कलोनियल गोवा

सुनील's picture
सुनील in भटकंती
19 Jun 2017 - 8:07 pm

नुकतेच एका कौटुंबिक समारंभाकरीता कारवार येथे जायचे होते . समारंभ सकाळचा. म्हणजे, अगदी पहिले विमान पकडून गोव्यात गेलो असतो तरीही कारवारला पोहोचेपर्यंत प्रचंड दगदग आणि धावपळ होणारच होती. म्हणून मडगावला मुक्काम करून दुसर्‍या दिवशी कारवार गाठावे असा बेत केला. हाताशी तसा वेळ फार नव्हता आणि यंदा समुद्रकिनार्‍यावर जायचे नाही असे ठरवेलेलेच होते. तेव्हा मडगावच्या जवळपासच थोडे फिरावे असा विचार केला.

मडगावजवळच चांदोर नावाचे एक टुमदार गाव आहे. तेथे ३-४ शतके जुनी अशी बरीच पोर्तुगिझकालीन घरे आहेत. तेव्हा भटकंती तिथेच करावी असे ठरवले.
 
पहिले घर पाहिले, ते होते मेनेझिस ब्रागान्झा हाऊस. सत्तरीकडे झुकलेल्या एका आजीबाईने दरवाजा उघडला आणि स्वागत केले. घर सतराव्या शतकातील. उत्तम फ्लोअरींग, इटालियन झुंबरे, बेल्जियन आरसे, चीन-मकावहून आणलेली पॉटरी, साधारणपणे ८० माणसे बसू शकतील असा मोठा डायनिंग हॉल, चांदीची कटलरी आणि ते ठेवण्यासाठी असलेले सुबक लाकडी कपाट, पाच हजार पुस्तके असलेली खासगी लायब्ररी. जागोजागी लावलेली फॅमिली पोर्ट्रेट्स, खोल्यांमागून खोल्या जातच होत्या. आणि घराच्या अगदी मागच्या बाजूला, छोट्याश्या जागेत, आजीबाई आणि तिचे कुटुंब राहत होते!

a
(ब्रागान्झा हाऊस)
 
दुसरे घारदेखिल चांदोरमधीलच सारा फर्नांडीस यांचे . पहिल्याचा मानाने जरा लहान पण तरीही भव्यच! ही म्हातारीही सत्तरीकडे झुकलेली पण सोबतीला तरुण सून! येथेही तोच प्रकार. भल्या थोरल्या खोल्या, मार्बल फ्लोअरींग, जुने लाकडी फर्निचर, युरोपातून वगैरे आणलेल्या इतर वस्तू इत्यादी इत्यादी. मात्र घरची मंडळीही इथेच राहात होती. आणि स्वतःच्या राहत्या घरातूनच ते पर्यटकांना फिरवीत होते!

खरे तर ही फर्नान्डीस मंडळी पारंपरीक ख्रिस्ती गोमंतकीय खानादेखिल खिलवतात. पण त्यासाठी किमान एक दिवस आधी सुचना द्यावी लागते. ती दिली नव्हती म्हणून तो योग (इथे तरी) हुकला.
 
चांदोराहून निघालो तो जवळच असलेल्या लोटली (Loutolim) गावाकडे. इथे पाहिले अरौजो अल्वारिस यांचे घर. बराचसा मामला पहिल्या दोन घरांसारखाच. एक खास बाब म्हणजे "दिपाजी राणेंच्या गुंडांपासून" (sic), रोख आणि दागिन्यांचे संरक्षण करण्यासाठी बनवलेला मजबूत लोखंडी दरवाजा!

b

(अल्वारीस हाऊस)
 

लोटली गावातच एक छोटेखानी म्युझियम आहे. मुख्य आकर्षण आहे ते संत मीराबाई यांचे १४ मीटर लांब शिल्प. आणि शिल्पकार आहे अल्वारीस नावाचा एक स्थानिक लोटलीकर!
c
(मीराबाईचे शिल्प)

आता ह्या तीनही घरांचा लसावि काढला असता काय दिसते?

एखाद्या घराण्यात एक -दोन कर्तुत्ववान व्यक्ती निपजतात. त्या एक मोठे साम्राज्य उभे करतात. पुढील पिढ्या मात्र सामान्य वकुबाच्या निघतात. आहे त्या ऐश्वर्यात भर टाकणे त्यांच्या कुवती बाहेरचे असते. पण ही मंडळी ते फूकून टाकत नाहीत. काही उरले आहे ते जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मग त्यासाठी आपली राहते घर आणि मालमत्ता प्रदर्शानात का मांडावी लागेना!

