(सर्वात आधी पाककृती विभागात आल्याबद्दल क्षमा करा. इथे येण्याचे प्रस्तुत लेखकाचे हे केवळ दुसरे धारिष्ट्य आहे!)
(दुसरे म्हणजे हा धागा पाककृती विभागात काढावा की काथ्याकूट विभागात, हा गहन प्रश्न न सुटल्यामुळे सांप्रत येथेच पांढऱ्यावर काळे करत आहे (पाडत आहे!). तरी धागा कुठल्याही विभागात (अगदी खफवरसुद्धा) हलवला तरी चालेल.)
मला स्वतःला स्वयंपाकाचे शून्य ज्ञान आहे. परंतु वैयक्तिक कारणांस्तव मी बरेच दिवस (किंवा वर्षे) अशा पदार्थांच्या पाककृतींच्या शोधात आहे, जे पदार्थ आरोग्याला आणि जिभेलासुद्धा चांगले असतील. तर मिपावरील सिद्धहस्त सुगरणी आणि बल्लवाचार्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी त्यांना माहीत असलेल्या अशा पाकृ इथे द्याव्यात.
निकष :
१. पदार्थ शक्यतो कमी उष्मांकांचा (क्यालोरी) असावा. तेल-तूप अत्यल्प असावं.
२. पदार्थ भारतीयच असावा. उगीच कसल्या कसल्या फ्यानशी पाकृ नसाव्यात. हे स्यालाड आणि ते ड्रेषिंग वगैरे वगैरे परदेशी फ्याडे नकोत.
३. शक्यतो घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर केला जावा. (महाराष्ट्रीय घरात).
४. पदार्थ बनवायला जरा सोपा असावा.
५. पदार्थाची चव त्यातल्यात्यात बरी असावी. उगीच गवत-बिवत खायला देऊ नका.
६. पदार्थ पोटभरू हवा. पोट भरल्याचं समाधानही लाभावं आणि पोटावरील चरबीही वाढू नये.
७. टार्गेट ऑडियन्स (किंवा खवय्ये) हे हृदयरोगी, मधुमेही, स्थूल वगैरे असतील असे समजून त्यांच्यासाठी (तरस खा के का होईना) पाककृती सुचवायच्या आहेत.
८. पदार्थांमध्ये सकाळच्या न्याहारीचे, दुपारच्या जेवणाचे, मधल्या वेळचे, संध्याकाळच्या जेवणाचे, असे विविध प्रकार सुचवल्यास उत्तम. (इतक्या वेळा चरल्यावर काय डोंबल्याचं कमी होणार वजन? असे पुटपुटू नये. दिवसातून किमान सहा वेळा जेवावं असं आदरणीय ऋजुताताई सांगून गेल्या आहेतच.)
९. पाकृ देताना कृपया दिलेले प्रमाण कितीजणांना पुरेल हेही सांगावे. (यावर 'तुम्हांला किती पुरतं' असा खोचक प्रश्न विचारू नये.)
१०. पाकृचा फोटो असला तरी उत्तम, नसला तरी हरकत नाही. न टाकल्यास फाऊल धरला जाणार नाही.
उदा. भाजणीचे थालिपीठ, उपमा, वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे इत्यादी पर्याय मला सुचत आहेत. तुम्हांला काही माहीत असल्यास आवर्जून सांगा ही पुनरेकवार विनंती.
(सूचना : धाग्यावर दंगा करू नये. वाटल्यास विडंबनात्मक रसग्रहण केले तर चालेल. अन्यथा ताटलीभरून 'तळतळाट' खावा लागेल. काय?)
धन्यवाद!
आपला,
(पाकृपाभिलाषी) एस.
प्रतिक्रिया
16 Jun 2017 - 4:17 am | कंजूस
शाळेतल्या उपहारगृहांतून "जंक फूड" बाद केल्याने हाच प्रश्न सर्वांना पडला आहे नक्की काय द्यायचे. मागचा लोकसत्ता (शनिवार) पाहा.
१)ढोकळा, खमण
२)थालीपिठ भाजणीचा ढोकळा
३)भाकरी + मूग/मटकी/वाटाणे उसळ
16 Jun 2017 - 5:44 am | रुपी
"फ्यानशी" नाहीये पण सॅलडवर्गात येईल अश्या सध्या मी कोशिंबीरी करते.
