भास्करगड - हर्षगड ट्रेक

नमिता श्रीकांत दामले's picture
नमिता श्रीकांत दामले in भटकंती
13 Mar 2017 - 10:57 pm

भास्करगड- हर्षगड

१. भास्करगड

भंडारदरा, घोटी परिसर म्हणजे किल्ल्यांचे, माहेरघर. पाबरगड, रतनगड, औंढा, पट्टा, कळसूबाई, अलंग- मदन-कुलंग पण त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतल्या अनेक दिवस खुणावणा-या हरिहरवर जाण्याचा योग आला नव्हता. मी, डॉक्टर आणि फॉरेस्ट अॉफिसर असे तिघेच जण शनिवारी रात्री साडे दहाला कळव्याहून निघालो. FM वरची जुनी हिंदी गाणी आणि गप्पा यांच्या सोबत नाशिक हायवेनी जाताना कसारा कधी आले ते कळलेही नाही. मगच रात्री एक वाजता बाबा दा ढाब्यावर वाफाळता चहा घेऊन खोडाळ्याचे वळण घेतले. खोडाळ्याकडे जाणारा रस्ता जंगल असल्यामुळे एकाकी आहे. पण फॉरेस्ट अॉफिसरना या भागाची खडानखडा माहिती होती. तिथल्या प्रत्येक वळणाच्या जुन्या चौकीच्या, एकुटवाण्या घराच्या त्यांच्या जुन्या आठवणी रात्र जागवत होत्या. त्या खाणाखुणा पडताळायला आणि अचूक मार्गदर्शन करायला गुगल मॕपही होता.
रात्री अडीच वाजता डहाळेपाड्यात पोहोचलो तरीही काही घरांत उजेड दिसत होता.इथल्या तुकाराम डहाळे मास्तरांशी आधीच संपर्क झाला होता. अर्ध्या रात्री त्यांचे घर शोधण्यासाठी चार जणांची झोपमोड करावी लागली; पण कोणी तणतण केली नाही. डहाळे मास्तर आमची बहुतेक वाटच बघत होते. झटपट स्लिपिंग बॕग काढून आडवे झालो आणि त्या नीरव शांततेत निद्रेचे संगीत सुरु झाले.
कोंबड्याची पहिली बांग ऐकल्यावर पहाटे पाचला दबक्या आवाजात दोघांची कुजबूज झाली गाइड किती वाजता येईल, कधी उठावे इ. कारण तिसरा माणूस अजून घोरत होता आणि घरच्यांची झोपमोडही टाळायची होती. सहा वाजता उठून, पटापट आवरुन अशोक नावाच्या दोन वाटाड्या मुलांबरोबर भास्करगडाकडे प्रस्थान ठेवले. आयताकृती भास्करगड उजावीकडे ठेवून वाट जात होती. लवकरच धारेवर पोहोचलो. तिथून तर किल्ला अगदी जवळ दिसत होता. पण किल्ल्याच्या दरवाज्याला पोहोचण्यासाठी संपूर्ण वळसा घालून जावे लागते. आता उजवीकडे खोल दरी आणि डावीकडे किल्ला अशी ट्रॕव्हर्सची वाट सुरू झाली. इथे एक ऐस-पैस गुहा लागली. मध्यभागी थोडे पाणी शिल्लक होते. पावसाळ्यात मुबलक असते पाणी. ही गुहा बघून घनगडाच्या गुहेची आठवण झाली. इथे थोडी न्याहरी करुन मग पुढे निघालो.
ट्रॕव्हर्सची काही ठिकाणी काटे-कुटे, रान यांनी गर्दी केलेली अन्था एक माणूस सहज जाऊ शकेल अशी वाट संपल्यावर कोथळीगडासारख्या डोंगराच्या पोटात कातळात खोदून काढलेल्या पायऱ्यांचा टप्पा आला. पहिल्या टप्प्यातील पायऱ्या सुस्थितीत परंतु दुसऱ्या टप्प्यातील पायऱ्या तुटून ढिगारा खाली आल्यामुळे दरवाज्यातून रांगत जावे लागते.

