लोकहो, आपला नारळीपौर्णिमेचा खास मेनू केला आज. त्यामुळे आता वाचा आणि पहाही तोच. तुमच्याही घरी तोच असेल म्हणा :)
वाढणी: ४ व्यक्तींसाठी
साहित्यः १ वाटी बासमती तांदूळ, १ वाटी खोवलेला नारळ, १.५ वाटी चिरलेला गूळ, ६-७ लवंगा, पाव वाटी बेदाणे, काजू, बदाम आवडीनुसार, वेलदोडा पूड १ टीस्पून, साजूक तूप एक टेबलस्पून, पाणी २-३ वाट्या (तांदळाच्या प्रतीनुसार कमी जास्त लागू शकते.), केशराच्या ८-१० काड्या आणि केशर भिजवायला पाव वाटी दूध.
कृती: तांदूळ स्वच्छ धुवून एका रोवळीत १ तास उपसून ठेवावेत. केशर किंचित गरम करून (गरम तव्याचर गॅस बंद करून केशर तव्यावर घालून लगेच काढून कोमट दुधात किंचित चुरून घालायचे. तव्यावर ठेवायचे नाही. लगेच करपते. )
एकीकडे ३ वाट्या पाणी तापवायला ठेवावे आणि दुसर्या बाजूला तूप तापवावे. त्यात पहिल्यांदा काजू, बदाम, बेदाणे तळून घ्यावेत आणि बाजूला काढून ठेवावेत. त्याच तुपात लवंगा घालाव्यात आणि धुतलेले तांदूळ घालून छान परतून घ्यावेत. त्यात आधणाचे पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. एका ताटात तो भातही काढून घ्यावा. त्याच पातेल्यात चिरलेला गूळ आणि खोबरे एकत्र करून गूळ वितळेतो म्हणजे १-२ मिनिटे शिजवावे, त्यात वेलदोडा पूड घालून काजू, बदाम, बेदाणे घालून शिजवलेला भात हलकेच मिक्स करावा, केशर घातलेले दूध घालावे आणि मंदाग्नीवर पाच मिनिटे झाकून वाफ आणावी. नारळीभात तयार आहे.
प्रतिक्रिया
7 Aug 2017 - 9:29 pm | माम्लेदारचा पन्खा
पाणी सुटले . . . . .
7 Aug 2017 - 9:31 pm | रेवती
आवडलाय, पाठवून दे.
8 Aug 2017 - 3:25 am | रुपी
वा वा.. मस्तच!
माझी एक मैत्रीण फार छान बनवते नारळी भात.
एक शंका आहे.. गूळ, भात एकत्र केल्यावर ५ मिनिटेच पुरेशी होतातका?? व्यवस्थित गोड होतो का भात तेवढ्या वेळात?
8 Aug 2017 - 6:58 am | सविता००१
छान गोड होतो.
8 Aug 2017 - 7:16 pm | दिपक.कुवेत
आख्खे बदाम!!! तुकडे जास्त छान लागतात गं. बहूतेक ह्याच पद्धतीने भात करताना पाहिलाय अन्यथा गु़ळाचं पाणी उकळवून त्यात भात घालून मोकळा शीजवायचा.....असं कधी ट्राय केलं आहेस का? फोटो फारच तोंपासू आलाय पण भाताची मूद पाडुन, काजू-मनूके-बदाम नी सजवून जsssssरा लांबून काढला असतास तर अधीक दिलखेचक आला असता (अस आपलं माझ मत).
9 Aug 2017 - 9:01 am | सविता००१
नाही रे. गुळाच्या पाण्यात भात नाही केला मी कधीच. आता बघीन करून.
आधी मूदच पाडली होती. पण तो फोटो खूप कॉमन वाटला रे. म्हणून भाताचा डोंगर केला :)
अरे काय हे.. ज्यात त्यात कंजूषी? तुकडे घाल म्हणे;)
...अरे मी पण तुकडे घालते. पण यावेळी अक्खे बदाम घालायचे ठरवले. उगीचच.
