कोहोज नंतर लोहोपे तलावाची एक छोटीशी सहल केली होती ग्रुपने, आता पावसाळ्यात काय हा प्रश्न विचारून सगळ्यांनी मला पिडलं होतं. याआधी नाणेघाट आणि मागच्या वर्षी ब्रह्मगिरी असे दोन पावसाळी ट्रेक झाले होते जवळचे त्यामुळे आता हे दोन पर्याय सोडून इतर पर्यायांचा विचार करत होतो. या वर्षीच्या यादीत हरिहरगड, कलावंतीण दुर्ग आणि गोरखगड अग्रस्थानी होते. खरेतर तीनही एकाच पठडीतले वाटावे असे, सुळक्यासारखे आकाशाला भिडणारे आणि कठीण. यातील जवळ असणारा आणि तुलनेने सोपा गड निवडावा असे ठरवले आणि गोरखगड ट्रेकचा ठराव ग्रुपात मांडला. सगळ्यांनी कल्ला करीत तो मान्यही केला( यांच्या अज्ञानाचा कधीकधी फायदा होतो मला) आणि मी कामाला लागलो. गडाच्या काठिण्य पातळीची चर्चा नयन आणि विशाल भाऊंबरोबर आधीच झाली होती. थोडा कठीण असला तरी आमची वानर सेना गोरखगड सर करतील एवढा आत्मविश्वास आला. नेहमीप्रमाणे गृहपाठ म्हणून इतर ब्लॉग्स आणि वेबसाईट्स चाळून झाल्यावर पावसाचा जम बसण्याची आणि तारखा जुळून येण्याची वाट बघू लागलो. हो नाही म्हणता ९ जुलै हि तारीख पक्की झाली आणि मंडळाची जमावजमाव सुरु झाली. खरंतर रविवार सगळ्यांना सुट्टी असते अमोल आणि विकास व्यतिरिक्त, पण अमोलने घरी लावणी चालू असल्याचे निमित्त सांगत सुट्टी मिळवली आणि विकासने मित्रांबरोबरचा प्लॅन रद्द करून सुट्टी इकडे वळती केली(न करून सांगतो कोणाला, याआधी हरिश्चंद्रगड ट्रेकला ना येता अलिबागला गेल्याचा पश्चाताप अजून करतोय तो. :) )
गोरखगड चढायला थोडा कठीण असल्याने यावेळी येण्यासाठी कोणाची मिन्नतवारी करायची नाही एवढे ठरवून होतो. सुदैवाने फारशी करावीही लागली नाही. ज्यांना खरोखरच जमणार नव्हते त्यांनी आधीच नकार कळवले. आणि एकूण दहा जणांचा आकडा ठरला. त्यात पुन्हा महेशचे दोन मित्र जॉईन झाले आणि कधी नव्हे ती संख्या कमी व्हायच्या ऐवजी वाढली. पण यामुळे थोडे दडपणही आलेच कारण तब्बल चार जण नवे भिडू जे याआधी कधीही ट्रेकला आले नव्हते असे होते. त्यांना एकदम गोरखगडला न्यायचे म्हणजे थोडे धाडसाचं वाटले. पण म्हटलं घेऊ सांभाळून. आणि नियोजन केले.
कुडूसहून गोरखगडाच्या पायथ्याचे देहरी हे गाव गूगल मॅप्सवर ८७ किमी दाखवत होते. अर्थात शॉर्टकटमुळे हे अंतर ८०-८२ किमीवर आले असते. म्हणजे न थांबता गेल्यास दोन तास लागणार नक्की( कुडूसहुन जाणारा बहुतेक सगळा रस्ता एकेरी आणि खराब असल्याचे परिणाम), त्यात वाटेत लागणारे टिटवाळ्याचे महागणपती मंदिर, तेथे किमान अर्धा तास वेळ जाणार होता. सकाळी सहा वाजता निघायचे ठरले. महेशचे मित्र विशाल आणि तुषार अंधेरीहून थेट मुरबाडला आम्हाला मिळतील, रविवार असल्याने सुट्टी संपवून महेशला परत लांज्याला जायचे असते म्हणून गडावरून परततानाच त्याला मुरबाडहून कल्याणकडे रवाना करायचे असे ठरले. वेळ वाचावा म्हणून दुपारच्या जेवणाबरोबरच सकाळचा चहा-नाश्ताही घरूनच नेण्याचे ठरले. त्यासाठी आदल्याच दिवशी बेकारीतून खरेदी केली. आणि सज्ज झालो.
