सायकल प्रवास - पुणे ते पोखले (वारणानगर, कोल्हापूर )- एक स्वप्नपूर्ती

अजित पाटील's picture
अजित पाटील in भटकंती
3 Jun 2017 - 11:36 am

नमस्कार मंडळी..

गेली २ वर्ष झाली सायकलचे थोडे वेड लागले आणि सायकल प्रवास सुरु झाला. अभियांत्रीकी पर्यंत पूर्ण शिक्षण सायकल ने केले नंतर १४ वर्ष नोकरीच्या मागे धावायला लागलो. त्यामुळे ७० किलोचा मी ८८ किलोचा कधी झालो कळालेच नाही. सर्व डाएट प्लॅन करून झाले पण ते फक्त काही दिवसांपुरतेच आणि नंतर ये रे माझा मागल्या प्रकार चालू व्हायचा आणि वजनाची गाडी पुढे पुढेच धावायची. दोन वर्षांपूर्वी माझे मित्र गजानन खैरे यांनी मला सायकलींग बद्दल सांगितले. तो दररोज आपले सायकलींग बद्दलचे फिटनेस अॅप चे फोटो व्हाट्सपवर पाठवत होता. सुरवातीला हे फोटो बघून दुर्लक्ष करत होतो पण नंतर विचार केला कि आपण पण सायकलींग सुरु करावे आणि हे सायकलींग चे वेड सुरू झाले.

दिवसा १० किमी सायकलिंग या गतीने सुरूवात केली आणि हळू हळू चक्क २०० किमीचा टप्पाही गाठला. या प्रवासामध्ये खुप सारे छान मित्र भेटत गेले आणि हा प्रवास आणखी मजेदार होत गेला. मिपाची ओळखपण सायकलिंग मुळेच झाली. मी प्रशांतसोबत सायकलने लोहगड ला गेलो होतो आणि त्या प्रवासात मिपा बद्दल समजले नंतर मोदक, सागर कल्पेश आणि बरेच मिपा सदस्य भेटले. मागील वर्षी मी पुणे ते गोवा सायकल प्रवास केला पण वेळेअभावी माझ्या गावी (पोखले) जाता आले नाही. ती रुखरुख कुठेतरी मनात बरेच दिवस घर करून होती. मी गावी जाण्याचा बेत आखात होतो पण काही ना काही कारणामुळे शक्य होत नव्हते

नुकतीच मुलांच्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती आणि आमचे कुटूंब कोल्हापूरला सुट्टीला गेले होते. जर आठवड्याचा शेवटी शनिवार व रविवार आमच्या इंडो सायकलिस्ट क्लबचा सायकलींगचा कोणता ना कोणता कार्यक्रम असतोच, पण येणाऱ्या शनिवार व रविवार काहीतरी वेगळा बेत आखायचा विचार करताना अचानक गावी जाण्याचा विचार मनात आला.अशा कडक उन्हाळ्यामध्ये सायकलने २४७ किमी एका दिवसात जायचे थोडे कठीणच वाटले. पण म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग तसे झाले आणि गावी जायचे ठरवले. सुरवातीला एकट्यानेच हा प्रवास करायचा ठरवले कारण माझा बेत नक्की ठरत नव्हता आणि ऐन उन्हाळामध्ये इतका लांबचा सायकल प्रवास कोणी येईल असे वाटले नाही. पण कदाचित माझ्यासारखे अजून कोणालातरी गावी जायची इच्छा असेल म्हणून मी माझी हि कल्पना आमच्या ICC अॅक्टिव्ह ग्रुप मध्ये टाकली आणि लगेचच मला गुणवंत आणि दत्तात्रय या दोन मित्रांचा चा होकार मिळाला. गुणवंतला इस्लामपूर आणि दत्तात्रयला तासगावला जायचे होत. म्हणजे मला इस्लापूर नंतरचा प्रवास एकट्यानेच करावा लागणार होता, पण तो किरकोळ प्रवास होता. माझा ग्रुप मधला निरोप पाहून आशिषही सोबत यायला तयार झाला आणि असे आमचे चार जणांचे मिशन कोल्हापूर ठरले .

