोन-वेळा पुण्याचा प्रवास - शिल्लक ०.
मधल्या काळात घरी अनेक गोष्टी होत होत्या. धाकट्या भावंडांची शिक्षणे, त्यांचे कपडे इ.नी वडील पार थकून गेलेले असणार हे आता समजते.
अशा वेळेस परदेशात नोकरी करून अभ्यास करता येतो असे ऐकले. माहिती काढावयास सुरुवात केली. काहीही करून पैसे मिळवायचे. जेथे जेथे शक्य होते तेथे पत्रे, अर्ज टाकावयास सुरुवात केली. पर्शियन गल्फ, बोर्निओ अशा ठिकाणीही अर्ज केले, पण उपयोग झाला नाही. इंग्लंड व अमेरिकेतील माहीत नसलेल्या मराठी लोकांनाही पत्रे टाकली. त्यातल्या इंग्लंडमधील दोन जणांनी उत्तरे दिली. त्यातल्या एकानी भरपूर उपयोगी माहिती दिली . इंग्लंडला जायचा विचार केला आणि सगळे जण हसत होते. कॉलेजला फी भरायला पैसे नाहीत आणि इंग्लंडच्या बाता!! घरून काही मिळणार नाही हे नक्कीच होते, तेव्हा वडलांचे एक मित्र मुंबईचे श्री काका तांबे (तांबे उपाहारगृहाचे प्रणेते) ह्यांच्याकडे गेलो. काका सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर होते. त्यांनी सर्व ऐकून घेतले आणि पुण्याच्याच एका गृहस्थांचे नावे सुचविले. त्यांनी आणखी एकाचे नाव सुचविले - अशा तऱ्हेने ७-८ मान्यवर लोकांना भेटलो, पण प्रत्येक ठिकाणी तेच - सॉरी! शेवटच्या गृहस्थांना हा माझा 'प्रवास' माहीत नव्हता, त्यांनी काका तांब्यांचे नाव सुचविले, परत एकदा काकांना तोच पाढा वाचून दाखविला. काका मला घेऊन मुंबईच्या ब्राह्मण समाजात गेले व त्याच्या सांगण्यावरून मला २००० रुपयाचे कर्ज मंजूर झाले.
आतापर्यंत 'मी मी' झाले, परंतु हे सर्व वडलांच्या मुळेच झाले. त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण त्यांच्या सार्वजनिक कामामुळे त्यांना समाजात मान होता आणि त्यामुळेच हे सर्व झाले.

पैसे मिळाले पुढे काय? कुणालाच ह्या प्रवासाची माहिती नव्हती. परत एकदा मुंबईला थॉमस कुक कंपनीत चौकशीला गेलो. माझ्याकड़े पाहून त्यांना काय वाटले असेल कुणास ठाऊक? पासपोर्टची माहिती नाही, कुठे जाणार ठाऊक नाही आणि इंग्लंडच्या तिकिटाची चौकशी!! असो. त्यांनी माहिती दिली. पासपोर्ट विनासायास मिळाला. त्या वेळेस विमान प्रवास फक्त अतिश्रीमंत लोकांसाठी होता. तेव्हा बोटीची चौकशी केली. P.& O कंपनीच्या बोटी ऑस्ट्रेलियावरून येत. १८ सप्टेंबर १९५२ला SS Maloja येणार होती व लगेच लंडनला जाणार होती. तिकीट काढले.
पुलंनी अपूर्वाईचा विचारही केला नसेल तेव्हा आमची कपड्यापासूनची तयारी सुरू झाली. अर्धी चड्डी, मांजरपाटाचा शर्ट, नंतर पायजमा व एकदा कधीतरी फुल पॅन्ट हा आतापर्यंतचा आमचा कपड्यांचा प्रवास. हे सर्व आमचे पिढीजात टेलर - श्री पराडकर शिवत. पुण्यात सिटी पोस्टासमोर त्यांचे दुकान होते. तेथे आम्ही फक्त वडलांचे निरोप द्यायचो. ह्या वेळेस स्वतःचे पैसे घेऊन, निराळे कपडे घेणार होतो. आतापर्यंत माझया इंग्लिश स्वारीची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. मोठ्या रुबाबात एक सूट व दोन शर्ट ऑर्डर केले. थंडीच्या दिवसात लंडनला gabardeenचा मऊ सूट!!! त्यांनी विचारले, “कॉलर शेक्सपिअर कट करू?” कॉलरचीही फॅशन असते, हे त्या दिवशी कळले. नवीन जगात पावले हळू हळू पडत होती.

