मिपा संपादकीय - आपले संविधान.

संपादक's picture
संपादक in विशेष
13 Oct 2008 - 12:27 am
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...

- आपले संविधान -

१८५७ च्या राष्ट्रीय उठावा नंतर भारतावर ब्रिटिश संसदेचा सरळ अंमल सुरू झाला. त्यासाठी सुद्धा त्यांनी कायदा केला होता. १ नोहेंबर १८५८ ला राणीच्या नावाने राज्यकारभार सुरू झाला. भारतात कायद्याने राज्यकारभार करण्याचा आधुनिक काळातील हा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. ब्रिटिशांनी जे केले ते त्यांच्या सवयी नुसार किंवा त्यांना सोईस्कर असेच होते मात्र त्यामुळे भारतीय जनतेला सुद्धा फायदा झाला. दर दहा वर्षांनी भारतीय जनतेसाठी सुधारणांचा एक टप्पा देण्यात येई. १९०९, १९१९ आणि त्यापुढील टप्पा मात्र जरा उशीरा म्हणजे १९३५ ला आला.

भारतीय जनतेने पुन्हा १८५७ सारखा उठाव करू नये यासाठी त्यांच्या असंतोषाला विधायक वाट काढून द्यावी या हेतूने राष्ट्रीय कॉग्रेसची स्थापना करण्यात आली. यामुळे जे लोक सनदशीर मार्गाने जाऊ इच्छीत होते त्यांना मोठे व्यासपीठ प्राप्त झाले. आणि इंग्रजांना जनतेतील विचारप्रवाहांचे आकलन करणे सोपे होत गेले.

सुरुवातीच्या काळात सरकारला अनुकूल असलेली कॉग्रेस हळूहळू इंग्रजी सरकारच्या पोकळ आश्वासनांना कंटाळून इंग्रजांशी आंदोलनाच्या पावित्र्यात उभी राहिली तेव्हा इंग्रजांना कॉग्रेसची अडचण वाटायला लागली.

कॉग्रेस आणि इतर संघटना सरकारला मागणी करायचे आणि इंग्रज सरकार दहा वर्षांनी त्यांच्या काही मागण्या पूर्णं करायचे. असे होत होत १९३५ साल उजाडले. दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरील ब्रिटिश सरकारने भारताला या आधी कधीही न दिलेले अधिकार दिले प्रांतामध्ये भारतीय पक्षाचे लोक सरकार बनवू लागले.

हा १९३५ चा सुधारणा कायदा पुढे भारतीय संविधान बनवण्यासाठी मोठा संदर्भ म्हणून कामी आला. भारतीय संविधान बनण्याचे काम आपण स्वतंत्र व्हायच्या आधीच सुरू झाले होते. भारताला स्वातंत्र्य द्यायचे म्हणजे नेमकं काय आणि त्यानंतर भारताचा कारभार कसा चालेल याच्या तयारीसाठी म्हणा हवं तर, एक क्रिप्स (कॅबिनेट) मिशन भारतात आले. खरं तर ह्या मिशन ने भारताला वसाहती अंर्तगत स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले होते. गांधीजींनी या मिशनच्या तरतुदी फेटाळून लावल्या. आता पर्यंतच्या लढ्यात एक नक्की झालं होतं की भारताला आता पूर्णं स्वातंत्र्य पाहिजे होतं. त्यात कसलीही तडजोड होणे आता शक्य नव्हते.

क्रिस्प मिशनच्या शिफारसी फेटाळल्या गेल्या मात्र सत्ताबदलानंतर राज्यकारभार चालवण्यासाठी घटना असणे आवश्यक झाले होते. म्हणून संविधान बनवण्यासाठी देशभरातून संविधान सभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. २९९ सदस्य निवडून आले. खरं तर ह्या संख्ये मध्ये बरीच क्लिष्टता आहे. कारण संविधान सभेचे काम चालू असताना बाहेर राजकीय पटलावर अनेक जलद हालचाली सुरू होत्या. त्यामुळे संविधान सभेचे काम अतिशय धकाधकीच्या काळात आणि अत्यंत महत्त्वाच्या वेळी झाले.

