हंपी: दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं - भाग १
हंपी: दिवस पहिला- राजवाडा परिसर- भाग २
हजारराम मंदिर
हजारराम मंदिर, विजयनगरच्या ऐन शाही परिसरातील हे मंदिर, साहजिकच हे बांधले गेले ते सम्राटांचे खाजगी मंदिर म्हणूनच. विजयनगरच्या संगम राजघराणातल्या देवराय दुसरा ह्याने हे मंदिर बांधले ते लहान स्वरूपात. तेव्हा मंदिर फक्त सभामंडप, अर्धमंडप आणि गर्भगृह इतकेच मर्यादित होते. नंतरच्या सम्राटांनी अधिकची भर घालून आजचे शिल्पसमृद्ध मंदिर आकारास आणले. हा देवराय दुसरा (१४२४ ते १४४६) हा संगम घराण्यातला एक सर्वश्रेष्ठ राजा. इराणवरुन आलेल्या अब्दुर रझाक ह्या प्रवाशाने ह्या देवरायाचे साम्राज्य गुलबर्गा ते श्रीलंका आणि ओरिसा ते मलबार इतके विस्तारित होते असे वर्णिले आहे. तर समकालीन युरोपियन प्रवासी निकोलो कोंतीच्या म्हणण्यानुसार ह्या देवरायाने श्रीलंका, ब्रह्मदेश, केरळ आणि तामिळनाडूतून खंडणी गोळा केली होती.
हंपीच्या भग्न अवशेषांत हजारराम मंदिर शोधणे तसे सोपे आहे. शाही परिसरातून अंतःपुरात जाणारा रस्ता हा हजारराम मंदिरावरुनच जातो. शाही परिसरातूनही हे मंदिर दूरवरुनही नजरेच्या टप्प्यात सतत येत असते. शाही परिसरात हिरवळ दिसते ती हजारराम मंदिर परिसरातच. हजारराम मंदिर तटबंद असून मंदिराच्या तटाच्या बाह्यभिंतींना विजयनगरच्या सैन्याचे शिल्पांकन केलेले असून आतील बाजूच्या भिंतींवर आणि मंदिराच्या बाह्यांगावरही रामायणातील प्रसंगांचे अंकन केलेले दिसते. हजारराम मंदिराचे स्थापत्य द्राविड पद्धतीचे असून सभामंडप (मुखमंडप), अंतराळ आणि गर्भगृह असून डाव्या व उजव्या बाजूस अर्धमंडप आहेत. मंदिराच्या डाव्या मागील बाजूस महामंडप असून (असे मुख्य मंदिरापासून बाजूस असलेले मंडप हंपीच्या बहुतेक सर्वच प्रमुख मंदिरात दिसतात) उजव्या बाजूस सालंकृत देवी मंदिर आहे. इथल्या मुखमंडपातील स्तंभ मात्र वालुकाश्मांचे नसून काळे कुळकुळीत दगडांचे (बहुधा ग्रॅनाइट) आहेत.
हजारराम मंदिराचे प्रवेशद्वार
मंदिरतटाच्या बाह्य भिंतीवर असलेले विजयनगरच्या सैन्याच्या शिल्पांकन
मंदिराच्या प्रवेशद्वारात एका बाजूला महिषासुरमर्दिनी तर दुसर्या बाजूस भैरव आहेत.
महिषासुरमर्दिनी व भैरव
-
मंदिराच्या आवारात पूर्वी एक स्तंभ होता असे दिसते पण सध्या केवळ स्तंभपीठ अस्तित्वात असलेले दिसते. प्रवेशद्वारातून आत येताच रामायणातील शिल्पांचा एक विस्तृत पटच नजरेसमोर उभा राहतो. पाच शाह्यांकडून जवळपास ६ महिने विजयनगर लुटलं जात असूनही इथलं अगदी थोडकी त्यातही मंदिराच्या मुखमंडपाच्या शिखरभागाची शिल्प सोडून इतर शिल्प भग्न नाहीत. ह्याचं कारण मात्र त्या शाह्यांच्या सरदारांमध्ये हिंदू सरदारही बरेच असावेत असे अनुमान काढता येते. अर्थात ही शिल्प जरी भग्न केलेली नसली तरी त्याचं उट्टं गर्भगृहातील मूर्ती भग्न करुन काढलेलं दिसतं कारण येथील बहुतांश प्रमुख मंदिरात गाभार्याती मूर्ती दिसत नाहीत. त्या एकतर भग्न केलेल्या असाव्यात किंवा किंवा गर्भगृहात गाय वगैरे मारुन मंदिर वाटवलं असावं त्यामुळे गावकर्यांनी मुख्य मूर्ती इतरत्र सुरक्षित ठिकाणी लपवल्या असाव्यात किंवा स्थापित केल्या असाव्यात. ह्याच कारणांमुळे प्रमुख विरुपाक्ष मंदिर आणि उड्डाण वीरभद्रासारखी काही लहान मंदिरे सोडली तर इकडील मंदिरात कुठेच नित्यपूजा होत नाही.
