ये कश्मीर है - दिवस नववा - १७ मे (अंतिम भाग)

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
23 Jul 2017 - 8:46 pm

आज आमचा काश्मीरमधला शेवटचा दिवस. आमचे परतीचे विमान ११:५५ ला होते, तेव्हा लवकर उठायची काही गरज नव्हती. आम्ही आरामात उठलो. हाउसबोटीतला आमचा शेवटचा चहा घेतला आणि सज्ज्यात बसून सरोवरात येजा करणारे शिकारे न्याहाळत बसलो. श्रीनगरमधले आमचे सगळे मुक्काम हाऊसबोटींमधेच होते. आतमधे असलेल्या सजावटीमधे अधिक-उणे असले तरी आम्ही राहिलेली प्रत्येक हाऊसबोट सुंदरच होती. आमची आजची हाऊसबोट देखील साधी असली तरी कमालीची आकर्षक होती.

दिवाणखाना आणि त्याला लागून असलेला भोजनकक्ष

शयनकक्ष १

शयनकक्ष २

प्रवासात शेवटच्या दिवशी का कोण जाणे पण मन उदास होते. ही सगळी मजा, हा आनंद आज संपणार हा विचार निश्चितच सुखावह नसतो. भारताचे हे नंदनवन सोडणे आमच्याही जिवावर आले होते, पण काय करणार, जाणे भाग होते. आम्ही आस्तेकदम सकाळची आन्हिके उरकली, बॅगा भरल्या आणि पुन्हा पुन्हा एकमेकांच्या खोलीत जाऊन काहीही घ्यायचे राहिले नाही याची खात्री करून घेतली. हाऊसबोट मालकाचा हिशोब चुकता केला आणि सज्ज्यात येऊन आम्हाला किना-यावर पोचवणा-या शिका-याची वाट पाहू लागलो. ते नगिन सरोवर, त्या हाऊसबोटी, ते शिकारे, ते टपोरे गुलाब मी एकवार शेवटचे पाहून घेतले. अखेर शिकारा आला, सामान त्यात चढले आणि आम्ही निघालो.

श्रीनगर विमानतळावर दहशतवाद्यांचा मोठा धोका असल्याने सुरक्षेचे `पुख्ता इंतजाम` असतात. तुमच्या सामानाची तपासणी तुम्हाला जवळजवळ ३०० मी आधीच करावी लागते. आम्ही ती करून घेतली. विमानतळावर फक्त आम्हालाच प्रवेश होता, अर्थात आमचा काश्मीरी दोस्त सज्जादचा निरोप घेण्याची वेळ आलेली होती. नेहमी हसत राहणारा, आमच्या प्रत्येक प्रश्नाला न कंटाळता उत्तर देणारा, आम्ही जे म्हणू ते ऐकणारा आणि किंमती वस्तू असलेली माझी बॅग मागे राहिली हे कळताच तत्काळ गाडी वळवून ती सुसाट दामटणारा सज्जाद आता चालक राहिला नव्हता तर आमचा मित्रच झाला होता; त्याचा निरोप घेताना सगळ्यांनाच खूप वाईट वाटले. आम्ही त्याचे राहिलेले पैसे नि त्याची बक्षिसी दिली आणि `पुन्हा भेटू` म्हणत त्याचा निरोप घेतला. नंतर स्वत:ची तपासणी करवून घेतली आणि विमानतळावर प्रवेश करते झालो.

बारा वाजले, बाराचे एक झाले, पण आमचे दिल्लीकडे जाणारे विमान निघायची काही चिन्हे दिसेनात. दिल्लीहून पुण्याला जाणारे आमचे विमान साडेपाचचे होते, तेव्हा या विमानाला खूपच उशीर झाला तर पुढे परिस्थिती अवघड होऊ शकली असती. (पुढचे विमान ह्याच कंपनीचे होते, ही एक जमेची बाब होती.) चौकशी केल्यावर असे कळाले की दिल्लीवरून येणारे विमानच पुन्हा आम्हाला घेऊन दिल्लीला जाणार होते. जर येणारे विमानच अजून यायचे होते तर जाणारे विमान जाणार कसे?

