आजची पवित्र(पाक)-कृती :- "अंबाडीचे शरबत/चहा/काय-वाट्टेल-ते-म्हणा"

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in पाककृती
17 May 2017 - 1:27 pm

साहित्य:-

एक चहाचे पातेले, एक गाळणी, पुरेसे पाणी,एक पेला(ग्लास/गिल्लास वगैरे),एक लायटर किंवा आगपेटी(काड्या असलेली), गॅस शेगडी, गॅस सिलिंडर(त्यात गॅस भरलेली पाहिजेच), नाहीतर पेटलेली चूल किंवा कोळशाची शेगडीसुद्धा चालेल, साखर, लिंबू आणि सर्वात महत्वाचे साहित्य म्हणजे अंबाडीची लालेलाल बोंडं!

कृती:-

१. बागेतून अंबाडीची बोंडं खुडून घ्यावीत. योग्य बोंडं निवडणे महत्वाचे आहे. अंगठ्याने देठ चटकन खुडले गेले पाहिजे. फार पक्व नको किंवा फार कच्चे नको. बोंड्याच्या पाकळ्यांमध्ये पुरेसे रस पाहिजे.

पर्फ़ेक्ट बोंडं

२. मूठ-दोन मूठ बोंडं खुडून घ्यावीत. पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर पाकळ्या वेगळ्या, हिरवी गाठ(हिच्यात बिया असतात)वेगळी करा. सध्या तरी आपल्या कामाच्या नाहीत. ताटातच राहू द्या.

शहीद

३. आता सव्वा पेला पाणी पातेल्यात ओता. त्यात ह्या पाकळ्या घाला.लायटर लावून गॅस पेटवा. पहिल्या प्रयत्नात पेटणार नाही. पुन्हा प्रयत्न करा. पेटणार नाहीच!

शेगडी पेटलीच नाही वाट्टे

४. मग सिलिंडरचे रेग्युलेटर(जे आपण रात्री झोपताना बंद केले होते) ते सुरू करा. आता पुन्हा प्रयत्न करा, शेगडी पेटेल. द्रव्याला उकळी येऊन द्या.

मला लागली कुणाची उकळी

५. दोन मिनिटे चांगले उकळले की शेगडी बंद करा आणि पातेले खाली उतरवा. द्रव्य गाळणीने पेल्यात गाळून घ्या. त्यात एका पेल्यात अर्धा कागदी लिंबू आणि दोन चमचे साखर या प्रमाणात मिसळा.

परफ़ेक्ट शरबत

शरबत/चहा/काय-वाट्टेल-ते-म्हणा तयार आहे!

हिवाळ्यात चहासारखे गरमागरम प्या(मी हिवाळ्यात केले होते). सध्या उन्हाळा आहे तर त्याला गार होऊ द्या आणि नंतर बर्फाचे दोन-तीन खडे फेका, हिंदी जाहिरातींमध्ये दाखवतात तसे. आता हे अत्यंत चविष्ट असे अंबाडीचे आंबटगोड शरबत शांतपणे ढोसा!! किरपा बरसेगी!

- (परम कृपाळु)स्वामी संकेतानंद

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

17 May 2017 - 1:50 pm | पद्मावति

वाह! मस्तच.

लाडू's picture

17 May 2017 - 2:04 pm | लाडू

जास्वदींचे असे सरबत करतात, अंबाडीचे नवीनच समजले.
रंग फारच सुंदर दिसतोय.

सूड's picture

17 May 2017 - 2:12 pm | सूड

वाह!!

आता सव्वा पेला पाणी पातेल्यात ओता. त्यात ह्या पाकळ्या घाला.लायटर लावून गॅस पेटवा. पहिल्या प्रयत्नात पेटणार नाही. पुन्हा प्रयत्न करा. पेटणार नाहीच!
मग सिलिंडरचे रेग्युलेटर(जे आपण रात्री झोपताना बंद केले होते) ते सुरू करा. आता पुन्हा प्रयत्न करा, शेगडी पेटेल.

=== आज सकाळी सकाळी हा अनुभव आला.... लायटर फेकून देण्याच्या पवित्र्यात होतो.

अत्रुप्त आत्मा's picture

17 May 2017 - 3:16 pm | अत्रुप्त आत्मा

@शरबत शांतपणे ढोसा!! किरपा बरसेगी!
- (परम कृपाळु)स्वामी संकेतानंद ››› परम दुषषषष्ट स्वामिज्जी! =))

विनिता००२'s picture

17 May 2017 - 3:26 pm | विनिता००२

लायटर लावून गॅस पेटवा. पहिल्या प्रयत्नात पेटणार नाही. पुन्हा प्रयत्न करा. पेटणार नाहीच! >>>> मग माणूस पेटेल ;)

मस्त. आताच्या आता ढोसावंसं वाटतंय..
अंबाडी जर बागेत लावायची असेल तर बिया/रोपे कुठे मिळतील?

स्वामी संकेतानंद's picture

19 May 2017 - 10:01 am | स्वामी संकेतानंद

एखाद्या शेतकर्‍याला विचारून पाहता येईल किंवा बाजारात अंबाडीची भाजी विकणार्‍याला सांगून ठेवता येईल. किंवा मग कृषी केंद्रातून बियाणांची लहानशी पुडी घ्यायची.

सविता००१'s picture

17 May 2017 - 4:05 pm | सविता००१

स्वाम्या, तू कसला आहेस अरे...... भारीच. मस्त रेसिपी. फक्त ती अम्बाडीची बोन्डे कुठे मिळणार ते पण सांग. किरपा बरसनी मंगतीय ना...