मुखमंडपाच्या शिरोभागावरची भग्न शिल्पे
मंदिराचे मुखदर्शन
मंदिररचना
रामंदिर व देवीमंदिर
मंदिरावरील शिलालेख व बांगड्यांची नक्षी
राममंदिर व देवीमंदिर मागील बाजूने
राममंदिर
चला आता मंदिराच्या बाह्य भिंतीवरील रामायणातील काही प्रसंग पाहूयात.
दशरथाकडून श्रावणाचा वध.
सर्वात खालच्या पट्टीकेत दिसतोय तो श्रावणबाळ आपल्या आंधळ्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेला चालला आहे. वाटेत त्यांना तहान लागली म्हणून तो तिथेच एका तलावावर पाणी भरण्यासाठी जात आहे , त्याच्या तांब्याच्या गुडगुडण्याने आवाज होऊन मृगयेसाठी आलेल्या दशरथाला कुणी जनावर पाण्यावर आलंय असा भास होऊन तो शब्दवेधाने बाण मारत आहे. तो बाण श्रावणाच्या वर्मी लागून तो मृत्युपंथाला लागलेला असून दशरथ अपराधी भावनेने त्याच्याकडे येत आहे. ह्याच्याच बाजूच्या शिल्पपट्टीकेत श्रावणाच्या वृद्ध आईबापांनी दशरथाला शाप दिल्याचे शिल्पांकन आहे.
श्रावणवध
पायसदान
राजा दशरथाने ऋषी ऋष्यश्रृंगांच्या साहाय्याने पुत्रक्कामनेपोटी पुत्रेष्टी यज्ञाचे अनुष्ठान केले. यज्ञातून एक दिव्य पुरुष प्रकट झाले आणि त्याने दशरथाला सुवर्णामयी भांड्यात पायस देउन ते राण्यांना अर्पण करण्यास सांगितले. खीरीचे सेवन करुन तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या. कौसल्येपोटी राम, सुमित्रेपोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकयीपोटी भरत जन्माला आला. पुत्र थोडे मोठे होताच ऋषि विश्वामित्र राक्षसवधांसाठी राम लक्ष्मणाची मागणी करण्यास दशरथाकडे आले.
ह्या छायाचित्रात डावीकडे यज्ञपुरुष (अग्नी) दशरथाला पायसदान करताना. येथे अग्नीची वृषभमुखी शिल्प कोरलेले आहे हे विषेश. ऋग्वेदात अग्नीला वृषभ म्हणलेले आहे (अग्नीवृष). मधल्या पटात दशरथ तिन्ही राण्यांना खीर देताना व सर्वात डावीकडे विश्वामित्र दाशरथींची मागणी करताना.
अगदी हाच प्रसंग मंदिराच्या तटाच्या आतील बाजूस देखील कोरलेला आढळतो. अर्थात हे शिल्पांकन विजयनगरच्या देवरायानंतरच्या राजांच्या काळात झालेले आहे हे आधी सांगिलेलेच आहे.
अहिल्योद्धार आणि राक्षसवध
मारीच आणि सुबाहू हे राक्षस विश्वामित्राच्या यज्ञात सतत विघ्न आणत असल्याने विश्वामित्राने दशरथाकडून त्याचे दोन पुत्र राम लक्षण राक्षसवधासाठी मागून घेतले आहेत. विश्वामित्र आश्रमाच्या वाटेवर असताना वाटेत गौतमाच्या शापाने शिळा झालेल्या अहल्येचा रामाच्या स्पर्शाने उद्धार होतो व त्या शिळेवाटे अहल्या आपल्या मूळच्या स्त्रीरुपात प्रकट होते.
राम लक्ष्मणांकडून सुबाहू आणि इतर राक्षसांचा वध होताना. मारीच मात्र जखमी होऊन लंकेला पळून जातो.