कितीही प्रयत्न केले तरी सकाळी सहा वाजता निघण्याचे संकेत ग्रुमधून मिळेनात, कसेतरी फोनाफोनी करत साडे सहाला निघालो. त्यात आमच्या स्कुटरचा टायर पंचर झाला, त्याने पंधरा मिनिटं घेतली. कसेतरी अंबाडीला सात वाजता जमलो आठ जण. श्री आणि सौ योगेशला कुडूसहून येणे म्हणजे मोठा फेरा झाला असता म्हणून तो आम्हाला पडघ्या जवळच भेटणार होता. निघालो एकदाचे.
मुळात आमचा कुडूस-अंबाडी परिसर म्हणजे चारी बाजूंनी निसर्गाने वेढलेलाच आहे. हायवेपासून दोन तीन किमी आत गेलो कि रान सुरु. अंबाडीपासून निघाल्यावर लगेच हिरवळ सुरु झाली. बऱ्याच शेतकऱ्यांची लावणीची(आमच्याकडची 'आवनी ') सुरुवात झाली होती. मजल दरमजल करीत दाभाड मार्गे पडघा गाठले, तिथे खडावलीकडे जाणाऱ्या फाट्यावर योगेशची वाट बघत बसलो. या थांबण्यात आणि वाट बघण्यात उशीर मात्र होत होता म्हणून टिटवाळ्याच्या महागणपतीचे दर्शन घेणे रद्द केले कारण त्या दिवशी गुरुपौर्णिमा असल्याने कदाचित मंदिरात जास्त गर्दी असेल हा आमचा अंदाज. सगळा एकेरी आणि बऱ्याच ठिकाणी खराब रस्ता असल्यामुळे वेग मात्र नियंत्रित ठेवावा लागत होता. खडावली-टिटवाळा पार करत गोवेलीकडे निघालो, गोवेलीहून मुरबाडपर्यंत आम्हाला रुंद रस्ता मिळणार होता जो माळशेज घाटातून पुढे जातो.
मुरबाडला पोचेपर्यंत विशाल आणि तुषारही पोचले होते. आतापर्यंत सगळ्यांनी भूक लागली होती पण विशाल-तुषार येईपर्यंत थांबा म्हणत मी सगळ्यांना मुरबाड पर्यंत दामटले होते. "पुढे एखादे चांगले ठिकाण बघून तिथेच न्याहारी साठी थांबू" असे मी जाहीर केले आणि निघालो. मुरबाडपासून जवळच असलेल्या नढई फाट्याच्या पुढून आम्हाला उजवीकडे वळायचे होते. मी गूगल मॅप्सच्या मदतीने रस्ता शोधात निघालो आणि बाकीचे आमच्या मागे. नकाशावरच सरिताने थोडे पुढे गेल्यावर एक तळे आहे असे सांगितले आणि तिथेच थांबून न्याहारी उरकण्याचा निर्णय आम्ही घेतला. थोड्याच वेळात बाकीचेही आले मागोमाग. मग नेहमीप्रमाणे खाणे सोडून फोटोसेशन सुरु झाले त्यानंतर आणलेले बन मास्क- उकडलेली कणीसे आणि आलं घातलेला चहा असा फक्कड बेत सगळ्यांनी हणाला. थोडावेळ तिथेच टवाळक्या केल्या आणि निघालो.
पुन्हा एकदा एकेरी आणि वळणावळणांचा, शेतीतून-रानांतून जाणारा रस्ता सुरु झाला आणि हळूहळू घाट दिसायला लागला. उनही छानसं सोनेरी पडलं होतं. उर्वरित महाराष्टाला आमच्या कोकणापासून वेगळे करणारी ही अभेद्य भिंत आपल्याला आपल्या खुजेपणाची जाणीव करून देते. समोरची ती खडी भिंत बघून सगळेच भारावून गेले होते. बाईक हणता हणता "आपल्याला तिथे चढायचेय" अश्या खाणाखुणा चालल्या होत्या आणि नागमोडी वळणे घेत रस्ता कापीत सगळे चालले होते.
