श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक १ : माझा मी जन्मलो फिरुनी!

Primary tabs

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in लेखमाला
26 Aug 2017 - 12:50 pm

माझा मी जन्मलो फिरुनी!

लेखक : माम्लेदारचा पन्खा

नमस्कार मंडळी... श्रीगणेश लेखमालेचा हा विषय तसा वेगळाच असल्यामुळे आपल्यापैकी अनेकांनी त्याला नापसंती दर्शवली होती. पण माझं मन मात्र तो वाचून पुन्हा एकदा नकोशा वाटणाऱ्या भूतकाळात गेले, कारण विषयाचं नाव माझ्या ह्या घटनेला अगदी यथायोग्यच आहे म्हणून हा लेखनप्रपंच... फार मागे नाही जायला लागणार आपल्याला... याच वर्षीचा जानेवारी महिना! घरात नवीन पाहुणा येणार म्हणून बायकोच्या डोहाळेजेवणाची जवळपास सगळी तयारी होत आली होती. सातवा महिना लागल्यावर कार्यक्रम करायचा, हे नक्की ठरवलं होतं. आम्ही दोघेही अत्यंत आनंदाने सगळी जमवाजमव करत होतो. रोज नवीन ठराव आणि उत्साह तर ओसंडून वाहत होता..... आमचं हे पहिलंच बाळ असल्याने आम्हांला आणि सगळ्याच घरादाराला सगळ्या गोष्टींची भयंकर उत्सुकता होती.

दि. १५ जानेवारी २०१७. रविवार असल्याने लवकर उठायचा प्रश्न नव्हता. मी आरामात लोळत पडलो होतो. संकष्टी असल्याने नाश्ता वगैरे नव्हताच. इतक्यात बायकोची हाक ऐकू आली. मी स्वयंपाकघरात जाऊन पाहिलं, तर एक चिमणी आमच्या ग्रिलमध्ये असलेल्या बर्ड नेटमध्ये अडकली होती आणि जिवाच्या आकांताने सुटकेसाठी तडफड करत होती. तिचा कदाचित खिडकीत घरटं बांधायचा उद्योग सुरू असावा, कारण ग्रिलमध्ये बरीच काड्या आणि पिसं पडली होती. आमचं हे तिसऱ्या मजल्यावर असलेलं घर एका सोसायटीत भाड्याचं घेतलेलं असल्यामुळे आम्ही इथे यायच्या आधी बरेच दिवस ते बंद होतं, त्यामुळे चिमण्यांना घरटं वगैरे करायला पूर्ण वाव होता. एक-दोन चिमण्या अडकून मेल्याही होत्या, ते पाहून मी खूप हळहळलो होतो. आम्ही इथे आल्यानंतरही चिमण्यांचा चिवचिवाट होताच, पण मी मुद्दाम दुर्लक्ष करायचो, कारण मला सगळे प्राणी पक्षी प्रचंड आवडतात. पण मुख्य गोंधळ असा होता की ह्या घरट्यामुळे ओट्यावरच्या अन्नात सतत काहीतरी पडत राहायचं. त्यामुळे बायकोची चिडचिड व्हायची.

त्या दिवशी पुन्हा एकदा चिमणी अडकल्यामुळे मी लागलीच ओट्यावर चढलो. मला जवळ आलेलं पाहून ती चिमणी आणखीनच फडफड करू लागली. तिला दुखापत न होता सहीसलामत बाहेर काढणं फारच कौशल्याचं काम होतं. तशी खिडकी छोटी असल्याने मी सावधपणे काम करत होतो. कसंबसं ती जाळी वाकवून तिला बाहेर जायला वाट करून दिली, तरी ती जाईना. मग मीच मुद्दाम तिला ती वाकडी जाळी दाखवत होतो. पण तिच्या डोळ्यात अक्षरशः प्राण आला होता आणि भेदरलेल्या नजरेने ती माझ्याकडे बघत होती. शेवटी एकदा तिला बाहेर जायचा मार्ग दिसला आणि ती भुर्रकन उडून गेली. मी उरलेल्या काड्या खिडकीतून उचलून बाजूला केल्या आणि चिमणी परत येऊन अडकू नये म्हणून तिथे कागद लावून ठेवत होतो. आतून बायको "आता चिमणी गेली ना, मग खाली उतर... बाकी नंतर पाहू" असं म्हणाली. पण मग मीच म्हटलं की “आता नाहीतरी मी इथे आलोच आहे, तर सगळं काम करूनच खाली उतरतो. थोडा वेळ थांब.” तिला घरातून पेपर आणायला सांगितलं आणि मी खिडकी साफ करत होतो. तिने मला पेपर आणून दिला आणि मी तो त्या फटीत सरकवायचा प्रयत्न करत होतो. नेमकं जिथे ती जाळी वाकली होती, ती जागा माझ्यापासून सगळ्यात लांबचं टोक होतं, म्हणून मी तिथे सांडशीने पेपर सरकवायचा प्रयत्न करत होतो. हा प्रकार मी अनेकदा केला असल्याने त्याचं काही विशेष वाटत नव्हतं. तितक्यात त्या ग्रिलला माझ्या खांद्याचा धक्का लागला आणि त्याचे एकूणएक पंधरा-सोळा खिळे निखळले आणि माझाही तोल निसटला. माझ्या डोळ्यासमोर अचानक आकाश, झाडं वगैरे गोष्टी दिसू लागल्या. चालू कॅमेरा कोणीतरी लाथ मारल्यावर कसं रेकॉर्डिंग करतो, तसं काहीसं दिसलं... मी थेट बेचाळीस फुटांचा प्रवास करून काहीही कळायच्या आत खाली जमिनीवर जाऊन पडलो होतो. खाली पडल्यावर मी घरातून खाली पडलोय हे मला जाणवलं. बेचाळीस फुटांवरून पडूनही मला विशेष धक्का अजिबात जाणवला नाही, हा चमत्कारच होता. मी अर्धवट शुद्धीतच होतो. आजूबाजूला कोणीही नव्हतं, तरी मला माझ्या शेजारी कोणीतरी उभं आहे अशी जाणीव सतत होत होती आणि माझ्या कानात अचानक श्री स्वामी समर्थ यांच्या तारकमंत्राची एकच ओळ सतत गुंजत होती.....
उगाचि भितोसी भय हे पळू दे
जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे !

मी एकही किंकाळी न फोडता शांतपणे त्या उन्हात पडून होतो. इकडे माझी बायको मी अचानक कुठे दिसेनासा झालो याचा विचार करत होती. काही क्षण तीही सुन्न झाली होती. ती जशी भानावर आली, तसं तिला जाणवलं की काहीतरी भयानक प्रकार झालेला आहे, कारण ग्रिल आणि मी दोन्ही गोष्टी दिसेनाशा झाल्या होत्या. ती दरवाजा उघडून खाली पळत सुटली, तसं तिच्या लक्षात आलं की घडलेला प्रकार दोन्ही घरी कळवणं आणि घराची चावी तसंच मोबाईल घेणं गरजेचं आहे, म्हणून ती परत घाईघाईने घरात आली आणि सगळं घेतलं. खाली उतरत असताना तिने माझ्या आणि तिच्या आईबाबांना फोन करून “मी पडलोय” इतकाच निरोप दिला आणि लवकर यायला सांगितलं. कुठे, कधी, कसं वगैरे तपशील तिने मुद्दाम टाळला, नाहीतर त्या धक्क्याने आणखी काहीतरी अनर्थ घडला असता. माझी आई, तसेच माझे सासू-सासरे आणि मेव्हणा लगेच यायला निघाले.

दरम्यान काही लोकांना ग्रील पडल्यावर मोठा आवाज आला, म्हणून ते खिडकीत येऊन बघू लागले. मला पडताना समोरच्या इमारतीतल्या एका बाईने प्रत्यक्ष पाहिलं होतं. ती मोठमोठ्याने काहीतरी असंबद्ध बडबडू लागली. इमारतीतील काही लोकांनी, तसंच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या काही माणसांनी आत कंपाउंडमध्ये येऊन पाहिलं, तर मी निपचित पडलो होतो. बऱ्याच लोकांना माझं अवतारकार्य आटपलंय असंच वाटलं. त्यामुळे घाबरून कोणीच पुढे व्हायला तयार नव्हतं. माझ्या तोंडातून रक्त येत होतं आणि मातीही लागली होती. इतर ठिकाणीही कपडे मातीने माखले होते. ते ग्रिलसुद्धा माझ्यापासून थोड्याच अंतरावर पूर्णपणे मोडून पडलेलं होतं. इमारतीत राहणारा माझा एक मित्र पुढे आला आणि त्याने माझी अवस्था जवळ येऊन बघितली. तेवढ्यात बायकोही धावत खाली पोहोचली होती. दोघांनी मिळून माझ्याशी काहीतरी बोलायला सुरुवात केली. बायको तिथेच जमिनीवर खाली बसली आणि तिने माझं डोकं तिच्या मांडीवर उचलून ठेवलं. तिने कुणालातरी रुग्णवाहिकेसाठी ताबडतोब फोन करायला सांगितलं. मी जिवंत आहे हे जमलेल्या लोकांना कळल्यावर त्यांची एकच धावपळ उडाली. कोणी ते ग्रिल उचलून बाजूला नेऊन ठेवलं, कोणी पार्किंगमधल्या गाड्या हलवू लागला, कोणीतरी जाऊन एक सतरंजी आणली. तेवढ्या वेळात माझी आई आणि माझा मेव्हणा तिथे पोहोचला. मी अशा प्रकारे तिसऱ्या मजल्यावरच्या घरातून खाली पडलोय हे पाहून तर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. माझी अशी अवस्था बघून ती ओक्साबोक्शी रडायला लागली. इतर लोकांनी तिला शांत केलं. ती माझ्या जवळ येऊन बसली आणि असं कसं झालं वगैरे काहीतरी बोलत होती. मी तशाही अवस्थेत तिला सांगितलं की "मी ठीक आहे, तू घाबरू नकोस." मला माझं शरीर हलवायची खूप इच्छा होत होती, पण शरीर त्यासाठी अजिबात साथ देत नव्हतं. तिने माझी एकंदरीत अवस्था पहिली, तर माझा उजवा पाय घोट्याच्या वर पूर्ण फिरला होता आणि उजवा हात हाड तुटल्यामुळे नेहमीपेक्षा लांब झाला होता. इतर जखमा दिसत नव्हत्या पण त्या होत्याच, मात्र त्यासाठी लगेच वैद्यकीय मदत मिळणं गरजेचं होतं.

