साहित्य
३/४ कप मैदा
१/४ कप व्हॅनिला कस्टर्ड पावडर
१/३ कप अमूल बटर (साधारण १२५ ग्राम)
१/३ कप पिठी साखर
१/२ टीस्पून अननसाचे इसेन्स [पाईनअँपल इमल्शन]
१ टीस्पून बेकिंग पावडर
१/३ कप टुटी-फ्रुटी
२ ते ३ चमचे काजू तुकडे (मी अक्रोड वापरलं)
२ टेबलस्पून दूध
हैदराबाद मधील कराची बेकरी हि त्यांच्या फ्रुट बिस्कीटस साठी प्रसिद्धच. तीच फ्रुट बिस्कीटस आपण आता घरी बनवू शकतो. मी हि बिस्किटे एअर फ्रयर मध्ये केली. ह्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे हि बिस्किटे खालून लागू नयेत म्हणून कमी तापमानाला भाजून घ्यायची आहेत.
कृती
एका भांड्यात अमूल बटर आणि पिठी साखर चांगली फेटून घ्या. त्यात पाईनअँपल इमल्शन घालून ते एकजीव करून घ्या. ह्यात मैदा, कस्टर्ड पावडर आणि बेकिंग पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
ह्यात ट्युटी फ्रुटी, काजू/अक्रोड तुकडे आणि २ चमचे दूध घालून हे मिश्रण मळून घ्या.
मळलेल्या गोळ्याचा लांब चौकोनी ठोकळा करून, क्लिंग रॅप मध्ये घट्ट गुंडाळून, साधारण २ ते ३ तास फ्रिज मध्ये गार करायला ठेऊन द्या.
ओव्हन वापरत असाल तर तो १४० ला प्री-हिट करून घ्या. एयर फ्रायर १३० ते १४० ला ५ मिनिटे प्री-हिट करून घ्या. फ्रिज मधून ठोकळा बाहेर काढून, क्लिंग रॅप मधून सोडवून, धारधार सुरीने साधारण एक इंच जाडीची बिस्किटे कापून घ्या.
एयर फ्रायर च्या बास्केट ला फॉइल लावून त्यावर हि बिस्किटे ठेवून साधारण ३५ ते ४० मिनिटे बेक करून घ्या. बेक करताना बिस्किटे अधून मधून उलटी करून ती खालून लागत नाहीयेत ह्या कडे लक्ष द्या. ओव्हन मध्ये बिस्किटे साधारण ४५ ते ५० मिनिटे बेक करून घ्या. [सगळी बिस्किटे लावण्या आधी, एखादं भाजून बघा, तापमान खूप असेल तर बिस्कीट खालून लागेल, तसे होते असेल तर तापमान कमी करा]
बिस्किटे भाजून झाली कि बाहेर काढून गार करायला ठेवा. गरमागरम चहा/कॉफी सोबत हि छानच लागतात!
प्रतिक्रिया
30 Jun 2017 - 6:35 pm | वरुण मोहिते
ठरवलंय का लोकांना त्रास द्यायचा :))
बाय द वे फोटो मस्त . त्यात कराची बेकरी ची आठवण . त्यात तुमची पाकृ मस्तच .
30 Jun 2017 - 6:46 pm | इरसाल कार्टं
हाव ना, मीही तेच म्हणतो.
30 Jun 2017 - 6:43 pm | कपिलमुनी
Ditto कराची बिस्कीटे
30 Jun 2017 - 6:49 pm | त्रिवेणी
कहर आहात तुम्ही.
इथे अशा छान छान पाककृती टाकून तुम्ही आमचा मानसिक छळ करत असतात तर तुमचा आयडी बॅन का करू नये.
30 Jun 2017 - 6:50 pm | मुक्त विहारि
"गरमागरम चहा/कॉफी सोबत हि छानच लागतात!"
असे नुसतेच लिहून काय फायदा?
घरी कधी बोलावताय?
30 Jun 2017 - 6:52 pm | मुक्त विहारि
कातील फोटो आणि .... आणि..... आणि ....... वगैरे वगैरे...
30 Jun 2017 - 7:01 pm | अनन्न्या
माझ्याकडे मे महिन्यातली कस्टर्ड पावडर शिल्लक आहे, पहातेच करून!
30 Jun 2017 - 7:58 pm | वीणा३
बादलीभर लाळ गळली :( :(...
अप्रतिम रंगसंगती, सुरेख फोटो + प्रेझेंटेशन. एवढं स्वच्छ नीटनेटके पदार्थ कधी करता येतील देव जाणे !!!
30 Jun 2017 - 8:14 pm | सप्तरंगी
चव डाउनलोड करता यायला हवी..आणि काय सुंदर फोटो असतात तुमचे.
30 Jun 2017 - 9:10 pm | सविता००१
आईशप्पत. कसली भारी दिसतायत.....
30 Jun 2017 - 9:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
आत्ताच जेवण झाल्यानंतरही भूक खवळून टाकाणारा धागा ! :)
1 Jul 2017 - 8:20 am | केडी
_/\_
30 Jun 2017 - 10:18 pm | रुपी
मस्तच!
मला खरं तर केव्हापासून हे करुन पाहायचेत. काजू घालता येणार नाहीत म्हणून केले नाहीत, अक्रोड घालून बघेन. यात अननसाऐवजी काहीजण संत्रेही वापरतात फ्लेवरसाठी.
