लहानपणी इयत्ता नववीत असताना म्हणजे २३ वर्षापूर्वी शाळेच्या सहली मधून शिवतीर्थ रायगड ला भेट दिली होती. खुप दिवसापासून परत भेट देणे जमलेच नाही. मध्यंतरी राजगडला सायकलने भेट दिली होती पण शिवतीर्थ रायगड ला भेट देणे काही घडले नाही.
आमच्या सौंना श्रीमान योगी कादंबरी वाचल्यापासून सतत रायगड भेटीची उत्कंठा लागली होती पण माझ्या सायकलिंग मुळे दर वीकेंडला माझा स्वतःचा काही ना काही बेत असतोच नाहीतर मुलांच्या शाळेत भेट असते अशा अनेक कारणांमुळे रायगड भेट होत नव्हती. मुलांना शाळेला ४ दिवस सुट्टी होती आणि रायगडला रोपवे पण मुलांना दाखवता येईल म्हणून शनिवार फॅमिली डे ठरवला. तसेच या भेटीमागे माझा आणखी एक हेतू पण होता, तो म्हणजे सायकलींग साठी रोडची पाहणी करणे.
शनिवार व रविवार आणि जोडून सुट्टी म्हटले कि सगळीकडे गर्दी आणि वाहतूक कोंडी ठरलेलीच.. शनिवारी पहाटे रायगडाला जायचे ठरवले. सकाळी ५ चा गजर लावला. कुठे फिरायला जायचे म्हटले की माझी मुलगी नेहमी गजर वाजण्या आधीच उठून बसते, मात्र तिला रोज सकाळी शाळेच्या दिवशी १० ते १५ मिनिटे जागे करायला लागतात. चहा आणि अंघोळी आटोपून आम्ही ६:३० वाजता घरातून निघालो. वाटेत पेट्रोल भरायला थांबलो. पंपावर सुट्टीमुळे मुळे खुप गर्दी होती.. तेथे थोडा वेळ गेला व ७ वाजता आमचा प्रवास सुरु झाला.
रावेत, हिंजवाडी, पिरंगुट, ताम्हणी घाट, निजामपूर, पाचाड आणि रायगड असा १३१ किमीचा आजचा प्रवास होता. ताम्हणी घाटात अजून गर्दी सुरु झाली नव्हती. त्यामुळे आमची गाडी सुसाट धावत होती. समोरून एक सायकलिस्ट येताना दिसले जवळ येताच पहिले तर ते आमचे शंकर दादा होते. नुकताच ते आमच्या सायकल क्लब चे मेंबर झाले आहेत. त्यांना पाहताच कार बाजूला घेऊन त्यांची भेट घेतली आणि नुकतीच त्यांनी १००+ किमी ची मोठी सायकल प्रवास अगदी कमी कालावधी मध्ये सायकलींग सुरु करून पूर्ण केली होती. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून सोबत फोटो काढून पुढील प्रवास सुरु केला. वाटेत अजून काही सायकलिस्ट ताम्हणीच्या दिशेने जात होते.
ताम्हणीचा निसर्ग तुमचा स्पीड कमी नाही करणार तर नवलच. निसर्गाने नटवलेले ते ताम्हणीचे रूप पाहून आम्ही सर्व मंत्रमुग्ध झालो आणि त्यातच वरूण देवाच्या आगमनाने स्वर्ग सुखाची अनुभुती होत होती. एकीकडे धरणाचा विशाल पाणी साठा आणि एकीकडे हिरवाईने नटलेले डोंगर व त्यातून खाली येणारे सुंदर असे एकाहून एक धबधबे. थोड्यावेळाने पाऊस थांबला आणि मग काय फोटो शूट चालू झाले. अशा या सुंदर वातावरणातून आमचा पाय काही केल्या निघत नव्हता पण शिवतीर्थ रायगड ची ओढ मनात होती त्यामुळे काही ठिकाणी थोडे थांबून आमची गाडी पुढे पुढे जात होती. शेवटी आम्ही निजामपूरला १० वाजता पोहचलो. पोटात भुकेचे कावळे ओरडत होते त्यामुळे आम्ही तेथील हॉटेल मध्ये न्याहारी करून पुढील प्रवासाला सुरवात केली. तो प्रवास कसला एक स्वर्गातीलच एक वाटेनेच चाललो आहे याची अनुभुवती येत होती निसर्गाचे सुंदर असे रूप भरभरून डोळ्यामध्ये सामावण्याचा आम्ही केविलवाणा प्रयन्त करत होतो. वाटेत घनदाट जंगल, आम्ही आणि आमची कार कधीतरी एक वाहन आम्हाला दिसत होते. छोट्या छोट्या गावामधून, गाव कसले छोट्या वाड्यामधून हा रस्ता जात होता. रस्ता तसा ३० किमी चा पण हा संपूच नये असे वाटत होते. इतक्यात एक छोट्या वाडीतले मुले शाळेला चालत चालली होती त्यांना पाहून लहानपणीची आठवण झाली. चहूबाजूला सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये अनेक गड दिसत होते कोणता रायगड याची काहीच कल्पना येत नव्हती. एकामागून एक असे डोंगर आणि गड मागे जात होते आणि शेवटी आम्ही रायगडाच्या पायथ्याला पोहचलो. ३० किमी चा हा प्रवास जवळ जवळ आम्ही २ तास पूर्ण करत होतो पण इतका सुंदर प्रवास खुप खुप दिवसांनी कुटूंबासोबत झाला होता.
