सध्या सायकल सायकल ग्रुप मध्ये प्रेरणेचा सुळसुळाट झाला आहे. डॉक श्रीहासने चॅलेंजची आईडिया काढल्यापासून लोक सुरूच झालेत. चॅलेंजच प्रकरण निघालं त्यावेळी मी सुद्धा काहीतरी व्यायाम प्रकार शोधत होतो जो रेग्युलरपणे करायला जमेल, याचवेळी एका मित्राची सायकलसुद्धा मिळाली. अशा प्रकारे सगळे योग जुळून आल्यामुळे माझं सायकलिंग सुरु झालं. आठवड्यात किमान ५ दिवस साधारण १५-२० किमी माझं सायकलिंग सुरु होतं.
एका रविवारी सायकल सायकल ग्रुपचा युनिव्हर्सिटीला भेटण्याचा बेत ठरला. त्या भेटीत अनुभवी लोक त्यांच्या जुन्या सायकल राईडांच्या आठवणींना उजाळा देत होते. बोलता बोलता शेतकरी हॉटेलचा विषय निघाला. केदार म्हणे मारुया एक राईड, खडकवासला परिक्रमा करू, मध्ये निलकंठेश्वर मंदिरात जाऊ आणि येता येता शेतकरी मध्ये भोजन करून येऊ घरी. ६०-६५ किमीची राईड होईल, दुपारपर्यंत येऊ घरी. म्हणलं चला हरकत नाही, मी ३० किमी सहजपणे मारू शकत होतो तेव्हा ६० सुद्धा होऊनच जातील.
घरी गेल्यावर केदारने राईडचा सविस्तर रस्ता ग्रुप वर टाकला. बघितले तर starting point होता वारजे पूल, म्हणजे माझ्या घरापासून वीस किमी. मग मी जरा विचारात पडलो, कारण हि राईड मला १०० किमी होणार होती. मी माझ्या दोनचार शंका ग्रुपवर बोलून दाखवल्या, म्हणलं मला काही एवढा अनुभव नाही, सायकल जड आहे वगैरे वगैरे. पण वर सांगितल्याप्रमाणे प्रेरणेचा सुळसुळाट तर होताच, माझ्या शंका पाहून अजून चहूबाजूंनी प्रेरणा धावून धावून यायला लागली. लातुराहून मानसभौंनी तर ट्रक भरून प्रेरणा पाठवली. यावर कळस केला तो किरण ने, तो म्हणे तू माझी सायकल चालव मी तुझी चालवतो. म्हणलं एवढा सपोर्ट असताना न जाण्याचं कारण ते काय, चला जाऊया!
राईडच्या आदल्या चिक्की बिस्कीट इत्यादी गोष्टी बॅग भरून घेतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला वारजे पुलापाशी पोहचायचे होते. झोपायला उशीर झाल्याने जागच पावणे सहाला आली. म्हणलं झालं, आता काय आपल्याला हे लोक भेटत नाहीत, आपण वारजे पर्येंत जाऊन पाहू, नाही भेटले तर नाश्ता करून येऊ घरी. असं करून सकाळी ६ ला राईड सुरु झाली. थोड्याच वेळात केदारचा फोन आला, लोकं झोपलेत म्हणे सगळे, सावकाश ये. म्हणलं बर झालं, तसही मला कमीतकमी एक तास लागणारच होता.