सीतास्वयंवर.
राक्षसवधानंतर विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीत येतात. तिथे विश्वामित्राच्या आज्ञेने सीतास्वयंवरासाठी शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावणे हा पण पूर्ण करण्यासाठी राम धनुष्य उचलून प्रत्यंचा लावण्यास जाताच धनुर्भंग होतो. सीता रामाचा पती म्हणून स्वीकार करते.
बालकाण्डातील हा संपूर्ण प्रसंग असलेला शिल्पपट
कैकयी प्रसंग
चारही भावांचे विवाह होऊन श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी अयोध्येत सुरु होते त्याच वेळी मंथरा कैकयीचे कान भरते आणि भरतासाठी राज्यपद व रामाला वनवास हे दोन वर दशरथाकडे मागण्यास प्रवृत्त करते.
कैकयी आणि मंथरा ---------------------------------------------------------------------------------------------------------कैकयी आणि दशरथ
-
सीताहरण
शूर्पणखेचे नाक कान लक्ष्मणाने छाटल्यावर ती खर दूषण आदी राक्षसांना राम लक्ष्मणांना खाऊन टाकण्यास सांगते. खर-दूषणासहित १४ सहस्त्र राक्षसांचा राम लक्ष्मण संहार करतात त्यामुळे शूर्पणखा रडत रडत लंकेत रावणाकडे जाऊन रामाला मारण्यास सांगते, रावण बधत नाही हे पाहून ती शेवटी सीतेच्या अप्रतिम सौंदर्याचे वर्णन करुन रावणाच्या मनात सीतेविषयी अभिलाषा उत्पन्न करते. लंपट रावण मारीचाला मायावी रूपाने रामास सीतेपासून दूर नेण्यास सांगतो व एकाकी सीतेला पळविण्यास प्रवृत्त होतो.
मायावी कांचनमृगाला पाहून सीता त्याजवर आकर्षित होते व हट्टाने रामास त्या मृगास धरुन आणण्यास फर्मावते. मायावी सुवर्णमृग रामाच्या बाणाने घायाळ होऊन "धाव लक्ष्मणा" असा आर्त टाहो फोडून सीतेचे हृदय विकल करतो. व्याकुळ सीता तिच्या संरक्षणासाठी थांबलेल्या लक्ष्मणाला रामाच्या मदतीला जाण्यास सांगते. सीतेची आज्ञा प्रमाण मानून त्याच वेळेस रावण एका साधूचे रूप घेऊन सीतेच्या कुटीसमोर येतो व भिक्षेच्या मिशाने तिचे हरण करतो. सीतेला पळवून नेत असतानाचा जटायु सीतेला वाचवण्यासाठी रावणावर झडप घालतो व रावण आपल्या खड्गाने जटायुचा वध करतो.
सुवर्णमृगाला पाहून सीतेचे आकर्षित होणे व रामाच्या समजावण्यारही तिने हट्टाने रामाला त्याला धरुन आणण्यास पाठवणे.
सुवर्णमृगाचा वध व राम लक्ष्मणांची भेट
रावण साधूवेषाने येऊन सीतेचे हरण करतो
जटायुवध
वालीवध
सीताहरणानंतर शोकाकुल अव्स्थेतील राम लक्ष्मण ऋष्यमूक पर्वताजवळ येतात. त्या शस्त्रधारी वीरांना पाहून भयभीत झालेला सुग्रीव हनुमानास श्रीरामांची भेट घेण्यास पाठवतो. सुग्रीव आणि श्रीराम ह्यांमध्ये मैत्र उत्पन्न होऊन सुग्रीवाची पत्नी रुमाला बळकावून आणि त्याला राज्याबाहेर हाकलून किष्किंधेत असलेल्या वालीला मारण्याची ऋष्यमूक पर्वतावरील वानरराज सुग्रीव श्रीरामाला विनंती करतो व सीतेचा शोध घेण्याच्या कामी मदत करण्याचे आश्वासन देतो. त्याच वेळी वालीच्या सामर्थ्याला भिऊन असलेला सुग्रीव रामाच्या बलाची परीक्षा घेतो. ती परीक्षा म्हणजे मातंग पर्वतावरील महाप्रचंड दुंदुभी दैत्याचा सांगाडा दूर फेकणे व त्यानंतर एकाच वेळी सात साल वृक्षांमधून तीर मारणे. रामाने हा पराक्रम अगदी सहजी केल्याचे पाहून सुग्रीव वालीवधाविषयी निश्चिंत होऊन किष्किंधेत जाउन त्याला ललकारतो. त्यांचे द्वंद्वयुद्ध चालू असतानाच राम वृक्षाआडून बाण मारुन वालीवध करतो व मरणोन्मुख वालीला उपदेश करतो.
