जेनच्या नायिका

Primary tabs

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in लेखमाला
8 Mar 2017 - 6:22 am

.

.मी जिच्याशी सतत स्पर्धा करायचे, अशा एका मैत्रिणीकडून 'प्राइड अँड प्रिज्युडाइस'बद्दल ऐकलं, आणि त्या ईर्ष्येने तेव्हा ते वाचून काढलं होतं. ते वय ते कळण्याचं नव्हतंच, महान नाव असलेल्या अशा पुस्तकाबद्दल प्रामाणिक अभिप्राय देण्याचंही नव्हतं. तो देण्याइतपत शिंगं फुटली, तेव्हा हे बालपणीचंच इम्प्रेशन मनात कायम असल्याने 'जेन ऑस्टिन बकवासच' हे मांडायला सुरुवात झाली. काय ती रटाळ, कंटाळवाणी बॉलची वर्णनं, काय ते लग्न हे एकमेव ध्येय वगैरे वगैरे. अशीच कधीतरी हातात पडली ती बीबीसीची १९९५ची 'प्राइड अँड प्रिज्युडाइस'ची सिरीज. आणि मग सगळं सगळं बदललं (कॉलिन फर्थच्या डार्सीची किमया, दुसरं काय?) आणि जेन ऑस्टिन नव्याने भेटली. आणि मग जेवढी वाचेन तेवढी पुरेच ना. त्या पाठोपाठ एमा, मग मॅन्सफील्ड पार्क, मग सेन्स अँड सेन्सिबिलिटी, मग पर्सुएशन आणि मग परत आलेला कंटाळा. तिचं शेवटचं 'नॉर्थेंगर अ‍ॅबी' तेवढं वाचून पूर्ण कधीच केलं नाही. पण तिच्या नायिका मात्र विशेष आवडून गेल्या.

यातली एलिझाबेथ बेनेट फारच प्रसिद्ध. त्या पुस्तकातील तिचं वय ओलांडून काहीसं पुढे आल्यावरही मला कौतुक वाटतं तिच्या ठामपणाचं. आपल्या चक्क लाज आणणार्‍या कुटुंबावरही मनापासून प्रेम करणारी ही बया आपलं राहतं घरही वडिलांच्या मृत्यूनंतर दुसर्‍याकडे जाणार आहे, हे माहीत असून 'मी प्रेमासाठीच लग्न करेन' असं म्हणायचं धाडस दाखवते. आणि नुसतं दाखवत नाही, तर जेव्हा ते घर ज्याला मिळणार आहे तो मूर्ख माणूस हिला मागणी घालतो, तेव्हा त्याला स्पष्ट नकार देते. एका मोठ्या नावाच्या आणि त्या मोठ्या नावाला भरपूर मिरवणार्‍या, स्वतःची हांजी हांजी करणार्‍या लोकांना जमवणार्‍या, थोड्याशा भीतिदायकच असणार्‍या लेडी कॅथरीनसमोर बेधडक आपली मतं मांडते. इतकंच नाही, तर प्रेमासाठी लग्न करण्याच्या निश्चयावर एवढी ठाम राहते की अतिश्रीमंत डार्सीची मागणीही नाकारते. आपल्या लाडक्या, सुंदर आणि हळव्या बहिणीवर - जेनवर - नुसतं प्रेम करते असं नाही, तर मूर्खपणे वागणार्‍या, सगळ्यांवरच संकट आणणार्‍या लिडियाच्या काळजीनेही अस्वस्थ होते.. आणि खरोखर डार्सीच्या प्रेमात पडली आहे असा साक्षात्कार होतो, तेव्हा मोहरूनही जाते. प्रेमळ, मनमिळाऊ, पण ठाम मतं असणारी लिझी त्या काळाचा विचार करता स्वतंत्र व आधुनिकच म्हटली पाहिजे.