मॅप पाहत पाहत मी सव्वासातच्या आसपास वारजे पुलापाशी पोहोचलो. केदार आलेलाच होता. बाकी कोणी येणार नव्हते. आम्ही लगेच तिथून पुढे निघालो, थोड्याच अंतरावर किरण आम्हाला जॉईन झाला. थोडं गावाबाहेर पडल्यावर नितांत सुंदर नजारे असलेला रस्ता सुरु झाला. एका लयीत मस्तपैकी राईड सुरु होती. कानात बारीक आवाजात सुरु असलेले गाणे, डाव्या बाजूला स्वच्छ निळहिरवं पाणी, हिरवळीतून जाणारा नागमोडी काळा रस्ता, एका लयीत शांतपणे वाहणारा वारा, वाऱ्यामुळे पाण्यावर उमटणारे शांत निवांत तरंग, आल्हाददायक सूर्यकिरणांमुळे त्या तरंगांना येणारी चकाकी. सगळच अफलातून होत. हा आमच्या राईडचा हनिमून पिरिअड होता. आमची तंद्री लागली. मला अगदी छान स्वप्नातल्या रत्यावर सायकल चालवल्यासारख वाटत होतं. मला वाटलं पुढे पूर्ण रस्ता असाच आहे. बालपण असच होत, सगळ सोप आणि छान कायम तसच राहील असं वाटायचं. जसजसं पुढे जात गेलो तसे चढ उतार जाणवायला लागले.
चढ उतारांवरही अर्थात धमाल येत होती. चढताना थोडे कष्ट व्हायचे, पण लगेच पुढे उतार हजर असायचा श्रमपरिहार करायला. उतारांची गंमत कळल्यावर मग चढाचे कष्ट काही वाटेनासे झाले. उलट चढ आल्यावर पुढच्या उताराचा विचार करून अजून उत्साह यायचा.
समोरच्या रस्त्याचा नूर पाहून आपला गिअर सेट करण महत्वाच होत. उतारावर आलेल्या वेगाच्या खुमखुमीत चढलाहि टॉप गिअर मध्ये भिडलं कि वाट लागलीच समजा. तो तुमचं गर्वहरण केल्याशिवाय राहत नाही. मुख्य चढ सुरु असताना मग आपण धडपडून उभे राहून सायकल दामटायला बघतो, गिअर बदलायला लागतो, पण त्यावेळी चेनवर ताण इतका असतो कि गिअर सहजी बदलले जात नाहीत. अशावेळी आपण अगदीच टॉप गिअर मध्ये असू आणि चढहि तीव्र असेल तर उभ राहूनही सायकल चालत नाही. थांबवच लागतं. उतरून सायकल हातात घेऊन चढ पार करावा लागतो. मागे गेलेल्या उताराची हवा डोक्यातून काढून टाकून स्वतंत्रपणे पुढच्या चढाकडे बघता यायला हवं. उतार कितीही मोठा असला तरी त्याच्या जीवावर पुढचा संपूर्ण चढ चढता येत नाही.
असे चढ उतार चढ उतार खेळत आम्ही निलकंठेश्वराच्या पायथ्याशी पोहोचलो. किरणने विचारले जायचे का वरती. त्यावेळी सकाळपासून गर्दीस मिळवलेल्या काही छोट्या चढांमुळे माझ्यात वीररस संचारला होता, म्हणलं चला जाऊ. आणि निलकंठेश्वराचा चढ सुरु झाला............
आम्ही अगदी हळू हळू सायकल दामटत होतो. चढ तीव्र होता. मला वाटलं पुढे मस्त उतार असेल. कसलं काय, चढ चालूच राहिला. लोएस्ट गिअरवर चालवत कणाकणाने आम्ही पुढे सरकत होतो. तेही खूप अवघड जायला लागलं म्हणून मी उभ राहून सायकल दामटायला लागलो. रस्ता अगदीच खराब होता. सर्वत्र खडी परसलेली. शेवटचा गिअर टाकून, उभे राहूनही पुरेना, पुढचं चाक उचललं जाऊ लागलं. मग सरळ सायकलवरून उतरून सायकल हातात घेऊन चालायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं माझ्या सायकलच्या मागच्या चाकातली हवा गेलेली आहे. किरणकडे असलेल्या पंपाने हवा भरून घेतली. थोडं पुढे गेल्यावर आम्ही तिघांनी पुन्हा सायकल चालवण्याचा प्रयत्न केला. काही मीटरपर्यंत टिकलो नंतर परत उतरून चालायला लागलो. थोड्या वेळात लक्षात आलं माझ्या सायकलची हवा पुन्हा गेलेली आहे. बहुतेक ट्यूब पंक्चर झाली होती. तेव्हा आम्ही पूर्ण वर (पार्किंगपर्यंत) पोहोचलेलो होतो. मला वाटलं झाली भानगड आता, असच गावापर्यंत जावं लागणार. मी या दोघांना सांगितलं. त्यांनी लगेच एका झाडाखाली थांबून सायकल आडवी केली, पंक्चर किट होतच दोघांकडे, दहा मिनटात पंक्चर काढून झालं. ज्या सहजतेने त्यांनी ते घेतलं आणि पंक्चर काढूनही टाकलं ते मला अमेझिंग वाटलं. आपण उगाच बाऊ करतो काही गोष्टींचा, करायला घेतलं तर होऊन जातात त्या पटकन.
