मागच्या आठवड्यात दक्षिण गोव्यात अगोंडा आणि पालोलेम या ठिकाणी जाणे झाले. आम्हाला दोघांनाही गोवा हे राज्य अगदी प्रचंड आवडते. त्यामुळे गेल्या ६ वर्षातील ही गोव्याची पाचवी भेट झाली. प्रत्येकवेळी नव्या कुठल्यातरी समुद्रकिनार्याच्या जवळ एखाद्या रिझॉर्टमध्ये राहून थोडीफार भटकंती करूत निसर्गाचा आनंद लुटायला आम्हाला दोघांनाही फारच आवडते. यापूर्वी कोलवा, वारका, बाणावली (बेनॉलिम) आणि वेताळभाटी (बेतालबातीम) हे चार समुद्रकिनारे झाले होते. यावेळी राहिलो होतो काणकोणजवळ असलेल्या अगोंद (अगोंडा) या समुद्रकिनार्याजवळील एका रिझॉर्टमध्ये.
या समुद्रकिनार्याचे गोव्यातील भौगोलिक स्थान पुढील नकाशात बघायला मिळेलः
अगोंदचा समुद्रकिनारा निव्वळ अप्रतिम आहे. ट्रिपअॅडव्हायझर या संकेतस्थळाने या समुद्रकिनार्याला भारतातील दुसर्या क्रमांकाचा सर्वोत्तम समुद्रकिनारा असे म्हटले आहे. त्यामुळे हा समुद्रकिनारा कधीपासून बघायचाच होता.
२३ मार्चच्या सकाळी पाऊण तासाच्या विमानप्रवासानंतर आम्ही गोव्यातील दाबोळी विमानतळावर पोहोचलो. अगोंद हे ठिकाण विमानतळापासून टॅक्सीने चांगल्या सव्वा-दीड तासाच्या अंतरावर आहे. समुद्रकिनार्यावर खूप चांगली रिझॉर्ट्स आहेत. आम्ही उतरलो होतो डनहिल बीच रिझॉर्टमध्ये. क्युबा, एच टू ओ, जोजोलापा अशी इतरही चांगली रिझॉर्ट्स आहेत. अगोंद आणि पाळोळें या समुद्रकिनार्यावर झोपड्या (बीच हट्स) असतात. या बीच हट्स नक्की कशा असतील याचा आधी अंदाज न आल्यामुळे हटमध्ये न उतरता साध्या रूममध्येच उतरलो होतो. पण नंतर वाटून गेले की हटमध्ये उतरलो असतो तर खूप चांगले झाले असते.
हा समुद्रकिनारा किती अप्रतिम आहे हे फोटो आणि व्हिडिओ बघितल्याशिवाय समजायचेच नाही. त्यामुळे इथे तिकडचे काही फोटो आणि व्हिडीओ देत आहे.
गोव्यातील मी यापूर्वी बघितलेल्या समुद्रकिनार्यांमध्ये आणि अगोंदमध्ये एक फरक मला नक्कीच जाणवला.शक्यतो मला गर्दीच्या ठिकाणी सुट्टीवर जायला आवडत नाही त्यामुळे उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यातील समुद्रकिनारे जास्त आवडतात. आणि अर्थातच भारतीय पर्यटक जास्त असतील तर गर्दीही जास्त होते. तेव्हा यापूर्वी बघितलेल्या दक्षिण गोव्यातील समुद्रकिनार्यांवर भारतीय पर्यटक त्या मानाने कमी असायचे. पण अगोंदमध्ये अपेक्षेपेक्षा बरेच जास्त भारतीय पर्यटक होते. यापूर्वी बघितलेल्या ठिकाणांमध्ये कोलव्याला भारतीय पर्यटक बर्यापैकी होते पण वारका, बाणावली (बेनॉलिम) आणि वेताळभाटी (बेतालबातीम) या ठिकाणी भारतीय पर्यटक फारच कमी होते. विशेषतः वेताळभाटीला (बेतालबातीम) आमच्या रिझॉर्टमध्ये पहिले तीन दिवस आम्हीच भारतीय पर्यटक होतो. तसेच वारका, बाणावली आणि वेताळभाटीला रशियन पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. वेताळभाटीला तर रशियन पर्यटक भारतातील रिझॉर्टमध्ये आले आहेत की आम्हीच रशियातील कुठल्यातरी रिझॉर्टमध्ये गेलो आहोत असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती होती. तिथे तर सगळ्या बीच शॅकमध्ये आणि रिझॉर्टमध्ये इंग्लिशबरोबरच रशियनमध्येही पाट्या होत्या. वेटरनाही मोडकेतोडके रशियन बोलता येत असे. अगोंदमध्ये मात्र रशियन पर्यटक फार नव्हते तर ब्रिटिश, अमेरिकन आणि जर्मन पर्यटक मोठ्या प्रमाणावर होते.
