नमस्कार,
मिपाकर दो-पहिया आज दिनांक २६ ऑगस्ट पासून १२ दिवसांच्या पूर्व युरोप सायकल दौर्यावर आहेत. त्यांच्या प्रवासाची लाईव्ह दैनंदिनी करण्याचा हा प्रयोग.
त्यांच्याकडून रोज मिळणारे प्रवासवर्णन आणि फोटो त्यांच्याच शब्दात येथे अपडेट केले जातील...
(सायकलप्रेमी) मोदक.
*************************
मी सायकलिंग करायला सुरुवात केल्यापासून, सायकलवरून शहराबाहेरची निसर्गरम्य ठिकाणे शोधायचा मला छंदच लागला. सुदैवाने पुण्यात रहात असल्या मुळे, फिरायला बरेच पर्याय उपलब्ध होते. मग, सायकलिंगच्या पहिल्याच वर्षात जवळपासच्या सर्व धरणांना भेटी द्यायचा सपाटा लावला. पूर्वी मला घाटाची भीती वाटायची. ती घालवायला मग जवळपासचे घाट सर करून झाले.
ह्याच दरम्यान आमचा मित्र व ट्रेकिंगचा गुरु केदार, याने कोकणमार्गे पुणे – गोवा सायकल सफर करायची कल्पना काढली. केदार तसा नियमितपणे ग्रुप घेऊन जात असतो. पण त्यावेळी मागे सपोर्ट वाहन असते. म्हणजे आपले सामान सुमान वाहनात टाकून आपण आपले रमत गमत जमेल तेवढी सायकल चालवायची. पण हि सफर अशी नसणार होती. आपणच आपले समान वाहायचे. मी तर एका पायावर तयार झालो होतो. पण काही कामातील अडचणीमुळे मला ऐनवेळी जाणे जमले नाही. केदारचे फोटो पाहून मात्र मनाची घालमेल झाली आणि एक दिवस एका ओळखीच्याला तयार करून तीन दिवसाची कोकण सफर केली.
या सफरी नंतर मात्र मला सायकल टुरिंग चे आकर्षण वाटू लागले. हे प्रकरण आपल्याला जमतंय असा आत्मविश्वास येत होता. नेटवर https://www.crazyguyonabike.com/ वर लोकांच्या सायकल सफरींच्या कथा वाचून आपण पण अशी मोठी सफर करावी असा किडा वळवळू लागला. त्यात सहकुटुंब युरोप सहलीला गेलो असताना तिकडले स्वतंत्र सायकल मार्ग, सायकल स्वारांना इतर वाहनचालकांकडून मिळणारा मान वगैरे वगैरे पाहून मला गहिवरून यायचंच बाकी राहिलं होतं. मग कधीतरी सायकल वरून युरोप पाहायचाच असा दृढनिश्चय झाला.
एकदा निश्चय झाल्यावर फार काळ वाट पहावी लागली नाही. केदार आदल्याच वर्षी एकटाच इटलीला सायकल टूर करून आलेला होता. शिवाय त्याने एक ग्रुप Switzerland मध्ये Lake Constance ला नेलेला होता. मग त्याच्या बरोबरच, २०१७ मध्ये युरोपला सायकल सफर करायचे ठरले. तशी त्याची Lake Constance ची ग्रुप टूर ठरली होतीच. पण ती टूर विलासी होती. का कोण जाणे, पण मला सपोर्ट घेऊन सायकल चालवणे हि कल्पनाच झेपत नाही. मग त्या सफरीला लागून आमची सफर करायची ठरली. हि पूर्ण “स्वावलंबी” सफर असल्याने केदारला जास्त मेंबर वाढवायचे नव्हते. कारण जितके जास्त लोक तितके क्लिष्ट आयोजन लागते. मग फक्त केदार, मी व आमचा सायकल भिडू अविनाश अशा तिघांनीच जायचे ठरले.
आता प्रश्न होता कुठे जायचे ह्याचा. मग नेटवर अभ्यास सुरु झाला. युरोपमध्ये युरोवेलो नावाचे आंतरदेशीय सायकलमार्ग आहेत. हे खास मोठ्या सायकल सफरी करण्यासाठी बनवलेले आहेत. आणि खास प्रेक्षणीय स्थळांच्या जवळून हे मार्ग जातील अशी काहीशी रचना आहे असं समजलं.
प्रथम माझ्या डोक्यात ऍमस्टरडॅम ते म्युनिक असा डॅन्यूब नदी काठाने जाणारा युरोवेलो १५ हा मार्ग घ्यायचं आलं. आणि म्युनिकला होणारा ऑक्टोबरफेस्ट पाहता येईल अशा तारखा घ्यायच्या असा विचार होता. पण केदारच्या पुढच्या टूरच्या तारखा ठरलेल्या असल्याने मेळ जमत नव्हता. आणि केदारच्या मनात बरेच दिवस इस्टर्न युरोप करायचे होते. त्यातून मग प्राग ते बुडापेस्ट हा मार्ग निश्चित झाला.
सुमारे ५ महिने आधीपासून तयारीला सुरुवात झाली. आम्ही आमच्याच सायकली न्यायचं ठरलं. माझ्याकडे एअरमाईल्स असल्याने मी माझं वेगळं तिकीट काढलं. माझा प्रवास मुंबई ते ऍमस्टरडॅम व नंतर ऍमस्टरडॅमवरून दुसऱ्या विमानाने प्राग असा ठरला. ऍमस्टरडॅम ते प्राग च्या प्रवासाला मला माझ्या भाड्या इतकेच पैसे सायकलसाठी भरावे लागले. तब्बल ४५ युरो! पण इलाज नव्हता त्यातल्या त्यात हाच स्वस्त व सुलभ पर्याय होता.
आता प्रत्येक दिवसाचा प्रवास आखायचा होता. आम्ही आधीच ठरवलं होतं कि उगाच घाई गडबड करायची नाही. सायकल हे साधन आणि आसमंत अनुभवणं हा उद्देश होता. तेव्हा उगाच भारंभार अंतर कापत बसायचं नाही. सकाळी न्याहरी नंतर सुरुवात करायची आणि दुपारी १-२ वाजेपर्यंत इप्सित स्थळी पोचायचं. जेणेकरून तिकडला भाग नीट पाहता येईल. मग मी bikemap.net वरून रूट अभ्यासायला सुरुवात केली. दर दिवसाचं अंतर ठरवताना त्या दिवशी एकूण किती चढ असेल व किती उतार असेल याचा अंदाज घेऊन किती किमी करायचे ते ठरवलं. शक्यतो एखाद्या मोठ्या गावापर्यंत प्रत्येक दिवशी जाता येईल असं पाहिलं. म्हणजे रहाण्याचा प्रश्न सुटला. असं करत एकूण ५५० – ६०० किमी ११ दिवसात कापायचं ठरलं मध्ये दोन दिवस मोकळे ठेवले. एक दिवस प्राग पाहायला आणि एक दिवस विएन्ना पाहायला.
आता रहाण्याची सोय. केदारच्या डोक्यात कँपिंग करायची कल्पना होती. पण मग तंबू, स्लीपिंग बॅग आली. त्याने समान वाढलं असतं. मग तो प्लान रद्द केला. युरोपात हॉस्टेलचो सोय छान आहे. एकतर स्वस्त पर्याय आणि इतर प्रवाशांशी ओळख व्हायला उत्तम ठिकाण. आणि हो. खास सायकलस्वारांसाठी अजून एक छान सुविधा नेट वर आहे. Warmshowers.org म्हणून. या साईट वरून देशोदेशीचे सायकल प्रवासी त्यांच्या शहरात येणाऱ्या इतर सायकल प्रवाशांना फुकटात स्वतःच्या घरी रहाण्याची सोय करतात. तेव्हा जमेल तिकडे असे चकटफू राहायचे नाहीतर हॉस्टेल मध्ये असा आमचा बेत होता. मग आमच्या वेळापत्रकाप्रमाणे आधी हॉस्टेल बुकिंग केले व सायकल यजमानांना केदारने मेल धाडायला सुरुवात केली. पण आम्ही तिघं होतो आणि दोन पेक्षा जास्त सायकल स्वारांची एका घरात सोय करणं बऱ्याच जणांना जमत नसल्याने शेवटी हॉस्टेलचा मार्ग पत्करला. फक्त विएन्ना मध्ये एका यजमानांनी होकार कळवला आहे. ते एका तऱ्हेने बरंच झालं. कारण विएन्ना बऱ्यापैकी महागडं शहर आहे.
बुडापेस्टला प्रवास संपल्यावर केदार व अविनाश Lake Constance च्या टूर साठी झ्युरिकला जाणार होते व मी म्युनिकला. मला रेल्वेचं आकर्षण आहे. आणि युरोपात रेल्वेचं जाळं उत्तम आहे. तेव्हा मी बुडापेस्ट – म्युनिक अशी रात्रीची ट्रेन बुक केली. ट्रेन मध्ये २ जणांचा कुपे असतो त्याचं बुकिंग केलं. आता १० दिवस सायकल प्रवास केल्यावर जरा स्वतःचे चोचले पुरवायला हवे ना! म्युनिकमध्ये बीअर गार्डन हा प्रकार आणि BMW museum ह्या दोन गोष्टीत विशेष रस आहे. २ दिवस म्युनिक मध्ये राहून मग हाय स्पीड ट्रेन ने पॅरीसला जाऊन तिकडून परतीचे विमान पकडण्याचा बेत आहे.
आता प्रवासाची आखणी झाली होती. प्रवासाला लागणारा आवश्यक विसा माझायाकडे आधीच होता. केदार आणि अविनाशने आपआपला विसा करून घेतला. आता मोर्चा वळला सामनाकडे. विमानातून सायकल न्यायची म्हणजे त्याचा खोका घेणं आलं. सायकलच्या दुकानात फुकट खोका मिळतो. पण एकदा प्रागला पोचल्यावर त्याची व्हिलेवाट लावायला हवी. मग पुढच्या ट्रेन प्रवासात पुन्हा खोका शोधण आलं. कारण सर्व ट्रेन मध्ये सायकल जशीच्या तशी नेता येत नाही. म्हणून मग सायकल बॅग घेणं आलं. मला हवी तशी बॅग सिडनीवरून मागवली. सायकलवरून सामान न्यायला म्हणून कॅरिअरला अडकवता येतील अशा बॅगा बायकोने स्वीडनवरून आणल्या. सायकलची बॅग तर घेतली. पण त्यात सायकल घालायची म्हणजे सायकल पूर्ण खोलता आली पाहिजे आणि मग नंतर जुळवता पण आली पाहिजे. मग त्याचा सराव सुरु केला. आधी पूर्ण सायकल खोलून जोडायला २ तास लागत होते. सर्वाधिक वेळ मडगार्ड काढणे आणि लावणे यात जात होता. पण सरावाने २० मिनिटात सायकल खोलून बॅगेत घालता येऊ लागली. व जुळवायला अर्धा तास.
परदेश प्रवास म्हटलं म्हणजे आपल्याला भरपूर समान घेऊन जायची सवय असते. पण आमचं ओझं आम्हालाच वाहायचं होतं. तेव्हा अगदी मोजकंच समान घ्यायचं ठरलं. सायकल आणि त्याची टूल्स चेकीन बॅगेज मध्ये जाणार होतं. त्याचंच वजन २० किलो भरलं. कमाल मर्यादा २३ किलो आहे. मग कपडे अंगावरच्या बॅगेत ७ किलो मध्ये बसवायचे. म्हणजे कपड्यांवरपण राशन आलं. शेवटी सामानाची यादी खालील प्रमाणे झाली:
सायकल चे सामान (एकूण वजन २० किलो)
१. खुद्द सायकल
२. दोन सायकलला लावायच्या रिकाम्या बॅगा
३. सायकलची हत्यारं यात मल्टी टूल, स्क्रू ड्रायवर, पेडल काढायचा पाना, टायर काढायचे लिवर, एक पकड.
४. जास्तीच्या २ ट्यूब, पंक्चर पॅच, पंक्चर सोल्युशन, हवा भरायचा छोटा पंप
५. दिवे
६. पाण्याची बाटली
७. हेल्मेट
पाठीवरच्या पिशवीतले सामान (एकूण वजन ७ किलो)
१. सायकल चालवताना घालायला २ जोड
२. आतले कपडे २ जोड
३. एक स्वेटर
४. एक रेन जॅकेट
५. जरा बऱ्यातले टीशर्ट २
६. कार्गो पँट २
७. एक टॉवेल
८. गोप्रो कॅमेरा आणि त्याच्या विविध जोडण्या
९. चार्जर, सोलार बॅटरी, युरोपला चालेल असा प्लग
१०. भरपूर प्लास्टिक बॅगा (कपडे वगैरे भिजू नये म्हणून)
प्रवासात खर्चाला म्हणून मल्टी करन्सी कार्डवर ५०० युरो लोड करून घेतले आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय क्रेडीट कार्ड व काही डॉलर बरोबर ठेवले आहेत. आणि हो. मुख्य म्हणजे प्रवासाचा विमा काढून घेतला आहे.
तर अशा प्रकारे आत्ता पर्यंत जय्यत तयारी झाली आहे. आज पुण्याहून निघणार. २ दिवस प्राग फिरून मग सायकल प्रवासाला २९ तारखेपासून सुरुवात होईल.
मेरीडा..
सायकल सुटी करताना..
चाके..
सायकल बॅगेत भरून तयार...
पाठपिशवीतले सामान..
पाठपिशवी - वजन फक्त ६ किलो.
(क्रमशः)
**************************
***** रविवार - २७ ऑगस्ट २०१७ *****
शनिवारी संध्याकाळी शिवनेरीने मुंबईला निघालो. आधी दादरला मुलीला भेटायला जायचे होते. शिवनेरीचा ड्रायवर सायकलची बॅग पाहून उगीच कुरकुर करू लागला कि लगेज खूप आहे. वेगळे पैसे पडतील. तरी बरं. ह्या पठ्ठयाला बुड पण हलवायला लागलं नाही. आपणच लगेज कप्पा उघडून आपणच बॅग ठेवायची असते. म्हटलं रिसीट दे पैसे भरतो. पण नुसता उगाच रडत बसला. शेवटी मी म्हटलं चल डेपोला फोन लावतो मी. तेवढ्यात कंडकटर आला. त्याने किती वजन आहे विचारलं. म्हटलं 20 किलो. तर ठीक आहे जाऊ द्या म्हणाला. तर अशा प्रकारे प्रवास सुरु झाला.