श्रीराम लक्ष्मणांची हनुमान भेट. (इथे अर्धचंद्र बाणाची प्रतिमा उल्लेखनीय आहे)
रामाची सुग्रीवाकडून परिक्षा (उजवीकडे), मध्यभागी मरणोन्मुख वालीला उपदेश करताना राम, शेजारी रडत असलेली वालीपत्नी तारा व कुमार अंगद
अशोकवन प्रसंग व सेतूबंधन
सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमान दक्षिण समुद्र उल्लंघून लंकेत येतो. तेथे अशोकवाटिकेत सीतेची भेट घेतो व लवकरच श्रीराम सैन्यासह येऊन तुझी सुटका करतील असे बोलून सीतेस आश्वस्त करतो. आपली ओळख पटवैण्यासाठी सीता आपला चूडामणी हनुमानास देते, तदनंतर अशोकवनाचा विध्वंस करुन हनुमान किष्किंधेस परत येतो.
सीता आपला चूडामणी हनुमानास देताना
सीतेचा शोध लागल्यामुळे आनंदित झालेले श्रीराम वानरसैन्यासह समुद्रावर दगडांचा सेतू बांधून लंकेवर चालून जातात.
सेतूबंधन
युद्धकाण्ड
वानरसैन्याचे रावणाच्या राक्षससेनेबरोबर तुंबळ युद्ध होते. १० दिवस युद्ध चालून देवांतक, नरांतक, अतिकाय, प्रहस्त, कुंभकर्ण, इंद्रजित असे महान रावणसेनाधिपती एकेक करुन मारले जातात व दहाव्या दिवशी रामाच्या हस्ते रावणवध होतो.
युद्धातील काही प्रसंग
युद्धातील काही प्रसंग
युद्धातील काही प्रसंग
रावणवध
देवीमंदिरात लवकुशांची शिल्पे देखील आहेत असं समजलं होतं पण दुर्दैवाने त्याचा गाभारा बंद असल्याने ती काही पाहता आली नाहीत.
शिल्पपटांची रचना
शिल्पपटांची रचना
शिल्पपटांची रचना
येथे रामायणातील शिल्पे जरी सर्वाधिक असली तरी काही मोजकी शिल्पे कृष्णाची देखील आहेत.
विविध शिल्पे
बाळकृष्ण, विष्णू, हनुमान अशी शिल्पे
अष्टभुज श्रीकृष्ण
ही सर्व शिल्पे बाह्य बाजूने बघत बघत आम्ही मंदिराच्या सभामंडपात गेलो. सभामंडपतले काळे कुळकुळीत स्तंभ उल्लेखनीय आहेत. स्तंभावर विष्णूचे अवतार, कृष्ण आदी प्रतिमा कोरलेल्या आहेत.
सभामंडप
स्तंभावरील विष्णूचा भविष्यातील १० वा अवतार कल्कीची प्रतिमा. हाती ढाल, तलवार, शंख, चक्र धारण करुन कल्की घोड्यावर आरुढ आहे.
कृष्ण आणि विष्णू
-
गाभारा कुलूपबंद असल्याने आत जाता आले नाही पण आतमध्ये एक पीठासन असून त्याजवर तीन खड्डे आहेत अशी माहिती समजली त्यावरुन येथे पूर्वी राम, लक्ष्मण आणि सीतेच्या प्रतिमा होत्या हे सहज समजते.
देवीमंदिर
मंडप
विजयनगरच्या मंदिरातील उल्लेखनीय प्रकार म्हणजे मंदिराच्या बाजूस असलेले मंडप. ते येथेही आहेत. मंडपात राजाची प्रजेबरोबर भेट, देवाच्या नैवेद्यासाठी पाकसिद्धी, यात्रेकरुंच्या विश्रामासाठी व्यवस्था अशा विविध सोयी केलेल्या असत. बहुतेक मंडपांना कल्याणमंडप असे संबोधले जाते.
