१२ जुलै ची कोरडी शतकी सायकल सफर.

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in भटकंती
13 Jul 2017 - 10:40 pm

१२ जुलै ची कोरडी शतकी सायकल सफर.
जुलै उजाडल्या पासुन मना सारखी सायकल चालवायची संधी मिळत नव्हती .. २५/४० किमी च्या एक दोन किरकोळ राईड वगळता अर्धा जुलै गेला तरी फार काही झालं नाही सायकलिंग .त्यात दोन दिवस गिरिमित्रात गेले . अर्थात सत्कारणी लागले ते दोन्ही दिवस .. ट्रेकिंग , सेलिंग , सायकलिंग मधले दिग्गज , व अनेक गिरिमित्र व जाणते सायकलिस्ट यांचा सहवास , अनुभव ऐकायला मिळाले .
काल आज सुटी होती , कालचा दिवस संसारी कामे व विश्रांती यात गेला, आज मोठी राईड करायची संधी मिळाली .
बेत आधीच ठरवला होता , कालच सायकलची तपासणी व तेल पाणी करुन तयार ठेवली .
अशा ऑड डे ला येउ शकतिल अशा चार पाच जणाना बेत कळवला होता .
मागच्या वेळी ६ जण जमलो . आज फक्त दोनच .
अनुपमा व मी .
सकाळी साडेपाच ला घर सोडले ,सहज आकाशाकडे पाहीले तो शुक्राची चांदणी व किरकोळ पांढरे ढग , या शिवाय काही नव्हते ,तेव्हाच शंका आली आजची राईड कोरडी ठरणार . हुतात्मा चौकात आलो तेव्हा, एका अद्यात वाहना खाली ,हुतात्मा झालेल्या ,गणपतीच्या वाहनाच्या पार्थिवाचा, समाचार घेत असलेला एक कावळा, चाकात येता येता वाचला ,बहुधा कावळा जखमी असावा अथवा पिल्लू असावे .किंवा सर्वात चवदार भाग त्याच्या चोचीत असावा.
प्रथमच असा अनुभव आला . हे पक्षी कायम सावध असतात .असो .
माझ्या पाठोपाठ अनुपमा ही हजर झाली , मग थांबायचे कारण नव्हते अजुन कोणी येत नाही ना याची खात्री करुन व स्ट्राव्हा सुरु आहेना याची खात्री करुन नेट बंद केले .
मोबल्या प्लास्टीक ने वेढून पाउच मध्ये घातला व टांग मारली .
पहीला थांबा वांगणी असे ठरवुन दोघं ही सुसाट निघालो .
वांगणी ला पोहोचलो तेव्हा स्वच्छ दिसु लागले होते .
पाउस नाही पण ढगाळ हवा होती . थोडी पोटपुजा केली जवळच्याच खाउ ने . पाणी बाटली घेतली व निघालो .
आज रफी आशा , रफी लता होते सोबतीला .
शेलू व नेरळ च्या मध्ये आलो तो मोराची केकावली ऐकू आली . गाणी बंद केली व उजवीकडे पाहीले , तीन चार लांडोरी व एक मोर दिसला .. मोबल्या काढे पर्यंत गायब झाले सर्व .
भिवपुरी ला आलो , नेहमीच्या दुकानात पाच मिनिटे थांबलो ,काही घ्यायचे नव्हतेच आज. पाटील काकांच्या मुलग्याने माहीती दिली कि पळसधरी वरुन जाणारा रस्ता जाम खराब झालाय ,तुम्ही चौक रस्त्याने जा ,थोडे अंतर वाढेल पण रस्ता बरा आहे
काका ना रामराव करुन निघालो सुसाट.
चारचौक आला सुद्धा कर्जत चा . वाजले होते सव्वा आठ फक्त .
खलबत्ता चिकन चे “कोकणी हॉटेल” अजुन उघडले नव्हते त्याच्या फलकाचा फोटो काढला व निघालो ते थेट बाबा डेअरी ला जाउन थांबलो ,आता नाष्टा करावासा वाटू लागला होता.
मिसळ तयार होतीच .
घरी फोन केला , येताना जमलं तर बाबा डेअरीतुन ताजं पनीर आण अशी आद्य्ना मिळाली ..
आज दुपारी जेवायला येत नाही हे आधीच सांगितले होते .
तेव्हा दुपारच्या पोटपूजेची तयारी करायची होती . मघाशी जो नंबर घेतला होता त्या कोकणी हॉटेल ला फोन केला व दोन खलबत्ता चिकन थाळी ची नोंदणी केली ,साडेबारा पर्यंत येतो असे ही सांगितले.
बाबाडेअरी सोडली तेव्हा साडेनऊ झाले होते .