आणि तिच्यापेक्षा अगदीच वेगळी म्हणजे एमा. एमा ही म्हातार्‍या, सतत तब्येतीची कटकट करणार्‍या वडिलांसोबत राहून त्यांची श्रीमंत इस्टेट सांभाळणारी अतिशय स्वतंत्र विचारांची मुलगी. पण एमाला या स्वतंत्रपणाचा इतका अभिमान आहे की कधीकधी चक्क तिचा कान पिळावासा वाटतो. काहीशी अतिशहाणी एमा मुळात आहे प्रेमळ. पण स्वतंत्र मतं असण्याच्या तिच्या अट्टाहासात हा प्रेमळपणा लपून जातो. जगाचं भलं करायचे उपद्व्याप करण्याची तिची नसती हौस आणि त्यामुळे होत जाणारी गुंतागुंत ही काही वेळा तर मजेशीर वाटू लागते. यात भरकटत जाणार्‍या तिला सतत टोचून बोलत का होईना, पण प्रेमाने वाटेवर आणणार्‍या मि. नाईट्लीचं पात्र फार समजूतदार. तिच्या चुकांतून, मुळात भुसभुशीत पाया असल्याने फिसकटलेल्या कल्पनांतून सावरत ती शिकते, प्रगल्भ होते. हा तिचा नव्याने आलेला प्रगल्भपणा 'एमा' कादंबरीचा मला जीव वाटतो.

'मॅन्सफील्ड पार्क'मधली नायिका 'फॅनी' आणखीनच वेगळी. अतिशय गरीब घरातून श्रीमंत मावशीच्या घरी येऊन चार मावसभावंडांच्या छायेखाली आणि मावशीच्या उपकाराखाली दबून गेलेली ही बिचारी नायिका. नायिका म्हणण्यासारखं तसं हिच्यात काहीच नाही. चार भावंडांपैकी एकट्या एडमंडशीच काय ते तिचं जमतं. पण गावात सुट्टी घालवायला आलेल्या एका भावा-बहिणीची जोडी यांच्या घरात प्रवेश करते आणि फॅनी आणखी मिटू लागते. तिचा लाडका एडमंड त्या मुलीच्या प्रेमात पडतो, हे हिच्या हृदयाला झेपतच नाही. तिचे ठळकपणे दिसणारे दोष एडमंडला कसे दिसत नाहीत, याचा ती मनोमन आक्रोश करत राहते. फॅनी काही जीव लावणारी नायिका नव्हे. पण जेन ऑस्टिनच्या सर्व नायिकांमध्ये एखाद्या घटनेच्या विश्लेषणात न एकदाही चुकणारी अशी ही एकमेव नायिका.

. 'सेन्स अँड सेन्सिबिलिटी'मध्ये तर जोड-नायिका आहेत. प्राइड अँड प्रिज्युडाइसमध्ये जरी एलिझाबेथ आणि जेन या दोघींबद्दलही बरंच काही असलं (आणि शेवटी दोघींचीही लग्नं होऊन 'साठां उत्तरांची कहाणी' वगैरे होत असलं), तरी त्याची नायिका म्हणून निर्विवादपणे एलिझाबेथच कादंबरीभर वावरते. इथे मात्र परिस्थितीने गांजलेल्या एलिनॉर आणि मरियान सुरुवातीपासूनच अगदी विरुद्ध स्वभाव असणार्‍या नायिका म्हणून दिसू लागतात. मनात काहीही असलं तरी ते पटकन बोलून दाखवायचं नाही, कधीकधी अगदी वेळ उलटून गेली तरी, असा शांतपणा असणारी एलिनॉर; तर जे मनात असेल ते पटकन करून टाकणारी, सगळं काही उत्कटपणे करणारी मरियान. यांचे स्वभाव तर कधी फारसे बदलत नाहीत, पण त्यांच्यामुळे कादंबरी निरनिराळी वळणं घेत जाते. शेवटी लग्न आणि सुखी संसार या ऑस्टिनीय वळणावर येऊन संपते.