निलकंठेश्वराला मंदिरात जायला पार्किंगमध्ये सायकली लाऊन चालत वर जायचे होते. आम्ही काही वर गेलो नाही. पार्किंगमधूनचच देवाला रामराम केला, लिंबू सरबत प्यायलो आणि निघालो. आता न थांबता शेतकरी गाठायचा विचार होता. एवढा चढ चढून आल्याने आता उतारच उतार होता. पण हा उतार काही मागच्या सारखा मजेशीर नव्हता. अगदी सांभाळून सायकल चालवावी लागत होती. आला उतार सुट सैराट म्हणून सुटलो असतो तर सायकल पलटी होऊन कपाळमोक्षच झाला असता. दोन्ही ब्रेक दाबून, स्पीडचा मोह टाळत सावकाश सायकल उतरवावी लागली.
पूर्ण खाली आल्यावर पुढे एका पुलावर थांबलो, दोनचार फोटो झोडले. पुलाखालून खळखळून झरा वाहत होता, डुंबायचा मोह होत होता खरा, पण आम्ही फार न थांबता तेथून निघालो. आतापार्येंत ५० किमीची राईड होऊन गेली होती. केदारने मॅपवर पाहिलं, पुढे १० किमीवर शेतकरी होतं. पाऊणेक तासात आम्ही तिथे पोहोचणार होतो. एका सुरात आमचं सायकलिंग सुरु झालं.
बराच वेळ झाला शेतकरी काही येईना. किती वेळ झाला सायकलच चालवतोय, कुठाय हे हॉटेल. केदारने आपला अवसानघात होऊ नये म्हणून अंतर कमी तर नाही सांगितलं? शेतकरी अजून २० किमी पुढे असेल तर? मनाचे खेळ सुरु झाले. मन जेव्हा डेस्टिनेशनची वाट पाहत असत तेव्हा रस्ते अवघड आणि कंटाळवाणे वाटतात, तेच रस्त्याची मजा घेत गेलं तर डेस्टिनेशनला कधी पोहोचलो कळत सुद्धा नाही.
शेतकरीची वाट पाहत मी कशीतरी सायकल दामटत होतो. केदार माझ्या पुढे होता, मी मध्ये आणि किरण मागे. शेवटी एकदाचा केदार एका ठिकाणी थांबला, म्हणलं चला, फायनली पोहोचलो आपण. पण कसलं काय, हा पठ्ठ्या आम्ही सायकल चालवत येतानाचे फोटो काढायला थांबला होता. मी पुन्हा जड मनाने सायकल दामटायला लागलो. मला वाटलं हॉटेल बंद पडलय अन् ते शोधत शोधत आपण आता पुण्याला पोहोचणार. तेवढ्यात केदार माझ्या पुढे गेला आणि थोड अंतर गेल्यावर ‘उजवीकडे’ अशी खूण केली. मी मनात मुद्दाम एकदम आनंदी नाही झालो. म्हणलं न जाणो इथेही एखादा फोटोसेशन स्पॉट असायचा. पण नाही, यावेळी माझ्या स्वतःच्या डोळ्यांना शेतकरीचा बोर्ड दिसला. म्हणलं व्वा, हे खरोखरच आलं म्हणायचं.