चवळी, (काबुली) चने भिजवून आणि (चावता येईल इतपत) शिजवून घेऊन त्यात काकडी, टोमॅटो, कांदा, पालकाची पाने चिरुन मीठ, मिरपूड इ. घालून. चवीमध्ये बदल म्हणून चाट मसाला, जिरेपूड, साखर, लिंबाचा रस घालते. यात आणखी मुळा, गाजर असेही घालता येईल.
बीट, गाजर, दुधी, मुळा यांतले एखादे किंदा एकापेक्षा जास्त वापरुन किसून घेऊन त्यात कणीक भिजवायची. चॉपर/ फूड प्रोसेसर असेल तर वेळ वाचेल. मी पालकाची पानेही चॉपरमध्येच बारीक करते.
त्यातही पुदिना, ओवा, जीरे, तीळ, जवस, लसूण घालता येतील.
रवा इडली करताना इडलीपात्रात खाली बीट-गाजरे किसून, मटार इ. घालून नंतर इडलीचे पीठ घालून इडल्या करता येतील.
वेगवेगळ्या भाज्यांचे बारीक तुकडे करुन वाफवून घेऊन आले-लसूण घालून सूप बनवता येईल. बीट, गाजर, टोमॅटोचे (बरोबर थोडा कांदा, आले, लसूण) वाफवून सूप बनवता येईल.
खजूर आणि इतर सुकामेवा यांचे रोल, लाडू करता येतील - त्याहून कमी वेळखाऊ म्हणजे ते असेच खाणे ;)
बर्यापैकी पौष्टीक लाडूंची एक पाकृ मी आधी टाकलीये, पण त्यात तुपाचे प्रमाण अत्यल्प नाही म्हणून इथे देत नाही.
किती जणांना पुरेल वगैरे डिटेल्स द्यायचे असतील तर ते इथे देऊन आम्ही तुमच्या धाग्याचा टी.आर.पी. का वाढवावा? स्वतःच पाकृचा पेश्शल धागा का काढू नये? ;)
16 Jun 2017 - 8:58 pm | मितान
रुपी ने किसलेल्या किंवा चॉपलेल्या भाज्या घ्यायच्या, त्यात ज्वारी चे पीठ आणि थोडे दही घालायचे. ओवा, तिखट, हळद,मीठ, हिंग आणि आवडत असतील तर तीळ घालायचे. एकत्र मळून त्याचे धपाटे करायचे. अजून वेळ असेल तर मुटके वळून पाण्यावर वाफवून घ्यायचे. मग हवे तर फोडणीवर परतून खा नाहीतर लसणीच्या चटणी बरोबर हाणा.
यात वेगवेगळी पीठे घालून सेम प्रयोग करता येतो.
उकरपेंडी, ज्वारी बाजरीच्या कण्या भाज्या घालून शिजवून ताका सोबत, उकडशेंगोळे, उकड, कोणत्याही पिठाचे ताक घालून धिरडे, सगळ्या डाळी भिजवून वाटून अप्पे, उत्तप्पा.
मोडाची कडधान्य वाटून वाफवून घ्यायची मग त्यात हवे ते मसाले घालून हे पुरण भरून पराठे करायचे. मटकी चे तर फार छान लागतात.
अजून आठवेल तसं लिहिते.
16 Jun 2017 - 2:56 pm | अनन्त्_यात्री
प्रती माणशी १०० ग्रॅम लाल भोपळा (डा॑गर) बिया/साल काढून शिजवा. गार झाल्यावर मॅश करा. (तूप+जिरे+ हि॑ग + हिरवी मिर्ची) अशी फोडणी त्यावर द्या. वरून (मीठ+ साखर + मिर्चीपूड+चिरलेली कोथि॑बीर+ दही) टाकून चा॑गले मिश्रण करा. भाकरी / फुलका / रोटी यापैकी कशाही बरोबर (भाजी ऐवजी ) खाता येईल (कि॑वा खाण्याचा प्रयत्न करता येईल).
16 Jun 2017 - 3:31 pm | मुक्त विहारि
http://www.misalpav.com/node/35999
असा एक धागा मी काढला होता....
त्यातला तुम्हाला हवे तितके पदार्थ निवडा, पा.कृ. देतो.
फोन नंबर व्यनिने पाठवलात तर फोन वर पण सांगीन.
