प्रोग्रेसिव्ह लेन्सची देखभाल

ऋतुराज चित्रे's picture
ऋतुराज चित्रे in काथ्याकूट
10 May 2017 - 10:27 am
गाभा: 

मी गेली ५ वर्षे Carl Zeiss च्या प्रोग्रेसिव्ह लेन्सचा चष्मा वापरत आहे. लेन्सच्या कोटिंगची १ वर्षाची गॅरंटी होती. लेन्स स्वच्छ करण्यासाठी मी कायम कंपनीने दिलेल्या कपड्याचा व सोल्युशनचा वापर केला. १ वर्षभर लेन्सला कोणताही प्रॉब्लेम झाला नाहे. दीड वर्षानंतर हळूहळू लेन्सच्या कोटिंगवर चरे व काही भाग धुरकट दिसू लागला. ऑप्टिशियनला दाखवले, गॅरंटीची मुदत संपल्याने नवी लेन्स घेण्याचा सल्ला दिला गेला . एक तर माझा नंबर स्थिर होता आणि दीड वर्षात इतकी महागडी लेन्स बदलणे आर्थिकदृष्ट्या मला शक्य नव्हते. पुढील २ वर्षात ह्या प्रॉब्लेमनी चांगलाच' प्रोग्रेस' केला. आता तर मला जवळचे वाचायला बराच त्रास होतोय. नवीन चष्मा करावाच लागणार आहे. मला लेन्सची निवड व लेन्सच्या देखभालीबद्दल मार्गदर्शन हवे आहे. मिपावर कोणी ह्या लेन्स वापरत असतील तर त्यांनीही आपले चांगले वाईट अनुभव मांडावे.

प्रतिक्रिया

तुमचा नंबर किती आहे आणि लेन्स कितीला मिळाली?

तुमची पद्धत सोलुशन टाकून कापडाने पुसायची होती का?
ही पद्धत साध्या काचेच्या चष्म्याला ठीक आहे म्हणतो कारण त्यालाही चरे पडतात पण काचा फारच स्वस्त असतात. संपूर्ण बाइफोकल चष्माच दीडहजाराच्या आत होतो. दोन वर्षे टिकला तरी खूप. चांगल्या लेन्झना ही पद्धत उपयोगाची नाही.

कॅम्रा लेन्झ साफ करायची पद्धत वापरावी लागेल कोटिंगच्या लेन्झना.

कंजूस's picture

11 May 2017 - 11:45 am | कंजूस

असं करा-
१) चांगला कॅमल हेर ब्रश वापरून लेन्झवरची धूळ काढायची. ब्लोअरही वापरायचा.
२) सोलुशन टाकून ते दिलेल्या कापडाने टिपायचे. घासायचे नाही. महत्त्वाचे.
३)ब्लोअर मारायचा,फुंकायचे नाही.

हेच पुन्हा करायचे.

ऋतुराज चित्रे's picture

11 May 2017 - 2:06 pm | ऋतुराज चित्रे

हे करुन बघेन.

आनंदी गोपाळ's picture

10 May 2017 - 8:41 pm | आनंदी गोपाळ

परदेशात चष्मे कमालीचे महाग असतात, अन तसेच महाग इथेही असावेत, अशा अट्टाहासाने/गैरसमजातू टायटन, झाईस वगैरे ब्रँड्स वापरायची फॅशन आपल्याकडे आलेली आहे, व आपण स्वतःला आनंदाने लुटून घेत आहोत, असे माझे वैयक्तिक मत आहे.

१.
प्रोग्रेसिव्ह लेन्स = प्रेस्बायोपिया = वृद्धदृष्टीता = चाळीशीचा वाचण्याचा चष्मा.

नैसर्गिकरित्या आपल्या डोळ्याची फोकस करण्याची शक्ती उर्फ अ‍ॅकॉमोडेशन कमी झाल्याने, वयाच्या चाळीस वर्षांच्या आगेमागेपासून तुम्हाला वाचन/इतर कोणतेही 'जवळचे' काम करताना हा चष्मा वापरावा लागतो. ४०शीत लागतो, म्हणून चष्म्याला चाळीशी म्हणायचा प्रघात आहे.

