पिझ्झारट्टू

सरनौबत's picture
सरनौबत in पाककृती
10 May 2017 - 3:18 pm

साऊथ इंडियन (दाक्षिणात्य) पदार्थ म्हणलं कि इडली, डोसा, उत्तपा आणि वडा सांबार ह्याच गोष्टी पट्कन माझ्या डोळ्यासमोर येतात. हे पदार्थ मुख्यतः पुण्यातील प्रसिद्ध शेट्टी हॉटेल्स (वैशाली, रूपाली त) खाल्ले. त्यामुळे ह्या व्यतिरिक्त इतर दाक्षिणात्य पदार्थांचे माझं नॉलेज अतिशय मर्यादित.

पूर्वी आतासारखं इडली-डोश्याचं तयार पीठ मिळायचं नाही. त्यामुळे ह्या गोष्टी घरी करायला पूर्वतयारी लागायची. प्रत्येकाचा इडली रवा आणि उडीद डाळीच्या प्रमाणाचा 'फॉर्म्युला' असायचा. ज्याची इडली एकदम 'हलकी' (वजनाला, दर्जाने नव्हे!) त्यांच्याकडून तो फॉर्म्युला मिळवायचा. (ही लोकं इडली पिठात पोहे किंवा शिजवलेला भात घालायचे ही सिक्रेट एकदा समजली). स्टॅन्ड मधून काढलेल्या गरमा-गरम इडल्या आणि सोबत हिरवी चटणी आणि चिंच-गुळाचं 'ब्राह्मणी' सांबार म्हणजे अहाहा!

वैशाली आणि रूपाली पेक्षा 'भारी' इडली-डोसा कुठेच मिळत नाही असं वाटत असतांना काही महिने बंगलोर ला नोकरी निमित्त स्थायिक झालो. तेव्हा मात्र आपला हा समज किती चुकीचा होता ते जाणवलं. पुण्यातील हॉटेलात लहान वाटीत 'रेशनिंग वर' चटणी-सांबार देतात (एक्सट्रा चटणी चे एक्सट्रा पैसे!). तिकडे कर्नाटकात मात्र ३-४ प्रकारच्या चटण्या आणि त्यादेखील 'अनलिमिटेड'! हे म्हणजे दुष्काळी प्रदेशात काटकसरीने पाणी वापरणाऱ्याला २४ तास धो-धो पाणी मिळण्यासारखे आहे.

बंगलोर च्या हॉटेल्स मध्ये मेन्यूकार्ड बघत असताना इतरही अनेक दाक्षिणात्य पदार्थ अस्तित्वात असल्याचा साक्षात्कार झाला. इडिअप्पम, पेसरट्टु, पुलियोंग्रे, बिसिबेळे अन्ना असली भरघोस नावं फ्रेंच अथवा इटालियन नसून भारतीय आहेत हे तेव्हाच समजलं. तरीदेखील त्या वाटेला गेलो नाही. पदार्थाची नावंच जर मुळात आवडली नाही तर तो पदार्थ कसा काय आवडेल अशी माझी (चुकीची) समजूत. उपमा (उप्पीट) आवडत असून देखील केवळ तो मेन्यूकार्ड् मध्ये 'खारा बाथ' लिहितात म्हणून मी तिथे कर्नाटकात कधी खाल्ला नाही. (खारट पाण्याने ‘बाथ’ घेतल्यासारखं वाटतं राव!). नको तिथे H टाकण्यात आणि पाहिजे तिथून काढून टाकण्यात कन्नड लोकांचा हात धरणे अशक्य!

'तू कायम इडली- उत्तपाच ऑर्डर करतो, जरा वेगळे पदार्थ try करत जा रे' असं बायकोनं अनेक वेळा म्हणल्यामुळे थोडंसं स्त्री-दाक्षिण्य(त्य!) म्हणून एकदा रवा डोसा मागवला. बायकोची बडीशेप खायची वेळ झाली तरी रवा डोसा काही यायला तयार नाही. म्हैसूर मसाला डोश्याची किंमत बघूनच तो ऑर्डर करायची हिम्मत होत नाही. थोडीशी चटणी आतमध्ये लावून तिप्पट किंमतीला का लावतात हे मला न सुटलेलं कोडं आहे. (सोना-चांदी च्यवनप्राश मध्ये शुद्ध सोनं घालतात (म्हणे); तरी ते देखील इतकं महाग नसतं).

माझ्या आवडी-निवडी लक्षात घेऊन माझ्या तेलगू मित्राने 'पेसरट्टु' (मुगाचे डोसे) खाऊन बघ असा आग्रह केला. असलं नाव ऐकूनच मी 'मूग गिळून' गप्प बसलो. शिवाय मूग डोश्याबरोबर (बटाटा भाजी ऐवजी) उपमा खाणे सुद्धा विशेष पटले नाही (आंध्रा मध्ये तसाच खातात म्हणे). मित्राने 'पेसरट्टु' ऐवजी 'हैद्राबादी स्ट्रीट फूड style' पिझ्झारट्टू आपण करू असा आग्रह केला. शेवटी त्याचा आग्रह ‘मोड’वेना म्हणून मुगाला 'मोड' आणायला भिजत घातले.