भारतीय प्रमाणवेळेनुसार पंधरा-वीस मिनिटं झाली, तरी रुग्णवाहिकेचा पत्ताच नव्हता. इथे एक एक क्षण मोलाचा होता. शेवटी बायकोने इमारतीतल्या लोकांनाच त्यांची कोणाची तरी गाडी काढायची विनंती केली. माझी उंची सहा फुटांवर आणि वजन शंभर किलोंवर असल्याने मला उचलणं हेच एक दिव्य होतं. ज्या माणसाची गाडी सगळ्यात लांब आणि रुंद होती, त्याचा स्वतःचा काही दिवसांपूर्वी अपघात झाल्यामुळे तो ती गाडी चालवू शकत नव्हता. मग गर्दीतूनच एक अनोळखी माणूस पुढे झाला आणि त्याने सांगितलं की “मी गाडी चालवतो, तुम्ही ह्यांना लगेच उचलून आत ठेवा.” लोक परत माझ्यापाशी आले आणि त्यांनी मला उचलून सतरंजीवर ठेवलं. ती सतरंजी उचलल्यावर मला पहिल्यांदा माझ्या शरीरात कुठे कुठे काय काय झालंय हे जाणवलं. मी स्वतः सगळ्यांना “इकडे हात लावू नका... हे दुखतंय...” वगैरे माहिती देत होतो, म्हणून बरं झालं... नाहीतर ती परिस्थिती आणखीनच वाईट झाली असती. मला कसंबसं उचलून लोकांनी त्या गाडीच्या मधल्या सीटवर आडवं टाकलं, तर गाडीचे दरवाजे बंदच होत नव्हते. मग कोणीतरी सांगितलं की दरवाजे उघडेच ठेवून गाडी चालवा, कारण दुसरा पर्याय नाही. तशा अवस्थेत ती गाडी गेटमधून बाहेर काढणं सोपं नव्हतं, पण त्या माणसाने काढली. मला कुठल्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं ह्यावरही बराच खल झाला. बऱ्याच लोकांनी ज्युपिटरमध्ये न्या म्हणून सांगितलं, पण रुग्णवाहिका वेळेवर न आल्यामुळे तो कार्यक्रम रद्द झाला. मग आमच्या घरापासून पाच मिनिटां,वर असलेल्या रुग्णालयात आधी किमान प्रथमोपचारासाठी न्यावं, असं ठरलं. त्याप्रमाणे मला तिथे नेलं गेलं. ती दरवाजे उघडी असलेली गाडी, जवळपास २०-२५ बाइक्स आणि पायी चालत असलेले लोक पाहून परिसरातल्या लोकांना काहीच उलगडा होत नव्हता. ही सगळी मिरवणूक जेव्हा रुग्णालयापाशी पोहोचली, तेव्हा सगळे लोक कुजबुज करत होते की नक्कीच कोणीतरी मोठा नेता किंवा व्हीआयपी आल्यासारखा वाटतोय, म्हणून तेही लोक गोळा झाले आणि चौकशी करायला लागले.
हे रुग्णालय हाच एक मोठा विनोद होता. जखमी माणसाला किंवा रुग्णाला वरच्या मजल्यावर नेण्यासाठी फक्त एकाच लिफ्ट, ज्यात एका वेळी दोन माणसे उभी राहून जाऊ शकतील.... स्ट्रेचर लिफ्ट असा प्रकार असू शकतो, हे त्यांच्या गावीही नव्हतं. अगदी माझ्यासारख्या हाडं मोडलेल्या रुग्णाला फारच गरज असेल, तर त्याने खुशाल त्या लिफ्टमधून उभं राहून यावं, असा उदात्त दृष्टिकोन होता त्यांचा! ती भयानक सोय पाहून लोकांनी मला जिन्याने वर न्यायचं ठरवलं. पण तिथे जिने इतके ‘प्रशस्त’ होते की एका वेळी जर जिने चढत असताना समोरून कोणी आलं, तर कोणी माघार घ्यायची ह्यावरून मारामारी होऊन आणखी एक रुग्ण त्यांना मिळेल.... माझी आधीच वाकलेली हाडं आणखी वाकवत लोकांनी मला त्या सतरंजीतून कसंबसं वर पोहोचवलं. तिथे गेल्यावर माझी घटना ऐकून आणि अवस्था पाहून तिथले कर्मचारीही गोंधळले. बऱ्याच लोकांना तेव्हाही मी आत्महत्येचा प्रयत्न केलाय असंच वाटत होतं त्यामुळे लगेच पोलिसातही माझी वर्दी गेली.

तो रविवारचा दिवस असल्याने हॉस्पिटलमध्ये तशी शांतता होती. तसेही ह्या हॉस्पिटलकडे एरवी कोणीच फिरकत नव्हतं. स्टाफने लगेच डॉक्टरांना फोन केला आणि नशिबाची गोष्ट म्हणजे तेही लगेच येतो म्हणाले. दरम्यानच्या काळात हॉस्पिटलवाल्यांनी माझी तपासणी कम स्वच्छता सुरू केली. बरोबरच्या लोकांनी त्यांना “फक्त थोडे प्रथमोपचार करा” असा सांगितलं, कारण हॉस्पिटलच्या सुविधा भयानक दिसत होत्या. तपासणी करताना कुठून तरी भरपूर रक्त येतंय असं जाणवलं, म्हणून त्यांनी माझ्या अंगावरचे कपडे कातरीने अक्षरशः कापून काढले. त्या वेळी दिसलं की मांडीच्या आतल्या भागात एक खोल जखम झाली आहे, जी कदाचित ते ग्रिलचं लोखंडी टोक लागल्यामुळे झाली असावी. त्या जखमेतून रक्ताच्या एकामागून एक गुठळ्या बाहेर पडत होत्या आणि त्यामुळे अतिरक्तस्राव व्हायची भीती होती, म्हणून तिथल्या डॉक्टरने मला जर तिथून हलवलं आणि “जर काही विपरीत घडलं तर त्याला आम्ही जबाबदार नाही” असं सांगितलं. त्यामुळे मला तिथेच दाखल करण्याशिवाय पर्याय नव्हता. मला ह्या सगळ्या गोष्टी खूपच धूसरपणे जाणवत होत्या. मी परत थोड्या गुंगीत गेलो. मला परत जाग आली, तेव्हा मी ऑपरेशन टेबलवर होतो आणि डॉक्टर मला सांगत होते की तुला उठून बसावं लागेल, कारण त्यांना माझ्या मणक्यात इंजेक्शन द्यायचं होतं. हे ऐकून मला कापरं भरलं, कारण जिथे हलताच येत नव्हतं, तिथे उठून बसणं माझ्यासाठी अशक्यप्राय होतं. मला तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी मागून ढकलायला सुरुवात केली, तसं मला ब्रह्मांड आठवलं. शरीरातला प्रत्येक अवयव जणू माझ्याविरुद्ध बंडच पुकारून बसला होता. एखाद्या रोलरखाली टाकावं तसं सगळीकडे दुखत होतं. ते इंजेक्शन कसंतरी मला दिलं आणि मी परत बेशुद्ध झालो.

