पुण्यातील रविवार सकाळ. खरं तर ही वेळ म्हणजे 'सकाळ' च्या बातम्या वाचत (चितळे च्या दुधाचा) चहा पीत आता ब्रेकफास्ट ला रूपाली, गुडलक आणि बेडेकर ह्यापैकी कुठे जायचं हे ठरवण्याची वेळ. पण बायको सुद्धा बरोबर येणार असेल तर हा प्रश्न सहज सुटतो (तिच्या इच्छेनुसार जातो. सकाळी सकाळी वाद कशाला ?!) मित्राबरोबर जायचं असेल तर मग भरपूर चर्चा होऊन ठिकाण निश्चित होतं.
गेली ४ वर्षे मस्कत ला नोकरीनिमित्त स्थायिक असल्याने आता मात्र रविवार हा ऑफिस चा पहिला दिवस असतो (इकडे शुक्र -शनि वीकएंड!) पुण्यातील मित्रांच्या भाग्याचा हेवा करीत गप-गुमान ऑफिस ला जावं लागतं... तेव्हा बऱ्याच वेळा मन 'बेडेकर मिसळ' च्या आठवणीत रमतं.
पहिल्यापासूनच भेळ आणि मिसळ ह्या दोन्ही 'ळ'कारान्त पदार्थांवर विशेष प्रेम. पक्का पुणेकर असलो तरी 'बेडेकर नाही तर, कुठेच नाही' असा माझा पुणेरी बाणा नाहीये. खरंतर ‘बेडेकर पेक्षा भारी मिसळ कुठे मिळते’ ह्यासाठी अनेक ठिकाणं पालथी घातली. पुण्यातील रामनाथ, श्री, श्रीकृष्ण, काटाकिर्र ह्या सुप्रसिद्ध ठिकाणी जाऊन मिसळ खाल्ली. मित्रांच्या आग्रहावरून डेक्कन वरच्या वाडेश्वर; अगदी टिम्बर मार्केट, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट ला देखील गेलो. कोल्हापूरच्या फडतरे, खासबाग, बावडा येथील मिसळ; शिरवळ ची श्रीराम मिसळ, सातारा हायवे येथील ‘विरंगुळा’ पासून पुणे-मुंबई हायवे वरील श्री दत्त पर्यंत सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. पण ह्या मिसळी हृदयात ...सॉरी जिभेवर स्थान मिळवू शकल्या नाहीत. कुठे अति तिखट, तर कुठे तर्री (रस्सा) बेचव, तर अनेक ठिकाणी मिसळीच्या मानाने बटाटा भाजी चं proportion गंडलेलं. कुठे नुसत्या फरसाण वर रस्सा टाकून फसवणूक तर काही ठिकाणी मिसळी बरोबर चक्क गोडसर पाव!!
रविवारी सकाळी ९ नंतर कधीही गेलं तरी ‘बेडेकर’ बाहेर कायम प्रचंड गर्दी! सुट्टी मुळे ऑफिस चा ट्रॅफिक नसल्याने कोथरूड वरून ‘बेडेकर’ ला १५ मिनिटात पोचल्याचा आनंद; बाहेर तुडुंब वेटिंग पाहिलं कि कुठल्या कुठे नाहीसा होतो. मग आधी मिसळीला 'नंबर' लावून Bike साठी पार्किंग शोधण्याची कसरत. अनेक लोकं (बापाचा रस्ता असल्यासारखे!) साईड-स्टँड वर गाड्या लावतात. मग त्यांच्या (नावाने शिव्या घालत) १-२ गाड्या मेन स्टॅन्ड वर लावून आपली गाडी त्यात घुसवायची. मग बाहेर 'ताट'कळत मिसळीच्या 'ताटा'ची प्रतीक्षा.
बाहेर उभे राहून आत बसलेल्या लोकांना मिसळ चापतांना बघणे फार अवघड. मग ते frustration बाहेर काढण्यासाठी 'इतके पैसे कमावतात तरी बाजूची जास्त जागा का नाही घेत, कोथरूड ला branch का नाही काढत, कांद्याचे एक्सट्रा पैसे का लावतात, मराठी माणूस धंद्यात मागे का' असले परिसं'वाद'. २०-२५ मिनिटे वाट पाहिल्यावर एकदाचा आपला नंबर लागला कि ह्या चर्चेला आपोआपच पूर्णविराम मिळतो. काउंटर कडे जात असताना उजवीकडे लालभडक तर्री मोठ्या पातेल्यात उकळताना दिसते आणि जीव (त्या) भांड्यात पडतो. मिसळीच्या प्लेट्स घेऊन टेबलाशी बसलो कि स्टीलच्या मग मधली तर्री कधी एकदा आपल्या प्लेट मध्ये येते असं होतं.
