बाफळीची भाजी

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in पाककृती
5 Jul 2017 - 6:44 pm

पावसाच्या सुरवातीला मिळणारी ही अजून एक रानभाजी. या दिवसात जांभळी नाक्यावर अशा अनेक भाज्या विकायला आलेल्या असतात. लालसर देठ आणि त्याच्या टोकाला कात्र्या कात्र्याची हिरवीगार पाने म्हणजे बाफळी. बाफळीची भाजी वातहारक असते. आमच्याकडे काम करणाया मावशी सांगतात त्याप्रमाणे याच्या बियांपासून तेल बनवतात. ते असो पण याची भाजी मात्र एकदम फर्मास लागते .
1

2

साहित्य:
बाफळीच्या दोन जुड्या ( मी दोन आणल्या पण अजून चार सहा तरी आणायला हव्या होत्या ही रूखरूख लागलीच )
दोन माध्यम आकाराचे कांदे ( बारीक चिरून)
पाऊण वाटी बेसन
४ ५ लसूण पाकळ्या (ठेचून)
एक चमचा ओवा
एक चमचा मोहरी
एक चमचा हळद
एक चमचा किंवा हवं तर अधिक तिखट
दोन चमचे तेल
चवीपुरतं मीठ

3

आधी बाफळीची पानं देठापासून खुडून घ्यावी. स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. एका टोपात पाणी उकळत ठेवावे उकळल्यावर त्यात ही चिरलेली भाजी टाकावी. सुमारे सात आठ मिनिटे उकळल्यावर गॅस बंद करावा. थंड झाल्यावर भाजी चांगली पिळून घ्यावी. ( ही भाजी पिळून घेण्याची पद्धत आमच्या मावशींची.)

4

कढईत तेल तापलं की त्यात मोहरी, ओवा लसूण घालावा.

5

लसूण लालसर झाला कि कांदा परतून घ्यावा. तो लालसर झाला की हळद, तिखट घालावं . त्यात ती पिळलेली भाजी घालावी . भाजी जरा परतली की त्यात बेसन पेरावं, मीठ घालून ढवळावं. झाकण ठेऊन चांगली वाफ काढावी. की झाली झुणक्यासारखी खमंग भाजी तयार . गरमागरम भाकरीबरोबर ही भाजी मस्त लागते.

6

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

5 Jul 2017 - 6:55 pm | मुक्त विहारि

जास्त कडू असते का?

कधी खाल्ली नाही, म्हणून विचारले.

प्राची अश्विनी's picture

5 Jul 2017 - 7:14 pm | प्राची अश्विनी

कडूपेक्षा उग्र असते.

वाह ! मेथीची करेन किंवा केल ची ही पाकृ वापरुन. तेलाचा कावळा/ बुधला फार आवडला.

प्राची अश्विनी's picture

6 Jul 2017 - 2:03 pm | प्राची अश्विनी

:)

प्राची अश्विनी's picture

6 Jul 2017 - 2:17 pm | प्राची अश्विनी

:)

नूतन सावंत's picture

5 Jul 2017 - 9:32 pm | नूतन सावंत

मस्त लागतात पावसाळी भाज्या,पण प्रतिसादातील फोटोच दिसतो आहे,बाकीचे नाही दिसत.

रुपी's picture

6 Jul 2017 - 12:40 am | रुपी

मस्तच दिसत आहे भाजी.
दुसरा फोटो फार आवडला.

१) पाणी पिळून न घेतल्यास** पित्त वाढते डोके दुखते.
पर्याय तेल गरम करून त्यात पाने परतायची.
२)बेसनासह थोडे उकडलेले वाल चांगले लागतात.
(** सर्वच पावसाळी भाज्यांस लागू. )

प्राची अश्विनी's picture

6 Jul 2017 - 1:48 pm | प्राची अश्विनी

ओक्के, हे माहिती नव्हतं.
सोडे किंवा गोलमा घालून पण छान लागते.

कविता१९७८'s picture

6 Jul 2017 - 2:14 pm | कविता१९७८

मस्त

वा वा. जांभळी नाक्यास जाणे प्राप्त आहे.

भाजी आळून फार कमी होते असं दिसतंय. तेव्हा जास्त जुड्या आणलेल्या चांगल्या.

पाकृसाठी धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jul 2017 - 2:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं दिसतेय ! लहानपणी अनेक प्रकारच्या पावसाळी रानभाज्या खाल्ल्या आहेत, पण ही नाही खाल्ली.

शहरीकरणाच्या प्रक्रियेत आपण स्थानिक जैववैविध्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतो आहोत. काही वर्षांनी अश्या अनेक पावसाळी भाज्यांचे नावही ऐकू येणार नाही असेच दिसते आहे. :(

.....स्थानिक (नैसर्गिक) जैववैविध्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतो आहोत. "

+ १

त्रिवेणी's picture

6 Jul 2017 - 3:16 pm | त्रिवेणी

पहिल्यांदाच बघितली ही भाजी.
पुण्यात उणे य का ही भाजी, कधी दिसली नाही.

पुण्यातल्या लोकांना पावसाळी भाज्या कशाशी खातात हेच माहीत नसावं. मी तर टाकळा, कवळा, फोडशी, कंटोळी पण पाह्यली नाहीत कधी इथे.

अजया's picture

6 Jul 2017 - 10:15 pm | अजया

आता घरुन येताना ज्या मिळतील त्या आणुन देते तुला पावसाळी भाज्या. नऊ दहा प्रकार आहेत. एकेक प्रकार कातकरणी घेऊन बसतात. सगळ्यात शेवटी टाकळा दिसतो. कर्टोली सुरु झाली. भारंगी आली असेल आता.

पैसा's picture

6 Jul 2017 - 6:04 pm | पैसा

ही भाजी दुसर्‍या काहीतरी नावाने सुद्धा मिळते बहुतेक.

अजया's picture

6 Jul 2017 - 10:11 pm | अजया

आमच्या गावात येणाऱ्या पावसाळी भाज्यांमध्ये ही नेहमी दिसते. कशी करतात माहित नव्हते. आता आणुन बघेन.

स्वाती दिनेश's picture

16 Jul 2017 - 12:45 pm | स्वाती दिनेश

दिसते आहे भाजी.
टाकळा, भारंगी, शेवळं, कर्टुली,परवलं अशा अनेक पावसाळी भाज्या आठवल्या.
स्वाती

वेल्लाभट's picture

17 Jul 2017 - 1:12 pm | वेल्लाभट

चला जांभळी नाका !

ऋतु हिरवा's picture

21 Jul 2017 - 10:11 pm | ऋतु हिरवा

छान आहे. करून बघायला हवी