कल्याणमंडप
मंडप
हजारराम मंदिरात देखील दगडी पाईपांद्वारे पाणी खेळवले होते, पाणी साठवण्यासाठी येथे एक लहानशीच परंतु १०/१२ पुरुष खोल विहिर खणण्यात आली होती जी आजही येथे अस्तित्वात आहे.
ही ह्या मंदिरावरील काही मोजकी शिल्पे. रामायणातील इतरही शेकडो शिल्पे येथील भिंतींवर आहेत पण विस्तारभयास्तव सर्वांचे वर्णन तसेच छायाचित्रे येथे देता येणे शक्यच नाही.
हजारराम मंदिर बघून आम्ही बाहेर आलो. मंदिराच्या समोरच एक ध्वजस्तंभ आहे. ते ठिकाण म्हणाजे पान सुपारी बाजार.
पान सुपारी बाजार.
पान सुपारी बाजार हे हंपीतील प्रमुख बाजारांपैकी एक. इतर प्रमुख बाजार म्हणजे विरुपाक्ष मंदिरासमोरील हंपी बाझार, कृष्णपुर्यातील कृष्ण बाजार, विठ्ठलपुर्यातील विठ्ठल बाजार आणि अच्युतराय मंदिरासमोरील सुले बाजार. पानसुपारी बाजाराचा उल्लेख देवरायाच्या एका शिलालेखात आढळतो. आज येथे फक्त भग्न अवशेष आहेत. पान सुपाॠ बाजार ओळखण्याची प्रमुख खूण म्हणजे येथे एक उंच ध्वजस्तंभ आहे. ध्वजस्तंभाच्या बाजूलाच पूर्वीच्या बाजारपेठेचे अवशेष आहेत.
ह्या बाजारपेठेला पान सुपारी बाजार नाव पडण्याचे कारण बहुधा येथे पूर्वी सुपारीची भरपूर झाडे होती हे असावे. विजयनगरला भेट देणार्या परकीय प्रवाशांनी येथील रहिवाश्यांचे पान खाण्याचे वर्णन केले आहे. त्यात येथील लोक एक प्रकारचे पान खाउन स्वत:ची तोंडे लाल करुन घेतात असे लिहिलेले आहे. आजही येथे सुपारीची झाडे आहेत.
पान सुपारी बाजारातील ध्वजस्तंभ
पान सुपारी बाजाराचे अवशेष
पान सुपारी बाजाराचे अवशेष
इतकं सगळ बघून होईता दुपारचे जवळपास अडीच तीन वाजले होते. आता जेवण करुन जायचे होते ते हंपीपासूनच जवळच असलेले एक अनोखे आकर्षण बघायला. ते म्हणजे भारतातील एकमेव असलेले अस्वल अभयारण्य. अर्थात दरोजी स्लॉथ बेयर पार्क. त्याविषयी पुढच्या भागात.
क्रमशः
प्रतिक्रिया
24 May 2017 - 1:28 pm | एस
चांगले आहे मंदिर. पुभाप्र.
24 May 2017 - 1:39 pm | जगप्रवासी
मुर्त्यांचे फोटो आणि त्यांचे वर्णन खूपच छान. तुमचे लेख वाचायला मजा येते. खूपशी माहिती मिळते.
रामायणातील इतरही शेकडो शिल्पे येथील भिंतींवर आहेत पण विस्तारभयास्तव सर्वांचे वर्णन तसेच छायाचित्रे येथे देता येणे शक्यच नाही.>> लिहा ना त्यावर सुद्धा.
27 May 2017 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहा. विस्तारभयाची काळजी करु नका.
-दिलीप बिरुटे
24 May 2017 - 1:51 pm | अभ्या..
अप्रतिम शिल्पकला. अगदी अप्रतिम.
सीतास्वयंवरप्रसंगी धनुष्याला प्रत्यंचा लावणार्या रामाची पोझीशन वेगळीच वाटली. आधी पायाच्या अंगठ्यात धनुष्याचे खालील टोक पकडून प्रत्यंचा चढवायची पोझ परिचित होती पण ही आदीवासींप्रमाणे गुडघ्याने धनुष्य वाकवायची स्टाईल एकदम हटके आहे.
24 May 2017 - 1:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फोटो आणि शिल्पपटांचे विस्तृत वर्णन आवडले.
हे भव्य मंदीर त्याच्या वैभवकाळात किती आकर्षक असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.
26 May 2017 - 2:52 am | रुपी
+१
24 May 2017 - 2:16 pm | सूड
पुभाप्र!!
