आगरी विवाहसोहळ्यातील पारंपरिक वडे

जागु's picture
जागु in पाककृती
18 May 2017 - 3:10 pm

आगरी जमातीमध्ये लग्न म्हणजे एक धुमशान सोहळा. दाग-दागिने, थाट-माट, असंख्य पाहुण्यांची गजबज त्याच बरोबर आगरी लोकांचे लग्नातील खास जेवण व भोकाचे वडे हे विशेष असते. हे भोकाचे वडे उरण येथे जास्त प्रचलित आहेत. लग्न ठरताच लग्नाच्या तयारीच्या चर्चेत वड्यांची चर्चा अग्रेसर असते. ऐपत व आप्तांच्या गोतावळ्यानुसार वड्यांच्या मापनाचा अंदाज घेतला जातो. मोठ्या टोपल्या व रवळी (छोटी उभट टोपली) ची ऑर्डर दिली जाते.

वडे करण्यात निष्णात अशा काही बुजुर्ग बायका गावामध्ये असतात त्यांना भेटून साधारण किती माणसे येतील याचा अंदाज सांगून त्यांच्याकडून वड्याच्या सामानाची यादी घेतली जाते. साधारण गहू आणि तांदूळ सम प्रमाणात घेतले जातात.
ज्याप्रमाणे नवरीचा नूर चढण्यासाठी काही दिवस आधीपासून तयारी चालू असते तशीच एकीकडे वड्यांची तयारी चालू होते. साधारण १५-२० दिवस आधी तांदूळ व गहू आणून ठेवले जातात. हे तांदूळ व गहू निवडण्यासाठी एक खास दिवस ठरवून शेजार-पाजारच्या स्त्रियांना खास ह्या निवडण्याच्या कामासाठी आमंत्रण दिले जाते. बायका जमल्या की गहू तांदळाची पोती त्यांच्यापुढे ठेवली जातात. निवडता निवडता हळदी कुंकवाचा कार्यक्रमही चालतो. प्रत्येक सवाष्णीला हळद कुंकू, फुल दिले जाते. खाऊची डिश व चहा किंवा सरबत देऊन हा निवडण्याचा छोटासा समारंभ पार पाडला जातो.
लग्नाला ७-८ दिवस राहिले असताना वड्यांचे तांदूळ धुवण्याचा कार्यक्रम केला जातो. ह्या कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणजे पाण्याची सोय, टोपल्या, रवळी , तांदूळ धुण्यासाठी मोठे गंज (मोठी टोपे), बालद्या एकत्र आणून ठेवल्या जातात.

सर्व प्रथम ज्या ठिकाणी तांदूळ धुणार म्हणजे नळ/विहीर वगैरे तिथे नारळ-कलश, पानाचा विडा, नारळ ठेवून घरातील मुख्य स्त्रिया त्याची पूजा करतात. हा विधी बुज्रुर्ग बायकांच्या मार्गदर्शनाखाली होतो.


ज्या टोपल्यांमधे आणि रवळीमधे धुतलेले तांदुळ ठेवायचे असतात त्या भोवती रांगोळी काढली जाते.

जिचे किंवा ज्याचे लग्न ठरले आहे त्याला किंवा तिला कुंकू लावून, थोडी वाटीत हळद ओली करून गालावर दोन बोटे लावली जातात. उरलेली हळद इतर जण एकमेकांच्या दंगामस्ती करत लावून एन्जॉय करतात. सगळ्या सवाष्णींना हळद-कुंकू, फुल आणि गोड खाऊ वाटला जातो. मोठ्या टोपात अगर बालदीत तांदूळ घेऊन २-२ किंवा ३-४ जणींचा ग्रुप करून टीम वर्कने तांदूळ धुण्याचे काम केले जाते.
तांदूळ धुऊन झाले की मोठ्या टोपल्यांमध्ये फडके टाकून ते निथळण्याकरिता ठेवतात.