शनिवार आणि आंम्ही लवकर पोहचलो होतो त्यामुळे रोपवे ला काहीच गर्दी नव्हती. पार्किंग चे ५० रुपये देऊन मी एका हॉटेलच्या आवारामध्ये कार लावली. तेवढ्यात अचानक पावसाची जोरात सर आली आणि आम्ही ती थांबायची वाट पाहत बसलो. कारण इतक्या पावसात रोपवेतुन रायगड आणि खोऱ्याचे अनोखे रूप पाहायला मिळाले नसते. पाऊस थांबला, आम्ही रोपवे च्या कार मध्ये बसलो आणि केबल कार चालू झाली. त्या बलाढ्य अश्या शिवतीर्थाकडे आम्ही निघालो. सुंदर अशा रायगडाच्या कड्याचे आणि विस्तीर्ण खोऱ्याचे विलोभनीय दृश्य आम्ही आमच्या डोळ्यात सामावण्याचा प्रयत्न करत होतो.. ५ मिनिटं मध्ये आम्ही शिवतीर्थ रायगडावर पोहचलो होतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या शिवतीर्थावर पाय ठेवताना मनामध्ये प्रचंड आदर दाटून आला होता. त्या पावन भूमीला नमस्कार करून मेणा दरवाजातून आम्ही रायगडावर प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत आम्ही लहानाचे मोठे झालो पण नेमके या शिवतीर्थावर काय काय घडले असेल हे कोणीच सांगू शकत नाही.
रायगड पहायला सुरवात केली आणि त्यावेळीच्या स्थापत्य कलेची एक अनोखा कलाविष्काराचे काही अवशेष पाहायला मिळाले. सुरवात राणी वसा पासून झाली.
प्रशस्त अशा खोल्या आणि जोडून स्वछतागृह त्यावेळी हा विचार आणि त्याचे नियोजन. त्यानंतर राजसदर , खलबतखाना, नगारखाना , अष्टप्रधान वाडे , खासबाग, सुंदर असे उंच मनोरे, असे एक एक त्या पवित्र वास्तूचे सौंदर्य डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो. एकामागून एक असे अनेक ठिकाणांना भेट देत आम्ही जगदीश्वराचे मंदिराकडे पोहचलो. जगदीश्वराचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या छत्रपतींच्या समाधीकडे गेलो. गंगासागर ला भेट देऊन क्षणभर त्याच्या काठावर बसून नंतर आम्ही परत रोपवे कडे वळलो. रोपवे ने परत खाली येताना पाऊले जड होत होती पण परत या वस्तुनिष्ठ जगामध्ये यायचे होते. रोपवे मधून शिवतीर्थाच्या त्या उंच कडा आणि त्यावरून कोसळणारे धबधबे आणि विस्तृत असे खोरे पाहत आम्ही खाली आलो. संध्याकाळचे ५ वाजले होते गाडी सुरु केली आणि आम्ही थेट पाचाड ला मासाहेब जिजाऊंच्या समाधी स्थळाला भेट दिली. मातृत्वाचा महामंगलआदर्श या अशा या मातेस प्रणाम करून थोडा वेळ तेथे थांबून आम्ही थेट घरी ८:३० ला पोहचलो. अशा या सुंदर आणि एक अविस्मरणीय अशा शिवतीर्थाच्या भेटीची सांगता झाली होती.
प्रतिक्रिया
16 Aug 2017 - 8:41 pm | पद्मावति
वाह! सुरेख.
16 Aug 2017 - 9:06 pm | विशुमित
छान..!! फोटो मस्त आलेत.!!
------------------------
राज्य कारभार, सुरक्षा, निसर्ग, व्यवहार आणि रयतेची संवेदना या सगळ्यांचा एकाच वेळी समतोल राखणारा "जाणता राजा"..!!
16 Aug 2017 - 9:36 pm | प्रशांत
मस्त वर्णन केलत
16 Aug 2017 - 9:47 pm | मोदक
झकास हो पाटील साहेब..!!
17 Aug 2017 - 1:55 am | थिटे मास्तर
पाटिल साहेब आपण आम्हाला घरबसल्या शिवतीर्थाची सफर घडवुन आणलित. असेच फार पुर्वि पेठकर काकांनी फिरवुन आणले होते आपल्या दिलखुलास लेखणीतुन, त्या ३ भागाच्या लिंक्स.... जरूर वाचा.
http://www.manogat.com/node/6599
http://www.manogat.com/node/6611
http://www.manogat.com/node/6620
17 Aug 2017 - 11:42 am | अजित पाटील
आभारी आहे
17 Aug 2017 - 2:30 am | रुपी
सुरेख!!
17 Aug 2017 - 8:27 am | प्रचेतस
छान लिहिलंत मात्र रायगडाचं वर्णन थोडक्यात आटोपल्यागत वाटलं.
आमच्याही एका सहलीची आठवण झाली. http://www.misalpav.com/node/21411