पिझ्झा.. हा पदार्थ आमच्या पिढीच्या सुदैवाने उशिराने आमच्या आयुष्यात आला. त्यामुळे लहानपण मस्त वरण भात, गरम पोळी तूप साखर, आणि बाहेरचे आवडते पदार्थ म्हणजे वडा पाव, सामोसा, पाणीपुरी आणि भेळ असं खात खात आम्ही मोठ्ठे झालो.
आणि शेवटी ती वेळ आलीच की जेव्हा बाहेरच्या चिमुकल्या जगात पिझ्झा नावाचा नवीन पदार्थ दाखल झाला. त्या काळात पिझ्झा असतो तरी काय याच भयानक कुतूहल लागून राहील होत. बाहेरचा प्रोफेशनल पिझ्झा सगळ्यात पहिल्यांदा खाल्ला तो आयटी कंपनीत कामाला लागल्यावर. कसल्याश्या निमित्ताने आमचा मॅनेजर पार्टी देणार होता. तो नवीन प्रकार त्यावेळी थोडा आवडला होता आणि थोडा आवडला नव्हता पण. म्हणजे त्यावर भरपूर चिली फ्लेक्स आणि टोमाटो सॉस घालून तो खाल्ला म्हणून आवडला, पण त्यातली ओरेगॉनोची चव काही फारशी पचनी पडली नाही कारण पहिल्यांदाच ती चव अनुभवली होती. मग थोडे काळाने ३-४ वेळा पिझ्झा खाल्यावर त्या चवीची सवय झाली, थोडा जास्त आवडू लागला आणि मग हा घरी कसा करता येईल याचा शोध सुरु झाला. मग पिझ्झा बेस बाजारात विकत मिळतो तो आणून त्यावर टोमाटो केचप आणि भाज्या पसरून वरती अमूलच चीज (ते अमुलचे चीझ क्यूब पण त्याकाळी कुतूहलाचा आणि नवलाईचा विषय होते) मनसोक्त टाकून तव्यावर तो बनवायला सुरुवात तर झाली. पण ती चव येईना. त्यावेळी घरात ओव्हन नसल्यामुळे दुधाची तहान ताकावरच भागवावी लागायची.
मग बर्याच वर्षांनी इकडे अमेरिकेत येणे झाले. अमेरिका म्हणलं की बाकी बर्याच गोष्टींबरोबर डोळ्यासमोर येतो तो पिझ्झा. सगळ्यात पहिल्या ट्रीपच्या वेळी रस्टीज पिझ्झा नावाच्या दुकानातला पिझ्झा त्या वेळी खाल्ला होता .. अहाहा काय ती चव वर्णावी राजा. दिल खुश हो गया.
पण सध्या मी राहत असलेल्या भागात ह्या रस्टीज पिझ्झाच एक पण दुकान नाही. आणि इथले लोकल बरेच पिझ्झा चाखून बघितले पण त्यात बिलकुल मज्जा येईना.
मग तो दिवस उजाडलाच की ज्या दिवशी थोडा उत्साह पण होता, हाताशी वेळ पण होता आणि डोक्यात पिझ्झा करावा तोही कणिक मळून बेस करण्यापासून असा विचार पण घोळत होता. झालं, ठरलं आणि मी पिझ्झाची पाककृती शोधायला सुरुवात केली. पिझ्झा करताना तो गव्हाच्या पिठाचा करावा असा कधीचाच विचार केला होता. त्या दृष्टीने बघायला सुरुवात केली. पण मग शंकेखोर मनाने उचल खाल्ली आणि वाटलं पूर्ण प्रयोग फसला तर. नकोच ते. त्यापेक्षा थोडा तरी मैदा वापरू. पण तशी पाकृ कुठे सापडेना. मग मैद्याच्या आणि पूर्ण गव्हाच्या पिझ्झा कृतीचा अभ्यास करून माझ मीच थोडं प्रमाण बदललं आणि पिझ्झा बनवला. चव घेऊन बघितल्यावर "याच साठी केला होता अट्टाहास" याचा खरा अर्थ कळला आणि धन्य जाहले..
तर असा तो पिझ्झा ज्याची साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी खाली दिली आहे.