पोह्याचा खुसखुशीत चिवडा, मटकीची उसळ, बटाट्याची भाजी, जाड शेव आणि बारीक चिरलेला कांदा ह्या मिश्रणावर ती 'जादूई' तर्री ओतल्यावर स्वर्ग दोन बोटे उरल्याचा भास होतो. डाव्या हाताने पाव त्या रश्यात बुडवून त्याचा द्रोणासारखा आकार करून उजव्या हातातल्या चमच्याने त्यात मिसळ भरून पहिला घास खाल्ल्यावर जीवनाचे सार्थक झाल्यासारखं वाटतं. मग त्यावर १-२ चमचे तर्री प्यायल्यावर ब्रह्मानंदी टाळी लागते. 'ह्याचसाठी केला होता अट्टाहास'!!!
मालक (पुणेरी असून देखील!) प्रेमाने ताक, लिंबू सरबत, कोकम इत्यादीचा आग्रह करतात. पण ह्या स्वर्गीय चवीत इतर काहीच ‘मिसळू’ नये असं वाटतं. म्हणून दरवेळी मी त्यांना नम्रपणे नकार देतो.
पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे बायको देखील 'बेडेकर मिसळ प्रेमी' मिळाली. Hygiene आणि ambience च्या भ्रामक कल्पनेमुळे बेडेकर ऐवजी 'वाडेश्वर' ला मिसळ खाऊ म्हणणाऱ्या काही मित्रांच्या बायका पाहिल्या कि त्यांची कीव आणि स्वतः चा हेवा वाटतो.
वेळेअभावी कधीतरी बेडेकर मिसळ पार्सल करून घरी आणून खाणे ठीक आहे. पण त्याची खरी मजा तिथल्या अरुंद टेबलावर (समोर सर्वस्वी अनोळखी माणसासमोर बसून!) खाण्यात आहे. मिसळ तिखट लागल्यास ताक पिण्यापेक्षा थोडा वेळ तिखटपणा सहन करून मग गरम चहा प्यायला तर तो अगदी 'अमृततुल्य' लागतो. तिखट जिभेवर गरम चहाची ‘किक’ किमान अर्धा तास तरी राहते.
आता पुण्यात सुट्टीपुरतं थोडेच दिवस येणं होतं. त्यामुळे कमी दिवसांत सगळ्या आवडीच्या ठिकाणांना न्याय देणे अवघड होऊन बसतं. म्हणून आता आधी बेडेकर मिसळ, मग रुपालीत फिल्टर कॉफी आणि नंतर डेक्कनला जरा टाईम पास करून जाता जाता 'गुडलक' मध्ये चहा असे एका दगडात तीन पक्षी मारतो.
ह्या पृथ्वीतलावर मिसळ अनेक ठिकाणी मिळते, पण ज्याच्यापुढे 'कर' जोडावे अशी फक्त बेडे'कर'.
प्रतिक्रिया
13 Apr 2017 - 7:14 pm | मोदक
असहमत.
13 Apr 2017 - 8:08 pm | उपेक्षित
असहमत शी सहमत...
पुर्वी अलका टोकिज च्या समोर बटाटा भाजी आणि झटका मिसळ मिळायची आयुष्यात खाल्लेली सर्वात बेस्ट मिसळ होती ती आता बंद झाले आहे ते हॉटेल :(
बाकी बेडेकर/ श्री वगेरेला मिळणारी मिसळ अत्यंत सपक असते आणि रामनाथची कई च्या कै तिखट असते
13 Apr 2017 - 7:16 pm | अनुप ढेरे
वाह मस्तं लिहिलय.
पण लोक आता ही खरी मिसळच नाही वगैरे पिंका सुरू करतील.
13 Apr 2017 - 7:19 pm | यशोधरा
मस्त लिहिलंय.
13 Apr 2017 - 8:20 pm | सुमीत
मिसळ ला चव पाहिजे ती अशी "बेडेकर" सारखी. तिख्टाचा जळजाळाट म्हणजे मिसळ नाही.
13 Apr 2017 - 8:21 pm | सूड
बेडेकरची मिसळ म्हणजे पाणचटाहूनी पाणचट अशा बर्याच लोकांकडून पोचपावत्या मिळाल्याने अजूनतरी त्या वाटेला गेलो नाहीय.
13 Apr 2017 - 9:10 pm | रेवती
लेखन आवडलं. त्यातील भावनेशी सहमत. आता मिसळ करतेच! खूप दिवस झाले खाल्ली नाही. मुलाला आवडत नाही म्हणून मग कमीवेळा केली जाते. आधीच मिसळीच्या साहित्याची, पदार्थांची जमवाजमवी खूप असते, त्यात आम्हा दोघांसाठी मिसळ व मुलासाठी वेगळे काहीतरी करण्यासाठी तेवढा वेळ व शक्ती हवी. ;)
मला बेडेकरांची मिसळ आवडते. आता पूर्वीपेक्षा चवीत फर पडलाय. तसेच मागील भारतवारीत प्रभाचा ब वडा खाल्ला व आता कुठला दुसरा खायला नको वाटतो. त्यांची मिसळही आवडली होती पण फार लवकर उपहारगृह बंद करतात. लक्षुमीरोडवरील, तुबामधील खरेदी आटोपून (आता खरेदी म्हणजे एखादा शर्ट, लेंग्याची नाडी, पर्सचा तुटलेला पट्टा दुरुस्ती, कुकरचा व्हॉल्व वगैरे) चालत प्रभाला येईस्तोवर ते बंद झालेले असते.