प्रवास थोडा लांबचा असल्यामुळे मी शनिवारी सकाळी पहाटे ४ वाजता जायचे ठरवलं, कारण उन्हाच्या आधी आम्हाला जास्तीत जास्त प्रवास करता येईल आणि घरी लवकर पोचता येईल. पण गुणवंत माझ्याहूनही जास्त उत्साहाने म्हणाला कि आपण पहाटे ३ वाजता निघू आणि त्याला सगळ्यांनी होकार दिला. प्रवासाची सगळी तयारी झाली. सोबत आणखी एक टयूब, पंक्चर किट, टूल बॉक्स, पंप इत्यादी लागणारे साहित्य सगळयांनी घेतले जेणे करून प्रवासामध्ये काही अडचण येणार नाही. उद्या प्रवासामध्ये कुणालाही डिहायड्रेशन होऊ नये म्हणून आदल्या दिवशी सर्वाना भरपूर पाणी पिण्यास सांगीतले. गोवा प्रवासामध्ये बरेच काही अभिजितकडून शिकलो होतो. तो अनुभव पाठीशी होता पण त्यावेळी जास्तीत जास्त १८५ किमी चा प्रवास एका दिवसात केला होता. यावेळी कात्रज आणि खंबाटकी हे दोन घाट व जवळ जवळ २४७ किमी अंतर आणि १४०० मीटरची ऐकून उंची असे गणित होणार होते.

..आणि अखेर तो दिवस उजाडला २० मे २०१७ शनिवार सकाळी अडीचचा गजर वाजला आणि एकदम जाग आली. उठून सर्वाना व्हाट्स अॅप वर सुप्रभात चा मेसेज पाठवला आणि तयारीला लागलो थोड्या वेळाने गुणवंत आणि आशिष ने मेसेज वाचल्याचे व्हाटस अॅप वर कन्फर्म झाले. पण दत्तात्रयाचा काही निरोप मिळाला नाही म्हणून मी त्याला फोन केला पण त्याचा फोन बंद असल्याचे पलीकडून निरोप मिळाला. मला वाटले त्याने यायचा निर्णय बदलला म्हणून फोन बंद ठेवला असेल. मी तयारीला लागलो कारण आम्हाला ३:१५ ला डांगे चौकात भेटायचे होते. तेवढ्या आशिष चा फोन आला कि त्याच्या सायकलच्या पुढील चाकाचा टयूब च्या झडप मधून हवा जात आहे. मी त्याला झडप चेक करायला सांगून बाकीच्या तयारीला लागलो मला थोडा वेळ झाला होता. गुणवंतचा फोन आला 'ते दोघे ठरल्या प्रमाणे डांगे चौकात पोहोचले होते. मी त्यांना सांगितले आम्हाला थोडा वेळ लागेल तुम्ही प्रवास चालू करा आम्ही थोड्या वेळाने तुम्हाला गाठतो कारण दत्ताचा हा पहिलाच मोठा प्रवास होता आणि सुरवातीलाच कात्रजचा मोठा चढ होता. त्यांनी प्रवास चालू केला. मी भरभर आवरून सायकल घेऊन खाली आलो. आशिष ने तोपर्यंत टयूब बदली करत होता मी थोडी मदत केली आणि ३:४५ ला आम्ही आमचे फिटनेस अॅप स्ट्रावा आणि एंडोमोनोडो चालू करून व देवाचे स्मरण करून सायकल हाणायला सुरूवात केली.