आपल्या देशाच्या सुदैवाने त्याकाळी नव्या विचाराने भारलेले, नव्या जगाची जाण असलेले आणि सोबतच भारताच्या मातीशी नाळ जुळलेले लोक त्यावेळी भारताचे नेतृत्व करीत होते. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब आपल्या संविधानाच्या निर्मितीत पडले. आणि आपल्याला एक अद्वितीय असे संविधान प्राप्त झाले.

त्याकाळाचा विचार केला असता भारतीय समाजाची रचना आणि भारताला देश म्हणून पुढील भविष्यात जेथे न्यायचे आहे ते उद्दिष्ट्य समोर ठेवून ह्या संविधानाची निर्मीती केली गेली असे दिसते.

या आधी आपण संविधानाची धावती ओळख करून घेऊया. संविधान हा एका लेखमालेचा विषय होऊ शकतो मात्र येथे एका लेखातच त्याची धावती ओळख करून देणे आवश्यक आहे.

आपल्या संविधानाची निर्मीती भारतातील निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी केलेली आहे.
भारताच्या प्रत्येक प्रांतातील तसेच समाजवर्गातील सदस्य या संविधान मंडळात होते.
संविधान मंडळाचे काम ९ डिसेंबर १९४६ ला सुरू झाले होते.
संविधान मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून सच्चीदानंद सिन्हांनी काम पाहिले. ते दोन दिवस अध्यक्ष होते.
संविधानाचे पुढील अध्यक्ष म्हणून श्री राजेंद्र प्रसाद यांनी काम पाहिले.

संविधान मंडळात अनेक समित्या होत्या. प्रत्येक समितीला एका विषयाचे काम दिले गेले होते. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक त्या समितींमध्ये होते.
या समितींमधील सर्वात महत्वाची आणि सर्वात जास्त काम केलेली समिती होती, 'मसुदा समिती'
जगातील अनेक राज्यघटनांचा अभ्यास असलेले श्री बाबासाहेब आंबेडकर ह्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी होते.
या समितीत इतर लोक सुद्धा होते मात्र या समितीत बाबासाहेबांनी सर्वात जास्त काम केले. घटनेचा मसुदा त्यांनी लिहीला असं म्हणायला सुद्धा वाव आहे. त्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटल्या जाते.

भारतीय संविधान म्हणजे घटना हा भारतातील सर्वोच्च कायदा आहे. भारतात तयार होणारा कुठलाही कायदा हा भारतीय संविधानाशी सुसंगताच असला पाहिजे असं बंधन आहे. तो तसा नसेल तर तो कायदा रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत. संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार हा फक्त सर्वोच्च न्यायालयालाच आहे.

भारताचे संविधान तयार होण्यासाठी २ वर्षे ११ महिने १८ दिवस लागले. ९ डिसेंबरला संविधान समितीचे काम सुरू झाले आणि २६ नोहेंबर १९४७ ला संविधानाला मान्यता देण्यात आली. प्रत्यक्ष संविधान लागू झाले २६ जानेवारी १९५६ पासून
ह्या दरम्यान भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि संविधान समिती सार्वभौम झाली. याचा अर्थ असा की मसुदा समितीला आदेश देणारं बाहेरचं असं कुणी नव्हतं. ती केवळ भारतीय जनतेची प्रतिनिधी म्हणून आता काम पूर्णं स्वातंत्र्याने काम करू लागली.

ह्यातच एक मजेशीर किस्सा झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीवर मुस्लीम लीगकडून निवडून गेले होते. पुर्व बंगालमधून निवड झालेले बाबासाहेब जेव्हा भारत स्वतंत्र झाल्यावर पुर्वबंगाल पाकिस्तानात गेल्यामुळे आपसुकच घटना समितीच्या बाहेर फेकल्या गेले. आतापर्यंत बाबासाहेबांची या विषयातील तज्ज्ञता सर्वांनाच मान्य झाली होती. खरं तर पं. नेहरू आणि बाबासाहेबांचं अजिबात एक मत नव्हतं मात्र तरी सुद्धा बाबासाहेबांची घटनेसाठी आणि देशासाठी असलेली आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी बाबासाहेबांना मुंबई इलाख्यातून कॉग्रेसच्या टिकीटावर निवडून आणले आणि मसुदा समितीचं काम तसेच चालू राहील याकडे लक्ष घातले. देशहिता साठी या दोन्ही मोठ्या आणि परस्पर विरोधी विचारधारा असलेल्या नेत्यांची ही वागणू़क खरोखर एक आशादायक उदाहरण ठरले होते.