परदेशात तसे जाऊन आणि राहून आलेले लोक काही फारसे भेटत नव्हते. जे कोणी भेटले, ते एक तर श्रीमंत उचभ्रू होते किंवा चार-आठ दिवसाचा प्रवास करून आलेले. त्यांच्याकडून माहितीची अपेक्षा करणे चुकीचे होते. एकाने सांगितले की "तुम्हाला कमीत कमी ७-८ सूट तरी लागतील. मॉर्निंग सूट, इव्हनिंग सूट, स्मोकिंग जॅकेट वगैरे वगैरे..." मला एक सूट घेताना मारामार झाली होती. दुसरे एक नुकतेच जाऊन आले होते. त्यांच्याकडे त्यांनी तिकडे घेतलेला ओव्हरकोट होता. त्यांनी तो मला 'स्वस्तात' विकत देऊ केला. त्यांची स्वस्त किंमत ऐकून मला मुंबईतच थंडी वाजू लागली.
असे करता करता निघण्याची वेळ आली. बाकी सगळ्या गोष्टी घेऊन झाल्या. ४-५ दिवस अगोदर पुण्यात सत्यनारायण झाला. बरेच शिक्षक व मित्र आले होते. त्या दिवशी माझ्याकडे एक सूटकेस व त्यात एक शर्ट होता. पुढच्या एक दिवसात अनेक जणांनी त्यांच्या नवऱ्यासाठी, मुलासाठी, मित्रासाठी सामान आणून देण्यास सुरुवात झाली. १ किलो तांदूळ, साखर, चड्डीला लावायची बकल्स, चहाचे पुडे, खोबरेल तेलाच्या बाटल्या (ज्या मी नेल्या नाही) जवळजवळ दोन सूटकेसेस भरल्या. शेवटल्या मिनिटाला कोणीतरी म्हणाले, “इतक्या लांब होल्डऑलशिवाय कसा जाणार?” आतापर्यंत हे कोणीच बोलले नव्हते. झाले. शेवटाच्या मिनिटाला एक होल्डऑल विकत आणला.
पुण्याहून निघालो. मुंबईला येऊ न शकणारे मित्र स्टेशनवर आले होते. मुंबईला सरदारगृहात राहिलो. मुंबईत वडलांचे एक मित्र भेटायला आले. त्यांनी होल्डऑल बघितला आणि ते हसायला लागले. त्यांनी परदेश प्रवास केलेला होता. एक डाग कमी झाला. १५-१६ तारखेला केव्हातरी टाइम्स वाचत असताना p & O कंपनीची जाहिरात पाहिली. मलोजा बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी त्यांचे सामान १७ तारखेपर्यंत धक्क्यावर आणून पोहोचवावे व मेडिकल चेकअपसाठी हजर व्हावे.
मग काय - नुसती धावपळ. सामान पोहोचवले. दुसऱ्या दिवशी आई, वडील व धाकटी बहीण पुण्याहून आले. त्या मोठ्या बोटीवर चढलो. काका तांबेसुद्धा आले होते. हारतुरे दिले. प्रवाशांशिवाय इतरांनी उतरावे असा इशारा झाला. आई-वडील वगैरे उतरले. ज्यांना वर येता आले नव्हते, असे मित्र खालूनच हात करत होते.
बोट सुटली..... इतर प्रवासवर्णनात वाचल्याप्रमाणे मला काही गलबलून वगेरे आल्याचे आठवत नाही. नव्या अनोळखी जगाचे वेध लागत होते.
पण....
ही माझी आणि वडलांची शेवटचीच भेट आहे असे स्वप्नात तरी मला वाटले असते, तर?

(वरील सर्व थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. जून ते सप्टेंबर चार महिने खूप घडामोडीचे होते. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. ८ ऑक्टोबरला लंडनला पोहोचलो आणि खरा प्रवास सुरू झाला तो ६५ वर्षे सुरू आहे.)

प्रतिक्रिया

पैसा's picture

29 Aug 2017 - 11:57 am | पैसा

_/\_ सावकाश लिहा. तुमच्या अद्भुत प्रवासाबद्दल वाचायचे आहे.