मला शुद्ध आली, तेव्हा मी अतिदक्षता विभागात होतो आणि आजूबाजूला माझे सगळे लोक उभे होते. मी किलकिले डोळे करून आजूबाजूला पाहिलं, तर जवळपास सगळे नातेवाईक हजर होते. खबर सगळीकडे पसरली होती. त्यामुळे अगदी लांबूनही आलेले सगळे जण मी व्यवस्थित आहे ना हे ऐकायलाच उभे होते. मी वेळ विचारली, तर रात्रीचे साडेनऊ झालेले होते. माझी शस्त्रक्रिया जवळपास ५ तास चालली होती. माझ्या शरीरात अजूनही बधिरता असल्याने विशेष काही दुखत नव्हतं. आजूबाजूला सगळे नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र पाहून त्याही अवस्थेत मला खूप बरं वाटलं. मी परत माणसात आल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. सगळ्यांनी आपापल्या परीने आर्थिक आणि इतर मदत मनापासून देऊ केली होती, ती इतकी झाली की बायकोलाच नको नको म्हणायची वेळ आली. असे लोक आपल्या आजूबाजूला असणं हीच खरी दौलत, हे मनापासून कळलं. मला शंभर प्रकारच्या वायरी लावून ठेवल्यामुळे अजिबात हलायची सोय नव्हती. मी शुद्धीवर आल्याची बातमी पसरल्यामुळे सगळे जण एकेक करून मला पाहायला जवळ येत होते आणि एखादं वाक्य बोलून निघून जात होते. मला तशाही अवस्थेत सगळ्यांशी खूप बोलावसं वाटत होतं, पण डॉक्टर सगळ्यांना भराभर हुसकावून लावत होते, त्यामुळे तो बेत अर्धवटच राहिला. मग शेजारी फक्त बायको उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर अत्यंत आनंद दिसत होता. मी जमेल तेवढे प्रश्न तिला भराभर विचारून घेतले. मग तिने काय झालं, कसं झालं, वगैरे थोडक्यात सांगितलं. ती गर्भवती असल्यामुळे हॉस्पिटलने दोन कॉट असलेली एक खोली तिला आणि इतर घरातल्यांना बसायला दिली होती, तिथेच ते सगळे सकाळपासून बसून होते. कोणालाही खाणंपिणं सुचणं ही तर लांबची गोष्ट होती. तिने मला "तुला काय जाणवतंय?" असं विचारलं, पण तसं विशेष काही जाणवत नव्हतं. मग तिनेच मला माझा उजवा हात आणि पाय प्लास्टरमध्ये असल्याचं सांगितलं. इतक्या वरून बेसावधपणे पडूनही माझ्या डोक्याला किंवा मणक्याला काहीही इजा झालेली नव्हती, ही श्री स्वामी समर्थांचीच कृपा! अंगावर पांघरूण असल्यामुळे काहीच जाणवत नव्हतं, म्हणून मग शांत पडून राहिलो. उपवास असल्यामुळे सकाळी काहीच खाल्लं नव्हतं की साधा चहाही घेतला नव्हता. खूप तहान लागली होती, पण भूल दिलेली असल्यामुळे मला पाणीही द्यायला मनाई केली होती. मग कधीतरी अशीच झोप लागून गेली.

पोलिसांनी अशा वेळीही आपलं सहकार्य न करण्याचं काम मात्र चोख बजावलं. माझा अपघात झाल्यामुळे त्याचा पोलीस रिपोर्ट मेडिक्लेमसाठी अत्यावश्यक होता, म्हणून पोलीस आमच्या इमारतीत आणि घरी आले. खिडकीची एकूण रचना आणि ओट्याजवळ तसं मुद्दाम कोणीही जात नाही हे दिसत असूनही त्यांनी खास पोलिसी प्रश्न सुरू केले. पहिल्यांदा बायकोची चौकशी केली. तिचं माझ्याशी काही भांडण झालं आहे का? असं विचारून झालं. मग साहेब एवढे मोठे आणि खिडकी इतकी लहान मग ते पडले कसे? हे विचारून झालं. खाली जाऊन पडलेल्या ग्रिलचं आणि घटनास्थळाचं निरीक्षण करून झालं. तिथे थोडं रक्त पडलं होतं तेही त्यांनी पाहिलं. मग माझा जबाब घेण्यासाठी ते हॉस्पिटलमध्येही आले; पण डॉक्टरांनी त्यांना मला भेटू दिलं नाही, म्हणून जे निघून गेले ते परत आलेच नाहीत. मग माझा मेव्हणा आणि एक मित्र जाऊन दुसऱ्या दिवशी त्यांना परत घेऊन आले आणि मग त्यांनी माझाही जबाब घेतला. मी त्या अवस्थेतही त्यांना सगळं व्यवस्थित सांगत होतो, तरीही “तुमचा बायकोवर संशय आहे का?” हा प्रश्न त्यांनी विचारलाच! माझा जबाब लिहून घेतला आणि मला वाचून दाखवला. त्यात काही त्रुटी होत्या, म्हणून त्यांना मी सुधारणा सुचवल्या तर माझ्याकडे चिडून असं बघितलं की विचारता सोय नाही. बायकोला बाहेर जाऊन त्यांनी विचारलं की “साहेब काय करतात?” तर ती म्हणाली की, “ते वकील आहेत.” मग त्यांची खातरी पटली, कारण मी त्यांच्या एक पानी जबाबात अशा अवस्थेतही मोजून तीस चुका काढल्या होत्या. तरीही पोलीस रिपोर्ट द्यायला त्यांनी “आज वेळ नाही, उद्या वेळ नाही” असं करायला सुरुवात केली. मग माझ्या मेव्हण्याने आणि बायकोने जाऊन त्यांच्या डोक्यावर बसून तो रिपोर्ट एकदाचा आणला आणि आमची गाडी पुढे सरकली.

दुसऱ्या दिवशी खायला तर काही द्यायचं नव्हतं.... पाणी द्यायला सांगितलं होतं, पण संपूर्ण तोंड कडूजार झाल्याने पाणी जाईना, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने नारळपाणी सुरू केलं. पण तेही फार द्यायचं नाही.... सुरुवातीला चमच्याने पाजत होते, पण मला भयानक तहान आणि भूक लागलेली. कधी एकदा ते पाणी पितोय असं झालेलं... त्यात थोडीफार सांडलवंड मग चिडचिड असेही उपकार्यक्रम झाले. भूल उतरल्यामुळे मला स्वतःला पूर्ण शरीरात प्रचंड ठणका जाणवत होता. काही टेस्ट्स करायच्या असल्यामुळे सगळे जण येऊन आपापले काम करत होते. क्ष किरणवाल्याने तर जीव नकोसा करून टाकला होता. काय, तर म्हणे “तुम्हाला उठून बसता येईल का?” मी मनात म्हटलं - अरे बाबा, जर मला उठून बसता आलं असतं, तर मी इथे कशाला दाखल झालो असतो? घरीच बसलो नसतो का... पण हे उद्गार मी गिळून टाकले आणि त्याला म्हटलं, “तुला जे जमेल ते तूच कर.... माझ्याकडून फार अपेक्षा ठेवू नकोस.”

तिसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली तीच मुळी भयानक बातमी घेऊन..... माझ्या किडन्या आत्यंतिक मुका मार लागल्याने हळूहळू काम करेनाशा झाल्या होत्या. आलेले रिपोर्ट काही खास उत्साहवर्धक नव्हते, पण ह्यातलं मला कोणीच काही कळू देत नव्हतं. तशात छातीत अचानक पाणी झालं होतं. माझ्यावर उपचार करायला एक हाडांचे डॉक्टर, एक भूलतज्ज्ञ, एक किडनीतज्ज्ञ, एक फिजिशियन, एक फिजिओथेरपीस्ट असे सगळे जण मिळून शर्थीचे प्रयत्न करत होते. याशिवाय क्ष किरण तपासणी, पॅथॉलॉजीवाले येऊन येऊन पिडत होते ते वेगळेच! भूल उतरल्यामुळे मला स्वतःला प्राणांतिक वेदना होत होत्या, पण त्या नक्की कुठे होतायत हेच कळत नव्हतं, कारण संपूर्ण शरीराचं प्रमाणच बिघडलं होतं. एका दवाई सुंदरीने आधीच मुका मार लागलेल्या डाव्या हातात चुकीच्या पद्धतीने सुई घुसवल्यामुळे होता तोही हात प्रचंड काळानिळा पडला. उजवा हात प्लास्टरमध्ये असल्यामुळे त्याला काही लावायचा प्रश्नच नव्हता. दुसरा दिवस प्रचंड वेदनेने भरलेला गेला. मला कोणी भेटायला पाच मिनिटं जरी आलं तरी खूपच बरं वाटायचं. माझं क्रिएटिनीन झपाट्याने वाढू लागलं कारण किडन्यांना प्रचंड सूज चढली होती. तशातच माझ्या संपूर्ण शरीराचा सीटी स्कॅन करायचा सल्ला एका डॉक्टरने दिला. ते अर्थात ह्या हॉस्पिटलमध्ये होणार नव्हतंच! त्यासाठी पुन्हा मला ते तीन मजले उतरवून अँब्युलन्समध्ये टाकून पश्चिमेला असलेल्या स्कँनिंग सेंटरमध्ये न्यायचं होतं आणि परत इथे वर आणून टाकायचं होतं. मला पुन्हा एकदा ब्रह्मांड आठवलं, पण करतो काय..... परत सात-आठ माणसं कुठून आणायची, हा एक प्रश्न होताच - कारण मला उचलणं हे खायचं काम नव्हतं. इकडची तिकडची अशी थोडी तगडी माणसं गोळा करून आमची मिरवणूक पुन्हा एकदा त्या चिंचोळ्या अंधाऱ्या जिन्यावरून निघाली. कसातरी मला अँब्युलन्समध्ये टाकून नेऊन आणला, त्यातच माझा अर्धा जीव गेला. कारण नाही म्हटलं तरी इतर लोकांचे माझ्या हातापायाला धक्के लागतच होते. रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळणार होते. हा दिवसही असाच धावपळीत गेला.
बरेचसे रिपोर्ट आल्यानंतर एक एक गोष्टीचं ज्ञान वाढत गेलं. किडन्यांना सूज आल्यामुळे माझं नारळपणीही बंद केलं गेलं. क्रिएटिनीन झपाट्याने वाढून ७.६पर्यंत पोहोचलं होतं, जे डॉक्टरांच्या मते फार चिंताजनक होतं. उजव्या हाताचं हाड कोपराच्या वर आणि उजव्या पायाचं हाड घोट्याच्या वर मोडलं असल्याने त्यात अनुक्रमे प्लेट आणि रॉड आधीच घातले होते. पण मागच्या मणक्यांनाही बरीच दुखापत झाली होती. त्यात माझी डाव्या हाताची एकही शीर सापडत नसल्याने माझ्या उजव्या मानेजवळ सेंट्रल लाईन टाकायला लागणार होती, म्हणून सगळे माझ्या आवतीभोवती जमून बसले. त्यात डॉक्टर, शिकाऊ डॉक्टर, नर्स, शिकाऊ नर्स आणि वॉर्डबॉय इतके सगळे लोक होते. शिकाऊ लोकांसाठी तर ही पर्वणीच होती. त्यामुळे ते उत्साहाने आले होते. जवळपास अर्धा पाऊण तास माझ्या मानेजवळ खुडबुड केल्यानंतर ती लाईन बसली, पण त्यामुळे मानही फिरवणं अवघड होऊन बसलं आणि मी पूर्ण लॉक झालो. पायांवर तर माझा काडीचाही कंट्रोल नव्हता. त्यामुळे ते सारखे घसरून इकडे तिकडे पडायचे. कॅथेटर असल्याने त्याचे झटके बसायचे ते वेगळेच! अशा परिस्थितीत पडून राहून फक्त देवाचा धावा करण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हतं.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या डाव्या छातीत सतत दुखत राहायचं. हे मी डॉक्टरांनाही सांगितलं, पण त्यांनी विशेष लक्ष दिलं नाही. तरीही मी माझा धोशा चालूच ठेवला. मग माझ्या आग्रहाखातर माझ्या छातीचा आणखी एक एक्सरे काढला. त्यात डाव्या बाजूच्या ५ बरगड्या तुटल्याचं दिसलं. आता एकूण अस्थिभंग ११च्या वर झाले होते. आणखी एक पट्टा छातीसाठी लावण्यात आला. बाकीच्या मॉनिटरच्या वायरी होत्याच. मला मी ‘द ममी’मधला कोणीतरी एक असल्यासारखं वाटत होतं. असेच आयसीयूमधले भयानक दिवस जात जात नव्हते. शेवटी एकदाचं माझं क्रिएटिनीन उतरायला लागलं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. रोज सकाळची हॉस्पिटलची चादर बदलणं हा माझ्यासाठी खूप भयानक प्रकार असायचा, कारण माझं मला तसूभरही हालत येत नव्हतं आणि त्या वॉर्डबॉयला त्याशिवाय काही करता यायचं नाही. मांडीच्या आतली खोल जखम नंतर खूप ठणकायला लागायची. रोजचं ड्रेसिंग हाही आणखी एक तापदायक प्रकार होता. भूल उतरल्यानंतर रोज रात्रीची झोप येणंही कठीण होऊन बसलं होतं. छताकडे पाहात एक एक मिनिट मोजत वेळ काढणं खूप कठीण काम असतं, हे मला तेव्हा हळूहळू कळायला सुरुवात झाली. बायको आणि सासूसासरे यांची तर भयानक तारेवरची कसरत सुरू होती, कारण माझ्याकडे लक्ष द्यायचं, बायकोची काळजी घ्यायची आणि आमचं घरही सांभाळायचं अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी कशी सांभाळली हे तेच जाणोत. बायको तर गर्भारपणाच्या काळात तहानभूक विसरून एकटीच जिथे-तिथे धावत होती, कारण आमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती केवळ तिलाच होती. तिची तब्येत सांभाळून ती माझ्यासाठी कुठेही जायला तयार असायची. तो माझ्या कसोटीचा काळ होताच, त्याहून कितीतरी जास्त तिच्या सत्त्वपरीक्षेचा होता.
आयसीयूमधलं दुष्टचक्र ७ दिवस चाललं आणि त्यानंतर खालच्या मजल्यावर एका रूममध्ये माझी रवानगी करण्यात आली. तिथे परिस्थिती आणखी बिकट होती. आयसीयूमध्ये कमीत कमी सिरियस केस म्हणून माझ्याकडे लक्ष तरी द्यायचे, पण खाली तर सगळंच उजेड होता. इथल्या नर्सेस माझ्याच लोकांवर "तुम्ही पेशंटला औषध का दिलं नाही?" म्हणून खेकसून जायच्या! आरएमओ डॉक्टर तर इतके भयानक होते की विचारता सोय नाही. एका दिव्य नर्सने तर रात्री साडेबारा वाजता कधी नव्हे ते मला गाढ झोप लागलेली असताना उठवून झोपेची गोळी दिली होती! आणि हा विनोद नाही, कारण मला रात्री ती गोळी द्यायची असं माझ्या रेकॉर्डमध्ये लिहिलेलं होतं म्हणे! दिवस घालवणं म्हणजे काळ्या पाण्याच्या शिक्षेपेक्षा भयानक शिक्षा होती. कोणीतरी भेटायला यायचं तितकाच विरंगुळा. बरेच मिपाकरही येऊन आवर्जून मला भेटून गेले... डॉ. खरे (सपत्निक), मोदक, माझीही शॅम्पेन आणि कितीतरी फोनही आले.... सगळ्यांनी आपुलकीने विचापूस केली. डॉ. खरेंनी माझे सगळे एक्सरे तपासून मला सांगितलं की खाली पडताना माझा उजवा पाय पहिल्यांदा जमिनीला आपटला आणि त्यानंतर उजवा हात, म्हणून हे दोन्ही अवयव सगळ्यात जास्त बाधित झाले होते, पण त्यामुळेच बाकीचे महत्त्वाचे अवयव वाचले. मी पडताना मुळात डोकं पहिल्यांदा जमिनीच्या दिशेने होतं, पण काहीतरी ईश्वरकृपा होऊन मी हवेत गिरकी घेतली असावी आणि त्यामुळेच पाय जमिनीवर आधी आपटला. खरं म्हणजे माझं वरचं शरीर खूप वजनदार आहे. त्यामुळे जमिनीच्या दिशेने ते पहिल्यांदा झेपावणं नैसर्गिक होतं. पण तसं झालं नाही. जे काही असेल ते असेल, पण थोडक्यात बचावलो हे नक्की.... माझा हा पुनर्जन्म आहे असं बऱ्याच जणांनी मला सांगितलं आणि त्याबद्दल मी परमेश्वराचे हजारदा आभारही मानले.

हॉस्पिटलमध्ये रोजचं वेदनाचक्र चालू होतंच, पण ते सहन करायची ताकद मला कुठून तरी मिळत होती. एकदा तर माझी सेंट्रल लाईन सटकली, तर एका महान आरएमओ मी पूर्ण शुद्धीत असताना माझी मान ३ टाके घालून छानपैकी कशिदाकारी केल्यासारखी शिवत बसला होता आणि मी त्याच्या नावाने ओरडत होतो. त्याला मी नंतर विचारलंसुद्धा की हॉस्पिटलचं भुलीचं औषध सोन्यासारखं खूप जपून वापरायचं अशी तुम्हाला काही सूचना आहे का? त्यावर तो "काही होत नाही जरा सहन केलं तर" असंही म्हणाला. खालच्या माझ्या पायाची जास्त हालचाल होऊ नये म्हणू अक्षरशः दर पाच मिनिटांनी मला बरं वाटेल किंवा निदान वेदना होणार नाहीत ह्यासाठी पायाखाली उशा लावणं आणि त्या बदलणं हा प्रकार सतत करावा लागायचा, पण त्यासाठी सतत माणसं कुठून आणायची? ते करणाऱ्या माणसाची मलाच कधीतरी दया यायची, पण पायातून कळाच इतक्या भयानक यायच्या की ते करणं फारच गरजेचं असायचं आणि माझ्याबरोबर असलेल्या माणसाची कसरत व्हायची. माझ्याकडे बघणं, औषधं आणणं आणि इतर बरंच काही.... पाठीखाली एअरबेड असूनही माझ्या पाठीला पंधरा दिवसात न हल्ल्यामुळे बेडसोर्स झाले, त्याचंही अजून वेगळं ड्रेसिंग सुरू झालं. मग जमत नसतानाही कुशीवर वळणं वगैरे प्रकार करावे लागायचे. त्यामुळे आणखीनच बिकट झाली परिस्थिती !