भारतीय संविधानाची प्रस्तावना आपल्या संविधानाचे सार सांगते आणि घटनाकारांनी उद्याच्या देशाचे काय स्वप्न पाहिले होते त्याची सुद्धा कल्पना देते. ही प्रस्तावना येथे आहे.

यात 'आम्ही भारताचे लोक... या पासून सुरूवात करून, भारतातील लोकांना

सामाजीक, आर्थीक आणि राजकीय - न्याय
विचारांचे, ते व्यक्त करण्याचे, विश्वासाचे, धार्मीक विश्वासाचे - स्वातंत्र्य
दर्जाची आणि संधीची - समानता
चे आश्वासन देण्यात आले.

याच प्रस्तावनेत भारताचे स्वरूप
सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रीक, गणराज्य असे करण्यात आलेले आहे.

भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान समजले जाते. ह्या संविधानाची ढोबळ रुपरेषा अशी आहे. -

संविधानात २२ भाग व १२ परिशिष्ट्ये आहेत.

एकूण कलमांची संख्या ३९५ आहे. ह्यात घटनेच्या संशोधनामुळे आणि बदलांमुळे नव्याने तयार झालेल्या कलमांना उपकलमांचा आकडा देऊन ही ३९५ ची संख्या कायम ठेवण्याचे ठरले आहे. त्यामुळे कलम १४* (अ) उपकल (बअ १२अ) असा काहीसा उल्लेख आपल्याला आढळतो.

१) पहिल्या भागात भारत देश आणि राज्यांबद्दल माहिती आहे. ( कलम १ ते ४ )
२)दुसऱ्या भागात नागरिकत्वाचा कायदा आहे. ( कलम ५ ते ११ )
३) मुलभुत हक्क (कलम १२ ते ३५ )
४) मार्गदर्शक तत्वे (कलम ३६ ते ५१)
४)(अ) मुलभुत कर्तव्ये (कलम ५१ (अ) )
५) केंद्राची रचना (कलम ५२ ते १५१)
६) राज्याची रचना (कलम १५२ ते २३७)
.
.
.
.
२२) अन्य

असे भाग आहेत.

शेवटी १२ परिशिष्टे आहेत. प्रत्येक परिशिष्टात विशेष माहिती आहे.
जसे दुसऱ्या परिशिष्टात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा सभापती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचे पगार दिलेले आहेत.
चवथ्या परिशिष्टात प्रत्येक राज्याच्या वाटेला आलेल्या राज्यसभेच्या संख्येचे विवरण आहे.
सध्या चर्चेत असलेले परिशिष्ट म्हणजे आठवे परिशिष्ट ज्यात भारताच्या अधिकृत भाषांचे विवरण आहे.

केंद्र व राज्यातील अधिकार नेमके पणाने विभागलेले आहे. तश्या तीन सुची आहेत.
१)केंद्रसूची - यात असलेल्या विषयांवर केंद्रच कायदा करू शकते.
२) राज्यसूची - यात असलेल्या विषयांवर राज्य आपापले कायदे करू शकतात.
३) मध्यवर्ती सूची - यात केंद्र आणि राज्य दोन्ही कायदे करू शकतात. मात्र अंतीम कायदा केंद्राचा असेल.

या व्यतिरिक्त उरलेले विषय हे केंद्राच्या अधिकारात येतात.

देशाचा कारभार कसा चालावा हे सांगण्यासाठी संविधान आहे. त्यासाठी संविधान, संसद आणि न्यायालय अशी व्यवस्था आहे.

संविधान आपण वर पाहिलेच आहे आता संसद म्हणजे नेमके काय ते पाहूया.
संसद म्हणजे - लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांची मिळून संसद तयार होते.

न्यायालय हे संसदेच्या अधिकार कक्षेत नाहीत. त्यांचे स्वतंत्र अस्तीत्व आहे. न्यायाधिशांनी स्वतंत्र बुद्धीने निकाल दिला पाहिजे यासाठी त्यांना बरेच अधिकार आहेत.