दादरला मुली बरोबर जेवायला गेलो. मग तिकडून उबर ने विमानतळ गाठला. विमानतळावर सर्व सुरळीत पार पडलं. सायकलचं वजन बरोबर 23 किलो बसलं. म्हणजे वजनाची पुरती वसुली केली. अवजड बॅग असल्याने ती बेल्ट वरून गेली नाही. एक कर्मचारी येऊन स्वतः घेऊन गेला.
आज सकाळी अॅमस्टरडॅमला पोचलो. सायकल अवजड वजनात येत असल्यामुळे मिळायला वेळ लागला. एकाच प्रवासात बॅग बऱ्यापैकी जखमा दाखवतेय. पण सायकल शाबूत आहे. विमानतळावरून बाहेर येऊन सायकल जोडली, त्यावर सामान चढवले व शहरात जायची तयारी केली.
विमानतळापासूनच सायकल ट्रॅक चालू होतो. आधी बाईक मॅप लावलं पण ते गंडलं. शेवटी गुगल जिंदाबाद. गुगल मॅपने अगदी अचूक मार्ग दाखवला व अर्ध्या तासात मी आम्सटरडॅममधील वॉंडेलपार्क या बॅगेत पोचलो.
आज रविवार असल्याने बरीच वर्दळ होती. पण गोंधळ नव्हता. कारंज्याच्या आजू बाजूला गवतात उन्ह खात लोक पहुडले होते. अगदी लहान मुला पासून आजी आजोबांपर्यंत सर्व वयोगटातले लोक सायकल चालवत होते. तिकडेच एका हॉटेल मध्ये सॅन्डविच घेतलं व आजूबाजूची गंमत न्याहाळत रेंगाळत बसलो. साधारण दुपारी एक वाजल्यावर परत निघालो. जवळपास जाऊन येऊन 25 किमी सायकलिंग केलं असेल. पण एक खड्डा नाही कि हॉर्न नाही. कि प्रदूषणाचा त्रास नाही. अॅमस्टरडॅम म्हणजे खरंच सायकल पंढरी आहे. सायकल भक्ताने एकदा तरी इकडे सायकल वारी करावीच.
आता मी प्रागला जायला परत विमानतळावर आलो आहे.
(क्रमशः)
******************************************
***** सोमवार - २८ ऑगस्ट २०१७ *****
अॅमस्टरडॅम वरून रविवारी संध्याकाळी पावणेसातला विमान होतं. खरंतर मी शहरात जास्तवेळ फिरू शकलो असतो. पण परत सायकल बॅगेत कोंबून चेकइन करायची त्याचं टेन्शन होतं. माझं प्रागचं विमान इझीजेट नावाच्या स्वस्त कंपनीच होतं आणि या विमान कंपनीच्या तुसडे पणाबाबत नेटवर बरंच वाचलं होतं. लोकांनी इतकं लिहिलं होतं की मला वाटू लागलं की स्टेट बँकेचे कर्मचारी तर ही विमान कंपनी चालवत नाहीत ना. ;)
तर मग मी दोन वाजताच विमानतळावर पोचलो. आधी सायकल परत खोलून पॅक करणं आलं. अर्धा पाऊण तास त्यात गेला.
मी जिकडे सायकल पॅकिंग करत होतो तिकडे शेजारीच एक कचऱ्याचा डबा होता. त्यात दोघे भिकारी काही मिळतंय का ते शोधत होते. त्यातल्या एकाला एक लिटर कोकची अर्धी भरलेली मिळाली. जितं मया अशा अविर्भावात त्याने ती दुसऱ्याला दाखवली. त्याच्या चेहऱ्यावरची आंनदाची लकिर पाहून कसंतरीच वाटलं. असो.
सायकल पॅक करून काउंटर वर गेलो. बरीच गर्दी होती. मी रांगेत उभा राहिलो तर तितक्यात एक कर्मचारीण आली व म्हणाली इतकी अवजड बॅग घेऊन रांगेत नको उभा राहू, प्रायॉरिटी चेकिन मध्ये चल. म्हटलं वा.. म्हणजे स्टेट बँकेत कर्मचाऱ्याने तुम्हाला सौजन्यपूर्वक वागणूक दिली तर काय वाटेल? तसला फील आला.
बॅगेच वजन झालं. जवळच्या अवजड सामनाच्या काउंटर वर बॅग दिली आणि गेट कडे जायला लागलो.
नुकतंच मला डायनर क्लब कार्ड मिळाल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळावर लाऊंज चकटफू होता. हे लाऊंज म्हणजे भारी प्रकरण असतं. शांत जागा, बसायला आरामदायी खुर्च्या व खायची चंगळ. मुख्य म्हणजे सर्व फुकटात. तेव्हा सिक्युरिटी क्लिअर करून लाऊंज शोधणे व आराम करणे असा बेत होता. तसही विमानात नीट झोप झाली नव्हती.
पण कसचं काय. इझी जेट ही स्वस्तातली विमानकम्पनी असल्याने त्यांचा टर्मिनलवर स्वतंत्र एरिया होता. इतर विमानतळापासून अलग. आणि तिकडे लाऊंज नव्हताच. एक मोकळी जागा आणि दोन तीन महागडी रेस्टॉरंट्स. चांगलाच पचका झाला. मग चार्जिंग पॉईंट शोधून जागा पकडली. माशा मारत बसायचं तर मेल्या माशा पण नव्हत्या. मग काय, व्हाट्सअँप वरचा कचरा काढत बसलो.
बोर्डिंगच्या ठिकाणी बरीच जण दोन बॅगातील समान एका बॅगेत कोंबण्याचा प्रयत्न करत होती. एक मुलगी तर बॅगेत कपडे मावत नाहीत म्हणून चक्क अंगावर घालत होती. इझी जेटचा एक प्रवासी एक बॅग असा कडक नियम होता.
आपल्या पुण्यातल्या विमानतळा प्रमाणेच इकडेही विमानात शिडीने जावं लागलं. ह्या शिडीच्या दोन्ही कठड्याच्या भिंतींना चक्क सोलर पॅनल लावले होते. भारी कल्पना होती. नाहीतरी या शिड्या उन्हातच असणार.
विमान बजेट एअरलाईन असलं तरी आतून चकाचक होतं. माझ्या शेजारचा प्रवासी विमानात चक्क अवजड चेलो (cello) घेऊन चढला. म्हटलं बापरे आता हे घेऊन तो बसला तर अडचण होणार. पण त्याने ते चेलों खिड्कीतल्या सीटवर ठेवून त्याला सीट बेल्ट लावला व आपण मधल्या सीटवर बसला. आणि मी सुस्कारा सोडला.
(क्रमशः)
***************************************************************
***** सोमवार - २८ ऑगस्ट २०१७ *****
रात्री 8 वाजता प्रागला विमान उतरलं. आधी प्रमाणेच अवजड बॅग म्हणून उशिरा आली. पण यावेळी मनाची तयारी होती. त्यामुळे निवांत व्हॉट्सअप चेक करत बसलो.
अरे हो एक सांगायचं राहिलं. Amsterdam ला पोचल्यावर प्रथम सिम कार्ड घेतलं. लायका मोबाईल कंपनीचं पूर्ण युरोपात चालेल असं 40 युरो ला सिम मिळतं. त्यात 24 युरोचं कॉलिंग आणि 1 जीबी डेटा एक महिन्या साठी. भारतात मॅट्रिक्सच मिळतं त्याहून खूप स्वस्त.
तर आरामात बॅग आली. एव्हाना रात्रीचे साडे नऊ झाले होते. आता परत सायकल बांधून रस्ता शोधत 20 किमी जाण्याचं त्राण नव्हतं. म्हणून ऊबर बुक केली. गाडीचालक एक तरुण चुणचुणीत मुलगी होती. पण तिला इंग्रजी येत नसल्याने प्रवास चिडीचूप झाला. एकदा लेन बदलताना तिचा अंदाज चुकला म्हणून मागून कोणी हॉर्न वाजवला तितकाच. तिने मला दहावेळा सॉरी म्हटलं. मनात म्हटलं, बाई तुझी चूक झाली हे मला कळलंपण नाही. आम्हाला लेन पाळायची सवय नाही आणि उलट हॉर्न एकून मायदेशाची याद झाली म्हणून मीच तुझे आभार मानायला हवेत. पण मी पुणेरी असल्याने आभार वगैरे मानायला लाजतो. हे सर्व मनातच.
हॉस्टेलवर पोचलो तर समोर पुणेरी पाटी. नो युरो कॅश, नो कार्ड, ओन्ली क्रोना. आता अली का पंचाईत. माझ्याकडे युरो होते व कार्ड. रिसेप्शनिस्टला विचारलं उद्या कॅश दिली तर चालेल का. तिने कठोरपणे आज रोख उद्या पण रोखच अस सुनावलं. पण मग तिने जवळपासचं एटीएम कुठे असेल ते अगदी व्यवस्थित सांगितलं. नशीब रस्ता सांगताना तिने चुकीचा रस्ता सांगायचा पुणेरीपणा नाही केला.
तर एटीएम मध्ये पहिलं कार्ड चालेना. म्हटलं छान. आता काय करायचं? हृदयाची धडधड थोडी वाढली. पण शांतपणे विचार केला कि अगदीच वेळ आली तर कार्ड घेतील असं मोठं हॉटेल बुक करू. पण तशी वेळ आली नाही. दुसरं कार्ड चाललं.
हजार क्रॉना काढले. रस्त्यात एक पब दिसला. तिकडे मोर्चा मिळवला. खिशात पैसे खुळखुळायला लागल्यावर जसे काही लोकांचे पाय अड्डया कडे वळतात तसं वाटलं. पण पबमध्ये खाणं चांगलं मिळतं असा माझा अनुभव आहे. इकडेही तसंच झालं. गिर्हाईकाला आल्या बरोबर प्यायला पाणी द्यायची इथे पद्धत नाही. बीअर मात्र आवर्जून विचारतात. म्हटलं उगाच वेटरला नाराज कशाला करा म्हणून बीअर मागवली व खायला चिकन आणि त्यावर बेकनचे तुकडे. मी रेड मीट अजिबात खात नाही. पण या प्रवासात मात्र आवर्जून खाणार आहे. जेवण भारी होतं.
जेवून परत हॉस्टेलवर आलो. पैसे देऊन चावी घेतली व रुम वर गेलो. हॉस्टेल खूपच बेसिक. एक मोठी खोली. त्यात जुनाट फर्निचर. तीन लोकांना प्रत्येकी एक पलंग, टेबल व खुर्ची. जमिनीवर जुनाट enamel चं, मधेच फ़ुगलेलं असं कार्पेट. अत्यन्त गैरसोयीच्या ठिकाणी प्लग पॉईंट. हिटर पण पंखा नाही. संडास बाथरूम पूर्ण मजल्यासाठी कॉमन एरिया मध्ये. त्यातही स्त्री पुरूष भेदभाव नाही. 900 रुपयात अजून काय हवे? सुदैवाने इतर दोन बेड रिकामे होते. त्यामुळे पूर्ण खोली माझीच होती. कपडे बदलून ताणून दिली. रात्री लोकांचे आवाज मध्यरात्रीपर्यंत येत होते पण दमलो असल्याने पार झोपमोड झाली नाही.
(क्रमशः)
*********************************************
***** मंगळवार - २९ ऑगस्ट २०१७ *****
सोमवारी सकाळी बरोबर सहा वाजता जाग आली. सगळा शीण निघून गेला होता. प्रातर्विधी आटपून अंघोळीची व्यवस्था पाहायला गेलो. एका मोठ्या रूम मध्ये भरपूर शॉवर्स आणि प्रायव्हसी साठी साधे प्लास्टिकचे पडदे. बायका पुरुषांसाठी सामायिक जागा. मग कोणी नाही हे पाहून पटकन अंघोळ उरकून घेतली.
आता न्याहरीची सोय पाहायला हवी होती. हॉस्टेल मध्ये विशेष पर्याय नव्हता. मग चालत बाहेर पडलो. छान गुलाबी थंडी होती. कोवळ्या उन्हाची ऊब हवी हवीशी वाटत होती. रस्त्यावर फार वर्दळ नव्हती. मस्त दुतर्फा झाडे, मधल्या लेन मध्ये ट्राम लाईन आणि डॉन बाजूना शिस्तीत जाणारी वाहने. रुंद आणि मोकळे पादचारी मार्ग. एकदम भारी वाटत होतं.
जवळपास दीड किलोमीटर चालल्यावर एक सुपर मार्केट लागलं.
मला कोणत्याही गावात गेलं तर सुपर मार्केट मध्ये जायला आवडत. आता तुम्हाला वाटेल परदेशात जाऊन सुप्रमार्केट काय पाहायचं. पण माझ्या मते तिकडेच त्या देशाची संस्कृती दिसते. कारण ग्राहकाच्या आवडी निवडी जाणूनच सुपरमार्केट मध्ये मालाची मांडणी केलेली असते. इकडे प्रकर्षाने लक्षात आलेली गोष्ट म्हणजे मद्याचे विविध प्रकार खचून भरलेले आणि मांसाचे वेगवेगळे प्रकार, ब्रेड्सचे विविध प्रकार. त्यामानाने फळांचे व भाज्यांचे स्टॉल लहान होते.
पूर्ण सुपर मार्केट पाहिल्यावर तिकडल्या कॅफे मध्ये ओपन सँडविच टाईप प्रकार व कॉफी घेतली. खर्च 100 क्रॉना म्हणजे 300 रुपये.
न्याहरी करून रूम वर आलो. आणि सायकल बांधायला घेतली. इझीजेटने बॅगेला फारच इजा पोचवली होती. तीन मोठी भोकं पडली होती. आत उघडल्यावर पाहिलं तर गोप्रोची हँडलबारला लावायची जोडणी तुटलेली. मात्र बाकी सायकल व्यवस्थित होती. आज सायकल लवकर जोडून झाली पण मागच्या ब्रेकने भारी वैताग दिला. युरोपात जागोजागी युगलं एकमेकांना खेटून असतात तसं ब्रेक पॅड चाकाला खेटून राहिलं होतं. कितीही ट्युनिंग करून उपयोग होत नव्हता. शेवटी दिडतास खटपट केल्यावर सुधारणा झाली. मागचा ब्रेक मला नेहमी त्रास देत आलाय. पुढल्या सायकलला मात्र डिस्क ब्रेक आहे हे पाहून घेणार.