भरपूर खर्च केल्यानंतर, हो-ना करता करता, मला तब्बल १५ दिवसांनी हॉस्पिटलमधून एकदाचा डिस्चार्ज मिळाला आणि सगळ्या नातेवाइकांनी आणि इतर लोकांनी मला तिसऱ्या मजल्यावर माझ्या घरी आणून ठेवलं. पण त्याआधी नवीन संकटं केव्हाच उभी राहिली होती. पाहिलं म्हणजे घरी गेल्यावर माझं आवरणं, ड्रेसिंग आणि इतर गोष्टी कशा आणि कोण करणार? कारण बायकोला ते झेपणं शक्यच नव्हतं आणि हॉस्पिटलमधलं कोणीही पैसे देऊनही हे करायला तयार नव्हतं, कारण त्यांची नोकरीची वेळच आडनिड होती. पहिले एक-दोन दिवस कसेतरी काढले, पण ते काही जमेना, म्हणून मग वॊर्डबॉयसाठी नर्सिंग ब्युरोची चौकशी करायला सुरुवात केली. एकेक ब्युरोचे रेट ऐकून आधीच पांढरे असलेले डोळे आणखी पांढरे व्हायची वेळ आली. आम्हाला सुरुवातीला थोडे दिवस का होईना, पण २४ तासासाठी माणूस असणं गरजेचं होतं. हो ना करता करता एका ब्युरोची ऑफर त्यातल्या त्यात बरी वाटली आणि त्यांचा एक माणूस घरी येऊन धडकला. बायकोच्या अशा अवस्थेत एक बाहेरचा त्रयस्थ माणूस २४ तास घरात ठेवणं तसं विचित्रच, पण आम्हाला दुसरा इलाज नव्हता. त्यातल्या त्यात एकच गोष्ट बरी होती की मला अपघात झाल्या दिवसापासून माझ्या सासूबाई आमच्याबरोबर राहात होत्या, कारण ती गरज होतीच. बायको रात्री अपरात्री मी हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा घरी झोपेतून दचकून उठायची, तिला सांभाळणं प्रचंड गरजेचं होतं. त्यात हा घरी नवीन आलेला नग म्हणजे एक असामान्य वल्ली होती, कारण महाराजांचं लग्न होऊन त्यांना दोन पोरं होऊन सोळा वर्षं झाली होती आणि शिवाय त्यालाच सोळावं लागल्यासारखी एक गर्लफ्रेंडही होती (कसं जमवलं होतं देव जाणे !) बरं, दिसायला म्हणावं तर त्याचीही बोंब आणि पगार यथातथाच.... याची एक गम्मत मला नंतर कळली, ती म्हणजे बायकोचा फोन आला की अक्षरशः दोन मिनिटात हा फोन ठेवून द्यायचा आणि तेच मैत्रिणीचा फोन आला की तासंतास हा फोनवरच! हळूहळू त्या बाईचे फोनही वाढायला लागले. तिलाही काही कामधंदा नसावा बहुतेक.... रात्री-अपरात्री कधीही हा प्राणी कानात बुचं घालून फोनवरच बोलत असायचा! बोलणं इतकं हळू की त्या बयेला तरी ऐकू जायचं की नाही... देव जाणे! ह्या सगळ्या गोंधळात कित्येकदा मीच बाजूला राहून जायचो ज्यासाठी त्याला घरी आणला होता .... त्याच्या प्रेमलीला ऐकत रात्रभर जागाच असायचो, कारण झोप काही केल्या यायचीच नाही. झोपेची गोळी घेऊनही काडीचा परिणाम नसायचा, कारण वेदनाच इतक्या ठिकाणी होत्या की ज्याचं नाव ते! घरी आणल्यानंतरसुद्धा माझ्या शरीराचं लक्षण काहीच ठीक दिसत नव्हतं. एका हाताला कामचलाऊ प्लास्टर, छातीला आणि कमरेला पट्टा आणि ड्रेसिंगच्या पट्ट्या अशा साजशृंगारात दिवस कंठत होतो. पायातून वेळी-अवेळी भयानक करंट मारायचे आणि त्यांचा आवेग इतका असायचा की कोणीतरी सुरी पायात खुपसतंय की काय असं वाटायचं.
तेवढ्यात आणखी एक महान प्रकार घडला. माझ्या फिजियोथेरपिस्टने "आता आपण हाताची हालचाल करू, नाहीतर तो अवघडेल" असं एक दिवस जाहीर केलं आणि प्लेटने कसातरी जोडलेला हात ट्रकचा गियर असल्यासारखा कोपरातून हलवून पहिला. परिणामी तो आणखी भयानक पद्धतीने दुखायला लागला. आता घरी एक्सरे काढायचीही सोय नव्हती, म्हणून जास्त पैसे देऊन बाहेरचा एक्सरेवाला घरी आणला. ज्याची आम्हाला भीती होती, तेच झालं होतं. ती प्लेट एका बाजूने सटकली होती आणि त्यामुळे हाताचं हाड खुळखुळ्यासारखं वाजत होतं. आणखी एक गमतीची गोष्ट कळली, ती म्हणजे पायाच्या दहापैकी सात बोटांचाही अस्थिभंग झाला होता आणि ही गोष्ट मला हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर जवळपास एक महिन्याने कळत होती. आम्ही ताबडतोब आमच्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांना घडलेली घटना सांगितली. तेही प्लास्टरचं सामान घेऊन धावत घरी आले आणि त्या कामचलाऊ प्लास्टरऐवजी मोठं हातभर लांब प्लास्टर घातलं आणि "ह्या हाताला कोणालाही हात लावू देऊ नकोस" अशी तंबी दिली आणि वर पायाची बोटं खेचून खटक्यासारखी बसवली, तेव्हा तर माझा आवाज टिपेला पोचला होता. ती बोटं बसवतानाही तोंडाने सतत "जर ह्या प्लास्टरनेही ते हाड जुळलं नाही, तर पुढे काहीतरी करावं लागेल" असं काहीतरी मोघम बोलून ते निघून गेले. पण त्यामुळे आमची सगळ्यांचीच झोप उडाली. आता काय करायचं ह्या चिंतेने निराश अवस्थेत सगळे जण एकमेकांकडे बघत बसलो होतो. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीवरून दोन-तीन प्रथितयश डॉक्टरांचं सेकंड ओपिनियनही घेतलं, पण ते आपलीच तुंबडी भरण्यासाठी उत्सुक आहेत हे स्पष्ट दिसून आलं. त्यांनी घरच्या लोकांना झालेलं ऑपरेशन कसं चुकीचं आहे आणि ते पुन्हा करायलाच लागेल असं भयानक पद्धतीने घाबरवून सोडलं. त्यामुळे आम्ही त्यांचा नादच सोडून दिला.

माझ्या अशा अवस्थेत काहीतरी विरंगुळा म्हणजे केवळ आलेले फोन आणि भेटायला येणारे लोक...... बाकी दिवस भयाण जायचा. मला साधं बिछान्यातही उठून बसता येत नव्हतं. त्यामुळे जेवणापासून सगळे प्रकार झोपूनच.... त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली झाली की मी मुळातच डावखुरा असल्याने माझी संपूर्ण उजवी बाजू जरी काम करत नसली, तरी डाव्या हाताने बरीचशी कामं करायचो. पण त्यालाही मर्यादा होतीच. झोपून झोपून दिवस रात्र काढून त्याचाही कंटाळा यायला लागला. त्यात माझा वॉर्डबॉय रोज काहीतरी आचरट प्रकार करायचा आणि आमचं काम उगाच वाढवून ठेवायचा. सगळ्यांच्या आधी ह्याची आंघोळीची घाई... बरं आंघोळ चांगली साग्रसंगीत तासभर चालायची... ह्याच्याबरोबर ह्याचा मोबाइलही आतमध्ये, म्हणजे बघायलाच नको! बाहेर आल्यानंतर आरशासमोर इतकं घोटाळायचं की माझी बायकोही हैराण व्हायची. मधून मधून काहीतरी कारणं काढून ५-६ तास गायबच असायचा. कुठे जायचा हे कळायला काही ज्योतिषाची गरज नव्हती. त्याची बायको एकदा मुद्दाम आमच्या घरी येऊन गेली आणि मग माझ्या बायकोच्या फोनवर फोन करून आडून आडून चौकशी करायची. ह्याला दुपारची झोप सगळ्यांच्या आधी हवी असायची, कारण रात्री गप्पा कशा मारणार मग? अशात एप्रिल उजाडला, तरीही अपेक्षित परिणाम दिसून येत नव्हते. मला जेमतेम ५ मिनिटं उठून बसता यायला लागलं, पण ते पुरेसं नव्हतं. घरी व्हीलचेअर केव्हाची येऊन पडली होती, पण मला तिचा उपयोगही करता येत नव्हता. तरीही मनाचा हिय्या करून मी एकदा तिच्यावर बसायचं ठरवलं. पण तो दिवस फार भयानक होता, कारण नुसता प्रयत्न करायला मला तासभर लागला. डॉक्टरांनी सुचवलेली आणि ढीगभर पैसे ओतून बनवून घेतलेली ऑर्थोपेडिक आयुधं परिधान करून त्या खुर्चीत बसणं म्हणजे एक दिव्य होतं. पण तरीही अथक प्रयत्नानंतर पहिल्यांदा खुर्चीत बसलो. तेव्हा जग जिंकल्याचा आनंद झाला होता. पण पाठीला लगेच रग लागली आणि भयानक कळा सुरू झाल्या. पण कितीही कंटाळा आला तरी हा उद्योग न चुकता रोज करून बघायचो, कारण सवय व्हायला हवी होती. त्या चेअरवर बसल्यावर स्थानबद्धता संपल्यासारखं वाटलं.