२.वरचा मजला सांभाळून
वर दगडांच्या राशीतूनच मार्गक्रमण करावे लागते. गडावर पोहोचायला तीन तास तर गडफेरी करायला पाऊण तास लागला. उघड्या वरच स्थापन केलेली व शेंदूरविलेपित दगडांनी वेढलेली एक हनुमानाची मूर्ती आहे. अजनेरीचे एक साधूबाबा काही गावकऱ्यांच्या मदतीने पाण्यासाठी खोदकाम करीत होते. त्यांची विचारपूस करुन पुढे गेल्यावर जुन्या टाक्याचे भग्नावशेष आढळले. त्यात अगदी थोडेच पाणी होते. गडावर थोड्या सपाटीवर गेल्यावर आजूबाजूचे डोंगर-किल्ले आणि दूरवर दिसणारे अलंग- मदन-कुलंगही स्पष्ट ओळखू येत होते.
गडाची उंची ३५०० फूट असून डहाळेपाडा इगतपुरीपासून साधारण ५० किमी अंतरावर आहे. मुंबई दिशेनी जाण्यासाठी भिवंडी- खोडाळा/ कसारा- खोडाळा असे दोन मार्ग आहेत. गडावर मुक्कामाची सोय, पाणी नाही. परतताना रान झोडपून वाट काढत दोन तासात उतरलो. गडाची प्रदक्षिणा पूर्ण झाली. गावाच्या अलीकडे शेतीसाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीतील पाणी पिऊन व चेहऱ्यावर मारुन मस्त ताजेतवाने झालो, हर्षगडाला जाण्यासाठी.

३. हर्षगड
जेवण आटपून मुक्कामाची तयारी बरोबर घेऊन दुपारी अडीच वाजता डहाळेपाड्याला लागूनच असलेल्या कोटमपाड्यात गाडी ठेवून हर्षगडाला जायला निघालो. निरगुडपाड्यातून किंवा त्र्यंबक दिशेनी येणाऱ्यांसाठी हर्षेवाडी गावातूनही गडाला जायला वाटा आहेत. कोटमपाड्यातून समोरच हर्षगड व स्काॕटिश कड्यात खोदून काढलेल्या पायऱ्या दिसत होत्या. गड उजव्या हाताला ठेवून जंगलातून थोडे फिरुन गेल्यावर धारेवर पोहोचलो. वाटचाल अगदी सावकाश केली कारण वेळ उन्हाची होती आणि सकाळी एक किल्ला चढूनआलो होतो. इथे एका टपरीवर मस्त लिंबू सरबत मिळाले. तिथे थोडा वेळ टेकून मग खड्या चढाईला सुरूवात केली. प्रथम एक घसरड्या वाटेचा छोटा टप्पा पार करुन नंतर दगडांवर चढून गेलं तर थेट पायऱ्यांना भिडतो अन्यथा झाडाच्या मुळ्यांना पकडून वळसा घालणारी तुलनेने सोपी वाट आहे. दुरुन बघितल्यावर थरकाप उडविणाऱ्या ८० अंश उभ्या खोदून काढलेल्या पायऱ्यांना आता भिडलो.

४. पायऱ्यांची वाट
पहिला टप्पा संपल्यावर ओव्हरहँग येतो तिथे सॕक डोके सांभाळून वाकून जावे लागते. त्यानंतर पोटात खोदून काढलेल्या पायऱ्यांची वाट म्हणजे चिमणी क्लायंबिंग आहे. एकूण १७१ पायऱ्या असून एकाग्रचित्ताने चढल्यास हे टप्पे अजिबात अवघड नाहीत. मात्र उंचीची भीती वाटली तर पाय लटपटायला लागू शकतात.

