चांगल्या किंवा खूप चांगल्या खेळाडूंच्या करियर मधे एखादा क्षण, एखादी मॅच, एखादा गेम असा येतो की तिथून पुढे ते 'लिजंड' होतात. १९९६ साली, अहमदाबाद ला द. अफ्रिकेविरुद्ध टेस्ट मॅच मधे पदार्पण केलेल्या वांगिपुरुप्पू वेंकट साई लक्ष्मण ने सुरूवातीची ४-५ वर्षं अशी काही दखलपात्र कामगिरी केली नव्हती. नाही म्हणायला 'द डेझर्ट स्टॉर्म' (https://www.youtube.com/watch?v=07BMrivOzUE) च्या वेळी सचिन ला वेळो वेळी शाबासकी देण्याचं आणी त्याला रन-आऊट न करण्याचं एक महत्वाचं काम त्याने केलं होतं. त्यानंतर सिडनी च्या टेस्ट मॅच मधे ग्लेन मॅकग्रा चा बॉल हेल्मेट वर आदळल्यावर, एखाद्या कलाकाराच्या नजाकतीनं आणी सर्जन च्या स्किल नं (आई-वडील दोघही डॉक्टर असल्याचा फायदा) मॅकग्रा, फ्लेमिंग, ली आणी वॉर्न अशा बॉलिंग अॅटॅक समोर ८४.३४ च्या स्ट्राईक रेट ने १६७ धावा काढल्या होत्या (२७ चौकार). ऑस्ट्रेलियावर पुढे येणार्या संक्रांतीची ही नांदी होती.
१९९५ साली लॉर्ड्स वर दादा गांगुली बरोबर पदार्पण केलेल्या, आणी पदार्पणातच ५ धावांनी शतक हुकलेल्या, शांत, समजूतदार, सुसंस्कृत क्रिकेटियर म्हणून लौकिकाला येत असलेल्या राहूल शरद द्रविड ने तोपर्यंत टेस्ट क्रिकेट मधे एक भरवशाचा खेळाडू म्हणून जम बसवला होता. जोहान्सबर्ग मधले १४८, न्युझिलंड मधल्या एकाच टेस्ट मधल्या दोन डावातली दोन शतकं, झिंबाब्वे, श्रीलंका, वेस्ट-ईंडिज दौर्यातली उल्लेखनीय कामगिरी आणी एक द्विशतक त्याच्या नावावर ऑलरेडी होतं. १९९९ साली ईंग्लंड ला झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढलेला फलंदाज हा एक वन-डे मधला सुद्ध रेकॉर्ड त्याच्या नावावर होता (८ सामने, ६५.८५ सरासरीने ४६१ धावा, ८५.५२ चा स्ट्राईक रेट, २ शतकं आणी ३ अर्धशतकं - सेहवाग ने सुद्धा शाबासकी दिली असती).
पण ह्या दोन्ही बाळांचे पाय पाळण्यात दिसत असले तरी अजून 'वंदावी पाऊले' म्हणण्यासारखी, थोडक्यात 'लिजंड' म्हणवण्यासारखी कारकीर्दीला वळण देणारी घटना घडत नव्हती.
२००१ चा ऑस्ट्रेलिया दौरा आला आणी सर्व पात्रांची सिद्धता झाली. नुकताच भारतीय संघ फिक्सिंगच्या 'काल'खंडातून बाहेर येत होता. सौरव गांगुली च्या नेतृत्वाखाली नवी मोट बांधली जात होती. जुन्यातला सचिन, कुंबळे आणी श्रीनाथ तेव्हढे ह्यातून तावून-सुलाखून बाहेर पडले होते. बाकी टीम नवीनच होती. थोडक्यात म्हणजे स्टीव्ह वॉ ला त्याचं 'फायनल फ्रंटियर' जिंकण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती होती. त्यातच अनिल कुंबळे ईंज्युरी मुळे खेळू शकणार नसल्याचं कळलं आणी दुष्काळात तेरावा म्हणतात तो ह्यालाच असं वाटून गेलं. सौरव गांगुली ने म्हणे हट्टाने २१ वर्षाच्या पोरसवद्या हरभजन सिंग ला जेमतेम ८ टेस्ट्स च्या अनुभवावर कुंबळे च्या जागी टीम मधे निवडायला लावलं. (बॉलर ला रिप्लेसमेंट म्हणून बॉलर च निवडल्याबद्दल - भले लेगस्पिनर च्या जागी ऑफ-स्पिनर- सचिन सद्गदित झाला म्हणे. नोएल डेव्हिड च्या जखमा अजून ताज्या होत्या). सलग १५ सामने जिंकून भारतात आलेला ऑसी संघ अक्षरशः अभेद्य वाटत होता. मुंबई ला झालेल्या पहिल्या टेस्ट मॅच मधे एका सचिन चा प्रतिकार वगळता भारतीय संघ सहज हारला.