हे संविधान मान्य झाले २६ नोहेंबर १९४९ रोजी आणि ते भारताला लागू झाले २६ जानेवारी १९५० रोजी. त्यामुळे २६ जानेवारी हा गणतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारीचा मुहूर्त निवडण्यासाठी एक कारण आहे, २६ जानेवारी १९३० हा कॉग्रेसने पुर्णस्वराज्य दिवस म्हणून साजरा केला होता. त्याची आठवण म्हणून गणतंत्र दिवसाचा मुहूर्त २६ जानेवारी निवडल्या गेला.

संविधान तयार झाले आणि ते लागू झाले. त्या अनुसार कामकाज सुरू झाले. पुढे जेव्हा कधी एखादी अडचण आली असेल की जिचा उल्लेख संविधानात नसेल किंवा पुरेसा स्पष्ट नसेल तेव्हा संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे. मात्र यात सुद्धा खुप छान बंधने आहेत. त्यामुळे कुणीही उठ आणि काहिही कर अशे शक्य नाही.

तीन प्रकारे संविधानात बदल करता येतात. साधा बदल करण्यासाठी संसदेत बहूमत असणे गरजेचे आहे.
त्यापेक्षा गंभीर बदल करण्यासाठी ससदेत २/३ बहूमत असणे गरजेचे आहे, आणि काही विशिष्ट परिस्थितीत तर संसदेत २/३ बहूमत आवश्यक आहेच सोबतच २/३ घटक राज्यांच्या विधानसभेंची मान्यता सुद्धा आवश्यक आहे. ह्या अटींमुळे आपली घटना अंशत: परिवर्तनीय - अंशतः परिदृढ अशी झालेली आहे.

घटना दुरूस्तीचा विषय निघाल्यावर ४२ व्या घटना दुरूस्तीचा उल्लेख होणार नाही असं होत नाही. इंदिरा गांधीच्या काळात ही ४२ वी घटना दुरूस्ती करण्यात आली होती. आणिबाणीच्या काळातली ही घटना दुरूस्ती खुप मोठी होती. त्यात सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कमी करण्यात आले होते. पंतप्रधानांचा सल्ला राष्ट्रपतींना बंधनकारक करण्यात आला होता. लोकसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा करण्यात आला होता. असे अनेक बदल बाईंच्या काळात करण्यात आले होते. वर संविधानाच्या प्रस्तावनेतील 'धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी' अशी दोन विशेषने जोडण्यात आली.

या घटना दुरूस्तीतील अनेक बदल पुढे मोरारजी देसाईंच्या काळात ४४व्या घटना दुरुस्तीने रद्दबातल केले आहेत.

अशी ही आपली घटना हीचा धावता आढावा घेतो म्हटले तरी कठीण जाते. या विषयाबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. खास करून आपले मुलभुत अधिकार, आणिबाणी व तिचे प्रकार, भाषा, आपली स्वातंत्र्ये याबद्दल अधीक वाचने फार रोचक आहे. इंटरनेटवर आणि इतरत्र सुद्धा या विषयावर भरपूर लिहिलेलं सापडतं. ते कायदेशीर असल्यामुळे खुप लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र जी घटना आपल्या सगळ्या देशाचा कारभार चालवते तीची किमान ओळख तरी आपल्याला असायलाच हवी! तुम्हाला काय वाटते?

पाहुणा संपादक : नीलकांत.

प्रतिक्रिया

धनंजय's picture

13 Oct 2008 - 6:46 am | धनंजय

चांगली धावती ओळख दिली आहे.

(एखाद्या वादग्रस्त विषयावर मुद्देसूद आणि पटण्यासारखे मत मांडायचा नीलकांत यांचा हातखंडा आहे. येथे फक्त माहिती दिलेली आहे, कुठलाही वाद स्पष्ट करून त्यावर आपली बाजू समजावून सांगितलेली दिसत नाही... :-( त्यामुळे पुढील प्रश्नोत्तरात हो-ला-हो असे सगळेच म्हणतील असे वाटते. वाद हा आहे, की भारतातले अनेक ऐतिहासिक प्रश्न, ऐतिहासिक वैतुष्ट्ये मनात आलीत, की राज्यघटनेवेगळी प्रमाणे विचारात घेतली जातात. यातील सर्वाधिक लाथाळलेला विषय म्हणजे "धर्मनिरपेक्षता" होय. आणखी एक घटनादुरुस्तीतून आलेला समाजवाद. घटनेतील आपल्याला न आवडणार्‍या कलमांचे उच्चाटन घटना-मान्य मार्गांनीच करायचे का? याबद्दल वाद आहेत. आपले जे विरोधक घटनाबाह्य मार्ग अवलंबतात, त्यांचा पायबंद घटना-मान्य मार्गांनीच करायचा काय? याबद्दल वाद आहेत. या सर्व वादांमध्ये साधारणपणे लोक राज्यघटनेची अवहेलना करतात.)