ही ताकद वयानुसार कमी होतच जाणार आहे, व २-२॥ वर्षांत तुमचा नंबर नैसर्गिकरित्या वाढणारच आहे. तेव्हा २ वर्षे टिकेल इतक्याच लायकीचा चष्मा घेणे उत्तम.

२.
सर्वांनाच 'प्रोग्रेसिव्ह' प्रकारची काच सूट होत नाही. कित्येक लोकांना त्या काचा वापरताना चक्कर येतात, व स्फेरिकल अ‍ॅबरेशन्स अर्थात, भिंगाच्या वक्रतेमुळे समोरची वस्तु वेडीवाकडी दिसण्याचा त्रास होतो.

प्रोग्रेसिव ऐवजी पूर्वीचे 'बायफोकल' प्रकारचे चष्मे वापरायला अजिबात हरकत नसते. काचेतली टिकली कॉस्मेटिकली वाईट दिसेल इतकीही आजकालच्या लेन्सेसमधे समोरून दिसून येत नाही.

३.
चष्म्यावरील कोटिंग.

याला ARC उर्फ Anti Reflective Coating म्हणतात. भिंगावर प्लॅस्टीकचा एक मोनोमॉलेक्युलर लेयर असतो,(पार्‍याच्या गॉगलसारखा रंगीत चमकणारा) ज्याची जाडी अ‍ॅव्हरेज व्हिजिबल वेव्हलेग्थच्या अर्ध्याइतकी असते. यामुळे लेन्सच्या पॄष्ठभागावरून होणारे रिफ्लेक्शन, 'डिस्ट्रक्टिव्ह इंटर्फेरन्स' तयार होऊन कमी होते. अर्थात, 'ग्लेअर' कमी होते. याचा खरा उपयोग नाईट ड्राईव्हिंगच्या वेळी समोरून येणार्‍या लाईटचा त्रास कमी होण्यासाठी आहे.

ह्या काचा कॉम्प्युटरच्या काचा म्हणुन आपल्याला खपविल्या जातात. स्क्रीनवर ब्राईटनेस्/काँट्रास्ट कंट्रोल करायची सोय असताना या नाटकाची खरे तर गरज नाही.

कोणत्याही कापडाने पुसल्यावर ह्या कोटिंगला चरे पडणारच असतात. नवे मायक्रोफायबर क्लॉथ वापरून ते थोडे उशीरा पडतात इतकेच. "नवे" यासाठी, की हे कापड धुवायची/वेळोवेळी बदलायची पद्धत आपल्याकडे नसते. त्यात अडकत जाणारे धुळीचे कण कालांतराने त्या मऊ कापडाचे रुपांतर सँडपेपरमधे करतात, व काचेवर चरे पडू लागतात.

तात्पर्य कोटिंग नसलेला चष्मा घेतल्याने नुकसान काहीच नाही.

४.
झाईस वगैरे लोक लेन्स 'टेक्नॉलॉजीत' लय प्रगत/पारंगत/प्रसिद्ध आहेत, ते 'सिस्टीम ऑफ लेन्सेस' व अस्फेरिक डीझाईन रिसर्च साठी. अर्थात, मायक्रोस्कोप, कॅमेरा, टेलिस्कोप्स इ. जिथे एकाचवेळी अनेक लेन्सेस वापरून काम केले जाते. चष्म्यातली सिंगल लेन्स कुणाचीही वापरली, तरी फार फरक पडत नाही. अर्थात, योग्य नंबरचा असेल, तर रस्त्यावरून १०० रुपयांत घेतलेला वाचण्याचा चष्मा वापरून डोळे खराब होत नाहीत.

सारांशः वर अधोरेखित केल्याप्रमाणे, २ वर्षे टिकेल इतक्याच लायकीचा चष्मा घ्या. रोज ५ रुपये प्रमाणे जास्तीत जास्त ३ हजार चष्म्यात घाला. मी नॉर्मली २-३ रुपये रोजाचा सल्ला देतो. मुंबैत १०,०००ला मिळणारा तोच चष्मा उदा. यवतमाळला १२-१५०० पर्यंत मिळायला हरकत नसते. ;)

'प्रॅक्टिकल' सल्ला आवडला. धन्यवाद डॉक.