13 Apr 2017 - 10:11 pm | अनुप ढेरे
प्रभाचा वडा बेष्टच. पण मालक तितकाच तिरसट आहे.
15 Apr 2017 - 3:18 am | रेवती
तसे कॉम्बिनेशनच असावे. ;)
14 Apr 2017 - 1:36 pm | सरनौबत
ग्राहक शक्यतो येऊ नयेत ह्याची पूर्णपणे खबरदारी घेतात प्रभा वाले. रविवारी बंद, इतर दिवशी १-२ तासात बटाटे वडा संपतो, वड्या बरोबर चटणी वगैरे काही नाही. पण इतकं असून देखील मी सुद्धा तिथेच वडा खायला जातो.
15 Apr 2017 - 3:26 am | रेवती
वड्याबरोबर चटणी नाही तसेच वड्याच्या भाजीत हळद नाही वगैरे गोष्ती मीही पहिल्यांदा अनुभवल्या तरी व्यसन लागावं असा वडा आहे हे नक्की. ;)
तेथील मालकांना माझ्या वडिलांनी त्यांच्या लवकर बंद होणार्या वेळांबद्दल विचारले असता त्यांनी निदान त्यादिवशी तरी बर्या आवाजात उत्तर दिले.
तेथील ट्रॅफिकची मला कल्पना नाही पण मालक म्हणाले की ट्रॅफिक जॅम, पार्किंगला जागा नसणे या कारणाने ग्राहक तिथे थांबेनासे झाले. त्यांचे पदार्थ वाया जाऊ लागले. त्यांच्या म्हणण्यानुसार रोजचे पन्नास पन्नास वडे, पातेली भरून इतर पदार्थ वाया जायचे व लोक म्हणायचे की पार्किंग नाही तर कसे येणार. यावर सध्यातरी कोणाकडेच उपाय नाही. मग त्यांनी त्यांचे हिशोब घालून तेवढेच पदार्थ तयार करायला सुरुवात केली व दुकान बंद करून जायला लागले. वेळेच्या गणिताला नावे ठेवत का होईना ग्राहक येतातच, व्यवसाय आवश्यक तेवढा होतोच आहे.
आता लहानसे उपहारगृह पार्किंगची व्यवस्था कशी करणार हा प्रश्न आहे हे पटले तरी चवीसाठी मला तो गैरसोयिचा वाटतो. ;)
15 Apr 2017 - 12:56 pm | सरनौबत
अगदी खरंय. इतर अनेक ठिकाणचे वडा-पाव गरमा-गरम असल्यामुळे आणि चटणी वगैरे मुळे चमचमीत लागतात. पण प्रभाचा वडा तसा नाही. आलं लसूण मुळे सारणाची चव उत्तम; शिवाय वरील बेसनाचे आवरण देखील अति जाड नाही.
पार्किंग च्या समस्येमुळे झालेली समस्या ऐकून वाईट वाटलं.
13 Apr 2017 - 9:28 pm | मृत्युन्जय
वाह वाह. बेडेकर म्हणजे अप्रतिम मिसळ. दहा गावच्या मिसळ खाउन झाल्यावर असे प्रामाणिक मत आहे की बेडेकर पेक्षा उत्तम मिसळ कुठेही मिळत नाही,. याचा अर्थ बाकीचे पाणचट मिसळ देतात असे काही म्हणणे नाही. पण बेडेकर म्हतल्यावर जी खास चव जिभेवर येते ती कुठेच नाही.
बाकी हे मात्र मान्य केले पाहिजे की पुण्याबाहेरच्या ७५% (विदा उपलब्ध नाही. तरी मागितल्यास अपमान केला जाइल) लोकांना बेडेकर आवडत नाही आणि पुण्यातल्या ७५% पेक्षा जास्त लोकांना बेडेकरच सर्वोत्कृष्ट वाटते (विदा उपलब्ध नाही. तरी मागितल्यास अपमान केला जाइल)
13 Apr 2017 - 9:42 pm | पद्मावति
लेख आवडला.
13 Apr 2017 - 10:06 pm | मितान
लेखन आवडले !
13 Apr 2017 - 10:30 pm | एस
अगदी, अगदी!
13 Apr 2017 - 10:47 pm | तुषार काळभोर
बेडेकरांच्या मिसळीविषयी असहमत.
लैच पांचट! श्रीची लै बरी त्यापेक्षा.
रामनाथला 'कडक'चा माज ना करता लाईट किंवा मिडीयम घेतली तर चव चांगलीच आहे.
काटा किर्रर्र चांगली आहे, तीपण आपल्या वकुबानुसार लाईट किंवा मिडीयम घ्यावी.