दुपारी दोनला केदार व अविनाश आले. विमानतळावरून सायकल चालवत आले. ते येऊन स्थिरस्थावर झाल्यावर आम्ही जेवायला बाहेर पडलो. मी रोस्टेड डक मागवलं. प्रथमच डक खात होतो. सोबत बीअर. कारण वेटर नाराज नको व्हायला. बहोत मजा आया.
जेवल्यावर आम्ही चार्ल्सब्रिज पाहायला निघालो. जाताना थोडा गोंधळ झाला कारण मॅप जो रस्ता दाखवत होता तिकडे नो एन्ट्रीचा बोर्ड. मग त्याच भागात थोडे घुटमळलो आणि कसाबसा रस्ता मिळाला.
चार्ल्स ब्रिजचा भाग अप्रतिम होता. तिकडे बोट राईड घेतली. मग चार्ल्स ब्रिज वरून फेरफटका मारून परत निघालो. केदार व अविनाश प्रवासाने दमलेले होते. दुपारचं जेवण उशिरा झाल्याने रात्रीचं जेवण टाळलं. अविनाशने आणलेल्या भोपळ्याच्या घारग्यांवर ताव मारला, कॉफी प्यायलो आणि आता झोपायची तयारी केली.
उद्या प्राग शहराचा फेरफटका.
.
.
.
.
.
.
.
.
**************************************************
***** मंगळवार - २९ ऑगस्ट २०१७ *****
आज प्राग मधला विश्रांतीचा दिवस होता. दिवसाची सुरुवात फक्कड चहाने झाली. अविनाशने रेडी मिक्स चहाची पाकिटे आणली होती. शेवटी सकाळच्या चहाची सर कशाला नाही.
चहा पिऊन बाहेर पडलो. केदारने माझ्या सायकलच्या ब्रेकचं थोडं ट्युनिंग केलं त्याचा फायदा झाला. आधी प्रागच्या ओल्ड टाऊन स्क्वेअर मध्ये जायचं ठरलं. माझं बाईकमॅप गंडलं होतं म्हणून मग map.me वापरायला घेतलं. हे त्यातल्या त्यात बरं होतं. पण कधी कधी उशिरा सूचना देत होतं. त्यामुळे थोडासा गोंधळ उडाला. एका गार्डन मधून सायकल ट्रॅक जात होता. तिकडे एक छान आकर्षक इमारत दिसली म्हणून केदार म्हणाला जाऊन पाहूया. गेलो तर काय सांगावे. आमच्या समोर प्रागचं विहंगम दर्शन उभं ठाकलं. शहरातून जाणारी व्लाटावा नदी (आम्ही गंमतीने वाटलावा असं नाव ठेवलं होतं), त्यावरचे सात पूल, समोर प्रागचा किल्ला, अहाहा. दिल खुश हो गया.
ओल्ड टाऊन स्क्वेअर मध्ये पोचे पर्यंत 10 वाजले होते. पोटात कावळे कोकलत होते. हा परिसर पर्यटकांनी नुसता फुलला होता. तिकडे रस्त्यावर गाड्यांवर विविध पदार्थ विकत होते. किंमती पण स्वस्त वाटल्या म्हणून एक बटाट्याचं सॅलड, एक सोसेज आणि एक हॅम स्टेक घेतलं. तर बिल झालं 800 क्रॉना! हा हिशेब काही जुळेना. चौकशी केली तर म्हणे रेट लिहिलेला होता तो 100 ग्रॅम वजनाचा होता आणि एक एक डीशच वजन त्याहून जास्त होतं. म्हणजे आम्ही टुरिस्ट ट्रॅप मध्ये फसलो होतो. जेवण ओके होतं.
ओल्ड टाऊन स्क्वेअर मध्ये एक घड्याळ आहे त्यात दिवसाच्या प्रत्येक ठोक्याला एक खिडकी उघडते व त्यातून काही धर्मगुरूंच्या प्रतिकृती डोकावून जातात. तसंच एक हाडाचा सापळा ठोके वाजवतो. ते पाहून मग आम्ही नुसतेच गल्ली बोळातून भटकत होतो. जरा दमलो असं वाटलं तेव्हा नदीकाठच्या गवतावर मस्त ताणून दिली.
झोप झाल्यावर मग पेट्रीन नावाची एक टेकडी आहे तिकडे गेलो. टेकडीवर जायला सायकल ट्रॅक होता. पण त्याचा चढ इतका भयानक होता कि सिंहगड, पाबे घाटातले पण सोपे वाटतील. धापा टाकत तो पार पाडला. पण वर गेल्यावर परत शहराचं विहंगम दृश्य डोळ्याचं पारणं फेडून गेलं. वर प्राग कॅसल होता. त्याला बगल देऊन आम्ही दुसऱ्या मार्गाने खाली उतरलो.
आता परत थोडी भूक लागली होती. इकडे trdelnik नावाचा एक प्रकार मिळतो. हा नळकांड्यासारखा दिसणारा गोड ब्रेड. त्यात आईस्क्रीम वगैरे घालून खायचे. ही झेक डेलिकसी आहे. आम्ही भटकत असताना मी हा प्रकार कुठे मिळतो ते पाहून ठेवलं होतं. फसू नये म्हणून रेट पण पाहून घेतले. पण प्राग कॅसल वरून उतरताना एक दुकान मिळालं. तिकडे पिझा आणि trdelnik मिळत होतं. म्हणून तिकडेच थांबलो व trdelnik ची चव मस्तच होती.
क्षुधाशांती झाल्यावर आम्ही Wenceslas Square पहायला निघालो. मधेच कॉफीची तल्लफ आली. चार्ल्स ब्रिज पाशी एक छान रेस्टॉरंट दिसलं किंमती पण ठीक वाटल्या म्हणून घुसलो. कॉफी प्यायला गेलो पण इकडे बीअर कॉफीपेक्षा स्वस्त. फक्त 30 क्रॉनाला अर्धा लिटर बीअर आणि कॉफी 45. 30 क्रॉना म्हणजे अवघे 90 रुपये. मग कॉफी कटाप. आणि मी व केदार ने बीअर मागवली. अविनाशने कॉफी. इकडे एक वाईट गोष्ट म्हणजे नळाच्या प्यायच्या पाण्याला सुद्धा पैसे लावतात. आम्ही पाणी मागवलं तर अर्धा लिटर पाण्याला 25 क्रॉना लावले. एकूण आजचा दिवस लुटमारीचा होता तर.
नंतर परत चार्ल्स ब्रिजचा फेरफटका मारला व Wenceslas Square कडे निघालो. इकडली एक एक इमारत पहाण्यासारखी. त्यांची रचना, कोरीव काम अगदी वाखाणणी करण्या सारख. आणि पक्ष्यांच्या विष्ठेने खराब होऊ नये म्हणून त्या कोरीव कामावर पारदर्शक जाळी लावली होती.
गर्दी पाहून आम्ही Wenceslas Square पर्यंत जायचा बेत रद्द केला व हॉस्टेल वर परत जायला निघालो. आता प्रागच्या रस्त्यांचा अंदाज चांगलाच आला होता. त्यामुळे सराईतपणे सायकल चालवणं जमत होतं. सिटी सेंटरवरून होंटेलकडे जाताना एक टेकडी पार करावी लागते. परत तीव्र चढ. पण वरून डोळ्याचे पारणे फेडणारा व्ह्यू. या टेकडीवर एक बार होता व गार्डन मध्ये आराम खुर्च्या टाकून लोक मस्त बीअरचे घुटके घेत होते. आपल्याकडे लोक जसा चहा "मारतात" तसं इकडे लोक बीअर "मारतात". काही लोक बीअर पीत बसले होते, काही आपल्या कुत्र्यांना फिरवत होते. काही आया मुलांना खेळायला म्हणून घेऊन आल्या होत्या. काही लोक पर्वती चढतात तसं ही टेकडी धावत चढून उतरायची आवर्तनं करत होते. तरुण पोरं स्केटबोर्डवर स्टंटबाजी करत होती. पण कुठे गोंधळ नाही. अगदी मज्जानु लाईफ चाललं होतं. अनेक वर्षांचा नाझी व कम्युनिस्ट राजवटीचा जुलुम सहन केलेली हीच का ती जनता असा प्रश्न मला पडला. अगदी आत्ता आत्ता पर्यंत रेशनिंग जेथे चालायचं तो हा देश आता मुक्त अर्थव्यवस्था अगदी एन्जॉय करतोय असं वाटून गेलं.
थोडं पुढे गेल्यावर गवतावर काही लोक डोंबारी करतो तस दोरी वर तोल सांभाळत चालायचा प्रयत्न करत होते. एक ग्रुप सर्कशीत दाखवतात तसं gymnastic करायचा सराव करत होता. तर काही मुलं पायाला उंच स्प्रिंग च्या काठ्या लावून उंच उड्या मारायचा खेळ खेळत होते. हे खरं प्राग. जे कुठलीही टुरिंग कंपनी कधी दाखवत नाही.
आम्ही बराच वेळ इकडे टाईमपास केला आणि मग हॉस्टेल कडे निघालो.
एकूण दिवस मस्त उनाडण्यात गेला. आता बुधवारपासून सायकल ट्रिप चालू होणार. दोनच दिवसात मला या शहराने लळा लावला. तेव्हा सोडताना हुरहुर नक्की असेल.
.
.
.
.
.
(क्रमशः)
**************************************************
***** बुधवार - ३० ऑगस्ट २०१७ *****
सकाळी सहा वाजता उठून आम्ही सामानाची बांधाबांधी सुरु केली. आज प्राग सोडायचे होते. आवरून व न्याहरी करून रिसेप्शन मध्ये आलो व स्टोर रुम मधून सायकली ताब्यात घेतल्या. आमच्या सायकली पाहून तिकडल्या दोन तरुण मुलांनी आमची चौकशी सुरु केली. आमचा प्लॅन ऐकून ते चकित झाले. हे दोघे अमेरिकन होते व प्राग मध्ये शिकायला म्हणून नुकतेच आले होते. अमेरिकेपेक्षा प्राग मध्ये शिक्षण खूप स्वस्त पडते. म्हणून बरेच अमेरिकन हा पर्याय निवडतात असं कळलं. त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या व मग आम्ही निघालो. निघेपर्यंत सकाळचे आठ वाजले होते.
प्राग सोडतनाच मोठा चढ लागला. पण ताजेतवाने असल्याने निवांत पार पाडला. सुरवातीचा काही रस्ता नदीकाठावरून असल्याने छान वाटत होतं. सकाळी लोक धावायला, सायकल चालवायला बाहेर पडलेले होते. मस्त माहोल होता.
आमचा मार्ग हमरसत्यावरूनच होता. त्यामुळे बस, ट्रक ची रहदारी खूप होती. पण आमच्या सायकलींनी आधीच कात्रजचा घाट पाहिल्यामुळे त्या बिचकल्या नाहीत. उलट इकडे तर ड्रायवर लोक भारी सौजन्य दाखवणारे निघाले. हॉर्न न वाजवता शांत पणे आम्ही बाजूला व्हायची वाट पहात होते. आम्हालाच उगाच टेन्शन यायचं.
प्राग शहर मागे पडल्यावर रहदारी थोडी कमी झाली आणि लॅण्डस्केपही बदलला. दुतर्फा मशागत केलेली जमीन, दूरवर पसरलेल्या टेकड्या निरभ्र आकाश हे सर्व पाहताना रस्त्याच्या चढ उतारामुळे पडणारे श्रम सार्थकी लागले असं वाटलं.
तीस किलोमीटर गेल्यावर आम्ही कॉफी साठी थांबलो. बरोबर पेस्टरीज. पाणी भरून घेतलं. चकटफू. मग पुढची मार्गक्रमणा सुरु झाली. थोडे पुढे गेलो तर माझ्या सायकलने मान टाकली. गिअरची केबल तुटली होती. नशिबाने केदारने एक जास्तीची केबल ठेवली होती. त्यानेच केबल बदलून दिली. यावरून घेतलेला धडा म्हणजे सायकल टुरिंग करायचं म्हणजे स्वतःबरोबरच सायकलचा पण फिटनेस महत्त्वाचा. आणि बेसिक दुरुस्तीचे ज्ञानही महत्त्वाचे. असो.
तर गिअर केबल बदलल्यावर आम्ही पुढे कूच केले. 25 किमी राहिले होते व उतार सुरु झाला. तिकडे एका वळणावर उलट दिशेने येणारा सायकल टुरिस्ट भेटला. हा एकटाच व्हिएन्नावरून प्रागला निघाला होता. त्याने व्हिएन्ना प्राग ग्रीनवे हा सायकल साठी आखलेला मार्ग घेतला होता. आम्हाला पण हाच मार्ग हवा होता पण आमच्या मॅपच्या ऍप ने आम्हाला दुसऱ्या रस्त्यावरून नेलं. त्याने त्याच्याकडील छापील नकाशा आम्हाला दिला. थोड्या गप्पा, त्याच्या टुरिंग सायकलची चौकशी करून आम्ही पुढे निघालो.
आता आजूबाजूचा परिसर कमालीचा बदलला होता. गर्द पाईनची झाडी, बाजूला छोटा तलाव असा मस्त रस्ता होता. आणि हो. कुठेही खड्डे नाहीत. हे भलतंच सुख होतं.
Tynec nad sazovou गावापर्यंत उतार होता. मग परत तीव्र चढ सुरु झाला. अगदी सिंहगडासारखा. असं नऊ किमी गेल्यावर आजच्या मुक्कामाचं गाव benesov आलं. गावात एक मोठं सायकलचं दुकान दिसलं. तिकडे गिअरची वायर घेतली. दुकानदाराने माझ्या कॅरिअरचा पडलेला स्क्रू फुकट बसवून दिला. त्यानेच जेवणाची जागा सुचवली. जेवण अप्रतिम. सोबत अर्धा लिटर बीअर 29 क्रॉना म्हणजे फक्त 90 रुपये. वेटरला आम्ही नाराज केलं नाही.
जेवून हॉटेलमध्ये आलो. हॉटेल म्हणजे एक बंगलाच होता. मालकीण व तिचा तरुण मुलगा तळमजल्यावर आणि वरच्या फोन बेडरूम्स, लिविंग रूम, किचन आमच्या दिमतीला. घर खूपच कलात्मक रित्या सजवलेलं. तिची बाग तर केवळ अप्रतिम. आणि तिने स्वताहून खपून साकारलेली. मागे ग्रीनहाऊस. त्याच्या भिंती काचेच्या बरण्या रचून बांधलेल्या. जेणेकरून आत सूर्यप्रकाश पोचेल. एकूण आमची आज चंगळ होती.