स्वाती दिनेश's picture

29 Aug 2017 - 7:00 pm | स्वाती दिनेश

ज्यो सारखेच म्हणते.
विस्तृत लिहा. वाचण्यासारखे आणि घेण्यासारखे खूप आहे ह्याची जाणीव झाली आहे.
स्वाती

सस्नेह's picture

29 Aug 2017 - 12:08 pm | सस्नेह

अरेबियन नाईट्स वाचत असल्यासारखे वाटले :)
काका, पुढचा भाग लवकर लिहा !

आतिवास's picture

29 Aug 2017 - 12:50 pm | आतिवास

वेगळ्या जगाची ओळख.
धागाकर्तीने शब्दांकन केलं आहे की मुलाखत घेतली आहे?

मोदक's picture

29 Aug 2017 - 1:05 pm | मोदक

१) धागाकर्ते आहेत.

२) स्वानुभव शब्दांकीत केले आहेत.

३) असाच एक अनुभव इथे वाचू शकता - एक आठवण

:)

आतिवास's picture

29 Aug 2017 - 1:24 pm | आतिवास

धन्यवाद,
मी आधीचा प्रतिसाद लिहिला तेव्हा मला हा लेख 'ज्योति अलवानि' या नावाने दिसत होता.
बहुतेक भास झाला असेल मला. किंवा डोळे तपासून घ्यायला हवेत :-)

पैसा's picture

29 Aug 2017 - 5:32 pm | पैसा

मी पण तुमच्यासोबत! :)

साहित्य संपादक's picture

29 Aug 2017 - 6:46 pm | साहित्य संपादक

नाही, नाही बरोबर आहे तुमचे :) आमच्याकडून लेखकाचे नाव चुक टाकले गेले होते. ती चुक दुरुस्त केली नंतर.

मस्त हो काका.. तुमच्याकडे पोतडी भरावी इतके अनुभव आहेत. लिहीत रहा..!!

अनन्त अवधुत's picture

29 Aug 2017 - 1:18 pm | अनन्त अवधुत

काका, तुमचे अनुभव फक्त गणेशोत्सवापर्यंत नका ठेवू, प्लीज. अजून लिहा.

स्मिता.'s picture

29 Aug 2017 - 4:53 pm | स्मिता.

अनिवासि काकांचे अनुभव फार रोचक वाटत आहेत. ज्या काळाबद्दल केवळ इतिहासाच्या पुस्तकात वाचलंय त्या काळातले काकांचे स्वानुभव वाचायला मजा येतेय. माझे आजोबाही याच पिढीतले पण त्यांचं बालपण आणि तरूणपण हे जळगावमधल्या एका खेड्यात, ते ही अत्यंत गरिबीत गेलं. त्यांच्या आठवणीनुसार त्यांच्या जीवनावर स्वातंत्र्य मिळणे वगैरे या गोष्टींचा फारसा फरक पडला नाही.

शेवटंच वाक्य वाचून काळजात चर्र झालं :(

प्रभावित करणारे लेखन आवडले. तुमची धडपड विलक्षण आहे. त्यावेळचे भारतातील सामाजिक वातावरण थोडेफार डोळ्यासमोर येऊ शकले. त्यावेळच्या परदेशातील वातावरणाचे मात्र काही माहित नाही. एका संध्याकाळी लंडनमधील रस्त्यांवरून फिरताना तेथील ढगाळ वातावरणात आजूबाजूचा आधीच जुन्याकाळचा परिसर आणखी पुराणकालीन वाटू लागला होता ते डोळ्यासमोर कल्पून तुम्ही तेथे जाणार आहात म्हणून वाचत राहिले. सुरेख लिहिलयत.

छान लिहिलंत काका. पण अजून विस्तृत लिहा ही विनंती.

संग्राम's picture

29 Aug 2017 - 5:27 pm | संग्राम

एक विनंती ... जर इथे लिहणे अवघड वाटत असेल किंवा वेळखाऊ वाटत असेल तर कच्चं लिहून ते रेकॉर्ड करून इथे देता येईल ?

आदूबाळ's picture

29 Aug 2017 - 5:58 pm | आदूबाळ

भारीच! लिहित राहा काका.

काका, लिहीताना हात आखडता घेऊ नकात. तुमच्याकडे आठवणींचं भांडार आहे, आम्हाला डिटेल मध्ये वाचायला खुप आवडेल.