स्वामी संकेतानंद's picture

19 May 2017 - 10:02 am | स्वामी संकेतानंद

शेतकर्‍यांकडे!

मंजूताई's picture

17 May 2017 - 4:09 pm | मंजूताई

युक्त आहे हे शरबत. आमच्याकडे ह्याची तयार भुकटी मिळते, तयार शरबतही मिळतं. सेंदिय गुळ घालून केलं तर अजून सकस व सरस!

नूतन सावंत's picture

18 May 2017 - 11:15 am | नूतन सावंत

तुमच्याकडे म्हणजे कुठे?

मंजूताई's picture

18 May 2017 - 12:36 pm | मंजूताई

दरवर्षी एप्रिल महिन्यात बीजोत्सव असतो तिथे अंबाडीचे टिकाऊ व ताजे पदार्थ असतात. बुलढाणा खामगाव भागात अंबाडीची भाकरी प्रसिद्ध आहे.

सानझरी's picture

17 May 2017 - 4:17 pm | सानझरी

करून बघणेत येईल..

टवाळ कार्टा's picture

17 May 2017 - 4:18 pm | टवाळ कार्टा

कागदी लिंबू कुठे मिळेल?

टवाळ कार्टा's picture

17 May 2017 - 4:20 pm | टवाळ कार्टा

बर्फाचे दोन-तीन खडे कुठे फेकायचे?

स्वामी संकेतानंद's picture

19 May 2017 - 10:03 am | स्वामी संकेतानंद

कागदी लिंबू बाजारात मिळेल. निसता लिंबू मागितला तरी कागदी लिंबूच मिळेल.
बर्फाचे खडे शरबतात फेका.

प्रीत-मोहर's picture

17 May 2017 - 4:28 pm | प्रीत-मोहर

मरुन जा बे तु!!

स्वामी संकेतानंद's picture

19 May 2017 - 10:08 am | स्वामी संकेतानंद

कधीचाच मेलोय मी

विशाखा राऊत's picture

17 May 2017 - 5:03 pm | विशाखा राऊत

पहिल्यांदच बघितले अंबाडीचे फळ :)

पैसा's picture

17 May 2017 - 6:01 pm | पैसा

सरबत उर्फ चहा मस्तच! सूचना त्याहून भारी!! =))

स्वाम्या, पहिली अबांडीची बोंडे पार्सल कर. मग करुन बघेन..

अत्रुप्त आत्मा's picture

17 May 2017 - 9:41 pm | अत्रुप्त आत्मा

+१
तेच ना. ! दुत्त दुत्त! :-/

सांगत पण नैत स्वामिज्जी. कुटं मिळतं हे सगळं. :-/

स्वामी संकेतानंद's picture

19 May 2017 - 10:05 am | स्वामी संकेतानंद

कुंडीत लावता येईल की! मंडईत कुणाला विचारा, बिया आणून देईल.

राही's picture

17 May 2017 - 11:07 pm | राही

लिहिण्याची श्टाइल मस्तच. आमच्याकडे पाइप्ड गॅस आहे. (झैरात.) त्यामुळे खाली वाकून सिलिंडरची चावी उघडावी लागत नाही.
वर्धेच्या सेवाग्राम गांधी आश्रमात आंबाडीचे सरबत आणि आंबाडीपासून बनणार्‍या आणखी काही वस्तू/पदार्थ ठेवलेले असत. अजूनही असतील.उदा. वाकापासून बनवलेल्या पर्सेस, पिशव्या, जाकिटे, जाम, मुरांबे वगैरे. एक संशोधक कुटिरोद्योगी सद्गृहस्थ प्रेमपाल्हाळाने आंबाडीचे उपयोग आणि प्रयोग सांगून सांगून पकवीत. अजूनही (पकवीत ) असतील.

नूतन सावंत's picture

18 May 2017 - 11:20 am | नूतन सावंत

स्वामी,ती अंबाडीची बोन्डे कुरियर करा प्लिज तुमच्या बागेतून.
मग तुमच्यासारखंच सरबत/चहा बनवता येईल.

स्वामी संकेतानंद's picture

19 May 2017 - 10:06 am | स्वामी संकेतानंद

परवडत नाय. खी:खी:खी:

त्रिवेणी's picture

18 May 2017 - 6:26 pm | त्रिवेणी

सध्या उन्हाळा आहे तर त्याला गार होऊ द्या आणि नंतर बर्फाचे दोन-तीन खडे फेका, हिंदी जाहिरातींमध्ये दाखवतात तसे. >>>>बर्फाचे खडे फेका म्हणे. नंतर ग्लासातून उडालेले सरबत पुसावे लागेल. घरचे तेवढ बरोब्बर करतील नंतरची आवरआवर सोयीस्कर विसरतील.
सरबत एकदम मस्त.

स्वामी संकेतानंद's picture

19 May 2017 - 10:07 am | स्वामी संकेतानंद

त्यांना पुसायला लावून स्वावलंबनाचे धडे द्यायचे!

अनन्न्या's picture

19 May 2017 - 2:24 pm | अनन्न्या

छान आहे सरबत

इरसाल कार्टं's picture

20 May 2017 - 10:26 am | इरसाल कार्टं

पुढल्या सिझनला करून बघणेत यील

वामन देशमुख's picture

26 Nov 2017 - 8:08 am | वामन देशमुख

आत्त्ताच करून पितोय, मस्त लागतंय सरबत / सूप!

AmbadicheSoupकर्पून
AmbadicheSoup