असेच गाडी चालवता चालवता समोर गोरखगडाने दर्शन दिले आणि अवाक झालो, आकाशाला गवसणी घालणारा हा सुळका आता छातीत धडकी भरवायला लागला होता त्याचबरोबर तेवढीच उत्सुकताही वाढवत होता. मनात फक्त एवढीच इच्छा होती कि आता जसे कोवळे ऊन आता आहे तसेच ते गड चढेपर्यंत राहावे. पण कोकणातल्या पावसाचा काही भरवसा नाही. कधी झोडपून काढेल ते सांगणे कठीण. थोड्याच वेळात देहरी गावाच्या फाट्यावर आलो आणि रस्त्याबद्दल विचारपूस केली. गावकऱ्यांनी सांगितले कि पुढे गोरक्षनाथांचे मंदिर आहे तिथे गाड्या पार्क करायला जागा आहे आणि वाटही तिथूनच आहे.
मंदिरासमोर गाड्या लावून दर्शन घेते झालो. एखाद्या किल्ल्याच्या धर्तीवर बांधकाम चालू असलेल्या या मंदिराशेजारीच मोठा शेड आहे तिथे काही ट्रेकर्स विश्रांती घेत बसले होते, त्यांनाच रास्ता विचारला. त्यांनी सांगितले कि शेजारून जाणारी पायवाट तिथेच जाते, मग निघालो मंदिराच्या थोडे वर गेलो आणि पायवाटेला दोन फाटे फुटले, त्यातली गडाच्या दिशेने फिरणारी पायवाट निवडली आणि निघालो आणि. खरंतर इथेच गडबड झाली. जरा झाडीत गेल्यावर आमची गॅंग तोंडं फिरवीत सेल्फी काढण्यात व्यग्र झाली आणि मी वाट शोधात पुढे निघालो. एक दोन ओढे पार करेपर्यंत जर्रा संशय आला वाट चुकल्याचा, मळलेली वाट झाडीत गुडूप झाली होती. इकडे गँगचा गोंधळ काही कमी होईना. मला लवकरात लवकर बरोबर मार्गाला लागायचे होते आणि बाकीचे आपण वाट चुकलोय हे मान्य करायला तयार नव्हते.
चुकलेल्या वाटेवरही यांना सेल्फी घेण्याचे चाळे सुचत होते.
मग थोडा पावलो आणि सगळ्यनांना शांत केले(काही सेकंदांसाठी) तेवढ्यात उजव्या हातावरच्या डोंगरावरून काही ट्रेकर्सचा आवाज आला त्यांना हाक मारली अमोलने. झाडीत ते नीट दिसतही नव्हते पण एवढे नक्की झाले कि आम्ही वाट चुकलोय. आता चर्चेत वेळ घालवण्यात अर्थ नव्हता, मी लगेच माघारी फिरलो(त्याशिवाय बाकी मंडळी परत फिरली नसती) आणि पुन्हा मंदिराच्या रस्त्याला लागलो. खरंतर आम्ही जास्त दूरवर गेलो नव्हतो पण जाताना केलेल्या टाईमपास मुले सगळ्यांना ते अंतर जास्त वाटले.
चुकलेल्या वाटेवरून परतताना.
पाचच मिनिटात मंदिरात पोचलो आणि पुन्हा रास्ता नीट विचारून निघालो. आम्ही गडाकडे बघत जे डावे वळण घेतले होते ते चुकले होते. आता उजवीकडे जाणारी वाट पकडून चालू लागलो आणि पुन्हा मस्ती सुरु झाली. खरंतर आम्ही पावसाची वाट बघत होतो, पण पाऊस काही येईना आणि ऊन मात्र भाजून काढत होतं. थोडा वेळ चढाई केल्यावर अमोलला त्याची बॅग जड वाटायला लागली म्हणून त्याने सगळ्यांना थांबवून त्याच्याकडच्या भुईमुगाच्या शेंगा संपवण्याचा प्रस्ताव राखला, एकमताने तो संमतही झाला आणि सगळ्यांनी पायवाटेच्या बाजूला थोडी मोकळी जागा बघून शेंगांचा फडशा पाडला. थोडावेळ तिथेच गप्पा मारल्या आणि निघालो.