शेतकरीला पोहोचल्यावर मस्त गार पाण्याने तोंड धुतले आणि जेवायला बसलो. शारीरिक थकवा फार जास्त जाणवत नव्हता. शरीराची कॅपेसिटी खरी भरपूर असते, थकत ते मनच. मनाला खेळवत ठेवता आलं तर शरीर अशा कित्येक मोहिमा पार करून नेईल.
गप्पा मारत मारत मग आमचं जेवण पार पडलं. जेवण झाल्यावर त्या भल्यामाणसाने आम्हाला एका झाडाखाली पाठ टेकायला म्हणून चटई घालून दिली. आम्ही तिथे जाऊन जरावेळ पडलो. पाठ टेकल्यावर आलेला थोडाफार थकवाही पळून गेला. आर्धा तास विश्राम करून आम्ही निघालो.
राईडचा शेवटचा टप्पा सुरु झाला होता. आता डायरेक्ट खडकवासला चौपाटी कडून पुणे. शेवटचे पस्तीस एक किमी बाकी होते. मध्ये फक्त खानापूरच एक चढण लागणार होत, नंतरचा रस्ता बऱ्यापैकी सपाट असणार होता. चढ किती आहे ते आजीबात न बघता मान खाली घालून गपगुमान सायकल चालवायची असं ठरलं. घरातून निघून एव्हाना मला आठ तास होऊन गेले होते. लहान मुलाला बराच वेळ बसवून ठेवल्यावर त्याची चुळबुळ सुरु होते तशी मनाची चुळबुळ सुरु झाली होती. मी गाणे लाऊन इअरफोन्स कानात घातले आणि सायकलवर टांग मारली.
मजल दरमजल करत खाली मान घालून आम्ही सायकल चालवत होतो. समोरच फक्त पाच फुटावरच दिसेल एवढ मी डोक खाली करून ठेवलं खरं, पण अचानक समोर काहीतरी यायचं आणि वर बघव लागायचं. ‘थोडाफार चढ मग लगेच उतार’, मन तेवढ्यात सगळं बघून घ्यायचं. त्यात कानातले गाणे बंद होऊन बाsरीक आवाजात कुठलेसे भाषण लागले, watsapp ऑडीओ असणार, मनाने ते ऐकायला साफ नकार दिला आणि स्वच्छंदी पणा करू लागले. खूप मोठा उतार आला कि आता खूप मोठा चढ लागणार म्हणून ते मला घाबरवू पाहत असे. मी मनाला निलकंठेश्वरच्या चढाचा रेफरन्स देऊन ठेवला होता. त्या मानाने हे चढ काहीच नव्हते. त्यामुळे मन ‘मुख्य चढाची’ वाट पाहत बसून राहिले. तेवढा मोठा चढ काही आला नाही. असेच खानापूर पास होऊन गेले. चढाची वाट पाहत बसलेलं मन आता जरा मोकळं झालं. सीट बोचतंय जरा, तळहात पण दुखताएत. मनाने नवा शोध लावला. म्हणलं बस गप आता, शेवटचे २५ किमी आहेत. आपल्या रोजच्या राईड एवढं अंतर. जाईल झटक्यात निघून.
एव्हाना केदार पुढे निघून गेला होता. मी आणि किरणने खडकवासला चौपाटीवर एकेक लिंबू सरबत प्यायलो, गोष्टींना मिनिटभर आराम दिला आणि निघालो. पुढे काही किलोमीटर नंतर किरण त्याच्या घराकडे वळणार होता. जायच्या अगोदर त्याने मला घरी गेल्यावर करायचे स्ट्रेचिंग सांगितले आणि पोहोचल्यावर मेसेज कर सांगून तो निघून गेला.