एकीकडे बायकोची डिलिव्हरी डेट जवळ यायला लागली होती, त्याचीही तयारी करायला हवी होती. पण ते करणार कोण आणि कधी? सगळे नुसते प्रश्न आणि प्रश्न! एप्रिलच्या सुरुवातीला पुन्हा एकदा सगळे एक्सरे काढले. त्यात काहीही सुधारणा झाली नव्हती आणि हातापायाच्या हाडात भरपूर पोकळी दिसत होती, म्हणून डॉक्टरही थोडे चिंतित झाले. त्यांनी पायासाठी जो रॉड घातला होता, त्याचं dynamisation - म्हणजे एक स्क्रू काढण्याचं ऑपरेशन त्यांनी सुचवलं, जेणेकरून हाडाच्या वाढीसाठी जागा निर्माण होईल. हाताच्या बाबतीत त्यांनी आणखी थोडी वाट बघायला सांगितली. आमच्यापुढे यक्षप्रश्न असा होता की आता जर हे ऑपरेशन करायचं ठरवलं, तर बायकोकडे कोण बघणार? तिच्या मदतीशिवाय मला काहीही शक्य नव्हतं आणि तिकडे तिलाच माझ्या मदतीची आत्यंतिक गरज होती. मी म्हटलं की आपण हे ऑपरेशन सध्या पुढे ढकलू या, कारण आताच्या परिस्थितीत हे करणं शक्य नाही. पण बायको नाही म्हणाली, कारण डिलिव्हरीनंतर तर ते अजिबातच शक्य नव्हतं, म्हणून मग नाइलाजाने हो म्हटलं. पण तरीही सगळ्यांना धाकधूक होतीच! मी आधी बऱ्याच डॉक्टरांचे सल्ले घेतले आणि त्यांनीही ओके म्हटलं. मला पुन्हा खाली तीन मजले उचलून न्यायचं, ऑपरेशन करायचं आणि त्याच दिवशी परत आणायचं, असं ठरलं. म्हणून मग सकाळीच लवकर बोलावलं होतं पण डॉक्टरांना एक इमर्जन्सी आल्यामुळे सकाळी ११ वाजता बोलावलं. इथे घरी अँब्युलन्स बोलावली गेली आणि त्याबरोबर ४-५ माणसंही... माझी वरात पुन्हा त्याच हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. तिथे गेल्यावर पुन्हा त्याच आठवणी माझ्या डोक्यात घोंगावू लागल्या. आतापर्यंत हॉस्पिटलमधले सगळे लोक मला नावानिशी ओळखायला लागले होते. सगळ्या स्टाफने माझी चौकशी केली. ऑपरेशनचे सगळे सोपस्कार पार पडले आणि नेमका माझ्या मेडिक्लेमवाल्यांनी काहीतरी घोळ केला आणि मी संध्याकाळी ५ऐवजी रात्री ११ वाजता पुन्हा घरी आलो, तोपर्यंत दिवसभराचा व्यवस्थित उपवास घडला होता.

दोनच दिवसांनी पहाटे बायकोला अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून माझे सासूसासरे सकाळी ७ वाजता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. माझ्या डोक्यात इकडे असंख्य विचारचक्रं चालू होती. तिला ऍडमिट करून घेणार आहेत असा निरोप आला. सकाळी साडेदहा वाजता मला फोन आला की तिचं सिझेरिअन करावं लागलं आणि मला मुलगा झाला अशी बातमी मिळाली! जीव अक्षरशः भांड्यात पडला ..... ऐकून कधी एकदा तिला भेटतोय असं झालं होतं. पण मी दुर्दैवाने घरीच आडवा असल्याने कुठलं भेटणं आणि काय... ती घरी येईपर्यंत मला चैन पडत नव्हती. तिकडे तिला डिलिव्हरी झाल्यादिवसापासून ताप सुरू झाला आणि पिल्लूचीही शुगर लो झाल्याने त्याला एनआयसीयूमध्ये ठेवलं गेलं होतं..... आमचं सगळं कुटुंबच जणू दैवाची परीक्षा एकदम एकाच वेळी देत होतं! दोघांनाही कुणाला भेटू देत नव्हते, म्हणून आणखीनच टेन्शन आलं होतं. एकदाचं त्यांना ७ दिवसांनी घरी सोडलं, तर घरी आल्यावर दोन दिवसांनी पुन्हा बायकोला ताप आला म्हणून ऍडमिट करावं लागलं.... पुन्हा एकदा तीच धावपळ आणि गडबड .... आता तर पिल्लूही घरी एकटंच आईशिवाय ३ दिवस राहिलं. आयुष्यातली अपत्यजन्माची ही अविस्मरणीय घटना ह्या सगळ्या थरारनाट्याने पुरती झाकोळून गेली आणि ‘नको ते हॉस्पिटल’ असा देवाकडे धावा करून करून जीव मेटाकुटीला आला.

मे महिना आला आणि ह्या आमच्या चॉकलेट वॉर्डबॉयला २४ तासांसाठी घरी ठेवणं आम्हाला परवडेना झालं, पण अजून माझी उठायची किंवा हिंडाफिरायची तर जाऊ दे, नुसतं एका जागी सरळ बसायचीही परिस्थिती आली नव्हती. त्यामुळे माझं आवरायला कोणीतरी लागणार होतंच, म्हणून त्याला “फक्त सकाळी तासभर येतोस का?” असा विचारलं, तर तो सरळ नाही म्हणाला आणि दुसऱ्या दिवसापासून त्याने येणं बंद केलं. माझी भयानक पंचाईत झाली, कारण माझं सगळं त्याच्यावरच अवलंबून होतं. कितीतरी लोकांना विचारलं तर सगळे एकजात नाही म्हणाले. मग मात्र धीर सुटत चालला, कारण रोजचं स्पंजिंग, कपडे बदलणं, बेडपॅन ही कामं होणार कशी? एक जण सापडला आणि येतो म्हणाला, पण नेमक्या वेळेला दुसऱ्या दिवशी उगवलाच नाही. हतबलता काय असते आणि काकुळतीला येणं कशाला म्हणतात, हे धडेही तेव्हाच मिळाले. समोर घरातच बाथरूम असूनही मी तिथे जाऊच शकत नव्हतो, यापेक्षा खडतर शिक्षा काय असणार? दुसऱ्या दिवशी तो माणूस आला, माझं सगळं त्याने आवरलं, पण त्याने एक निराळाच रंग दाखवला. एका बेसावध क्षणी घरातल्या कोणाचंही लक्ष नाही असं बघून त्याने थेट बायकोच्या पर्सलाच हात घातला. आमच्या सुदैवाने माझ्या सासूबाईंनी नेमकं तिथे येऊन त्याच्याकडे पाहिलं, तसा तो गडबडला आणि त्यानं पर्स टाकून दिली. त्यानंतर मात्र आम्ही कटाक्षाने कोणी ना कोणीतरी त्याच्यावर आळीपाळीने लक्ष ठेवायचो. त्याला हाकलणं परवडणारं नव्हतं, म्हणून त्यानंतरचे दोन महिने अक्षरशः त्याला सहन केलं.

पुन्हा एकदा एक्सरे काढले, तेव्हाही हातापायाच्या अवस्थेत म्हणावा तसा फरक पडला नव्हता. त्यामुळे डॉक्टरही थोडे गंभीर झाले. त्यांच्या मते आतापर्यंत बरीच प्रगती व्हायला हवी होती. पण ती तशी होत नव्हती, ही वस्तुस्थिती होती. त्यांनी "फार तर आणखी एक महिना थांबू. मात्र त्यानंतर हाताचं बोन ग्राफ्टिंग करावं लागेल" असं सांगितलं. मला पुन्हा एकदा ऑपरेशन कुठल्याही परिस्थितीत नको होतं, कारण तोपर्यंत मी घरातून थोडं ऑफिसचं काम बसत उठत का होईना, पण सुरू केलं होतं. इथेही आपले मिपाकर ‘प्रास’ देवदूतासारखे माझ्या मदतीला धावून आले. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी आयुर्वेदिक औषध सुरू केलं आणि त्याने खरंच एका महिन्यात चमत्कारिकरित्या गुणकारी परिणाम दिसून आले आणि हाताची हाडं बरीचशी सांधली गेली आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. पायाची हाडं सांधली जाण्यासाठी त्यावर दाब पडणं गरजेचं आहे असं डॉक्टरांचं मत होतं, त्यानुसार माझ्या फिजिओथेरपिस्टने मला हळूहळू उभं राहायचे व्यायाम सांगितले. पण पाठ प्रचंड धरलेली असल्याने ते खूप अवघड वाटत होतं आणि गेले सहा महिने जमिनीला पाय लागलाच नसल्याने माझा आत्मविश्वास प्रचंड कमी झाला होता.