ऋतुराज चित्रे's picture

11 May 2017 - 2:03 pm | ऋतुराज चित्रे

धन्यवाद आनंदी गोपाळ.

प्रोग्रेसिव ऐवजी पूर्वीचे 'बायफोकल' प्रकारचे चष्मे वापरायला अजिबात हरकत नसते.

बायफोकलने मला लांबचे व जवळचे स्पष्ट दिसायचे, परंतू २.५ ते ३ फूट अंतरावरील वस्तू अस्पष्ट दिसायच्या. प्रोग्रेसिव्ह लेन्समुळे हा दोष दूर झाला.

तात्पर्य कोटिंग नसलेला चष्मा घेतल्याने नुकसान काहीच नाही.

कोटिंग नसलेल्या प्रोग्रेसिव्ह लेन्स मिळतात का?

मुक्त विहारि's picture

3 Dec 2019 - 10:45 pm | मुक्त विहारि

गेली 2 वर्षे , 200 रूपयांचा चष्मा वापरत आहे. अद्याप टिकून आहे.

मला फक्त वाचनासाठी चष्मा लागतो.

उदय's picture

10 May 2017 - 10:01 pm | उदय

आयुष्यात कधीच चष्मा वापरला नाही, पण आता मी गेले २ वर्षे दूरचा + जवळचा चष्मा वापरत आहे. माझ्या चष्म्यात लेन्स ही प्रोग्रेसिव्ह लेन्स आहे. यात लेन्सचा नंबर स्मूथली बदलतो आणि बायफोकल मध्ये जशा २ काचा जशा वेगवेगळ्या दिसतात, तशा दिसत नाहीत. सुरुवातीला चष्म्याची सवय व्हायला वेळ लागला कारण पूर्वीच्या सवयीने डोके पुढे-मागे करून जवळचे बघायची सवय होती, त्यामुळे जिन्याच्या पायर्‍या जवळ वाटायच्या. पण सवय झाल्यावर फक्त डोळे वरखाली केल्याने नीट दिसते. व्यक्तिशः मला प्रोग्रेसिव्ह लेन्स आवडते. मध्यंतरी फक्त वाचनासाठी स्वतंत्र चष्मा वापरायचा प्रयत्न केला, पण डोके दुखायला लागले म्हणून प्रोग्रेसिव्ह लेन्सच वापरतो.

परदेशात चष्मे महाग असतात म्हणून गेल्या वेळी भारतात गेलो होतो तेव्हा चौकशी केली तेव्हा लेन्सच्या किमती जवळपास तितक्याच आढळल्या. मी नायकॉन (Nikon) लेन्स वापरतो त्याची किंमत भारतात ~१२-१३,००० रुपये सांगितली होती. इथे मला ~$२०० द्यावे लागतात.

मी चष्मा स्वच्छ करायला फक्त नळाचे पाणी वापरतो, कुठलेही सोल्युशन वापरत नाही. मग रुमालाने पुसून घेतो. चष्म्यावर अजिबात चरे पडले नाहीत. वर्षातून एकदा डोळे तपासून घेतो आणि लेन्स बदलून घेतो (गेल्या वर्षी फ्रेम तीच ठेवली, बदलली नाही.) माझ्या मते चष्म्यात आणि कॅमेरात लेन्सच फार महत्वाची आहे, त्यामुळे मी स्वस्तातली लेन्स घेत नाही. (माझे १/३ आयुष्य झोपेत जाते, त्यामुळे मी स्वस्त गादी घेत नाही, साधारणतः तसेच).

महागडी लेन्स घ्यायची की नाही, हा माझ्या मते तरी व्यक्तिगत निर्णय आहे. आपण डॉक्टर नाही म्हणून डॉक्टरचा सल्ला घेणे जरूरीचे आहे. डॉक्टर प्रोफेशनल आहे तेव्हा त्याला/तिला त्याचे/तिचे काम करू द्यावे. पण दर वर्षी डोळे तपासून घेतले पाहिजेत आणि त्याप्रमाणे योग्य चष्मा करून घेणे अधिक गरजेचे आहे.