झाडीतून डोकावणारा गोरखगड
झाडीतून डोकावणारा गोरखगड
आता थोडी खडी चढाई सुरु झाली. रास्ता काहीसा निसरडा झाला होता त्यामुळे चढणे कठीण वाटू लागले त्यात भाजून काढणाऱ्या उन्हाने भर घातलेली.आम्ही चढत असताना काही ट्रेकर्स उतरत होते त्यामुळे अजूनच उशीर होतं होता. धापा टाकत, मधेमधे थांबत कसेतरी दुसरा टप्पा पार करत होतो तेवढ्यात हळूहळू सूर्य नाहीसा झाला आणि खाली दिसणारा परिसर धूसर होत गेला. चौखूर उधळलेले ढग आमच्या बाजूने येताना दिसले आणि अचानक पावसाचा शिडकावा सुरु झाला, थोड्याच वेळात तो धोधो बरसू लागला आणि उन्हामुळे कासावीस झालेले आम्ही आणि इतर अनेक ट्रेकर्स 'धन्य धन्य' झाल्याप्रमाणे भिजू लागलो. निसरडी वाट चढून झाल्यावर थोडी सपाटी लागली आणि तिथून समोर दिसणारे अहुपे घाट आणि परिसराचे दृश्य मात्र मंत्रमुग्ध करणारे होते. प्रचंड कातळाच्या या अभेद्य भिंतीवरून पांढऱ्या शुभ्र पाण्याचे अनेक धबधबे वाहत होते आणि त्याच्या पार्श्वभूमीवर वाऱ्याच्या वेगाने धावणारे ढग त्यात भर घालत होते. पाऊस पडत असतानाही सगळ्यांनी फोनच्या कॅमेऱ्यात फोटो काढले आणि थोडा वेळ तिथेच समोरील दृश्याचा आस्वाद घेत थांबलो थोड्या वेळाने पुढे येणाऱ्या काळ्या पाषाणावरच्या चढाईसाठी मानसिक तयारी करीत चालते झालो.
काळ्या पाषाणावरच्या चढाईची सुरुवात होण्यापूर्वीच गोरक्षनाथांची समाधी लागते(धोधो बरसणाऱ्या पावसामुळे फोटो काढता आले नाहीत). तिथून खरा कस लागणार होता. हळूहळू पाषाणातल्या ताशीव पायऱ्या लागल्या आणि तेव्हाच सगळ्यांना पुढे काय वाढून ठेवलेय याची कल्पना आली. आतापर्यंत सगळ्यांना हि चढाई इतर किल्ल्यांसारखीच असेल असे वाटले होते पण हा अंगावर येणारा सुळका त्याचे खरे रौद्र रुप आता दाखवायला लागला होता. आम्ही हळूहळू, एकमेकाला सहारे देत पाठीवरच्या बॅगांचे ओझे सांभाळत चढत होतो. अमोल आणि मी पुढे जात मोर्चा सांभाळण्याची जबाबदारी उचललेली होती, तसेही बहुतेक जण आता ट्रेकिंगला सरावले असल्याने विशेष धास्ती नव्हतीच पण नव्यांच्या मनात नक्की काय येत असेल याची मला काळजी. कारण त्यांच्या पहिल्याच ट्रेकला मी त्यांना इथे आणले होते. पण सगळे काळजीपूर्वक तो उभा कातळ चढून आले. समोरच कातळात कोरलेला असलेला एक दरवाजा आहे तो पार करून कातळाच्या चढाईचा एक टप्पा पार केला आणि थोडावेळ तिथे थांबायचे ठरले. हे मधेमधे थांबणे फक्त चारीबाजूंचे देखावे न्याहाळण्यासाठी होत होते. गडाच्या चारही बाजूंनी ढग वाहात जात होते आणि मधेच मुसळधार पावसाच्या सारी झोडपून काढीत होत्या. क्षणार्धात खाली सगळी दिसणारी दाट झाडी गुडूप व्हायची. अहुपे घाटाच्या अंगाखांद्यावरून वाहणारे ते धबधबेही तीतकेच नयनरम्य.
थोडावेळ पाऊस थांबला आणि सगळ्यांनी इथेच जेवण उरकून घेण्याचे ठरवले, तसेही वर लेण्यांमध्ये प्रचंड गर्दी असणार हे कळून चुककले होते, म्हटलं त्यात पुन्हा आमची भर नको(आता माझ्या पाठीवरलं ओझं कमी व्हावं हि माझीही विच्छा होऊ लागली होतीच म्हणा). तडक सगळ्यांनी सोयीस्कर जागा पकडून गडावरच्या माकडांना सुगावा लागण्याच्या आत शिदोरी वाटून घेतली आणि खायला सुरुवात केली. खाऊन झाल्यावर पुन्हा थोडा वेळ गप्पा मारल्या आणि पुढच्या चढाईसाठी सज्ज झालो. आता गडाचा अर्धा सुळका पार केला होता आणि पुढला रास्ता आणखी भेदक वाटत होता आणि खाल बघितल्यावरही तसाच तीव्र उतार छातीत धस्स होण्यास पुरेसा होता.