'पर्सुएशन'मधली अ‍ॅन ही एलिझाबेथसारखीच काहीशा विक्षिप्त कुटुंबात अडकलेली. पोकळ वाशांचासुद्धा अभिमान धरणार्‍या घरात घुसमटत राहणार्‍या अ‍ॅनला त्यांच्या प्रतिष्ठेला तिच्या घरच्यांच्या मते न शोभणार्‍या फ्रेडरिककडून आलेली मागणी स्वीकारायचं धार्ष्ट्य दाखवता येत नाही, पण ती त्याच्या आठवणीत कुढत राहते. जेनच्या नायिका कुणाच्यातरी प्रेमात पडतात, पटकन लग्न करतात आणि संसारात सुखी(च) होतात असं सरसकटीकरण होऊ नये, म्हणूनच अ‍ॅन जन्मलेली आहे. सात वर्षं काढते ती त्याच्या आठवणीत. आणि तो परत आल्यावरही लग्नाची अपेक्षा करत नाही. आशा सोडून दिलेलं प्रेम त्यांना कसं पुन्हा भेटत जातं, याची कथा या कादंबरीला वेगळ्या प्रकारे प्रगल्भ ठरवते. इतर नायिकांना एक सर्वसामान्य सामाजिक प्रतिष्ठा आणि बर्‍यापैकी पैसा असणारे नवरे जेन ऑस्टिनने शोधून दिले. अ‍ॅनला मात्र खरोखरचं निखळ सुख शोधून देऊन, मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या या कादंबरीला एक वेगळेपण दिलं.

जेन ऑस्टिनच्या नायिका या काही समाजाविरुद्ध बंड वगैरे करून उठणार्‍या नव्हेत. पण लग्न हे सुखाचं एकमेव परिमाण असताना त्यांच्या डोक्यातल्या विचारप्रक्रिया जेन अतिशय प्रभावीपणे मांडते. स्वतःच्या नायिकांवर तिचं काही फार आंधळं अपत्यप्रेम नाही. प्रत्येकीच्या गुण-दोषांची चिकित्सा ती कधी स्पष्टपणे, कधी उपहासात्मक, तर कधी किंचित जाणवून जावी इतपत प्रमाणात करते. तिची सहावी कादंबरी वाचण्यात इतका कंटाळा आला की ती मी चक्क सोडून दिली. पण या राहिलेल्या पाच कादंबर्‍यांमधल्या सहा नायिका कमी-अधिक प्रमाणात सख्या वाटाव्यात, इतकं माणूसपण जपून आहेत. अक्कल जागेवर ठेवून स्वप्नाळू होणार्‍या या नायिकांसाठी जेन ऑस्टिनची भुरळ पडली, हे एक माझ्यासाठी चांगलंच घडलं असं म्हणावं लागेल.

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

पैसा's picture

8 Mar 2017 - 11:52 pm | पैसा

खास पिशी स्टाईल छान लेख!

पद्मावति's picture

9 Mar 2017 - 12:10 am | पद्मावति

सुरेख लेख.

सानिकास्वप्निल's picture

9 Mar 2017 - 3:48 am | सानिकास्वप्निल

वाह! जेन ऑस्टेनच्या नयिकेंबद्दल उत्तम लिहिले आहेस. फार फार आवडला लेख पिशी :)

आवडलंच. सगळ्याजणी एका ठिकाणी भेटल्या. :)
हा विषय निवडल्याबद्दल विशेष धन्यवाद.

नुकतच मॅन्सफिल्ड पार्क वाचायला वर काढलंय आणि तुझा लेख आला!
मला आवडते जेन. त्या काळातलं ब्रिटिश वातावरण डोळ्यासमोर उभं राहतं.
तिची फॅनी त्या मानाने कमी प्रसिध्द असली तरी मला ती फार आवडते!

प्रीत-मोहर's picture

10 Mar 2017 - 9:37 am | प्रीत-मोहर

खूप छान विषय निवडलास पिशे. मला नेहमीच तिच्या नायिकांची सामाजिक स्टेटस आणि आर्थिक स्थैर्यासाठी लग्नावरची डिपेंडंसी कुठेतरी खटकत आलीय. पण तुझ्या लेखामुळे थोड्याफार आवडतीलही कदाचित. वाचेन एक्दा परत.

पिशे तुज्या नजरेतुन दिसलेल्या या नायिकांबद्दल वाचायला आवडले.छान विषय.

