डोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं! (Tribute to Dr. N. G. Dongare, who unearthed the roots of Physics in ancient Indian texts )

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
20 Aug 2017 - 12:59 am

सर,

आज तुम्ही लिहिलेल्या ‘Physics in Ancient India’ या सुंदर पुस्तकाचे पूर्ण वाचन झाल्यानंतर पहिले पान वाचले आणि त्यात आपल्या विषयी जन्म: १९३९ व मृत्यू: २००९ असे वाचले. खरं सांगतो हळहळ वाटली. मनुष्य जात्याच स्वार्थी असल्याने ही हळहळ तुम्ही जगात नाही यापेक्षा तुमच्याकडून खरंच काही ऐकायला मिळालं असतं ते आता मिळणार नाही याचं वाईट वाटलं. खरं सांगतो, डोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं!

विज्ञानविषय मराठीत लिहिण्याचा किडा डोक्यात गेल्यापासून व लिहायला लागल्यापासून एक विचार राहुन राहुन मनात येत असे. इतके भारतीय ऋषी जर गणितात भारी होते, इतके खगोलशास्त्रात गुरू होते तर भौतिकशास्त्रासारखा मूलभूत विषय त्यांनी कसा सोडला? गणित कळणाऱ्या लोकांनी त्या गणिताचा भौतिकशास्त्रात वापर कसा केला नसेल? हे त्यांना का सुचलं नसेल? पण माझी इच्छा भारतीयांनी विमान आधीच बनवलं होतं हे सिद्ध करण्याची वगैरे नव्हती, म्हणजे ते खरं असेलही. पण एक सामान्य विचार करता केवळ भौतिकशास्त्राचा पाया भारतीय आद्यग्रंथात कुठे आहे हे मी शोधत होतो, तसे करता मला India'S Glorious Scientific Tradition हे सुरेश सोनी यांचं पुस्तक वाचायला मिळालं. त्या पुस्तकाच्या प्रकरण ५: Mechanics and Mechanical Science मध्ये न्यूटनने सांगितलेली गतीसूत्रे ही ऋषी कणादांनी वैशेषिक दर्शन या ग्रंथात आहे असे म्हटले आणि त्यात तुमच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. सुरेश सोनींनी दिलेले संदर्भ तपासावेत म्हणून तुमचं ‘Physics in Ancient India’ हे पुस्तक हाती घेतले आणि तुम्ही प्रत्येक विधानाला दिलेल्या संस्कृत श्लोकाच्या मूळ पुस्तकातील क्रमांकासह दिलेल्या पुराव्याला पाहून थक्कच झालो.

बरं तुमच्या पुस्तकात तुम्ही भारतीयांचा मान वाढवलात, पण आधुनिक पाश्चात्त्य शास्त्रज्ञाना जराही अवमानित केलं नाहीत. उलटपक्षी, सर्व साधने हाती असताना, ज्ञान असताना, गणित माहिती असताना ऋषींनी या तत्वांची गणितीसूत्र पद्धतीने मांडणी का केली नाही असा प्रश्न तुम्हालाही पडला.(तो अजूनही अनुत्तरीत आहे..) पण तरीही तुम्ही आशावाद कायम ठेवत या तत्त्वांचा शास्त्रज्ञ, संस्कृत पंडित, तंत्रज्ञ यांनी एकत्रपणे अभ्यास केल्यास नक्कीच काहीतरी वेगळं हाती लागेल असा विश्वास जपलात.

पण तुमचा विश्वास केवळ भोळा विश्वास नव्हता, तर त्याला तुम्ही शास्त्राच्या पट्टीवर तोललंत, निरीक्षणाच्या कॅलिपर मध्ये मोजलंत आणि प्रयोगाच्या भट्टीत भाजून भारतीय विज्ञानाचं नाणं खणखणित असल्याचं दाखवलंत. बनारस विश्वविद्यालयामध्ये याबाबतचे अनेक शोध प्रबंध लिहिले. एवढंच नाही तर महर्षि भारद्वाज यांनी लिहिलेल्या (व बोधानंद यांनी भाष्य केलेल्या ) अंशुबोधिनी या ग्रंथावरून ध्वांतप्रमापक (Spectrometer or Monochrometer) हे यंत्र Sah Industrial Research Institute, काशी येथे तयार केलंत आणि हे यंत्र भारतीयांना साधारण ७व्या शतकामध्येच माहिती होतं व त्याची रचनाही आधुनिक यंत्रापेक्षा वेगळी असल्याचं दाखवून दिलंत. म्हणजेच अतिनील(ultraviolet), दृश्य(visible) व अवरक्त(infrared) किरणांच्या तरंगलांबीचं मोजमाप त्या काळात ज्ञात होतं हे ही सिद्ध झालं.

