ये कश्मीर है - दिवस सातवा - १५ मे

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
20 Jun 2017 - 11:27 pm

मी आधी म्हटल्याप्रमाणे पेहेलगाममधे पहायची ठिकाणे तशी तीनच - बेताब व्हॅली, अबू व्हॅली नि चंदनवारी. आणि ही ठिकाणे पाहण्यासाठी स्थानिक गाडीच करावी लागते. तेव्हा आम्ही आमच्या गाडीने पेहेलगाम टॅक्सी स्टॅंडवर आलो. स्थानिक स्थलदर्शनासाठी मारूती इकोपासून सुमो, स्कॉर्पिओ ते इनोव्हा अशा अनेक गाड्या उपलब्ध होत्या. आम्ही मारूती इको गाडी ठरवली. एक पोरगेलासा तरूण आमचा चालक होता. “प्रत्येक ठिकाण पाहण्यासाठी तुम्हाला फक्त अर्धा तास मिळेल” आम्ही गाडीत बसताच त्याने तुटकपणे सांगितले. आम्ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण का कोण जाणे, तो त्या गोष्टीसाठी फारसा उत्सुक दिसला नाही. मला तरी तो काश्मीरमधल्या चिडलेल्या, संतप्त तरूणांचा प्रतिनिधी वाटला.

पेहेलगामचे रस्ते अरूंद आणि वळणावळणाचे आहेत, पण हे साहेब ज्या वेगाने गाडी चालवत होते ते पाहता चंदनवारी आधी स्वर्गवारी होईल अशी भीती आम्हाला वाटली. (ह्याचे लायसन पुण्याचे असावे काय?)

आमचा पहिला थांबा होता चंदनवारी. प्रामाणिकपणे सांगायचं तर चंदनवारीला सोनमर्गची लहान बहीण म्हणता येईल. बर्फाचा उंचचउंच कडा, आजूबाजूला दिसणारे बर्फाने झाकलेले डोंगर, त्यावरची पाईनची झाडे, बर्फातले स्लेडगाडी वगेरे खेळ हा सगळा मामला इथे होताच, पण इथले एक वेगळेपण म्हणजे पर्वताच्या पोटातून वाहणारा एक ओढा आणि हा ओढा पर्वताखालून वहात असल्याने बनलेला बर्फाचा एक 'पूल'. अर्थात या 'पुला'वर जायला परवानगी नव्हती.

मी चंदनवारीला सोनमर्गसारखे म्हटले असले तरी मला ते आवडले. एक तर आम्ही गेलो तेव्हा इथे लख्ख सूर्यप्रकाश होता. (सोनमर्गमधे आम्ही गेलो तेव्हा वातावरण ढगाळ होते.) आणि दुसरे म्हणजे सोनमर्गच्या तुलनेत इथे स्लेडगाडीवाल्यांचा त्रास बराच कमी होता. आम्ही इथे बराच वेळ रेंगाळलो आणि पुष्कळ फोटो काढले.

पुढच्या आकर्षणाकडे जाण्यासाठी आम्ही गाडीजवळ आलो आणि मगाशी आपण बरोबर नेलेली शाल आता आपल्याजवळ नाही हे माझ्या आईच्या लक्षात आले. तिला पुन्हा वर येणे शक्य नव्हते, तेव्हा तिला खालीच थांबायला सांगून मी पळतपळत वर आलो. आम्ही जिथे थांबलो होतो तिथे पोचलो, पण शाल काही दिसेना. शाल खूप महाग नव्हती, पण अगदीच टाकाऊपण नव्हती. “अरे अशी कुठे गायब झाली शाल?” असा विचार करत असतानाच तिथला एक स्थानिक फोटोग्राफर त्याच्या गळ्याभोवती एक शाल गुंडाळून फिरताना दिसला. त्याला विचारल्यावर त्याने शाल चटकन मला काढून दिली आणि आपण शाल सापडल्यावर तिच्याविषयी खूप जणांना विचारल्याचेही आवर्जून सांगितले. काश्मीरी लोकांच्या प्रामाणिकपणाचा अनुभव आम्ही आधी घेतला होता, त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि निघालो बेताब व्हॅलीकडे.

एखाद्या ठिकाणी कुठल्यातरी सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे म्हणून त्या जागेला त्या सिनेमाचे नाव द्यायचे असा घाणेरडा प्रकार फक्त भारतातच घडू शकतो; “बेताब” व्हॅलीचे असेच आहे. सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या बेताब या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे म्हणून या जागेला बेताब व्हॅली म्हटले जाते. अर्थात नावामागची कथा अनाकर्षक असली तरी खुद्द ही जागा मात्र कमालीची आकर्षक आहे. किंबहुना काश्मीर सहलीत चुकवू नयेत अशा अनुभवांपैकी बेताब व्हॅलीला भेट हा एक अनुभव होता असे मी म्हणेन. बेताब व्हॅली म्हणजे एक बाग आहे. इथे हिरवळ आहे, खळाळती नदी आहे, तिच्यावरचे पूल आहेत, फुलांची झाडे आहेत आणि ही देखणी बाग फिरायला आडव्यातिडव्या वाटा आहेत.