सातारा रस्त्यावर वाळवेकर लॉन्स च्या गल्लीत पाच वर्षांपूर्वी एक गाडी होती, त्याची भजी अन मिसळ मस्त होती. आता आहे की नाही माहिती नाही.
इथेच कौतुक ऐकलेली 'मंगला'समोरची मामा मिसळसुध्दा बेडेकरांच्या पेक्षा पांचट!
नाशकाच्या निखारा मिसळचं लै कौतुक ऐकलंय, ती एकदा खायचीये.
मी हडपसरच्या कॉलेजात असताना महादेव नगर मध्ये एक हनुमान हॉटेल होते. ती मी खाल्लेली ब्येष्ट मिसळ! आता हनुमानकाका पण नाहीत अन ते हॉटेल पण नाही.
13 Apr 2017 - 10:47 pm | रुपी
छान लिहिलंय.
14 Apr 2017 - 7:38 am | चतुरंग
कित्ती वर्ष झालीत असं वाटतं खाऊन! :)
तिथले मालक आवर्जून विचारायचे ते आठवलं "अजून एक मिसळ देऊ का दोघात अर्धी अर्धी? गोड ताक आहे थंडगार देऊ का"
किंवा "ताजं दही आहे घट्ट" किंवा कोकम सरबत आहे" मस्त आठवणी....
मिसळ म्हणजे फक्त लाल भडक रस्सा किंवा फक्त जीभ जाळणारी तिखट तर्री असेच असते अशा समजुतीने जाणार्या लोकांना ती बहुदा आवडणार नाही.
(आणि खरं तर एका मिसळीची दुसर्याशी तुलना नकोच. खवय्याने कसे सगळ्यांचा आस्वाद घ्यावा.)
(बेडेकर मिसळ प्रेमी) रंगा
14 Apr 2017 - 8:56 am | बोका-ए-आझम
वेगळी चव म्हणून आवडली होती पण नाशकातल्या मिसळी खाल्ल्यावर त्याच्यासारखं काहीच नाही हे समजलं. शिवाय मामलेदार हा एक जबरदस्त आॅप्शन जवळ असताना कशाला दुसरीकडे जायचं?कोल्हापूरची मिसळ पण भारी असते असं ऐकलंय पण तांबडा पांढरा सोडून मिसळ खाणं शक्य नाही.
14 Apr 2017 - 10:26 am | मोदक
पत्ता द्या.. (नाशिकच्या मिसळीचा)
14 Apr 2017 - 9:17 am | आषाढ_दर्द_गाणे
लेखन आवडलं!
असं चवीनं खाणे आणि तितक्याच रसिकतेने वर्णन करणे एकदम भारी!
त्याउप्पर असहमती वगैरे दाखवणं म्हणजे फारच उच्च संभाषा!
14 Apr 2017 - 10:25 am | मोदक
अहो.. आंबट चव असते हो त्या मिसळीला.
मस्त फरसाण,
बाकी मालमसाला,
कच्चा कांदा,
रसाळ लिंबू
असे सगळे समोर असताना त्यात सांबार घातले तर कसे वाटेल..?
तसे अनुभवले आहे म्हणून असहमती दर्शवली (आणि प्रतिसादात पुढील पंचनामा केला नव्हता)
असो, प्रत्येकाची आवड असते त्याचाही आदर आहेच. :)
14 Apr 2017 - 1:24 pm | सरनौबत
प्रस्तुत लेखाचा उद्देश 'तुमच्या श्रद्धास्थानांनां धक्का पोचवणे' हा नसून मला ज्या प्रकारची मिसळ आवडते त्याचे वर्णन आहे. फक्त बेडेकर मिसळ जर सर्वांना आवडणारी असती तर तिकडे ३-४ तास थांबून सुद्धा बसायला जागा मिळाली नसती. लोकांनी सजेस्ट केलेल्या आणि मला माहिती नसलेल्या 'मिसळी' मी जरूर try करेन. तसेच लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे म्हणून 'तिखट' मानून एन्जॉय करा कि राव.
14 Apr 2017 - 4:46 pm | मोदक
पहिला प्रयत्न आहे हे माहिती नव्हते. चांगले लिहिले आहे.
..आणि याबद्दल तुम्हाला एक मिसळ लागू.. :)
14 Apr 2017 - 5:22 pm | उपेक्षित
प्रत्येकाच्या वयक्तिक आवडीचा पूर्ण आदर आहे हे मगाशी लिहायचे राहिलेच राव...
14 Apr 2017 - 9:54 am | किसन शिंदे
बेडेकर मिसळ अजून खाल्ली नसल्याने काही बोलता येणार नाही. हं..लेख मात्र मस्त लिहीलाय.
14 Apr 2017 - 11:43 am | सूड
होय, पण आता कौतुक > निंदा झाल्याने उत्सुकता वाढलीये.
(तरी मामलेदारला तोड नाहीच)
14 Apr 2017 - 11:45 am | किसन शिंदे
बाडिस
14 Apr 2017 - 10:22 am | पाटीलभाऊ
मस्त वर्णन केलंय...!