गुणवंत आणि दत्ता पुढे गेले असल्यामुळे आम्हाला थोडे जलद अंतर कापायचे होते, त्यामुळे आम्ही जोर जोरात पाय फिरवू लागलो. गुणवंतला सांगितले कि तुम्ही कात्रज घाट पूर्ण करून थांबा, पण आम्हाला ३० मिनिट उशीर झाल्यामुळे आम्ही जवळ जवळ १० किमी पाठीमागे होतो. मी गुणवंतला सूचना केली कि, तुम्ही पुढे जाऊन आवडत्या शिरवळचा श्रीराम वडापाव हॉटेल ला जाऊन न्याहारी करायला सांगितले. आम्ही कात्रज चा घाट सर करायची तयारी सुरु केली आणि ५:३० वाजता आम्ही घाट पूर्ण केला. आशिष थोडा मागे होता त्यामळे मी त्याची वाट पाहत होतो. मी फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो पण अजून अंधारच होता. तसेच संधी प्रकाशात थोडे फोटो काढले आणि थोडयाच वेळातच आशिष हि पोहचला. आशिषने थोडी विश्रांती घेतली. नंतर आम्ही पुढील प्रवासाला सुरवात केली.


कात्रज चा नवीन बोगदा पार करून झाल्यावर उताराचा रास्ता आणि सकाळची थंड गार हवा यामुळे खुपच सुखद प्रवास सुरु झाला. कात्रज च्या चढाला आमचा सरासरी वेग कमी झाला होता, तो वाढवण्यासाठी सायकलचे टॉप गियर टाकले आणि सायकल सुसाट चालवू लागलो . येथून श्रीराम वडापाव अजून ३५ किमी होता. थोडे अंतर पार झाल्यावर आशिष थोडा मागे राहिला होता म्हणून मी त्याची वाट पाहत कांही फोटो काढले. आशिष आल्यावर पुढील प्रवास सुरु झाला.

मी श्रीराम स्टॉप ला ७:१५ ला पोचलो. तिथे गुणवंत आणि दत्ता त्यांची मिसळ ची न्याहारी आटपून तयारीतच होते. आम्ही जवळ जवळ ७० किमी चा प्रवास पूर्ण केला होता. त्यांना भेटून आनंद झाला कारण आत्तापर्याचा सर्वच प्रवास सुखरूप झाला होता. आम्ही सर्वांचा ग्रुप फोटो घेऊन त्या दोघांना सायकलिंग चालू करायला सांगितले, आम्ही पटकन न्याहारी करून पाठीमागून येतो असे सांगितले. कारण थोड्याच वेळात आम्हाला खंबाटकीचा घाट पार करायचा होता. तो पूर्ण झाला कि पुढील प्रवास तसा सोपा होता, कारण इतका मोठा चढ पुढे कुठेच नव्हता. मी हा घाट आधी दोन वेळा पार केला असल्यामुळे थोडा निवांत होतो पण बाकीच्या कुणीच यापूर्वी हा घाट पार केला नव्हता.



सायकलिंग सुरु करतो ना करतोच तोच गुणवंत चा फोन आला कि तो त्याच्या कारची किल्ली घरीच विसरून आला आहे. त्याला कार घेऊन परत यायचे होते त्यामुळे त्याला परत पुण्याला जावे लागणार होते. आम्ही सर्व पर्यायांची फोनवर चर्चा केली पण किल्ली साठी कोणताच पर्याय नव्हता आणि गुणवंतला इथून परत फिरावे लागणार होते. तो खुप नाराज झाला होता. मी त्याला सुचवले की तू खंबाटकी घाट पूर्ण करून परत जा म्हणजे घाट पार केल्याचा आनंद आणि त्याचा २०० किमी विक्रम पण पूर्ण होईल. त्याला हा मुद्दा पटला आणि त्याने घाट पार करायला सुरवात केली. मी हा घाट पार करायची तिसरी वेळ होती. पहिल्या वेळेला मी निम्मा घाट चालूनच पूर्ण केला होता. यावेळेला हा घाट न थांबता आणि दुसऱ्या वेळे पेक्षा लवकर पूर्ण करायचाच होता. घाटाची सुरवात झाली तेंव्हा जवळजवळ ८:१० झाले होते आणि सूर्य देवांनीआपली प्रखर किरणे पृथ्वी वरती पाठवायला सुरवात केली होती. घाटाच्या सुरवातीला सायकलिंग अवघड जात होते पण मनामध्ये वैयक्तीक सर्वोत्तम लक्ष्य गाठायचे होते. त्यामुळे मी जोर जोरात पेडलिंग सुरु ठवले. अर्धा घाट पूर्ण झाल्यावर डोंगराच्या कड्याचा थोडा थोडा फायदा होत होता. असे करत करत ८:४० ला मी घाट पूर्ण केला नंतर समजले कि मी २८ मिनिटामध्ये हा घाट पूर्ण केला होता. गुणवंत आणि दत्ता आधीच पोचले होते. त्यांनी जल्लोशात माझे स्वागत केले. आशिष आल्यानंतर आम्ही पुन्हा फोटोचा कार्यक्रम पूर्ण केला.