ह्या रस्त्याच्या उजव्या बाजूला प्रसिद्ध एन डी देसाई स्टुडिओ व तसेच पूढे गेलं कि मोरबे धरणाची भिंत व त्या भिंतीवर दुरवरुन पहारा करणारा इर्शाळ गड दिसतो .
ढग फारसे नव्हतेच त्यामुळे इर्शाळ चा दाता सारखा आकार स्पष्ट दिसत होता . फोटो चा मोह व्हावा असे दृष्य होते .
e
पूढे एका फार्म हाउस चा फलक ही दिसला त्यावर टुथ माउंटन फार्म हाउस अशी अक्षरे होती ..
हे इर्शाळ गडाचे आधुनिक नाव .
कर्जत पळसधरी रस्ता खड्डे असल्याने टाळला होता ,तरी कर्जत चौक रस्त्यालाही बऱ्यापैकी खड्डे आहेतच.
एक दोन खड्यानी तर जेल पॅंट ची ॲसिड टेस्ट ही घेतली.
थोडं ॲसीड चुरचुरलच एक दोन वेळा .
चालायचच असं म्हणत त्याकडे दुर्लक्ष करत सायकली दामटत राहीलो .
हायवे आला सुद्धा .
वळलो डावीकडे .. आता हायवे वेगाने जाउ लागलो .
पावसाचा पत्ता नव्हताच व आता तर उन ही पडले चक्क.
केव्हा एकदा महड येते असे झाले होते .
कारण या बाजूने गेल्यास अंतर जास्त आहे याची कल्पना होती पण नक्की किती जास्त हे कोणताच फलक सांगत नव्हता .
एकदाचा फलक दिसला . महड ३. ७ किमी .
आपोआपच वेग वाढला दोघांचाही .
काळजीपूर्वक हाय वे ओलांडत महड रस्त्याला लागलो .
कमानी जवळ फोटो काढले .
जीथपर्यंत सायकल नेउ दिली जाइल तीथपर्यंत न्यायची व एकाने सायकल ची राखण व एकाने दर्शनासाठी जायचे असे ठरवले . भक्तीच्या बाजारात आज चतुर्थी असल्याने तेजी दिसत होती , शोभिवंत दुर्वा व लाल फूलांचे हार छान दिसत होते .
b
मी थांबलो , अनुपमा दर्शनाकरिता गेली ती रांगेचे दर्शन घेउन परतली .
दोन थंडगार सोलकढी घेतल्या व परतीच्या प्रवासाला सुरुवात केली .
एक दीवसाच्या राईड चा हा सर्वात कंटाळवाणा भाग असतो लक्ष गाठल्यावर परत फिरण्याचा .
पण त्याला इलाज नाही. परत फिरण्यापुर्वी स्ट्राव्हा बघीतले ५९ .६ दाखवत होता आकडा . लगेच त्याचा स्क्रिन शॉट घेतला , काय भरवसा या स्ट्राव्हाचा मध्येच थांबले तर ?
आताही दोघांच्या रेकॉर्डिंग मध्ये फरक दाखवत होताच .
पुन्हा हायवे ला लागलो .
अस्मीच्या पुढच्या चाकात जरा हवा कमी वाटु लागली .
सावली पाहून थांबलो , भर लावली थोड्या हवेची व निघालो .
हायवे ओलांडला व परत चौक कर्जत रस्ता धरला .
बाबा डेअरी शी थांबलो .
पनीर ची चौकशी केली , तीन तास टिकेल का असे विचारले गल्ल्यावरच्या माणसाला, एसी गाडी असेल तर टिकेल नाहितर या हवेत खराब होइल असे सांगितले . आमच्या सायकली आहेत हो एसी नाहीत त्या, असे हसत हसत सांगुन तेथून सटकलो
वाटेत एका रस्त्यावरच्या दुकानाने लक्ष वेधले, मातीची सुबक भांडी,अगदी पाण्याची बाटली ही मातीचीच, सुरई,टोप असे बरेच प्रकार होते, आता अशा नाजूक वस्तू सायकलवरून कशा नेणार म्हणून ,नेहमी असता का अशी चौकशी केली व येईन परत असे सांगून निघालो. एखादी स्पेशल डिश अशा मातीच्या भांड्यात करायला मजा येईल नक्कीच
dukan
. परत एक दोन ॲसीड टेस्ट वाले खड्डे चुकवत उताराला लागलो ते थेट चार चौका आधीच्या कोकणी हॉटेल पाशीच थांबलो .
अगदी घरगुती स्वरुपाचे हे छोटेखानी हॉटेल आहे .
मालक रमाकांत जाधव व सौ जाधव
घरगुती पध्दतीचे शाकाहारी व मांसाहारी जेवण
d
दोन स्त्री व दोन पुरुष कामगार
वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सात
मिसळही छान मिळते
खलबत्ता चिकन ही स्पेशालीटी.