हे सगळे पाहता पाहता अडीच वाजून गेले होते. कळवळून भूक लागली होती. आता पोट पूजा करणे क्रमप्राप्त होते.

असे म्हणतात, जर स्थानिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला नाहीत तर तुमची भटकंती अपूर्ण राहते!

साष्टी (Salcete) भाग हा बव्हंशी ख्रिस्तीबहुल. गोमंतकीय हिंदू खाद्य-संस्कृतीशी चांगलीच "तोंड"ओळख असली तरी, किरिस्तावी पद्धतीची माझी मजल विंदालू आणि सोर्पोतेलच्या पलीकडे गेली नव्हती. सारा फर्नांडीस यांच्याकडील संधी हुकली होती परंतु चौकशीअंती, चिंचोणे (Chinchinim) गावानजीक असलेल्या असोळणे गावात Seman's Nest नामक एक खानावळ ऑथेन्टिक ख्रिस्ती गोमंतकीय खाद्यपदार्थ देते, असे कळले आणि तिकडेच मोर्चा वळवला.

ठाण्याच्या मामलेदारची आठवण यावी असे कळकट्ट बाह्यरूप! दुपारचे सव्वा-तीन वाजून गेले असल्यामुळे, आता जेवण मिळणार नाही, असे सांगितले गेले. तेव्हा खास तुमचे नाव ऐकून मडगाहून आलो असे सांगून, पहिली ऑर्डर हीच शेवटची ऑर्डर, अशी मांडवली करून आत गेलो.

मत्स्याहारी खाणावळीत मेन्यू कार्ड बाजूला ठेऊन वेटरचा सल्ला घेणे इष्ट, कारण आजचा "फ्रेश कॅच" कोणता हे त्यालाच ठाऊक असते! तसे त्यालाच विचारले. त्याने मोडशो (Lemon fish) आणि चोणक (Giant sea perch) ची शिफारीश केली. ही नावे तशी कधीतरी कानावरून गेली होती तरी ते मासे प्रत्यक्ष कसे लागतात, हे काही ठाऊक नव्हते. अखेर, मोडशो आणि चोणक फ्राय, कलामारी (Squid) चे कालवण आणि भात, अशी पहिली आणि शेवटची ऑर्डर दिली.

तोवर किंचित पावसला सुरुवात झाली होती. आभाळ भरून आले होते. शेजारूनच साळ नदी संथपणे वाहात होती आणि समोर थाळी आली!
मोडशो आणि चोणकचा एक-एक तुकडा चाखला आणि मला मत्स्याहारातले फार कळते, हा अहंकार साळ नदीत बुडून गेला! निव्वळ अप्रतिम चव. कलामारीचे कालवण आणि भात हे काही मी पहिल्यांदा खात नव्हतो, पण ही चवदेखिल वेगळी आणि छानच होती.

खरा धक्का बसला तो बिल आल्यावर! ठाण्या-मुंबईतील कुठल्याही ठिकाणी किमान तिप्पटतरी बिल आले असते!

भरघोस टिप आणि दिलखुलास दाद देऊन बाहेर आलो.

संपादन - २४ ऑगस्ट २०२३
फोटोंची लिन्क -

https://drive.google.com/drive/folders/1eLRvaVfNrBgaN5hU8xIVprBWeOJRYoYk...

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

19 Jun 2017 - 8:36 pm | प्रदीप

छान विषयावरील अप्रतिम लेख.

गोव्यात गावांतून फिरतांना एक असे जाणवत राहिले (ते चुकीचे असण्याची शक्यता आहेच) की हिंदूंची घरे कशीबशी उभी, तर किरीस्तावांची घरे ह्या लेखांत वर्णिलेल्या महालांसारखी प्रशस्त व 'वेल अपॉइंटेड'.

सुनील's picture

20 Jun 2017 - 8:55 pm | सुनील

हिंदू आणि किरिस्ताव यांच्या घराबाबत असे सरसकट विधान कदाचित करता येणार नाही पण किरिस्तावांची घरे टापटिपीची दिसतात हे मात्र खरे.