14 Apr 2017 - 10:29 am | लाडू
अगदीच सहमत.
आता रविवारी सकाळी जायलाच पाहिजे बेडेकर ला
14 Apr 2017 - 10:45 am | मोदक
मिसळपाव बद्दल प्रत्येक गावातला माणूस अशी मिसळ जगात कुठे मिळत नाही असे म्हणतो आणि प्रत्येक मिसळ तशी युनीकच असते.
पुण्यात रामनाथ, काटा किर्र, मधूची गाडी, अतृप्त बुवांनी सांगितलेली मिसळ असे सगळे प्रकार ट्राय करून झाले.
सांगली, नगर, कोल्हापूर, सरदवाडी, पिंपरी, चिंचवड, चाकण आणि सोमाटणे फाटा वगैरे ठिकाणेही धुंडाळून झाली.
नेवाळे सारखी जहाल तिखट मिसळही खाल्ली (ही मिसळ खाण्यापेक्षा तेलात तिखट कालवून ते प्यावे - हे वैयक्तीक मत)
सध्या आवडली आहे ती मोरया गोसावी जवळील कवी बंधूंची बालाजी मिसळ.
बादवे - शुभम कॉम्प्लेक्स चिंचवड, येथे तीन प्रकारचा रस्सा असलेली एक मिसळ सुरू झाली आहे. ती पण आवडली.
पण अजून शोध सुरू आहे तो कोल्हापूरात मिळणार्या मटणाच्या रस्श्यातल्या मिसळीचा - ही मिसळ कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा - लै उपकार होतील.
*******
एकदा कोकणातून परत येताना वेळेचे गणित चुकले आणि जेवणासाठी वेळ घालवणे शक्य नव्हते. म्हणून एका हॉटेलात "मिसळपाव.. फक्त तर्री ऐवजी चिकनचा तांबडा रस्सा" अशी तिरपागडी ऑर्डर दिली. तो गल्ल्यावरचा मालकही साशंक नजरेने "चांगली लागेल..?" असे विचारत होता.
पण काय सांगू म्हाराजा... गरम गरम तांबडा रस्सा, पाव, फरसाण आणि कांदालिंबू... झक्कास समीकरण जुळले.
नंतर मी, बुलेट, एक साधे पान आणि ताम्हिणी घाट... व्वाह..!!
14 Apr 2017 - 1:30 pm | सरनौबत
जाणकार लोकं सांगतात कि अति तिखट मिसळ खाल्ली कि तेव्हा उजव्या हाताला आणि नंतर डाव्या हाताला वास येतो.
14 Apr 2017 - 7:55 pm | सुबोध खरे
एक परदेशी नागरिक कोल्हापुरी झणझणीत मिसळ खाऊन दुसऱ्या दिवशी म्हणाला कि आता मला कळले कि भारतीय लोक धुवायला पाणी का वापरतात
टॉयलेट पेपर वापरला तर तो पेट घेईल -)))
14 Apr 2017 - 8:42 pm | तुषार काळभोर
योगायोगाने परवा गावच्या यात्रेला (आम्ही उरूस म्हणतो), घरी मटण होतं. बऱ्याच वर्षांपासून सवयीप्रमाणे गावातून घरी जाताना गावातली प्राचीन कालीन क्लासिक भेळ घेतली. बाकीच्यांनी मसाला-कांदा कालवून खाल्ली अन मी मटणाच्या रस्स्यात कालवून. मला आवडते. मटकी ऐवजी मटणाचा रस्सा टाकून केलेली भेळ मला जन्नत वाटते.
14 Apr 2017 - 9:05 pm | आषाढ_दर्द_गाणे
हे कोंबडी/ मटणाचे रस्से घालण्याचं वाचून माझी मिसळीप्रतीची उदासीनता गळून पडून उत्सुकता भलतीच चाळवलेली आहे!
माहितीकरता धन्यवाद, करून पाहणेत यील.
पण बटाट्याची भाजी मिसळीत घालणे माहित नव्हते
16 Apr 2017 - 11:34 am | हतोळकरांचा प्रसाद
अशात आवडलेली मिसळ म्हणजे अरिहंत, चिंचवड! मस्त टेस्ट. उगाच बचकभर तिखट घालून केलेल्या मिसळी गल्लीबोळात किंवा नाक्यांनाक्यावर सापडतील. बेडेकर पण ओकेओकेच! मागे कालिजात असताना आरटीओ ऑफिसच्या कँटीन मध्ये मिळायची ती मिसळही आवडायची, आता मिळते कि नाही माहित नाही.
9 Jun 2017 - 1:43 am | दिपस्तंभ
मस्त आहे
9 Jun 2017 - 1:49 am | दिपस्तंभ
What are these three samples ?
It’s the power of 3 K- Khandeshi, Konkani and Kolhapuri.
Khandeshi is mix of garam masalas, jeera (cumin seeds), saunf (fennel seeds) with khandeshi kala masala.