९३७३६०६०५७ / ९२०९९९१८७९
हॉटेल चा कारभार वहीनीच बघतात .
आहे का खलबत्ता चिकन अशी विचारणा करताच ,सकाळी फोन वरुन तुम्ही दिली होती का ऑर्डर ? असा प्रतीप्रश्न आला . हो आम्हीच ते . मग आहे .
मग जाधव वहिनी व अनुपमा यांच्यात रेसीपी चर्चा सुरु झाली .. हात धुवे पर्यंत ताटे तयार ही झाली .
भाजलेल्या सुख्या खोबऱ्याचा मस्त परिमळ जाणवताच भूक चाळवली गेली.
छान चव होती व आपुलकी ही
तरीही मिपाकराना फोटो लागतोच याचे भान ठेवत फोटो काढला व समाचाराला सुरुवात केली .
चतुर्थीला दिर्घ प्रवास करुन देवस्थानाला भेट दिल्याने काही पुण्य जमा झालेच असेल चुकुन माकून ते
चतुर्थीलाच चिकन खाउन परत शुन्यावर आणले .
नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी
सुटीच्या दिवशी सायकल हाणी
असे काहीसे मनात आले ..
c
जेवण होतय तो पर्यंत रमाकांत जाधव शेट आलेच .
काही व्यक्ती अशा असतात कि प्रथम दर्शनीच जाणवते याच आपलं छान जमणार . रमाकांत त्याच पैकी एक निघाले .
छान गप्पा झाल्या . आम्हालाही अशा मस्त जेवणानंतर लगेच सायकलिंग करायचे नव्हतेच त्यामुळे वेळही होता .मग गप्पातुन आमचा एक कुटुंब मित्र गौतम वैद्य कर्जत याचा उल्लेख रमाकांत ने केला .
नव्हे लगेच फोनच लावला गौतम ला .
गौतम शी बोललो , अरे हा रमाकांत एकदम राजा माणूस आहे अशीच सुरुवात केली गौतम ने . चला आपले अनुमान बरोबर निघाले याचे समाधान वाटले . गौतम म्हणाला थांबतोस का पाच मिनिटात येतो मी , नको म्हणालो, अजुन ३५/४० किमी जायचय सायकल ने , परत येइन तेव्हा सांगेन तुला असे बोलून फोन रमाकांत कडे दिला . हॉटेल चा कारभार वहीनीच पाहतात , ऱमाकांत व त्यांची मुलगी दोघानाही गायनाची आवड आहे. एक साप्ताहिक ही छापतात व स्थावर मिळकतीचा ही व्यवसाय आहे .
माणूस रसिक व दिलदार आहे
पुन्हा एकदा मित्राना घेउन येइन असे श्री व सौ जाधव याना सांगुन निरोप घेतला .
a
आतातरी पाउस यावा अशी अपेक्षा करत पायडल मारु लागलो .
आता घाई नव्हती , अंतर आवाक्यात होते ..
थोडी पावसाची मेहरबानी झाली असती तर मजा वाढली असती .
नाही म्हणायला चार थेंब शिंतडले . शेलू ला चहा साठी थांबलो . तेव्हढ्यात पडला नेमका थोडासा पाउस .
पण आता उन नव्हते व वारा ही होता त्यामुळे अगदी सहज सफर सुरु होती .
२८ मार्च ला याच रस्त्याने हीच राईड केली तेव्हाची आठवण झाली .. प्रचंड उन्हाळा होता तेव्हा ,एक एक लिटऱ पाणी एका वेळी दोघांत फस्त करत होतो .
आज मात्र काहीही त्रास न होता सहज पणे १३० किमी पुर्ण झाले .
ही राईड २८ मार्च ला केली होती पुन्हा करायचे ठरवले तेव्हा ,काही निरीक्षणे करायचे ठरवले होते .
मुख्य म्हणजे २८ मार्च व १२ जुलै यातला फरक
तोच परिसर तोच रस्ता पण पावसाने काय सुंदर फरक पडतो सर्व चराचरांत, खरच पाण्याला जीवन हे नाव किती समर्पक आहे. दुसरे निरीक्षण स्वत: बाबतचे, मोठी राइड करताना नेहमी हाताला मुंग्या येतात, परवाच कुठेसे वाचले होते कि पकड चुकीची असेल तर असे घडते, आज मुद्दामहून हात मोजे घातले नव्हते, व थोड्या थोड्या वेळाने हातांची पकड बदलत राहिलो, एकही मुंगी फिरकली नाही आज, चला एक नवीन तंत्र शिकायला मिळाले, अजून सायकलिंग मध्ये बरंच आहे शिकण्यासारखे आपल्याला याची जाणीव झाली. .
f
भटक्या खेडवाला.