24 May 2017 - 2:29 pm | पैसा
सुंदर!
24 May 2017 - 2:31 pm | कंजूस
हे मंदिर राजवाड्याच्या बाजुलाच आहे परंतू याची नासधूस केलेली नाही. कारण बहुतेक मूर्ती तोडण्याचा हेतू नव्हता अथवा तो विरोध कमी झालेला होता. शिवाय इकडच्या देवरायाच्या सैन्यातही मुसलमान सैनीक होतेच॥
छान आहे.
24 May 2017 - 6:06 pm | पद्मावति
अद्भुत आहे हे. पु.भा.प्र.
24 May 2017 - 8:29 pm | यशोधरा
सुरेख!
25 May 2017 - 6:41 am | अत्रुप्त आत्मा
मससससस्त.. .!
25 May 2017 - 9:49 am | नि३सोलपुरकर
अप्रतिम आणि सुरेख वर्णन .
प्रचेतस राव __/\__ .
पुलेशु .
25 May 2017 - 10:52 am | दुर्गविहारी
मस्तच माहिती. या सगळ्याच भागांची मिळून एक पि.डी. एफ. करा आणि महाराष्ट्रातून जाणार्या पर्यटकांना टुर गाईड म्हणून द्या असे मी एम.टि.डी.सी. ला सुचवितो. आता हंपीला जायच्या तयारीला लागतो.
27 May 2017 - 10:33 pm | यशोधरा
वल्लीचे नाव टाका म्हणावं त्या पीडीएफ वर लेखक म्हणून, नाहीतर खपवतील माल फुकाचे स्वतःच्या नावावर एमटीडीसीवाले!
27 May 2017 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संगम घराण्यातला श्रेष्ठ राजा देवराय दुसरा त्याचं कर्तुत्व वाचतांना छान वाटलं. मंदिरातील रामायण शिल्प अतिशय सुंदर. आपण रामायण सांगत आहात आणि आम्ही श्रोते एकेक ते पाहात आहोत असा अनुभव आला. आपण वर्णन करायचं आणि ते शिल्प आम्ही वाचकांनी तपशीलवार बघायचे. अतिश सुंदर लेख मालिका लिहित राहा. शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
27 May 2017 - 9:31 pm | चौथा कोनाडा
प्रचेतस सिरिज अप्रतिम चित्रलेख !
हंपीमधील हजारराम मंदिराविषयी फोटोंसहित प्रथमच वाचण्यात आले. थक्क करणारी मंदिर रचना अन राम-चरित्र शिल्प-पट !
पानसुपारी बाजार देखिल क्लासिक !
अस्वल अभयारण्याविषयी वाचण्याची उत्सुकता वाढली आहे !
30 May 2017 - 10:27 am | vikrammadhav
अजून येऊ देत !!!
आणि विस्तारभयाची काळजी करू नका .....विस्तार होउ दे , आम्ही वाचायला तयार आहोत ,
आपल्याच देशाचं वैभव आहे हे !!
2 Jun 2017 - 7:06 am | चौकटराजा
मंदिरे तर हम्पीची खासच आहेत तसेच आजूबाजूचा परिसर विविध आकारांच्या शिळांनी व्यापलेला आहे. त्यातील सापटीमधून पलिकडे जाण्याची मजा औरच आहे. त्याचे फोटो काढले की नाही. नदीवर एक पुरातन पूलही आहे. ( आता फक्त अवशेष ). बाकी शिल्पांचे तपशील हा खास प्रचेतस टच ! मस्त !
3 Jun 2017 - 1:55 pm | प्रचेतस
धन्यवाद काका.
त्या अजस्त्र शिळा खूप भारी आहेत. मात्र हंपीला जाउनही वेळेअभावी तुंगभद्रेचं दर्शन घेणं राहिलंच. पुलाचे अवशेष, बुक्करायाने बांधलेले धरण हे सर्व बघायचं राहिलंय. पुढच्या भेटीत नक्की.
3 Jun 2017 - 12:29 pm | निशाचर
हा भाग मस्तच झालाय. अष्टभुज कृष्ण आवडला. सभामंडपातले काळे स्तंभ तर अप्रतिम आहेत.
पुभाप्र
7 Sep 2017 - 9:57 am | प्रीत-मोहर
याचा पुढचा भाग कधी येतोय?
7 Sep 2017 - 12:34 pm | प्रचेतस
लिहिन लवकरच.