जवळच्याच ग्रोसरी मधून सँडविचचं समान आणून आम्ही रात्री ते खाल्लं व कॉफी व केक खाऊन दिवसाची सांगता केली.
आजचा एकूण प्रवास ५१ किमी.
.
.
.
.
.
सायकल मार्ग
.
रस्ता शोधताना
.
ग्रीन हाऊस.
***** गुरूवार ३१ ऑगट २०१७ *****
आजचा पल्ला मोठा असणार होता म्हणून आम्ही लवकर उठलो. आदल्या दिवशी ग्रोसरी शॉपमधून न्याहरीची तयारी आणली होती. तेव्हा मस्त पैकी बॉइल्ड एग सॅन्डविच विथ लेट्यूस आणि मेयो बनवून खाल्ले. सोबत गरम कॉफी.
आम्ही खात असताना मालकीण बाई आली. तिने फ्रीझ मधून एक पेय काढून आम्हाला देऊ केले. त्याने म्हणे पचनशक्ती सुधारते. हे पेय म्हणजे slivovice नावाची प्लमची ब्रॅन्डी. आता तिला नाराज कशाला करा, म्हणून आम्ही त्याचे शॉटस् घेतले. सकाळी सकाळी अल्कोहोल म्हणजे जरा अतीच. पण पाचक आहे म्हणजे औषधच अशी आम्ही स्वतःची समजूत काढून घेतली. ;)
पॅकिंग करून आम्ही मालकीणीचा निरोप घेतला. केदारची तिच्या जेस्सी नावाच्या कुत्रीशी दोस्ती झाली होती. तिचाही निरोप घेतला व आम्ही आमच्या रस्त्याला लागलो.
आज टाबोर नावाच्या गावी मुक्काम असणार होता. तसं म्हटलं तर आमरस्त्याने अंतर ५५ किमी होतं. पण आम्ही ग्रीनवे नावाचा सायकलिंगचा मार्ग घ्यायचे ठरवले. त्यामुळे अंतर ६५ किमी असणार होते. पण प्लॅनिंग प्रमाणे सर्व गोष्टी झाल्यातर ते ऍडवेन्चर कसलं. साधारण ३० किमी गेल्यावर पहातो तर काय पुढचा रस्ता बंद होता. मग बराच वेळ खलबतं करून, तिकडे रहाणाऱ्या एका कुटुंबाला केदारने रस्ता विचारला होता, तो रस्ता घ्यायचं ठरलं. ह्यात अंतर वाढणार होतं पण इलाज नव्हता.
एरवी पुण्यात ५० किमीपण हातचा मळ वाटतो. पण एकतर इकडे सारखे चढ उतार व त्यात आमचं सामानाचं वजन. त्यामुळे आमचा वेग १४ किमीच्या वर जायला तयार नव्हता. पण मॅपने जो रस्ता सुचवलं तो भन्नाट होता. निवांत.. रहदारी नाही, आजूबाजूला गावातली टुमदार घरं, कडेला सफरचंदाची झाडं आणि त्यातून जाणारा रस्ता. रस्त्यावर तर पडून खराब झालेल्या सफरचंदांचा सडा होता. एके ठिकाणी केदारला चांगल्यातली सफरचंदं पडलेली दिसली. नाहीतरी भूक लागली होतीच. तर मग ती फस्त करून टाकली.
पुढे तर रस्ता जंगलातून होता. कच्चा रस्ता. दुतर्फा पाईनची झाडं. त्यांच्या सावलीमुळे बरं वाटत होतं. टाबोर गावाच्या १४ किमी अलीकडे आम्ही जेवायला थांबलो. दुपारचे २:३० वाजले होते. इकडे काम करणारी वेट्रेस चुणचुणीत होती. आणि इंग्रजी बरं बोलत होती. तिच्याकडून थोडे फार झेक शब्द शिकलो. तिने पुढे आता उताराचा रस्ता आहे अशीं सुवार्ता दिल्याने आम्ही तिच्यावर जास्तच खुश झालो. व तिच्या हसतमुख वृत्तीचं कौतुक करत आम्ही निघालो.
साधारण 5 वाजता टाबोर नावाच्या एका अतिशय सुंदर गावात पोचलो. या गावाच्या टाऊन सेंटरचा भाग केवळ अवर्णनीय. त्याचे काही फोटो टाकत आहे.
आजचा एकूण प्रवास 75 किमी.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
***** १ सप्टेंबर २०१७ *****
काल रात्रीच आम्हाला आज पाऊस लागणार याची कल्पना आली होती. सकाळी उठल्या उठल्या बाहेर पाहिलं तर पाऊस सुरु. पण भूरभूर होता. सर्व समान काळजी पूर्वक पॅक करून आम्ही पावणे आठलाच हॉस्टेल सोडलं.
जेमतेम 2 किमी गेलो असू. आणि का कोण जाणे मला अचानक पाकिटाची आठवण झाली. आपण पाकीट कुठे ठेवलंय तेच आठवेना. मग एका आडोश्याला सायकली पार्क केल्या व सगळं समान, सर्व खिसे धुंडाळले पण पाकिटाचा पत्ता नाही. आता आली का पंचाईत. काल जेवणाचे पैसे माझ्या कार्डा वर दिले होते. म्हणजे आता पाकीट रेस्टॉरंट मध्ये राहिलं की हॉस्टेलवर, ते पण आठवेना. मग हॉस्टेलवर जाऊन पहायचं ठरवलं.
अविनाश आमच्या बॅगा सांभाळायला तिकडे थांबला आणि केदार व मी हॉस्टेल कडे सायकली दामटल्या. सकाळी लवकर निघाल्याने आम्ही होस्टेलच्या खोलीवरच लॉकला चावी सोडली होती. एव्हाना मला पाकीट उशीखाली ठेवल्याची आठवण झाली होती. त्याप्रमाणे ते तिथेच निघालं. जीव भांड्यात आणि पाकीट खिशात घालून आम्ही परत निघालो.
पुण्याच्या पावसाच्या तुलनेत हा पाऊस अगदीच बारीक होता. पण थंडी खूप होती. 13 डिग्री तापमान होतं. पण सायकल चालवल्याने थंडी जाणवत नव्हती. हॉस्टेल मधून निघताना नमनालाच तीव्र चढ होता. पण नंतर रस्ता बराच सपाट निघाला. गावाच्या बाहेर पडल्यावर आम्ही आतलं रस्ता घेतला. या रस्त्यावर बरीच छोटी गावं होती पण रस्ता निर्मनुष्य.
जवळपास दीड तास सायकल चालवल्यावर पोटात कावळे ओरडू लागले. आम्ही ब्रेकफास्टपण केला नव्हता. एक छोटेखानी शहरवजा गाव लागलं. थंडीमूळे आम्हाला गरमा गरम कॉफीची तल्लफ आली होती. पण इकडे सगळा संथ कारभार की १० च्या आधी कॅफे उघडतच नाहीत. नशीबाने एक ग्रोसरी शॉप उघडं दिसलं. बाहेर बसायला पण ऐसपैस जागा होती. मग तिकडे ब्रेड, चीज, सॉसेजेस घेऊन बाहेर बसून सॅन्डविच बनवलं. सोबत अर्धा लिटर कोल्ड कॉफी. आणि अविनाशकडचा खजूर लाडू व राजगिरा चिक्की. भरपेट ब्रेकफास्ट करून आम्ही पुढचा मार्ग धरला.
साधारण साडेबारा पर्यंत ५३ किमी झाले होते. आजून फक्त १८ किमी बाकी होते. कालच्या मानाने आजची राईड खूपच चांगली होती. याला कारण म्हणजे ढगाळ हवा आणि पाऊस. तो आमच्या पथ्यावरच पडला. आम्ही एका टुमदार शहरात शिरलो होतो. तिकडे मग एका हॉटेलमध्ये शिरलो. छान उबदार वाटत होतं. इकडे जेवणाचा मेनू स्वस्त होता पण आम्हाला भूक नव्हती. मग सर्वात स्वस्त अशा पेयाला प्राशन करून आम्ही निघालो.
आता फक्त 18 किमी. पुण्यात हे अंतर पार करायला पाऊण तास लागतो. पण इकडे परत चढ सुरु झाला. आणि पावसाचा जोर पण वाढला. आणि हे १८ किमी कापायला दीड तास लागला. इकडचे चढ पण फसवे. नाकासमोर पाहिलं तर सरळ रस्ता वाटतो. पण चालवताना मात्र वाट लागते. काही ठिकाणी उतार चालू झालाय असं वाटायचं पण तोही चढ निघायचा. पण चढ सम्पल्यावर उतारावरून घरंगळत जाताना जी मजा येते त्यासाठी कितीही चढ आले तरी बेहत्तर असं वाटू लागत.
तर अशा रीतीने 3 वाजता आम्ही हॉटेल वर पोचलो. 5 वाजता जेवलो. मग बाहेर थोडा फेरफटका, उद्याच्या खाण्याचं शॉपिंग वगैरे करून रूम वर आलो. आता हिटर समोर कपडे वाळवत गप्पा टप्पा चालू आहेत.
आजचं एकूण अंतर 64 किमी. आज पावसामुळे कमी फोटो आहेत.
.
.
.
***** २ सप्टेंबर २०१७ *****
लहानपणी आम्हाला चित्रकलेच्या तासाला निसर्ग चित्र काढायला सांगितलं की बऱ्याच जणांचं पेटन्ट चित्र म्हणजे दोन शेजारी शेजारी टेकड्या आणि मध्ये उगवणारा सूर्य. मग बाकी आपापल्या कल्पनाशक्ती प्रमाणे, नदी, पक्षी, झाडे झुडपे असायची.
निसर्गचित्राच्या या अशा कल्पनेचा जनक नक्कीच झेक रिपब्लिक देशाचा असावा असं माझं ठाम मत आहे. एकामागून एक टेकड्या, आणि दोन टेकड्यांच्या मध्ये वसलेली टुमदार गावं. गाडीतून फिरताना तर हे मस्तच वाटेल, पण सायकल वरून जाताना मात्र घाम फुटतो. तरीही सृष्टीसौन्दर्य इतकं ठासून भरलेलं की चढाच्या श्रमाचं चीज झालं असं वाटावं. आज तर प्रत्येक चढानंतर येणारा उतार लांब होता. त्यामुळे आणि थंडीमुळे चढ हवाहवासा वाटत होता. कारण त्यामुळे थंडी कमी वाजत होती. नशिबाने आज पावसाने दडी मारली होती.
प्राग ते व्हिएना या मार्गावर बऱ्याच गावांनी पुढाकार घेऊन ग्रीनवे नावाचा सायकल मार्ग तयार केला आहे. हा रस्ता काही ठिकाणी गाडी रस्त्यावरून तर काही ठिकाणी स्वतंत्र जातो. आम्ही प्राग पासून हा मार्ग शोधत होतो पण आज याच्या पाट्या दिसल्या. मग तो मार्ग धरला. पाईन वृक्षांच्या जंगलातून रस्ता जात होता. बरेच ठिकाणी स्किईंगचे मार्ग पण काढलेले होते. म्हणजे थंडीत इकडे बर्फ होतो तर. एक मोठा लांब उतार लागला. त्यावरून 30 35 किमी वेगाने सायकली घरंगळत गेल्या. सुख सुख म्हणजे काय असतं याची जणू प्रचिती आली.
पण पुढे स्लोव्हानाईस नावाच्या गावात ग्रीनवेच्या पाट्या गंडल्या. मग मोबाईल मॅपला शरण जाऊन त्याने सुचवलेल्या मार्गाने आम्ही जाऊ लागलो. आता नवीन समस्या. हा मार्ग पुढे 6 किमीवर बंद असल्याची पाटी मी पाहिली. मी केदारला तसं सांगितलं. पण केदार आत्मविश्वासाने म्हणाला, घाबरू नको सायकल नक्की जाईल. मला ते पटलं नसलं तरी म्हटलं चला पाहू काय होतं ते. केदारला अनुभव जास्ती आहे तेव्हा आपण मध्ये लुडबुड करू नये.
6 किमीवर रस्ता पूर्ण खोदलेला होता. आणि मध्ये नदी. झालं, म्हणजे आता परत फिरा. पण केदारने तिकडल्या कामगारांना विचारलं तर त्यांनी बाजूने यायची खूण केली. फक्त घोटभर पाण्यातून सायकल काढायची होती. आज केदार कडून एक गोष्ट शिकलो म्हणजे तोंड उघडायचं. आम्ही आपली भाषा झेक लोकांना समजत नाही या गृहितकावरच अडकलेले पण केदार बिनधास्त जाऊन त्यांच्याशी संभाषण साधत होता.
तर अशा प्रकारे आम्ही तिकडून बाहेर पडलो. मग काय, चढ टेकडी आणि उतर टेकडी असं चालू. मध्ये एका छोट्या शहरात मस्त जेवून शेवटचे 30 किमी कापायला सुरवात केली.
संध्याकाळी चार वाजता zonjmo गावी पोचलो. हे साधारण 1100 साली वसलेलं झेक आणि ऑस्ट्रिया सीमेजवळच गाव. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे सुमारे २७ किमीचे भूमिगत मार्ग आहेत. काही ठिकाणी तर सरपटत जावे लागते. हे पहायला वेगवेगळ्या टूर्स निघतात. पण आम्ही जाई पर्यंत वेळ निघून गेली होती. मग थोडसं टाऊन सेंटरमध्ये भटकून रात्री साठी रूम वर पिझा घेऊन आलो.
आजचं अंतर 84 किमी.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
***** ३ सप्टेंबर २०१७ *****
आज सकाळी जाग आली तीच मुळी पावसाच्या आवाजाने. त्यात आजचा लांबचा पल्ला होता. त्यामुळे काय करावं, सायकलिंग न करता सरळ ट्रेन वा बस वर जावं का ह्यावर चर्चा करत न्याहरी झाली. न्याहरी करता करता आम्ही ट्रेन, बस चे पर्याय शोधूनही ठेवले होते. शेवटी केदार म्हणाला, सरळ पॅडल मारायला लागू. पाऊस तर पाऊस. एव्हाना जोर जोर कमी वाटत होता. मग आम्ही सायकलींवर टांगा टाकून निघालो.