वेळेचे बंधन असल्याने आम्ही न रेंगाळता पुढे गेलो आणि बागेच्या दुस-या टोकाजवळ जाऊन थांबलो. कुठल्यातरी बर्फाच्छादित पर्वताहून वाहत येणारी लिड्डर नदी या बागेत काही काळ विसावते नि परत पुढे निघते. त्यात आम्ही गेलो त्या वेळी तिथे लख्ख ऊन होते. बर्फाने वेढलेली शिखरे चमकत होती, नदी झुळूझुळू वहात होती आणि सोबत होती काश्मीरमधली ती वेड लावणारी हवा. खरं तर एक अख्खा दिवस काढावा अशी ही जागा, पण पाऊण तास थांबून आम्ही तिथून निघालो.

पुढचे आकर्षण होते अडू व्हॅली. “आपको चंदनवारी और बेताब व्हॅली पसंद आई ना... आप यहॉंपे दस मिनटभी नही रुकोगे...” गाडीतून उतरताना आमचा चालक आम्हाला म्हणाला. “असे का म्हणाला असेल हा?” विचार करतच आम्ही गाडीतून उतरलो आणि अडू व्हॅलीच्या दिशेने चालू लागलो. अडू म्हणजे पर्वतांनी वेढलेले एक छोटेसे पठार आहे. आणि मजेची गोष्ट म्हणजे या पर्वतांपैकी एकही पर्वत बर्फाछादित नाही, ते सगळे आहेत गर्द हिरवे, झाडांनी आच्छादलेले.

आम्ही चालत बरेच आत गेलो. आत जेकेटीडीसीचे एक हॉटेल आहे. आम्ही हॉटेलवाल्यांनी बाहेर टाकलेल्या बाकड्यांवर बसलो आणि चहा मागवला.

आजूबाजूला नजर जाईले तिथे हिरवळ होती. हिरवळीवर बारीक पिवळी फुले फुलली होती. हॉटेलची जागा अगदी झकास होती. “सुंदर व्ह्यू असलेल्या काही खास मोजक्या खोल्या” अशी काही हॉटेले जाहिरात करतात, पण या हॉटेलच्या कुठल्याही कोप-यामधून दिसणारा व्ह्यू सुंदर नव्हे तर केवळ अप्रतिम होता. या हॉटेलमधे रहायला फारज मजा आली असती. “असो, नंतर कधीतरी. पुन्हा पहायला काहीतरी राहिले पाहिजे ना!”, मी मनाची समजूत घातली. (आयुष्यात एकदा तरी पुन्हा काश्मीरला जायचेच असे मी मनाशी ठरवून टाकले आहे. ४ दिवस श्रीनगरला हाऊसबोटीत आणि ४ दिवस ह्या हॉटेलात. अजुन ५/६ वर्षांत जम्मू - काश्मीर रेल्वेचे कामही पूर्ण होते आहे, तसे झाले तर काश्मीरला जाणे अधिक सोपे नि अधिक स्वस्त होणार आहे.)

दूरवर काही लोक पॅरासेलिंग करत होते.

त्यांचा हेवा करत आम्ही परतीची वाट धरली. टॅक्सी स्टॅंडवर आल्यावर आम्ही आमच्या मूळ गाडीत शिरलो आणि जेवण करून हॉटेलात परतलो.

संध्याकाळी जरा फिरून आणि सोबत जेवण उरकूनच परत यावे असा विचार करून आम्ही बाहेर पडलो. “चला तुम्हाला एक जुने मंदिर दाखवतो” सज्जादने असे म्हटल्यावर माझी उत्सुकता चाळवली गेली. हे मंदिर होते पेहेलगामचे मामलेश्वर मंदिर. मंदिर पेहेलगामपासून दोनेक किलोमीटर दूर असावे. शंकराचे हे मंदिर आकाराने अगदी चिमुकले आहे. मंदिरात एक (खेळत्या?) पाण्याचा झरा आहे. “काश्मीरात हिंदू मंदिरे नाहीत आणि जुनी तर नाहीतच नाहीत” अशी माझी एक समजूत होती, त्या समजुतीला हे मंदिर पाहून धक्का बसला.

दूरवर सूर्य पेहेलगामचा निरोप असताना प्रकाशाचे काही खेळ करून दाखवत होता.

मंदिर पाहून येताना आम्ही वाटेतल्या एका बागेत थबकलो. तिथे थोडा वेळ घालवून जेवून आम्ही खोलीवर गेलो तेव्हा रात्र बरीच झाली होती.

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jun 2017 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट चालली आहे सहल ! फोटोही अप्रतिम !

पुभाप्र.

संजय क्षीरसागर's picture

20 Jun 2017 - 11:54 pm | संजय क्षीरसागर

धन्यवाद !

मोदक's picture

21 Jun 2017 - 12:14 am | मोदक

अप्रतीम फोटो..!!

जुइ's picture

21 Jun 2017 - 12:29 am | जुइ

अतिशय देखणे फोटो. कश्मिरचे सौंदर्य अतिशय उत्तम प्रकारे फोटों कैद केले आहे तुम्ही.

कंजूस's picture

21 Jun 2017 - 6:04 am | कंजूस

:)
:)
:)

निलदिप's picture

21 Jun 2017 - 11:54 am | निलदिप

छान फोटो..!! पहातच रहावे असे