फोटोबद्दलच्या तुझ्या सूचना लक्षात ठेवल्यात.
9 Aug 2017 - 11:15 am | दिपक.कुवेत
"आधी मूदच पाडली होती. पण तो फोटो खूप कॉमन वाटला रे. म्हणून भाताचा डोंगर केला" हि जोड विशेष आवडली.
8 Aug 2017 - 7:48 pm | सूड
आमच्याकडे भात शिजत आला की त्यात खवलेला नारळ घालतात आणि मग अंदाजे पाणी घालून सुटसुटीत शिजला की मग आवडीप्रमाणे साखर्/गूळ घालून ते आळेपर्यंत नीट शिजवतात. बदाम काजूचे मात्र तुकडेच, अख्खे बरे लागत नाहीत.
9 Aug 2017 - 10:14 am | पैसा
तिने केलाय त्या पद्धतीला 'बैठा' नारळीभात म्हणतात.
सोपी पाकृ. बदाम आणि काजूचे तुकडेच बरे ग पण!
9 Aug 2017 - 12:02 pm | सूड
हे माहीत नव्हतं.
13 Aug 2017 - 9:49 pm | सविता००१
हे पहिलांदाच ऐकलं नाव. दुसरा प्रकार सांग की ज्योताई
13 Aug 2017 - 10:54 pm | पैसा
लाडूप्रमाणेच कोणताही गोडाचा भात दोन प्रकारानी करतात. पाकातला किंवा पाक न करता. पाक न करता केलेला तो 'बैठा'.
8 Aug 2017 - 8:39 pm | पद्मावति
मस्तच दिसतोय भात.
9 Aug 2017 - 9:41 am | अभ्या..
ताई, एक लंबर जमलाय ग भात.
9 Aug 2017 - 10:27 am | II श्रीमंत पेशवे II
मस्त ....
टिपिकल केशरी रंग आला असता तर अजून छान दिसला असता
( लहानपणापासून केशरी रंगाचा भात पाहिलाय ना म्हणून तो फील आला नाही ) - घरी बुल बुल नाव असलेली एक पत्र्याची डबी असायची , ति आजीच्या कपाटातून वर्षातून २ -३ वेळा बाहेर पडायची , एकदा श्रीखंडा मध्ये , कधीतरी शिर्यात , नाहीतर नारळी भातात
एकंदरीत मस्तच ........
9 Aug 2017 - 11:50 am | सस्नेह
गूळ घातल्यामुळे केशराचा रंग दिसत नाहीये बहुधा.
साखर घालून करमाग दिसेल केशरी !
9 Aug 2017 - 8:13 pm | रमेश आठवले
पेशवाई पंगतीत जेवायला उशीर झालयावर भुकेल्या अण्णा खाजगीवाले यांनी वाढप्याच्या हातून परात खेचून घेऊन सगळाच्या सगळा साखरभात आपल्या ताटात वाढून घेतला अशी कथा वाचली आहे. तसेच कुणी कुणी केशरीभात पण बनवतात. या दोन आणि नारळीभातात काय फरक आहे हे कोणी सांगेल का ?
13 Aug 2017 - 9:52 pm | सविता००१
बरोबर आहे तुमचं. मी साखरभात केला असता तर केशरी रंग आपोआप खुलून आला असता. नारळीभातात गूळ घालतात ना सहसा...
आणि त्यात माझ्याकडे आम्ही रसायन विरहित गूळ वापरत असल्याने तो पिवळ्या रंगाऐवजी जरा चॉकलेटी रंगाकडे झुकलाय.
पण चव मस्त आहे हो. खरंच.
केशराचा रंग त्यामुळे गेलाच कुठच्याकुठे. :(
9 Aug 2017 - 11:48 am | सस्नेह
पीसी वर फोटो दिसत नाही. मोबाईल वर दिसतोय.
आख्खे बदाम !
... बाबौ !!