(अर्थात ह्या पा.कृ. गिल्याची दक्षिणा द्यावी लागेल आणि ती म्हणजे मला कॅमेरा कसा हाताळायचा? ते शिकवणे. निदान कॅमेरा तरी हातात नीट पकडता आला तरी चालेल. कॅमेराची पण माझ्याकडून तितकीच अपेक्षा आहे.कॅमेराने फोटो काढण्याची कला आम्हाला येणार नाही. )
17 Jun 2017 - 5:47 pm | प्रीत-मोहर
मुवि काका मला पण घ्या तुमच्यासोबत.
17 Jun 2017 - 9:17 pm | मुक्त विहारि
या कधीही...
घर आपलेच आहे.
16 Jun 2017 - 3:55 pm | II श्रीमंत पेशवे II
खरच ,... विचार केला न कि अस लक्षात येत कि आपण मोडेर्ण , शिकलेले आई बाप मुलांच्या बाबतीत , कमी वेळात ( शोर्ट कट ) मारून त्यांच्या डब्यांची काही न काही सोय करत असतो.
पण ते खरच पौष्टिक असत का याचा आपण विचार करत नाही , आणि मुलसुद्धा टीवीवर पाहतात तेच घ्यायला सांगतात.
गावातल्या मुलांना यागोष्टी फार फार एकदा खायला मिळतात , पण डब्याबद्दल अजूनही गावात भाकरी भाजी असते , किवा पोळी भाजी असते आणि तेच खर सोलिड फूड असत ...
16 Jun 2017 - 5:40 pm | कपिलमुनी
स्ट्यू बनवा !
पाकॄ शोधा आणि इथे टाका
16 Jun 2017 - 5:45 pm | कपिलमुनी
दुवा
16 Jun 2017 - 6:22 pm | एस
सर्वांना खूप खूप धन्यवाद. इथे पाकृ देण्याऐवजी स्वतंत्र धागे असतील तर त्यांच्या लिंका दिल्यात तरी चालेल.
मुविसाहेब, तुम्हांला आपण छायाचित्रणातील एक्स्पर्ट बनवू! नो टेन्शन! ;-)
16 Jun 2017 - 8:08 pm | मुक्त विहारि
ओके...
फक्त साहेब न म्हणता, काका म्हणालात तर उत्तम...
आणि तुम्ही म्हणता तसे, इथे मी पा.कृ.चे धागे अजिबात शोधत बसणार नाही. फार जळजळ होते. तरी बरे आजकाल गणपा आणि गँग गायब झाली आहे....भयंकर त्रासदायक गँग... काय एकेक रेशीपी टाकतात आणि फोटो पण अप्रतिम....
16 Jun 2017 - 7:16 pm | मोदक
#मिपाफिटनेस अंतर्गत अशा प्रकारचा उपक्रम राबवायची चर्चा सुरू होती. नंतर कांही कारणाने थांबली.
तुम्ही तर आयड्या फुस्स केलीत राव. :(
16 Jun 2017 - 7:23 pm | एस
अर्रर्रर्र! स्वारी! :-(
काय आहे की मिपावर हल्ली येत असलेल्या पाकृपैकी बहुतांश पाकृ ह्या चरबी वाढवणाऱ्या असतात की काय असे मला जाणवले. त्यामुळे मग म्हटले की आपणच आरोग्यदायी पाकृ संकलित करूयात.
22 Jul 2017 - 6:55 am | पिलीयन रायडर
द्या की ह्याच धाग्याला हॅशटॅग मिपाफिटनेसचा. असा काय मुहुर्त शोधुन र्हायलेत की..
तुम्हाला उजाडण्याशी मतलब ना, मग कुणाच्या का कोंबड्याने उजाडेना.
16 Jun 2017 - 11:45 pm | रातराणी
माझं आवडतं कम्फर्ट फूड म्हणजे चकोल्या, वरणफळ. फार काही खटपट न करता उत्तम वन डिश मील. याचं गुजराती भावंड दाल ढोकलीच्या मी प्रेमात आहे. पारंपरिक रेसिपीमध्ये फक्त तुरीची डाळ वापरतात, मी सगळ्या डाळी मिक्स घेते तेवढंच मनाला समाधान. किती आरोग्यदायी हे माहीत नाही पण आपल्या दालढोकली पुढे सगळे भारी पास्ता म्हणजे किस झाड की पत्ती ;)
तसंच अजून आवडतं कम्फर्ट फूड म्हणजे खिचडी. मध्यंतरी घरात आणलेली सालाची मूग डाळ काही केल्या संपत नव्हती म्हणून सहज खिचडीत टाकून पाहूया म्हणलं, आणि काय अप्रतिम चव आली! त्यात आवडत्या / न आवडत्या भाज्या टाकल्या की भाजी खाल्ली जात नाही हाही प्रश्न निकालात निघतो.