निवडक छायाचित्रे व थोडक्यात रेसिपी इथे टाकतो आहे.

पिझ्झारट्टू
साहित्य:
मुगाच्या डोश्यासाठी- हिरवे (आख्खे) मूग (६०%) आणि तांदूळ (४०%) ह्या प्रमाणात ७-८ तास भिजवून ठेवावेत. डोसा जास्त कुरकुरीत हवा असल्यास तांदुळाचे प्रमाण वाढवणे. मिक्सर मध्ये वाटताना लाल मिरची, आलं, लसूण आणि मीठ घालावे. पाणी घालून डोश्याला करतो तितपत पातळ करणे.

135

चटणी पूड - उडीद डाळ, चणा डाळ, डाळं आणि लाल मिरची पॅन मध्ये भाजून मिक्सर मध्ये पूड करून घ्या.

IMG_8962

पातळसर उपमा - देखील बनवून घ्या. (उपमा कसा करायचा हे माहिती नसल्यास तुम्ही पेसरट्टु च्या वाट्याला जाणार नाही. म्हणून त्याची कृती देत नाहीये.)

134

कृती:
डोशासाठी करतो तसा तवा तयार झाल्यावर एक मोठा डाव मिश्रण मध्यभागी घालून भराभर गोलाकार पसरावं. त्यावर पातळसर उपमा आणि चटणी पूड लावून घ्या. बटर लावून व्यवस्थित झालाय असं दिसलं कि खायला घ्या.

140

IMG_8963

150

143

आम्ही मुगाचा डोसा 'बेस' वापरून वरून चीज / पनीर / चिप्स / स्वीट कॉर्न असे विविध प्रकार बनवून पहिले.
मूग डोसा आणि पातळ उपम्याचं कॉम्बिनेशन खरोखर छान लागतं. स्वीट कॉर्न चे दाणे आणि चिप्स मुळे crunchiness येतो. आवडीनुसार बारीक चिरलेला कच्चा कांदा आणि कोथींबीर देखील घालू शकता. पालक पेस्ट आणि पनीर किसून देखील छान लागेल.

नेहमीचा डोसा खाऊन कंटाळा आला असल्यास हा प्रकार एकदा अवश्य करून बघा.

प्रतिक्रिया

सूड's picture

10 May 2017 - 4:07 pm | सूड

वाह!!

चांदणे संदीप's picture

10 May 2017 - 4:31 pm | चांदणे संदीप

डोसा खायची वेळ आलीएएए!!
पाकृ आवडली. :)

Sandy

कवितानागेश's picture

10 May 2017 - 4:34 pm | कवितानागेश

मस्त वाटतोय

मंजूताई's picture

10 May 2017 - 4:38 pm | मंजूताई

दिसतोय!

सविता००१'s picture

10 May 2017 - 6:38 pm | सविता००१

सुरेख दिसतोय

मितान's picture

10 May 2017 - 6:49 pm | मितान

किती नेटकेपणाने केलंय !
पेसरट्टू करते पण उपमा घालून कधी खाल्ले/केले नाही. आता करून बघेन.

किल्लेदार's picture

10 May 2017 - 7:12 pm | किल्लेदार

वाह सरनौबत .... मिसळीनंतर आता डोसा ?

तिखटजाळ मिसळ खाऊन भलतीकडे मोड येण्यापेक्षा मोड आलेल्या मुगाचे डोसे उत्तमच. खववय्येगिरी चालू ठेवा. पुढच्या डिश ची वाट बघतो आहे.

सरनौबत's picture

11 May 2017 - 2:18 pm | सरनौबत

धन्यवाद किल्लेदार. मराठी माणूस 'मोड'येईल पण वाकणार नाही.

किल्लेदार's picture

11 May 2017 - 5:04 pm | किल्लेदार

भलत्या ठिकाणी मोड आला तर वाकेल का ताठ उभा राहील ते माहित नाही पण बसणार नक्कीच नाही.... ख्या ! ख्या! ख्या!

किल्लेदार's picture

11 May 2017 - 5:16 pm | किल्लेदार

किंवा एखादा मोठा डोनट घेऊन त्यावर बसू शकेल. त्याची पण पाककृती द्या.
CDCiEkmW4AAjvTo

पैसा's picture

10 May 2017 - 11:14 pm | पैसा

कसला भारी प्रकार दिसतोय! पेसरट्टु खाल्लाय पण त्यासोबत उप्पीट खातात हे माहीत नव्हतं. आता नक्की करून बघेन.

पिलीयन रायडर's picture

11 May 2017 - 12:58 am | पिलीयन रायडर

किती सुंदर केलाय पेसरेट्टु! मी इथे टाकलेली रेसेपी पटकन उडवुन टाकायला हवी (ते चक्क धिरडं आहे, डोसाबिसा नाहीये!)