पूर्वाविवेक's picture

11 Mar 2017 - 11:46 am | पूर्वाविवेक

अभ्यासपूर्ण केलेलं परीक्षण फार आवडलं. तुझे लेख नेहमीच असे असतात.
रचक्याने हि पुस्तक मराठीत अनुवादित झाली आहेत का?

पिशी अबोली's picture

13 Mar 2017 - 7:44 pm | पिशी अबोली

सर्व वाचक-प्रतिसादकांना धन्यवाद.

पूर्वाताई, निश्चित माहीत नाही मला मराठीत झालेत का, आणि चांगले कोणते ते. बघते चौकशी करून.

सविता००१'s picture

14 Mar 2017 - 12:28 pm | सविता००१

मस्त लिहिलं आहेस गं. फार आवडलं.

मनिमौ's picture

14 Mar 2017 - 12:41 pm | मनिमौ

नवनवीन पुस्तक तुझ्यामुळे मुद्दाम मिळवून वाचली जातात. आता ही पुस्तके वाचताना तुझ परिक्षण कायम डोक्यात असेल बघ

सानझरी's picture

14 Mar 2017 - 1:39 pm | सानझरी

मस्तं लिहिलंय परीक्षण!!

स्मिता.'s picture

14 Mar 2017 - 2:20 pm | स्मिता.

भूतकाळात अनेक वेळा प्राइड अँड प्रिज्युडाइस वाचायला घेवून सोडून दिलंय. एकदा तर ऑडिओ-बूकचाही प्रयत्न केला होता, पण निष्फळ! आणि मग मीसुद्धा 'जेन ऑस्टिन बकवासच' हे मत बाळगून होते.
हा लेख वाचून बीबीसीची प्राइड अँड प्रिज्युडाइस सिरीज पाहिली आणि जेनच्या प्रेमात पडले. लगेच पाठोपाठ एमा सुद्धा बघून घेतली, आवडलीच! फक्त खटकली ती एकच गोष्ट की सगळ्या नायिका, सहनायिका केवळ प्रेम-लग्न-आर्थिक स्थैर्य एवढ्याकरताच धडपडत असतात. परंतु नंतर विचार करतांना वाटलं की का आपण कथानायिकेकडून कायम प्रवाहाविरूद्धच जाण्याची अपेक्षा करावी? नायिका चारजणींसारखी नसावीच का? जेनच्या कथा-कादंबर्‍यांमधला काळात आणि त्या सामाजीक वर्तुळात कदाचित तीच 'अचिव्हमेंट' असावी! आपण आपल्याच मनाला प्रश्न विचारला तर आजच्या काळातही आपलं प्रांजळ उत्तर हेच असतं की आपल्याला जीवापाड प्रेम करणारा नवरा आणि आर्थिक स्थैर्य हवं असतं.

कविता१९७८'s picture

14 Mar 2017 - 5:33 pm | कविता१९७८

पिशे मस्त लेख

मला तर बर्याच कथा-कादंबर्‍यां वाचयचा आहेत , सुरुवात आता जेन पासुनच :)

बर्‍याच वर्षांपुर्वी प्राइड अँड प्रिज्युडाइस वाचायचा विचार केला होता पण अजुन तो आचरणात आलेला नाहिये, तुझा लेख वाचुन पुन्हा एकदा राइड अँड प्रिज्युडाइस वाचावे असं वाटायला लागलं आहे.

लेखाबद्दल तर काय बोलणार? नेहमीप्रमाणे मस्त मस्त सहज ओघवते लिखाण.

पिशी अबोली's picture

20 Mar 2017 - 1:04 pm | पिशी अबोली

सर्व वाचक-प्रतिसादकांचे आभार!

भुमी's picture

23 Mar 2017 - 2:09 pm | भुमी

जेनच्या नायिकांची ओळख आवडली.