पैलवान's picture

29 Aug 2017 - 7:08 pm | पैलवान

ज्यावेळी ज्ञानच नव्हे तर माहिती मिळवणं आणि साधा निरोप पोचवणं, हे सुद्धा जिकिरीचं काम होतं, त्या काळात परदेशात जाऊन शिक्षण घेणे (या विषयीची विश्वासार्ह माहिती तर अजूनही सहज उपलब्ध होत नाही), त्यासाठी आर्थिक तजवीज, कागदपत्रांची पूर्तता इ गोष्टी करणे, माझ्या कल्पनेपलीकडे आहे.

तुम्हाला विनम्र अभिवादन!!

अवांतर : इतकी दशके राणीच्या देशात काढूनही तुमची मायभूमी अन मायबोलीची ओढ तशीच आहे, याचं खूप मनापासून कौतुक वाटलं.

रुपी's picture

30 Aug 2017 - 4:10 am | रुपी

+१

नूतन सावंत's picture

31 Aug 2017 - 10:30 am | नूतन सावंत

+1

Ranapratap's picture

29 Aug 2017 - 7:17 pm | Ranapratap

तुमची भेट पुण्यातील कट्ट्यावर झाली. कट्ट्यावर तुम्ही , मी मंचारला आहे असे सांगितल्यावर तुम्ही तेथील खासदारांचा लंडन मधील व्यवसाय सांभाळत होता हे सांगितले तसेच तुमच्या बंधूनी तुमचे मूळ गाव हे बाहुले जिल्हा सातारा असे सांगितले. हे माझ्या मामाचे गाव त्यामुळे तुमच्याशी एक वेगळाच ऋणानुबंध. तुमचे इंग्लंड मधील अनुभव ऐकून तुमच्या बद्दल असलेला आदर आणखीनच वाढला.

आवडला प्रवास. परवा तुमची भेट झाली आनंद झाला. तुम्ही वर्तमानकाळात जगत आहात बोलत आहात हे मला विशेष भावले.

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Aug 2017 - 8:10 pm | माम्लेदारचा पन्खा

अजून लिहायला हवं तुम्ही काका . . . . . . . मोठा लेख येऊ द्या !

संत घोडेकर's picture

29 Aug 2017 - 8:38 pm | संत घोडेकर

काका, विस्तृत लेखमालेची प्रतिक्षा करतोय

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2017 - 10:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

मळलेली वाट सोडून... किंबहुना एका नव्या वाटेची सुरुवात करणारा... विरळा रोचक अनुभव !

नुकत्याच झालेल्या कट्ट्यात तुम्ही जगावेगळ्या वाटेवरून केलेल्या अद्वितिय (unique) वाटचालीची झलक ऐकली होती. हा लेख म्हणजे त्या वाटचालीची एक रोचक पण केवळ संक्षिप्त प्रस्तावना आहे असे समजतो आहे. तुमच्या अनुभवांच्या लेखमालेची प्रतिक्षा आहे.

ज्योति अळवणी's picture

30 Aug 2017 - 12:30 am | ज्योति अळवणी

काका पुढचा भाग नक्की आमी लवकर टाका. आम्ही सगळेच वाट बघतो आहोत. मी लिहीण्याचा प्रयत्न करत असते पण काकांइतके आयुष्याचे अनुभव नाहीत. तरीही काही वेळासाठी माझा लेख आहे असं वाटलं यात मी स्वतःला धन्य मानते

पिलीयन रायडर's picture

30 Aug 2017 - 12:55 am | पिलीयन रायडर

फार आवडला लेख. त्याकाळात किती अवघड असेल हे सगळं!

अजून लिहा काका. टाइपिंगला काही मदत हवी असेल तर नक्की करू.

राघवेंद्र's picture

30 Aug 2017 - 2:23 am | राघवेंद्र

मस्त सुरुवात.
लेखनमालिकेच्या प्रतीक्षेत !!!

बाजीप्रभू's picture

30 Aug 2017 - 6:55 am | बाजीप्रभू

सर्वप्रथम बाजीप्रभूचा तुम्हास सप्रेम वंदे!!
काका खूप छान लिहिताय तुम्ही... त्याकाळी दाखवलेल्या आत्मविश्वाचाचं खूप कौतुक वाटतंय.... तुम्ही लिहीत रहा एक छान लेखमला होईल.
तुमच्या निमित्ताने आम्हालाही राणीच्या देशाची सफर घडतेय.