आता सकाळचे ९:३० झाले होते आणि आम्हाला आधीच्या नियोजनानुसार जवळ जवळ दीड तास उशीर झाला होता. आम्ही ठरवले होते ८ ला खंबाटकीला पोहचून उंब्रज किंवा कराडला दुपारी १२ पर्यंत पोहचायचे, म्हणजे थोडी विश्रांती घेऊन अंधाराच्या आधी घरी पोहचता येईल.

आम्ही गुणवंतला निरोप देऊन पुढील प्रवास चालू केला. आम्ही थोडे ढग येण्याची मनामध्ये प्रार्थना चालू केली पण बहुतेक आज आमची फिटनेस ची परीक्षाच सुरू आहे वाटत होते. कडक उन्हामध्ये सायकलिंग करणे खुपच अवघड जात होते. जवळचे पाणी भराभर पोटामध्ये जात होते. सकाळचा सुंदर प्रवास संपला होता आणि या कठीण प्रवासाला सुरवात झाली होती. अथक प्रयत्नांनी १०:४५ वाजता आम्ही वीरमाडे टोल नाक्याला पोहोचलो. टोल नाक्यावरची सर्व दुकाने हटवली गेली होती आणि आमच्या जवळचे सर्व पाणी संपले होते. जे शिल्लक थोडे होते ते उन्हाने उकळले होते. आता पाण्याची खुप आवश्यकता होती. थोडे पुढे गेल्यावर एक टपरी दिसली, न विचाराता सगळेच थांबले आणि थंड पाण्याचा बॉटल्स घेऊन घटाघटा पाणी पोटात ढकलले. तिथे विहिरीचे थंड पाणीही होते मग आम्ही छान हात पाय धुवून घेतले आणि थोडा आराम केला. जास्त वेळ आम्हाला तिथे थांबता येणार नव्हते. म्हणून पाण्याचा साठा घेऊन आम्ही पुढे कूच केले आणि १६ किमी चा प्रवास करून आम्ही ११:३० ला सातारा शहरामध्ये पोहोचलो.

आशिष आणि दत्ता ची वाट पाहत मी एका झाडाच्या सावलीमध्ये उभा होतो तिथेच मला हॉटेल मल्हार चा बोर्ड दिसला. मला अचानक आठवले कि हे हॉटेल माझ्या मित्राच्या पाहुण्यांचे असेल, मी लगेच अभय ला फोन केला आणि विचारले तेच हॉटेल आहे का आणि किती दूर आहे..? ते त्यांचेच हॉटेल होते. आता आम्हाला आणखी अंतर चालवायचे नव्हते. सकाळची न्याहारी हलकी केली होती त्यामुळे खुप भूक लागली होती. पुढे माहितीचे चांगले हॉटेल नव्हते आणि सकाळच्या १३० किमी अंतर पूर्ण केल्यामुळे पुढील १२० किमी प्रवासासाठी चांगल्या जेवणाची खुप गरज होती. मी प्रस्ताव मांडला थोडे पुढे जायचे का विश्रंती घेऊन जेवण करून पुढील प्रवासाला सुरवात करायची..? दोघांनी तात्काळ जेवणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आंम्ही लगेचच तिथे पोचलो. हॉटेल पहिल्या मजल्यावर असल्यामुळे आम्ही सायकली जिन्याने उचलून घेऊन गेलो आणि आमच्या नजरेसमोर ठेवल्या कारण सायकलवर बरेच साहित्य होते आणि या भागाची फारशी माहितीही नव्हती. सायकली पार्क करून आम्ही हॉटेल मध्ये प्रवेश केला. हॉटेल १२:३० नंतर चालू होते असे तिथल्या इसमाने सांगितले. आम्ही मालकांच्या ओळखीचे आहोत म्हटल्यावर आम्हाला आत येऊ दिले. त्याची तयारी चालू होती. आम्ही थोडे फ्रेश होऊन थोडे स्ट्रेचिंग केले.

