दीड शतकी सायकल सफर २०जुले२०१७
मागच्या महड सायकल सफरीच्या वेळी जुन्या मुंबई पुणे रस्त्याने जात असता खालापूर पाली असा एक फलक पाहिला होता. तेव्हाच पाली ची राइड करायचा किडा डोक्यात वळवळला होता. नक्की कसे जायचे याबद्दल थोडा गोंधळ होता मनात. एक मार्ग खोपोली वरुन तर एक खालापूर वरुन असे दोन रस्ते माहीत झाले होते. गुगल बाबाने अंबरनाथ ते पाली हे अंतर ८७ किमी दाखवले होते.मागे डोंबिवलीतील एका सायकल ग्रुप ची पाली राइड दोन दिवसांत केल्याची पोस्ट पाहिली होती. तो ग्रुप दर वर्षी ही राइड करतो असेही समजले होते.
या आठवड्यात सुटीचे दिवस होते गुरु व शुक्रवार. आणि शनिवारी ऑफीस च्या लोकांसाठी तिकोना किल्याचा ट्रेक. म्हणजे शुक्रवारी एव्हढी मोठी राइड करून शनिवारी ट्रेक करणे कठीण होते. पण योग होता या राइडचा.
मंगळवार बुधवार ची रात्र पाळी अचानक रद्द झाली व बुधवारी दुपारीच कामावरून सुटका झाली त्यामुळे गुरुवारी मोठी राइड शुक्रवारी आराम व शनिवारी ट्रेक असे नवे वेळापत्रक तयार झाले. येऊ शकतील अशा मित्र मंडळीना बेत कळवला. पण यावेळी सोलो राइड चा योग असावा. काही बाही कारणांमुळे कोणीच येऊ शकत नव्हते, असो एकला चलो रे हेच खर. तसं पाहिलं तर सायकल पटू कधीच एकटा नसतो, सायकल ही त्याची सर्वात विश्वासू साथीदार असते कि कायम सोबतीला.
बुधवारी घरी येताच सायकल ची तपासणी केली, पाठपिशवीतले आवश्यक सामान तपासले. पहाटे चार चा गजर लाऊन, चक्क दहाच्या आताच गुडूप झालो.गजराच्या आधीच जाग आली नेहमीप्रमाणे. घराबाहेर पडलो व लक्षात आले कि मोबल्याची battery बँक विसरलोय. आता घरच्या मंडळीना उठवावे लागणार म्हणून स्वत:वरच चरफडत बेल दाबली, सौ ने लगेच आणून दिली, व रेनकोट घेतला आहेस ना असा प्रश्न केला, होss असे खोटेच सांगून सटकलो, अर्थात हे खोटे तिला तासाभरातच समजणार होते, खुंटीवर तो मस्त सुखत ठेवलाय हे पाहून. सुखु दे बापडा उगाच त्याला सर्दी वगैरे व्हायची अशा पावसात भिजला तर.