अगोंद हे छोटेसे टुमदार गाव छान आहे. गावाची लोकसंख्या असेल ३-४ हजार. त्यामुळे गावात समुद्रकिनार्याला समांतर असलेला एकच महत्वाचा रस्ता आहे. खालील फोटोत दाखविल्याप्रमाणे या रस्त्यालगत छोटीछोटी दुकाने आहेत. तिथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ही दुकाने चालविणारे जवळपास सगळे बाहेरून तिथे आले होते. कोणी कर्नाटकातून आले होते, कोणी काश्मीरमधून तर कोणी गुजरातमधून. मुळातल्या गोयंकरांची दुकाने मात्र फारशी आढळली नाहीत.
सुटीवर गेल्यावर पूर्ण दिवस समुद्रकिनार्यावर अर्थातच बसायचे नव्हते. त्यामुळे थोडेफार पर्यटनही केलेच. अगोंदपासून सुमारे २०-२५ मिनिटांच्या अंतरावर असलेला पाळोळें (पालोलेम) हा अधिक प्रसिध्द समुद्रकिनारा आहे. तिथे गेलोच होतो. हा समुद्रकिनाराही अगोंदसारखाच अप्रतिम आहे. पाळोळेंच्या समुद्रकिनार्यावरील वाळू अत्यंत मऊ आहे.अशी मऊ वाळू वारका आणि बाणावलीला बघायला मिळाली होती. पण हा समुद्रकिनारा थोडा अधिक प्रसिध्द आणि त्यामुळे जास्त कमर्शिअलाईझ झालेला असल्यामुळे इथे गर्दी जास्त होती. पाळोळेंला संध्याकाळच्या वेळी पोहोचल्यामुळे तिथला सूर्यास्त बघायला मिळाला. सूर्यास्त होण्याआधी अर्धातास काढलेल्या या फोटोवरून हा प्रकार किती सुंदर आहे हे नक्कीच कळेल.
आणि वर दिलेला फोटो घेतला साधारण त्याचवेळी हा व्हिडिओही शूट केला होता--
अगोंद आणि पाळोळेंच्या मध्ये हनीमून बीच आणि बटरफ्लाय बीच म्हणून दोन लहान समुद्रकिनारे आहेत. त्याच भागात डॉल्फिनही बघायला मिळतात. मागे एकदा पणजीजवळच्या समुद्रात डॉल्फिन बघायला गेलो होतो आणि तो अनुभव काही फार चांगला नव्हता. दूरवर कुठेतरी एखाद्या डॉल्फिनने नाक वर काढले आणि ते आपल्याला बघायला मिळाले की त्यातच समाधान मानावे लागले होते. यावेळीही डॉल्फिननी सी वर्ल्डमध्ये मारतात तशा उड्या मारल्या नाहीत पण डॉल्फिनचे नुसते नाक बघून समाधान मानावे लागण्यापेक्षा जरा चांगला अनुभव होता. बटरफ्लाय बीच त्यामानाने एकदम छोटा आहे. तिथे एकही रिझॉर्ट नाही की हॉटेल नाही. तरीही निसर्गसौंदर्याचा अनुभव घ्यायला तिथे जाणे हाच उद्देश होता. अगोंदपासून बोटीने साधारण १५-२० मिनिटात त्या ठिकाणी पोहोचता येते.