शेवटी सव्वा वाजता ते विमान आले. लोळावळ्याला जाणारी लोकल आज पाऊण तास उशीराने धावत आहे हे ऐकणा-या प्रवाशाला पुणे स्टेशनकडे जाणारी ती लोकल जेव्हा शिवाजीनगर स्थानकात दिसते तेव्हा त्याला जो आनंद होतो तोच आम्हालाही झाला. `चला विमान आले तर खरे, आता निघेलही लवकर` आम्ही स्वत:शी म्हणालो. आणि पंधरा मिनिटात `प्रवाशांनी विमानात बसून घ्यावे` अशी उद्घोषणा झालीही. पावणेदोन वाजत विमान निघाले. जम्मूत थांबून आम्ही शेवटी दिल्लीला पोचलो तेव्हा चार वाजून गेले होते. विमानतळाशेजारच्या एका हॉटेलात आम्ही चार घास पोटात ढकलले आणि `सुरक्षा जांच` करून गेटवर पोहोचलो तर विमान कर्मचारी आमचीच वाट पहात असलेले आम्हाला दिसले. विमानाकडे जाणा-या बसची शेवटची फेरी चालू होती आणि तिच्यात फक्त आम्हीच होतो. `आयला, आपल्यासाठी विमान थांबवून ठेवलेय की काय?` असा विचार येऊन आम्हाला उगाचच अवघडल्यासारखे झाले. अर्थात थोड्याच वेळात एका मराठी कुटुंबाने बसमधे प्रवेश करून हा बहुमान आपल्याकडे घेतला.

असो. शेवटी एकदाचे विमान उडाले आणि आम्ही दिल्लीचा निरोप घेतला. ऋशिकेष का कुठेतरी एका कॅंपसाठी गेलेल्या मुलामुलींची एक टोळी विमानात होती. त्यांनी विमानात अक्षरश: उच्छाद मांडला होता. समोरच्या मुलाला टपली मार, इकडेतिकडे टोप्यांची फेकाफेक कर, हवाई सुंदरीला बोलवण्याचे बटन पुन्हापुन्हा दाब, असे हे त्यांचे प्रकार पाहून माणूस मर्कटापासून जन्मला आहे या विधानाची सत्यता पटत होती. अखेरीस दोन तासांनी आम्ही पुण्यात पोचलो तेव्हा घड्याळात आठ वाजत होते. विमानातून बाहेर पडताच उष्म्याने आणि विमानतळातून बाहेर पडताच वाहनांच्या गर्दीने आमचे स्वागत केले. विमानप्रवासाचे हे असे असते. रेल्वेप्रवासात, आपण जाऊन आलो त्या ठिकाणची नशा हळूहळू उतरते; त्यामुळे तिचा त्रास होत नाही. विमानप्रवासात ही नशा खाडकन उतरते आणि मोठा झटका बसतो. असो. ब-याच वेळाने आम्ही एकदाचे घरी पोचलो तेव्हा साडेनऊ तरी झाले असावेत.

दुस-या दिवशी मी आयटी हमाल या पदावर कसा रुजू झालो आणि सॉफ्टवेयरची ओझी पुन्हा आपल्या खांद्यावर कशी वाहू लागलो हे वाचण्यात ना तुम्हाला स्वारस्य आहे ना लिहिण्यात मला! तेव्हा, इति लेखनसीमा!

प्रतिक्रिया

मोदक's picture

23 Jul 2017 - 10:56 pm | मोदक

भारी झाली लेखमाला.

पुढील प्रवासासाठी शुभेच्छा आणि नवीन लेखमालेच्या प्रतिक्षेत.

नीलमोहर's picture

25 Jul 2017 - 3:57 pm | नीलमोहर

आवडली लेखमाला, बरीच माहिती मिळाली,
काश्मीरला जायचं आहेच, मात्र दल सरोवर ज्या प्रकारे खराब केले जातेय ते पाहता हाऊसबोट मध्ये रहायची
इच्छा राहिली नाही आता, असो.
अजून अनेक प्रवास आणि लेखमालांसाठी शुभेच्छा..