मला अजून एकदीड तास लागणार होता. माझा एकट्याने प्रवास सुरु झाला. पुढे एके ठिकाणी जरा हिरवळ होती तेथे थांबलो, मिनिटभर पाठ टेकवली, चिक्की खाऊन जरा पाणी प्यायलो, गाण्याचा आवाज थोडा वाढवला आणि निघालो. आता वर्दळीचा रस्ता होता. समोर येणारे लोक, गाड्या यातून वाट काढण्यात मन गुंतून गेल. म्हणलं बरय, असच चालू राहूद्या, गर्दी, खराब रस्ते असं काही असलं म्हणजे मन कामात राहील. रिकामं राहिल कि काहीतरी धिंगाणा घालत. अधेमध्ये लोकांना रस्ता विचारत बरोबर रस्त्यावर असल्याची खात्री करून घेत होतो. मला आजीबात रस्ता चुकायचा नव्हता. कर्वे पुतळा आल्यावर जरा हायसं वाटलं. सीटवर बसायला त्रास होत होता, उतरून सायकल हातात घेतली आणि आरामात चालू लागलो. शेदोनशे मीटरवर नीरावाला दिसला. मला कधीची सब्जा टाकलेला नीरा प्यायची तल्लफ लागलेली. मी लगेच फारसा विचार न करता ग्लासभर नीरा प्यायलो. अगोदर पाणी प्यायलेल असल्याने पोट जरा भरल्यासारख झालं. किरण गेल्यानंतर एवढ्याशा वाटेत दोनतीन ब्रेक झाले होते. आता म्हणलं मारा फायनल, थेट घर गाठायचं आता, बास झालं.
सायकलवर बैठक जमवली. शांतपणे एक दोन एक दोन करत पायडल मारायला लागलो. लॉ कॉलेज रोड येईपर्येंत मन एकदम शांत होऊन गेलं होतं. माझं जग सीमित होऊन मी आणि माझी सायकल एवढच उरलं. आजूबाजूचे आवाज अंधुक झाले. सायकल चालवताना चेनच्या येणारा लयबद्ध आवाजासोबत मन एकरूप झालं. सेनापती बापट रोड लागला. बालभारतीचा चढ आला, गेला. पुढे उतार, परत चढ, परत उतार. चढ आणि उतार आता माझ्यासाठी सारखेच होऊन गेले. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, हि सायकल चालूच राहणारे आयुष्यभर. किती वेळ सुख आणि दुःख यामध्ये झुलत राहणार आपण. उगाच उताराच्या मोहात मन अडकवू नये, आणि चढापासून दुरही पळू नये. कोणताहि उतार कायम टिकणारा नाही, ना कोणता चढ कायम टिकणार आहे. आपलं काम आहे पायडल मारणे, तेवढ आपण करत राहावं. अशाच कुठल्यातरी चढ किंवा उतारावर हा प्रवास थांबणार आहे. त्यावेळी समाधानी असावं म्हणजे झालं.
पुढे युनिवर्सिटी रस्ता लागला. हा संपला कि फक्त एक वळण त्यानंतर दोन चौक पार करायचे, मग दोन छोटी वळणे कि झालं!
अशा राईड्स खरं कशाला करतो आपण? कारण त्या तेवढ्याशा वेळात संपूर्ण आयुष्य जगता येत. घरापासून घरापर्यंत. सुरुवातीपासून शेवटापर्यंत. मातीपासून मातीपर्यंत. चढापासून उतारापर्यंत. दुःखा पासून सुखापर्येंत. उतारापासून पुढच्या आव्हानापर्यंत.