प्रतिक्रिया

वा! भारी भटकता तुम्ही! सायकलिंग करताना मलाही तळहाताला मुंग्या जाणवतात बरेचदा. हातमोजे घालतोच, पण आता हे पकड बदलत राहण्याचं तंत्र शिकून घेतलं पाहिजे.

मोदक's picture

14 Jul 2017 - 7:58 am | मोदक

या ग्रिप वापरा..

.

हे बार एंड्सही वापरून बघा..

.

भ ट क्या खे ड वा ला's picture

14 Jul 2017 - 6:03 pm | भ ट क्या खे ड वा ला

सायकल घेतली तेव्हा दुकानदार बोलला होता , या सायकल च्या ग्रीप्स चांगल्या आहेत , ग्लोव्ह्ज न घालता ही जमेल ..
आता ते पटलंय .

दो-पहिया's picture

14 Jul 2017 - 6:55 am | दो-पहिया

खूप छान. मध्ये मुंबई पुणे राईड केली तेव्हा बराचसा हाच रस्ता होता. त्यामुळे त्याच्या आठवणी जाग्या झाल्या.

नेट बंद करून strava चालवल्यास अचूकता कमी होते असा माझा अनुभव आहे.

कंजूस's picture

14 Jul 2017 - 8:45 am | कंजूस

कोणत्या फोनात?

प्रशांत's picture

14 Jul 2017 - 7:19 am | प्रशांत

भटकंती आणि लेख मस्तच

आमच्या सायकली आहेत हो एसी नाहीत त्या, असे हसत हसत सांगुन तेथून सटकलो

सायकल वरच्या भटकंतिची मज्जा औरच

बरेच दिवस झालेत शतकी राइड झाली नाही पुढच्या विकांतला प्लान करतो

मोदक's picture

14 Jul 2017 - 7:46 am | मोदक

झक्कास वृत्तांत.

खलबत्ता चिकनची नोंद घेण्यात आली आहे

पाऊस आला तर रेनकोट? स्पीड कमी होतो?

भ ट क्या खे ड वा ला's picture

14 Jul 2017 - 6:05 pm | भ ट क्या खे ड वा ला

पूर्ण भिजायच्या तयारीनेच जातो ,त्यामूळे रेनकोट खुंटीलाच असतो . फक्त मोबल्या पैसे गाणी ऐकायचे साधन कोरडे ठेवायची व्यवस्था करतो

भ ट क्या खे ड वा ला's picture

14 Jul 2017 - 6:06 pm | भ ट क्या खे ड वा ला

पूर्ण भिजायच्या तयारीनेच जातो ,त्यामूळे रेनकोट खुंटीलाच असतो . फक्त मोबल्या पैसे गाणी ऐकायचे साधन कोरडे ठेवायची व्यवस्था करतो