पुढची मॅच कोलकता (तेव्हाचे कलकत्ता) च्या ईडन गार्डन मधे होती (नको मना त्या अभद्र आठवणी - १९९६ च्या वर्ल्ड कप ची सेमी-फायनल, नंतर भारत पाकिस्तान टेस्ट मधले शोएब चे ते दोन यॉर्कर्स). 'सालाबादप्रमाणे यंदाही' असं म्हणत ऑसीज ने पहिल्या डावात धावांचा रतीब घालायला सुरूवात केली. 'तुका म्हणे त्यातल्या त्यात' असं म्हणत हरभजन ने हॅट-ट्रीक (भारतातर्फे पहिली टेस्ट हॅट-ट्रीक) घेऊन ऑसीज च्या रन-मशिन ला ब्रेक लावला. तरिही ४४५ रन्स काही कमी नव्हते. आणी असं वाटेपर्यंत भारताचा पहिला डाव १७१ धावांत आटोपला सुद्धा. त्यातही लक्ष्मण ५९ आणी द्रविड २५. ऑस्ट्रेलियाने अपेक्षेप्रमाणे फॉलो-ऑन लादला आणी पहिल्यांदा भारतातर्फे थोडासा प्रतिकार दिसला. १६ ओव्हर्स मधे ५२ धावांची ओपनिंग झाली आणी सदगोपन रमेश आऊट झाला. पहिल्या इनिंग मधल्या ५९ धावांच्या बळावर आणी नागपूर मधे १६२ रन्स केल्यावर सुद्धा नंतर च्या तीन डावात ९, ३९ आणी २५ रन्स केल्याने आऊट ऑफ फॉर्म असलेल्या(?) द्रविड च्या जागी लक्ष्मण बॅटींग ला आला. (आऊट ऑफ फॉर्म चे ईतके कडक नियम आज असते, तर बर्याचशा रोहित शर्मांची आणी रविंद्र जडेजांची कारकीर्द कधीच संपली असती. - असो, हे जरा पर्सनल होतय). तिसर्या दिवस अखेर भारताची अवस्था बिकट होती (२५४/४; २० रन्स चा डेफिसीट, ईफेक्टीव्हली -२०/४). ऑसीज नी म्हणे शँपेन सुद्धा ऑर्डर करून ठेवली होती.