उताराची मजा घ्यायची म्हणलं तर चढ चढावाच लागतो. योग्य गिअर मध्ये, चिकाटीने पायडल मारत राहिले, तर चढ नक्की संपतो. इतकेच नाही तर चढाची मजासुद्धा घेता येते. चढ म्हणजे दुःख नाही अन् उतार म्हणजे सर्वस्व नाही, दोन्ही गोष्टी क्षणभंगुर आहेत हे उमगतं. उतारावर जरा संयम ठेवला, चढावर गिअर बरोबर टाकले, प्रसंगी उतरून चालण्याची तयारी ठेवली कि सगळं बरोबर होतं. चढाची भीतीही नाहीशी होते आणि उतारावरचा मोहसुद्धा जातो. चढ उतार दोन्ही सारखे होऊन जातात आणि माणूस त्या चक्रातून मुक्त होतो. मन सुखाची वाट पाहत बसत नाही आणि दुःखाचाही बाऊ करत नाही. उरतं ते फक्त समाधान. चढावर दाखवलेल्या चिकाटीचं समाधान, उतारावर दाखवलेल्या संयमाच समाधान. असा मुक्त झालेला जीव कुठेही थांबावं लागलं तरी समाधानाने थांबू शकतो. त्याच काहीच ‘राहून जात’ नाही. यालाच कदाचित समाधी अवस्था म्हणतात.
अशा तऱ्हेने राईडचा परिपूर्ण अनुभव घेऊन मी युनिवर्सिटी रस्ता सोडला आणि आत वळलो.......,
शेवटचा एक किमी अंतर उरलं होतं,
दोन चौक पार केले, आर्ध्या किमीवर घर,
पुढे एक वळण घेतलं........,
घर हाकेच्या अंतरावर आलं........,
एक शेवटचं वळण..,
पोहोचलो पार्किंगमध्ये !
सायकल लावली, stand लावला, बॅगेतून चावी शोधली, लॉक लावलं.
लिफ्टमधून वर गेलो. घरात गेल्यावर मन एकदम शांत होतं. बसून थोडं पाणी प्यायलो.
.
.
अनबिलीव्हेबल! शंभर किलोमीटर पूर्ण झाले, मनाचा आत्ता विश्वास बसला...!
प्रतिक्रिया
2 Mar 2017 - 3:37 pm | बंट्या
भारी !!!वाचून मजा आली ..
2 Mar 2017 - 3:37 pm | डॉ श्रीहास
आता पुढचा टप्पा दिडशे किमी चा असणार.... तो नव्या सायकलवर !! बरोबर की नाही ?
2 Mar 2017 - 4:11 pm | मोदक
सहमत.. मस्त लिहिले आहे.
भरपूर फोटो काढा.. इथे वृत्तांत देत रहा..
2 Mar 2017 - 3:39 pm | केडी
.....राइड ला मज्जा आली. आता लवकर नवीन सायकल घेऊन टाक, आणि पुढच्या लांब पल्ल्याच्या राईड्स ना सज्ज हो! बाकी लेख मस्त जमलाय, आणि हो, या पुढे बरोबर एक एक्सट्रा ट्युब बरोबर घायची विसरू नकोस! :-)
मी मागे व्हाट्सअँप ला पण टाकलेलं, हेच आता इथे लिहितोय (हे सर्व माझ्या बाबतीत तरी तंतोतंत लागू होतं).
Age, Weight and Distances are mere damn numbers!
2 Mar 2017 - 3:55 pm | देशपांडेमामा
राईड आणि लेख दोन्ही छान!
नविन सायकलकरीता शुभेच्छा !!! :-)
देश
2 Mar 2017 - 4:03 pm | शलभ
मस्त लिहीलंय..
2 Mar 2017 - 4:09 pm | एस
मस्त हो. भारी राईड झाली तुमची. पुसाशु.
2 Mar 2017 - 4:11 pm | फेदरवेट साहेब
खूप खूप शुभेच्छा, आमच्या काऊच पोटॅटो मनाला १०० किमी वाचूनच दम लागला हो. :(
2 Mar 2017 - 4:27 pm | sagarpdy
मस्तच हो. मजा आली वाचून. असेच फिरत राहा.
2 Mar 2017 - 10:36 pm | इरसाल कार्टं
खरोखरच मस्त.
2 Mar 2017 - 10:52 pm | अरिंजय
राईड आणी लेख दोन्ही भन्नाट झालेत प्रतिक. फक्त सायकल बदल आता.