अंगावर येणारा सुळक्याचा चढ.
त्यात सोसाट्याच्या वाऱ्याने भर घातली, मला या ट्रेकला येण्याआधी विशाल भाऊ आणि नयनशी केलेला संवाद आठवला, तेव्हा विशाल भाऊ हसत म्हणाला होता कि 'जाताना सैल कपडे घालून जाऊ नको नाहीतर वाऱ्याने उडून जाशील', ते शब्द मात्र आता खरोखर पटले. हळूहळू, पायांना हाताच्या घट्ट पकडीची जोड देत हाही टप्पा पार केला आणि लेण्यांच्या आधी असणाऱ्या थोड्या सपाट जागेवर भरपूर फोटो काढले(इतके कि सागराला वर्षभर पुरतील डीपी ठेवायला).
फोटोसेशन्स...
जेवढं उंचावर जावं ठेवढा समोरचा अहुपे घाट जास्त भेदक आणि तेवढाच सुंदर दिसत होता. आता लेण्यांपाशी आलो आणि बघतो तर तिथे प्रचंड गर्दी. मला वाटते फक्त आम्हीच अख्खा रस्ता थांबत थांबत, मजा घेत आलो होतो कारण बरीचशी गर्दी घाईघाईत चढून इथेच खोळंबा करून राहिली होती. त्यातल्या दोन ग्रुपचे तर एक दोन सदस्य त्यांच्यापासून खूप मागेही राहिले होते बहुदा, कारण शोधाशोध चालू होती. लेण्यांजवळ आम्हीही बराच वेळ थांबलो आणि समोरच्या सुळक्याचे दृश्य बघत बसलो. क्षणात ढगांमध्ये हरवून जाणारा हा सुळका पुन्हा आकाशाला भेदीत आपल्या रौद्ररूपाने सगळ्यांच्या मनावर गारुड घालून जात होता. पावसाळा बऱ्यापैकी स्थिरावल्याने त्यावरील गवतही वाढल्यामुळे वार्याबरोबर डोलत त्याला साथ देत होते. डोळ्यांचे पारणे फेटणाऱ्या त्या दृश्याने आमच्यातील प्रत्येकालाच इथवर येण्यासाठी झालेल्या कष्टांचा विसरायला लावत होते. पण आमच्या जुन्या भिडूंपेक्षाही मला सोनाली, विशाल आणि तुषारच्या चेहऱ्यावर दिसणारे भाव जास्त सुखावणारे होते. पुढच्या ट्रेक्स साठी वाढणाऱ्या सदस्यसंख्येची ती नांदी होती.
समोरील सुळक्याची रूपे....
घन ओथंबून येती...
आता आमच्यापैकी जास्त कुणाला अजून वर जायचे नव्हते, इथवर आलो तेच खूप झाले आणि इथेच थोडावेळ थांबावे अशी सगळ्यांची इच्छा होती. तेही बरोबरच होते कारण गडाच्या शिखरावर जाणारा चिंचोळा रस्ता ट्रेकर्सने भरून वाहत होता त्यात चढणारे आणि उतरणारे ट्रेकर्स यांचा गोंधळ चालू होता. अश्याने ते जास्त धोकादायक वाटत होतं. मनाला मुरड घालत यशस्वी माघार घेण्याचे ठरवले आणि अजून थोडा वेळ लेण्यांपाशी थांबून चार वाजेल परतीला निघालो.
उतरतानाही तोच थरार...
उतरतानाही काळजीपूर्वक आणि पायऱ्यांचा नीटसा अंदाज घेत तो कातळाचा टप्पा पार केला आणि मजल दरमजल करत चढताना घेतलेल्या प्रत्येक थांब्याशी पुन्हा पुन्हा थांबत, या दृश्याला मनात साठवत गप्पा मारत उतरते झालो. तासाभरात पुन्हा पायथ्याच्या मंदिराशी येऊन थोडा वेळ शांत बसलो आणि आता परतीच्या प्रवासाचे आखाडे बांधू लागलो.