उदवाहन बंद ! मग सात जीने उतरत जमिनीवर आलो. सोसायटीचा पहारेकरी गाढ झोपेत होता, फाटक उघडताना त्याची नाराजी लपली नाही. मागच्या राइड पेक्षा आज चित्र वेगळेच होते. चंद्राची कोर काळ्या कुट्ट ढगांमधून डोकावण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. जाम खुश झालो ते पाहून, आज झिम्माड असणार दिवसभर. एकेका नगरसेवकाचा उद्धार करत खड्डे ओलांडत पाईप लाईन रोड गाठला एकदाचा. strava सुरु केले. मोबल्या सुरक्षित कोरडा राहील असा ठेवला व सुसाट निघालो,आता फारसे खड्डे नाहीत, रहदारी नाहीच व रस्ता पाठ. वांगणी गेलं तेव्हा पुढचा दिवा हि बंद केला. आज ही मोराची केकावली ऐकू आली पण बघायला वेळ नव्हता, थांबलो तो एकदम भिवपूरीलाच. इथे थांबावच लागत. पाटील काकांशी दोन शब्द बोलण्यासाठी, सायकल प्रवासात जोडलेल्या माणसांपैकी हे एक कुटुंब. डेअरीचा व्यवसाय. असाच एकदा थांबलो असताना झालेली ओळख. आता स्नेहात रुपांतर झालेली, माझ्या पाठीवर उडालेला चिखल बघून काकांच्या मुलाने आपणहून मडगार्ड ला एक प्लास्टिक ची पिशवी बांधली, माझी पोटपूजा होईपर्यंत. काकानी पाण्याची सीलबंद बाटली पुढे केली, ती मात्र नाकारून,तुमच्याकडचे साधे पाणी द्या,असे सांगितले, उन्हाळ्यात एक दोन वेळा गार पाणी घेतले होते आज त्याची गरज नव्हती, पैसे वगैरे विचारायची सोय नसते इथे. काकांच्या मुलाने खालापूर वरुन कसे जायचे याचे ही मार्गदर्शन केले. चिखलाची मला तमा नव्हती पण असुदे एव्हढया प्रेमाने बांधली आहे ती असे म्हणून निघालो. निघाल्यापासून मस्त पाऊस होता अगदी सतत. दुसरा थांबा घेतला तो चौक फाटा आला तेव्हा.strava अजून तरी नीट सुरु होते, नाष्ट्यासाठी हॉतेल मध्ये शिरलो तेव्हा वेटर माझ्या ध्यानाकडे पाहून हसला. हसणारच ओला चिंब व पाठीवर डोक्यापर्यंत उडालेला चिखल. पटापट नाष्टा उरकला, एक मस्त पान घेतले पानाच्या ठेल्यावर अर्धे तोंडात व अर्धे बांधून खिशात. नाक्यावर डुक्कर रिक्षा उभ्या होत्या, एकाला विचारले पाली इथून किती ? ५० पकडा,रस्ता चांगला आहे जाल आरामात असे सांगून माझा हुरूप वाढवला. आता तर हाय वे ने जायचे होते काही किमी,वेग अजूनच वाढला, त्यात पावसाने हि थोडी विश्रांती घेतली होती . खालापूर आले सुद्धा, वळलो. रस्ता खरोखरच चांगला होता. दहावीस खड्ड्यांचा अपवाद वगळता. आपल्या रस्त्यांवरील मैलाचे दगड हा एक विनोदी प्रकार आहे, एक दगड सांगतो पाली ३० दुसरा २८ परत तिसरा २९. मला तर पुलंच्या म्हैस मधले हवालदार आठवले,पंचनामा करताना एकच अंतर प्रत्येक वेळी वेगळे मोजणारे. असो, एकदाचे २७ व २६ पाठोपाठ आले मग मात्र पटापट कमी होत गेले पुन्हा पावसाचा जोर वाढला. जांभूळपाडा आला, अंबा नदी दुथडी भरून वाहात होती, एका दुर्घटनेची आठवण आली, याच नदीवर पनवेल गोवा हायवे वर पंचवीस तीस वर्षांपूर्वी काही वाहने वाहून गेली होती ,त्यात एका मित्राचे निधन झाले होते, विठ्ठल सोमण, आपण जशी गाणी गुणगुणतो तसे क्रिकेट च्या धावत्या सामालोचानाचे उतारे म्हणायचा,क्रिकेट चा निस्सीम चाहता. स्मरणशक्ती ही अजब चीज आहे केव्हा काय आठवेल याचा नेम नसतो.
रस्त्याला बर्यापैकी चढ उतार होते व झाडी ही. काही वेळा पावसाची काळोखी इतकी दाट होत असे व त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठे वृक्ष,एखाद्या गूढ कथेतील वातावरणाचा भास व्हावा असेच सगळे. पाली ला पोहोचे पर्यंत जवळजवळ पूर्ण वेळ पाऊस होताच,कधी मुसळधार तर कधी रिप रिप तर कधी भूस पडल्या सारखा.