१४ मार्च २००१. मॅच चा चौथा दिवस उजाडला (हे लगान मधल्या 'और उस ऐतिहासिक दिन की सुबह हुई' टोन मधे वाचावे). लक्ष्मण १०९*, द्रविड ७*. पुढच्या ९० ओव्हर्स मॅकग्रा आणी कंपनी (ही कंपनी म्हणजे एक LLC. च होती, कारण ह्यात प्रमुख आणी बदली असे मिळून ८ बॉलर्स होते) आयुष्यभर विसरणार नाहीत. दोन्ही देशातले क्रिकेट रसिक आयुष्यभर विसरणार नाहीत आणी लक्ष्मण-द्रविड आयुष्यभर विसरणार नाहीत. कलकत्त्याच्या त्या उष्ण आणी दमट हवेत हे दोन वेडे, मानेवर आईस ट्यूब्स बांधून अक्षरशः ऑसी बॉलिंग ची अब्रू वेशीवर टांगत होते. ही कत्तल ईतकी अदाकारीनं आणी कलाकृतीनं नटलेली होती की एखादं शिल्प घडताना बघतोय असच वाटत होतं. ३७६ धावांची जबरदस्त अनपेक्षित भागीदारी!!! अनबिलीव्हेबल!!! त्या भागीदारीला रन-मशिन म्हणण्यापेक्षा रन-बंदिश म्हणावं ईतकी कलाकारी त्यात होती. त्यातले काही नजरेसमोरून आजही पुसट न झालेले क्षण म्हणजे शेन वॉर्न ने लेग स्टंप च्या बाहेर टाकलेल्या बॉल ला लक्ष्मण ने पुढे येत, एक्स्ट्रा कव्हर मधून इनसाईड आऊट चौकार मारला. तिथे उभा असलेला फिल्डर प्लॅटफॉर्म वर उभं राहून समोरून न थांबता जाणारी एखादी एक्स्प्रेस पहावी तसा बघत राहिला. मग वॉर्न आणी वॉ ने खलबत वगैरे करून तिथे आणखी एक फिल्डर ठेवला. पुन्हा तसाच लेग स्टंप च्या बराच बाहेर फ्लायटेड बॉल टाकला, पुन्हा लक्ष्मण तसाच बॅले करत क्रीझ मधून पुढे सरसावला आणी वॉर्न ची नजर अपेक्षेने ऑफ साईड ला वळेपर्यंत मनगटात बसवलेल्या स्टील च्या मसल्स च्या ताकदीवर, हैद्राबादी नवाबी नजाकतीत तो बॉल मिडविकेट बाऊंड्रीबाहेर तडकावला. वॉर्न हताशपणे कमरेवर हात ठेवून पिच च्या मधे येऊन उभा राहिला होता. दुसरी एक आठवण म्हणजे शतक पूर्ण झाल्यावर राहुल द्रविड सारख्या एरव्ही ईतका शांत असलेल्या खेळाडूने ड्रेसिंग रूम कडे पाहून आवेशाने बॅट हवेत वर करून मानवंदना स्विकारली होती. हे डिमोशन (३ र्या क्रमांकावरून ६ व्या क्रमांकावर) त्याला भलतच लागलं होतं. ह्या इनिंग नंतर त्याला कुणी त्याचा तिसरा क्रमांक बदलायला सांगितला नाही (अपवादात्मक परिस्थितीत तोच पाकिस्तान मधे ओपनिंग ला आला होता आणी तिथेही सेहवाग बरोबर ४००+ ची ओपनिंग दिली होती. वह कहानी फिर सही). आणी तिसरं असच नजरेसमोरून न हटणारं दृश्य म्हणजे दिवसभर बॅटींग करून ऑसीज ना हताश केलेल्या लक्ष्मण ने स्क्वेअर लेग बाऊंड्री कडे एक बॉल मारला. बाऊंड्री जाणार हे निश्चित होतं. पण बॉल चा जीव तोडून पाठलाग करणार्या रिकी पाँटींग ने शेवटच्या क्षणी डाईव्ह करत बॉल अडवायचा प्रयत्न केला आणी बाऊंड्री गेल्यावर वैतागून हात जमिनीवर आपटला. त्याही परिस्थितीत त्याची कमिटमेंट वाखाणण्यासारखी होती. म्हणूनच ऑस्ट्रेलिया चा संघ सहजा-सहजी हारत नाही आणी म्हणूनच त्यांना हारवताना प्रतिस्पर्धी संघाला सर्वोत्तम खेळ करावा लागतो.
चौथ्या दिवशीचा खेळ संपल्यावर द्रविड-लक्ष्मण ला सलाईन लावावे लागले होते. पाचव्या दिवशी २८१ धावा करून लक्ष्मण बाद झाला. त्यावेळचा भारताकडून तो सर्वोच्च स्कोअर होता. द्रविड १८० धावांवर बाद झाला. भारताने ६५७ धावांचा डोंगर रचला आणी ऑस्ट्रेलिया ला चौथ्या डावात २१२ धावांत गुंडाळून १७१ धावांनी सामना जिंकला. पुढचा चेन्नई चा सामना जिंकून भारताने सिरीज जिंकली.