अर्ध्या तासातच आमच्या मॅपने आम्हाला जंगलातल्या रस्त्यात नेले. जवळपास ७ किमी हा रस्ता पूर्ण जंगलातून होता. काही ठिकाणी तर आम्हाला झाडांच्या फांद्या वेगळ्या करून पुढे जावं लागत होतं. रेल्वे/बसने नं जाण्याचा आमचा निर्णय योग्य ठरला.
साधारण अडीच तासांनी आम्ही झेक रिपब्लिकची बॉर्डर सोडली व ऑस्ट्रियामध्ये प्रवेश केला. गेल्या तीन दिवसात हा देश खऱ्या अर्थाने पहायला मिळाला. इकडले लोक थोडे खडूस वाटले तरी ते आतून तसे नाहीत. रस्त्यात तुम्हाला पाहून हॅलो वगैरे करणार नाहीत, पण तुम्ही काही मदत मागितली तर जरूर करतील. इंग्रजी येत नसल्याने ते संभाषण करायला आढे वेढे घेतात असे वाटते.
ऑस्ट्रिया मध्ये शिरल्याशिरल्या आम्हाला काही फरक जाणवू लागले. झेक मध्ये कणीस, सूर्यफुलांची शेती अधिक तर ऑस्ट्रियामध्ये भोपळे, द्राक्ष जास्ती दिसले. झेक मधल्या गावातल्या रेस्टॉरंटमध्ये मुख्यत्वे कष्टकरी लोक बीअर पिताना आढळायचे. ऑस्ट्रियाच्या गावांमध्ये मध्ये जास्त करून उचभ्रू लोक दिसले आणि त्यांच्या हातात वाईन. एकूणच ऑस्ट्रियामध्ये सुबत्ता जास्त असावी असं वाटलं.
आता आमची चढ उताराची आवर्तनं पण कमी होऊ लागली व स्पीड जरा बरा मिळू लागला. आणि सृष्टी सौन्दर्य तर काय वर्णावे? त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. साधारण दीड वाजता आम्ही जेवायला थांबलो ते तीन वाजता परत सायकलवर टांग मारली. आता व्हिएन्ना फक्त 30 किमी होते. साधारण 10 किमी गेल्यावर डॅन्यूब नदीचं दर्शन झालं आणि ह्या नदीच्या मधेच घुसलेल्या जमिनीवरून साधारण 8 किमी चा सायकल ट्रॅक. म्हणजे दोन्ही बाजूला पाणी आणि मधून सायकल ट्रॅक. ही खऱ्या अर्थाने जॉय राईड होती.
साधारण 5 वाजता आम्ही हॉस्टेलवर पोचलो. हॉस्टेल महाग पण खूप बेसिक आहे.
तर अशा रीतीने znojmo ते vienna हा 90 किमी प्रवास विनासायास पार पडला.
उद्या आमचा विश्रांतीचा दिवस आहे. तेव्हा उद्या व्हिएन्ना दर्शन.
.
.
.
.
.
***** ४ सप्टेंबर २०१७ *****
आज आमचा विश्रांतीचा दिवस होता. तेव्हा आरामात उठून आम्ही कॉफी प्यायला उतरलो. तिकडे एक स्पेनचं तरुण जोडपं भेटलं. क्रिस्टिना आणि डेव्हिड. ते पूर्ण डॅन्यूब नदीच्या काठाने प्रवास करत होते. 20 ऑगस्ट पासून ते सायकलिंग करतायत. कधी कॅम्पिंग कधी हॉस्टेल. विशेष म्हणजे भाड्याच्या सायकली घेऊन. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या.
व्हिएन्ना मध्ये आम्ही free walking tour घेतली. ही एक छान सोय आहे. अडीच तासाची टूर. त्यात काही महत्त्वाच्या इमारती दाखवतात आणि व्हिएन्ना शहराची माहिती देतात. टूर संपल्यावर आपल्या इच्छेने टीप द्यायची.
टूर छान झाली. त्यात गाईडने ऑपेराची उभे राहून ऐकण्याची तिकीटे साडे तीन युरोला मिळतात अशी माहिती दिली. ऑपेरा आणि तोही व्हिएन्ना मध्ये आणि तोही साडे तीन युरो. मग आम्ही दुपारचा प्लॅन असा बनवला कि जवळचा शॉनब्रून राजवाडा पाहून मग ऑपेराची तिकिटं काढून, सेंट्रल कॅफे मध्ये कॉफी प्यायची. सेंट्रल काफेचं वैशिष्ट्य म्हणजे हे खूप जुने कॅफे असून इकडे आईनस्टाइन कॉफी प्यायला यायचा. म्हणजे इकडे कॉफी प्यायल्यावर आमच्यात आणि आईनस्टाईन मध्ये एक तरी कॉमन गोष्ट होईल असा युक्तिवाद मी मांडला होता. असो.
तर आम्ही सायकली काढून पॅलेस पहायला गेलो. कोणीतरी सांगितलं होतं कि वरून शहराचं विहंगम दृश्य दिसतं. पण तसं काही दिसलं नाही. मग आम्ही हिरमुसले होऊन ओपेराची तिकिटं काढायला निघालो.
पण आम्हाला चक्क चकवा लागला. ऑपेराच्या बिल्डिंगला दोन तीन प्रदक्षिणा मारूनही बिल्डिंग सापडेना. शेवटी जेव्हा सापडली तेव्हा उशीर झाला होता. तिकिटं संपली होती. मग कॉफी प्यायला गेलो तर तिकडेही निराशा. कारण काही कारणामुळे सेंट्रल कॅफे पण बंद. मग निराश होऊन परतलो.
मात्र व्हिएन्ना मध्ये सायकल नुसती हाणली. कधी सायकल वे मधून तर कधी सायकल वे नसलेल्या रस्त्यावरून. अगदी वेडात निघाले वीर टाईप. इकडे पुण्यात सायकल चालवल्याचा विशेष फायदा झाला. याचा व्हिडिओ नंतर युट्युबवर टाकणार आहे.
व्हिएन्ना शहर मात्र पाहण्यासारख आहे. प्रत्येक इमारत तब्येतीने बांधलेली. अप्रतिम कलाकुसर. आणि मोठे रस्ते. त्यावर गाड्या, ट्राम व सायकलचे ट्रॅक. आणि कोणतेही नियम न तोडणारे वाहन चालक. पण भारी महागडं.
रात्री रुमवर पोचेपर्यंत साडे नऊ वाजून गेले होते. आम्ही दमलोही होतो. त्यामुळे लगेच झोपलो.
एकूण चालणे १० किमी आणि सायकलिंग २५ किमी.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
***** ५ सप्टेंबर २०१७ *****
आज आमचा लांबचा पल्ला होता. जवळपास १०० किमी. म्हणून सकाळी न्याहरी न करताच निघालो. आजपासूनचा रस्ता डॅन्यूब नदीच्या काठाने असणार होता. आणि सपाट. त्यामुळे टेन्शन नव्हतं. आणि हवामानही चांगलं होतं. युरोपात चांगलं हवामान मिळणं भाग्यचं असतं म्हणतात.
पण सर्वच गोष्टी ठरवल्याप्रमाणे थोडीच होतात? आमच्या मॅपने आम्हाला भर शहरातून फिरवत बाहेर काढलं. पुण्याचा रिक्षावाला जसं बाहेरगावच्या प्रवाशाला उगाच घुमवतो, तसं मॅपने आमच्या बाबतीत केलं. खरं तर डॅन्यूब नदीच्या काठाने सायकल मार्ग जातो. पण डॅन्यूबने आमच्या मॅपचं काय घोडं मारलं होतं कोण जाणे. जितकं जमेल तितकं आम्हाला नदीपासून दूर ठेवत मार्ग काढला.
जवळपास ३० किमी गेल्यावर आम्ही न्याहरी साठी थांबलो असताना तिकडे एक म्हातारबा आपणहून भेटायला आले. त्यांनी सांगितलं कि दीड किलोमीटर गेल्यावर डावीकडे रस्ता जाईल तो घेऊन नदी किनारी जा आणि तिकडून फेरीने दुसऱ्या किनाऱ्यावर जा. तिकडून थेट बुडापेस्ट पर्यंत सायकल ट्रॅक आहे. ट्रॅफिक आजिबात नाही. फेरीचे माणशी २ युरो पडतील. इंग्लिश येत नसूनही मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये फक्त आम्हाला मदत म्हणून ते आपणहुन माहिती देत होते. त्यांना दुवा देऊन आम्ही निघालो.
त्यांनी सांगितल्या प्रमाणे फेरी मिळाली. पण फेरीवल्याने दुपटीहून अधिक पैसे घेतले. पण अडला हरि असे म्हणत आम्ही निघालो. डॅन्यूब नदीच्या तटापासून साधारण 250 मीटर अंतरावर बंधारा बांधला आहे. बहुतेक पुराचं पाणी अडवायला. त्यावरून सायकल रस्ता केला आहे. एकदम सपाट आणि खड्डेविरहित रस्ता. सपासप पेडल मारत आम्ही निघालो. वाटेत बरेच सायकलस्वार भेटले. काहींशी जुजबी बोलणं झालं.
साधारण दोन वाजता आम्ही ब्रातीसलाव्हाला पोचलो. इकडे आम्हाला खास भेटायला म्हणून मृणालिनी व निशांत हे मराठी जोडपं आलं. मृणालिनींनी misalpav.com वर आमच्या सहलीबद्दल वाचून आमच्याशी संपर्क साधला होता. स्लोव्हाकियात 6 वर्ष रहात आहेत. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. त्यांनी छोटीशी पण उपयुक्त भेट दिली होती ती घेऊन आम्ही पुढे निघालो. निशांतनी इंग्लड मध्ये सायकल टुरिंग केलं आहे.
आता अजून 25 किमी राहिले होते. रस्ता सपाट. आज पहिल्यांदाच इतका सपाट रस्ता लागत होता. ५:३० पर्यंत हॉटेलला पोचलो. इकडे अविनाशचा फोक्सवॅगन मधला जर्मन सहकारी माथायस म्हणून भेटायला आला. हा पूर्वी वर्षाला १५००० किमी सायकल चालवायचा. पण आता मोटरसायकलचा षौक आहे. भारतात २ वर्ष चाकण प्लँट मध्ये घालवली. त्याची व अविनाशची घट्ट मैत्री. त्याच्याशी मस्त गप्पा झाल्या. त्यांच्या स्लोव्हाकियामधल्या प्लांट मध्ये पोर्शे, ऑडी सारख्या महागड्या गाड्या बनतात. दिवसाला २५०० गाड्या बनतात.
एकूण आज दिवस मस्त गेला. नवीन ओळखी झाल्या. सपाट रस्ता मिळाला. डॅन्यूब नदीची साथ मिळाली.
आजचं एकूण अंतर १०२ किमी.
.
.
.
.
.
***** ६ सप्टेंबर २०१७ *****
आजचा रस्ता बऱ्यापैकी सपाट असल्याने आम्ही निवांत आवरून निघालो. रस्ता पूर्ण डॅन्यूब नदीकाठी होता. डाव्या बाजूला नदी आणि उजव्या बाजूला शेते किंवा गावे. आणि मधून बंधाऱ्या वरून जाणारा सायकल रस्ता. म्हणजे सुखच. त्यातून रस्त्यावर फक्त आम्ही तिघे. मस्त रमतगमत आम्ही चाललो होतो.
एके ठिकाणी बंधाऱ्यावरचा रस्ता बंद झाला. तेव्हा तिकडल्याच एका घराच्या बागेत केदार रस्ता विचारायला गेला. एक आजोबा होते. वयस्कर असले तरी तरुणपणी कमावलेल्या पीळदार शरीरयष्टीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ते केदारला मोठ्या उत्साहाने उच्चरवात रस्ता सांगत होते. पण स्लोवाक भाषेत. केदार मला म्हणाला, हे आजोबा काय बोलतायत ते काही समजलं नाही. त्यांचा विरस नको म्हणून तो मान डोलवत होता.
तर त्यांचं रस्ता सांगायचं झाल्यावर मी सहजच त्यांच्या बागे कडे बोट दाखवून छान आहे असं खुणावलं तर आम्हाला थांबायची खूण करून आमच्यासाठी बागेतून टोमॅटो काढून आणले. व त्यांच्यासमोर एक टोमॅटो खायला लावला. सूर्याकडे बोट दाखवून तो हे आम्हाला देतो अशा अर्थाचं काही बोलले. टोमॅटोचा आकार पण इतका मोठा की एका हातात जेमतेम एक मावेल. त्यांच्याशी जे काही संभाषण झालं ते कळलं नसलं तरी त्यांना भेटून, त्यांचं आदरातिथ्य पाहून छान वाटलं.
पुढचा रस्ता मला रटाळ वाटू लागला. ना काही चढ, ना उतार, तीच नदी, तीच शेतं आणि अव्याहत पॅडल मारणे. असं करत आम्ही medvedov गावा पर्यंत पोचलो. आता 47 किमीवर आमचं आजचं ठिकाण, कोमारन होतं. इकडे आमच्याकडे दोन पर्याय होते. एक तर नदी ओलांडून हंगेरीत शिरून पुढे जायचं किंवा नदी न ओलांडता स्लोव्हाकिया मधूनच काठा काठाने जाऊन मग कोमारन ला नदी ओलांडायची. तितक्यात समोरून एक सायकल स्वार आला. त्याने स्लोव्हाकियाचा मार्ग घ्या असं सुचवलं. मग आम्ही निघालो.
हा पूर्ण सायकल रस्ता होता. गाड्यांचा त्रास नाही. निवांत पॅडल मारत जायचं. शिवाय सपाट रस्ता. पण सर्व गोष्टी सरळसोट थोडीच असतात? थोड्याच वेळात डांबरी रस्ता संपून कच्चा रस्ता सुरु झाला. रस्त्यावर सुटी खडी. त्यामुळे वेग तर मंदावलाच पण तोल सांभाळायला कसरत करावी लागत होती. माझी सायकल दोन वेळा घसरली. पण आम्ही चिकाटीने पॅडल मारत होतो. रस्त्याला शिव्या देत एकूण ३४ किमी गेलो आणि शेवटी कोमारनला पोचलो. इतके दिवस खड्डेविरहित रस्त्याचं खूप कौतुक केलं होतं आणि आज हे असं. नशीब.