साहित्य :
पिझ्झा बेस साठी :
२ कप गव्हाचे पीठ (आपण रोजच्या पोळ्यांना वापरतो तेच)
१ कप मैदा किंवा ऑल पर्पज फ्लोर
२ १/४ टी स्पून इन्स्टट यीस्ट (बाजारात याच १/४ oz च पाकीट मिळत ते अख्ख पाकीट )
१ टी स्पून साखर
१ १/४ टी स्पून मीठ
१ १/२ कप कोमट पाणी ( ११०F-१२०F आपण काटामोड असं ज्याला म्हणतो तसं कोमट)
२ टेबलस्पून ओलिव्ह ऑईल
२ टेबलस्पून रवा
(या साहित्यात चार १० इंच व्यासाचे पिझ्झा बेस तयार होतात)
पिझ्झा सॉस साठी :
२ मध्यम आकाराचे टॉमेटो
१ मध्यम आकाराचा कांदा
४-५ पाकळ्या लसूण
१ टेबलस्पून ओलिव्ह ऑईल
१ टी स्पून ओरेगॉनो
१ टी स्पून साखर
१ टी स्पून मीठ
२ टेबलस्पून टॉमेटो सॉस
१/२ टीस्पून लाल तिखट किंवा मिरपूड
टॉपिंग्स साठी :
१ मध्यम आकाराचा कांदा
१ मध्यम आकाराची सिमला मिरची
१०-१२ पाने बेबी स्पीनेच
३ कप मिक्स (मोझरेला चेडर असे वेगवेगळे प्रकार) चीज किसलेलं
कृती :
सगळ्यात पहिले आपण बेस साठी कणिक मळून घेऊ. त्यासाठी कोमट पाण्यात साखर आणि यीस्ट घालून नीट ढवळून विरघळून घेणे. १० मिनिट थांबलो की यीस्ट प्रुफ व्हायला सुरुवात होते आणि या मिश्रणावर चांगलेच बारीक बुडबुडे येतात. ते तसे आले कि समजावे कि यीस्ट चांगले आहे. ते जर आले नाहीत तर ते मिश्रण तसेच फेकून द्यावे कारण यीस्ट जुने झालेले असेल आणि त्याचा काहीही उपयोग नाही. परत नवीन यीस्ट विकत घेऊन मग पुन्हा सुरुवात करावी.
तर यीस्ट अशाप्रकारे चांगले आहे हे कळल्यावर, एका मोठ्या पसरट भांड्यामधे किंवा पराती मधे गव्हाचे पीठ आणि मैदा एकत्र करून त्यात मीठ घालून मधे एक खड्डा करून त्यात ते यीस्ट च मिश्रण हळू हळू ओतून कणिक मळायला सुरुवात करावी. पिठाचा गोळा करून घ्यावा. कणिक फार सैल झाली असेल तर १-२ टीस्पून पीठ टाकून सारखे करून घ्यावे. कणिक फार घट्ट पण नसावी कारण मग पिझ्झा कडकडीत होईल. घट्ट झाली असेल तर १-२ टीस्पून पाणी घालून किंचित सैल करून घ्यावी.
मी नुकताच oster या कंपनीचा हॅण्ड मिक्सर घेतला आहे की ज्याला डोव हूक ची अटॅचमेंट आहे. ती कणिक मळण्यासाठी वापरली. हा हॅण्ड मिक्सर वापरल्यामुळे कणिक मळण्याचे कष्ट थोडे कमी झाले. पण जर हाताने कणिक मळायची असेल तर कणिक साधारण ५-१० मिनिटे तरी चांगली मळून घ्यावी. कणीकेचा गोळा तयार होऊ लागल्यावर त्यात २ टेबलस्पून ऑलिव ऑईल घालावे आणि पुन्हा छान मळून एका मोठ्या बाउल मधे तेलाचा हात लावून वरतून प्लास्टिक क्लिंग रॅपने किंवा ओलसर फडक्याने झाकून काही वेळ ठेवावी जेणेकरून ती फुगून दुप्पट होईल. साधारण १-२ तास ठेवावी लागते. पण हे वेळेचे गणित प्रत्येकासाठी थोडं वेगळ असू शकतं. त्यासाठी महत्वाचे म्हणजे उबदार वातावरण हवे. ज्या ठिकाणी कडक उन्हाळा आहे तिथे १ तासात ती दुप्पट होते. पण माझ्या कडे बेताचाच उन्हाळा होता. त्यामुळे उबदार वातावरण तयार करण्यासाठी मी माझा ओव्हन आधीच १० मिनिटे २००F (९५C) वर तापण्यासाठी चालू करून ठेवला. हा कणकेचा गोळा त्या ओव्हन मधे ठेवून ओव्हन चे दार थोडे उघडे ठेवून दिले. साधारण अर्धा तासाने दार लावून टाकले जेणे करून आतले उबदार वातावरण टिकून राहील. या उपायामुळे साधारण एक सव्वा तासात कणिक दुप्पट झाली. मग त्यावरचे प्लास्टिक काढून त्यात बोट दाबून बघितले तर मोठ्ठा खड्डा तयार झाला याचा अर्थ कणिक छान फर्मेण्ट झाली होती.
