आज आपण आमच्या घरातली माझी आजची बक्षिसपात्र पाककृती पाहू बरं का.
नेहमी आपण मैद्याची नान खातो. पण ती थंड झाली की चिवट होते. मग घरातल्या मोठ्यांची नाराजी. त्यावर उपाय म्हणून ही संपूर्ण कणीक वापरून केलेली नान. पहा कशी वाटते. थंड झाली तरी चिवट होत नाहीच पण चविष्ट ही लागते.
साहित्यः २ वाट्या कणीक, २ चमचे दही, १ चमचा तेल, मीठ, १/२ चमचा यीस्ट, १ चमचा साखर, ३ टी स्पून बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टी-स्पून कलोंजी/काळे तीळ, कणीक मळायला कोमट पाणी, बटर.
कृती: यीस्ट अर्धा कप कोमट पाण्यात साखर घालून अर्धा तास ठेवले. नंतर कणकेत मीठ, एक चमचा तेल, १ टी-स्पून लसूण , दही आणि हे यीस्ट च मिश्रण घातले. कोमट पाण्याच्या सहाय्याने कणीक नेहमी पोळीसाठी भिजवतो तशीच पण खूप मळून घेतली आणि तेलाचा हात लावून २ तास झाकून ठेवली.
२ तासांनंतर तो कणकेचा गोळा चांगला दुप्पट झालेला असतो. मग ज्या कुणाचा आपल्याला खूप राग आला असेल त्यालाच आपण भरपूर गुद्दे मारतोय अशी रम्य कल्पना करून त्या गोळ्याला छानपैकी गुद्दे मारायचे आणि त्याचे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे. या प्रमाणात माझे ७ गोळे झाले.
नान करण्याआधी एका ताटलीत तीळ्/कलोंजी, लसूण, कोथिंबीर असं काढून ठेवायचं. त्या गोळ्याला हे सगळं थोडंथोडं लावायचं आणि थेंबाच्या आकारात लाटायचं.हे काही एवढं खास जमलं नाहीये मला. पण तरी केलंच. :) मग तव्यावर दोन्ही बाजूंनी बटर लावून भाजून घ्यायची.
ही नान तुम्ही कोणत्याही उत्तर भारतीय भाजीबरोबर वाढा. मी आपलं घरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सूचनेनुसार ऑल टाईम फेव्हरेट आलू-मटर केलं होतं.
प्रतिक्रिया
8 Apr 2017 - 5:30 pm | तुषार काळभोर
खुदा आपको बरकत और हमें ऐसे नान से नवाजे!
8 Apr 2017 - 6:55 pm | केडी
मस्त ग... तो नान लाटला कि एका बाजूला पाणी लावून ती बाजु तव्यावर चिकटवून भाजून घयायची...मग तवा चक्क गॅस वर पालथा घालून डायरेक्ट वरची बाजू गॅस वर भाजायची ....त्याने जरा तो तंदूर टाईप भाजून निघेल....शेवटी वरून बटर लावायचे .....
11 Apr 2017 - 12:40 pm | सविता००१
हे नव्हतं माहीत मला.
धन्स रे केदार
पुढच्या वेळी नक्की. मागे एकदा कुठेतरी वाचून कुकर मध्ये त्या नान लावून पाहिलं होतं मी. बर्या झाल्या होत्या. इतक्या काही खास नव्हत्या. आता हे नक्की करेन.
11 Apr 2017 - 7:08 pm | केडी
करून बघ...मी म्हणतोय ते असं करायच
13 Apr 2017 - 5:34 pm | सविता००१
नक्की करेन.
8 Apr 2017 - 8:38 pm | रेवती
भेट गं, भेट तू एकदा. पळवूनच आणते.
पाकृ व फोटू आवडले.
8 Apr 2017 - 10:30 pm | फ्रेनी
छान पाककृती .
8 Apr 2017 - 11:03 pm | मोदक
अरे व्वा... भारी आयड्या आहे.
9 Apr 2017 - 1:43 am | पद्मावति
क्लास्स!
9 Apr 2017 - 8:13 pm | कौशी
फोटो आणि सादरीकरण छान..
10 Apr 2017 - 1:28 pm | बरखा
नक्की करुन बघणार
10 Apr 2017 - 2:53 pm | पैसा
मस्त पाकृ!
10 Apr 2017 - 6:48 pm | एस
ह्या नानची पाककृती आणि तुमचं सविता हे नाव वाचून मला आतिवास यांची अफगाणिस्तानवरील मिपावर आलेली लेखमालिका, त्यात दिलेली नानची पाककृती, लेखमालिकेवरून निघालेलं 'भय इथले...' हे पुस्तक (त्यात हा पाककृतीचा भाग वगळलेला आहे), आणि तिथे तिथल्या परंपरेनुसार आतिवास यांना 'सविताजान' असं म्हटलं जायचं, हे सगळं आठवलं.
नान भारीच.
10 Apr 2017 - 11:45 pm | रुपी
छान पाकृ!
शेवट्चे दोन फोटो जरा मोठेही चालले असते, निदान पाहून तरी समाधान मानले असते ;)
11 Apr 2017 - 12:51 pm | सस्नेह
छानच आहे आणि सोपी पाकृ ! फोटो जरा मोठे टाकता येतात का बघ.
12 Apr 2017 - 7:50 pm | सविता००१
शेवटचा फोटोच मोठा करून टाकतेय
12 Apr 2017 - 7:52 pm | सविता००१
हा खूपच मोठा झाला :(