केडी, यानिमित्ताने आणखी एक विनंती.. तुम्ही बर्याचदा सामीष पाकृंबरोबरच त्यातला निरामिष पर्याय एकत्र टाकता. त्यामुळे माझ्यासारखे शाकाहारी लोक धागा उघडत नाहीत. त्या वेगवेगळ्या टाकल्या तर बरे होईल. :)
30 Jun 2017 - 10:41 pm | केडी
पुढल्या वेळी हे लक्षात ठेवेन...._/\_
1 Jul 2017 - 1:35 am | पद्मावति
खुप खुप मस्तं पाककृती.
केडी, यानिमित्ताने आणखी एक विनंती.. तुम्ही बर्याचदा सामीष पाकृंबरोबरच त्यातला निरामिष पर्याय एकत्र टाकता. त्यामुळे माझ्यासारखे शाकाहारी लोक धागा उघडत नाहीत. त्या वेगवेगळ्या टाकल्या तर बरे होईल
+१ माझं असंच होतं त्यामुळे तुमच्या इतक्या सुरेख पाककृती मिस होतात बरेच वेळा :(1 Jul 2017 - 4:23 am | पिलीयन रायडर
माझं उलटंय. मी केडीचे नाव वाचुन १००% धागा उघडते. फोटोंसाठी. तेव्हा उद्या ह्यांनी कोणत्याही जनावराचे नाव घेऊन धागा काढला तरी मी धागा वाचणारच! ;)
फक्त सध्या हा धागा उघडल्याचा पश्चाताप होतोय, तो जरा निवळु देत...
1 Jul 2017 - 8:19 am | केडी
लोल! :-)
1 Jul 2017 - 1:54 am | स्मिता.
काय आठवण करून दिलीत!!
बिस्किटंही हुबेहूब तशीच दिसत आहेत. मी गुलाबाच्या इसेन्सची खाल्ली आहेत ही बिस्किटं. डबा उघडला की गुलाबाचा सुगंध!!
1 Jul 2017 - 8:02 am | एस
बिस्किटे वगैरे बेकरी आयटेम अजिबात आवडत नसल्यामुळे हा धागा पाहून अज्जिबात जळजळ झाली नाही ;-)
1 Jul 2017 - 8:31 am | इशा१२३
मस्त फोटो !करुन बघण्यात येईल.
1 Jul 2017 - 8:32 am | इशा१२३
मस्त फोटो !करुन बघण्यात येईल.
1 Jul 2017 - 8:32 am | इशा१२३
मस्त फोटो !करुन बघण्यात येईल.
1 Jul 2017 - 11:31 am | मनिमौ
टपकते आहे. मस्त दिसतायत बिस्किटे. मावे मधे करता येतील का?जर करता येत असतील तर टेंपरेचर किती ठेवावे लागेल?
1 Jul 2017 - 12:58 pm | केडी
मावे मध्ये ओव्हन मोड मध्ये १२० ते १३० ला साधारण ४५ ते ५० मिनिटे. (प्रत्येक मावे ची पॉवर वेगळी असते, त्यामुळे तापमान अंदाजानुसार ठेवा, आणि पाकृ मध्ये लिहिल्या प्रमाणे एक ट्रायल बॅच करून बघा).
1 Jul 2017 - 1:55 pm | नीलमोहर
दरवेळेस या आयडीचा धागा आला की पुढील मेंटल टॉर्चरच्या तयारीनेच उघडला जातो, तरीही छळाचे प्रमाण दरवेळी वाढत असते,
तरी कृपया यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा,
( खूप आवडीची बिस्कीटे आहेत ही, धन्यवाद :)
1 Jul 2017 - 7:13 pm | केडी
करून बघा, सोप्पी आहे पाकृ.....
2 Jul 2017 - 12:08 am | पिंगू
पुण्याला येताना तुला फोन करुनच येतो आता..
2 Jul 2017 - 5:42 pm | मदनबाण
आहाहा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राकासी राकासी... ;) :- Rabhasa
3 Jul 2017 - 5:11 pm | तेजस आठवले
छळ आहे नुसता... का हो असे धागे काढता?
हा धागा पाहून मुडदा पण उठून बसेल.
4 Jul 2017 - 11:38 am | अप्पा जोगळेकर
काय त्रास आहे. आजच सकाळी मऊ पडलेली मारी बिस्किटे चहात बुडवुन खाल्ली आणी आता पाहतो तर हे.
4 Jul 2017 - 7:03 pm | सरनौबत
मस्त पाकृ आणि फोटोस नेहेमीप्रमाणेच जबरदस्त.
5 Jul 2017 - 12:16 am | सूड
कहर!!
5 Jul 2017 - 11:54 am | एमी
बिस्कीट तर छान आहेतच पण तुम्ही बनवलेला चहा देखील अगदी मला आवडतो तसा आहे. भरपूर दूध घातलेला आणि फिका.
5 Jul 2017 - 4:45 pm | प्राची अश्विनी
फोटू
5 Jul 2017 - 4:47 pm | प्राची अश्विनी
मस्त बनलीत. मैद्याऐवजी गव्हाचं पीठ एवढाच बदल केला.
5 Jul 2017 - 5:09 pm | केडी
क्या बात है, मस्त! आणि हो, मैद्या ऐवजी गव्हाचं पीठ हा सुद्धा चांगला बदल आहे...
5 Jul 2017 - 9:44 pm | नूतन सावंत
मस्त,मस्त.करून पाहते नक्की.
18 Jul 2017 - 9:08 pm | पियुशा
व्वा मी कधी खाल्ली नाहीयेत पण पाहूनच तोपासू झालाय माझं:)