महेशला लांज्याला परतायचे होते आणि त्याची ट्रेन रात्री ठाण्याहून होती म्हणून त्याने मुरबाडहून कल्याणला बसने आणि पुढे ठाण्यापर्यंत लोकलने जायचे ठरवले. विशाल आणि तुषार बाईकने पुन्हा अंधेरीला जाणार होते आणि आम्ही बाकीचे एकत्र टिटवाळामार्गे घरी येणार होतो. वाटेत योगेश पडघ्याला आमच्यापासून वेगळा होऊन शॉर्टकटने घरी जाणार होता. आता लवकरात लवकर मुरबाड गाठायचे म्हणत सगळे निघालो, गडाला मागे टाकत. परततानाही गाडीच्या आरश्यांतुन दिसणाऱ्या त्या अभेद्य सुळक्यावरून नजर हटवणे मुश्किल होत होतं. कधीतरी कुठल्याश्या वळणावर मात्र तो झाडीत गुडूप झाला आणि आता घराची ओढ जाणवायला लागली.
मुरबाडला सगळ्यांनी गरमागरम वाडा पाव आणि चहा हणाला, महेशला आणि तुषार-विशालला निरोप दिला आणि लवकरच भेटू म्हणत आपापल्या बाईक हाणायला सुरुवात केली.
आणखी एक ट्रेक मोहीम व्यवस्थित, ठरल्या वेळात आणि सुरक्षितपणे पार पडली होती.
उतरून पायथ्याच्या मंदिराशी आलो तेव्हाच नव्या सदस्यांचे साभिनंदन केले आम्ही, अर्थातच ते करण्यासारखे काहीतरी त्यांनी केले होते. दर वेळी नखरे करणारी स्वाती यावेळी आघाडीवर होती, तिचंही कौतुकच. माझी 'सौ' सरिताला यावेळी योगेशच्या 'सौ' सोनालीने साथ दिली, सगळ्यात छोटी असलेली दीपाली अख्ख्या ट्रेकमध्ये मस्त एन्जॉय करताना दिसली, सागरने तिला खास सांभाळून घेतले(ना घेऊन सांगतो कोणाला, त्याचे फोटोज तिनेच काढून दिले ना). विकासने मित्रांबरोबरच 'भुशी डॅम'चा रद्द केलेला बेत सार्थकी लागला असे मला तरी त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. अमोलने मला चांगली साथ दिली त्यामुळे मला नेहामोच पार्टनर वसंताची उणीव भासली नाही. तुषार विशालही पहिल्यांदा येऊनही ग्रुपमध्ये छानशे मिसळले.
तिसऱ्या दिवशी विशालने फोन केला होता. छान झाली ट्रिप म्हणाला. पाय दुखतात का रे विचारलं तर म्हणाला कि 'थोडेसे दुखातायेत', खरंतर सगळ्यांचे पाय दुखत होते, खासकरून जिने उतरताना. ते नेहमीच दुखतात ट्रेक नंतर, पण यावेळचं दुखणं थोडं वेगळं वाटलं मला, 'अंगावर मिरवण्यासारखं'!
प्रतिक्रिया
26 Jul 2017 - 11:15 pm | दुर्गविहारी
मस्तच!!!!फोटो कातिल आलेत. वर्णनही मस्त.
आधी ईथे तितकी गर्दी नसायची. पण हल्ली कुठल्याही किल्ल्यावर सुट्टी च्या दिवशी गर्दी असतेच.
पण पावसाळ्यात बघायचा हा किल्ला नव्हे आणि नवख्याना अशा ठिकाणी नेताना विचार करा. रोप वगैरे साधनेही तुमच्याकडे दिसत नाहीत. पावसाळ्यात पायर्या विलक्षण घसरड्या होतात. त्यामुळे सुळक्यावर गेला नाहीत हा योग्य निर्णय.
पुढच्या भटकंती च्या धाग्याच्या प्रतिक्षेत.
27 Jul 2017 - 9:51 am | इरसाल कार्टं
सल्ल्यासाठी मनापासून धन्यवाद.
आता वर्दळ वाढली असल्याने पायऱ्यांवर निल अजिबात नव्हती पण गर्दीमुळेच अरुंद पायऱ्यांवर चढण कटीं वाटत होत. आदल्या दिवशी गडावर वस्तीला असलेल्या एका ग्रुपने शिखरावर जाणाऱ्या रस्त्यावर दोर बांधून ठेवला होता पण एवढ्या गर्दीत अजून आमची भर नको म्हणून आम्ही ना जाणे पसंत केले.