तेथे चार्जिंगची सोय होती आम्ही आमचे मोबाइल आणि सायकलचे दिवे चार्जिंगला लावून दिले, कारण आम्हाला शेवटचा प्रवास अंधारात कारावा लागणार होता. थोड्याच वेळात हॉटेलचे मालक आले. आम्ही आधी चिकन थाळी सांगितली होती पण त्यांनी मटण थाळी सुचवली. जेवणाची ताटे आली. पाहताच प्रेमात पडावे अशी थाळी सजवून आमच्या समोर आली. गरम गरम भाकरी आणि मटण तांबडा रस्सा आणि सूप. अप्रतिम चव कि मन आणि पोट तृप्त झाले. जर तुम्हाला नॉन व्हेज आवडत असेल आणि तुम्हाला साताऱ्यामध्ये जेवण करायचे असेल तर तुम्ही या हॉटेलला नक्की भेट द्या. थोडी वामकुक्षी घेऊन हॉटेल मालकांना च्या बरोबर फोटो काढला आणि धन्यवाद देऊन आम्ही परत पुढील प्रवासाला सुरवात केली.

दुपारचे २ वाजले. हॉटेलचे जेवण नॉन व्हेज होते पण मसालेदार नसल्यामुळे पोट एकदम हलके होते पण सूर्य अजून तळपत होता त्यामुळे सुरवात एकदम संथ गतीने चालू झाली आणि लगेच सातारा खिंडीचा चढ चालू झाला. तो ३ किमीचा चढ ३० किमी चा वाटू लागला होता पण सांगतोय कुणाला.. सायकल तशीच रेटत कशीबशी खिंड पार केली. आणि लगेचच उतार सुरु झाला. शेवटी ३ वाजता १८ ते २० किमी अंतर पार करून एका झाडाखाली कलिंगडाच्या स्टॉल वर दत्ता थांबला होता. आम्ही कलिंगडावरही ताव मारला. आशिष आजून थोडा पाठीमागे होता कारण त्याचा पायामधे थोडे दुखायला लागले होते. दत्ताला कराडहून तासगावला जायचे होते. कराड ते तासगाव रस्ता अरुंद आणि दत्ता एकटाच होता त्यामुळे मी त्याला पुढे जायला सांगून आशिष ची वाट पाहत बसलो. दत्ता ने निरोप घेऊन पुढील प्रवास चालू केला. आशिष थोड्या वेळाने आल्यानंतर आम्ही दोघे बरोबर निघालो. आशिषचा पाय दुखायला लागला होता त्यामुळे मी त्याच्या सोबत सायकल चालवू लागलो. १० ते १२ कमी झाल्यावर ४ वाजता आम्ही एका रसवंती जवळ थांबलो. एका शेतकऱ्याने आपल्याच शेतात हा व्यवसाय चालू केला होता. आम्ही त्याला दोन ग्लास रस बनवलाय सांगून तिथे असलेल्या खाटेवर आमची पाठ विसावली. थोड्या वेळात भला मोठा काचेचा ग्लास समोर आला. फक्त १० ला एक ग्लास ऐकून आम्ही एकदम हैराण झालो इतका मोठा ग्लास.. इतका गोड़ रस फक्त १० रुपयाला. थोडा विसावा घेऊन आंम्ही निघण्याची तयारी चालू केली. उसाचा रस इतका गोड होता कि अजून एक एक ग्लास घ्यायचा मोह आम्हाला टाळता आला नाही.