विचित्रा's picture

23 Mar 2017 - 4:44 pm | विचित्रा

लेख आवडलाच, पण यामध्ये प्रतिनायिका लेडी सुझनचा उल्लेख राहिलाय. ही पत्ररुप कादंबरी जेनच्या आयुष्यात किंवा नंतरही प्रकाशित झाली नसली, तरी सध्या जालावर उपलब्ध आहे. सौंदर्य आणि संभाषणकौशल्याच्या जोरावर लोकांचा वापर करुन घेणारी स्वार्थापायी स्वतःच्या मुलीचीही गय न करणारी ही प्रतिनायिकाही उल्लेखनीय आहे.
जेनचे विशेष गुण म्हणजे तिच्या आत्मविश्वासपूर्ण निर्भीड नायिका ( फँनी आणि अँनचा अपवाद ), तिरकस विनोद आणि उपरोधिक संवाद. उदा. जेव्हा एलिझाबेथची आई ,तिच्यावर ,श्री कॉलीन्स यांचा विवाहप्रस्ताव स्वीकारण्यासाठी दबाव आणते, अन्यथा तिचं तोंड न पहाण्याची धमकी देते, तेव्हा तिचे वडिल शांतपणे सांगतात , " तू कोणताही निर्णय घेतलास, तरी आईवडीलांपैकी एकाला तुला मुकावंच लागेल, कारण हा प्रस्ताव स्वीकारलास तर मी तुझं तोंड बघणार नाही."
जेनच्या कादंबर्या ' क्लासिक्स' मध्ये गणल्या जात असल्या तरी त्यावर टीकाही भरपूर होते. योगायोगांची रेलचेल आणि रटाळ एकसुरीपणा याशिवायचे मुख्य आक्षेप म्हणजे नोकरचाकरांच्या गराड्यात वावरणार्या तिच्या नायिका नेहमी उच्चमध्यमवर्गीय , उमरावकुलीन असतात. त्यांच्या कला, शिक्षण, संगीत या सर्व उपलब्धी फक्त लग्नाच्या बाजारात पत वाढवण्यासाठी असतात. तत्कालीन बदलते समाजजीवन, ब्रिटीश वसाहतवाद, गुलामांची परंपरा, औद्योगीक क्रांती असे उल्लेख कुठेही नाहीत. कष्टकरी समाजाचं कुठेही प्रतिबिंब नाही.
हे सगळे आरोप मान्य करुनही मला जेन आवडते. कारण तिच्यामुळेच वाघिणीच्या दुधाची चव प्रथम चाखली. शिवाय दारिद्र्य , स्त्री म्हणून साधनांच्या आणि अनुभवांच्या मर्यादा आणि अल्पायुष्य या सगळ्या अडचणींमधून तिने लिहिलं.
शिवाय बासुंदीचं गोड जेवण जेवताना त्याच वेळी झणझणीत मटणाच्या रश्श्याची अपेक्षा करणं कदाचित चुकीचं ठरेल.

पिशी अबोली's picture

25 Jun 2017 - 12:18 pm | पिशी अबोली

या प्रतिसादावर बोलायचं राहून गेलं होतं..

लेडी सूझन फार वेगळं आहे हे खरंच..

शिवाय बासुंदीचं गोड जेवण जेवताना त्याच वेळी झणझणीत मटणाच्या रश्श्याची अपेक्षा करणं कदाचित चुकीचं ठरेल.

Perfect.

एमी's picture

24 Jun 2017 - 12:06 pm | एमी

https://www.theguardian.com/books/2017/jun/23/atwood-ishiguro-mcewan-jan...

Pride and Prejudice “set a bad example” to the 12-year-old Margaret Atwood, she has scribbled, by exposing the young girl to “a hero who was unpleasant to the heroine, but later turned out to be not only admirable and devotedly in love with her, but royally rich … Were underage readers of this book, such as myself, doomed to a series of initially hopeful liaisons in which unpleasant men turned out to be simply unpleasant?”
Atwood adds: “I especially liked the scene in which Elizabeth Bennett [sic] stands down Lady de Bourgh. I longed to do the same to my gym teacher, but occasion never offered.”

२००५ सालचा प्राईड अँड प्रिज्युडाइस ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी:

http://sundayfreedom.com/2010/06/21/my-favorite-mr-darcy-and-lizzie-scen...

http://sundayfreedom.com/2010/06/21/my-favorite-mr-darcy-and-lizzie-scen...