एका हार पेढे वाल्या दुकानाशी सायकल लावली. strava पाहिले ८५.१ तेथेच बंद करून ठेवले.. एक फोटो काढला. मोबल्या जिवंत राहणे अत्यावश्यक होते, माझ्या सुरक्षा प्लानचा तो महत्वाचा घटक होता.घरी पालीला पोहोचल्याचे कळवले. यायला साडेसात होतील असे ही सांगितले. दुकानदाराशी थोडे बोलून सायकलला सुरक्षित केले व दर्शनासाठी गेलो. गर्दी नव्हतीच, थोडे लांब थांबूनच नमस्कार केला कारण पाठीवरचा चिखल. आत दोन सुरक्षा रक्षक होते ,त्यांनी काका या आत असे सांगितले मग गेलो थोडा आत. पुन्हा नीट दर्शन घेतले.सायकल पाशी आलो, दुकानदाराने त्याच्या मित्रांसाठी चहा मागवला होता,एक कप मलाही दिला, प्रसाद म्हणून पेढ्यांची दोन पाकिटे घेतली, बारा वाजले होते आता इथेच जेवण घ्यावे असे वाटले, दहा रुपयाच्या कुपन मध्ये महाप्रसाद होता पण आपल्या शेजारी बसणाऱ्या माणसाला पाठीवरच्या चिखलामुळे जेवण नकोसे होईल म्हणून ते टाळले व तडक हॉटेल गाठले. गरमागरम राईसप्लेट मिळाली. जेवेपर्यंत मोबाईल हि थोडा चार्ज केला.
आता ८५ किमी जायचे होते, थकवा जराही नव्हता व पोट ही भरले होते. फार न दामटता सावकाश जाऊ लागलो. मगाशी एका डोंगराने लक्ष वेधले होते पण ढगांमुळे फोटो घेतला नव्हता,आता जरा उघडीप होती एक मस्त सेल्फी काढला सुळक्यांच्या पार्श्वभूमीवर.
मग मात्र वेग वाढवला. परत पावसाला सुरुवात झाली जोरदार. काळ्याभोर रस्त्यावर पडून थेंब उसळत होते मला तर असा भास होऊ लागला कि हा रस्ता नसून लांब लचक बाथरूम आहे व त्यात मी अस्मी मस्त शॉवर बाथ घेतोय. जाम मजा येत होती सायकल चालवायला. पाली फाटा केव्हा आला ते समजलेच नाही. एका टपरीशी थांबलो,दोन केळी द्या असे सांगितले मावशीला,तीने तीन दिली. १० रुपये फक्त, तीन ही गेली पोटात सहज. मावशीने चौकशी केली तिच्या प्रश्नांना उत्तरे देऊन सटकलो. आता एक बर्यापैकी चढ होता हे माहीत होते,शांतपणे पार केला, खालापूर ला आलो, चहाची टपरी दिसली मस्त चहा घेतला. आता थोडा हायवे चा प्रवास,मग चौक फाटा ते चार फाटा व चारफाटा ते अंबरनाथ असे तीनच टप्पे राहिले. हायवे वर अनेक ठिकाणी करटूलं घेऊन आदिवासी बसले होते. एक दोन ठिकाणी काकडी,पडवळ, शिराळी होती, नको उगाच ओझं पाठीवर म्हणून नाही घेतली. चौक फाटा आला, खिशातल्या पानाची आठवण आली. विसरलोच होतो. चौक फाटा ते चार फाटा हे अंतर पानाचे चर्वण करता करता केव्हा पार झाले ते समजलेच नाही. आता पाऊस सतत पडत नव्हता पण जी सर यायची ती जोरदार. भिवपुरी ला आलो, पाटील काकाना प्रसाद दिला पाणी भरून घेतले चहाचा आग्रह झाला पण नको म्हणून निघालो. एक जोरदार सर आली ती थांबत्ये तो वांगणी आलं मस्त भजीचा वास आला. थांबलो गरम भजी व चहा झाला. ३२ रुपये , हे ही नेहमीचे ठिकाण. वरचे दोन रुपये सुटे नसल्याने माफ. पुढचा दिवा केव्हा राम म्हणेल याची खात्री नव्हती दुसरा होताच पाउच मध्ये तो ही फिट केला मागचा सुरूच केला आता केव्हाही अंधार पडेल उगाच रिस्क नको. मग मात्र न थांबता अंबरनाथ गाठले.घरी पोहोचलो तेव्हा ०७:२५ झाले होते. १७० किमी ची ओलीचिंब राइड करून मन एकदम तृप्त झाले होते.इतक्या वर्षांच्या ट्रेकिंग मध्ये ही एव्हढा मनसोक्त भिजलो नव्हतो तेव्हढा आज भिजलो. पावसाने व भिजण्यातल्या आनंदाने अंतर्बाह्य.