१६ किमी अंतर कापत मी कराड मध्ये पोहचलो तेंव्हा संध्यकाळचे ६ वाजत आले होते आणि आशिष थोडा मागे होता. अचानक एक विचार आला कि माझा एक मित्र विनायक कराड मध्ये आहे. विचार केला कि जाता जाता त्याला भेटायचे. अलीकडे मी जिकडे सायकलने जातो तिथल्या मित्रांना आवर्जून भेट घेतो. मग काय फोन उचलून कॉल केला लगेच पलीकडून उत्तर मिळाले डी मार्ट जवळचा महामार्गावर त्याचे शॉप आहे. मग काय आमची स्वारी थेट विनयकच्या शॉप वर. इंजिनीरिंग पूर्ण झाल्या नंतर आम्ही प्रथमच भेटत होतो. दोघांना खुप आनंद झाला. थोड्या गप्पा झाल्यावर आम्हाला लगेच निघायचे होते, त्यामुळे फोटो घेऊन आम्ही पुढील प्रवास सुरु केला.

संध्याकाळचे ६:३० झाले होते अंधार पडू लागला होता आम्ही आमच्या सायकलचे दोन्ही दिवे चालू केले आणि भर भर रास्ता कापायला सुरवात केली. आशिषची ही पहिलीच २०० किमीची राईड होती. मी दोनशे किमी अंतरावर जाऊन आशिष ची वाट पाहत होता. बराच वेळ झाला तरी आशिष येत नव्हता त्यामुळे काळजी वाटू लागली त्यामुळे तिकडून येणार्या लोकांना विचारू लागलो. इतक्यात मला माझ्या बायकोचा फोन आला, कुठे आहात? सायकलने कुठे गेला होता सकाळी ? अशा प्रश्नांची सरबत्ती चालू झाली होती. कारण दुपार पासून फोन झाला नाही आणि सकाळी खंबाटकीला आलो आहे असे सांगितले होते. पण तिच्या भावाच्या मुलांनी मला वाई फाट्याजवल पहिले होते त्यामुळे अधिक चौकशी चालू होते, कुठे फिरता, कशाला इतक्या लांब सायकलने प्रवास करता इत्यादी इत्यादी. मी अजून तिला किंवा माझ्या घरच्यांना याची कल्पना नव्हती कि मी सायकलने घरी येत आहे. हो हो म्हणून बाकीच्या विषयावर बोलू लागलो.

थोड्याच वेळात आशिष आला मी त्याचे २०० किमी बद्द्ल अभिनंदन केले. थोडे पाणीही पिऊन आम्ही पुढील प्रवास सुरू करणार इतक्यात इंगळीचे एक गृहस्थ आमची चौकशी करायला थांबले. कुठून आला कुठे चालला आहे वगैरे चर्चा झाल्यावर त्यांनी सांगितले तेही सायकलिंग करतात आणि त्यांना त्याचा मुलाला सायकलिंग स्पर्धेसाठी तयार करायचे आहे अशी माहिती त्यांनी दिली. मी त्यांना आमच्या क्लब बदल माहिती दिली आणि त्याचा नंबर आणि कार्ड घेऊन नंतर ग्रुप मध्ये घेतो असे म्हणून त्यांचा निरोप घेऊन पुढील सायकलिंग सुरू केले. रात्रीचे ८ वाजले होते आम्ही कॅमेराला पोहोचलॊ होतो, आमच्या जवळील पाणी संपले होते त्यामुळे पाणी भरून आम्ही थेट किणी टोल नाका गाठला रात्रीचे ९:४५ झाले होते , स्वतःच्या भागात आलो होतो आणि आमच्या प्रवासाचा शेवटचा १४ किमी चा प्रवास राहिला होता.

खूप आनंद झाला होता पण अजून मिशन पूर्ण झाले नव्हते. आशिषला कोल्हापूर ला जायचे होते आणि मला वाठार वरून रत्नागिरीच्या दिशेने वारणानगरला जायचे होते. एव्हाना दत्ता त्याच्या घरी पोचला होता आणि त्याचा आवाजातून त्याचा आनंद समजून येत होता.