2 Mar 2017 - 11:09 pm | जेपी
लेख आवडला.
3 Mar 2017 - 7:20 am | संजय पाटिल
फार सुंदर वर्णन आणि जबरदस्त राइड...
3 Mar 2017 - 10:57 am | सिरुसेरि
हुश्श.. छान वर्णन . प्रेरणेचा सुळसुळाट एकदम मस्त
3 Mar 2017 - 12:31 pm | प्रतिक कुलकर्णी
सर्व प्रतिसादकांचे आभार. सायकल घेण्याचा प्रस्ताव गांभीर्याने घेण्यात आलेला आहे.
@केडी <> #TrueStory
3 Mar 2017 - 12:34 pm | प्रतिक कुलकर्णी
@केडी > Age, Weight and Distances are mere damn numbers! >> #TrueStory
3 Mar 2017 - 12:45 pm | सुबोध खरे
१०० किमी सायकल चालवत म्हणजे फार झाले. साष्टांग दंडवत.
मागच्या रविवारी मी आपला मोटार सायकलवर सव्वाशे किमी ची राईड मारून आलो. बजाजची नवीन डॉमिनर घेतली आहे.(जाहिरात हो)बुलेट वाल्याना हूल द्यायला मजा आली.
फार वर्षांनी मोटारसायकलची एवढी रपेट झाली.
3 Mar 2017 - 12:48 pm | चष्मेबद्दूर
वर्नन अतिशय छान लिहिलय. दोल्यासमोर रस्ता उभा राहिला.
3 Mar 2017 - 1:08 pm | शिखरे
I want to buy new bicycle budget is Rs. 15000 to 17000 . I live in Saswad, Pune. Please help
3 Mar 2017 - 10:27 pm | अनिरुद्ध.वैद्य
शरीराची कॅपेसिटी खरी भरपूर असते, थकत ते मनच. मनाला खेळवत ठेवता आलं तर शरीर अशा कित्येक मोहिमा पार करून नेईल.
>>
छान वाक्य! बर्याचदा असेच जाणवतं!
14 Mar 2017 - 1:33 am | अमित खोजे
काय उत्साहवर्धक लेखन केलाय हो. इतक्या दिवसांचा आळस चाललाय माझा व्यायामाचा. तुमच्या सायकलच्या या वृतांताने पार घालवून टाकला. मागे कधीतरी एकदा ती सायकलची स्पर्धा मारली होती तिची आठवण झाली. आता सायकल घेऊन रपेट मारणे आले. खरोखरीच धन्यवाद.
14 Mar 2017 - 4:47 am | इडली डोसा
पुढील सायकल सफरीसाठी शुभेच्छा!
14 Mar 2017 - 8:06 am | अत्रे
छान लिहिलंय.
14 Mar 2017 - 12:05 pm | मनिमौ
पुढील स्वारी साठि शुभेच्छा
14 Mar 2017 - 1:02 pm | सविता००१
मस्त लिहिलंय. आवडली सफर.
शरीराची कॅपेसिटी खरी भरपूर असते, थकत ते मनच. मनाला खेळवत ठेवता आलं तर शरीर अशा कित्येक मोहिमा पार करून नेईल. हे वाक्य जबरी आवडलं.
14 Mar 2017 - 1:43 pm | सानझरी
झकास लिहिलंय!!
15 Mar 2017 - 10:45 am | नमिता श्रीकांत दामले
मजा आली वाचायला, फोटो असते तर नीळकंठेश्वराला नमस्कार केला असता.
आता सायकल घेऊन लाँग राइडला निघावं असं वाटलं
21 Mar 2017 - 11:42 am | प्रतिक कुलकर्णी
धन्यवाद मित्रहो. तुमचे प्रतिसाद पाहून मला सायकल चालवण्यासाठी आणि लिहिण्यासाठी आणखी हुरूप आला.
@अमित राईडला जाऊन आलात कि नाही मग :)
21 Mar 2017 - 4:48 pm | पैसा
छान वृत्तांत!