आता कणिक फर्मेण्ट होई पर्यंत मधल्या काळात पिझ्झा सॉस करायला एका कढई मधे १ टेबलस्पून ऑलिव ऑईल घ्यावं. ते तापलं की त्यात लसूण बारीक चिरून टाकावी. तिचा रंग बदलला कि बारीक चिरलेला कांदा टाकून गुलाबीसर परतावा. त्यात बारीक चिरून २ टॉमेटो टाकावे. २-३ मिनिटे टॉमेटो छान शिजून कांदा टॉमेटो एकजीव झाला कि त्यात टॉमेटो केचप, ओरेगॉनो, तिखट, मीठ साखर टाकून हलवावं. सॉस गार करत ठेवावा.
आता ओव्हन मधल्या किंवा उबदार वातावरणात ठेवलेल्या कणकेचा गोळा फुगून दुप्पट झाला की या कणकेला चांगले गुद्दे हाणून पुन्हा मूळ आकारात आणायचे. ५-७ मिनिटे परत कणिक बाजूला ठेवायची.
ओव्हन ४८० F (२५० C)(ज्यांच्या ओव्हन ला येव्हढे जास्त तापमानाचे पर्याय नसेल त्यांनी ४००F वर ठेवावे) तापमानावर तापवायला ठेवावा. चांगला अर्धा तास तरी ओव्हन तापला पाहिजे जेणेकरून ओव्हनचा इंचन इंच चांगला तापला असला पाहिजे. यामुळे पिझ्झा छान बेक होतो.
आता कणकेचे चार समान भाग करायचे. त्यातला एक भागाचा गोळा करून घेऊन एका पिझ्झासाठीच्या बेकिंग प्लेट किंवा पिझ्झा स्टोन वर थोडा रवा खाली पसरून त्यावर या गोळ्याला थापून छान गोल आकार द्यायचा. खाली रवा पसरला की कणिक ताटलीला चिकटत नाही आणि बेस छान कुरकुरीत होतो. या गोळ्याचा साधारण १० इंच व्यासाचा आणि १ सेमी जाडीचा गोल थापून त्यावर काट्याचमच्याने भोकं पडून घ्यावीत जेणे करून पिझ्झा भाजताना बेस फुगणार नाही. आता यावर थोडंस ऑलिव ऑईल ब्रश ने पसरावं.
मग टॉमेटो सॉस चा एक पातळ थर पसरावा. त्यावर मुक्त हस्ते किसलेले चीज पसरावे. कांदा सिमला मिरची यांचे साधारण अर्धा इंच जाडीचे तुकडे कापून ते आणि बेबी स्पिनच त्यावर पसरावा. परत थोडं चीज त्यावर भुरभुरावे.
आणि आता हा पिझ्झा ओव्हन मधे ठेवून १०-१२ मिनिटेच वाट पहावी. साधारण १२ व्या मिनिटाला मऊ लुसलुशीत पिझ्झा तयार होतो. जर थोडा क्रिस्पी बेस आवडत असेल तर अजून २-३ मिनिटे ठेवावा. पण त्या पेक्षा जास्त नको. ओव्हन मधून पिझ्झा बाहेर काढून पिझ्झा कटर ने कापून गरमागरम खायला घ्यावा.
हाणा आता .. मारा ताव.. आणि पिझ्झा केलात तर इथे फोटो टाकायला विसरू नका.
काही उपयुक्त टिप्स:
१. पिझ्झा चांगला होण्यासाठी कणिक सुरवातीला छान मळून घेणे गरजेचे आहे. ५-१० मिनिटे पुरेशी आहेत. खूप जास्त पण मळू नये.