महामार्ग सोडल्यावर गावाकडचा रोड सुरु झाला. रोड खुपच खराब होता खुप खड्डे होते आणि आता सकाळपासून १७ तास सायकलिंग सुरू होते. कंटाळा बाजूला सारून परत जोरात सायकलिंग सुरु केले व थेट घराच्या दारात सायकल उभी केली. घरच्यांना थोडा वेळ काहीच कळेना मी अचानक सायकलने कसा आलो कारण मी मित्राच्या कार ने येत आहे असेच सांगितले होते. शब्दात व्यक्त करू शकणार नाही अश्या आनंदात मी घरी पाय ठवले दिवसभराच्या या मेहनतीचे यशामध्ये रूपांतरित झाले होते. छान थंड पाण्याने आंघोळ करून जेवण केले. आशिष चा पण इतक्यात फोन आला कि तो हि सुखरूप घरी पोचला होता. सर्व प्रवास परमेश्वरच्या कृपेने आणि सर्व मित्राचा शुभेच्छांमुळे सुरळीत पार पडला होता. आजच आई बाबाच्या लग्नाचा वाढदिवस होता. हा आजचा प्रवास मी त्यांना समर्पित केला.

अशा एका सुंदर प्रवासाची सांगता झाली होती. एकूण २४७.५ किमीचा प्रवास ऐकून १८ तासात (११ तास सायकलिंग) करून पूर्ण केला होता. खुप दिवसाचे स्वप्न पूर्ण झाले होते.

अजित पाटील

प्रतिक्रिया

एस's picture

3 Jun 2017 - 12:04 pm | एस

जबरदस्त. कीप इट अप.

कंजूस's picture

3 Jun 2017 - 12:14 pm | कंजूस

फार आवडली सायकल स्वारी.
परत कसे आलात?

टवाळ कार्टा's picture

3 Jun 2017 - 3:05 pm | टवाळ कार्टा

कहर आहे

मस्त हो अजित साहेब. अभिनंदन.
ICC बद्दल माहितीसाठी उत्सुक आहोत.

ICC बद्दल माहितीसाठी उत्सुक आहोत.

मी पण.

बाकी धाडसाबद्दल सलाम!!!

इंडो सायकलिस्ट क्लब हि आमची एक सामाजिक बांधिलकेने तयार झालेली संस्था आहे. समाजामध्ये सायकलिंग आणि स्वतःचा फिटनेस बद्दल लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि सर्वांनी नियमित काहीतरी व्यायाम करावा हा उद्देश आहे. आम्ही ७ लोकांनी तयार केलीली हि संस्था आता १२०० च्या वर संपूर्ण भारत भर सदस्य आहेत. आमचा संस्था मध्ये कोणीही सामील होऊ शकते आपल्या बरोबर आपले मित्र आणि घराच्या सदस्यना पण सामील करून घ्यावे त्यांना फिटनेस बदल प्रवृत्त करणे.
तसाच आमच्या एक उपक्रम आहे कि लोकांनी आठवड्यातून एकदा तरी ऑफिस ला सायकलिंग ने जाण्यास सुरुवात करावी जेणे करून आपण सर्व मिळून ह्या रहदारी चा जटिल प्रश्न सोडवण्यास मदत करू. आमचे बरेचशे सदस्य दररोज ऑफिस ला सायकलने जातात.
आमचा संस्थेबद्दल अधिक माहितीसाठी http://iccgogreen.org/ ला जरूर भेट द्या.

प्रशांत's picture

3 Jun 2017 - 5:57 pm | प्रशांत

मस्त लेख , मजबूत राईड

अभिजीत अवलिया's picture

3 Jun 2017 - 6:53 pm | अभिजीत अवलिया

जबरदस्त ...

प्रीत-मोहर's picture

3 Jun 2017 - 7:00 pm | प्रीत-मोहर

__/\__

स्पा's picture

3 Jun 2017 - 11:17 pm | स्पा

जबरदस्त मालक

धडपड्या's picture

3 Jun 2017 - 11:37 pm | धडपड्या

जबरी राईड ओ मालक...