भटक्या खेडवाला
प्रतिक्रिया
21 Jul 2017 - 8:38 pm | sagarpdy
मस्त राईड, मजा आली वाचून.
21 Jul 2017 - 9:28 pm | प्रशांत
लेख आणि राइड मस्तच
21 Jul 2017 - 8:47 pm | डॉ श्रीहास
तुमच्यासोबत एक लंबी राईड मारायची आहे राव _/\_
21 Jul 2017 - 9:39 pm | शलभ
मस्तच राईड आणि खूप छान लिहिलय..
21 Jul 2017 - 9:44 pm | मोदक
झक्कास हो..!!!
21 Jul 2017 - 10:13 pm | धडपड्या
क्या बात है काका... जबरदस्त राईड..
आम्ही पंखे आहोत तुमचे...
तुमची लिखाणशैली नेहमीच आम्हालाही तुमच्या सोबत सफर घडवून आणते...
21 Jul 2017 - 10:34 pm | इरसाल कार्टं
पेरणा तुमच्याकडे वास्तव्यास राहणार असे दिसते पावसाळाभर.
21 Jul 2017 - 10:41 pm | दो-पहिया
खूप छान वर्णन.
22 Jul 2017 - 2:00 am | एस
नेहमीप्रमाणेच भारी!
22 Jul 2017 - 6:53 am | जेम्स वांड
मस्तच, तुमची सायकल जाड चाकांची आहे काय? एमटीबी का काय असतं ते? जास्त जाड टायर असल्याने जास्त दमायला नाही होत?
22 Jul 2017 - 9:25 pm | भ ट क्या खे ड वा ला
मध्यम जाड आहेत .
हायब्रिड सायकल आहे .
Scott sub cross 40 2017 असे मॉडेल चे नाव आजे
22 Jul 2017 - 8:10 am | अरिंजय
राईड पण मस्त आणि वर्णन एकदम झकास. सुरसुरी व्हाय लागली आता.
22 Jul 2017 - 8:15 am | झेन
शहरी लोक जराशा पावसाला वैतागतात तूम्ही कमाल आहात. पावसात १७० किलोमीटर ? मान गये बॉस. परत एवढं छान वर्णन लिहीण्याएवढा उत्साह.
22 Jul 2017 - 11:46 am | मित्रहो
पावसातल्या सायकलींग मधे काही वेगळीच मजा असते. बाकी १७० किमी पावसात आणि तेही सोलो मान गये.
22 Jul 2017 - 12:18 pm | नितीन पाठक
राईड मस्त आणि
लेख तर लय भारी .............
धन्य
22 Jul 2017 - 2:22 pm | कपिलमुनी
22 Jul 2017 - 5:55 pm | प्रविन ९
खुप छान....