२. पिझ्झाच्या वरती अजून वेगवेगळी टॉपिंग्स पण घालू शकता. त्यात ब्रोकोली, अननसाचे तुकडे, मश्रूम, बारीक चिरून लसूण, सन ड्राईड टॉमेटो, ग्रीन ओलिव्ह, ब्लॅक ओलिव्ह, स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न, झुकीनी, हलापिनो असे प्रकार वापरता येतात. नॉनव्हेज खाणाऱ्यांनी त्यावर चिकन, मटण, बॉइल्ड एग्ग्ज असं वापरून बघाव.
पण असं म्हणतात की एका वेळी शक्यतो तिनच अशी (सॉस आणि चीझ वगळता) टॉपिंग्स, जी एकमेकांबरोबर चवीला चांगली लागतील अशी वापरावी. त्यामुळे पिझ्झा बेस आणि सॉस यांची चव पण नीट चाखता येईल. नाहीतर खूप साऱ्या टॉपिंग्स मधे यांची चव हरवून जाईल.
३. पिझ्झा ची कणिक सगळी एकदम वापरायची नसेल तर ती फर्मेण्ट झाल्यावर तिचे गोळे करून प्लास्टिक झिपच्या पिशवीत हवाबंद करून डीप फ्रीजला ठेवा. जेव्हा ती वापरायची असेल तेव्हा १२-१५ तास आधी डीप फ्रीज मधून नॉर्मल फ्रीज च्या भागात काढून ठेवा आणि करायच्या १ तास आधी बाहेर काढून ठेवा आणि मग वापरा. अशी डीप फ्रीजला ठेवलेली कणिक साधारण २-३ आठवडे टिकते.
४. आपल्या बीडाच्या तव्यावर पिझ्झा भाजला तर जास्त छान आणि सगळीकडून सारखा भाजला जातो. मी माझ्या पिझ्झा साठी तोच वापरला आहे.
५. पिझ्झाच्या कणकेमधे भिजवतानाच थोडी ओरेगॉनो आणि लसूण पावडर टाकली तर बेस पण छान चवदार होतो.
प्रतिक्रिया
21 Jun 2017 - 2:40 am | स्रुजा
झकास च जमला की प्रयोग. करुन बघायला हवं...
21 Jun 2017 - 6:18 am | जेम्स वांड
धागा बुकमार्क करण्यात आला आहे, लवकरच हा येळकोट करण्यात येईल. सुंदर फोटो.
27 Jun 2017 - 8:45 pm | सही रे सई
नक्की करा आणि इथे फोटो टाका
21 Jun 2017 - 7:00 am | सविता००१
कसले सुरेख फोटो आहेत.... मस्तच जमलाय. करून पाहीन नक्की. ओव्हन नसल्याने बिडाचा तवा झिंदाबाद.
खरच.. कधी करून पाहीन असं झालं हे वाचून.
खूप खूप सुरेख पाककृती
धन्स
21 Jun 2017 - 7:38 am | सही रे सई
कौतुकाबद्दल धन्यवाद सविता
पण अगं मी ओव्हनच वापरला आहे. नुसता बिडाचा तवा वापरून नाही करता येणार
21 Jun 2017 - 10:05 am | सविता००१
ओके ग. बघते मग सध्या तरी नुसतेच फोटो.......
29 Jun 2017 - 10:25 am | नूतन सावंत
फ्राय पॅननाध्ये होईल,आधी झाकण ठेव 3/4 मिनिटे.नंतर झाकण काढून गॅस मंद करून कर.बाकी तू सुगरण आहेसच,तर गॅस कधी बंद करायचा ते तुला कळेलच.
21 Jun 2017 - 7:34 am | जुइ
सवडीने करून बघेन!
21 Jun 2017 - 6:55 pm | खग्या
नक्की करनार
21 Jun 2017 - 9:51 pm | दशानन
असे असे रेसेपी मला परत एकदा किचन मध्ये जाण्यासाठी प्रेरणा देत आहेत, मागाच्यावेळी 2010 ला गेलो होतो, महान प्रयोग केले होते.. परत सुरू करू काय?
27 Jun 2017 - 8:44 pm | सही रे सई
दशानन, नक्की करून बघा आणि इथे फोटो पण टाका.
27 Jun 2017 - 9:49 pm | दशानन
नक्कीच!
बायको नेमकी माहेरी जात नाही आहे.... आणि आईच्या किचन मध्ये मला प्रवेश नाही :(
लेट्स होप, पुढील महिन्यात काहीतरी कारण काढून बायकोला माहेरी पाठवतोच :P
21 Jun 2017 - 11:45 pm | राघवेंद्र
मस्त दिसत आहे पिझ्झा !!!