एकूणच अगोंदचा समुद्रकिनारा खूपच आवडला. समुद्रकिनार्यावरील खडकांवर चढून खाली दिलेला 'पॅनोरॅमिक व्ह्यू' काढता आला
आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला श्वान भेटतातच. तसेच अगोंदलाही भेटलेच. यावेळी अगदी एक महिन्याचे छोटे गोंडस पिलू असलेल्या 'बाबू' पासून १४ वर्षांच्या 'सिसी' पर्यंत आम्हाला श्वान भेटले. या दोघांचाही आमच्यावर आणि आमचा या दोघांवर खूपच जीव जडला होता.
(१४ वर्षीय सिसी)
(१ महिन्याचे गोंडस श्वानशावक 'बाबू')
गोव्यात बिबिंका म्हणून एक गोड प्रकार मिळतो. तो मला खूपच आवडतो. राज्याच्या दक्षिण टोकाकडील भागात बिबिंका फार कुठे आढळला नाही म्हणून थोडा विरसच झाला होता. पण शेवटी बिबिंका मिळू शकेल असे एक ठिकाण शोधून काढलेच आणि बिबिंकाचे चार तुकडे का होईना खाल्लेच--
काल रात्री घरी परत आलो तरीही अर्थातच तो अथांग समुद्र, तो लाटांचा आवाज, समुद्रापासून थोडे दूर गेले की ती निवळशंख शांतता इत्यादी इत्यादी अगदीच अविस्मरणीय आहेत. बिबिंका खाताखाता समुद्राचा आणखी एक फोटो घ्यायचा मोह आवरता आला नाहीच--
कधी गोव्याला जायचे असेल तर हा भागही जरूर बघा असे सुचवेन. कळंगूट-बागा सारखी गर्दी इथे नाही की बोगमॅलोसारखा सारखा विमानांचा आवाज येणार नाही. माझ्यासारखे शाकाहारी असाल तरीही खाण्याची आबाळ इथे होणार नाही. आणि हो... गोव्यात कुठेही गेले तरी फेणी मिळेलच :)
या ठिकाणी पर्यटनासाठी सर्वात चांगला काळ नोव्हेंबर ते जानेवारी आहे. तरीही मध्य एप्रिलपर्यंत पर्यटक येतच असतात. ३१ डिसेंबरनंतर रिझॉर्टचे दरही बर्यापैकी कमी होतात. गोव्याच्या इतर भागांप्रमाणे इथेही दुचाकी भाड्यावर मिळतातच.
अगोंदमध्ये एक अडचण मात्र मोठ्या प्रमाणावर आली. आणि ती म्हणजे तिथे मोबाईल फोनच्या रेंजचा मोठाच प्रश्न आहे. एअरटेलची तर अजिबात रेंज येत नव्हती. समुद्रावरून व्होडाफोनची थोडीफार रेंज मिळत होती. रूममधून तर दोन्ही नेटवर्कची अजिबात रेंज येत नव्हती. त्यामुळे सगळ्या बीच शॅक आणि रेस्टॉरंटमध्ये वाय-फाय असणे अगदी गरजेचीच गोष्ट आहे. तसेच व्होल्टेजमध्ये बरेच चढउतार होत असल्यामुळे मधूनच एसी बंद होणे, दिवे कमीजास्त होणे हे प्रकारही होतात.
या लहानसहान अडचणी सोडल्या तर आमची या भागाला दिलेली भेट अगदीच अविस्मरणीय होती. तुम्हीही शक्य होईल तेव्हा जरूर भेट द्या. नक्कीच आवडेल.