५. प्रवेशद्वार
वर गेल्यावर हनुमानाकडे जाताना वाटेत पाण्याची टाकी आहेत. दरवाज्यावर व कोरीव काम व ओव्हरहँगमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण सोयी दिवे ठेवण्यासाठी किंवा इतर काही उपयोगासाठी केलेल्या आढळतात; तज्ज्ञांकडून अधिक जाणून घ्यावे लागेल. हनुमानाची मूर्ती उघड्या शिळांवरच स्थापन केलेली असून त्याजवळच्या दोन टाक्यांचे पाणी जरा स्वच्छ दिसले. इथे झाडाच्या पानांचे छप्पर केलेली एक मोकळी टपरी होती. बाजूला उंबराचे झाड होते. तिथेच मुक्कामाचा बेत ठरला. मग पटापट चूल पेटवून मस्त मसाला चहा मावळतीच्या साक्षीने तिघांनी एकत्र प्यायला. जोडीला खायला भेळ करुन चुलीवर खिचडीसाठी आधण ठेवले. अख्ख्या किल्ल्यावर मुक्कामाला इतर कोणीच नव्हते. निमुळती रेखीव चंद्रकोर चांदण्यांनी खच्चून भरलेले आकाश, ताटलीत गरमागरम खिचडी, गाजर, काकडी आणि जिवलग सोबती अशा या जेवणाचा स्वाद काही वेगळाच होता. थोडा वेळ फेरफटका मारला. गुगल स्काय मॕपवरुन आकाशदर्शनाचा प्रयत्न केला. थंडी बेताची असल्यामुळे रात्री झोप मस्त लागली.

६. उतरताना खोल दिसणारे दृश्य
पहाटे डोंगरमाथ्यावर उजवीकडच्या दोन डोंगरांच्या मागून डोकावू लागणारे उगवतीचे रंग प्रसन्न करुन गेले आणि सूर्योदय झाला. मग गरम चहा आणि मॕगी घेऊन किल्ल्यावर चक्कर मारली. धान्यकोठाराच्या दोन खोल्या सुस्थितीत आहेत. किल्ल्याच्या मध्यावर उंच टेकाडावर ध्वजाची काठी उभारली आहे. उतरताना पठाराकडील बाजूवरुन समोर भास्करगड त्याला खेटून उटवड/ चिता डोंगर व पुढे फणीचा डोंगर ताठ मानेने उभे होते. त्यापलीकडे अजनेरी, ब्रह्मगिरी दूरवर दिसत होते. या किल्ल्याची उंची ३६७८ फूट आहे. दोन तासात खाली उतरुन गेलो आणि कोटमपाड्याचा निरोप घेतला तो डहाळेमास्तरांनी दिलेलं 'पुढच्या वेळी या मग आपण चित्याला जाऊ या' हे आमंत्रण ध्यानात ठेवूनच.

७. कोटमपाड्यातून सिंहावलोकन

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

13 Mar 2017 - 11:52 pm | किसन शिंदे

मस्त भटकंती! हरिहर मला त्याच्या ९० अंशातल्या पाय-यांसाठीच आवडतो. आत्ता दोन महिन्यांपूर्वीच आमच्या कार्यालयातल्या लोकांना घेऊन गेलो होतो. गडाच्या एका टोकावर असणारे धान्याचे कोठार नसून दारुगोळा कोठार असावे असे मला वाटते.

बाकी हरिहर माझी पहिली भेट अविस्मरणीय अशीच होती ज्यावर इथे एक जिलबी पाडली होती. =))

रच्याकने ठाणेकर, पुढच्या वेळी ट्रेकला जाताना कळवत चला आम्हालाही, तुम्हाला चालत असेल तर..

नमिता श्रीकांत दामले's picture

14 Mar 2017 - 1:46 pm | नमिता श्रीकांत दामले

नक्कीच कळवीन.
लेख वाचून आवर्जून प्रतिक्रिया पाठवल्याबद्दल आभार.

सुमीत's picture

14 Mar 2017 - 10:13 pm | सुमीत

भन्नाट ट्रेक आणि वर्णन, फोटो अल्बम ची लिंक द्यावी पुढच्या वेळेस.
बाकी खरेच कळवत जा, येता येत असेल तर आम्ही पण येऊ ट्रेक ला.

इडली डोसा's picture

14 Mar 2017 - 2:20 am | इडली डोसा

वर्णन आवडले, अजुन फोटो असतील तर बघायला आवडतील

नमिता श्रीकांत दामले's picture

14 Mar 2017 - 1:50 pm | नमिता श्रीकांत दामले

धन्यवाद
फोटो भरपूर आहेत. Fb वर album आहे.