अजून एक असाच सहज करून तरी पाहूया म्हणून केलेला आणि आवडलेला प्रकार म्हणजे एग डोसा. त्यावर सकाळची किंवा रात्रीची उरलेली भाजी पसरायची, आवडत्या चटण्या टाकायच्या, वरून थोडं पनीर किसायचं आणि पिझ्झासारखं खायचं. यम्म :)
16 Jun 2017 - 11:57 pm | मोदक
एग डोसावर लांब लांब चिरलेला कांदा घालून फ्रँकीसारखे रोल करूनही खाता येईल.
आणखी एक व्हेरीएशन - उकडलेल्या अंडयाचा फक्त पांढरा भाग चौकोनी कापून घ्या, तिखट / मसाले भुरभुरवून मसालेदार बनवा आणि हे टॉपिंग / फिलींग म्हणून वापरा.
17 Jun 2017 - 2:23 am | पद्मावति
खुप उपयुक्त धागा.
17 Jun 2017 - 6:52 pm | एस
रुपीताईंचा हा धागा चांगला आहे.
"आरोग्यदायी" झटपट पराठे.
22 Jun 2017 - 1:20 pm | नीलमोहर
आरोग्यदायी पदार्थ शोधण्याची गरज आहेच, रोज तेच पोळी भाजी, भात खायचाही कंटाळा येतो,
नाचणीचे कुठलेही प्रकार, नाचणी दळून त्याचे पीठ करून किंवा रेडीमेड पीठ मिळते ते आणून बरेच पदार्थ करता येतात, जसे की डोसा, इडली, लाडू, भाकरी, लापशी/पेज, इ.
तांदूळ ज्वारी इ. पीठांची उकड, गोड/तिखट शेवया, मिक्स पिठांची आंबोळी, गव्हाच्या दलियाचा पुलाव, उपमा, कच्चे मोड आणलेले कडधान्य, तांदळाची, गव्हाची, फळांची खीर, मिक्स फळं, भाज्यांची कोशिंबीर, साळीच्या, ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा, कॉर्नफ्लेक्स कमी तेलात तळून चिवडा इ.
बरेच प्रकार आहेत, अजून आठवतील तसे सांगते,
24 Jun 2017 - 2:14 pm | एस
भरली केळी हा एक प्रकार छान आहे.
http://www.misalpav.com/node/33262
22 Jul 2017 - 6:47 am | पिलीयन रायडर
दिनेशदांचा ब्लॉग सुरु झालाय. त्यात अनेक रेसेपीज सापडतील. काही सोप्या आणि वन डिश मील किंवा नाश्ता ह्या सदरात मोडणार्या पाकॄंच्या लिंक्स देतेय. बाकी तिथे खजिनाच आहे. अर्थात अजुन पुष्कळच पाकृ यायच्या आहेत.
१. मुग डाळीचे खमण
२. Hin Htote from Myanmar / ( Vegetarian version )
३. उकडपेंडी
४. गव्हाची उसळ
५. ऊमर अल खय्याम पराठे
22 Jul 2017 - 6:01 pm | एस
क्या बत है! धन्स पिराताई!
2 Oct 2017 - 8:25 pm | अनिंद्य
वा वा !
दिनेश शिंदे यांच्या ब्लॉगची अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती. त्यांच्या मायबोलीवर येणाऱ्या रेसेपी वाचणे आणि फोटो पाहणे हे माझे फार आवडीचे काम होते. लिंक दिल्याबद्दल आभार.
- अनिंद्य
29 Jul 2017 - 6:13 am | पिलीयन रायडर
दिनेशदांच्या ब्लॉगवरुन पाहुन वडाभात केला होता. भिजवलेली मटकी हाताशी असेल तर अक्षरशः अर्ध्या तासात होतो. डाळी भाजुन घ्यायच्या असल्याने खमंग होतात वडे. आणि तेल पित नाहीत अजिबात.