थीन क्रस्ट पिझ्झा दिसतोय. :)
21 Jun 2017 - 11:57 pm | सही रे सई
नाही थीन क्रस्ट नाही केला या वेळी. मिडीयम क्रस्ट म्हणू शकता.
22 Jun 2017 - 2:12 pm | पद्मावति
सुंदर पाककृती आणि फोटो.
22 Jun 2017 - 6:17 pm | श्रीरंग_जोशी
पिझ्झा खायला जेवढा सोपा असतो तेवढा बनवायला सोपा नसतो हे आजवर ठाऊक होते. पिझ्झा करुन बघावा असे वाटायला लावणारी पाककृती. फोटो अन वर्णनशैली उत्तम आहे.
पुपाप्र.
22 Jun 2017 - 8:08 pm | सही रे सई
मलाही इतके दिवस असेच वाटायचे कि पिझ्झा करायला फारच अवघड. खासकरून त्याचा बेस.
बेसच्या कणकेचे प्रमाण हुकले तर कडकडीत किंवा मऊ गिच्च गोळा खावा लागतो कि काय असे आणि कणिक मळण्याचे फारच कष्ट असतील असे पूर्वग्रह होते.
पण प्रत्यक्ष केल्यावर जाणवत आहे कि कणकेसाठी जिन्नस प्रमाणात घेतले आणि ५-१० मिनिटे ती नीट मळली कि झाले. महत्वाचे म्हणजे अशी कणिक डीप फ्रीज ला ठेवता येत असल्या मुळे जब मन चाहा पिझ्झा करता येईल हे लक्षात आले.
23 Jun 2017 - 7:27 am | रुपी
मस्तच.. बेस्ट जमला आहे पिझ्झा आणि फोटो पण मस्त! शेवटच्या फोटोतला पिझ्झा एकदम झकास दिसत आहे... फक्त पिझ्झा कटरने जरा फूटेज खाल्लं आहे ;)
आमच्या इथे काही 'देसी' पिझ्झाची ठिकाणे आहेत. त्यातला माझा एक आवडता म्हणजे 'सागर' ;). त्यांनी प्रत्येक पिझ्झाला एकेका बॉलिवूड सिनेमाचे नाव दिले आहे. उदा. छोलेचा टॉपिंगवाला 'शोले' =) तर सागर पिझ्झा म्हणजे 'साग'चा सॉस - सरसो की पालक माहीत नाही, पण बहुतेक पालकच असावा. त्यावर हलापिनो आणि पाइनॅपलचं टॉपिंग. फार मस्त लागतो.
27 Jun 2017 - 8:45 pm | सही रे सई
नोटेड.. पुढच्या वेळी लक्षात ठेवते.
23 Jun 2017 - 7:11 pm | इशा१२३
मस्त!मस्त!
23 Jun 2017 - 7:19 pm | अभ्या..
सही रे सई
23 Jun 2017 - 8:33 pm | सही रे सई
अभ्या .. मान गये उस्ताद .. शब्दांचा सही उपयोग.
धन्यवाद
26 Jun 2017 - 4:24 pm | अत्रुप्त आत्मा
म्म्म्म्म्म्म्म्म! धागा शेव करनेत येत हाये.
27 Jun 2017 - 3:45 pm | धर्मराजमुटके
मस्तच !
27 Jun 2017 - 8:43 pm | सही रे सई
धर्मराजमुटके, अत्रुप्त आत्मा, अभ्या, इशा१२३, रुपी, श्रीरंग जोशी, पद्मावति, राघवेंद्र, दशानन, खग्या, जुइ, सविता००१, जेम्स वांड, स्रुजा आणि ही पाककृती वाचणाऱ्या सर्व मिपाकरांचे खूप खूप आभार.
28 Jun 2017 - 12:12 pm | सस्नेह
पिझ्झा आवडता आहेच. बेस घरी केला नव्हता कधी. आता करून बघेन.
बादवे, चिली फ़्लेक्ष आणि बेसिल्स नामक मसाले घातले नाहीत ?
29 Jun 2017 - 10:30 am | नूतन सावंत
सही ग सही!पिझ्झा बेस आयता आणून नेहमी केलाय पण आता तुझ्या पद्धतीने करून पाहीनच.तुझी लेखनशैली आवडली.आणि स्वयंपाकघरातल्या नवागतालाही जमेल अशा टिप्सहित पाककृती देण्याची पद्धतही आवडली.