बाकी आपली पुष्कळ मतं जुळतात. मी सुद्धा खारा बाथ कधीही खाऊ शकणार नाही, भलेही अमृत का देईनात! आणि "एच" बाबर १००० वेळा सहमत!!!!

मस्त.. शेवटून दुसरा फोटो लईच भारी!

रेवती's picture

11 May 2017 - 2:10 am | रेवती

पाकृ आवडली.

नि३सोलपुरकर's picture

11 May 2017 - 1:31 pm | नि३सोलपुरकर

वाह सरनौबत साहेब ,
छान प्रेसेंटशन . धन्यवाद सांगा तुमच्या तेलुगू मित्राला .

सरनौबत's picture

11 May 2017 - 2:16 pm | सरनौबत

धन्यवाद. अवश्य.

नि३सोलपुरकर's picture

11 May 2017 - 1:32 pm | नि३सोलपुरकर

* प्रेझेंटेशन

त्रिवेणी's picture

11 May 2017 - 2:42 pm | त्रिवेणी

मस्त फोटो. उपमा+पेसरट्टू काॅम्बिनेशन कोणी आयत दिल तरच खाल्ल जाईल. बराच खटाटोप य रेसिपीला.
अवांतर - एफ सी रोडवरच्या चाट बझार मध्ये केरळी मसाला डोसा मिळतो. मस्त य एकदम.

च्यायला... काय त्रास आहे रे हा..
आता ईनो शोधावे लागणार...

अवांतरः उत्तम पाकृ. पुपाप्र. ;-)

किसन शिंदे's picture

11 May 2017 - 3:09 pm | किसन शिंदे

फोटो लई भारी आलेत. पुण्या-मुंबईत इडली डोश्यासोबत मिळणार्‍या 'रेशनिंग' चटणीबाबात प्रचंड सहमत आहे.

सकाळी नेहेमी नेहेमी तेच तेच पोहे उपमा खाण्यापेक्षा हा प्रकार वेगळा आहे, पूर्वतयारी करून ठेवली तर ऐईन वेळी पटकन होण्या सारख्या ....पाककृती आवडली...

इशा१२३'s picture

11 May 2017 - 4:10 pm | इशा१२३

मस्त फोटो आणि पाकृ!

सप्तरंगी's picture

11 May 2017 - 5:30 pm | सप्तरंगी

:) पाककृती ,लिहिले पण छान.. मोडवेना , मूग गिळून वगैरे:)

तुषार काळभोर's picture

11 May 2017 - 5:34 pm | तुषार काळभोर

खुदा ऐसे पिझ्झारेट्टूसे हमें भी नवाजे!

राघवेंद्र's picture

12 May 2017 - 1:17 am | राघवेंद्र

मस्त आहे हो MLA पेसरट्टू

आषाढ_दर्द_गाणे's picture

12 May 2017 - 2:08 am | आषाढ_दर्द_गाणे

तुमच्या कल्पकतेला दाद दिलीच पाहिजे!
फोटो मस्त आहेत!

फार वर्षांपूर्वी केरळला गेलो असताना 'रोस्ट' नावाचा प्रत्येक डोश्यातला एक उपप्रकार (साधा विरुद्ध मसाला असतो तसा) खाल्ला होता...
अजूनही आठवण आहे त्याची!

मैत्र's picture

12 May 2017 - 1:31 pm | मैत्र

हैदराबाद ला गेल्यास चटनीज मध्ये एम एल ए पेसरटटू नक्कीच खाऊन पहा. पांढरा मऊ भरपूर कांदा आणि हिरव्या मिरच्या असलेला उपमा डोसा भाजी ऐवजी खमंग पेसरटटू च्या आत भरलेला असतो
सहसा घरी सुद्धा पेसरटटू बरोबर उपमा च खातात.

मनिमौ's picture

12 May 2017 - 6:54 pm | मनिमौ

छानच दिसतोय

सिरुसेरि's picture

12 May 2017 - 7:46 pm | सिरुसेरि

छान वर्णन . नवरत्न , हनुमान इडली डोसा सेंटर , कामत , चटनीज अशी अनेक ठिकाणे आठवली .

नूतन सावंत's picture

16 May 2017 - 6:59 pm | नूतन सावंत

पेसरट्टू खुप वेला केला पण असा नाही ,छान वाटतेय पाककृती,करू नक्कीच पाहीन.

विशाखा राऊत's picture

17 May 2017 - 4:51 pm | विशाखा राऊत

मस्त रेसेपी.. आवडली

पियुशा's picture

19 May 2017 - 10:18 am | पियुशा

अव्व्व ....... सुगरनिना लाजवैल आसा ज़ालाये डोसा का काय आहे ते यम्मी दिसते:)

एकदम यम्मी दिसतंय हे प्रकरण ! फोटो लैच !!

मुक्त विहारि's picture

10 Jun 2017 - 12:58 pm | मुक्त विहारि

एक अनवट पा.कृ. दिल्याबद्दल धन्यवाद...

आमच्या सौ.ला सांगतो हा प्रकार करायला.