भ ट क्या खे ड वा ला's picture

14 Jul 2017 - 6:06 pm | भ ट क्या खे ड वा ला

पूर्ण भिजायच्या तयारीनेच जातो ,त्यामूळे रेनकोट खुंटीलाच असतो . फक्त मोबल्या पैसे गाणी ऐकायचे साधन कोरडे ठेवायची व्यवस्था करतो

भ ट क्या खे ड वा ला's picture

14 Jul 2017 - 6:06 pm | भ ट क्या खे ड वा ला

पूर्ण भिजायच्या तयारीनेच जातो ,त्यामूळे रेनकोट खुंटीलाच असतो . फक्त मोबल्या पैसे गाणी ऐकायचे साधन कोरडे ठेवायची व्यवस्था करतो

तोंडावर पाऊस मारू नये म्हणून वाइजरवाले हेल्मेट?

स्थितप्रज्ञ's picture

14 Jul 2017 - 9:13 am | स्थितप्रज्ञ

हापिसातल्या खुर्चीवर बसल्याबसल्या १३० किमी सायकल चालवून आल्यासारखे वाटले. नशीब पाऊस नाही आला नाहीतर भिजलो असतो :P
आमच्या गावाला असतात तर ऑड डे ला मस्त गट्टी जमवता अली असती. असो.
बाकी लेख मस्तच! इथून प्रेरणा घेऊन सोमवारी असच काहीतरी करीन म्हणतो!

भ ट क्या खे ड वा ला's picture

14 Jul 2017 - 6:07 pm | भ ट क्या खे ड वा ला

गाव कोणता

स्थितप्रज्ञ's picture

15 Jul 2017 - 5:01 pm | स्थितप्रज्ञ

पुणे

भटकीभिंगरी's picture

14 Jul 2017 - 9:38 am | भटकीभिंगरी

खुप छान वर्णन आणी फोटो ...
अनुभव समृद्ध आणि प्रेरणादायी ..
शतकांची घोडदौड अशिच चालत राहो ..

देशपांडेमामा's picture

14 Jul 2017 - 10:00 am | देशपांडेमामा

तुमचे लेख म्हणजे मेजवानी असतात वाचायला ! _/\_

देश

भ ट क्या खे ड वा ला's picture

14 Jul 2017 - 6:10 pm | भ ट क्या खे ड वा ला

खूप ऐकलय तुमच्या बद्दल चांगल .
एकदा भेटायची इच्छा आहे .
सायकलिंग बद्दल काही नवे शिकायला मिळेल तुमच्याकडून

भ ट क्या खे ड वा ला's picture

14 Jul 2017 - 6:10 pm | भ ट क्या खे ड वा ला

खूप ऐकलय तुमच्या बद्दल चांगल .
एकदा भेटायची इच्छा आहे .
सायकलिंग बद्दल काही नवे शिकायला मिळेल तुमच्याकडून

कलंत्री's picture

14 Jul 2017 - 5:00 pm | कलंत्री

पुण्यात सायकल वाले कोणी आहे का?

मिपाचे सरपंच, देशपांडे मामा, स्थितप्रज्ञ, अंजनेय, आनंदराव, शैलेंद्र, शेफ केदार, अमित M, किरण कुमार, मंदार आठवले, नाजुक पाटील, सेनाकर्ते, सागर पाध्ये

अशी लै लै लोकं आहेत..!

मोदक दादा सहित वरील सर्व जण हे गुरु, महागुरु लोकं आहेत

सुधांशुनूलकर's picture

16 Jul 2017 - 6:36 pm | सुधांशुनूलकर

असेच सायकलत राहा, शतकं मारत राहा आणि त्या भ्रमंत्यांचे असेच मस्त, खास 'विनायकी टच' असलेले वृत्तान्त लिहीत राहा.

(तुमच्याबरोबर एखाद कि.मी. सायकल चालवण्याची अ‍ॅम्बिशन असलेला) सुधांशुनूलकर

मित्रहो's picture

18 Jul 2017 - 2:24 pm | मित्रहो

तुमची शतकी राइड मस्त झाली. राइड, देवदर्शन (दुरुन का असेना) आणि चिकन सार काही एकाच राइड मधे. मस्त

एकच राइड दोन वेगवगेळ्या मोसमात करण्यात वेगळीच मजा असते.