Konkani is mix of green chillies which is fried first and then mixed with coriander, pudina as a coolant and spices.
Kolhapuri is the sample / tarri which is generally served with misal.
17630161_1430027880353651_1910637583439706226_n
Three Samples
The misal preparation has matki , chakariphul ( type of garam masala) loads of farsaan and coriander garnishing. Home made papad, curd, and fresh buttered pav is the ideal combination.
17796503_1430027927020313_2123470876452329325_n
Misal bowl
The three samples are served piping hot and you can ask more for it. The attempt to experiment with three different flavours works quite well.
And I think one of the rare places, who have tried to add twist to a sacred food like misal!
14 Apr 2017 - 10:56 am | कबीरा
बेडेकर मिसळ, प्रभा चा बटाटा वडा, पुष्करणी ची भेळ, पूना बोर्डिंग हाऊस च जेवण, बादशाही चा बटाटा टोस्ट, मोतीबागेसमोरचा चहा ह्या गोष्टी अगदी सगळ्यात उत्तम नसल्या तरी ह्या ठिकाणी जाऊन जो एक नॉस्टॅल्जिक असा जो काही एक फील येतो ना आणि तिथे जाऊन खाऊन आल्यावर जी एक तृप्तता मिळते ती गोष्ट नॉन पुणेकरांना नाही कळणार हो.
14 Apr 2017 - 1:27 pm | सरनौबत
अगदी खरंय. वैशाली रूपाली पेक्षा अनेक ठिकाणी डोसा उत्कृष्ट मिळत असेल, पण आपल्याला तिथलाच आवडतो बुआ. ह्याचं कारण मुख्यतः नॉस्टॅल्जिक च आहे ;-)
14 Apr 2017 - 12:07 pm | कबीरा
बाणेर मधील खासबाग, शिरवळ चे येष्टी कॅन्टीन, माणगांव मधील आनंद भुवन ही सुद्धा काही आवडती मिसळ केंद्रे..
14 Apr 2017 - 4:47 pm | मोदक
बाणेर मधील खासबाग
पत्ता द्या,...
15 Apr 2017 - 6:57 am | कबीरा
महाबळेश्वर हॉटेल च्या पुढे पेट्रोल पंप आहे त्याला लागून डावीकडे आत एक रस्ता जातो त्या रस्त्यालाच montreal का काहीतरी एक उंच इमारत आहे त्याचाच तळमजल्याला खासबाग.
14 Apr 2017 - 5:25 pm | उपेक्षित
माझ्या वयक्तिक अनुभवानुसार बर्याचदा एखाद्या आडबाजूला खंग्री मिसळ / चहा मिळून जातो फ़क़्त नजर शोधक पाहिजे...
14 Apr 2017 - 6:46 pm | बबन ताम्बे
कुणी पत्ता सांगेल काय ?
14 Apr 2017 - 6:47 pm | बबन ताम्बे
कुणी पत्ता सांगेल काय ?
15 Apr 2017 - 3:15 am | रेवती
बबनराव,
प्रभा विश्रांती गृह,
केसरीवाड्यासमोर,
नारायणपेठ, पुणे
वेळ ही दुपारी साडेचार रात्री साडेआठपर्यंत अशी लिहिली असली तरी सात वाजता सगळा खडखडाट असतो.
15 Apr 2017 - 8:20 am | अनुप ढेरे
सकाळी( विकांताला तरी ) पण चालु असतं. बहुधा ११ पर्यंत.
18 Apr 2017 - 5:01 pm | बबन ताम्बे
.
14 Apr 2017 - 7:50 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मिसळ खावी ती कोल्हापुरच्या फडतरेंचीच किंवा मग खासबाग.
बेडेकराची गोडसर पांचट कोकणस्थी मिसळ फक्त कोब्रांनाच आवडते असा आमचा कयास आहे.
8 Jun 2017 - 11:28 am | रानडेंचा ओंकार
कोब्रांना झणझणीत तांबडा पण आवडतो बरं!!!
14 Apr 2017 - 9:07 pm | आषाढ_दर्द_गाणे
इथे मुंबईतल्या मिसळींवर काही वाचण्यात आले नाही अजून.
एकाच जागा माहीत होती, गिरगावातील सुभाष.
पण त्याची आठवण नाही उरली काही आता.
15 Apr 2017 - 12:23 am | मोदक
मामलेदारचा उल्लेख आला आहे की वर.
का ठाण्याला मुंबईकर गावकुसाबाहेरचे समजतात? ;)
15 Apr 2017 - 12:34 am | आषाढ_दर्द_गाणे
इथे मिपावर मूक संमती कशी दाखवतात?
स्माईली आहे का कुठला?