हॉटेलचा रेसेप्शनिस्ट चांगला पोरगा होता. त्याच्याशी गप्पा झाल्या. त्याला हिंदी सिनेमे, विशेष करून शाहरुखचे सिनेमे आवडतात. विचारलं शाहरुखच्या सिनेमात काय आवडलं तर म्हणे कल्चर (मी मनातल्या मनात डोक्याला हात मारला). त्याने आम्हाला कोमारन मध्ये थर्मल बाथ असल्याचे सांगितले. म्हणजे गरम पाण्याचे औषधी झरे. हे प्रकरण बुडापेस्टमध्येपण आहे. पण इकडे स्वस्त म्हणून आम्ही इकडल्या थर्मल बाथ मध्ये गेलो. माणशी 300 रुपये. मस्त वाटलं. सगळा शीण निघून गेला.
हंगेरी हा मी भेट दिलेला पहिला देश ज्याची करन्सी रुपयापेक्षा स्वस्त आहे. एक हंगेरीयन फॉरीन्ट म्हणजे चार आणे. आमचं भरपेट जेवण चांगल्या हॉटेलात माणशी पाचशे रुपयात झालं. हे भारीच.
आता फक्त दोन दिवस राहिले. व अंतरही कमी. तेव्हा उद्या आरामात आवरून निघणार.
आजचं एकूण अंतर ७३ किमी.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
***** ७ सप्टेंबर २०१७ *****
आजचा आमचा पल्ला लहान असल्याने आरामात उठून आवरलं आणि हॉटेलमधेच न्याहरी करून साधारण नऊला निघालो. कालच्या वाईट रस्त्याच्या अनुभवामुळे आम्ही गाडी रस्ता घ्यायचं ठरवलं.
रस्ता सपाट होता. पुण्यात सायकल चालवणाऱ्यांना इकडल्या रहदारीचा त्रास होत नाही. पण इकडले लोक मात्र रहदारीतुन सायकल चालवणे म्हणजे धाडसी समजतात. हंगेरीतले स्थानिक मस्त आहेत. आम्ही सायकलवरून जाताना आम्हाला आपणहून हात हलवत होते. विशेषकरून वयस्कर लोक.
२० २५ किमी गेल्यावर आम्हाला अजून तीन सायकलस्वार भेटले. पॅरिसची तरुण पोरं होती. पॅरिसवरून महिन्यापूर्वी निघाले होते आणि आज बुडापेस्टला त्यांचा प्रवास सम्पणार होता. ते मध्ये कॅम्पिंग मध्ये हॉस्टेल असं रहात होते. त्यांच्याकडल्या एकाच फोन पडून बंद झाला होता. कोणत्याही मॅपविना चालले होते. आम्ही एका दुकानात एकत्र कॉफी प्यायला थांबलो. पण दुकानात युरो घेत नव्हते. मग त्यांनीच आमच्या कॉफीचे पैसे दिले.
या मुलांशी छान गप्पा झाल्या. यांनीही शाहरुखचे सिनेमे पाहिलेले होते. दर वर्षी उन्हाळ्याच्या सुटीत युरोपचा कोणता तरी भाग पालथा घालतात. यातल्या एकाच्या सायकलचं मागचं चाक डुगडुगत होतं म्हणून त्याने मागचे ब्रेक्स काढून टाकलेले आणि पुढेही ब्रेक नीट लागत नव्हते. मग केदारने त्याचे पुढेचे ब्रेक टाईट करून दिले. त्यांनतर ते त्यांच्या मार्गाने आणि आम्ही आमच्या मार्गाने निघालो.
साधारण साडेबारावाजता आम्ही आमच्या आजच्या गावात पोचलो. गावाचं नाव एष्टरगोम. आमचं आजचं बुकिंग एका होमस्टे मध्ये होतं. मालक शहरात चक्क रस्त्यावर गॉगल व टोप्या विकतो. त्याला त्याच्या दुकानावर भेटलो. म्हणाला घराची सफाई चालू आहे तो पर्यंत जेवून घ्या. त्याने एक स्थानिक व स्वस्त रेस्टॉरंट दाखवलं. जेवण मस्त होतं. माणशी फक्त २५० रुपयात भरपेट.
जेवून आम्ही शहर बघायला गेलो. इकडे एक किल्ला होता. साधारण पर्वतीपेक्षा थोडा बुटका डोंगर. वरून शहराचं मस्त दृश्य दिसत होतं. समोरच्या डोंगरावर एक पुरातन चर्च. दुसऱ्या बाजूला डॅन्यूब नदी आणि पलीकडे स्लोव्हाकिया. स्लोव्हाकिया मध्ये उंच इमारतीचं जंगल आणि हंगेरीच्या बाजूला छान टुमदार कौलारू घरं. एका सीमारेषेने केवढा फरक केलेला. थोडेफार फोटो काढून आम्ही गडाच्या दुसऱ्या बाजूने उतरू लागलो. ह्या बाजूला सुंदर घरं होती. त्यांचं कौतुक करत आम्ही खाली उतरतोय तर तिकडे मालक भेटला. म्हणाला रूम तयार आहे. मग आम्ही त्याच्या दुकानावर जाऊन सायकली ताब्यात घेतल्या. त्याने आमचं सामान आधीच गाडीने घरात नेलं होतं.
मालकाबरोबर घरी गेलो. घर चक्क आम्ही ज्या गडावरून गेलो त्या गडावर. घर तर केवळ अप्रतिम. आमच्यासाठी त्याने घरगुती वाईन आणून दिली. आम्हाला संध्याकाळी सूर्यास्त कुठून पहायचा ते दाखवून ठेवलं. खूप बोलका होता. हिंदीत शुक्रिया म्हणून निघून गेला.
मग अंघोळी वगैरे करून आम्ही संध्याकाळच्या जेवणाची सोय करायला बाहेर पडलो. रात्री घरीच सॅलड बनवून सोबत फ्रोजन पिझ्झा ओव्हन मधून गरम करून खायचा बेत होता.
खायचं समान घरात ठेवून आम्ही सूर्यास्त पहायला निघालो. या सनसेट पॉईंटवर आम्हा तिघांशिवाय कोणी नव्हतं. इतक्या शांतपणे सूर्यास्त शेवटी कधी पाहिला ते आठवत नाही. स्लोव्हाकियाच्या क्षितिजावर सूर्य मावळला आणि आम्ही कृतकृत्य होऊन निघालो.
उद्या बुडापेस्टला आमचा प्रवास संपणार. थोडी रुखरुख लागून राहिली आहे. असो.
आजचं एकूण अंतर ५२ किमी.
.
.
.
.
.
.
.
***** ८ सप्टेंबर २०१७ *****
आजचा आमचा या सायकल सफरीचा शेवटचा दिवस. नेहमी प्रमाणे लवकर आवरून आम्ही हॉटेल सोडलं व बुडापेस्टच्या मार्गाला लागलो. ह्या ट्रिपमधलं हे एक उत्कृष्ट हॉटेल होतं आणि शहर Esztogrom (एष्टोग्रॉम) पण अतिशय सुरेख.
आजचं अंतर फक्त ५० - ५२ किमी होतं. रस्ता बराचसा सपाट आणि बुडापेस्ट जवळ काही ठिकाणी चढ उतार. आज लवकर जायचं म्हणून गाडी रस्ता घेतला होता. रस्त्याची रुंदी थोडी कमी असल्याने गाड्या जरा जास्त जवळून जात होत्या. पण पुण्याच्या मानाने काहीच नाही.
बुडापेस्टला १२:३० वाजता पोचलो. केदार व अविनाश आज एका स्थानिक सायकलिस्ट मुलीकडे रहाणार होते. ही आयर्नवुमन स्पर्धा जिंकलेली आहे. पुढच्या वर्षी तिला सायकलवरून जगभ्रमण करायचं आहे. तिने केदारची वोर्मशोवर्स वरची पोस्ट वाचून आपल्या घरी रहाण्याची सोया होईल असं कळवलं होतं. मग आम्ही आधी तिच्या घरी बॅगा टाकून मग जेवायला गेलो.
याच वॉर्मशॉवर वरून अजून एका अँड्रस नावाच्या सायकलिस्टने केदारला मेल वरून आम्हाला शहराची सायकल सफर घडवून आणायची तयारी दाखवली होती. तो आम्हाला एके ठिकाणी भेटायला आला. त्याच्याबरोबर शहरात सायकल बिनधास्त दामटली. बुडापेस्ट मध्ये फिरताना मला उगाच वाटून गेलं की एखाद्या रविवारी भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच चालू असताना मुंबईतला फोर्ट, दादर टी टी भाग जसा दिसेल तसं हे शहर आहे. असो.
संध्याकाळी मग अँड्रेसने आम्हाला स्टेशनवर सोडलं. केदार व अविनाशच्या मदतीने सायकल परत बॅगेत टाकून आमच्या या सफरीची सांगता झाली.
सुरवातीचे किरकोळ त्रास वगळता सायकलीनी या 750 किमी प्रवासात काहीच त्रास दिला नाही. हवामानानेही चांगली साथ दिली.
प्रवासात खूप छान अनुभव आले. सर्व शब्दबद्ध करणं कठीण आहे. पण कोणताही प्रदेश पहाणं आणि अनुभवणं ह्यातला फरक या सफरीने जाणवून दिला.
आता डोक्यात पुढच्या सायकल प्रवासाचे बेत आत्ताच घोळू लागले आहेत.
.
.
.
.
.
(समाप्त)
प्रतिक्रिया
26 Aug 2017 - 1:14 pm | कंजूस
28 Aug 2017 - 10:36 am | चाणक्य
सहमत.
26 Aug 2017 - 1:14 pm | कंजूस
फोटो जरा पब्लिक करा.
29 Aug 2017 - 10:15 am | वेल्लाभट
फोटोशिवाय अर्थ नाही राव एवढ्या भारी धाग्याला. तेवढे ते पब्लिक करा फोटो तातडीने.
29 Aug 2017 - 10:30 am | मोदक
फोटो अजुनही दिसत नाहीयेत..??
29 Aug 2017 - 10:31 am | वेल्लाभट
नाही...
29 Aug 2017 - 10:39 am | वेल्लाभट
दिस्ले दिसले
26 Aug 2017 - 1:22 pm | एस
भारी! खूप खूप शुभेच्छा. फोटो दिसले नाहीत. तेव्हढं करा प्लीज.
26 Aug 2017 - 2:34 pm | शलभ
मस्तच..प्रवासाला खूप शुभेच्छा..
26 Aug 2017 - 8:23 pm | पैसा
प्रत्यक्ष प्रवास वर्णन वाचायला उत्सुक आहे.
26 Aug 2017 - 9:02 pm | मार्गी
अतिशय जबरदस्त!!!!!!!!
26 Aug 2017 - 10:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
भन्नाट सफर ! सुरुवात आवडली. आता सफरीच्या सचित्र वर्णाची उत्सुकता आहे !
@ मोदक : फोटोंना "पब्लिक अॅक्सेस" दिलेला नाही त्यामुळे ते दिसत नाहीत.
26 Aug 2017 - 10:01 pm | संग्राम
जबरदस्त !!! सहलीला शुभेच्छा ....
फोटोच तेवढ बघा ....
27 Aug 2017 - 1:34 am | पद्मावति
वाह! वाचतेय.
27 Aug 2017 - 8:38 am | मोदक
आता बघा फोटो दिसत आहेत का...
28 Aug 2017 - 2:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
होय.
1 Sep 2017 - 10:20 am | भ ट क्या खे ड वा ला
मस्त मजा येत्ये वाचायला व फोटू पाहायला,
27 Aug 2017 - 11:49 am | Nitin Palkar
27 Aug 2017 - 12:39 pm | भ ट क्या खे ड वा ला
पुढील लेखांच्या प्रतीक्षेत
27 Aug 2017 - 1:00 pm | दुर्गविहारी
वा!!! अशी डायरी नक्कीच माहितीपुर्ण आणि थरारक असते. नक्कीच वाचायला आवडेल.
27 Aug 2017 - 1:33 pm | कंजूस
दिसताहेत.
27 Aug 2017 - 9:35 pm | पिंगू
सायकल सफरीसाठी हार्दिक शुभेच्छा..
28 Aug 2017 - 12:26 am | मोदक
***** रविवार - २७ ऑगस्ट २०१७ *****
शनिवारी संध्याकाळी शिवनेरीने मुंबईला निघालो. आधी दादरला मुलीला भेटायला जायचे होते. शिवनेरीचा ड्रायवर सायकलची बॅग पाहून उगीच कुरकुर करू लागला कि लगेज खूप आहे. वेगळे पैसे पडतील. तरी बरं. ह्या पठ्ठयाला बुड पण हलवायला लागलं नाही. आपणच लगेज कप्पा उघडून आपणच बॅग ठेवायची असते. म्हटलं रिसीट दे पैसे भरतो. पण नुसता उगाच रडत बसला. शेवटी मी म्हटलं चल डेपोला फोन लावतो मी. तेवढ्यात कंडकटर आला. त्याने किती वजन आहे विचारलं. म्हटलं 20 किलो. तर ठीक आहे जाऊ द्या म्हणाला. तर अशा प्रकारे प्रवास सुरु झाला.
दादरला मुली बरोबर जेवायला गेलो. मग तिकडून उबर ने विमानतळ गाठला. विमानतळावर सर्व सुरळीत पार पडलं. सायकलचं वजन बरोबर 23 किलो बसलं. म्हणजे वजनाची पुरती वसुली केली. अवजड बॅग असल्याने ती बेल्ट वरून गेली नाही. एक कर्मचारी येऊन स्वतः घेऊन गेला.
आज सकाळी अॅमस्टरडॅमला पोचलो. सायकल अवजड वजनात येत असल्यामुळे मिळायला वेळ लागला. एकाच प्रवासात बॅग बऱ्यापैकी जखमा दाखवतेय. पण सायकल शाबूत आहे. विमानतळावरून बाहेर येऊन सायकल जोडली, त्यावर सामान चढवले व शहरात जायची तयारी केली.
विमानतळापासूनच सायकल ट्रॅक चालू होतो. आधी बाईक मॅप लावलं पण ते गंडलं. शेवटी गुगल जिंदाबाद. गुगल मॅपने अगदी अचूक मार्ग दाखवला व अर्ध्या तासात मी आम्सटरडॅममधील वॉंडेलपार्क या बॅगेत पोचलो.