पाणी ठिबकायचे बंद झाले की घरातील एका कोपर्यात रांगोळी काढून पाट मांडले जातात. मग मध्ये रवळी ठेवून बाजूला तांदूळ भरल्या टोपल्या ठेवल्या जातात. ह्या टोपल्यांना हळद कुंकू लावून त्यावर कापड झाकण देऊन त्यावर बोरीच्या झाडाच्या फांद्या शास्त्र म्हणून ठेवल्या जातात.

दुसर्या दिवशी हे तांदूळ उन्हात थोडे वाळवले जातात.

वाळलेले तांदूळ एका गोणीत भरून ठेवतात. गिरणमालकाची अपॉइंटमेंट आधीच घेतली जाते. धुतलेले तांदूळ व गहू घेऊन ३-४ बायका व घरातील १-२ पुरुष मंडळी गिरणीकडे रवाना होतात. गिरणवाल्यांनी वड्याच्या पिठात भेसळ होऊ नये म्हणून गिरण साफ केलेली असते. मंगलकार्याचे पीठ दळायचे म्हणून दळण घेऊन आलेल्या सवाष्णी गिरणीची पुजा करतात.

त्यानंतर गिरणीत गहू व तांदूळ घालून त्याचे रवाळ पीठ दळले जाते. घरी आल्यावर ह्या गोणी व्यवस्थित एका ठिकाणी ठेवल्या जातात. मध्येच पीठ चाळवण्याचे काम करून पीठ व्यवस्थित पुन्हा पोत्यात भरून ठेवले जाते.

लग्नाच्या दोन दिवस आधी वा आदल्या दिवशी वडे करण्याचा बेत ठरलेला असतो. ज्या दिवशी वडे करायचे त्याच्या आदल्या दिवशी गावात जाऊन "उद्या सकाळी पीठ मळायला आणि संध्याकाळी वडे काढायला या" असे आमंत्रण लग्नघरातील एखाद्या व्यक्तीमार्फत गावभर फिरते. सूर्यनारायणांचे आगमन होण्यापूर्वीच वडे-निष्णात सुगरण हजर असते. तिच्या मार्गदर्शनाखाली पीठ मळले जाते. स्त्रिया लाइनमध्ये आपल्या समोर पराती वा ताटे व पीठ मळण्यासाठी पाणी घेऊन आपल्या लगबगीच्या गप्पागोष्टी करत असतात.
आग्री जमातीच्या लग्नामध्ये लग्नाच्या विधीच्या प्रसंगांना अनुसरून एक स्त्री गाणं म्हणते. ह्या गाणे म्हणणार्या स्त्रीला धवलारीण म्हणतात. तिलाही तितक्याच मानाने बोलावले जाते. धवलारीण प्रत्येक विधी, प्रसंगाला अनुसरून आगरी भाषेत गाणं म्हणते. गाण्यात नवरा/नवरीचे, त्याच्या घरातल्या सगळ्या कुटुंबातील माणसांची नावे विधीसाठी जमलेल्या स्त्रियांची समाविष्ट केली जातात.
पीठ मळायच्या वेळीही धवलारीण गाणी म्हणण्यास सज्ज असते. पीठ मळण्यासाठी गरम पाण्याचा मोठा गज चुलीवर चढविला जातो.

ह्या पाण्यात किंवा पिठात धणेपुड, जिरेपुड, पापड खार, मीठ इ. टाकण्याचे काम मुख्य वडेमाहीतगार महिलेच्या हस्तेच केले जाते. हे पाणी सुक्या पिठात थोडे थोडे टाकत लाटणीच्या साहाय्याने प्रार्थमीक स्वरूपातील पीठ कालवले जाते. हे थोडे घट्टच ठेवतात. मग हे पीठ परातीत घेऊन ते जमलेल्या स्त्रियांच्या परातीत थोडे थोडे मळण्यासाठी दिले जाते.