अनन्त अवधुत's picture

1 Sep 2017 - 10:56 am | अनन्त अवधुत

हो तुम्ही राणीच्या देशाची सहल घडवा आणि बाजीप्रभूंनी तर ऑलरेडी राजाच्या देशात फिरायला नेलंय. मिपावर राजाराणीच्या राज्य पाहायला मिळेल :D असो.
@बाजीप्रभू तुम्ही पण छान लिहिता, तुमचे थायलंड वरचे लेख वाचनीय आहेत.

पद्मावति's picture

30 Aug 2017 - 3:23 pm | पद्मावति

अतिशय सुरेख.

इरसाल कार्टं's picture

30 Aug 2017 - 3:30 pm | इरसाल कार्टं

पुढचा भाग यावा असे मनापासून वाटते.

प्रसाद_१९८२'s picture

30 Aug 2017 - 3:33 pm | प्रसाद_१९८२

आचार्य अत्रेंच्या 'मी कसा झालो' ह्या पुस्तकात, त्यांच्या इंग्लड प्रवासाविषयी त्यांनी लिहिलेय, अगदी तसाच तुमचा अनुभव वाटला.
पु.भा.प्र.

काका, तुमच्या अनुभवाची पोतडी आमच्यासाट्।ई उघडी करता आहात यासाट्।ई धन्यवाद. तेव्हाचं लंडन, इंग्रजांचा भरतियांकडे पाहण्ञाचा दृष्टीकोन, शेजारी, तुमच्या ववसायाबद्दल, मुलांच्या शिक्षणाबद्दल वाचायला आवडेल. प्लीज आणखी लिहा.

सुमीत भातखंडे's picture

31 Aug 2017 - 10:21 am | सुमीत भातखंडे

सुंदर लेख.
एवढ्यात संपवू नका प्लीज. तुमचा संपूर्ण प्रवास जाणून घ्यायला आवडेल.

नूतन सावंत's picture

31 Aug 2017 - 10:38 am | नूतन सावंत

झकास सुरुवात!(शेवतचं वाक्य सोडून)
तुमचे अनुभव वाचायला नक्कीच आवडतील.अजून विस्तृतपणे लिहा,पु लं च्या अपूर्वाई सारखेच पुस्तक होईल .कदाचित त्यापेक्षा वेगळ्या प्रतीचे,कारण काळ त्याआधीचा आहे.

नजदीककुमार जवळकर's picture

31 Aug 2017 - 5:33 pm | नजदीककुमार जवळकर

नमस्कार काका ! फार सुंदर लिहलय ..असेच लिहीत रहा !! पुढील प्रवासाच्या प्रतीक्षेत.

सप्तरंगी's picture

31 Aug 2017 - 5:22 pm | सप्तरंगी

तुमचे अजून-अजून लेख / अनुभव वाचायला आवडतील , विस्तृतपणे लिहा नक्की !

भाते's picture

31 Aug 2017 - 8:35 pm | भाते

संपुर्ण लेख किमान १०-१२ वेळा वाचुन काढला. खरंच लेख खुप मनापासुन आवडला.
जसे जमेल तसे आणि तेव्हा या विषयावर टप्याटप्याने पण सविस्तर लिहा हि नम्र विनंती. वाचायला आतुर आहे.

याच विषयावर आणखी मिपाकरांचे अनुभव वाचायला आवडतील.

नितिन५८८'s picture

1 Sep 2017 - 11:49 am | नितिन५८८

फार सुंदर लिहलय पुढचा भाग लवकर लिहा.

काका, फक्त एकच सांगावस वाटत... ते म्हणजे,पुढचे भाग लवकर लिहा. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सुनो जी तुम क्या क्या ख़रीदोगे, यहाँ तो हर चीज़ बिकती है... :- Sadhna (1958)

जुइ's picture

2 Sep 2017 - 2:20 am | जुइ

अतिशय विलक्षण सुरुवात काका. पुढे वाचायला उत्सुक!!

सविता००१'s picture

5 Sep 2017 - 1:50 pm | सविता००१

पुढील लेखमालेच्या प्रतीक्षेत.........

" तुमच्या बंधूनी तुमचे मूळ गाव हे बाहुले जिल्हा सातारा असे सांगितले. हे माझ्या मामाचे गाव त्यामुळे तुमच्याशी एक वेगळाच ऋणानुबंध." माझ्या वडिलांचे पण आजोळ्चे गाव बहुले जवळ्चे पाटण .
ले़ख छान च लिहिला आहे.