मात्र जी घटना आपल्या सगळ्या देशाचा कारभार चालवते तीची किमान ओळख तरी आपल्याला असायलाच हवी! तुम्हाला काय वाटते?

माझे उत्तर : होय

बेसनलाडू's picture

13 Oct 2008 - 6:59 am | बेसनलाडू

अशी ही आपली घटना हीचा धावता आढावा घेतो म्हटले तरी कठीण जाते. या विषयाबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. खास करून आपले मुलभुत अधिकार, आणिबाणी व तिचे प्रकार, भाषा, आपली स्वातंत्र्ये याबद्दल अधीक वाचने फार रोचक आहे. इंटरनेटवर आणि इतरत्र सुद्धा या विषयावर भरपूर लिहिलेलं सापडतं. ते कायदेशीर असल्यामुळे खुप लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र जी घटना आपल्या सगळ्या देशाचा कारभार चालवते तीची किमान ओळख तरी आपल्याला असायलाच हवी! तुम्हाला काय वाटते?
अगदी बरोबर. पण यासाठी संपादकांनी म्हटल्याप्रमाणे आंतरजालावरील विविध वाचनस्रोत, वाचनालयांमधील पुस्तके, शालेय अभ्यासक्रमांमधील नागरिकशास्त्राची पुस्तके असा विपुल साठा उपलब्ध आहे. अग्रलेखातून/संपादकीयातून त्याचा धावता आढावा घेणे अप्रस्तुत वाटले, त्यावर वेगळा गद्य लेख लिहिला असता तर चालले असते. संपादकीयात संपादकांचे संविधानाबद्दलचे स्वतःचे मत काय, संविधानातील कोणती कलमे/तरतुदी संपादकांना सामाजिक न्याय, लोकशाहीदी मूल्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या वाटतात, संविधानातील अशी काही वक्तव्ये/तरतुदी ज्यांमुळे कायद्यात अनेक पळवाटा तयार झालेल्या आहेत, ज्यांमध्ये कालानुरूप लवचिकता आणणे, बदल करणे इ. आवश्यक आहे त्या कोणत्या याबद्दल प्रकाश टाकता आला असता तर आवडले असते. केवळ सांख्यिक व ऐतिहासिक विदा उपलब्ध करून देण्याच्या नादात संपादकाने स्वतःचे मत मांडले नाही आणि संपादकीयातून त्यांना वाचकांना संविधानावरील साधकबाधक चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देता आले नाही, याचे थोडे वाईट वाटले. त्यामुळे संपादकीय लिहिण्याचा / मिसळपाववर ते सुरू करण्याचा हेतू किमान या संपादकीयातून तरी पूर्ण झालेला मला दिसला नाही. चू. भू. द्या. घ्या.
(वाचक)बेसनलाडू

सहज's picture

13 Oct 2008 - 7:10 am | सहज

तुझ्या अग्रलेखाची खूप वाट पहात होतो. पण सचिन पहील्याच ओव्हर मधे.... :-(

विषय उत्तम पण अपेक्षीत चर्चा, आकलन, दीर्घकाळ भिजत पडलेले प्रश्र [सीमा प्रश्र, महीला आरक्षण, जातीवर आधारीत आरक्षण, समान नागरी कायदा, स्थलांतर व भुमीपुत्रांचे अधिकार इ.] राज्यघटनेच्या आधारे सोडवणे सोपे की अवघड? आजच्या काळात राज्यघटना दुरुस्ती आवश्यक, अनावश्यक, कालावधी. हे वाचायला आवडले असते.

असे वाटते की पुढल्या सोमवारी तुझाच संपादकीय भाग दोन वाचायला मिळावा.