पीठ मळून झाले की एक स्त्री हे मळलेले पीठ मोठ्या टाकीमध्ये जोरदार आपटून जमा करते. असे आपटल्याने पीठ अजून सैल होते. टाकी भरली की वर जळता कोळसा टाकून त्यावर थोडे तेल ओतून टाकीचे झाकण लावले जाते. जमलेल्या स्त्रियांना हळदकुंकू चहा-नाश्ता दिला जातो. व वडे तळण्यासाठी ४-५ तासानंतरची वेळ दिली जाते.
वडे तळण्यासाठी गावातील काही घरांमध्ये मोठे तवे/कढई असतात. त्या त्यांच्याकडून आणून ठेवलेल्या असतात.
वडे करण्यापूर्वी आपले वडे चांगले निर्विघ्न व्हावे, बिघडू नये अशी मनोकामना मनी बाळगून चुलीच्या पूजेची तयारी केली जाते.

रांगोळ्या काढून त्यावर ३-४ चुली मांडल्या जातात. चुलींची हळद-कुंकू, फुल वाहून पुजा केली जाते.

चुली पेटवून त्यावर मोठे तवे चढवून तेल तापविले जाते. पहिले पाच वडे नवरा मुलगा किंवा नवरी मुलीच्या हस्ते कढईत सोडले जातात. तोपर्यंत हळू हळू गावातील स्त्रिया जमा होतात व ४-५ चुलींभोवती वडे सोडायला व तळायला हौशेने सज्ज होतात. पीठ पुन्हा परातीत घेऊन थोडे पाण्याने सैल करून घेतले जाते. हाताला पाणी लावून पिठाचा गोळा हातात चपटा करून मध्ये भोक पाडून सटासट वडे तेलात सोडले जातात.

हे तळत असताना खरपूस खमंग वास परिसरात दरवळत असतो. वडे ठेवण्यासाठी एक वेगळी खोली आधीच तयार ठेवलेली असते. त्यात कापड अंथरून त्यावर तळलेले वडे थंड करण्यासाठी पसरवले जातात.
वडे करण्यासाठी आलेल्या सर्व स्त्रियांना, गावातल्या प्रत्येक घरात वड्यांची भेट दिली जाते. आल्या-गेल्या पाहुण्यांना ह्या वड्यांचा आस्वाद दिला जातो. दुपारच्या वेळेत चहा बरोबर तर संध्याकाळी मटण, जवळा, चवळी/वाटाण्याच्या भाजी बरोबर वडे पानात वाढले जातात.
आगरी जमातीत देवांच्या मानासाठी हे वडे व तांदळाच्या फेण्या नैवेद्यात ठेवल्या जातात. मंडपातील तसेच लग्न ठिकाणातील दारकशीलाही फेण्या व वड्यांचे तोरण बांधले जाते.
तर असे हे सगळ्या गावकर्यांना आपल्या आनंदात सामावून, विविध विधी करून तयार झालेले रुचकर भोकाचे वडे लग्नघरातील मेजवानीत रंगत आणतात.

हे लेखन ऑगस्ट २०१६ च्या माहेर अन्नपूर्णा ह्या अंकात प्रकाशीत झालेले आहे.

प्रतिक्रिया

अच्छा तेव्हाच आगरी लग्नात हळदीला इतकं महत्त्व असतं तर!!

अप्पा जोगळेकर's picture

18 May 2017 - 6:38 pm | अप्पा जोगळेकर

हळदीलाच महत्व असते. नंतर दुसर्‍या दिवशी लग्न कार्यक्रम सोपस्कार म्हणून पार पडतात.

अप्पा जोगळेकर's picture

18 May 2017 - 6:43 pm | अप्पा जोगळेकर

चुकीने हळद लिहिले आहे. हलद असे वाचावे.

होय होय, राती हालद आनी मंग सकाली आंबेहालद !! =))

एस's picture

18 May 2017 - 3:47 pm | एस

स्लर्प!