पण हे असं लांब लांब फिरताना घरच्या कोणालातरी सांगीतलेलं बरं असतं... सरप्राईज वगैरे ठिक आहे, पण काळजी असतेच हो...

पुढच्या मोठ्या राईडला मोठ्या शुभेच्छा...

इरसाल कार्टं's picture

4 Jun 2017 - 10:17 am | इरसाल कार्टं

अजितदा तुम्ही ग्रेट आहात हो,
एवढ्या उन्हात हा पराक्रम म्हणजे कहरच कि.
आणि हो, ICC चं काम लै भारी चाललंय तुमचं. खूप खूप शुभेच्छा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jun 2017 - 3:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट !

राघवेंद्र's picture

4 Jun 2017 - 7:16 pm | राघवेंद्र

लय भारी !!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Jun 2017 - 7:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जबरदस्तं. परतीच्या प्रवासावरही एक लेख येउद्या.

भ ट क्या खे ड वा ला's picture

5 Jun 2017 - 12:15 pm | भ ट क्या खे ड वा ला

एका दिवसात इतके अंतर ते ही अशा उन्हाळ्यात ... खरच ग्रेट ...
तेव्हढे घरच्यांना विश्वासात घेऊन अशा साहसी मोहिमा करत जा, शेवटी आपली माणसे तीच असतात.
शनिवार रविवार ०३/०४ जून ला मी ही अंबरनाथ ते पिंपळे सौदागर व परत अंबरनाथ अशा दोन दिवसांत दोन सेन्चुर्या मारल्या.
स्पीड वाढण्या साठी काही तंत्र तुमच्याकडून शिकायला आवडेल.
तुमची सायकल कोणत्या प्रकारची आहे ते ही सांगा.

अजित पाटील's picture

5 Jun 2017 - 3:03 pm | अजित पाटील

हो फक्त काळजीपोटी घरी सांगितले नाही कारण दिवसभर त्यांना काळजी वाटेल. तसे शनिवार रविवार मी १०० किमी सायकलिंग करत असतो. मित्रांना सांगितले होते मोहिमेबद्दल आणि बरॊबर मित्र होत
माझी सध्या सायकल हायब्रीड प्रकारातील (Fuji Absolute 2.1 Hybrid Bike ) आहे जिचा सरासरी वेग तशी २० ते २८ किमी जाऊ शकतो.
स्पीड वाढवण्यासाठी नियमित सायकलिंग, सायकल ची सीट ची उंची आणि आपला फिटनेस महतवाचा आहे. सायकल पण थोडी चांगल्या कंपनीची असेल तर अजून उत्तम

पाटीलभाऊ's picture

5 Jun 2017 - 1:02 pm | पाटीलभाऊ

जबरदस्त...!

सूड's picture

5 Jun 2017 - 3:09 pm | सूड

भारीच!!

सिरुसेरि's picture

6 Jun 2017 - 7:37 pm | सिरुसेरि

जबरदस्त प्रवास लेख . +१ . वारणानगरला आला आहात तर वारणा लस्सी पिल्यावर थकवा निघुन जातो .

रंगासेठ's picture

7 Jun 2017 - 3:31 pm | रंगासेठ

लय भारी प्रवास वर्णन!

देशपांडेमामा's picture

8 Jun 2017 - 12:58 pm | देशपांडेमामा

मस्त प्रवास वर्णन!

ICC चा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे . मी भाग घेतलाय एक दोन राईड्समध्ये. राइड चे नियोजन फारच ऊत्तम असते :-)

कीप इट अप !!

देश

कलंत्री's picture

8 Jun 2017 - 3:00 pm | कलंत्री

फारच रोचकपणे लिहिले आहे. शाब्बास.

वेल्लाभट's picture

8 Jun 2017 - 3:02 pm | वेल्लाभट

अगागागागागा!
काय जबरदस्त मोहीम केलीत राव !

भारीच.. कहर भारी.

असं कधी जमणार आम्हाला .... श्या!

लव्हलीच. शुभेच्छा आणि कौतुक !

मार्गी's picture

2 Jul 2017 - 11:26 am | मार्गी

अ ति श य ज ब र द स्त . . .