पिवळा डांबिस's picture

13 Oct 2008 - 9:05 am | पिवळा डांबिस

एक माहितीपूर्ण स्वतंत्र लेख म्हणून हा लेख श्रेष्ठ आहे यात काहीच वाद नाही...
पण संपादकीय म्हणून लिहितांना संपादकाकडून एकप्रकारचे मतप्रदर्शन/ टिप्पणी/ एक्स्ट्रापोलेशन अपेक्षित असते ते आढळले नाही...
भारताचे संविधान इतका मोठा विषय न घेता त्यातील एकाच मुद्द्यावर (उदा. धर्मनिरपेक्षता, केंद्र-राज्य संबंध वगैरे) अधिक सखोल फोकस केले असते तर कदाचित जास्त परिणाम झाला असता....

आमचे आपले प्रांजळ मत, नीलकांतजी, राग नसावा....
कदाचित तुमच्याकडून आमच्या अपेक्षा जरा जास्त असल्याने असे वाटले असेल...

आपला,
डांबिसकाका

भाग्यश्री's picture

13 Oct 2008 - 8:31 am | भाग्यश्री

वरच्या प्रतिसादांशी किंचित सहमत..
पण नेटवर ही सगळी माहीती असताना आपणाहून वाचणं होत नाही.. कधीच नाही! त्यामुळे मला वाचायला छान वाटलं, पण संपादकीयचा फील थोडा कमी आला..
ते काहीही असलं तरी ही सगळी माहीती इतक्या छान शब्दात लिहीली आहेस ना, की क्षणभर असं वाटलं, शाळेत नागरीकशास्त्राच्या पुस्तकाऐवजी हा लेख पाहीजे होता! :)

विसोबा खेचर's picture

13 Oct 2008 - 8:47 am | विसोबा खेचर

ते काहीही असलं तरी ही सगळी माहीती इतक्या छान शब्दात लिहीली आहेस ना, की क्षणभर असं वाटलं, शाळेत नागरीकशास्त्राच्या पुस्तकाऐवजी हा लेख पाहीजे होता!

हेच म्हणतो..

तात्या.

प्रियंका's picture

13 Oct 2008 - 8:48 am | प्रियंका

लेख आवडला!

यशोधरा's picture

13 Oct 2008 - 9:03 am | यशोधरा

छान लिहिले आहेस नीलकांत. आवडले, पण फक्त एक माहितीपर आढावा घेतल्यासारखे वाटले. अर्थात, तेही महत्वाचे आहेच, तरीही संपादक या नात्याने देशाची सद्यस्थिती आणि त्या अनुषंगाने घटनेची होणारी पायमल्ली - होत असेल तर - तसेच आजचे देशासमोरचे प्रश्न घटनेच्या चौकटीत सोडवता येतील का, ह्यावर संपादकांचे मत आले नाही. :(

या लेखाचा दुसरा भाग येणार आहे का?

>>जी घटना आपल्या सगळ्या देशाचा कारभार चालवते तीची किमान ओळख तरी आपल्याला असायलाच हवी! तुम्हाला काय वाटते?

हो, खरं आहे.

वैशाली हसमनीस's picture

13 Oct 2008 - 9:17 am | वैशाली हसमनीस

नीलकांतजी, आपला माहितीवजा लेख चांगला आहे.पण 'मि.पा. संपादकीय'मध्ये संपादक कुठेच दिसला नाही.तो दिसणे आवश्यक होते.

माहितीपूर्ण धावता आढावा. आवडला! काहि नवी माहितीदेखील कळली. आभार!

मात्र जी घटना आपल्या सगळ्या देशाचा कारभार चालवते तीची किमान ओळख तरी आपल्याला असायलाच हवी! तुम्हाला काय वाटते?

होय. अर्थातच.

माझ्या मते अग्रलेख हा दरवेळी संपादकाचे मत असलेपाहिजे असे नाहि. साधारणतः ते तसे असावे मात्र अपवादात्मक प्रसंगी अग्रलेख हा आढावा घेणाराही असतो/असावा. मात्र असा आढावा घेण्यासारखे आज / नजीकच्या भविष्यात काहिही प्रसंग/कारण नाहि; त्यामुळे संपादकाची मते, काहि प्रश्नांचा उहापोह आला असता तर संपादकीय अधिक परिपूर्ण वाटले असते.
त्यात सहजराव म्हणतात त्या मुद्यांबद्द्लची मते महत्त्वपूर्ण होतीच. त्यामुळे या धावत्या आढाव्या नंतर

असे वाटते की पुढल्या सोमवारी तुझाच संपादकीय भाग दोन वाचायला मिळावा.