कविता१९७८'s picture

18 May 2017 - 4:04 pm | कविता१९७८

आमचीही पारंपारीक डीश आहे ही. आमच्याकडे याला चुनवडे म्हणतात. बहीण निष्णात आहे हे बनवायला. वड्याला आधीच भोक न पाडता हातातुन वडा कढईत तळण्यासाठी टाकताना एका वेगळ्या ट्रीकने वड्याला भोक पाडता येतं तिला. लग्नप्रसंगी , कुलदेवता पुजन यावेळी हमखास केले जातात. चुनवडे , पोकरवडे (गोड व लांबट आकाराचे , केळं मिश्रित) , सांदण्या आणी रवळी — आजी बनवायची , हल्ली बनवले जात नाहीत) यासर्व आमच्या पारंपारीक डीशेस

कविता१९७८'s picture

18 May 2017 - 4:13 pm | कविता१९७८

तसेच हे वडे पित्र पुजनाच्या, सार्वपित्रि अमावास्या या वेळीही बनवतात. आमच्याकडे या वड्यांबरोबर पारंपारीक खीर वाढली जाते.

सतिश गावडे's picture

18 May 2017 - 5:13 pm | सतिश गावडे

आमच्याकडे प्रत्येक "कडव्या" सणाला चिकन आणि हे भोकाचे वडे असतात. अर्थात आपला जिल्हा एकच आहे म्हणा. :)

निशाचर's picture

18 May 2017 - 5:24 pm | निशाचर

माहितीबरोबर फोटो टाकले असते तर आणखी छान झाला असता.

डोंबिवलीला आगरी लग्नातल्या शेकड्यांनी थापलेल्या तांदळाच्या भाकर्‍या पाहिल्या आहेत. पण हे वडे माहित नव्हते. लहानपणी उरणकडचे शेजारी होते. त्यांच्याकडे कविता१९७८ नी लिहिलंय तसं खीर आणि वडे खाल्ले आहेत. पण ते वडे फक्त तांदळाचे असत.

अप्पा जोगळेकर's picture

18 May 2017 - 6:41 pm | अप्पा जोगळेकर

मस्त वडे एकदम. हल्दीच्या मटणाबरोबर लै भारी.
ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार मटणात पुरवठ्याला घातलेली डाळ आणि खंब्यांची संख्या कमीजास्त होते इतकेच.

रुस्तम's picture

18 May 2017 - 8:14 pm | रुस्तम

पेणला वड्यानं सोबत फेण्यापण तळतात.

लेखन आवडले. मेदूवड्यांसारखे दिसतायत.

पैसा's picture

18 May 2017 - 8:50 pm | पैसा

छान लिखाण. तुझ्या फोटोंचं फायरफॉक्ससोबत काहीतरी वाकडं आहे बहुतेक. मला फोटोच्या जागासुद्धा दिसत नाहीत.

सफारी बरोबरही वाकडं आहे, पण जरा कमी.. मला फोटोच्या जागा दिसत आहेत :)

पण लेखन फार सुंदर आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 May 2017 - 12:01 am | डॉ सुहास म्हात्रे

भोकाचे वडे आणि फेण्या ! स्लर्प !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 May 2017 - 9:28 am | डॉ सुहास म्हात्रे

वर्णन आणि फोटोही रसभरीत आहेत!

कौशी's picture

19 May 2017 - 3:23 am | कौशी

कसलं भारी वर्णन आणि फोटो..

अत्रुप्त आत्मा's picture

19 May 2017 - 5:33 am | अत्रुप्त आत्मा

वाह. ! मजा आ गया.

सचिन काळे's picture

19 May 2017 - 7:53 am | सचिन काळे

मस्त!!!

लयी दिवसांनी जागुताईची रेसिपी आली. अर्थात रेसिपीच्या जोडीने माहिती आणि ती मांडण्याची पद्धत लाजवाब आहे. मला तर सर्व फुटू दिसत आहे (क्रोम वर)

इरसाल कार्टं's picture

19 May 2017 - 12:29 pm | इरसाल कार्टं

आमच्याकडे तेलिवडे बनवले जातात. हे तांदळाच्या पिठाचे वडे असतात, म्हणूनच हालदींच्या रातीला 'तेला' म्हणून संबोधले जाते.
आणि तेलांनाच 'खावाची अन पिवाची' मज्जा. लग्न म्हणजे फक्त सोपस्कार.