आज त्या ऐतिहासिक भागीदारीला १६ वर्षं पूर्ण झाली. केवळ एक सामना फॉलो-ऑन मिळून, पिछाडीवरून जिंकला ईतकच ह्या सामन्याचं महत्व नव्हतं. भारताच्या 'दादा'गिरी ची ती खर्या अर्थानं सुरूवात होती. अॅशेस ची परंपरा नसलेली, पण तितक्याच चुरशीनं खेळल्या जाणार्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यांची ती सुरूवात होती. आजच्या विराट कोहली जनरेशन च्या 'अरे' ला 'का रे' करण्याची ती गंगोत्री होती. आक्रमकपणा हा फक्त शिवराळ भाषेतून, उद्दाम हावभावातून किंवा क्रिकेट बॉल ला रागाने तडकावूनच दाखवता न येता, अत्यंत सुसंस्कृत पणे, नजाकतीनं सुद्धा तितक्याच प्रभावीपणे दाखवता येतो हे द्रविड-लक्ष्मण जोडीनं सगळ्यांना दाखवून दिलं. 'फॅब-फोर' चा जन्म झाला होता आणी सचिन तेंडुलकर ह्या क्रिकेट च्या देवाबरोबर त्याच्याच टीम मधून खेळणार्या दोन लिजंड्स चा जन्म झाला होता.
प्रतिक्रिया
15 Mar 2017 - 11:02 am | किसन शिंदे
ती टेस्ट आणि या दोघांनी केलेली फलंदाजी आयुष्यभर न विसरता येण्याजोगी.
लेख आवडला हेवेसांनल.
15 Mar 2017 - 5:54 pm | शलभ
मस्त लिहिलय..लेख आवडला..
15 Mar 2017 - 7:32 pm | फेरफटका
किसन शिंदे, शलभ, धन्यवाद!
17 Mar 2017 - 12:01 am | diggi12
नोएल डेव्हिड च्या जखमा म्हणजे ?
17 Mar 2017 - 1:25 am | फेरफटका
तेंडुलकर च्या कॅप्टन्सी मधे १९९७ च्या वेस्ट ईंडिज दौर्यात जवागल श्रीनाथ (फास्ट बॉलर) ईंज्यूअर्ड झाल्यावर, त्याची रिप्लेसमेंट म्हणून सिलेक्टर्स नी हैद्राबाद च्या नोएल डेव्हिड ह्या कामचलाऊ ऑफ-स्पिनर ला पाठवलं होतं. तो एक मोठा विनोद ठरला होता. तेंडुलकर ने सुद्धा त्या प्लेयर चं नाव कधी ऐकलं नव्हतं. प्रेस कॉन्फरन्स मधे त्याने 'नोएल हू?' असा प्रश्न विचारला होता.
17 Mar 2017 - 3:14 am | आषाढ_दर्द_गाणे
आठवणी जाग्या झाल्या! धन्यवाद!
ह्या मॅच मधली गिलख्रिस्टची पहिली-वाहिली सुवर्णशून्ये आणि त्याने पहिल्यांदाच अनुभवलेला पराभव! :))
रच्याकने, लेखाच्या नावात 'स्वीट सिक्सटीन' का आहे?
17 Mar 2017 - 7:27 pm | फेरफटका
१६ वर्षं झाली ह्या घटनेला (१४ मार्च २००१) म्हणून. बाकी १६ मॅचेस जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाला हरवण्याशी ही ह्याचा संबंध जुळवता येईल, पण माझा उद्देश १६ वी अॅनिव्हर्सरी होता.
21 Mar 2017 - 3:01 am | आषाढ_दर्द_गाणे
आले ध्यानात!
हो बरोबर, सिक्सटीन योग्यच!
मी गोंधळलो कारण सध्या मार्च मध्ये इकडे अमेरिकेत बास्केटबॉलची स्पर्धा चालू आहे आणि त्यात 'स्वीट सिक्सटीन'चा वेगळाच अर्थ लागतो
म्हटलं हे क्रिकेट मध्ये कधीपासून सुरु झाले?
21 Mar 2017 - 3:47 am | फेरफटका
बास्केटबॉल (NCAA) मधल्या स्वीट सिक्स्टीन चा संदर्भ लक्षातच नाही आला माझ्या. :)
19 Mar 2017 - 12:36 pm | अभिजीत अवलिया
लेख आवडला
20 Mar 2017 - 8:39 pm | फेरफटका
धन्यवाद!