आज रविवार असल्याने बरीच वर्दळ होती. पण गोंधळ नव्हता. कारंज्याच्या आजू बाजूला गवतात उन्ह खात लोक पहुडले होते. अगदी लहान मुला पासून आजी आजोबांपर्यंत सर्व वयोगटातले लोक सायकल चालवत होते. तिकडेच एका हॉटेल मध्ये सॅन्डविच घेतलं व आजूबाजूची गंमत न्याहाळत रेंगाळत बसलो. साधारण दुपारी एक वाजल्यावर परत निघालो. जवळपास जाऊन येऊन 25 किमी सायकलिंग केलं असेल. पण एक खड्डा नाही कि हॉर्न नाही. कि प्रदूषणाचा त्रास नाही. अॅमस्टरडॅम म्हणजे खरंच सायकल पंढरी आहे. सायकल भक्ताने एकदा तरी इकडे सायकल वारी करावीच.
आता मी प्रागला जायला परत विमानतळावर आलो आहे.
28 Aug 2017 - 1:11 pm | स्थितप्रज्ञ
वाचायलाही भारी वाटतंय....सायकल चालवायला किती मस्त वाटत असेल!
28 Aug 2017 - 2:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरोखरच सायकलस्वारीच्या पंढरीत पोहोचला आहात. नेदरलँडमध्ये सूट्बूटटाय घातलेला सीईओ कामावर चालला आहे हे दृष्य विरळ नाही ! सायकलस्वारांसाठी केलेली रस्ते, वगैरे व्यवस्था तर चारचाकीसाठीच्या व्यवस्थेच्या बरोबरीची (किंवा कांकणभर जास्तच) आहे.
अॅमस्टरडॅममध्ये आदूबाळ यांनी खाली म्हटल्याप्रमाणे चोरांच्या बाबतीत खबरदारी घ्याच. इतके सुंदर आणि शिस्तबद्ध शहर चोर आणि ड्रगिस्ट यांचीही पंढरी आहे ! हे विरोधाभासी वाटत असले तरी निखळ सत्य आहे. :)
पुढच्या सायकलसफरीसाठी अनेक शुभेच्छा ! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.
28 Aug 2017 - 3:50 pm | मोदक
पुढील भाग याच धाग्यात टाकला आहे. चेकवावा...
28 Aug 2017 - 7:43 pm | Anand Kumbhare
Lovely. It must be an amazing experience.
Keep writing, keep sharing.
29 Aug 2017 - 4:48 pm | उमेश धर्मट्टी
मस्त रे निरंजन! मजा आली वाचून. पुढच्या दिवसाचा वर्णनाची वाट बघतोय!!
28 Aug 2017 - 12:44 am | आदूबाळ
दादा, amsterdam मध्ये सायकलीची काळजी घ्या. सायकली चोरणं हा तिथला राष्ट्रीय विरंगुळा आहे. त्यातून मेरिडासारखी चकाचक सायकल तर जास्तच डोळ्यांत भरते.
28 Aug 2017 - 1:04 am | मोदक
निरोप पोहोचवल्या गेला आहे.
28 Aug 2017 - 1:06 am | मोदक
Thank you. Left Amsterdam along with cycle. Prague is no different. We are planning to tie all three cycles with three locks
इति - दो पहिया.
28 Aug 2017 - 10:19 am | प्रशांत
सफरीसाठी शुभेच्छा..
28 Aug 2017 - 1:10 am | मोदक
मी पुढील भाग येथेच अपडेट करत आहे.. त्यामुळे हाच धागा चेक करत रहा...!
28 Aug 2017 - 3:24 am | निशाचर
खूप भारी! वाचायला मजा येणार आहे. दो-पहिया यांना प्रवासासाठी शुभेच्छा! पुभाप्र..
28 Aug 2017 - 5:19 am | पिलीयन रायडर
हे फार भारी चाललंय!! सतत धागा चेक करणार!
28 Aug 2017 - 11:40 am | mayu4u
सफर करणारे अवलिये आणि वार्तांकन करणारे मोदकराव... सर्वांनाच!
28 Aug 2017 - 11:51 am | सुमीत भातखंडे
दो-पहिया यांना शुभेच्छा आणि मोदकरावांचे आभार.
28 Aug 2017 - 12:46 pm | पाटीलभाऊ
प्रवासासाठी शुभेच्छा..!
28 Aug 2017 - 12:49 pm | केडी
पुढील प्रवासाठी शुभेच्छा!
28 Aug 2017 - 2:28 pm | मोदक
***** सोमवार - २८ ऑगस्ट २०१७ *****
अॅमस्टरडॅम वरून रविवारी संध्याकाळी पावणेसातला विमान होतं. खरंतर मी शहरात जास्तवेळ फिरू शकलो असतो. पण परत सायकल बॅगेत कोंबून चेकइन करायची त्याचं टेन्शन होतं. माझं प्रागचं विमान इझीजेट नावाच्या स्वस्त कंपनीच होतं आणि या विमान कंपनीच्या तुसडे पणाबाबत नेटवर बरंच वाचलं होतं. लोकांनी इतकं लिहिलं होतं की मला वाटू लागलं की स्टेट बँकेचे कर्मचारी तर ही विमान कंपनी चालवत नाहीत ना. ;)
तर मग मी दोन वाजताच विमानतळावर पोचलो. आधी सायकल परत खोलून पॅक करणं आलं. अर्धा पाऊण तास त्यात गेला.
मी जिकडे सायकल पॅकिंग करत होतो तिकडे शेजारीच एक कचऱ्याचा डबा होता. त्यात दोघे भिकारी काही मिळतंय का ते शोधत होते. त्यातल्या एकाला एक लिटर कोकची अर्धी भरलेली मिळाली. जितं मया अशा अविर्भावात त्याने ती दुसऱ्याला दाखवली. त्याच्या चेहऱ्यावरची आंनदाची लकिर पाहून कसंतरीच वाटलं. असो.
सायकल पॅक करून काउंटर वर गेलो. बरीच गर्दी होती. मी रांगेत उभा राहिलो तर तितक्यात एक कर्मचारीण आली व म्हणाली इतकी अवजड बॅग घेऊन रांगेत नको उभा राहू, प्रायॉरिटी चेकिन मध्ये चल. म्हटलं वा.. म्हणजे स्टेट बँकेत कर्मचाऱ्याने तुम्हाला सौजन्यपूर्वक वागणूक दिली तर काय वाटेल? तसला फील आला.
बॅगेच वजन झालं. जवळच्या अवजड सामनाच्या काउंटर वर बॅग दिली आणि गेट कडे जायला लागलो.
नुकतंच मला डायनर क्लब कार्ड मिळाल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळावर लाऊंज चकटफू होता. हे लाऊंज म्हणजे भारी प्रकरण असतं. शांत जागा, बसायला आरामदायी खुर्च्या व खायची चंगळ. मुख्य म्हणजे सर्व फुकटात. तेव्हा सिक्युरिटी क्लिअर करून लाऊंज शोधणे व आराम करणे असा बेत होता. तसही विमानात नीट झोप झाली नव्हती.
पण कसचं काय. इझी जेट ही स्वस्तातली विमानकम्पनी असल्याने त्यांचा टर्मिनलवर स्वतंत्र एरिया होता. इतर विमानतळापासून अलग. आणि तिकडे लाऊंज नव्हताच. एक मोकळी जागा आणि दोन तीन महागडी रेस्टॉरंट्स. चांगलाच पचका झाला. मग चार्जिंग पॉईंट शोधून जागा पकडली. माशा मारत बसायचं तर मेल्या माशा पण नव्हत्या. मग काय, व्हाट्सअँप वरचा कचरा काढत बसलो.
बोर्डिंगच्या ठिकाणी बरीच जण दोन बॅगातील समान एका बॅगेत कोंबण्याचा प्रयत्न करत होती. एक मुलगी तर बॅगेत कपडे मावत नाहीत म्हणून चक्क अंगावर घालत होती. इझी जेटचा एक प्रवासी एक बॅग असा कडक नियम होता.
आपल्या पुण्यातल्या विमानतळा प्रमाणेच इकडेही विमानात शिडीने जावं लागलं. ह्या शिडीच्या दोन्ही कठड्याच्या भिंतींना चक्क सोलर पॅनल लावले होते. भारी कल्पना होती. नाहीतरी या शिड्या उन्हातच असणार.
विमान बजेट एअरलाईन असलं तरी आतून चकाचक होतं. माझ्या शेजारचा प्रवासी विमानात चक्क अवजड चेलो (cello) घेऊन चढला. म्हटलं बापरे आता हे घेऊन तो बसला तर अडचण होणार. पण त्याने ते चेलों खिड्कीतल्या सीटवर ठेवून त्याला सीट बेल्ट लावला व आपण मधल्या सीटवर बसला. आणि मी सुस्कारा सोडला.
(क्रमशः)
28 Aug 2017 - 4:03 pm | स्थितप्रज्ञ
येत राहू द्या!
28 Aug 2017 - 3:56 pm | अप्पा जोगळेकर
लव्हली
28 Aug 2017 - 4:53 pm | मोदक
***** सोमवार - २८ ऑगस्ट २०१७ *****
रात्री 8 वाजता प्रागला विमान उतरलं. आधी प्रमाणेच अवजड बॅग म्हणून उशिरा आली. पण यावेळी मनाची तयारी होती. त्यामुळे निवांत व्हॉट्सअप चेक करत बसलो.
अरे हो एक सांगायचं राहिलं. Amsterdam ला पोचल्यावर प्रथम सिम कार्ड घेतलं. लायका मोबाईल कंपनीचं पूर्ण युरोपात चालेल असं 40 युरो ला सिम मिळतं. त्यात 24 युरोचं कॉलिंग आणि 1 जीबी डेटा एक महिन्या साठी. भारतात मॅट्रिक्सच मिळतं त्याहून खूप स्वस्त.
तर आरामात बॅग आली. एव्हाना रात्रीचे साडे नऊ झाले होते. आता परत सायकल बांधून रस्ता शोधत 20 किमी जाण्याचं त्राण नव्हतं. म्हणून ऊबर बुक केली. गाडीचालक एक तरुण चुणचुणीत मुलगी होती. पण तिला इंग्रजी येत नसल्याने प्रवास चिडीचूप झाला. एकदा लेन बदलताना तिचा अंदाज चुकला म्हणून मागून कोणी हॉर्न वाजवला तितकाच. तिने मला दहावेळा सॉरी म्हटलं. मनात म्हटलं, बाई तुझी चूक झाली हे मला कळलंपण नाही. आम्हाला लेन पाळायची सवय नाही आणि उलट हॉर्न एकून मायदेशाची याद झाली म्हणून मीच तुझे आभार मानायला हवेत. पण मी पुणेरी असल्याने आभार वगैरे मानायला लाजतो. हे सर्व मनातच.
हॉस्टेलवर पोचलो तर समोर पुणेरी पाटी. नो युरो कॅश, नो कार्ड, ओन्ली क्रोना. आता अली का पंचाईत. माझ्याकडे युरो होते व कार्ड. रिसेप्शनिस्टला विचारलं उद्या कॅश दिली तर चालेल का. तिने कठोरपणे आज रोख उद्या पण रोखच अस सुनावलं. पण मग तिने जवळपासचं एटीएम कुठे असेल ते अगदी व्यवस्थित सांगितलं. नशीब रस्ता सांगताना तिने चुकीचा रस्ता सांगायचा पुणेरीपणा नाही केला.
तर एटीएम मध्ये पहिलं कार्ड चालेना. म्हटलं छान. आता काय करायचं? हृदयाची धडधड थोडी वाढली. पण शांतपणे विचार केला कि अगदीच वेळ आली तर कार्ड घेतील असं मोठं हॉटेल बुक करू. पण तशी वेळ आली नाही. दुसरं कार्ड चाललं.
हजार क्रॉना काढले. रस्त्यात एक पब दिसला. तिकडे मोर्चा मिळवला. खिशात पैसे खुळखुळायला लागल्यावर जसे काही लोकांचे पाय अड्डया कडे वळतात तसं वाटलं. पण पबमध्ये खाणं चांगलं मिळतं असा माझा अनुभव आहे. इकडेही तसंच झालं. गिर्हाईकाला आल्या बरोबर प्यायला पाणी द्यायची इथे पद्धत नाही. बीअर मात्र आवर्जून विचारतात. म्हटलं उगाच वेटरला नाराज कशाला करा म्हणून बीअर मागवली व खायला चिकन आणि त्यावर बेकनचे तुकडे. मी रेड मीट अजिबात खात नाही. पण या प्रवासात मात्र आवर्जून खाणार आहे. जेवण भारी होतं.
जेवून परत हॉस्टेलवर आलो. पैसे देऊन चावी घेतली व रुम वर गेलो. हॉस्टेल खूपच बेसिक. एक मोठी खोली. त्यात जुनाट फर्निचर. तीन लोकांना प्रत्येकी एक पलंग, टेबल व खुर्ची. जमिनीवर जुनाट enamel चं, मधेच फ़ुगलेलं असं कार्पेट. अत्यन्त गैरसोयीच्या ठिकाणी प्लग पॉईंट. हिटर पण पंखा नाही. संडास बाथरूम पूर्ण मजल्यासाठी कॉमन एरिया मध्ये. त्यातही स्त्री पुरूष भेदभाव नाही. 900 रुपयात अजून काय हवे? सुदैवाने इतर दोन बेड रिकामे होते. त्यामुळे पूर्ण खोली माझीच होती. कपडे बदलून ताणून दिली. रात्री लोकांचे आवाज मध्यरात्रीपर्यंत येत होते पण दमलो असल्याने पार झोपमोड झाली नाही.
(क्रमशः)
28 Aug 2017 - 10:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं ! प्रवास चालू असतानाच त्याचे वर्णन टाकण्याची चिकाटी... म्हंजे अचाटच की हो ! :)
28 Aug 2017 - 7:28 pm | Nitin Palkar
दो पहिया आणि मोदक्राव दोघांचेही अभिनंदन. पुन्हा एकदा संपूर्ण प्रावासासाठी शुभेच्छा. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
28 Aug 2017 - 7:40 pm | Anand Kumbhare
This is an amazing expedition. Have a great time.
Look forward to more sharings and learnings from you as always.
29 Aug 2017 - 8:36 am | झेन
मिटक्या मारत वाचत आहे.
पूर्वी म्हणे ज्यांना काशीला/पंढरीच्या वारीला जायला जमत नसे ते यात्रा करणाऱ्या च्या पाया पडत. तसंच काही तरी फिलिंग येतय.