बोरी (Borim) गावातील बा भ बोरकर यांचे घर हे स्मारक म्हणून विकसीत करण्याचा घाट घातला गेला होता. त्याचे पुढे काय झाले ते कळले नाही.

राही's picture

20 Jun 2017 - 8:57 pm | राही

हा 'फारिन' इन्फ्लुअन्स आहे. गोव्यात एक कायदा होता. त्यानुसार प्रत्येकाला आपापले घर, निदान त्याचा दर्शनी भाग स्वच्छ आणि व्यवस्थित रंगवलेला असणे आवश्यक होते. अगदी हिंदू देवळातसुद्धा एक सरकारी ऑफिसर येऊन स्वच्छतेची तपासणी करीत असे. इतकेच काय, मुंबई, वसई, दीव, दमण, पाँडिचेरी जिथे जिथे मोठ्या प्रमाणात क्रिस्टिअन किंवा युरोपीय लोक राहिले तिथे स्वच्छता आणि टापटीप आढळते. केरळातले किनारे आपल्या इकडच्या मानाने स्वच्छ आहेत. टूरिस्ट लोक काय घाण करतात तेव्हढीच. त्यांची घरे, चर्चेस व्यवस्थित निगा राखलेली असतात. त्यांनी कसलेल्या जमिनीसुद्धा हिरव्यागार, आखीवरेखीव दिसतात. एक इंचही जागा रिकामी ठेवलेली नसते. विरार, वसईकडे बाकीच्यांनी आपापल्या जमिनी विकल्या किंवा विकत आहेत. क्रिटिअनांनी मात्र त्या विकलेल्या नाहीत. मुम्बईत मरोळ, खोताची वाडी, वेसावे, चकाला, सहार, आंबोली इथली जुनी क्रिस्टिअन वस्ती अगदी लखलखीत होती. आता डीपी , बिल्डरलॉबी आणि अर्बन लँड सीलिंग अ‍ॅक्टमुळे अनेकांना जमिनीवरची मालकी सोडावी लागली आहे.

मासे आणि ताटाचा फोटो द्या..!

ही ठिकाणे नोंद करून ठेवली आहेत. नक्की भेट देण्यात येईल.

+ १, माशांची खानावळ नोंदवली आहे.

किती सुंदर भटकंती केलीत ! गोवा कधी ही निराश करत नाही.

गोवा कधी ही निराश करत नाही.

प्रचंड सहमत.

मस्त भटकंती झाली, वरील ठिकाणी आवर्जून भेट देणार मी :)

सुनील's picture

20 Jun 2017 - 8:56 pm | सुनील

गोवा कधी ही निराश करत नाही

सहमत.

सुनील's picture

20 Jun 2017 - 8:56 pm | सुनील

खरे तर पोटात कावळे, नव्हे डोमकावळे ओरडत होते. तेव्हा ताटे समोर आल्यावर फोटो काढायचे सुचलेच नाही!

वा! काय नशीबवान आहात आमच्या मानाने! गोव्याला आलो की येथे नक्की भेट देण्यात येईल.

गणोराज's picture

19 Jun 2017 - 11:04 pm | गणोराज

मस्त....

गणोराज's picture

19 Jun 2017 - 11:04 pm | गणोराज

मस्त....

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jun 2017 - 1:00 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं धागा !

असे धागे, 'गोव्याला जाऊन खूप दिवस झाले, परत फेरी मारावी' असा विचार करायला लावतात :)

मुक्त विहारि's picture

20 Jun 2017 - 8:38 pm | मुक्त विहारि

+ १

कधी निघायचे?

सुनील's picture

20 Jun 2017 - 8:58 pm | सुनील

'गोव्याला जाऊन खूप दिवस झाले, परत फेरी मारावी' असा विचार करायला लावतात

हेच म्हणतो!

फारएन्ड's picture

20 Jun 2017 - 2:41 am | फारएन्ड

आवड्ली माहिती!

रुपी's picture

20 Jun 2017 - 2:46 am | रुपी

मस्त!

जुइ's picture

20 Jun 2017 - 4:00 am | जुइ

जरा निराळी भटकंती आवडली!!

प्रीत-मोहर's picture

20 Jun 2017 - 9:01 am | प्रीत-मोहर

सुनील दा, हांव सध्या चांदरालागींच शेलड्यां रावतां एक कट्टो जाता आशील्लो!!