एकदा मनाचा हिय्या करून जमिनीला पाय लावला आणि मग रोजच सराव करू लागलो. पाठ साथ देत नसतानाही त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. मी निराश झालो तर माझे मित्र, नातेवाईक, हितचिंतक सगळे जण हक्काने येऊन कानउघाडणी करायचे आणि उत्साह नव्याने माझ्या मनात परत परत निर्माण करायचे. व्हीलचेअर सोडून वॉकर सुरू केला आणि घरात चालायला सुरुवात केली. जून-जुलै हा हा म्हणता असेच निघून गेले, पण त्यातून मी माझा नवीन मार्ग शोधायला सुरुवात केली. अखेर तो दिवसही आला, ज्या दिवशी आमच्या शर्विलक वॉर्डबॉयबरोबर का होईना, पण पहिल्यांदा बाथरूममध्ये पाय ठेवला आणि मला अत्यानंद झाला. माझा आत्मविश्वास परत आल्यावर शर्विलकालाही ताबडतोब नारळ दिला. आता तयारी होती जिने उतरायची, कारण सगळ्यात अवघड काम तेच होतं. एक दिवस खाली उतरून स्वामींच्या मठात जायचं नक्की केलं आणि रोज तब्बल अर्धा तास सराव करून मी एकट्याने मजला दरमजला करत खाली उतरलो. मोठा वॉकर नको, म्हणून आधारासाठी हातात काठी घेतली आणि स्वामींचं दर्शन घेऊनच आलो. पुन्हा जिने चढताना तब्बल एक तास लागला, जे काम मी दहा मिनिटात करायचो.

ह्या सात-आठ महिन्यात त्या एका गोष्टीमुळे आणि त्याच्या परिणामामुळे माझ्या आख्ख्या कुटुंबाने भयानक पद्धतीने खूप काही सोसलं, आलेल्या अनुभवातून खूप काही शिकलो, खूप माणसं आणि त्यांचे खरे स्वभाव दिसले, आपले कोण परके कोण ह्याचा उलगडा झाला, माझ्यातल्या सहनशीलतेची मला आणि माझ्या बायकोच्या व्यवस्थापन कौशल्याची तिला नव्याने जाणीव झाली, आमच्या पुत्रजन्माचा आनंदही ह्याच काळात मिळाला.. अजूनही आमची लढाई संपलेली नाही. ती चालूच राहणार आहे. पण एक माणूस म्हणून या लढाईतून आणखी थोडं समृद्ध झालो. कुसुमाग्रजांच्या ह्या ओळी माझ्या संपूर्ण अनुभवात सतत प्रेरणा देत राहिल्या....

“ओळखलंत का सर मला?” पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून,
“गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी? बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.”
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला.
“पैसे नकोत सर”, जरा एकटेपणा वाटला.
“मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून, नुसतं लढ म्हणा!”

प्रतिक्रिया

साहित्य संपादक's picture

26 Aug 2017 - 12:56 pm | साहित्य संपादक

काही तांत्रिक अडचणींमुळे लेख प्रकाशित करायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. हा लेख लवकरच 'लेखमाला' विभागात आणि माम्लेदारचा पन्खा यांच्या आयडीने प्रकाशित केला जाईल. सध्या तात्पुरता 'जनातलं मनातलं' विभागात प्रकाशित केला आहे.

धन्यवाद!
- साहित्य संपादक.

अरे काय हे!!
वाचतानाही धडधडतय

पैलवान's picture

26 Aug 2017 - 2:01 pm | पैलवान

पुनर्जन्मच !!

चायला भयंकर आहे, वाचताना लय त्रास झाला

काळजी घ्या मा.प

प्रचेतस's picture

26 Aug 2017 - 1:41 pm | प्रचेतस

भयंकरच प्रकार झाला. ह्या परिस्थितीतून तावूनसुलाखून बाहेर पडताय. जिद्दीला सलाम.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2017 - 8:52 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वण टू आगोबा.

पैसा's picture

26 Aug 2017 - 1:50 pm | पैसा

काळजी घ्या म्हणून काय सांगणार? लढा सुरू ठेवा.

तुमचा पुनर्जन्मच झालाय!

सिरुसेरि's picture

26 Aug 2017 - 1:54 pm | सिरुसेरि

भयानक अनुभव . शुभेच्छा .

वरुण मोहिते's picture

26 Aug 2017 - 1:56 pm | वरुण मोहिते

वाचतानाच काय प्रसंग आला असेल ते डोळ्यासमोर उभे राहते . काळजी घ्यालच आपण पुढे . शुभेच्छा .

नि३सोलपुरकर's picture

26 Aug 2017 - 2:03 pm | नि३सोलपुरकर

मापं, तुमच्या जिद्दीला सलाम.

काळजी घ्या .

बापरे! भलतंच हे. काळजी घ्या.

कठीण प्रसंग खरच. देव तुम्हाला लढण्याचे पाठबळ देवो. काळजी घ्या.

आदूबाळ's picture

26 Aug 2017 - 2:40 pm | आदूबाळ

मापं __/\__

आणखी लिहवत नाही.

आता कसे आहात?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2017 - 2:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

भयानक अनुभव ! चित्रदर्शी शैलीत शब्दबद्ध केला आहे. तुमच्या पूर्ण आरोग्यपूर्णतेसाठी अनेक शुभेच्छा !

तीन मजल्यांवरून पडूनही इतक्यावर निभावलं हे काही कमी नाही. असे प्रसंग आपल्या स्वतःलाच सुप्त असलेल्या अनेक पैलूंची ओळख करून देतात... ही ओळख तुम्हाला जन्मभर बळ देत राहील. शिवाय, अश्या प्रसंगात आजूबाजूच्या माणसांची खरी ओळख पटते, ते अलाहिदा. वाईटातून चांगले मिळते ते हेच !

प्रमोद देर्देकर's picture

26 Aug 2017 - 2:48 pm | प्रमोद देर्देकर

भयानक अनुभव. पुढील वाटचालीस शुभेच्छा!

कुमार१'s picture

26 Aug 2017 - 2:58 pm | कुमार१

चांगला लेख. चांगली जिद्द. म्हणतात ना,
Tough times do not last but tough people do.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2017 - 3:01 pm | अमरेंद्र बाहुबली

भयानक! काळजी घ्या.

ज्योति अळवणी's picture

26 Aug 2017 - 3:25 pm | ज्योति अळवणी

पुनर्जन्माच्या आणि नवीन पाहुण्याच्या शुभेच्छा. तुमच्या पत्नीच्या खमबीरपणाची दाद दिली पाहिजे. आणि तुमच्या लढवय्या वृत्तीला तर तोड नाही. यापुढील आयुष्य खूप निरोगी आणि सुदृढ मिळो ही श्रींचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना.

सतिश गावडे's picture

26 Aug 2017 - 3:44 pm | सतिश गावडे

भयानक अनुभव आहे हा. काळजी घे रे मापं.

मंदार कात्रे's picture

26 Aug 2017 - 3:45 pm | मंदार कात्रे

वकीलबाबू ,
सुरुवातीपासून कायाप्पा वर अपडेट्स देत होतात . पण प्रत्यक्षात परिस्थिती खरोखरच फार गम्भीर होती हे आता कळतंय
असो
आपणास त्वरित आराम पडून बरे व्हा अशी देवाजवळ प्रार्थना

गुरूप्रसाद बाचल's picture

26 Aug 2017 - 4:21 pm | गुरूप्रसाद बाचल

एवढया कठीण काळात ज्या दिव्यातून तुम्ही व तुमचे घरचे गेलात खरोखरच सलाम तुमच्या धैर्यला.ज्यावेळी तुमच्या पत्नीची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे त्या काळात ऐवढ्या जिवावरच्या संकटातून तुम्ही वाचलात.काळजी घ्या व आनंदी रहा

स्मिता.'s picture

26 Aug 2017 - 4:37 pm | स्मिता.

फारच भयानक अनुभव होता, त्यातून तुम्ही बाहेर पडलात ही आनंदाची गोष्ट!
बाळाच्या जन्माच्या वेळची तुमची आणि तुमच्या पत्नीची मानसीक अवस्था कशी असेल याची कल्पनाच न केलेली बरी असं वाटतंय. तुम्हा पती-पत्नीना सलाम आणि नवीन पाहुण्याला अनेक शुभेच्छा!!

कायप्पावर वाचला होता. तेव्हा फक्त अपघात झाल्याचं कळलं होतं. ही पुढची दिव्यं आणि सव्यापसव्यं माहीत नव्हती. फारच भयावह प्रकार झाला आणि तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय कोणत्या परिस्थितीतून गेले याची कल्पनाही करु शकत नाही. या सगळ्या परिस्थितीतही तुम्ही तुमची विनोदबुध्दी कायम ठेवली याबद्दल तुमचे विशेष कौतुक आहे.

माझीही शॅम्पेन's picture

28 Aug 2017 - 9:23 am | माझीही शॅम्पेन

+ १००

एवढ्या सगळ्या आपदेत तू तुझी विनोद बुद्धी कायम ठेवलीस , मला आठवतंय मी , मोदक आणि डॉ खरे तुला भेटायला आलो होतो तेव्हा तू ह्यातले काही किस्से ऐकले होते , असो आता नवीन जीवनाला आनंदाने सामोरे जा

हा अपघात हि तुझी ओळख न राहता ह्यातून सावरलेला माणूस अमुक तमुक कस काय करू शकतो हे लोकांनी म्हंटल पाहिजे

मस्त झालाय रे लेख (हे एक मित्रच म्हणू शकतो) , रचाकने ऑगस्ट / सप्टेंबर कट्टा बाकी आहे रे , लवकरच भेटू :)

पद्मावति's picture

26 Aug 2017 - 5:35 pm | पद्मावति

मापं, तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी केवळ आणि केवळ __/\__

जेडी's picture

26 Aug 2017 - 6:20 pm | जेडी

बाप रे ! सलाम तुमच्या जिद्दीला . तुमच्या सहचारिणीच्या धीराचीही कमाल आहे . कसं पेललं एवढे ? सर्वात मुख्य आर्थिक आधार लागतो ,त्यावर काहीच आले नाही जास्त. मेडिक्लेम पॉलिसी घेणे जरुरी आहे .