छान वर्णन आणि फोटो. लिहित राहा.

नमिता श्रीकांत दामले's picture

14 Mar 2017 - 1:50 pm | नमिता श्रीकांत दामले

धन्यवाद

छान लिहिलं आहे. फोटोही आवडले.

नमिता श्रीकांत दामले's picture

14 Mar 2017 - 1:51 pm | नमिता श्रीकांत दामले

आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.

नमिता श्रीकांत दामले's picture

14 Mar 2017 - 1:54 pm | नमिता श्रीकांत दामले

आपल्यासारख्या वाचकांमुळे लिहिण्याचा उत्साह वाढतो.
धन्यवाद

एस's picture

14 Mar 2017 - 8:37 am | एस

गुड.

नमिता श्रीकांत दामले's picture

14 Mar 2017 - 1:54 pm | नमिता श्रीकांत दामले

धन्यवाद

नमिता श्रीकांत दामले's picture

14 Mar 2017 - 1:56 pm | नमिता श्रीकांत दामले

धन्यवाद

प्रचेतस's picture

14 Mar 2017 - 8:47 am | प्रचेतस

छान लिहिलंय.

नमिता श्रीकांत दामले's picture

14 Mar 2017 - 1:55 pm | नमिता श्रीकांत दामले

धन्यवाद

मनिमौ's picture

14 Mar 2017 - 3:22 pm | मनिमौ

मला वाटते मिपा वर तुमचा लेख पहिल्यांदाच आलाय. स्वागत आहे

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2017 - 3:28 pm | श्रीगुरुजी

प्रकाशचित्रे आणि वर्णन आवडले. इतर ट्रेकबद्दल सुद्धा लिहा.

स्वच्छंदी_मनोज's picture

14 Mar 2017 - 4:47 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्त लेख आणी फोटो.
हरीहर त्याच्या पायर्‍यांमुळेच प्रसिद्ध आहे. आमच्या तिन दिवसाच्या नाशीक ट्रेकची (पांडवलेणी - रामशेज - चांभारलेणी - ब्रम्हगिरी - हरीहर - कावनई) आठवण आली. आम्ही हरीहर निरगुड्पाड्यावरून चढलो होतो.

जव्हेरगंज's picture

14 Mar 2017 - 5:32 pm | जव्हेरगंज

सुंदर!

जगप्रवासी's picture

14 Mar 2017 - 6:29 pm | जगप्रवासी

लेख खुमासदार झालाय पण फोटो खूपच कमी आहेत. गडाचे फोटो काढले नाहीत का? म्हणजे पाण्याचे टाके, सदर, बुरुज वगैरे.

हरिहरगडालाच हर्षगड म्हणतात का?

अत्रुप्त आत्मा's picture

14 Mar 2017 - 10:41 pm | अत्रुप्त आत्मा

छान लिवलया..
पन फोटू अजून पायजेवते.

दुर्गविहारी's picture

15 Mar 2017 - 7:12 pm | दुर्गविहारी

मस्त वर्णन पण फोटोमधे जरा कंजुषी केली आहे. कितीतरी वर्षे हा किल्ला माझ्या लिस्ट्वर आहे. केव्हा योग येतोय बघुया.
एक विनंती तुकाराम डहाळे मास्तरांचा मोबाइल क्रमांक इथे देउ शकता का ? किंवा व्य.नि. हि केला तरी चालेल. मला जाताना उपयोगी पडेल. तसेच अशोकचा नंबरही द्या.
अजुन ट्रेक केले असतील तर त्यावर लिहा. पु. ले. शु.

कविता१९७८'s picture

16 Mar 2017 - 12:50 pm | कविता१९७८

मस्त लेख

पाटीलभाऊ's picture

4 Apr 2017 - 10:51 am | पाटीलभाऊ

मस्त वर्णन आहे पण फोटू दिसत नाहीयेत...लिहीत राहा.
ट्रेकला जाण्या आधी कळवत जा...जमल्यास आम्हीही येऊ.

मस्त..
काही फोटो दिसत नाहीत.