जागु's picture

19 May 2017 - 12:44 pm | जागु

सूड, आप्पा, एस, कविता, सतिश, रेवती, रुपी, डॉ. सुहास, कौशी, अ. आत्मा, सचिन उपेक्षीत सगळ्यांना मनापासून धन्यवाद.

निशाचर फोटो टाकले आहे. क्रोम मधून दिसतील.

रुस्तम माझे सासर पेणचे. तिथले मटण मला खुप आवडते. मटणात खोबर्‍याचे तुकडे टाकतात ते भन्नाट लागतात. उखळीत कुटतात ते खोबर. त्याचीही माहिती मला लिहायची आहे.

पैसा, क्रोम वापरून पहा.

केंट's picture

19 May 2017 - 3:43 pm | केंट

पेण ला असताना , मित्रांच्या हळदी ला वड्यांची चव चाखालिये.. वाशी, वाढाव, दादर , जीते परिसरात खूप लग्न पाहिली ..
आठवणी जागवल्या बद्दल धन्यवाद :)

जागु's picture

19 May 2017 - 5:01 pm | जागु

वाशी माझ सासर गाव आहे.

अनन्न्या's picture

19 May 2017 - 1:20 pm | अनन्न्या

वडे पण झकास अगदी!!

अत्रन्गि पाउस's picture

19 May 2017 - 2:43 pm | अत्रन्गि पाउस

पण ओळखीत कुणी आगरी नाही कि जाऊन हे अनुभवावं ...
कुठे एखाद ठिकाण आहे का जिथे हे अनुभव दिले जातात ....(जस कि चोखी दाणी / व्हिलेज वगैरे )

अभ्या..'s picture

19 May 2017 - 5:33 pm | अभ्या..

भारीच वर्णन.
कीती दिवस टिकतात हे वडे?

गामा पैलवान's picture

19 May 2017 - 6:07 pm | गामा पैलवान

तासभर टिकले तरी खूप झालं हो बुवा!! ;-)
-गा.पै.

गामा पैलवान's picture

19 May 2017 - 6:11 pm | गामा पैलवान

जागूताई,

वाचून तोंडाला पाणी सुटलं. फटू बघून काय होईल याची केवळ कल्पनाच करतो सध्या. कोल्ह्याला द्राक्षे आंबट तशी आमच्या आगीनकोल्ह्यास जागूवडे अदृश्य!

रच्याकने : धवलारी म्हणजे घर. तर धवलारीण म्हणजे शब्दश: घरवाली!!

आ.न.,
-गा.पै.

प्राजु's picture

20 May 2017 - 10:52 am | प्राजु

उत्तम माहिती! यातलं काहीच माहिती नव्हतं!

नूतन सावंत's picture

20 May 2017 - 11:10 pm | नूतन सावंत

हा लेख माहेरच्या अन्नपूर्णा अंकात वाचला होता ,पोच द्यायची राहून गेली कारण नाव वेगळे होते,खूप माहितीपूर्ण आणि समारंभात सहभागी करवून घेणार लेक,सुरेख आहे.

विचित्रा's picture

21 May 2017 - 9:04 am | विचित्रा

वडे छानच, पण प्रत्येक पायरीला पूजा, रांगोळ्या, हळदीकुंकू हे पण इंटरेस्टींग.

वरुण मोहिते's picture

21 May 2017 - 6:03 pm | वरुण मोहिते

काय आठवण काढलीत .मटण आहे पण आता हे वडे कुठून मिळवावेत .
( अनेक हलदी ला गेलेला वरुण...)

जागु's picture

22 May 2017 - 11:13 am | जागु

अनन्या, पाऊस, अभ्या, गामा, प्राजू, सुरन्गी, विचित्रा, वरूण मोहिते धन्यवाद.

अदि's picture

25 May 2017 - 8:27 pm | अदि

ही जमात आहे, हे खटकलं, बाकी लेख सुंदर!!

सविता००१'s picture

26 May 2017 - 11:30 am | सविता००१

किती छान लिहिलं आहेस जागूताई...प्रचंड आवडलंय.

जागु's picture

29 May 2017 - 12:16 pm | जागु

अदी, सविता धन्यवाद.