३ डाळी आणि मटकी असल्याने प्रोटिन्स भरपुर! भात नसेल करायचा तर ह्याचे छोटे थालपीठ होऊ शकतील. ते ही ट्राय करुन कळवेन.
29 Jul 2017 - 11:02 am | एस
नागपुरी वडाभात का? वाह!
उडदाचे घुटे हाही एक पौष्टिक पण पचायला जड असा पदार्थ आहे.
27 Aug 2017 - 12:22 pm | रातराणी
मला या रेसिपीमागचं लॉजिक काही कळत नाही. नुसता भात आणि वडा असं कोरडं कोरडं नाही वाटत का? की नागपूर मध्ये याबरोबर आणखी काही बनवतात थोडा तरी रस्सा असेल असं? सहज उत्सुकता म्हणून विचारतीये, इथल्या नागपूरकरांनी शंका समाधान करा प्लीज.
( वरण-भात, कटाचीआमटी-भात, मसालेभात-टोमॅटोसार/रस्सम प्रेमी)
27 Aug 2017 - 10:28 pm | रेवती
मलाही आधी असंच वाटायचं पण हा भात कोरडा वाटत नाही. चवदार असतो. त्याबरोबर ताक देतात असं आठवतय.
मी नागपूरकर नाही तरी शंका समाधान झाले का? ;)
29 Aug 2017 - 1:12 am | अभिदेश
ह्या बरोबर आमसुलाचे सार करतात. माझी आई करते नेहमी.
29 Jul 2017 - 10:18 am | पिवळा डांबिस
हा पदार्थ अस्सल भारतीय आणि चवदार आहे.
तो चरबी तर वाढवत नाहीच (बटाटवडा खाऊन जाडं झाल्याचं कुणी माझ्यातरी पहाण्यात नाही) पण
तो अनेक रोगांवर (सर्दी-पडसं, तोंडाची चव जाणे, डिप्रेशन, म्हंटल्यास क्षय!!) वगैरे रोगांवर अक्सीर इलाज आहे!!
प्रत्यक्ष खा आणि खात्री करा!!
:)
29 Jul 2017 - 11:26 am | कंजूस
पोट बिघडल्यास पाणीपुरी उत्तम.
23 Aug 2017 - 2:52 pm | ससन्दीप
शेपू चे पराठे हा झटपट न्याहारीचा प्रकार ट्राय करून पहा. पदार्थ गवती आहे पण चवीला खूप छान आणि खमंग.
लहान मुले सुद्धा आवडीने खातात. युट्युब ची लिंक आहे.
Shepu Parathe
24 Aug 2017 - 12:11 pm | गम्मत-जम्मत
१ वाटी बारीक रवा,४/५ चमचे नाचणी चे पीठ, १ चमचा गुळ चिरून, थोडा कांदा/कोबी , मिरची , मक्याचे दाणे, बारीक चिरलेला काऊलीफ्लॉवर, (किंवा तत्सम आवडीच्या भाज्या) , पीठ भिजवण्या इतपत दही, थोडेसे पाणी, चिमूट भर खाण्याचा सोडा, चवीपुरते मीठ
भाज्या आणि कांदा थोड्या तेलाच्या फोडणीत परतून घ्याव्यात , जास्त शिजवू नयेत. मोठ्या कुंड्यामध्ये रवा, नाचणी चे पीठ, मिरच्या/लाल तिखट, चिरलेला गुळ, मीठ, हे सर्व दह्यात कालवून घ्यायचं, त्यात तेलावर परतलेल्या भाज्या घालून पुन्हा मिसळून घ्यावं.
खायचा सोडा घालून अगदी हलक्या हाताने मिसळून घ्यावं.
आप्पेपात्र मंद आचेवरती छान गरम करून घ्यावं. थोडासा तेल सोडून अप्पे तयार करावेत. साधारण १० मिनिटे पुरतात, खमंग अप्पे होण्यासाठी. कोथिंबीर आणि भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी या अप्प्यांसोबत छान लागते.
(मिसळपाव वर फोटो अपलोड करायला अजून जमत नाही. नाहीतर फोटो हि टाकला असता!!)
24 Aug 2017 - 1:27 pm | एस
धन्यवाद ससन्दीप आणि गम्मत-जम्मत. मिपावर फोटो चढवणे आणि इतर मदतीकरिता हा धागा पहा.
http://www.misalpav.com/help.html