पण डोंगरे सर हे वाचून मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही हे सर्व करताना तुम्हाला सगळं सोपं गेलं का? तुम्ही ज्या काळात हे सर्व केलंत त्या काळात US, UK ला जाऊन ‘स्वतंत्र’ वातावरणात काम करावंसं वाटलं नाही? तसं कुणी म्हटलं नाही. जुन्या ग्रंथात नवे तंत्रज्ञान शोधायच्या प्रयत्नांना कोणी नस्ती उठाठेव म्हटलं नाही? १८५७ च्या आधीचा भारताचा इतिहास वाचणे हा केवळ वेळ वाया घालवण्याचा उद्योग आहे असे बहुसंख्यांना वाटत असताना तुम्हाला काही असे ‘सल्ले’ मिळाले नाहीत? अशा कुत्सित टोमण्यांनी तुम्ही कधी विव्हल झाला नाहीत? शिवाय एवढे प्रयोग करताना तुम्हाला पाठिंबा देणारे कोण होते? हे प्रयोग सिद्ध होतानाचे किस्से, कहाण्या, रोमहर्षक प्रसंग, प्रलोभने काय होते? अपयश किती वेळा आले? कशी मात केली? शिवाय अश्या पुरातन पुस्तकात Spectrometer चे तत्व सापडल्यावर होणारा क्षण म्हणजे साक्षात्काराच्या क्षणा इतकाच बहुमोल असणार. तेव्हा Eureka Eureka असे म्हटलात का? आम्हाला न्यूटन च्या पडणाऱ्या सफरचंदाविषयी माहिती आहे, आर्किमिडिज ने Eureka म्हणत पळत सुटलेलं माहिती आहे..पण भारतीय शास्त्रज्ञांच्या कहाण्या काय आहेत? वाटलं होतं तुम्हाला हे सर्व विचारता येईल. डोंगरे सर तुम्हाला खरंच भेटायचं होतं.

भारतीयांना त्यांच्या पुरातन ठेव्याविषयी पुन्हा प्रेम, आपुलकी, सार्थ विश्वास वाटू लागण्याच्या काळात तुमचं असणं पुढच्या पिढ्यांना दीपस्तंभासारखं वाटलं असतं. तुम्ही तिकडे काशीमध्ये संशोधन करत होतात. तुमच्यानंतर आता तुमची धुरा कोण वाहतंय? त्यांना काही असं नवीन सापडलंय का? ते शास्त्रज्ञ कोण आहेत? त्यांच्या कहाण्या काय आहेत? त्यांनी काही नवीन लिहिलंय का?

शिवाय एक मराठी माणूस काशीमध्ये संशोधन करतो. नवीन गोष्टी शोधतो. प्रवाहा विरुद्ध पोहतो. यशस्वी होतो. पण मराठी लोकांना मात्र काहीच माहिती नाही. कदाचित मला माहित नसेल. म्हणजे सर्वसाधारण माझ्या आधीच्या व नंतरच्या पिढीला तुमची ओळख नाही. आम्हाला जयंत नारळीकर माहिती आहेत, वसंत गोवारीकर माहिती आहेत, डॉ. रघुनाथ माशेलकर माहिती आहेत..पण तुम्ही अनोळखी राहिलात...अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या (व मनाने अमेरिकन झालेल्या) भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला नोबेल मिळाल्यावर भारतीय लोक डोक्यावर घेतात..पण तुम्ही इथेच राहून, इथल्या संस्कृतीची उज्ज्वल परंपरा पदार्थविज्ञानाच्या प्रकाशात पहिलीत. वैशेषिक दर्शन हेच प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान हे साधार सिद्ध केलंत तरीही एकंदर सामान्य जनांना, त्यातही मराठी लोकांसाठी अनोळखीच राहिलात. एका अर्थाने उपेक्षितच राहिलात..

तुमच्याविषयी कुसुमाग्रजांची हीच ओळ म्हणाविशी वाटते
“अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्‍त स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात !”

सर या बद्दल सॉरी म्हणायला तरी तुम्हाला एकदातरी भेटायचं होतं!

N. G. Dongre यांची पुस्तके व प्रकाशने यांची यादी (अपूर्ण)
Dhvantapramapaka Yantra of Maharshi Bhardvaja
• Physics in Ancient India
• Waves and Oscillations
• Kanada’s Science of Physics

सर्व लेख एका ठिकाणी पाहण्यासाठी ब्लॉग पहा: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

20 Aug 2017 - 3:21 am | पिलीयन रायडर

छान लिहीलंय!