याच्याशी पूर्ण सहमत.

काहि शंका:

  • श्री राजेंद्र प्रसाद हेच पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद? का कोणी वेगळे?
  • २६ जानेवारी १९५६ ला संविधान लागु झाले का १९५०ला?

-ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

13 Oct 2008 - 12:20 pm | स्वाती दिनेश

घटनेची ओळख आवडली..पण वरील काही मतांप्रमाणेच 'संपादकीय' फिल आला नाही,
असे वाटते की पुढल्या सोमवारी तुझाच संपादकीय भाग दोन वाचायला मिळावा.
याच्याशी पूर्ण सहमत.
ऋषिकेशसारखेच म्हणते.
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2008 - 12:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वरच्या लोकांप्रमाणेच माझंही मत आहे की तुम्ही दुसरा लेख लिहाच!

आनंदयात्री's picture

13 Oct 2008 - 11:29 am | आनंदयात्री

नीलकांत,

अग्रलेख माहितीपुर्ण आहे. संविधानासारख्या विषयावर मत प्रदर्शित करण्यासाठी प्रचंड व्यासंग पाहिजे, अभ्यास पाहिजे हे जाणुन तु मतप्रदर्शनाचा मोह टाळला आहेस असे जाणवले. हा असा उत्तम पायंडा पाडल्यावद्दल अभिनंदन. भल्याभल्यांना असे मोह आवरत नाहीत, तुझ्या विनम्रतेला सलाम !!
अन मिपाला एक उत्तम अग्रलेख्/संपादकिय दिल्याबद्दल शतशः धन्यवाद.

-आनंदयात्री

रामदास's picture

13 Oct 2008 - 12:28 pm | रामदास

अपेक्षा जास्त आहेत.त्यामुळे लेख आवडला असला तरी अपूर्ण वाटला.

विजुभाऊ's picture

13 Oct 2008 - 1:03 pm | विजुभाऊ

एक उत्तम माहितीपूर्ण लेख.
या आठवड्याचे संपादकीय यातून वेगवेगळे वैविध्यापूर्ण लिखाण समोर येतंय

विसोबा खेचर's picture

13 Oct 2008 - 6:28 pm | विसोबा खेचर

अवांतर - होऊन गेलेल्या संपादकांव्यतिरिक्त जी मंडळी उत्तम संपादकीय लिहू शकतील अश्या बर्‍याच लोकांना विचारलं, परंतु प्रत्येक जण काहीना काही कारणामुळे बिझी आहे.

आता पुन्हा एकदा होऊन गेलेल्या संपादकंपैकीच कुणाला तरी अग्रलेखाबद्दल विचारावे लागेल...

त्यांनी होकार दिला तर उत्तमच आहे, अन्यथा नाईलाजाने हे सदर बंद करावे लागेल याचे वाईट वाटते!

असो, एक चांगलं सदर काही काळ चालवू शकलो याचा आनंद वाटतो...! हे सदर बंद करायची वेळ येऊ नये असे मनापासून वाटते..

असो, कोणतीच गोष्ट कायमस्वरुपी टिकत नसते हेही तितकंच खरं!

हे सदर आजपर्यंत यशस्वी केल्याबद्दल सर्व मिपाकरांचे मनापासून आभार...

तात्या.

सर्वात प्रथम मी आमचे स्नेही श्री नीलकांत यांचे अभिनंदन करतो. अतिशय समतोल आणि आपल्या सर्वांना अभिमानच वाटेल अश्या स्वरुपाचे लिखाण आज वाचायला मिळाले. इतका रुक्ष विषय इतक्या मनोरंजक आणि ओघवत्या भाषेत लिहिल्यामूळे माझा श्री नीलकांत यांचाबद्दल आदर शतगुणित झाला आहे.

मुख्य म्हणजे त्यांनी साचेबद्ध विचारसरणीलाच छेद दिला आहे, ते कदाचित कोणाला जमले असते का याबद्दल मी साशंक आहे.

नीलकांतजी, आपला व्यासंगाचा उपयोग फक्त येथेच अडकुन न पडता आपण यावर सार्वजनिक भाषण केले पाहिजे अशी माझी शिफारस आहे.