:दात
14 Apr 2017 - 9:53 pm | विखि
बेडेकर लै आंबट गोड लागते, काटाकिर्र् ठिक, रामनाथ मस्त, नेवाळे नुसतच तिखट करतय, के ए म हॉस्पिटल समोर आप्पाची मिसळ पण चांगलीय ( हिरवा ठेचा पण मिळतो सोबत), कोथरुड शिवाजी पुतळा ची तांबे मिसळ पण खायला हरकत नाय, कर्वे रोड इन्कम टॅक्स गल्लीतली भडाईत मिसळ मस्तय( दुपारी १२ पर्यन्त सम्पुन जाते, जाणार असेल तर लवकर जायच) श्री मिसळ बरीय, तुळशीबाग ची श्रीकृश्न लै गोड( मिसळ चा फील नाय) तशीच वैद्य मिसळ हिरव्या रस्स्याची गोड, कोल्हापुर ची बावडा मिसळ मस्त, फडतरे पण, खासबाग नाय आवडली,
नाशीक ची अंबीका आवड्ली( काळ्या रस्स्याची)
17 Apr 2017 - 1:55 pm | मृत्युन्जय
तांबे मिसळ नक्की कुठेशी म्हणायची? इतकी वर्षे कोथरुडात राहुन माहिती नाही. एकदा चाखायलाच हवी.
शिवाजी पुतळ्यापाशी नविन राजमकमल मिसळ सुरु झाली आहे नारायणगावची. ती सुद्धा बरी आहे. पण भक्त होण्याइतकी चांगली नाही वाटली.
बाकी फडतरे बद्दल सहमत. एकदम बेचव मिसळ. खासबाग मात्र आवडते. पण ती देखील थोडीफार पांचट असते कधीकधी.
18 Apr 2017 - 5:15 pm | उपेक्षित
कोथरूडला तुम्ही छ.शिवाजी पुतळ्याकडून बस stand कडे जी निमुळती गल्ली जाते (जुन्या नीना-रिची दुकानावरून) त्या गल्लीत आत शिरल्या शिरल्या उजव्या हाताला लयी जुनाट दुकान आहे तांबे मिसळ चे
बाकी मिसळ चांगली मिळते जाऊन या एक डाव
15 Apr 2017 - 11:22 am | अभिजीत अवलिया
लेख चांगला लिहिलाय. बेडेकरांचे नाव ऐकून एकदा खूप वेळ रांगेत थांबून मिसळ खाल्ली होती. अजिबात आवडली नाही. तसेच गावी जाताना एकदा वेळात वेळ काढून कोल्हापूरला फडतरे मिसळ खाल्ली होती. त्यासाठी काहीही काम नसताना कोल्हापुरात २ तास थांबलो होतो. अतिशय पांचट वाटली फडतरे.
15 Apr 2017 - 12:01 pm | कंजूस
मिसळीत--
>>कुठे अति तिखट, तर कुठे तर्री (रस्सा) बेचव, तर अनेक ठिकाणी मिसळीच्या मानाने बटाटा भाजी चं proportion गंडलेलं. >>
।
।
बटाटा भाजी कुठे असते यात?
16 Apr 2017 - 4:56 pm | सरनौबत
तर्री ओतण्यापूर्वी बघा एकदा... डोसा भाजी सारखी भाजी घालतात २ छोटे चमचे. तेवढा दम निघत नसल्यास एकदा काउंटर जवळ उभे राहून बघा, तिकडे समोर मिसळ भरण्याचे काम सुरु असते तिथे दिसेल.
17 Apr 2017 - 8:32 am | कंजूस
हा भाजीचा प्रकार वेगळा वाटला. मारवाडी लोक मिसळ चांगली करतात.
16 Apr 2017 - 7:51 pm | कपिलमुनी
बेडेकरांकडे जे मिश्रण मिळते त्याला मिसळ म्हणतात ?? _/\_
16 Apr 2017 - 8:04 pm | रेवती
तुम्हाला त्या पदार्थाला मिसळ म्हणायचे नसल्यास हरकत नाही. नवे नाव द्या.........अन्नपदार्थ असल्याने साजेसे काही सुचवा.
17 Apr 2017 - 9:45 am | nanaba
मिसळ म्हणजे फक्त लाल भडक रस्सा किंवा फक्त जीभ जाळणारी तिखट तर्री असेच असते अशा समजुतीने जाणार्या लोकांना ती बहुदा आवडणार नाही.
>>अस अजिबात मत नाहिये. नुसती तिखटजाळ मिसळ आवडत नाहीच.
पण बेडेकर अतीच गोड वाटली. बिलकुल आवडली नाही.
17 Apr 2017 - 12:53 pm | किल्लेदार
बेडेकर मिसळीपुढे कर जोडावेसे वाटत नसले तरी तुमच्या लेखाला मात्र कर जोडतो. बाकी "इतकी वर्ष पुण्यात राहून बेडेकर मिसळ कशी खाल्ली नाही ? थू....!!!"अशी निर्भस्यना केली गेली म्हणून एकदा मित्रधर्म पाळायला खाल्ली आणि कशी वाटली मिसळ असे विचारल्यावर मात्र मूग गिळून गप्पा बसलो (मिसळीमध्ये मूग नसून सुद्धा). मिसळीची चव हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न असला तरी मिसळीबरोबर पाव स्लाइस ही कल्पना पण मला पटत नाही. हे म्हणजे भरीत-भाकरीचा चा बेत करायचा आणि भाकऱ्या थापायचा कंटाळा आल्यामुळे भरताशी पोळी खावी लागावी असे वाटते.