असा अभ्यास कुणी केलेला आहे हे माहिती नव्हतं. खरंच हे पुस्तक मिळवुन वाचायला हवं. एरवी नाहीतर कुणी "हे आधीच आपल्या भारतीयांनी शोधलं आहे" असं म्हणलं की महान भारतीय संस्कृतीवाल्यांच्या थापा वाटायच्या. पण ग्रंथांमध्ये खरोखरीचे असे श्लोक आहेत हे वाचुन आश्चर्य वाटलं.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

20 Aug 2017 - 7:57 am | योगेश लक्ष्मण बोरोले

एका महत्वाच्या विषयावर (माझ्या मते महत्वाच्या) चांगले काम केलेल्या डोंगरे सरांविषयी माहीतच नव्हत. तुम्ही ओघवत्या शैलित चांगली ओळख करुन दिलीत. सरांची पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करेन.

भ ट क्या खे ड वा ला's picture

21 Aug 2017 - 6:33 pm | भ ट क्या खे ड वा ला

छान ओळख करून दिलीत.

चाणक्य's picture

21 Aug 2017 - 7:44 pm | चाणक्य

असेच म्हणतो.

गामा पैलवान's picture

21 Aug 2017 - 6:52 pm | गामा पैलवान

अनिकेत कवठेकर,

जबरदस्त विषय आहे. डोंगरे गुरुजींना विनम्र अभिवादन. आणि तुम्हांस धन्यवाद.

सूर्य पृथ्वीपासून १०८ सौरव्यास दूर आहे, तर चंद्र आपल्यापासून १०८ चांद्रव्यास दूर आहे हे आर्यभट्टाने कसं शोधलं असेल याची उत्सुकता आहे. एकवेळ पृथ्वीवरचे प्रयोग प्राचीन ऋषींना माहीत असतीलही, पण अंतराळगमनाच्या सिद्धीही अवगत असतील काय?

आ.न.,
-गा.पै.

आ.न.,
-गा.पै.

नया है वह's picture

21 Aug 2017 - 8:06 pm | नया है वह

+१

पैसा's picture

21 Aug 2017 - 8:29 pm | पैसा

याबद्दल संशोधन करावेसे वाटणे हेच फार मोठी गोष्ट आहे

वस्तुनिष्ठरीत्या संशोधन व्हायला हवे. पुराव्याने शाबित व्हायला हवे. एकदम अवकाश गमन वगैरे दावे नकोत.

गामा पैलवान's picture

22 Aug 2017 - 2:11 am | गामा पैलवान

अहो अनिकेत कवठेकर, अवकाशगमन तर लोकं आजही करतात. आंतरराष्ट्रीय अंतरिक्षयानात (=इंटरन्याशनल स्पेस स्टेशनात) अंतराळवीर येजा करतात ते अवकाशगमनच झालं ना?
आ.न.,
-गा.पै.

नाही. अडचण काही नाही. संस्कृत पुस्तकावर अभ्यास होऊन त्या श्लोकांवर आधारित तांत्रिक संशोधन होऊन त्यावर प्रयोगशाळेत विमानोड्डाण करून दाखवता यायला हवे. मग तो दावा अतिरंजित होणार नाही. आता त्यावरचा प्रयोग केलेली माहिती अस्तित्वात नसल्याने बोलणे इष्ट नाही. तुम्हाला अशा प्रयोगाची माहिती असल्यास कळवा.

गामा पैलवान's picture

22 Aug 2017 - 5:50 pm | गामा पैलवान

अनिकेत कवठेकर,

मग तो दावा अतिरंजित होणार नाही

सूर्य १०८ सौरव्यास दूर आहे आणि चंद्र १०८ चांद्रव्यास दूर आहे हे शोधण्यासाठी आर्यभट्टाने अवकाशगमन केलं होतं असा दावा कोणी केलाच नाहीये मुळातून. अवकाशगमनाची सिद्धी प्राप्त असणे ही एक शक्यता आहे इतकंच. ही सिद्धी प्राप्त असलेल्या पाहिल्या भारतीय माणसाचं नाव राकेश शर्मा आहे.

आ.न.,
-गा.पै.

डोंगरे सरांच्या विषयी त्यांच्या जवळचे लोक सांगू शकतील

अमितदादा's picture

25 Aug 2017 - 10:13 pm | अमितदादा

संतुलित लेख. छान ओळख, पुस्तक वाचून पाहायला हवं.

अनिकेत कवठेकर's picture

26 Aug 2017 - 11:30 am | अनिकेत कवठेकर

लेखाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल शतश: धन्यवाद..
कळावे
अनिकेत

उत्तम माहिती देणारा लेख. डोंगरे सरांबद्दल अशी काही माहिती नव्हतीच.