सुनील's picture

20 Jun 2017 - 9:01 pm | सुनील

माका खबर नाशिल्ली तू बगलेनाच राबता म्हूण.

अभिजीत अवलिया's picture

20 Jun 2017 - 10:57 am | अभिजीत अवलिया

जायला हवे एकदा :)

लोटुलीत जाऊनही जिला बेकरीत न जाणं म्हणजे..

सुनील's picture

20 Jun 2017 - 9:03 pm | सुनील

काय करणार! दर वेळी पाहिलेल्यापेक्षा न पाहिलेल्या ठिकाणांचीच यादी मोठी! पुढच्या वेळी नक्की!

पद्मावति's picture

20 Jun 2017 - 5:24 pm | पद्मावति

मस्तच!

आवंयस! भयंकर सुंदर बरयंला!

प्राध्यापक's picture

20 Jun 2017 - 5:48 pm | प्राध्यापक

मस्तच वर्णन....

प्रचेतस's picture

20 Jun 2017 - 6:56 pm | प्रचेतस

मस्त लिहिलंय

दुर्गविहारी's picture

20 Jun 2017 - 6:58 pm | दुर्गविहारी

मस्तच !! मागच्या गोवा भेटीत लोटली गावावरुनच वेर्णा कडे गेलो होतो. पण त्यावेळी ह्या म्युझियमविषयी माहिती नव्हते, त्यामुळे पाहता आले नाही. पुढच्या गोवा भेटीसाठी मार्क करुन ठेवतो.

पिशी अबोली's picture

21 Jun 2017 - 8:23 pm | पिशी अबोली

फार फार आवडला लेख..

सुबोध खरे's picture

21 Jun 2017 - 9:20 pm | सुबोध खरे

मेनेझिस ब्रागान्झा हाऊस पाहिले आहे. सुंदर आहे आणि छान ठेवलेले आहे.
बाकी गोव्यात अशा कळकट आणि टिनपाट हॉटेलातच किंवा किनाऱ्यावरील शॅक वर सर्वात चविष्ट जेवण मिळाले आहे/ मिळते. गोव्यात गेलो कि अशा हॉटेलात आमची चक्कर असतेच. उदा पणजी हुन विमानतळाकडे जाताना जासिंतो बेटासमोर असलेल्या शीलाज बार मध्ये चिली चिकन किंवा चोणाक रवा फ्राय किंवा कुठ्ठाळीला(CORTALIM) पुलाच्या खाली बॉनीज बार इथे खेकडे आणि मासे ,किंवा सांकवाळ चा फिश बोन बार ( आता इतर नावे आठवत नाहीयेत)
बाकी हॉटेले झक मारतील अशी परिस्थिती आहे.

उपेक्षित's picture

20 Mar 2018 - 7:10 pm | उपेक्षित

वाह मस्त आवडला हा वेगळा गोवा

राघव's picture

21 Mar 2018 - 10:10 am | राघव

सुंदर!

अवांतरः बाकी मडगांव वरून मागची काणकोणची छोटेखानी ट्रिप आठवली.. आणि अगदी कसनुसं झालं. हा किल्लेदार कुठं गंडलाय त्या कॅनडात जाऊन माहित नाही. आला परत की एक ट्रिप टाकावीच म्हणतो.. :-)

नीलकांत's picture

21 Mar 2018 - 10:47 am | नीलकांत

उत्तम भटकंती... मडगाव जवळ कुठेतरी बिगफुट नावाचे म्युझीयम आहे तेथे असे मिराबाईचे शिल्प पाहिल्याचे आठवते. तुम्ही म्हणता तसे पोर्तुगीज घरसुध्दा पाहिलेले आठवते. आता एवढे स्पष्ट आठवत नाही की गाव कुठले ते.

मासे मात्र अगदीच नवीन वाटले.

आज हा लेख वाचला. फोटो दिसत नाहीत पुन्हा देता येतील का ? वर्णनावरून ही घरे, संग्रहालय वगैरे खूपच प्रेक्षणीय वाटत आहेत. तिथले आणखीही फोटो असतील तर ते प्रतिसादात अवश्य द्यावेत ही विनंती.

सुनील's picture

24 Aug 2023 - 1:55 pm | सुनील

जुने फोटो सगळे आता डिलीट झालेले दिसताहेत. कळत नाही नक्की काय झाले ते. परंतु त्या ट्रिपचे काही फोटो अन्यत्र मिळाले ते डकवत आहे.