थोडक्यात काय तर वेडे करणारी मिसळ कशी खाल्ली नाहीस म्हणून लोकांनी वेड्यात काढू नये इतपत खाण्याइतकीच मला ही मिसळ वाटली.
17 Apr 2017 - 5:46 pm | कपिलमुनी
समस्त सांगली कोल्हापूर स्लाइसच खाते.
तिकडे मोठे स्लाईस असतात.
17 Apr 2017 - 7:20 pm | सरनौबत
मिसळ आवडत नसून देखील लेख आवडल्याबद्दल धन्यवाद. स्लाईस / पाव / without पाव ह्या ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. स्लाईस तर्री ला मस्त शोषून घेते म्हणून मला पाव ऐवजी स्लाईस आवडतो.
17 Apr 2017 - 3:10 pm | विशुमित
<<<मिसळीबरोबर पाव स्लाइस ही कल्पना पण मला पटत नाही.>>>
==>> अगदी सहमत..
17 Apr 2017 - 8:25 pm | पिशी अबोली
बेडेकर मिसळ मुळीच आवडलेली नसली, तरी तुमचं लेखन आवडलं.
त्या पत्र्या मारुतीच्या आडोशाला असलेला चहा मात्र आवडतो. बेडेकरची मिसळ थोडीशी कमी सपक असती तर हे कॉम्बिनेशन अतिशय आवडलं असतं..
18 Apr 2017 - 5:10 pm | यशोधरा
पत्र्या मारुतीकडून जरा वर गेलं की चौकाच्या अलिकडेही एक चहा कॉफीची गाडी आहे. तेथील कॉफी आणि चहा अत्युत्तम आहे.
18 Apr 2017 - 7:32 pm | पिशी अबोली
कॉफी लवकरच ट्राय केली जाईल. :)
18 Apr 2017 - 7:56 pm | आदूबाळ
बन्दुक्षणी निवास? क्या बात! जबरदस्त आहे ते.
19 Apr 2017 - 12:14 am | पिशी अबोली
येस्स.. बंदुक्षणीच.
19 Apr 2017 - 12:16 am | पिशी अबोली
सॉरी, बन्दुक्षणी.
18 Apr 2017 - 11:29 am | इडली डोसा
एका काकांना रस्ता विचारला तर ते म्हणे " तुम्हाला बेडेकरच हवी असेल तर पत्ता सांगतो पण आमच्याकडेही चांगली मिसळ मिळते." =)
मग काय अजुन शोधाशोध करण्यापेक्षा आम्ही तिथेच मिसळ खाल्ली ती श्री मिसळ होती आणि चांगली होती.
बाकी बेडेकर खायचा योग पुन्हा कधी आला नाही.
18 Apr 2017 - 11:30 am | इडली डोसा
.
18 Apr 2017 - 6:48 pm | सूड
=))
19 Apr 2017 - 10:33 am | साहेब..
लोळ!!
5 Jun 2017 - 1:13 pm | किरण कुमार
खरे तर अत्यंत टूकार प्रकारची मिसळ आहे ती, आवडण्यासारखी एकही गोष्ट नाही , कशात काहीही टाकून सपक पाणी ...........
इतर ठिकाणी झणझणीत तरी मिळतात
6 Jun 2017 - 12:40 pm | मुक्त विहारि
आणि मिसळीबद्दल म्हणाल तर....
आमची सौ. एकदम अप्रतिम मिसळ बनवते, त्यामुळे हल्ली मुद्दाम मिसळ खायला म्हणून जात नाही. ती मटकीची उसळ वापरते.
असो,
खिम्याचा रस्सा, फरसाणातली पापडी, रतलामी शेव, तळलेले मसूर आणि बारीक चिरलेला कांदा हे मला आवडलेले काँबिनेशन.
9 Jun 2017 - 10:18 am | सुबोध खरे
खिम्याचा रस्सा, फरसाणातली पापडी, रतलामी शेव, तळलेले मसूर आणि बारीक चिरलेला कांदा
तों पा सु
केंव्हा बोलावताय खायला ?
7 Jun 2017 - 11:51 pm | असंका
वेडे'कर'णारी मधले अवतरण चिन्ह नक्की काय सुचवायला वापरलंय?
8 Jun 2017 - 11:18 am | रानडेंचा ओंकार
बेडेकरांनी मिसळीत वांग घातलेलं बघितलं अन तेव्हाच मनातून बाद केल त्यान्ना. पुण्यात मिसळ आवडली ती 'नाद खुळा' ची, राजाराम पुलावरून डावीकडे वळून कर्वेनगर कडे जाताना आहे. हा माझा अनुभव आहे...
8 Jun 2017 - 6:08 pm | सप्तरंगी
लिखाणाचा पहिलाच प्रयत्न झणझणीत आहे..