कुरकुरीत्/क्रिस्पी भेंडी:

सविता००१'s picture
सविता००१ in पाककृती
11 Jun 2017 - 6:25 pm

वाढणी: ३ व्यक्तींसाठी

साहित्य: अर्धा किलो कोवळी भेंडी, १ टीस्पून तिखट, १ टी स्पून गरम मसाला, १/२ टीस्पून आमचूर पावडर, १/२ टीस्पून धने - जिरे पावडर, १/२ टीस्पून चाट मसाला, १/२ ते पाउण वाटी बेसन, चवीनुसार मीठ, शॅलो फ्राय करण्यासाठी तेल.

कृती: पहिल्यांदा भेंडी धुवून टॉवेल वर कोरडी करून घ्यावी. नंतर दोन्ही बाजूंची टोके कापून प्रत्येक भेंडीला एक एक उभी चीर द्यावी. जर भेंडी खूप मोठी असेल तरच तिचे दोन-तीन तुकडे करावेत. नाहीतर अख्खीच ठेवा.

एका ताटात हे सारे तुकडे ठेवून द्या. एका बाउल मध्ये तिखट, मीठ, धने-जिरे पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला, बेसन आणि मीठ हे सगळं नीट एकत्र करावं. कोरडंच. हा मसाला चिरलेल्या भेंडीवर व्यवस्थित पसरावा आणि हलक्या हाता ने भेंडीमध्ये मिक्स करावा. हे मिश्रण अर्धा तास तसेच मुरत ठेवून द्यावे.

.

नंतर एका पॅन मध्ये जरा जास्त तेल घ्यावे. आपण भेंडी तळणार नाही. त्याची काही आवश्यकता नाही. तेल तापले की त्यात भेंडीचे तुकडे घालून मंदाग्नीवर सावकाश परतावी. भाजी झाली की मात्र ती गरम गरमच भात-आमटी किंवा पोळी-रस्सा भाजी याबरोबर वाढावी.

.

टीपः- भेंडी तळली तर ती नंतर लगेच मऊ पडते. शिवाय तेलात बेसन आणि इतर मसाले खाली बसतात. ते तेल नंतर वापरता येत नाही नीट. त्यापेक्षा शॅलो फ्राय भेंडी जास्त वेळ कुरकुरीत रहाते, तेल खराब होत नाही आणि भाजीही जास्त तेलकट होत नाही.

प्रतिक्रिया

एस's picture

11 Jun 2017 - 7:08 pm | एस

हम्म. बादवे, दही घालून सरबरीत अशी भेंडी बनवता येईल का असा विचार मनात आला. मी खूप पूर्वी कुठेतरी अशी भेंडी खाल्ली होती. त्याची आठवण आली. सविताताई, तुम्हांला जर येत असेल तर त्याची पाकृ टाका प्लीज.

सविता००१'s picture

11 Jun 2017 - 7:16 pm | सविता००१

नक्की नक्की. थोडासा वेळ द्या फक्त.

मलाही हविये ही रेसिपी. नक्की टाका. वाट बघतेय..

सविता००१'s picture

11 Jun 2017 - 10:03 pm | सविता००१

बरं बरं नक्की लवकरात लवकर.
परत लगेच भेंडी केली तर मारच खाईन मी घरी :)

भेंडीसारखी देखणी आणि चविष्ट भाजी नाही, फक्त हातात कला हवी!
भरलेली भेंडी हा माझा आवडता पदार्थ आहे, पण माझ्या माहितीमध्ये खूप कमी लोक आहेत जे हवेतसे तयार करू शकतील.. :)

जेम्स वांड's picture

11 Jun 2017 - 8:29 pm | जेम्स वांड

भेंडीत दही, मसाला घालून घातलेले सांडगे हे सांगली जिल्ह्यात तरी घरोघरी सापडणाऱ्या ऐवजापैकी एक प्रकरण आहे सरजी, असे कुरकुरीत तळलेले सांडगे, मुगाच्या खिचडीसोबत बाहेर धो धो पाऊस पडत असताना ओरपायची मजाच वेगळी.

रुपी's picture

12 Jun 2017 - 11:26 pm | रुपी

माझी आजी अशी दही घालून भेंडी बनवायची. अगदी शेवटी दही घालायची आणि मग लगेच खायला वाढायची.

जेम्स वांड's picture

11 Jun 2017 - 8:31 pm | जेम्स वांड

एरवी चकण्यात खाल्लेल्या 'कुरकुरी भिंडी' चे हे घरगुती साधे व्हर्जन सुद्धा आवडलेलं आहे, साधी पण उत्तम अन चविष्ट पाककृती वाटली ही.

मुक्त विहारि's picture

11 Jun 2017 - 8:59 pm | मुक्त विहारि

तोंपासू

चला आता आमच्या ३-१३ ग्रहावर भेंडी शोधणे आले....

मनिमौ's picture

12 Jun 2017 - 12:07 pm | मनिमौ

करून बघते नायतर तुझ्या कडे येते

प्रीत-मोहर's picture

12 Jun 2017 - 1:03 pm | प्रीत-मोहर

सवे मस्त!!! आधीच भेंडी फेवरिट आहे. हे नक्की करुन बघेन.

पद्मावति's picture

12 Jun 2017 - 1:31 pm | पद्मावति

मस्तच सवि.

मेसमधल्या काकू भेंडी आडवी चिरुन असाच मसाला लावून तळून घेतात. अप्रतिम लागतात.

नशीबवान आहात, मेसमध्ये भरलेली भेंडी खायला मिळतेय!

पाकृ मस्त, तुम्ही जरा २ महिने सुट्टीवर जा बघू. सारख्या छान छान फोटो टाकून छळत असता ;)

रातराणी's picture

13 Jun 2017 - 12:25 am | रातराणी

"सविताताई" पाकृ मस्त, तुम्ही जरा २ महिने सुट्टीवर जा बघू. सारख्या छान छान फोटो टाकून छळत असता.
=))

किसन शिंदे's picture

12 Jun 2017 - 3:24 pm | किसन शिंदे

जोरदार सुरूये की पाककृती सदर

कुरकुरीत आणि चमचमीतही. मस्त.

नूतन सावंत's picture

12 Jun 2017 - 9:58 pm | नूतन सावंत

मस्त,मस्त,करणे मस्ट आहे.

इशा१२३'s picture

16 Jun 2017 - 5:57 pm | इशा१२३

मस्त सवे!माझ्याकडेही अशी भेंडी आवडते.

कंजूस's picture

16 Jun 2017 - 7:44 pm | कंजूस

>>भेंडीत दही, मसाला घालून घातलेले सांडगे हे सांगली जिल्ह्यात तरी~~~
बरोबर. गवारसुद्धा छान लागते.

भेंडी पाकृ झकास.