29 Aug 2017 - 9:51 am | Neelam Mantri
Superawesome Niranjan....sooo inspiring....have a superawesome trip
29 Aug 2017 - 10:36 am | मोदक
***** मंगळवार - २९ ऑगस्ट २०१७ *****
सोमवारी सकाळी बरोबर सहा वाजता जाग आली. सगळा शीण निघून गेला होता. प्रातर्विधी आटपून अंघोळीची व्यवस्था पाहायला गेलो. एका मोठ्या रूम मध्ये भरपूर शॉवर्स आणि प्रायव्हसी साठी साधे प्लास्टिकचे पडदे. बायका पुरुषांसाठी सामायिक जागा. मग कोणी नाही हे पाहून पटकन अंघोळ उरकून घेतली.
आता न्याहरीची सोय पाहायला हवी होती. हॉस्टेल मध्ये विशेष पर्याय नव्हता. मग चालत बाहेर पडलो. छान गुलाबी थंडी होती. कोवळ्या उन्हाची ऊब हवी हवीशी वाटत होती. रस्त्यावर फार वर्दळ नव्हती. मस्त दुतर्फा झाडे, मधल्या लेन मध्ये ट्राम लाईन आणि दोन बाजूना शिस्तीत जाणारी वाहने. रुंद आणि मोकळे पादचारी मार्ग. एकदम भारी वाटत होतं.
जवळपास दीड किलोमीटर चालल्यावर एक सुपर मार्केट लागलं.
मला कोणत्याही गावात गेलं तर सुपर मार्केट मध्ये जायला आवडत. आता तुम्हाला वाटेल परदेशात जाऊन सुप्रमार्केट काय पाहायचं. पण माझ्या मते तिकडेच त्या देशाची संस्कृती दिसते. कारण ग्राहकाच्या आवडी निवडी जाणूनच सुपरमार्केट मध्ये मालाची मांडणी केलेली असते. इकडे प्रकर्षाने लक्षात आलेली गोष्ट म्हणजे मद्याचे विविध प्रकार खचून भरलेले आणि मांसाचे वेगवेगळे प्रकार, ब्रेड्सचे विविध प्रकार. त्यामानाने फळांचे व भाज्यांचे स्टॉल लहान होते.
पूर्ण सुपर मार्केट पाहिल्यावर तिकडल्या कॅफे मध्ये ओपन सँडविच टाईप प्रकार व कॉफी घेतली. खर्च 100 क्रॉना म्हणजे 300 रुपये.
न्याहरी करून रूम वर आलो. आणि सायकल बांधायला घेतली. इझीजेटने बॅगेला फारच इजा पोचवली होती. तीन मोठी भोकं पडली होती. आत उघडल्यावर पाहिलं तर गोप्रोची हँडलबारला लावायची जोडणी तुटलेली. मात्र बाकी सायकल व्यवस्थित होती. आज सायकल लवकर जोडून झाली पण मागच्या ब्रेकने भारी वैताग दिला. युरोपात जागोजागी युगलं एकमेकांना खेटून असतात तसं ब्रेक पॅड चाकाला खेटून राहिलं होतं. कितीही ट्युनिंग करून उपयोग होत नव्हता. शेवटी दिडतास खटपट केल्यावर सुधारणा झाली. मागचा ब्रेक मला नेहमी त्रास देत आलाय. पुढल्या सायकलला मात्र डिस्क ब्रेक आहे हे पाहून घेणार.
दुपारी दोनला केदार व अविनाश आले. विमानतळावरून सायकल चालवत आले. ते येऊन स्थिरस्थावर झाल्यावर आम्ही जेवायला बाहेर पडलो. मी रोस्टेड डक मागवलं. प्रथमच डक खात होतो. सोबत बीअर. कारण वेटर नाराज नको व्हायला. बहोत मजा आया.
जेवल्यावर आम्ही चार्ल्सब्रिज पाहायला निघालो. जाताना थोडा गोंधळ झाला कारण मॅप जो रस्ता दाखवत होता तिकडे नो एन्ट्रीचा बोर्ड. मग त्याच भागात थोडे घुटमळलो आणि कसाबसा रस्ता मिळाला.
चार्ल्स ब्रिजचा भाग अप्रतिम होता. तिकडे बोट राईड घेतली. मग चार्ल्स ब्रिज वरून फेरफटका मारून परत निघालो. केदार व अविनाश प्रवासाने दमलेले होते. दुपारचं जेवण उशिरा झाल्याने रात्रीचं जेवण टाळलं. अविनाशने आणलेल्या भोपळ्याच्या घारग्यांवर ताव मारला, कॉफी प्यायलो आणि आता झोपायची तयारी केली.
उद्या प्राग शहराचा फेरफटका.
.
.
.
.
पुणेरी पाटी..
.
.
.
29 Aug 2017 - 10:09 pm | स्थितप्रज्ञ
एकूणच भन्नाट प्रकरण चालू आहे तुमचं. इकडे आलात की भेटाच. आपण वेटरला नाराज न करता बसू :D
युरोपमध्ये असून युरो स्वीकारत नाही हे काही कळलं नाही. ग्रेग्झिट, ब्रेग्झिट नंतर आता चेग्झिट व्हायच्या मार्गावर आहे की काय!
रच्याकने, ATM मध्ये जाऊन येवोस्तोवर सामान कुठे ठेवलेत?
बाकी फोटो सुंदरच...
29 Aug 2017 - 10:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
युरोपियन देशांत, भौगोलिक युरोपमध्ये असणे, हेच केवळ एक सामायिक लक्षण आहे.
मात्र...
(अ) युरोपियन युनियन (इयु)मध्ये असणे,
(आ) युरोझोनमध्ये* (युरो सरकारमान्य चलन) असणे,
(इ) शेंगेन (सामायिक) व्हिसा मान्य असलेल्या देशांपैकी एक असणे,
(ई) नाटो सदस्य देश असणे,
... इत्यादींचा एकमेकाशी काही संबंध नाही. प्रत्येक देश, तो सामील झालेल्या करारांन्वये, यापैकी कोणत्याही समुदायात असू/नसू शकतो. :) कोणत्याही एका समुदायाचा दुसर्याशी तडक संबंध नाही.
* : Nine countries (Bulgaria, Croatia, Czech Republic, Denmark, Hungary, Poland, Romania, Sweden, and the United Kingdom) are EU members but do not use the euro.
United Kingdom मध्ये युरो हे चलन कधीच अधिकृत नव्हते आणि आता तर त्याने EUमधूनही बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे (ब्रेक्झिट).
31 Aug 2017 - 5:57 pm | स्थितप्रज्ञ
माहितीबद्दल धन्यवाद!
29 Aug 2017 - 10:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोचक वर्णनाबरोबर बक्कळ फोटोंची भर पडल्यामुळे आता आम्हीही तुमच्याबरोबर फिरायला लागलो आहोत असेच वाटत आहे !
पहिला फोटो परत एकदा मागे जाऊन पाहिला... माझी चौथी सायकल दिसते का हे पाहण्यासाठी ;) :)
30 Aug 2017 - 12:52 am | पिलीयन रायडर
बेस्ट!!!
टाईप कोण करतंय हे? मोदक की निरंजन?
निरंजन करत असतील तर कोपरापासून नमस्कार घ्या!
मोदक करत असेल तर .. त्याला काही धन्यवाद वगैरे म्हणणार नाही!
29 Aug 2017 - 11:33 am | मिहिर
अगदी उत्कंठावर्धक. वाचतोय.
29 Aug 2017 - 3:06 pm | अजित पाटील
खुप खुप शुभेच्छा
पुढील प्रवास वर्णन वाचलंय आतुर आहोत
परत आल्यावर नक्की भेटू. म्हणजे विस्तृत चर्चा करता येईल
29 Aug 2017 - 3:44 pm | सई कोडोलीकर
लाईव्ह टेलीकास्ट आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी धन्यवाद आणि सहलीसाठी खूप खूप शुभेच्छा.
29 Aug 2017 - 4:43 pm | किरण कुमार
वर्णन आणि फोटो सुरेख आहेत, येवू द्या अजून
29 Aug 2017 - 5:22 pm | Mrunalini
खुप छान चालु आहे तुमचा प्रवास. मी ब्रातीस्लाव्हा मधे राहते. ब्रातीस्लाव्हा वरुन जाण्याचा काहि प्लॅन आहे का? असल्यास कधी येणार आहात city मधे? मी कुठे बाहेर गेले नसेल तर नक्की भेटायला आवडेल.
30 Aug 2017 - 12:31 am | मोदक
नमस्कार... निरंजन ६ तारखेला ब्रातीस्लाव्हाला पोहोचेल. त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला फेसबुकवर मेसेजमध्ये दिला आहे.
(मी तुम्हाला मिपावर व्यनी पाठवण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही..)
29 Aug 2017 - 5:25 pm | सानझरी
भन्नाट!!
इनो घेतलाय!!!!!
29 Aug 2017 - 5:29 pm | नितिन५८८
खुप छान चालु आहे तुमचा प्रवास. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!
29 Aug 2017 - 5:48 pm | वेल्लाभट
केवळ अफाट ! केवळ अफाट ! फुल्ल शुभेच्छा आहेत तुम्हाला.... फोटो तेवढे देत रहा आम्हाला बघायला.... लव्हली !
आय रियली अॅडमायर पीपल लाइक यू.
30 Aug 2017 - 12:42 am | मधुकर भतिअ
मस्त ब्लोग!
30 Aug 2017 - 2:26 am | मोदक
नवीन भाग धाग्यात अपडेट केला आहे.
30 Aug 2017 - 6:38 am | पिलीयन रायडर
वाचला! खूप आवडला!
30 Aug 2017 - 5:38 pm | मदनबाण
अभिनव उपक्रम ! दो-पहिया यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पेसालागी ऑर्डर कुट्टे... ;) BRAHMA
30 Aug 2017 - 5:56 pm | सप्तरंगी
साधे सरळ लिखाण आहे पण वाचायला मस्त वाटले. छान होऊ दे bike tour, एकदा असा cycle प्रवास करायची इच्छा आहे. शुभेच्छा !
30 Aug 2017 - 6:17 pm | पद्मावति
जबरदस्त!
30 Aug 2017 - 9:10 pm | रायगड
जबर चालू आहे प्रवास! शुभेच्छा!!
31 Aug 2017 - 11:14 am | सुमीत भातखंडे
जबरी प्रवास चालू आहे. वाचतोय
31 Aug 2017 - 11:46 am | नितिन५८८
भन्नाट सफर जबरदस्त ... . तुमचा खर्च किती होणे अपेक्षीत आहे.
31 Aug 2017 - 5:14 pm | इरसाल कार्टं
भारी चाललीय सफर
31 Aug 2017 - 5:55 pm | स्थितप्रज्ञ
चा टँकर मागवून ठेवला आहे. प्रत्येक अपडेट वाचल्यावर एक बादली इनो घ्यावे लागतेय.
31 Aug 2017 - 5:59 pm | स्थितप्रज्ञ
ऐवजी
असे वाचावे
1 Sep 2017 - 6:14 pm | मोदक
ओके वाचले, तुम्ही संध्याकाळी कुणाला नाराज न करता प्रतिसाद दिलात ते सांगा. ;)
31 Aug 2017 - 8:31 pm | डॉ श्रीहास
सायकल वारी आटपली की मी येणार .... सायकलच्या चाक स्पर्शासाठी _/\_
1 Sep 2017 - 3:23 am | निशाचर
हवामानाचा अंदाज दो-पहिया आणि त्यांचे सायकलमित्र घेत असतीलच. तरीही इथे लिहावेसे वाटले. त्यांनी आखलेल्या मार्गावर पुढचे दोनतीन दिवस वारे आणि पाऊस असण्याची शक्यता आहे. विशेषतः उद्या जोरदार पाऊस पडू शकतो, तापमानही उतरेल. त्यानुसार तयारीत असल्यास उत्तम!
दौर्याचे पुढचे अपडेटस् वाचायची उत्सुकता आहे.
1 Sep 2017 - 6:12 pm | मोदक
धन्यवाद..
इथे पाऊस आहे. पण आमची तयारी आहे. रेनकोट व समान कव्हर करायला प्लास्टिक घेतलं आहे. उलट गरम नसल्याचा फायदा होतोय.
(निरंजनचा प्रतिसाद)
3 Sep 2017 - 3:19 am | निशाचर
खरंय, थंड हवा सायकलिंगसाठी जास्त अनुकूल असेल.
झेक अंतर्भागाची मस्त सफर चालल्येय. फोटो छान आहेत. प्रवासात भाषेचा प्रश्न येत आहे का? पुभाप्र!
3 Sep 2017 - 11:03 am | मोदक
प्रवासात भाषेचा प्रश्न येत आहे का?
हो भाषेचा प्रश्न आहेच. पण खाणाखुणा आणि मोडके तोडके जर्मन शब्द कामी येत आहेत.
(इति निरंजन)
3 Sep 2017 - 5:28 pm | निशाचर
अश्या प्रवासाचीही वेगळी मजा असते. जर्मनचा उपयोग ऑस्ट्रियात अर्थातच होईल, पण हंगेरीतही होईल.
निरंजन यांचं लिखाण आमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तुम्हालाही धन्यवाद!
1 Sep 2017 - 4:30 pm | मोदक
नवीन भाग धाग्यात अपडेट केला आहे.
1 Sep 2017 - 5:08 pm | इरसाल
मोदकावर आता भयंकर सौंशय येतोय........हा पण अस्सच कधीही निघु शकतो परदेश सायकल भ्रमणाला (जातील हे दोघे फ्रान्सला मोदकसाहेब आणी प्रशांतसाहेब)
1 Sep 2017 - 5:12 pm | पिलीयन रायडर
काहीही करा पण वेटरला नाराज करू नका कधीच!
हा ही भाग उत्तमच!
1 Sep 2017 - 6:13 pm | मोदक
३१ तारखेची रोजनिशी धाग्यात अपडेट केली आहे.
1 Sep 2017 - 9:05 pm | पिलीयन रायडर
वाचला. फोटो खरंच सुरेख आहेत. कुणा कुणाला नाराज न करता जावं लागतंय बाबा! कठीणच!
1 Sep 2017 - 9:35 pm | वरुण मोहिते
वाचत आहे पहिल्या भागापासून .
1 Sep 2017 - 10:21 pm | दशानन
जबरदस्त उपक्रम !
आवर्जून वाचतोय मी.
1 Sep 2017 - 10:32 pm | शलभ
मस्त चाललाय प्रवास.. प्रत्येक अपडेट ची वाट बघत आहे..