श्री तात्या : आपण मध्येच असा निराशेचा सुर का लावता हेच मला समजत नाही. संपादकीय ही मिपाची खासियत आहे आणि ती चालवत रहावे ही आमची आग्रहाची विनंती.

परत एकदा खुपच सुंदर संपादकीय वाचण्यात आल्याबद्दल मिपाच्या सर्वच चमूचे अभिनंदन करावेसे वाटते.

छोटा डॉन's picture

13 Oct 2008 - 7:51 pm | छोटा डॉन

अवघड व किचकट विषयात सोप्या भाषेत लिहण्याची परंपरा निलकांतने कायम ठेवली ...
महत्वाच्या विषयाची सोप्या भाषेत ओळख करुन देणारा एक उत्तम अग्रलेख ....

इंटरनेटवर आणि इतरत्र सुद्धा या विषयावर भरपूर लिहिलेलं सापडतं. ते कायदेशीर असल्यामुळे खुप लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र जी घटना आपल्या सगळ्या देशाचा कारभार चालवते तीची किमान ओळख तरी आपल्याला असायलाच हवी!

समहत आहे. ओळख हवीच ...
चांगले काम केलेस ....

अवांतर : ह्याच स्वरुपाचे लेख मुलांना वाचायला दिल्यास त्यांचे या विषयाबद्दल ज्ञान वाढण्यास मदत होईल ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सुनील's picture

13 Oct 2008 - 9:26 pm | सुनील

एक उत्तम माहितीवजा लेख. पण संपादकीय म्हणून किंचित निराशा. संपादकीयात लेखकाने स्वत:ची मते मांडावीत अशी माझी अपेक्षा आहे.

घटनेची (का कुणास ठाउक पण संविधान हा शब्द फारच बोजड वाटतो बॉ!) जुजबी माहिती प्रत्येक नागरीकास असावी का?
माझे उत्तर होय.

भारताची घटना निर्मिती आणि घटनेनुसार झालेली राजकीय वाटचाल हा तिसर्‍या जगातील नवस्वतंत्र देशांच्या इतिहासातील एक चमत्कार मानला जातो. एक राष्ट्र (नेशन स्टेट) म्हणून प्रथमच उदयास आलेल्या, असंख्य जाती-धर्म-भाषांत विभागलेल्या लोकसमुहांना एका धाग्यात बांधणे ही बाब वाटते तितकी सोपी नक्कीच नाही. पण ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट भारताने तब्बल सहा दशके यशस्वीपणे करून दाखवली आहे. अर्थात याचे बव्हंशी श्रेय हे स्वातंत्र्य चळवळ ज्या पद्धतीने चालवली गेली त्याच्याशी निगडीत आहे, पण हे विषयांतर झाले.

आपल्या घटनेची अजूनही काही वैशिष्ठ्ये सांगता येतील -
१) राष्ट्र आणि सरकार विभागणी -
राष्ट्रप्रमुख (हेड ऑफ द स्टेट) आणि सरकारप्रमुख (हेड ऑफ द गवर्मेन्ट) ही दोन वेगळी पदे. दोन्हीही पदांसाठी निवडणूक होते. एकात थेट तर दुसर्‍यात अप्रत्यक्ष.

अमेरीकेत ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीच्या हातात एकवटलेली असतात तर ग्रेट ब्रिटनमध्ये राष्ट्रप्रमुख हे पद वंशपरंपरागत पद्धतीने येते. तेथे निवडणूक नसते.

ही दोन्ही पदे वेगवेगळ्या व्यक्तींकडे असल्यामुळे सत्तेचे संतुलन साधण्यास मदत होते (होतेच असे नाही!) पण होऊ शकते. आणि मुख्य म्हणजे तीनही सैन्यदले ही राष्ट्रप्रमुखाच्या अखत्यारीत येतात.

२) घटनादत्त संस्था / पदे -
निवडणूक आयोग, लोकायुक्त, अल्पसंख्यांक आयोग इ. लोकशाहीत या पदांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहेच शिवाय ती घटनादत्त असल्यामुळे सत्ताधारी पक्षालाही मनमानी कारभार करण्यापासून रोखण्यात ती बर्‍याचदा यशस्वी ठरल्याचीही उदाहरणे आहेत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.