स्वाती दिनेश's picture

26 Aug 2017 - 6:35 pm | स्वाती दिनेश

भयानकच..
हा अनुभव वाचतानाही काटा येत होता अंगावर..
तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांना __/\__
स्वाती

अतिशय अस्वस्थ करणारा अनुभव. त्यातूनही तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी ज्या धीराने मार्ग काढलात त्याला सलाम! लेखमालेच्या थीमला अतिशय समर्पक लेख. खरोखर तुमचा पुनर्जन्मच झाला असे म्हणायला हरकत नाही. तुम्हां उभयतांचे आई-बाबा झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन मात्र! लवकर बरे व्हा आणि काळजी घ्या प्रकृतीची.

अरिंजय's picture

26 Aug 2017 - 7:56 pm | अरिंजय

फारच खतरनाक परिस्थितीला सामोरे गेलात तुम्ही. प्रतिक्रिया नेमकी कशा शब्दात द्यावी तेच कळत नाही. तुमच्या सहनशक्तीला आणि धर्मपत्नीच्या खंबीरपणाला दंडवत. __/|\__

बाजीप्रभू's picture

26 Aug 2017 - 8:47 pm | बाजीप्रभू

सगळ्या संकटाचा शेवट गोड झाला वाचून बरं वाटलं.
गुरुंवरील श्रद्धा, घरच्यांचा खंबीर पाठिंबा... संकटसमई यासारखी दुसरी मात्रा नाही हेच खरं.

वाचतांना सगळे प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसत होते... प्रसंग लेखणीतून जिवंत करण्याचे तुमचे कसब वाखाण्यासारखे आहेत.
पुढल्या वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा.

थोडाफार मी देखील या अनुभवातून गेलो आहे...
तुमच्या मिश्किल लेखना मागे असलेली वेदना अनुभवू शकतो या क्षणी देखील.
ईश्वर तुम्हाला, तुमच्या घरच्यांना व बाळाला उदंड आयुष्य व सुख देवो ही प्रार्थना.

इरसाल कार्टं's picture

26 Aug 2017 - 11:00 pm | इरसाल कार्टं

बाकी शब्द नाहीत.

चाणक्य's picture

26 Aug 2017 - 11:24 pm | चाणक्य

मा.प., खरोखर पुनर्जन्म. काय काय सोसलंत. वाचतानाच घाम फुटत होता.

अमितदादा's picture

27 Aug 2017 - 12:29 am | अमितदादा

भयंकर आणि अतिशय वेदनादायी. सगळं काही व्यवस्थित होवू हीच सदिच्छा.

रेवती's picture

27 Aug 2017 - 3:43 am | रेवती

सत्वपरिक्षा पास झालात म्हणायला हवे. वाचताना फार भीती वाटली.
तुमच्यावर अवघड प्रसंग आलाच पण तुमच्या पत्नीची मानसिक अवस्था किती अवघडली असेल याची कल्पनाही करायला नको वाटते.
पण यामुळे दोघेही टफ झाला असाल.
वाईटातून चांगले हे की तुम्ही बाळाजवळ बरेच दिवस राहू शकलात. अपत्यप्राप्तीबद्दल तुम्हा दोघांचेही अभिनंदन व तंदुरुस्त होण्यासाठी शुभेच्छा.

जुइ's picture

27 Aug 2017 - 4:05 am | जुइ

वाचतानाही भिती वाटत होती. पण या प्रसंगाला तुम्ही आणि तुमच्या पत्नीने अतिशय खंबीरपणे तोंड दिले त्याबद्दल दंडवत स्वीकारा. तुमच्या घरात आलेल्या नवीन पाहुण्याचे स्वागत त्याला अनेक उत्तम आशीर्वाद. तुम्ही लवकर पूर्ववत होण्यासाठी शुभेच्छा!

पिलीयन रायडर's picture

27 Aug 2017 - 4:45 am | पिलीयन रायडर

तिसऱ्या मजल्यावरून पडून सुद्धा आपल्या डोक्याला अथवा मणक्याला इजा झाली नाही हे फार महत्वाचे. आपले कुटुंब फार अवघड परिस्थितीमधून गेले आहे, पण आता सर्व ठीक होतेय हे वाचून आनंद झाला. तुमच्या बाळाला सुद्धा पुढे काही त्रास झाला नाही हे उत्तम. लवकर पूर्ण बरे व्हा. तुमच्यात ती जिद्द दिसतेच आहे. तुमच्या बायकोचे विषेश कौतुक वाटले. 7 व्या महिन्यात इतकी धावपळ करणे खरंच अवघड आहे.

अभिजीत अवलिया's picture

27 Aug 2017 - 5:06 am | अभिजीत अवलिया

काळजी घ्या. खूप भयानक प्रसंगातून गेला आहात.

मापं - तुम्हाला दोघांना आणि घरच्यांना दंडवत..!!!

या धाग्याची लिंक अनेक ठिकाणी पाठवली आणि अगदी असेच रिप्लाय आले आहेत. __/\__

आता लवकर बरा हो..

अभ्या..'s picture

27 Aug 2017 - 9:07 am | अभ्या..

गोंविंधराव, ही बातमी व्हाटसपवर कळली तेव्हाच धडकी भरलेली. तुमच्याशी प्रत्यक्ष बोलताना प्रसंग इतका गंभीर असेल ह्याची कल्पनाही आलेली नव्हती. सर्व निभावले गेले ही स्वामींची कृपा.
त्यांचा आशीर्वाद असेल कायम.
या एकदा खडखडीत बरे होऊन. अक्कलकोटी जाऊन येऊ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Aug 2017 - 11:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लवकर बरे व्हा. जिद्दीला सलाम. नव आयुष्यच म्हणावे लागेल आपलं सर्व कुटुंब काय अवस्थेतून गेले असेल त्याची कल्पना अनुभव वाचतांना येते.

-दिलीप बिरुटे

कायअप्पावर समजले होते, परंतु तुम्ही ज्या वेदनेतुन गेलात त्याचा इतका अंदाज आला नव्हता ! तुमच्या या जिद्दीला सलाम आणि तुमच्या कुटुंबियांच्या धैर्याला सुद्धा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अल्लड सीनू... ;):- Alludu Seenu

:( कठीण परिस्थितीतून खंबीरपणे बाहेर पडलात, काही वेळा अप्रत्यक्षरीत्या का होईना एखादी दिव्य शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे याची प्रचिती येते हे सतत ऐकलेलं, वाचलेलं तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलंत. तसंच आईवडील वारंवार गाडी सावकाश चालवा, तब्येती सांभाळा हे लेक्चर देतात असं वाटतं त्यामागची त्यांची कळकळ पोचली. खरोखर उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना अनेक शुभेच्छा, बाप्पाचरणी तुमच्यासाठी अनेक प्रार्थना. _/\_

नंदन's picture

27 Aug 2017 - 12:16 pm | नंदन

वाचतानाच धडधडत होतं, तर प्रत्यक्ष तुमच्यावर आणि कुटुंबियांवर किती ताण आला असेल याची कल्पनाच करू शकतो. काळजी घ्या.

नीलमोहर's picture

27 Aug 2017 - 12:19 pm | नीलमोहर

इतक्या कठीण परिस्थितीतून थोडक्यावर निभावलं हा खरेतर चमत्कारच म्हणायला हवा. ते थोडकंही पुष्कळ होतं म्हणा. इतकी संकटं येऊन गेल्यावर जीवनातल्या अनेक गोष्टींची किंमत नव्याने कळते हे तुम्ही अनुभवले असेलच.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा !!

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

27 Aug 2017 - 1:31 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

चांगलात लढा दिलात व जिंकलात. अभिनंदन. ओघवत्या शैलित, मनाला भिडेल असे लिहीलेत. आता ही परीक्षा लवकरच संपणार असा विश्वास ठेवा. When the going gets tough, tough gets going! शुभेच्छा!

सस्नेह's picture

27 Aug 2017 - 2:41 pm | सस्नेह

श्रीगणेशा च्या कृपेने इथून पुढे तुम्ही व तुमच्या परिवाराला आयुरारोग्य लाभो !

मंजूताई's picture

27 Aug 2017 - 2:44 pm | मंजूताई

बापरे! किती भयानक प्रसंग! वाचताना काटा आला अंगावर.

काळजी घ्या!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

27 Aug 2017 - 2:50 pm | भाग्यश्री कुलकर्णी

दंडवत.खूप
सोसलेत.असो. जपा...

भाग्यश्री कुलकर्णी's picture

27 Aug 2017 - 2:53 pm | भाग्यश्री कुलकर्णी

प्रतिसाद नाही टाकत येत आहे.