26 Jul 2017 - 11:35 pm | धडपड्या
आता खास भटकंती साठी वाड्यावर मुक्कामी कट्टा करण्याचं घ्या मनावर....
फोटो लैच भारी...
27 Jul 2017 - 9:52 am | इरसाल कार्टं
या मस्त कोहोजवर नाहीतर एखाद्या तळ्याकाठी वस्ती करू.
27 Jul 2017 - 8:19 am | सोंड्या
मस्त भटकंती झालीये. घरापासून फक्त 9 किमी असुनही एकदाच जाण झालंय. बाजूच्या सुळक्याला मचिंद्रगड नाव आहे. पण त्यावर कोणी चढाई करत नाही.
वाट आहे की नाही माहित नाही पण जुनी माणसं बोलतात वर टोपल्याएवढे मोठे भुंगे आहेत :) .कोणी चढाई केली असेल तर माहिती द्यावी.
27 Jul 2017 - 1:39 pm | स्वच्छंदी_मनोज
ह्या सुळक्यावर चढाई करता येते. पुर्वीही लोकांनी ती केलेली आहे पण कठीण श्रेणी आणी टेक्नीकल क्लाईंब मुळे सहसा ह्याच्या वाटेला कुणी जात नाही.
27 Jul 2017 - 1:16 pm | इरसाल
एकाकी रस्ता आणी एकाकी सुळका लाईकण्यात आला आहे.
27 Jul 2017 - 1:16 pm | इरसाल
शेअर पावला बरं का :))
27 Jul 2017 - 10:02 pm | इरसाल कार्टं
हा हा हा
27 Jul 2017 - 1:37 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्तच लिखाण आणि व्रुत्तांत. असेच ट्रेक करत राहा.
पुढच्या ट्रेकला शुभेच्छा.
27 Jul 2017 - 5:37 pm | सिरुसेरि
मस्त लिखाण , ग्रुप , ट्रेक आणी फोटो
27 Jul 2017 - 7:23 pm | कंजूस
इथेही मी एकटाच गेलेलो पण पहिला टप्पा पाय्रांचा चढून एक बुटका दरवाजा लागतो तिथूनच परत फिरलो. सोबत असणाय्रा एका ग्रुपमधील मुलांनी सांगितले या वरती तुमची बॅग घेतो परंतू मला गरगरायला लागले होते. खालच्या देवळातल्या एका सेवेकय्राने माझ्याशी गप्पा मारून चहा दिला होता. पण कोरा चहा मला काही नाही म्हणता आले नाही. सवय नव्हती. शिवाय त्या पाय्रा पाहून माझ्या लक्षात आले आपण इथे वारंवार सहज चढू शकणार नाही.
पुढे एकदा जिवधन घाटघर वाटेने पावसात दोर न लावता चढलो पण भयानक धोकादायकच.
27 Jul 2017 - 9:06 pm | दुर्गविहारी
स्वताची मर्यादा ओळखणे हिच जातीवंत भटक्याची खूण. योग्य निर्णय घेतलात काका.
27 Jul 2017 - 9:58 pm | इरसाल कार्टं
100% पटलं.
28 Jul 2017 - 7:04 pm | दिलीप वाटवे
व्वा,भन्नाट भटकंती. मलाही देहरीतुन एकदा गोरख करायचाय. आम्हा पुणेकरांना आहुपेमार्गे गोरखगड पाहणं सोईचं होतं त्यामुळे मी आहुप्यातुन भैरवनाथ दार या अतिशय अवघड घाटवाटेने उतरुन गोरख केला होता आणि परत आहुपे घाटाने चढुन आहुप्याला गेलो होतो.
30 Jul 2017 - 1:01 am | बॅटमॅन
किल्ला अवघड दिसतोय. अलीकडे जरासुद्धा निसरडे दिसले की अंमळ काँप्लेक्सच येतो- आपले बूट इथे टिकतील का?
30 Jul 2017 - 1:18 am | शलभ
मस्त लिहिलंय..
30 Jul 2017 - 5:54 am | निशाचर
हिरवाई आणि डोंगरकड्यांचे फोटो मस्तच आलेत. वर्णनही आवडलं.