आता भटकंतीमधील यापुढील लेख पुढच्या वर्षी-- बहुदा पटनेम किंवा राजबागच्या समुद्रकिनार्यांना दिलेल्या भेटीनंतर :)
प्रतिक्रिया
27 Mar 2017 - 2:55 pm | गणामास्तर
भारीच कि. डनहिल मस्तच आहे, गेल्या फेरीत मी त्याच्या शेजारच्या रामा रिसॉर्ट्स मध्ये राहिलेलो. मस्त आहे ते सुद्धा.
27 Mar 2017 - 3:00 pm | रेवती
लेखन व फोटू आवडले.
27 Mar 2017 - 9:27 pm | यशोधरा
असेच म्हणते आणि तू गावांची मूळ नावे लिहिली आहेस म्हणून जास्तीचे ५ मार्क्स! =))
27 Mar 2017 - 3:18 pm | कंजूस
भारीच.
27 Mar 2017 - 9:37 pm | पिलीयन रायडर
मला काही फोटो दिसत नाहीत. जसे की बाबू आणि सिसी.
मध्येच थोडे फोटो दिसतही आहेत.
27 Mar 2017 - 9:48 pm | गॅरी ट्रुमन
मी हे फोटो क्रोम वापरून अपलोड केले आहेत. तुम्ही क्रोमच वापरत आहात की दुसरा ब्राऊझर? लॅपटॉपवरून हे फोटो दिसत आहेत पण मलाही फोनवरून बाबू आणि सिसीचे फोटो दिसले नाहीत.
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
27 Mar 2017 - 11:31 pm | पिलीयन रायडर
क्रोमच वापरत आहे. काही दिसले आणि काही नाही.. हे कसं काय होतंय?
27 Mar 2017 - 11:09 pm | पैसा
छान लिहिलं आहेस. हे आम्ही रहातो तिथून फारच लांब झाले त्यामुळे भेटायचा प्रयत्न सुद्धा केला नाही.
ते दोन फोटो मलाही दिसत नाहीत. गूगल लॉग इन केले तरी तिथे फोटो दिसत नाहीयेत.
28 Mar 2017 - 3:56 pm | गॅरी ट्रुमन
हो ना. प्रिमोताई तिथून त्यामानाने जवळच राहतात हे नंतर कळले. काही हरकत नाही. गोव्याला यापुढेही येणारच आहे. भविष्यात एखादा छोटेखानी मिपा कट्टाच करू गोव्यात :)
27 Mar 2017 - 11:42 pm | वरुण मोहिते
दरवर्षी प्रमाणे गोव्याला जायची . दक्षिण गोवा छान आहे . बाकी काही फोटो दिसत नाहीयेत .
28 Mar 2017 - 3:47 pm | गॅरी ट्रुमन
सर्वांना प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
बर्याच मिपाकरांना काही फोटो दिसत नाहीत म्हणून ते परत अपलोड करत आहे.
१. ही १४ वर्षीय सिसी (एच टू ओ रिझॉर्टमधील)
२. माझ्या सर्वात नव्या आणि सर्वात छोट्या मित्राबरोबर--- हे आहे एक महिन्याचे गोंडस श्वानशावक बाबू
३. अगोंदच्या समुद्रकिनार्यावर हे दोघे (बहुदा जुळे भावंड) आम्हाला भेटले
४. बटरफ्लाय बीच
30 Mar 2017 - 12:42 pm | नीलमोहर
फोटो पाहून तडक गोव्याला जायची इच्छा झालीय, पाळोळे खरंच खूप सुंदर आहे. आम्हीही गोव्यात समुद्रकिनारी मिळणाऱ्या शांततेसाठी जातो, त्यामुळे अशी ठिकाणे जास्त आवडतात.
31 Mar 2017 - 10:12 pm | आषाढ_दर्द_गाणे
इतका आवडता किनारा आहे गोव्यातला की ह्याला जास्त प्रसिद्धी मिळू नये असं वाटतं कधी कधी!
छान माहिती आणि प्रेक्षणीय चित्रे. धन्यवाद.